ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, July 21, 2011

८१.तळदेव


या नावाच एक गाव आहे हे देखील मला इतकी वर्ष माहिती नव्हत. एका रविवारी मात्र मला या गावात जायची संधी मिळाली. माझ्या एका मित्राने त्या परिसरात काही काम सुरु केलं होत. त्याचाच एक भाग म्हणून काही स्वयंसाहाय्यता गट (सोप्या भाषेत बोलायचं तर बचत गट) चालू केले होते. या गटांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यान मला बोलावलं होत. आता मार्गदर्शन वगैरे काही करण्याच्या मी फंदात पडत नाही पण मला वेगवेगळ्या लोकांशी बोलायला आवडत. शिवाय या भागात मी कधी आलेले नव्हते आजवर म्हणून मग मी तळदेव गावात होते.

महाबळेश्वरपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरच हे गाव. मी महाबळेश्वरला फार वेळा गेलेले नाही पण वाईमध्ये माझी एक मैत्रीण राहायची, तिच्याकडे मात्र बरेचदा गेले होते. किमान दोन अडीच तासांचा प्रवास होता तो. पण आता मात्र आम्ही दीड तासातच तिथ पोचलो. रस्ते किती सुधारले आहेत हे तपासून पहायचं असेल तर पूर्वी केलेल्या रस्त्यांवरून पुन्हा एकदा प्रवास करावा म्हणजे अंदाज येतो. दरम्यान प्रवासाची साधनही बदलतात म्हणा. म्हणजे पूर्वी मी वाईला आपल्या लाल डब्याने म्हणजे एस टी बसने जात असे आज मात्र मी कारने आले होते त्यामुळेही प्रवासाचा वेळ वाचला असेल. गाव तसं छोटसंच जेमतेम १८० घर आणि हजार एक लोकसंख्या. शेजारच्या एका ३०० लोकसंख्येच्या गावाची आणि तळदेवची ग्रामपंचायात एक आहे म्हणजे यांच्यासोबत आणखी पन्नास घर जोडलेली आहेत.

तळदेव नावाच्या गावात देव ‘तळात’ असणार याचा मला अंदाज होता. या गावात महादेवाचे एक प्राचीन मंदिर आहे. परंपरा सांगते की पांडवानी हे मंदिर बांधले. बांधकाम अर्थातच इतके जुने नाही – पण तरी या मंदिराला काही शतकांचा इतिहास नक्कीच असेल. मंदिराच बांधकाम मला आवडल. दगडी बांधकामामुळे असेल पण एक मस्त थंडावा होता गाभा-यात. आणि शांतता तर इतकी की मी नुकतीच मंदिराच्या परिसरात असलेल्या सुमारे अडीचशे तीनशे माणसांच्या समूहाला सोडून आत आले - तर जग पूर्ण सोडून आल्यागत वाटल मला त्या क्षणी!
गाभा-या नेहमीप्रमाणे शिवलिंगाकडे तोंड करून उभा असलेला नंदी होता. गाभा-यात एक दिवा मंद  तेवत होता – त्याच्या प्रकाशाने अंधार उजळून निघाल्यागत वाटलं मला – अंधार आणि प्रकाश यांनी एकाच वेळी वेधून टाकण्याचा अनुभव खूप काळाने घेतला तिथ! मी एकटीच होते त्या क्षणी त्या गाभा-यात. मला खूप शांत वाटलं!! या जगात सगळ काही आलबेल आहे अस कळल्यावर जे एक सुख आणि समाधान वाटेल – तसच काहीस मला वाटलं! विश्वाच्या लयाची, विनाशाची जबाबदारी ज्या देवाकडे आहे अस मानल जात (आणि मी अनेकदा ऐकलेल आहे) त्याच्या मूर्तीच्या समोर मला सगळ ‘ठीक आहे’ अस वाटाव हा एक विरोधाभास होता. त्या क्षणी मृत्युचा स्पर्श झाल्यागत, स्वत:चा शेवट समजल्यागत वाटलं मला. त्या गाभा-यात असण हा एका अर्थी गर्भावस्थेत असण्याचा अनुभव वाटला मला. मरण, विनाश, शेवट, काही संपण .. यातही शांतता असू शकते, यातही समाधान असू शकत हे आतून जाणवलं मला. म्हणजे तसा भास तरी नक्कीच झाला. हे सगळ वाटंणच, त्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही – पण ते खूप तीव्रतेने आणि उत्कटतेने वाटल्यामुळे लक्षात राहिलं इतकच!

बाहेरच्या जगात येऊन लोकांशी पुन्हा एकदा बोलायला सुरुवात केली आणि या गावाबद्दल काही चांगली माहिती कळली. गावच्या सरपंच ताई ‘बिनविरोध’ निवडून आल्या होत्या. मग उपसरपंचांच्या घरी आग्रहाचा चहा घेताना मी हा ‘बिनविरोध’ निवडणुकीचा विषय काढला. त्यांनी मला सांगितलं की या गावात आजवर ग्रामपंचायतीची  निवडणूक अशी झालेली नाही. निवडणूक जेव्हा जाहीर होते, तेव्हा गावकरी एकत्र बसतात आणि सर्वसहमतीने कोणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करायचं ते ठरवतात. मग हे सगळे सात सदस्य मिळून पंचायात समितीच्या कार्यालयात जातात आणि अर्ज भरतात. अनुभवी सदस्य नव्या सदस्यांना अर्ज भरायला मदत करतात. अर्ज चुकीच्या पद्धतीने भरल्यामुळे नाकारला जाणे इथे घडतच नाही.

