जगताना फक्त नव्या गोष्टी निर्माण करणं पुरेसं नसतं, तर अनेक गोष्टी नाहीशाही करत जाव्या लागतात. जे आज हवं वाटतं, त्याचं उद्या ओझं होतं, किंवा जे आज नको वाटतं, त्याचा उद्या मोह पडतो .. त्यामुळे काय टिकवायचं आणि काय नाहीसं करायचं याचा निर्णय आपल्याला नेहमी करावा लागतो. हे लक्षात आल कागदांची आवराआवर करताना.
साफसफाई घराची असो, की ऑफिसची – कागदांची विल्हेवाट हे एक मोठंच काम होऊन बसलंय गेल्या अनेक वर्षांत! मी ज्या ऑफिसात दहा वर्ष काम केलं, ते सोडताना तर हे प्रकर्षाने जाणवलं! म्हणजे मी आपली कित्येक दिवस निष्ठेने, चिकाटीने कागद फाडत बसले होते; पण त्यांचा ढीग काही कमी होत नव्हता. ‘पेपरलेस ऑफिस’च्या जमान्यात मी इतके कागद कसे जमा करते याचं माझं मलाच नवल वाटायला लागलं! पण ते काही फार मोठं रहस्य नाही.
माझ्या आधीच्या ऑफिसात ‘संगणक विभाग’ म्हणजे एक मजेदार प्रकरण होतं! संगणकाचं कमीत कमी ज्ञान हीच जणू त्या विभागात काम करण्याची सर्वोच्च पात्रता होती. त्यामुळे Local Area Network (LAN) असल तरी ते नेहमी चालू राहील याची आम्हाला कोणाला खात्री नसायची. म्हणून केलेलं प्रत्येक document संगणकाच्या hard disk वर ठेवायची सवय आम्ही स्वत:ला लावून घेतली होती. आम्ही थोडेसे परंपरावादी आणि बरेचसे कंजूष असल्यामुळे इंटरनेट असलं तरी anti virus प्राचीन काळचा असायचा. त्यामुळे आपण संगणकात साठवलेलं काम टिकणार का याची नेहमी शंका रहायची.
मग निमुटपणे त्या त्या दिवशीच काम Pen Drive वर घ्यायचं! पण Pen Drive तर virus साठीचा खुला दरवाजा. म्हणून मग महत्त्वाचं काम सीडीवर घ्यायचं. आता आपण जे काम करत असतो त्याबाबत बाकी कुणाचं काहीही मत असो, आपल्याला तर ते काम महत्त्वाचं वाटतंच! त्यामुळे दिवसभराचं काम शेवटच्या पंधरा वीस मिनिटात कॉपी करायचं हा एक उद्योग असायचा.
आमच्या ऑफिसात वेगवेगळ्या काळात घेतलेले संगणक होते. त्यामुळे सगळ्या संगणकांना Pen Drive अथवा सीडी जोडायची सोय नव्हती. कार्यक्षेत्रात तर अनेकदा संगणक नसायचे. मग मिळेल त्या सायबर कॅफेत जाऊन काम करावं लागायचं. तिथं Pen Drive अथवा सीडी उघडलंच नाही तर भानगड नको, म्हणून ती सगळी documents स्वत:ला ईमेलने पाठवून द्यायची. Rediff किंवा Gmail कधी कधी उघडलं जात नाही. म्हणूण दूरदृष्टी दाखवत स्वत:ला एकाऐवजी दोन पत्त्यांवर ईमेल पाठवायची. वेळ पडलीच तर मग ईमेलवरून ते document वापरता यायचं.
हे सगळ होऊनही शांतता नसायची. विजेचा लपंडाव सगळीकडे सारखा चालू असतो. त्यामुळे महत्त्वाच्या document चे Printout जवळ ठेवावं लागे. कामानिमित्त मी अनेकदा पुण्याबाहेर असायचे. त्या काळात ऑफिसातला माझा संगणक इतरही कोणी वापरायचं. त्यांच्या उद्योगात एक दोनवेळा माझे काम गायब झालं, ते परत करावं लागलं. त्यावेळपासून ऑफिसातलं सगळं काम घरच्या संगणकावर मी ठेवायला लागले. रविवारी, सुट्टीच्या दिवशी अनेकदा reports, documents, presentations पूर्ण करावे लागत. काहीवेळा ऑफिसात दिवसच्या दिवस निरर्थक मीटिंगमध्ये जात. मग रात्री घरात काम करणं भाग पडायचं. म्हणून घरच्या संगणकात ऑफिसचं काम भरलेलं असायचं.
आता मागे वळून पाहताना मला हे सगळ विनोदी वाटत! किरकोळच गोष्टी असायच्या खर तर त्या – कोणत्यातरी बैठकीचा वृत्तांत, प्रशिक्षणासाठीचे presentation, त्या वर्षीचे बजेट, प्रकल्पांची रूपरेखा .. हे सगळं त्या काळापुरतं महत्त्वाचं होतं .. आता ते दिवस गेले . पण त्या काळात मी SCP (Save, Copy, Print) या रोगाची शिकार बनले.
