ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, May 31, 2011

७४. MFJ


जी गोष्ट आपल्याला आवडत नाही, ती वारंवार सामोरी यावी असा जणू नियम आहे जीवनाचा! निदान MFJच्या आणि माझ्या बाबतीत तरी नक्कीच तसा नियम आहे असा मला नेहमी संशय येतो!

नाही, नाही! MFJ ही कोणा व्यक्तीच्या नावाची आदयाक्षर नाहीत! माणसांना टाळता येण्याची कला थोडी थोडी आत्मसात केली आहे मी अलिकडे. MFJ म्हणजे अनेकांचा अतिशय आवडता आणि माझा तितकासा आवडता नसणारा (ओके, खर सांगायचं तर नावडता!) Mixed Fruit Jam.

महाविद्यालयीन शिक्षणाचा काळ वसतिगृहात गेला. त्यानंतरही मी अनेक वर्ष या ना त्या ठिकाणी Paying Guest म्हणून राहिले. त्याहून जास्त ठिकाणी Non Paying Guest या नात्याने राहिले. थोडक्यात काय, तर बरीच वर्ष मी घराबाहेर होते किंवा कोणातरी दुस-याच्या घरात होते. या काळात भ्रमंतीला जायचं असलं की ‘ब्रेड आणि जाम’ हा सगळ्यात सोपा पदार्थ असायचा न्यायला. कोणाला माझ्यासाठी काही कराव लागू नये भल्या पहाटे उठून म्हणून मी ‘ब्रेड आणि जाम’ आवडण्याच सोंग बराच काळ निभावल! ट्रेक असो, पावसाळी सहल असो, शिबीर असो, अभ्यास दौरा असो, कामानिमित्तचा प्रवास असो – मी नेहमीच सोबत ‘ब्रेड आणि जाम’ घेऊन जात असे. मला खर तर ‘ब्रेड आणि बटर’ आवडत. पण मला आवडत ते फक्त ‘अमूल’ बटर! आणि ‘अमूल’ची वितरण व्यवस्था फारशी चांगली नव्हती पूर्वी. त्यामुळे ते अनेकदा मिळायचं नाही. शिवाय ‘बटर’ वितळत म्हणून ते नेण त्रासदायकही असायचं.

मी घेऊन गेलेला ‘ब्रेड आणि जाम’ खायची वेळ माझ्यावर सहसा यायची नाही. सहप्रवाशांमध्ये ही जोडगोळी आवडणारे कोणी ना कोणी सुदैवाने असायचेच. मग त्यांचा घरचा डबा आणि माझा ब्रेड आणि जाम यांची आम्ही सुखासमाधानाने देवाणघेवाण करायचो. त्यात माझा तिहेरी फायदा होता. एक तर MFJ पासून माझी सुटका व्हायची; दुसरे म्हणजे मला घरगुती आणि चविष्ट पदार्थ खायला मिळायचे; आणि तिसरे म्हणजे MFJ आवडणारे लोक (ते संख्येने खूप असतात ..) माझे मित्र मैत्रिणी बनायचे. मला MFJ आवडत नाही म्हणून त्यांनी वरवर कितीही हळहळ व्यक्त केली तरी त्यांचा भाजी पोळीचा डबा मी संपवायचे म्हणून ते माझ्यावर खूष असत.

स्वत:च्या घरात राहायला आल्यापासून मी एकदाही MFJ किंवा कोणताच जाम विकत आणलेला नाही. ‘मॉल’मध्ये ‘एकावर एक फ्री’च्या घोषणाबाजीत कधी जाम माझ्या सामानात पडला तर तो मी लगेच दूर करते.

