ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, February 1, 2011

६१. पानिपतमध्ये एक दिवस

डिसेंबरमध्ये दवबिन्दु ब्लॉगवर पानिपत पोस्ट वाचली. पानिपतच्या तिस-या रणसंग्रामाला २५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने 'विवेक व्यासपीठ' पानिपत भेटीचा कार्यक्रम आखत आहे अशी त्यात माहिती होती. 'विवेक' साप्ताहिकाशी माझा प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष संबंध कधी आला नव्हता. पण टीम 'विवेक' मधले काही लोक चांगल्या ओळखीचे आहेत. त्यांच्याशी मेलामेली - फोनाफोनी ( हे दोन्हीही मराठी शब्द नाहीत याची पूर्ण जाणीव आहे मला!) झाल्यावर मीही पानिपतला जायचं ठरल.

निघायच्या दोन तास आधी विवेकच्या संपादकांचा फोन आला. 'पानिपतचा वृत्तांत विवेकसाठी लिहिशील का?' अशी त्यानी विचारणा केली. 'नाही' म्हणायचं काही कारण नव्हत - म्हणून मी 'हो' म्हटल. अनेक वर्षे असे वृत्तांत लिहायची मला सवय आहे. पानिपतच्या भेटीत 'किंचित पत्रकारितेचा' अनुभव मजेदार होता. वृत्तांत लिहिण्याच्या जबाबदारीमुळे मला (संपादकांनी काही बंधन न घालूनही) जरा बांधल्यासारख वाटल! आपला ब्लॉग लिहिण वेगळ आणि कोणातरी दुस-यासाठी लिहिण वेगळ हे जाणवलं! त्याबद्दल नंतर कधीतरी लिहीन.

तोवर विवेकच्या ३० जानेवारीच्या (२०११) अंकात प्रसिद्ध झालेला हा वृत्तांत.

******************************************************
पराभवातूनही मराठ्यांचे शौर्यदर्शन घडविणारा पानिपतचा रणसंग्राम महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासात महत्त्वाचा आहे.१४ जानेवारी२०११ रोजी या रणसंग्रामाला अडीचशे वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त "विवेक व्यासपीठ', पानिपत रणसंग्राम स्मृती समिती यांनी संयुक्तपणे पानिपतमध्ये यात्रेकरूंना नेऊन तेथेच या युद्धातील अनेक ज्ञात-अज्ञात वीरांना आदरांजली अर्पित करण्याचा अनोखा सोहळा आयोजित केला. कार्यकमाच्या आयोजनात राष्ट्रीय योद्धा स्मारक समितीचाही सहभाग होता. या स्मरणीय कार्यकमाचा वृत्तांत.

१४ जानेवारी. स्थळ - पानिपतमधील रणसंग्राम स्मारक. वेळ सकाळी अकरा-साडेअकराची. स्मारकात प्रवेश करणारे लोकांचे गट मोठ्या उत्साहाने घोषणा देतात "जय शिवाजी' आणि स्मारकात आधीच हजर असलेल्या लोकांकडून तितक्याच उत्साहाने प्रतिसाद मिळतो,"जय भवानी'.


निमित्त होते, पानिपतच्या तिसऱ्या रणसंग्रामाला दोनशे पास वर्षे पूर्ण झाल्याचे. पानिपत संग्रामात धारातीर्थी पडलेल्या योद्‌ध्याना मानवंदना देण्यासाठी पानिपत रणसंग्राम समिती आणि विवेक व्यासपीठ यांनी एकत्रितपणे कार्यक्रम आयोजित केला होता. महाराष्ट्रातील विविध भागातून सुमारे ४०० स्त्री-पुरुष या कार्यक्रमासाठी आले होते. अनेकांची पानिपतला ही पहिलीच भेट होती. त्यामुळे "काला आम' या ठिकाणी रणसंग्राम परिसरात पाऊल टाकताना अनेकांच्या मनात विविध भावनांचा कल्लोळ माजला होता.