पण अर्थात माझ्या टेबलावर येणा-या कागदांना मी (म्हणजे माझा SCP रोग) एकटी सर्वार्थाने जबाबदार नव्हते. मला माझे बरेच सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी मंडळी वाचण्यासाठी कागद पाठवायचे. Endosulfan ते Microfinance आणि गांधी ते Ecotourism असे कोणतेही विषय माझ्याकडे यायचे. स्वत:ला नको असलेले कागद सभ्यपणे पुढे ढकलायचे असतील तर त्या कागदावर ‘Please, discuss’ किंवा ‘This might be of your interest’ असं लिहायचं असतं हे मला कळेपर्यंत अनेक वर्षे उलटली. मला वाचायला, विचार करायला कोणताच विषय वर्ज्य नाही; त्यामुळे आलेला प्रत्येक कागद मी मनापासून वाचायचे. आमच्या कार्यक्रमात त्यातले काय घेता येईल, काय टाळावे यावे एक टिपण तयार करून संबधित लोकांना पाठवून द्यायचे - असं काम मी अनेक वर्ष केलं..
अनेकदा ज्यांनी माझ्याकडे कागद पाठवला ते त्याबाबत सोयीस्करपणे विसरून जात. चर्चेची आठवण मी करून दिली तरी त्यावर बोलायला त्यांना वेळ नसे - मलाही नसे. आपल्या टेबलावरचा पसारा कमी करायला लोक माझ्याकडे कागद पाठवतात हे लक्षात आल्यावर माझाही चर्चेचा उत्साह कमी झाला. पण तोवर माझ्या टेबलावर, आणखी एका डेस्कवर कागदांचा ढीग साठला होता. अजूनही लोक माझ्याकडे कागद पाठवतात आणि मी तो न वाचता पुढं कुणाला देत नाही. मला वाचायला मिळणारा वेळ आणि माझ्याकडे येणारे कागद यांचं प्रमाण व्यस्त आहे. कामातून (म्हणजे संगणकातून) थोडी उसंत मिळाली की मी कागद वाचते. पण माझ्या टेबलावर ‘अजून वाचायच्या’ कागदांचा गठ्ठा मोठा आहे!
संवादाची साधनं वाढल्याने, तंत्रज्ञान सोपां आणि स्वस्त झाल्याने गुंतागुंत कमी होईल असं वाटत होतं. पण माणसांच्या सवयी बदलणं कठीण! एक संदेश द्यायला वेगवेगळी माध्यमं आहेत – पण माणसं त्या वेगवेगळ्या माध्यमांतून एकच संदेश देतात. आमच्या ऑफिसचे लोक याबाबत जास्तच आटापिटा करायचं. म्हणजे कोणीतरी तुम्हाला ईमेल पाठवणार. ती अर्थातच दोन्ही-तीनही Inbox मध्ये येऊन पडणार. मग ‘तुम्हाला ईमेल पाठवली आहे ती बघा’ असा SMS करणार (आम्ही काही सारखे online नसायचो). काही वेळा मीटिंगमध्ये असू तेव्हा SMS कडे लक्ष देत नाही म्हणून फोन करून तेच सांगणार. आणि याउपरही धोका नको म्हणून ती महत्त्वाची एक दोन पाने fax करणार … माहितीचा भडिमार म्हणजे त्याच त्याच माहितीचा भडिमार!
माझा स्वभावही या सगळ्या समस्येत भर टाकतो. कोणताही कागद कच-याच्या टोपलीत फेकायला मी कचरते. अनेकदा आज फाडून टाकलेला कागद नेमका उद्या लागतो हा अनुभव तुम्हालाही असेलच! कागदाचा ढीग समोर घेऊन बसल्यावर त्यातले अनेक कागद ‘अजून लागेल कदाचित् पुन्हा’ असं म्हणून मी एका स्वच्छ कोप-यात ठेवते. पहिल्या फेरीत अनेक कागदांना असे जीवदान मिळते. पाहता पाहता त्या स्वच्छ जागेत जुन्या कागदांचा नव्याने ढीग लागतो.
कागद साठवण्यामागं माझं एक ‘तत्त्व’ही आहे. पाठकोरे कागद वापरून बिनमहत्त्वाचे प्रिंटिंग करायचं असा माझा प्रयत्न असतो. ही पोस्ट मी घरात बसून पाठको-या कागदावर लिहिते आहे – पण हाताने लिहिण्याचे प्रसंग आता कमीच! माझ्या ऑफिसात ‘common printer’ होता. मी Print command देऊन प्रिंटरजवळ जाईपर्यंत नव्या को-या A 4 कागदांवर माझे document तयार असायचे. माझ्यानंतर रांगेत असणा-या सहका-याला नेहमी महत्त्वाचं छापायाचं असायचं आणि पाठकोरे कागद चालायचे नाहीत. ‘पाठकोरे कागद’ वापरण्याच्या अटटाहासापायी माझ्या टेबलावर नेहेमी कागद साठलेले असतात.