यापूर्वीच्या ऑफिसात काम करताना अनेकदा ‘ब्रेकफास्ट मीटिंग’ हा एक कार्यक्रम असायचा. म्हणजे दूर दूरच्या ठिकाणाहून आलेल्या सहका-यांशी बोलायला, चर्चा करायला तेवढी एकच वेळ सोयीची असायची. तिथेही मी ‘ब्रेड जाम’ खात नाही हे कॅंटीनमध्ये काम करणा-या सर्वाना माहिती झाले होते. त्यामुळे मी गेले की ‘अरे, बिना जामवाल्या स्लाईस आण’ अशी सूचना ताबडतोब दिली जायची. जाम न आवडणारे लोक अल्पसंख्यांक आहेत हा शोध मला इतक्या वर्षांनी (!!) लागला होता तोवर!

अस आयुष्य ‘जाम’विना एकंदरीत सुरळीत चालू होत! पण काही महिन्यांपूर्वी माझ्या एका सहका-याने MFJ ची एक बाटली मला भेट दिली. हा सहकारी आदिवासी क्षेत्रात एक Food Processing Unit चालवतो. आणि हे MFJ त्या Unit मधल उत्पादन होत! या बाटलीभर MFJ चं काय करायचं असा मला प्रश्न पडला.

MFJ ची बाटली ज्यांना कोणाला जाम आवडतो, त्यांना देऊन टाक” असा अतिशय व्यावहारिक सल्ला माझ्या एका मैत्रिणीने दिला. पण मी अनेक बाबतीत अव्यावहारिक आहे – - मला मिळणा-या भेटवस्तू ही त्यातलीच एक गोष्ट! उगीच काही कोणी उठून कोणाला भेटवस्तू देत नाही. भेट देताना त्यामागे देणा-याची /देणारीची भावना असते; नात्याचा एक अदृश्य धागा असतो. मी तो जाणते. म्हणूनच मला मिळालेली भेटवस्तू मला आवडो अथवा न आवडो, मी ती वापरते – न आवडलेली भेटवस्तू कधीच कोणा दुस-याला देऊन टाकत नाही. ‘मला आवडत नाही’ म्हणून दुस-याला काही देणे आणि ‘समोरच्याला आवडते म्हणून’ त्याला /तिला काही देणे यात मूलभूत फरक आहे! माझ्या या स्वभावामुळे मी अनेकदा मला न आवडणा-या रंगाचे कपडे वापरले आहेत; कंटाळवाणी पुस्तके वाचली आहेत; फालतू चित्रपट पाहिले आहेत; एरवी मला कधी गरज भासत नाही अशा चैनीच्या वस्तू वापरल्या आहेत.

असो. तर या MFJ चं काय करता येईल यावर मी बराच विचार केला. अति विचारांचा जो परिणाम असतो तोच इथेही झाला – म्हणजे मी कृती काहीच केली नाही. काही दिवस विचारांत गेल्यावर मी MFJ ला पूर्ण विसरून गेले.

पण आपण दुर्लक्ष केल्यामुळे; समस्या नाहीच आहे अस मानल्यामुळे प्रश्न थोडेच संपतात? मागच्या आठवड्यात माझ्या एका मित्राने मला आणखी एक आणि आणखी मोठी MFJ ची बाटली दिली. ‘मला MFJ आवडत नाही; माझ्या घरात आधीच एक MFJ ची बाटली पडून आहे’ ही वस्तुस्थिती मी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याला वाटलं की मी संकोच करते आहे. “महाबळेश्वरचा प्रसिद्ध जाम आहे हा; एकदा खाल्ल्यावर मला आणखी आणायला सांगशील” अस पूर्ण आत्मविश्वासाने म्हणत तो MFJ माझ्यासाठी ठेवून गेला.

आता माझ्या संग्रहात एक सोडून दोन MFJ आहेत. तो मला आवडत नाही म्हणून तो मी दुस-या कोणाच्या तरी गळ्यात मारणार नाही हे नक्की!

आता या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा?