पानिपत ही प्राचीन काळापासून महत्त्वाची युद्धभूमी आहे. कौरव पांडवांचा संग्राम जेथे घडला ते कुरुक्षेत्र येथून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर आहे. पानिपतची पहिली लढाई दिल्लीचा सुलतान इब्राहीम लोधी आणि काबुलहून आलेला आकमक बाबर यांच्यात झाली. त्यात बाबराचे सैन्य जिंकले आणि हिंदुस्थानात मोगल साम्राज्याचा पाया रचला गेला. जानेवारी मध्ये दिल्लीचा राज्यकर्ता सम्राट हेमचंद्र विकमादित्य आणि अकबर यांच्यात झाली. यात अकबराचा विजय झाला आणि मोगल सा्म्राज्य अधिक बळकट झाले. पानिपतचा तिसरा संग्राम अफगाण आक्रमक अहमदशहा अब्दाली आणि सदाशिवरावभाऊ यांच्या अधिपत्याखालील मराठे सैन्य यांच्यात झाला. दुर्दैवाने मराठ्यांचा यात दारुण पराभव झाला. सात दिवस चाललेल्या या लढाईत प्रतिकूल परिस्थितीत मराठे शौर्याने लढले. विजय मिळूनही अब्दालीची पुन्हा हिंदुस्थानवर आकमण करण्याची हिंमत झाली नाही. विजयातही त्याने काही गमावले.


स्मारक परिसरात या तीनही संग्रामांची माहिती देणारा फलक आहे. स्मारकात पहिल्या दोन लढायांचे चित्रपटल (म्यूरल्स्‌) आहेत, तिसऱ्याचे नाही. तिसऱ्या संग्रामाच्या स्मरणार्थ एक स्तंभ आहे. या तिसऱ्या संग्रामाने इतिहासाला आणि देशाच्या भवितव्याला दिशा दिली असाही उल्लेख मु्ख्य फलकावर आहे.

महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग, रायगड, सिंहगड, प्रतापगड आणि विजयगड या किल्ल्यांमधून जल कलश येथे आणण्यात आले होते. पुण्यात शनिवारवाड्यावर झालेल्या कार्यकमात हे कलश समारंभपूर्वक एकत्रित जमा करण्यात आले होते. श्री. गोपीनाथ मुंडे आणि श्री. पांडुरंग बलकवडे यांच्यासह जमलेल्या अनेक नागरिकांनी या स्मारकाला जलाभिषेक केला."छत्रपती शिवरायांची परंपरा चालवणाऱ्या योद्‌ध्यांना आम्ही विसरलो नाही" ही मराठी मनाची, अवघ्या महाराष्ट्राची भावना व्यक्त करण्याचा हा एक अभिनव मार्ग होता यात शंका नाही.


या स्मारकाला त्या दिवशी शेकडो हजारो लोक भेट देत होते. बिदर (कर्नाटक), बुरहाणपूर (मध्य प्रदेश) या ठिकाणचे मराठ्यांचे वंशज आवर्जून आले होते. रोहतक (हरियाणा) मधील पाच सहा मराठी भाषिक शिक्षक आले होते. मुंबईतून पंचवीस लोकांचा एक गट आला होता. इतरही अनेक लोक होते. ज्यांचाशी वेळेअभावी बोलता आले नाही. काही लोक श्रद्धेने रणसंग्रामातील मातीचा टिळा भाळी लावत होते; तर काही सोबत आणलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत माती भरून घेत होते. रणसंग्राम स्मारकातून आमची बस परत फिरली तेव्हा अनेक गाड्या स्मारकाकडे येत होत्या. एकमेकांना रामराम करावा त्या थाटात लोक ओळख नसताना, भाषा प्रांत वेगवेगळे असताना मिळून "जय शिवाजी, जय भवानी' ललकारत होते ते एक हृद्य दृश्य होते.


