ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, February 5, 2011

६२ कुरुक्षेत्र

पानिपतनंतर पुढची भेट होती कुरुक्षेत्राची. त्याचा हा वृत्तांत.

*****************************************
इतिहासाला ज्ञात असलेल्या काळापासून या भूमीचे महत्त्व आहे. राजे बदलले, सत्ता बदलल्या, जगण्याची रीत बदलली........ या सगळ्याला कुरूक्षेत्र साक्षी आहे. या भूमीने कितीतरी संग्राम पाहिले. विनाशाच्या गर्तेतून पुन्हा पुन्हा बहरणारी ही भूमी. ती आपल्याला काय सांगेल याच कुतूहल मनात घेऊन १४ जानेवारीच्या संध्याकाळी आमचा प्रवास कुरुक्षेत्राच्या दिशेने सुरु झाला.

कुरुक्षेत्राबद्दल प्राचीन ग्रंथांमध्ये विविध उल्लेख आहेत. उत्तर्वेदी, ब्रह्मवेदी, धर्मक्षेत्र अशा अनेक नावानी हा भूभाग ओळखला जातो. कुरु वंशाचे साम्राज्य असणारी ही भूमी म्हणून हिचे नाव कुरूक्षेत्र हे सहज लक्षात येते. राजा कुरुने या भागात ४८ कोस परिसरातील भूमीवर सोन्याचा नांगर चालवला अशी एक कथा आहे. राजा कुरुने यातून धर्माचे बीज या परिसरात रोवले अशी एक धारणा आहे – म्हणून ते धर्मक्षेत्रही आहे.

आणखी एक कथा असे सांगते की, सगळीकडे अधर्म माजला म्हणून देव चिंतीत झाले. धर्मोत्थानासाठी कुरु स्वखुशीने तयार झाला – त्याच्या शरीराचे विष्णूने सुदर्शन चक्राने ४८ तुकडे केले. हे ४८ तुकडे जिथवर पसरले आहेत ते ‘धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र’ अशीही या परिसराची कथा आहे. हे क्षेत्र इतके पुण्यमय आहे की ब्रह्माने कुरुक्षेत्रापासून यज्ञाद्वारा विश्वाची निर्मिती केली असेही एक कथा सांगते.

कुरुक्षेत्रात आमचा पहिला कार्यक्रम होता तो ‘ज्योतीसर’ या ठिकाणी. श्रीकृष्णाने अर्जुनाला जेथे गीतेचा उपदेश केला ते हे ठिकाण असे परंपरा सांगते. आम्ही तेथे पोचलो तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. येथे संध्याकाळी ६.०० ते ७.०० असा तासाभराचा ‘Light and Sound show’ असतो. ‘विवेक’च्या स्थानिक हितचिंतक कार्यकर्त्यानी हा कार्यक्रम आमच्यासाठी तासभर पुढे ढकलण्याची तिथल्या व्यवस्थापानाला केलेली विनंती त्यांनी मान्य केल्यामुळे आम्हाला हा कार्यक्रम पाहता आला. ‘गारठ्यात उघड्यावर बसून हा कार्यक्रम तासभर पाहता येईल का?’ अशी आमच्या मनात आलेली शंका पहिल्या मिनिटातच नाहीशी झाली. समोरच्या विस्तीर्ण परिसरात रंगीबेरंगी दिव्यांच्या साहाय्याने, संस्कृत श्लोकांच्या पठणाने आणि ओघवत्या हिंदीत महाभारत युद्ध आमच्यासमोर सादर केले गेले. (आम्ही कार्यक्रमात रंगलेले असताना स्थानिक कार्यकर्त्यानी आम्हाला गरमागरम चहा आणि बिस्किटे देऊन आमची सेवा केली.) युद्धापूर्वी शांततेची बोलणी करायला धर्मराज तयार होतो तेव्हाचा द्रौपदीचा आक्रोश, आपल्याच लोकांशी आपल्याला लढायचे आहे हे पाहून अर्जुनाला आलेली हतबलता, अभिमन्यु वध, जयद्रथ वध, भीष्म पितामहांचे शरपंजरी पडणे, आत्म्याचे अमरत्व प्रतिपादन करणारे श्रीकृष्णाचे शब्द, विश्वरूपदर्शन, अश्वत्थामा वधाची हूल, दुर्योधन वध .. असे अनेक महत्त्वाचे प्रसंग थरारकपणे आमच्यासमोर मांडले गेले. एका तासाच्या मर्यादित वेळात महाभारत युद्धाचे प्रभावी सादरीकरण ही खरोखर अवघड गोष्ट आहे .. पण ती येथे सहज झाली होती.