जामपासून कोणकोणते पदार्थ बनतात? जामचा पराठा; जामची चटणी; जामचे सरबत – असे काही पदार्थ असतात का? MFJ न आवडणा-यांनी सध्या माझ्याकडे न फिरकणे चांगले. ज्यांना MFJ आवडतो ते येतील अशी खात्री आहेच. दूरच्या गावी राहणा-यांनी फारसे वाईट वाटून घेऊ नये. MFJ पासून सुटकेचा उपाय सांगायला थेट माझ्या घरीच आले पाहिजे असे थोडेच आहे? विचार, कल्पना, युक्ती सुचवायचे आणि संवादाचे इतरही मार्ग आहेतच की अर्थात आपले!
**

Thursday, May 19, 2011

७३. तडजोड

प्रसाद तसा लहान वयापासून वेगवेगळ्या सामाजिक चळवळीत असायचा. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे’ हे वचन त्याला जणू तंतोतंत लागू होते. सामाजिक कामाचा हा वारसा त्याला थेट त्याच्या आजोबांकडून मिळाला होता. त्याचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते आणि अजूनही सक्रिय होते. विविध सामाजिक संस्थांशी विश्वस्त, सल्लागार, मार्गदर्शक, आधारस्तंभ .. अशा अनेक स्तरांवरचे त्यांचे नाते होते. खर तर आम्ही सगळेजण (आणि त्यातल्या त्यात मी) प्रसादकडे जायचो ते आजोबांना भेटण्यासाठी. त्यांच्याशी गप्पा मारायला मजा यायची. उपदेशाचा आव न आणता ते आम्हाला बरच काही शिकवून जात; एखाद्या गंभीर प्रसंगात दुसरी बाजू दाखवून विचार करायला आम्हाला प्रवृत्त करत. आमच्या सबंध ग्रुपमध्ये मी एकटीच मुलगी असल्याने कदाचित मी आजोबांची जास्त लाडकी होते. माझा आणि त्यांचा विशेष संवाद चालायचा तो गणित आणि कविता या दोन विषयांवर. ते जुन्या काळातले गणिताचे पदवीधर. प्रसादचे आजोबा हे माझ्या गणिताच्या अडचणी सोडवायचे आणि गणितावर विचार व्यक्त करायचे एक हक्काचं ठिकाण होत.

निसर्गक्रमानुसार एक दिवस आजोबा हे जग सोडून गेले. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर मी पुण्याला रामराम ठोकला आणि दूरच्या गावी जाऊन वेगळ्या प्रकारच्या कामात मग्न झाले. कामात नाविन्य होत आणि माझ्यात प्रचंड उत्साह होता. हे कुरूप जग आपण बघताबघता बदलून टाकू असं वाटण्याचं स्वप्नाळू वय होत ते माझ! मी माझ्या नव्या जगात पूर्णपणे रमून गेले.

अधुनमधून पुणेकर मंडळीची पत्र यायची. क्वचित कोणीतरी मुद्दाम वाकडी वाट करून भेटायलाही यायचे. अशा वेळी प्रसादच्या आजोबांची आठवण हमखास निघायची. दीड दोन वर्षानंतर मी पुन्हा पुण्यात यायला जायला लागले. प्रवासात, नेहमीच्या कट्ट्यावर प्रसादही एक दोनदा भेटला. प्रसादची घोडदौड जोरात चालली होती ते पाहून बर वाटलं. म्हणजे त्याच दुकान तर चांगल चालल होतच पण नुसते पैसे कमवायच्या मागे न लागता तो सामाजिक कामातही सहभागी होता. अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यकारिणीत, विश्वस्त मंडळात तो इतक्या लहान वयात होता की ‘पोरगा आजोबांची गादी चालवतोय चांगली’ अस जो तो म्हणत होता. आपला मित्र ‘मोठा’ झालाय याच आम्हालाही समाधान होत.