स्मारकाच्या परिसरात रोड मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते भेटले. पानिपतच्या तिसऱ्या रणसंग्रामातील पराभवानंतर काही मराठी योद्धे महाराष्ट्रात न परतता कुरुक्षेत्राच्या दक्षिणेकडच्या ढाक जंगलात लपून राहिले. परिस्थितीमुळे मराठापणाची ओळख लपवणे त्याना भाग पडले. अशा प्रसंगी त्यांचे पूर्वज राजा रोड याच्या नावाने ते स्वत:ची ओळख सांगू लागले. छत्रपती शिवाजी राजे या रजपूत राजा रोडचे वंशज आहेत असे काही अभ्यासकांचे मत आहे. रोड मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तरांचलमध्ये सापडणाऱ्या गोत्रांची यादी प्रसिद्ध केली आहे. या आडनावाची कुटुंबे महाराष्ट्रात असतील तर त्यांची माहिती संघाला कळवावी असे त्यांनी आवाहन केले आहे.


त्याच दिवशी दुपारी पानिपत रणसंग्राम स्मृती समिती आणि राष्ट्रीय योद्धा स्मारक समिती यांनी एकत्रितपणे एस. डी.विद्यालयात जाहीर सभा ठेवली होती. भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपीनाथ मुंडे मुख्य वक्ते होते तर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि हिमाचल प्रदेशाचे माजी राज्यपाल विष्णू कोकजे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्योतिरादित्य सिंदिया काही अपरिहार्य कारणांमुळे कार्यकमाला उपस्थित राहू शकले नाहीत. खासदार श्रीमती सुमित्रा महाजन आणि इतर अनेक मान्यवर आणि योद्‌ध्यांचे वंशज मोठ्या संख्येने कार्यक्रमाला हजर होते.


उपस्थितांचे स्वागत आणि पाहुण्यांचा परिचय झाल्यानंतर इतिहास अभ्यासक अतुल रावत यांनी पानिपतच्या तिसऱ्या संग्रामाचे देशाच्या इतिहासातील महत्त्व विषद केले. "इतिहास म्हणजे राष्ट्रीय स्मरणाचे, त्याच्या प्रवासाचे संचित आहे आणि म्हणूनच तो आपण कधीही विसरता कामा नये', असे आवाहन त्यांनी केले. दीर्घकाळ चाललेल्या मध्यकालीन स्वतंत्रता संग्रामाची सविस्तर माहिती देऊन त्यानी म्हटले की, "इतिहासाच्या कटू अनुभवातून आपल्याला शिकायला मिळते म्हणून विजयाइतकेच पराभावाचेही स्मरण ठेवले पाहिजे. पानिपत नसते झाले तर भारताचे आजचे चित्र विदारकपणे वेगळे झाले असते', याची त्यांनी श्रोत्यांना जाणीव करून दिली.


मुंबईतून आलेले शाहीर योगेश यांनी," कौन कहता है पानिपतमे हमने हार खायी थी .... अंतिम विजय हमारी थी' हा पोवाडा गाऊन उपस्थितांची मने भारावून टाकली. या पोवाड्याचे सूत्र पुढे नेत इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे म्हणाले की,"या मानवंदनेच्या निमित्ताने आम्ही पराभवाचे उदात्तीकरण करत नसून प्रेरणा घेत आहोत. याच संग्रामातून १८५७ च्या स्वातंत्र्यसमराची आणि पुढे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची बीजे पेरली गेली हे आपण विसरता कामा नये. आपापसातील मतभेदांमुळे त्यावेळी आपण युद्ध जिंकू शकलो नाही हे लक्षात घेऊन आजच्या स्थितीतही एकतेची गरज आहे', असे त्यांनी प्रतिपादन केले.


गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या भाषणात, "राणा प्रतापची लढाई म्हणजे राजपुतांची लढाई, शिवाजी महाराजांची लढाई म्हणजे मराठ्यांची लढाई या प्रवृत्तीतून आपण बाहेर पडले पाहिजे' असे आग"हाने सांगितले. "जे जे लढले ते हिंदुस्थानसाठी लढले हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजे. पराजयातून विजयाचा रस्ता निघतो हेच पानिपतने सिद्ध केले आहे.' मराठी भाषेत पानिपत होणे शब्दप्रयोग सर्वनाश होणे या अर्थी वापरला जातो हे नमूद करून श्री मुंडे यांनी,"पानिपत म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत देशासाठी लढण्याची वृत्ती हा पानिपतचा खरा अर्थ आहे,' असे ठासून सांगितले.