जाट भवनातील सुखद मुक्कामानंतर आणि सकाळच्या नाश्त्यानंतर आमही पोचलो ते ‘भद्रकाली’ मंदिराच्या परिसरात. देशभरातील ५२ शक्तीपीठांपैकी हे एक. दक्षकन्या सतीने पित्याच्या इच्छेविरुद्ध शंकराशी विवाह केला. नाराज दक्षाने आपल्या घरच्या यज्ञसमारंभात सतीला आणि शंकराला बोलावले नाही. ‘घरचेच कार्य, त्याला आमंत्रणाची काय गरज’ या भावनेतून शंकराच्या मनात नसतानाही सती एकटीच दक्षाकडे गेली. त्या ठिकाणी दक्षाने सतीकडे पूर्ण दुर्लक्ष तर केलेच, शिवाय जमलेल्या पाहुण्यांसमोर शिवाची निंदा केली. हा अपमान सहन न होऊन सतीने प्राणत्याग केला. दु:खाने वेडेपिसे झालेल्या शंकराने यज्ञाचा विध्वंस केला, दक्षाचा वध केला आणि सतीचे शव हाती घेऊन प्रलयंकारी तांडव सुरु केले. विश्व लयाला जाणार या धास्तीने देवता मंडळाने शेषशायी विष्णूकडे धाव घेतली. विष्णूने सुदर्शन चक्राने सतीच्या मृत देहाचा वेध घेतला (विष्णूचे सुदर्शन किती वेळा चांगल्या लोकांवर सुटले आहे हे पाहण्यासारखे आहे!) आणि त्याचे ५२ तुकडे झाले. हे ५२ तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले, ती शक्तीपीठे झाली अशी आख्यायिका आहे.

महाभारत युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी पांडवानी भद्रकालीची पूजा केली होती आणि तिने त्याना विजयाचा आशीर्वाद दिला होता अशी कथा आहे. ही देवी ‘जागृत’ आहे – भक्तांच्या मनोकामना ती पूर्ण करते अशी त्यांची श्रद्धा आहे. शनिवार हा या देवीचा विशेष दिवस असल्याने देवळात भरपूर गर्दी होती. देवीची मूर्ती छान सजवलेली होती. तिच्या समोरच्या भागात बांधलेल्या असंख्य घंटा किणकिणत होत्या. एका झाडाला भक्तांनी बांधलेले लाल – केशरी रंगाचे अनेक धागे होते. ‘नवस’ बोलताना हा धागा झाडाला बांधायची प्रथा आहे. मुख्य देवळाच्या वरच्या भागात महाभारत युद्धातील चक्रव्युहाची दगडावर कोरलेली प्रतिमा आहे. एक छोटी गुंफाही आहे.