प्रसादशी तीन चार वेळा बोलल्यावर मात्र काही गोष्टी खटकायला लागल्या. एक तर आम्हाला कोणालाच एका संघटनेचे/संस्थेचे काम पूर्ण न्याय देऊन करता येते असा अनुभव येत नव्हता. पूर्ण वेळ कार्यकर्त्यांची गोष्ट वेगळी – पण नोकरी सांभाळून सामाजिक कामासाठी पुरेसा वेळ देता येत नव्हता याची अनेकांना खंत होती. पण प्रसाद मात्र एकाच वेळी चार पाच संस्थांना वेळ देत होता. बर, त्यात काही सुसंगती तरी असावी? एक पर्यावरणावर काम करणारी संस्था; एक देवदासींचे प्रश्न सोडवणारी; एक लहान मुलांसाठी मासिक चालवणारी चळवळ; तर एक रक्तदाता प्रतिष्ठान – काही संस्था तर काही संघटना. काही रचनात्मक कामात तर काही संघर्षात्मक कामात! प्रसाद काही अमानवी कार्यक्षम नव्हता. मग त्याच्या इतक्या कामांचे गौडबंगाल होते तरी काय? प्रसादशी काही बोलायला जावं यावर तर तो विषय बदलायचा.

आम्ही सगळ्यांनी एकदा ठरवून प्रसादला याबाबत छेडले. त्याच्या कामाबाबत प्रश्न विचारले. मग आमच्या लक्षात आलं की, प्रसादला त्या सा-या कामांबाबत, त्या संस्था-संघटनांच्या विचारप्रणाली आणि कार्यपद्धतीबाबत, त्यांच्या समाजातील प्रतिमेबाबत, त्यांच्या ध्येयधोरणांबाबत, त्यांच्या स्वप्नाबाबत काहीच माहिती नव्हत! तो आपला नेमाने फक्त कार्यकारिणीच्या बैठकांना जायचा. त्याला विषयाची गंधवार्ता नसल्याने तो कशाच्या खोलात जायचा नाही, अडचणीत टाकणारे प्रश्न विचारायचा नाही. त्यामुळे प्रसाद फार ‘समंजस आणि सहकार्य करणारा’ माणूस आहे असा बोलबाला झाला. आणि साहेबांना जिकडून तिकडून आमंत्रण येऊ लागली; साहेब सुखावले आणि सगळीकडे जाऊ लागले. महिन्या दोन महिन्यातून एखादी मीटिंग करायची इतक सोपे काम होते ते!

वस्तुस्थिती कळल्यावर आम्ही सगळे काही काळ सुन्न आणि विषण्ण झालो. अखेर प्रसाद आमचा मित्र होता आणि प्रसादच्या आजोबांचे आमच्यावर ऋण होते. आपापल्या संघटना आम्ही सर्वानी आमच्या जगण्याचा एक अविभाज्य हिस्सा मानला होता. त्यातल्या प्रत्येक छोट्या मोठया गोष्टीत आम्ही गुंतलो होतो; बाहेर अभिनिवेशाने संघटनेची प्रतिमा जपत होतो. कधीकधी त्यातल्या ताणतणावांनी, अपेक्षाभंगांनी कोसळत होतो. सामाजिक काम उत्कटतेने, तीव्र आवेगाने, प्रामाणिकपणे, वैचारिक निष्ठेने करण्याची आमची भूमिका होती. प्रसादला आम्ही हे सांगितल्यावर तो हसला. म्हणाला, ‘जास्त मनाला लावून न घेता सहज जमेल तितके करण्यात शहाणपणा आहे.’ शेवटी ‘दोनही जगांत यश मिळवायचं तर तडजोड करावी लागते’ असा सल्लाही त्याने आम्हाला दिला.

त्यावेळी मुक्ता, स्वानंद, पांडुरंग आणि मी वेगवेगळ्या संघटनांचे पूर्ण वेळ काम करत होतो. महेश, सीमा, रामदास आणि इतर अनेक जण नोकरी करून संघटनेला वेळ देत होते, स्वत:चा पैसा खर्च करत होते.

कालांतराने आम्हाला सर्वांनाच आपापल्या संघटनांचे विदारक अनुभव आले. सामाजिक संस्था संघटनांमध्येही एक श्रेणीबद्ध रचना असते; एक उतरंड असते; विचारांचा एक साचा असतो; तिथेही एक कंपू असतो. त्यात कमी अधिक धग सोसून आम्ही हळूहळू बाहेर पडलो. आमच्या गुंतवणुकीने आम्हाला खूप दु:ख दिलं – पण फक्त दु:खच दिलं अस मात्र नाही. त्या अनुभवातून जाताना आम्ही घडलो – काही वेगळेच घडलो. आमच्या कामाच्या आठवणी आजही आम्हाला भावूक बनवतात. आपल्याला शक्य होत तितकं आपण केलं असं वाटून समाधान मिळत.