स्वागताध्यक्ष दर्शनलाल जैन यांनी पानिपत योद्धा स्मारक उभारण्याची जबाबदारी मुंडे यांनी घ्यावी असे जाहीर आवाहन केले. त्याला प्रतिसाद देताना मुंडे यानी सांगितले की, "पानिपत योद्‌ध्यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. संसदेत चर्चा आणि प्रश्न यांच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल पण त्याचबरोबर सामान्य लोकांनीही या कार्यात सामील व्हावे' असे आवाहन त्यांनी केले. सध्याचे पानिपत संग्रहालय स्मारकापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर आहे. हे संग्रहालय स्मारक परिसरात उभे करण्याविषयी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले. साहित्यिक विश्वास पाटील यांनी पानिपतची महाराष्ट्राला पुन्हा आठवण करून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे असे सांगून "पानिपत' कादंबरीवर आधारित "रणांगण' नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात तर पुन्हा व्हावेतच पण पानिपतमध्येही व्हावेत अशी विनंती विश्वास पाटील आणि वामन केंद्रे यांना ते करतील असेही त्यांनी सांगितले. ग्वाल्हेरस्थित नरसिंह जोशी यांनी लिहिलेल्या आणि "विजित विजेता' या पुस्तकाचे (विवेक प्रकाशन) प्रकाशन मुंडे यांनी केले. मुंडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योजक सुरेश चव्हाणके यांनी पानिपत स्मारकात उभारण्यात येणाऱ्या दृकश्राव्य प्रकल्पासाठी २५ लाखापर्यंतचा खर्च उचलण्याचे जाहीर केले. दोन मिनिटे मौन राखून पानिपत योद्‌ध्यांना श्रद्धांजली वाहून आणि वंदे मातरम गाऊन कार्यक्रम संपला.


दुपारी आम्ही पानिपत संग्रहालयाला भेट दिली. हरियाणा सरकारने पानिपतचा इतिहास, कला आणि तिथले जीवन याबद्दल पर्यटकांना माहिती देण्यासाठी या संग्रहालयाची स्थापना केली आहे. पानिपतच्या तीनही युद्धांची माहिती देणारे विशेष कक्ष येथे आहेत. प्राचीन शिलालेख, युद्धातील शस्त्रास्त्रे, प्राचीन भांडी, प्राचीन कागदपत्रे असे पुष्कळ काही या संग्रहालयात आहे. पांडुरंग बलकवडे यातील अनेक गोष्टी आम्हाला समजावून सांगत होते. अर्थातच हे संग्रहालय पाहायला आमच्याकडे पुरेसा वेळ नव्हता आणि विवेकच्या कार्यकर्त्यांच्या "चला, वेळ झाली" या सूचनेवर नाराज होत आम्ही तेथून बाहेर पडलो. पण त्यांचेही बरोबर होते. पुढे कुरुक्षेत्र गाठायचे होते. तिथे दृक्‌श्राव्य कार्यकमासाठी वेळेत पोहोचणे गरजेचे होते.

पानिपत शहरात आम्ही आदल्या रात्री अकराच्या सुमारास पोचलो होतो. दुसऱ्या संध्याकाळी आम्ही तेथून बाहेर पडलो. चोवीस तासही आम्ही तिथे नव्हतो. पण या कमी वेळात आम्हाला खूप काही मिळाले. पुन्हा या भूमीला वेळ काढून भेट दिली पाहिजे, आपला इतिहास अधिक चांगल्या रीतीने जाणून घेतला पाहिजे ही भावना मनात घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
***********
पूर्वप्रसिद्धी: साप्ताहिक विवेक, ३० जानेवारी २०११

13 comments:

 1. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला हा निष्कर्ष बहुधा इंग्रज इतिहासकारांचा असावा. प्रत्यक्षांत तसे घडले नसावे असे नंतरच्या ऐतिहासिक घटनांवरून वाटते.