मंदिराच्या मुख्य गुरुजींनी आम्हाला हा इतिहास थोडक्यात सांगितला. नंतर एका सहप्रवाशाच्या उत्साही सूचनेनुसार समस्त मराठी मंडळीनी ‘दुर्गे दुर्गट भारी’ आरती मोठ्या आवाजात म्हणून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या मंदिरापासून जवळच ‘स्थाणेश्वर महादेव मंदिर’ आहे. या मंदिरावरून या परिसराला ‘थानेसर’ असे नाव पडले. थानेसर ही सम्राट हर्षवर्धनाची राजधानी. कुरुक्षेत्रापासून हे ठिकाण ४-५ किलोमीटर दूर आहे. पण आता कुरुक्षेत्राची वस्ती वाढली, ते जिल्ह्याचे ठिकाण झाले – त्यामुळे सगळा परिसर कुरूक्षेत्र नावाने ओळखला जातो. पण आम्हाला वाटेत ‘कुरूक्षेत्र’ आणि ‘थानेसर’ अशी दोन वेगळी रेल्वे स्थानके दिसली – त्याअर्थी हे आजही दोन वेगळे भाग असावेत. भद्रकाली मंदिराप्रमाणे या मंदिराशीही पांडवांचा संबंध सांगणारी एक कथा आहेच.

त्यानंतर आम्ही पोचलो ते ‘हर्ष का टीला’ या परिसरात. उत्खनन केलेल्या अवशेषामधून आम्ही पुढे पुढे जात राहिलो आणि चकित होत गेलो. हा परिसर पाहायला खरे तर एक दिवसही कमीच पडेल. या परिसरात सहा वेगवेगळ्या कालखंडांचे अवशेष आहेत. कुशाण, गुप्त, वर्धन, राजपूत, मोगल या काळातील इमारतींचे – त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे येथे सापडले आहेत. येथे प्रचंड मोठे संग्रहालय आहे. वेगवेगळ्या काळातील विटा, वस्तू, मृत्तिका, दागिने, शस्त्रास्त्रे .. यांचा मोठा संग्रह येथे आहे. तो चांगल्या पद्धतीने जतन केला आहे आणि मांडलाही आहे.

संग्रहालयातून बाहेर पडून जिना चढून वर गेलो, तर ‘शेख चेहली’ची कबर दिसली. शेखचिल्ली म्हणजे एक स्वप्नाळू, भोळा-भाबडा, काहीसा मूर्ख माणूस अशी आपल्या मनात एक प्रतिमा आहे. झाडाच्या फांदीवर बसून तिच्यावर कु-हाडीचे घाव घालणा-या शेखचिल्लीची गोष्ट आपल्यापैकी बहुतेकांनी वाचली आहे. वास्तवात ‘शेख चेहली’ हे एक सूफी संत होते. अकबर पुत्र दारा शुकचे ते सल्लागार आणि गुरु होते. कबर अतिशय भव्य आणि देखणी आहे. हा सगळा परिसर अतिशय स्वच्छ आहे. उत्तरेत अशी स्वच्छता हा माझ्यासाठी एक सुखद धक्का होता.

ज्योतीसर परिसरात कामचलाऊ मराठी बोलणा-या विक्रेत्यांनी आमचे लक्ष वेधून घेतले. अश्वत्थ वृक्षाखाली बसून गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे पठण करण्याचा अनुभव खूपच वेगळा होता.

येथील ‘ब्रह्म सरोवर’ अतिशय प्रचंड आहे. या सरोवराची निर्मिती ब्रह्माने केली अशी कथा आहे. या सरोवरात स्नान केल्याने अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य लाभते अशी पारंपरिक समजूत आहे. सोमवती अमावास्या, सूर्यग्रहण अशा प्रसंगी लाखो भाविक येथे जमा होतात. या परिसरात अर्जुन, त्याचा रथ, गरुडध्वज हनुमान, सारथी श्रीकृष्ण – थोडक्यात गीता सांगणारा सारथी श्रीकृष्ण – असे एक अप्रतिम शिल्प आहे. २००७ मध्ये हे शिल्प येथे उभे करण्यात आले. पुण्याचे शिल्पकार श्री सुतार यांची ही निर्मिती आहे अशी माहिती श्री पांडुरंग बलकवडे यांनी दिली.