परवा ब-याच वर्षांनी आम्ही सगळे परत भेटलो तेव्हा हे जाणवल. आम्ही बरेच बदललो होतो त्यामुळे एकमेकांशी बोलायला आमच्याकडे खूप काही होत. प्रसाद मात्र होता तसाच होता आणि त्याच्याकडे सांगण्यासारख काहीच नव्हत. त्याने जणू काही अनुभवलच नव्हत! आम्हाला प्रसादच्या आजोबांची आठवण येत होती. त्यानी सांगितलेले अनेक अनुभव आम्हाला कसे उपयोगी पडले ते आम्ही एकमेकाना सांगत होतो. प्रसादला मात्र आजोबांचा अनुभव वापरायची संधीच मिळाली नव्हती.

गुंतवणुकीत, आसक्तीत दु:ख असत म्हणून अलिप्ततेने जगलो तर अनुभवच येत नाहीत! आणि अनुभव नसतील तर जगण ‘श्रीमंतीच’ होत नाही. प्रसादला त्यादिवशी आमचा हेवा वाटला. त्याच्या आजोबांच्या विचारांचा वारसा त्याच्यापेक्षा आम्ही इतरांनीच जास्त जपला होता अस त्याला जाणवलं – तसं त्याने बोलुनही दाखवलं. प्रसादला जे आज समजलय ते कृतीत आणायला थोडा उशीरच झालाय त्याला - अशी मला भीती वाटतेय. मी त्याला तसं बोललेही.

अर्थात प्रसादला अजुनही स्वत:च्या जगण्याशी तडजोड करता येईल आणि समाधान मिळवता येईल. त्याला अजुनही गुंतता येईल आणि अनुभव घेता येतील. त्याच्या आजोबांच्या विचारांचा वारसा अजूनही त्याला मिळवता येईल ख-या अर्थाने. प्रसाद किंवा मी अशा प्रकारच्या लोकांसाठी वय ही अडचण नसते; माहितीचा अभाव ही अडचण नसते; कौशल्य नसणे ही अडचण नसते; संधी मिळत नाही ही अडचण नसते; मनोवृती हीच अडचण असते अनेकदा.

प्रसादने पूर्वी एकदा जगण्याशी तडजोड केली होती. आज पुन्हा एकदा तडजोड करण्याची संधी आहे त्याच्यापुढे. परिस्थितीशी तडजोड अपरिहार्य असते आयुष्यात – पण जोवर आपण मानतो तोवरच! एकदा ही मान्यता बाजूला टाकली की नवा अर्थ घेऊन येते परिस्थिती आणि तडजोडही!!

Wednesday, May 11, 2011

७२. अदलाबदल

नव्या भागात प्रवास करताना सहसा मला वातानुकूलित गाडीने किंवा डब्यातून प्रवास करायला आवडत नाही. नव्या भागात जाताना खिडकीतून दिसणार जग नवं वाटत. पण अर्थात आजचा प्रवास नेहमीच्या मार्गावर होता. खिडकी हवी तर धूळ, गार हवा, मधून येणारा पाउस हेही सोबत येणार होत! म्हणून मी वातानकूलित तिकीट विनातक्रार स्वीकारलं होत!

पण डब्यात जेव्हा मी प्रवेश केला तेव्हा मला ‘खिडकी’ मिळाली आहे हे पाहिल्यावर मला लहान मुलासारखा आनंद झाला. आता पुढचे काही तास मला पुस्तक उघडायची गरज भासणार नव्हती तर! या डब्याच्या खिडकीतून नीट दिसत नाही दृश्य हे खर, पण तरीही मी ते पाहत नुसती निवांत बसू शकणार होते! आता तीन आसनांच्या रांगेत माझी जागा शेवटची होती हा अडचणीचा भाग होता. आयुष्यातले जवळपास सगळे आनंद अशा ‘पण’शी जोडलेले असतात. ‘त्यामुळे आपला आनंद कमी होऊ दयायचा नाही’ अशी मी स्वत:ला पुन्हा एकदा आठवण करून दिली.