थोडक्यात काय तर मी सारखं काहीतरी नाहीसं करत असते.
- ऑफिसातल्या संगणकातलं काम
- घरच्या संगणकातलं काम
- Pen drive मधलं काम
- एक दोन तीन Inbox
- मोबाईल मधले SMS
अनेकदा हे करत असताना काल जे महत्त्वाचं होतं ते आज बिनमहत्त्वाचं झालं आहे हे जाणवून ‘आज’बद्दल विरक्ती येते. तुम्हाला हवे असोत की नको, कागद, ईमेल, SMS येत राहणार .. आणि तुम्हाला ते नाहीसे करत राहावे लागणार. एका अर्थी वर्षाचे ३६५ दिवस चालणारे ‘नाहीसं करण्याचं’ हे एक व्रतच आहे म्हणा ना! न उतता, न मातता ते चालवावं लागणार. ते न केलं तर धडगत नाही. काय टिकवायचं आणि काय नाहीसं करायचं याचा निर्णय तारतम्याने करावा लागणार .. तो चुकला तर सगळंच संपलं! संगणकाची system restore करता येते .. आयुष्यात मात्र ते असं चुटकीसरशी करता येत नाही हे भान ठेवून नाहीसं करत राहावं लागणार .. !
**
SCP.......एकदम पटले बरका .........खरच आपण तीच तीच information किती ठिकाणी साठवतो ......आणि पुन्हा जेव्हा पाहिजे तेव्हा मिळेल याची खात्री नाही....... आणि म्हणे आम्ही आत्ता paperless ऑफिस मधे काम करणार ............मस्त लिहिले आहेस एकदम .................हलक फुलक पण खुप महत्वाचे
ReplyDeleteप्रीती, माझ्यासाठी हा सगळा भूतकाळ आहे .. म्हणून मला बर वाटतय :-)
ReplyDeleteआश्लेषा, M&E च्या माणसांच दु;ख .. :-)
हाहाहा.. मजा आली..
ReplyDelete>> संगणकाची system restore करता येते .. आयुष्यात मात्र ते असे चुटकीसरशी करता येत नाही .. !
अगदी अगदी खरंय..
मी नेहमी म्हणत असतो तेच पुन्हा लिहितो. रोजच्या जीवनातल्या साध्या साध्या घटना विलक्षण रीतीने फुलवून खुलवून सांगण्याची तुमची हातोटी वादातीत आहे !!!
मी टेबलावर चळत तयार झाली की टेबल साफ करतो... आणि दोनेक दिवसांत पुन्हा चळत तयार असते! :) त्यामुळे मी रिलेट केलं बरंच!!!
ReplyDelete>>संगणकाची system restore करता येते .. आयुष्यात मात्र ते असे चुटकीसरशी करता येत नाही .. !
हे अगदी पटलं!
हाहा! आवडलंय!
ReplyDeleteखूप लक्ष देऊन या SCP विकारावर मात करावी लागते. खरंय!
कामाच्या कागदांप्रमाणे वृत्तपत्रं हा पण एक ’रद्दी’चा विषय असतो. आताशा सामान्य शहरी मनुष्य पुरेसा वेळ cyber जगात घालवतो, त्यातली दोन मिनिटं फेसबुक ऐवजी ई-पेपर वाचणं सहज शक्य असतं. गेल्या दोन-तीन वर्षात मी कागदी वृत्तपत्र नाईलाज झाल्याशिवाय घेतलेलं नाही. paperless life च्या दिशेने चुकून झालेला हा बदल आता तुझं पोस्ट वाचताना लक्षात आला...
आमच्या कॉलेजला प्रत्येक सबमिशन ’कागदा’वर मागण्याची एक वाईट खोड आहे. A1 आकाराचे किती कागद आम्ही (न केलेलं) काम दाखवण्यासाठी वाया घालवतो! त्यामानाने पाठकोऱ्या कागदांची गरज कमी पडते... कॉलेज संपल्यावर पुढचं एक दशक तरी मला कागद घ्यावे लागणार नाहीत!!
हेरंब.वादातीत की वादग्रस्त कोण जाणे :-)
ReplyDeleteविद्याधर, करा करा कागद नाहीसे करा .. मला वाटत होत software क्षेत्रातले लोक फक्त ई कचरा निर्माण करतात :-) पण तसं दिसत नाही!!
अनु, पुढच्या दशकात तुला कागद कदाचित लागणारसुद्धा नाहीत .. त्यामुळे बहुधा पुन्हा कागदावर लिहिण्याची fashion येईपर्यंत तुला ते कागद पुरतील ...अर्थात मला लागले तर मी मागेनच तुझ्याकडे :-)