या शिल्पाच्या जवळच एक माणूस ‘अहो पुणेकरानो, शनिवारवाड्यावर नारायण रावाला मारलेत’ असे काहीबाही म्हणत भीक मागत होता. हा माणूस मूळचा पुण्याचा – भवानी पेठेतला. लहानपणी घरातून पळाला आणि आता कुरुक्षेत्रावर भीक मागतो (असे त्यानेच सांगितले) . परप्रांतात मराठी क्षितिजे नेऊन भिडवणारा शिल्पकार आणि त्याच ठिकाणी मराठी भिकारी ... मराठी माणसाला आपले अंगभूत सामर्थ्य व्यक्त करण्यासाठी अजून किती दूरचा पल्ला गाठायचा आहे याची चुणूक दाखवणारा अनुभव होता तो!

कुरुक्षेत्रात आम्ही चार संग्रहालये पाहिली. चारीही संग्रहालये वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ‘शेख चेहली कबर’ परिसरातल्या संग्रहालयाचा उल्लेख वर आला आहेच. कुरुक्षेत्र विद्यापीठच्या ‘धरोहर’ संग्रहालयात हरियाणवी संस्कृतीचे अनोखे दर्शन घडते. मला सर्वात जास्त आवडले ते तिथले अगदी जिवंत वाटणारे पुतळे आणि रोजच्या जीवनाचे वेगळे दर्शन घडवणारे प्रकाशचित्रांचे दालन! श्रीकृष्ण संग्रहालयात ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहाबरोबरच श्रीकृष्णाच्या जीवनाचे दर्शन घडवणारी मनोरम्य दृश्ये आहेत. पनोरमा (Panorama) मध्ये खालच्या मजल्यावर विज्ञान संग्रहालय आहे. वैज्ञानिक तत्वे समजावून सांगणारी उपकरणे आणि खेळणी हाताळताना आमच्यातले अनेकजण प्रौढत्व विसरून कुतूहल घेऊन जगणारे लहान मूल झाले होते. येथे वरच्या मजल्यावर महाभारत युद्धातील विविध दिवसांचे भव्य दृश्य आहे. जयद्रथ वधासारख्या अनेक घटनांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण तेथे सादर केले आहे.

कुरुक्षेत्रातून बाहेर पडताना या भूमीचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा फार मोठा आहे याची जाणीव झाली होती. हा वारसा जपण्याच्या हरियाणा शासनाच्या प्रयत्नाना दाद द्यायला हवी. पानिपत – कुरुक्षेत्र ही युद्धभूमी. अनेक युद्धांचे घाव झेलून इथला समाज पुन्हा कसा उभा राहिला असेल याचा विचार मी करत होते. कुरुक्षेत्रात आता आपल्याला लढण्यासाठी जावे लागत नाही! ही शांतता आणण्यासाठी ज्या लाखो अनाम वीरांनी प्राण वेचले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटली.

इतिहासाच्या अनेक खिडक्या माझ्यासाठी नव्याने उघडल्या आहेत हे दिल्लीकडे परत फिरताना जाणवत होते. या इतिहासाचा, परंपरेचा योग्य तो धडा घेऊन आपला समाज अधिक एकसंध करण्याचे आव्हान आपल्यासमोर आजही आहे – याचेही भान जागे होते.

एका अर्थी कुरुक्षेत्रावरचा संग्राम निरंतर चालू राहतो – त्याचे स्वरूप बदलते इतकेच!
**************
पूर्वप्रसिद्धी: साप्ताहिक विवेक, ६ फेब्रुवारी २०११

10 comments:

  1. शंकराचार्यांच्या गीताभाष्यानुसार संचित ऊर्फ केलेले कर्म जेथे बीजरूपाने रुजून फळ देण्या समर्थ ठरते ते कुरुक्षेत्र होय. शंकराचार्याना कुरुक्षेत्र म्हणून शरीर अभिप्रेत आहे.

    ReplyDelete
  2. हो, तोही एक अर्थ आहे कुरुक्षेत्राचा. आठवण करून दिल्याबद्दल आभार.