माझ हे खिडकीच्या सुखाच स्वप्न अल्प काळचं टिकल! मी जागेवर जेमतेम स्थिरावले तोवर १७ -१८ वर्षांचा एक तरुण मुलगा येऊन मला म्हणाला, “मावशी, तुम्ही प्लीज खिडकीची जागा मला द्याल का?”

माझ्याबाबतीत नेहमी अस होत! एक तर खिडकीची जागा, खालचा बर्थ रेल्वे प्रवासात क्वचितच मला मिळतात – आणि जेव्हा केव्हा ते मिळतात तेव्हा कोणीतरी मला विनंती करून ती जागा मागत! आता कोणी ओळख नसणार विनंती करत तेव्हा त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असत. माणस सहसा दुस-याला विनाकारण त्रास देत नाहीत असा माझा आजवरचा अनुभव. म्हणून जास्त काही न विचारता मी हसून शेवटच्या तिस-या – खिडकीपासून दूर असणा-या जागी गेले.

त्या तरुण मुलाच्या मागोमाग त्याचा धाकटा भाऊ किंवा बहीण दिसण्याऐवजी जेव्हा एक सत्तरीचे गृहस्थ दिसले तेव्हा मला आश्चर्य वाटलं! आपल्या आजोबांचा हात काळजीपूर्वक धरून सावकाश चालत त्या मुलाने त्यांना जागेवर बसवले, ते आरामात बसले आहेत अशी खात्री केली, खिडकीचा पडदा सरकवला, आजोबांना थंडी तर वाजत नाही ना हे विचारल. मग माझ्याकडे वळून तो हसत म्हणाला, “दादाजींना खिडकीत बसायला आवडत, म्हणून मी मुद्दाम तुम्हाला विनंती केली. मी मनापासून तुमचा आभारी आहे.”

मी त्यावर हसले आणि पुस्तक काढून वाचायला लागले.

पण आजोबा आणि नातवात मस्त संवाद चालू होता – तो माझ्या कानावर पडत होता त्यामुळे वाचनात माझे पूर्ण लक्ष लागेना. मी डोळे मिटले पण झोपही येईना.

“गडबड नको, शांत व्यवास्थित बसायचं आता दोन तीन तास. काही खायचं का? भूक लागलीय का? डब्यात खाऊ आहे आजीने दिलेला. तो नको? वडा पाव खायचाय? सोसायचा नाही तो! बर, आता विक्रेता आला की त्याला विचारू काय आहे त्याच्याजवळ ते! ...” मला तो संवाद ऐकताना मजा वाटली कारण हे सगळ तो नातू आपल्या आजोबाना म्हणत होता.

मग दादाजीना गाण ऐकायची लहर आली. नातवाने मोबाईलवर गाण चालू करताना माझ्याकडे अपराधी नजरेन पाहिलं. तो म्हणाला, “ दादाजीना ऐकायला कमी येत, त्यामुळे गाण्याचा आवाज जरा मोठाच ठेवावा लागणार. तुम्हाला त्याचा त्रास होईल थोडा वेळ, पण गाण नाही लावलं तर ते नाराज होतील ....”

“असू दे, मला काही त्रास नाही. मी पण ऐकेन गाणी ...” मी त्याला हसून म्हटलं.

दोन चार गाणी झाल्यावर आजोबाना फोन लावायची हुक्की आली. आपल्या मुलाला (त्या तरुणाच्या बाबांना) फोन लावला गेला. दादाजी तक्रार करत होते, “हा मला वडा पाव देत नाहीये खायला, तू त्याला सांग.” बाबा तरुण मुलाशी काहीतरी बोलले. “पण ..” त्याने काहीतरी सांगायचा प्रयत्न केला. मग तो समंजसपणे हसला. फोन ठेवताना त्याने दादाजींना सांगितलं, “घेऊ ह आता वडा पाववाला आला की!”