  ReplyDelete
 2. इतिहास हा अनेकदा तथ्यापेक्षा दृष्टीकोनाचा मुद्दा असतो .. पण इथे बहुधा मराठ्यांचा पराभव ही वस्तुस्थिती असावी. तुम्हाला काही वेगळी माहिती असेल तर जरूर सांगा.

  ReplyDelete
 3. खरंय.. आपल्यालाच आपला खरा इतिहास जाणून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पूर्वी मीही पानिपत म्हणजे पराभवाची लढाई अशाच दृष्टीकोनातून बघत असे.

  ReplyDelete
 4. हेरंब, पण ती एका अर्थी पराभावाचीही लढाई आहे - हे आपण विसरलो की पुन्हा त्याच चुका होण्याची शक्यता जास्त :-)

  ReplyDelete
 5. सविता ताइ...अगदी लहानपणापासुन पानिपत म्हणजे मराठेशाहीवरील कलंक आहे हेच ऐकत आलोय...आज हे सगळ वाचल्यावर प्रश्न पडलाय...हे पुर्वीच्या लोकांना का नाही समजल..इतकी वर्ष सामान्य जनमाणसांच्या मनावर चुकीचा दृष्टीकोन बिंबवण्याच काय प्रयोजन असु शकत???

  आपला दृष्टीकोन जोपर्यंत बदलत तोपर्यंत इतिहास कळणार नाही..मान्य ....पण इथ प्रत्येक जण आप आपल्या सोयीने इतिहास सांगत आले आहेत अन आजही तेच घडत आहे

  ReplyDelete
 6. योगेशजी, आपला दृष्टीकोन बदलला की वस्तुस्थिती बदलते, हे वर्तमानाल जसं लागू पडत तसच इतिहासालाही. आपल्याला जे सांगितलं जात त्यावर प्रश्न विचारत राहावेत हे सगळ्यात उत्तम.

  ReplyDelete
 7. पानिपत मराठ्यांच्या इतिहासातला पराभवाचा अध्याय असला तरी तो चांगल्या अर्थाने सर्वांच्या मनात आहे असे लेखावरून दिसते.
  महाराष्ट्राबाहेरून, उत्तरेतून आलेल्या मराठ्यांच्या वंशजाबद्दल आणखी जाणून घ्यायला हवे, विशेषतः 'रोड' सारख्यांचा इतिहास फार संघर्षपूर्ण असणार.

  ReplyDelete
 8. प्रीति, माझ्याकडे एक पुस्तक आहे 'रोड मराठा' बाबत - त्या कार्यकर्त्यांनी दिलेल.. पुण्यात कधी येईन तेव्हा देईन .. website असेल त्यांची तर पाहून कळवते.

  ReplyDelete
 9. सविता ताइ....
  >>आपल्याला जे सांगितलं जात त्यावर प्रश्न विचारत राहावेत हे सगळ्यात उत्तम.

  पर्याय उत्तम आहे...

  सविता ताइ... "जी" नको...फ़क्त योगेश चालेल.. :) :)

  ReplyDelete
 10. ताई,
  एकदम छान झाला आहे वृत्तांत... मलाही एकदा जायचंय पानिपतला, कधी योग आला नाही अजून! :-|
  आणि ते 'रोड' चं मी पहिल्यांदाच ऐकलं!

  ReplyDelete
 11. योगेश, :-)
  विद्याधर, मलाही रोड मराठा बाबत काही माहित नव्हत आधी ... पण त्यांचा इतिहास वाचायला हवा आपण

  ReplyDelete
 12. सविता, सुंदरच आढावा घेतलास. पानिपत म्हणजे, मरठ्यांच्या र्‍हास हीच गोष्ट मनावर ठसली आहे. मी ही हे ’ रोड मराठा "ऐकलेलं नाही. लिंक मिळालीच तर देशील.

  ReplyDelete
 13. भानस, 'रोड मराठा'बाबत ब-याच लोकाना जास्त माहिती हवी आहे अस दिसतंय एकंदरीत. जरा अभ्यास करते त्याचा अजून आणि कळवते.

  ReplyDelete