    ReplyDelete
  3. एका अर्थी कुरुक्षेत्रावरचा संग्राम निरंतर चालू राहतो – त्याचे स्वरूप बदलते इतकेच! +१

    येथे एकदा जायचे आहे.

    ReplyDelete
  4. एका अर्थी कुरुक्षेत्रावरचा संग्राम निरंतर चालू राहतो – त्याचे स्वरूप बदलते इतकेच! +१

    "शेख चहेली" हे सुफ़ी संत आहे हे मी पहिल्यांदाच ऐकतो आहे....

    सविता ताइ खुप छान लिहल आहे..पानिपत अन कुरुक्षेत्र ला एकदा तरी नक्की भेट देणार आहे

    ReplyDelete
  5. >>एका अर्थी कुरुक्षेत्रावरचा संग्राम निरंतर चालू राहतो – त्याचे स्वरूप बदलते इतकेच!
    अप्रतिम ताई...मलाही आता ह्या दोन्ही ठिकाणांना भेट द्यायची अनिवार इच्छा होते आहे! :)

    ReplyDelete
  6. सवितादी, खरोखरच आमच्या इतिहासाला कितीतरी परिमाणे आहेत हे पुन्हा एकदा नव्याने समजले. अनेक आभार! या सर्व परिसरात हजारो वर्षांपासून सतत संग्राम होत आले. पण आज आधुनिक भारतात / इंडियात सर्वत्र चाललेले "नि:शब्द" युद्ध पहिले, कारण ते ऐकू येत नाही, की काळजाचा थरकाप येतो आणि प्रक्षोभ (outrage) पण होतो. वाटते पुन्हा एकदा महाभारत होणार का, जेथे पांच कौरव (उच्चभ्रू - elite) आणि शंभर पांडव (जनता - किसान आणि वनवासी) असतील. या स्थितीला इतिहासात तोड नाही. अन इतिहासापासून आम्ही खरोखरच काय शिकतो शंकाच आहे?

    ReplyDelete
  7. शेखचिल्ली (चेहली) खरा आहे किंबहुना तो सुफी संत होता ही खूपच वेगळी माहिती. मला तर ते काल्पनिक पात्र वाटायचं

    >> उत्तरेत अशी स्वच्छता हा माझ्यासाठी एक सुखद धक्का होता.

    अगदी अगदी.. लहानपणी कशी, प्रयाग यात्रेत तिथली भयंकर गलिच्छ आणि अस्वच्छ मंदिरं (अगदी कशीविश्वेश्वराचं मंदिरही) बघून प्रचंड धक्का बसला होता.

    ReplyDelete
  8. भानस, जरूर जा .. मात्र एक दिवस कमी पडतो, त्यामुळे वेळ काढून जा.

    योगेश, मला पण शेख चेहली बद्दल फार काही माहिती नव्हत आधी, अजून जाणून घ्यायला आवडेल.

    विद्याधर, अवश्य भेट देण्यासारखी जागा आहे

    रेमीजी, इतिहासाकडून आपण काय शिकतो - हा एक प्रश्नच आहे ..कारण इतिहासाचा अर्थ परिस्थितीनुसार आपल्याला वेगवेगळा कळतो!

    हेरंब, मीही शेख चेहली बाबत अजून फारस काही जाणत नाही .. थोडा अभ्यास करायला लागेल इतिहासाचा.

    ReplyDelete
  9. पानिपत आणि कुरुक्षेत्र दोन्ही आताच वाचली... छानच आहेत... वाचून अगदी ’जाऊजाऊ’ झालं!
    "एका अर्थी कुरुक्षेत्रावरचा संग्राम निरंतर चालू राहतो – त्याचे स्वरूप बदलते इतकेच!" हे तर अशक्य बरोब्बर वाक्य आहे!

    ReplyDelete
  10. अनु, एकदा भेटीचा कार्यक्रम ठरव मी दिल्लीत आहे तोवर :-)

    ReplyDelete