थोडया वेळाने नातवाने आजोबाना आग्रहाने चहा पाजला; चहाबरोबर दोन बिस्किटे खायला घातली; एक डुलकी काढण्याचा आदेश दिला, बाथरूमला जायची आठवण करून दिली; तिथवर तो आजोबाना घेऊन गेला. एखाद्या लहान मुला-मुलीसाठी मोठ्यांनी जे जे कराव ते सगळ हा तरुण नातू आपल्या आजोबांसाठी करताना पाहून मला नवल वाटलं. त्या तरुणाची संवेदनशीलता, त्याचा समंजसपणा, जबाबदारीचे त्याचे भान आणि मुख्य म्हणजे आजोबांवारचे त्याचे प्रेम हे पाहताना मला बर वाटत होत! आजोबा पण नातवाचे त्यांच्याकडे इतके लक्ष असण्याने सुखावलेले दिसत होते.

दादाजी थोडा वेळ झोपले ती संधी साधून मी त्या युवकाशी गप्पा मारल्या. तो सांगत होता, “म्हातारपण म्हणजे दुसर लहानपणच असत म्हणा ना! मी जेव्हा लहान होतो, तेव्हा मी आजोबाना फार त्रास द्यायचो. मी त्यांनी सांगितलेली एकही गोष्ट ऐकायचो नाही पण ते मला कधी रागावले नाहीत. त्यांना मी फार पळवायचो मागे मागे माझ्या! मला सांभाळायच म्हणजे त्याना केवळ शारीरिक कष्ट नव्हते, भरपूर मानसिक ताणही होता. पण त्यांनी कधी माझ्यावर हात उगारला नाही. त्यांनी एक गोष्ट दिली की मी दुस-याच काशासाठी तरी हटट करायचो. पण दादाजींचे माझ्यावर खूप प्रेम होते आणि त्यांनी कधीही माझ्याबद्दल तक्रार केली नाही. त्यानी माझी खूप काळजी घेतली. मला बर वाटत की त्यांची काळजी घेण्याची संधी मला मिळतेय. आमच्या पूर्वीच्या भूमिकांची फक्त आता अदलाबदल झालीय इतकचं – बदललं काहीच नाही त्याव्यतिरिक्त! सगळ तेच अन् तसच तर आहे ....

अदलाबदल .. अगदी नेमके हेच शब्द माझ्या मनात येत होते मघापासून! जेव्हा आपल्याला भूमिका बदलावी लागते तेव्हा भूमिकेतला बदल आपण कसा स्वीकारतो यावर आपल् सुख-दु:ख अवलंबून असत! भूमिकेतली अदलाबदल वाटते तितकी सोपी नसते! कारण अनेकांसाठी याचा अर्थ असतो – सत्ता सोडणे, अधिकार सोडणे, केंद्रस्थान सोडणे वगैरे! काहींसाठी याचा अर्थ असतो – सत्ता स्वीकारणे, त्याची जबाबदारी घेणे, निर्णय घेण्याची संधी असणे, केंद्रस्थानी असणे वगैरे.

आज आपण आपली भूमिका कशा त-हेने निभावून नेतो, यावर आपल्या वाट्याला ‘बदलेली’ भूमिका कोणती येणार हे अवलंबून असत! म्हणून आपल्याला आश्चर्य वाटायचं खर तर कारण नाही – आपल्याला माहितीच हव काय पुढे असणार आहे ते! आजची आपली भूमिका नीट निभावून नेली की त्याची दुसरी बाजूही कालांतराने समोर येतेच. आयुष्याच ‘पूर्ण’ चित्र आपल्याला दाखवायची ही निसर्गाची जणू एक युक्तीच आहे म्हणा ना!
**
प्रसिद्धी: साप्ताहिक विवेक, १५ मे २०११