अनेकदा सर्वसहमतीच्या  नावे काही ठराविकांची सत्ता चालू राहते असेही घडते. या गावातली ही सर्वसहमतीची प्रक्रिया  किती पारदर्शी असते हे मला  नाही सांगता येणार. जे मतदारसंघ स्त्रियांसाठी राखीव होतात, तिथेही कोणी असायचे हे गाव ठरवते. या ठरवण्याच्या प्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग फारसा नसणार हे उघड आहे. म्हणजे स्त्रियांच्या सबलीकरणासाठी आरक्षण व्यवस्था असताना प्रत्यक्षात मात्र घडते ते वेगळेच.

पण तरीही ही काही वेगळेच मी ऐकत होते यात शंकाच नाही. बाहेरच्या जगात एवढी जीवघेणी स्पर्धा चालू असताना, या गावात इतकी एकी, इतके सहकार्य कसे? मग चर्चा करताना आणखीही काही गोष्टी गावातल्या लोकांनी सांगितल्या. एक तर या गावातले जवळजवळ घरटी एक माणूस मुंबईत कामाला आहे. त्यामुळे गावात मुंबईतला पैसा येतो. शिवाय इथली माणसं मुंबईत एकमेकांना धरून राहतात, मदत करतात. इथे गावात काही भांडण झाली तर त्याचा परिणाम त्यांना मुंबईत भोगावा लागेल हे त्यांना कळते. म्हणून गावात शांतता आणि सलोखा राहावा असा ते प्रयत्न करतात. दुसरे म्हणजे गावात वीज, पाणी, रस्ते अशा मूलभूत सोयी आहेत. शाळा आहे, पोस्ट ऑफिस आहे, ग्रामपंचायत आहे, टेलिफोन आहे. एका छोट्या गावाच्या मानाने ब-याच गोष्टी इथे उपलब्ध आहेत. आता गावात काही नव्याने बांधायचे नाही सार्वजनिक कामासाठी. त्यामुळे फारसे असमाधान नाही लोकांच्या मनात असे दिसते. तिसरी गोष्ट – जी खर तर लोकशाहीला मारक आहे काहीशी – गावात एकाच राजकीय पक्षाचा प्रभाव आहे. तालुका, जिल्हा, राज्य .. सगळ्या ठिकाणी हा पक्ष सत्तेत आहे ; त्यामुळे इतर राजकीय पक्षांना इथे पाय रोवायला फारशी संधी मिळालेली नाही. कधीकधी वादावादी होते, भांडण होतात .. अशा वेळी गावची जुनी जाणती मंडळी सामोपचाराने मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात.

हे सगळ ऐकताना मला बर वाटलं. लोकशाही म्हणजे काही फक्त निवडणुका आणि मतदान नाही. त्याशिवायही लोकशाही पद्धतीने काम चालत असेल तर त्याच कौतुक करायला हव. यात लोकांचा बराच वेळ वाचतो, पैसा वाचतो आणि ताणही कमी राहतो.

ही अर्थात चित्राची एक बाजू झाली, दुसरेही काही असेलच. पण कधी नाही ते मी फार खोलात गेले नाही. इतरांना काही विचारलं नाही. एक तर मला वेळ नव्हता आणि दुसर म्हणजे मी पाहुणी म्हणून तिथ गेले होते. आता पुन्हा कधीतरी जाईन तेव्हा बघेन वेगळ्या दृष्टीकोनातून. पण तोवर तळदेवची गाभा-यातली शांतता आणि तळदेवची लोकशाही मला आठवत राहिल हे खरच!
**

8 comments:

 1. लोकशाही आणि शांतता एकत्र?

  ReplyDelete
 2. अनामिक/का, निव्वळ योगायोग :-)

  ReplyDelete
 3. दगडी देवळांमधला थंडावा व गाभार्‍यामधे भरून राहीलेली विलक्षण पवित्र व सुखद शांतता मनाला एक आगळावेगळा सकुन देते.
  बाकी तिथल्या लोकशाहीला सामंजस्याचे महत्व नेमके समजलेले दिसतेय.

  अवांतर :आमच्या दादरच्या घराजवळचे शंकराचे देऊळही ( पोर्तुगिजशेजारी भर रस्त्यावर असूनही )तळात(रस्त्यात)आहे.

  ReplyDelete
 4. भाग्यश्री, परकीय आक्रमकांपासून देवाला 'वाचवण्यासाठी' ही देवळ तळात असावीत अस एकदा वाटल - पण विष्णूच देऊळ मी अस तळात कधी पाहिलेलं नाही. शैव -वैष्णव वादाशी याचा संबंध असेल काय ते तपासून पहायला हव! मुंबईत अनेक वर्ष शिवाजी पार्क परिसरात राहून तू सांगतेस ते देऊळ कधी पाहिलं नाही. आता पुढच्या मुंबई भेटीत ते पाहीन :-)

  ReplyDelete
 5. Deven, if you go to Mahabaleshar for trekking, you should visit this village. The temple is indeed cool.

  ReplyDelete
 6. तळदेव खरोखर सुंदर गाव आहे!
  :)
  आणि तिथल्या समंजस लोकशाहीबद्दल पूर्वी ऐकल्याचं आठवतंय... पण तिथला शांत तलाव अन टपरी चहा जास्त लक्षात आहे!

  ReplyDelete
 7. अनू, पुढच्या तळ्देव भेटीसाठीचे मुद्दे :-)

  ReplyDelete