Monday, May 2, 2011

७१. संभ्रम


पुणे रेल्वे स्टेशनपासून माझ्या घरी यायचं हे एक कठीण काम होत. म्हणजे बाहेरगावचा प्रवास परवडला पण पुणे स्टेशन ते घर हा प्रवास मला नको वाटायचा – तो मुख्यत्वे रिक्षावाल्यांच्या अनुभवामुळे! खर तर पोलिस देखरेखीखाली Pre Paid Auto’ चा प्रयत्न वाहतूक पोलिसांनी केला होता. मी शक्यतो तिथून रिक्षा घ्यायचे. स्टेशनवरच्या गर्दीतून रिक्षा शोधणे आणि रिक्षावाल्याशी घासाघीस करणे या दोनही गोष्टी यामुळे टळायच्या. काहींच्या मते त्यात दहा एक रुपये जास्त लागायचे आणि कधी कधी रांगेत काही काळ उभे रहावे लागायचे – असे दोनच तोटे खर तर होते. तरीही रेल्वे स्टेशनवरचा हा प्रयोग शहाण्या पुणेकरांनी – त्या सेवेचा अजिबात उपयोग न करून - हाणून पाडला होता. आता एखादी सेवा कोणी वापरली नाही, तर ती बंद पडणारच की!

बरेचदा रिक्षावाले अव्वाच्या सव्वा रक्कम मागायचे. पहाटे पाच साडेपाच किंवा रात्री अकराच्या सुमारास कोणी जास्त पैसे मागितले तर ते एकवेळ समजू शकत! कारण अनेकदा त्याना परतीचे प्रवासी मिळत नाहीत अशा वेळी. पण सकाळी सात वाजता किंवा संध्याकाळी पाच वाजता कोणी जास्त पैसे मागितले – म्हणजे मीटरनुसार न येता थेट पैसे मागितले किंवा मीटरपेक्षा दहा वीस रुपये जास्त मागितले तर मी ती रिक्षा सोडून द्यायचे (अजूनही देते). रिक्षावाल्यांच एक असत – त्यांच्यात एकी खूप असते. एका रिक्षाला आपण जास्त पैसे द्यायला नाही म्हणल आहे हे इतर रिक्षावाल्यांना कळत आणि ते आपल ‘भाड’ नाकारतात. अशा वेळी मग थोड चालत जाव आणि दुस-या स्पॉटवरून रिक्षा पकडावी हे उत्तम!

त्यादिवशी तसच झालं. म्हणजे कोणी रिक्षावाला मीटरनुसार यायला तयार नव्हता. सकाळचे सहा वाजले होते. वातावरण छान उल्हसित करणार होत. प्रवास ठीकठाक झाला होता. म्हणून मग मी चालायला सुरुवात केली. पाच सात मिनिटांच्या अंतरावर एक मोठा चौक आहे – तिथ मिळेलच रिक्षा अस म्हणून मी निघाले.

दोन तीन मिनिटातच पाठीमागून एक मोकळी रिक्षा आली. रिक्षावाले काका पन्नाशीचे असावेत. ते थांबले; कुठे जायचय ते मी सांगितलं, ते बसा म्हणाले आणि मी त्या रिक्षात बसले. आमच्या गप्पा झाल्या. पाऊस, पुण्यातले रस्ते, राजकारण, पुण कस ‘आता’ बदलत चाललय – असे नेहमीचे दोन अनोळखी माणसांनी बोलायचे विषय आम्ही बोलत होतो. ते संपल्यावर बोलताना काका माळकरी आहेत, दरवर्षी न चुकता वारीला जातात, नियमित ज्ञानेश्वरी वाचतात – अशा अनेक गोष्टी समजल्या. मजा आली मला त्यांच्याशी गप्पा मारायला.

माझ्या घराशी आम्ही पोचलो, तेव्हा मीटरनुसार नव्वद रुपये बील झालं होत. मी शंभर रुपयांची नोट काकांच्या हातात दिली आणि ‘बर वाटलं तुमच्याशी गप्पा मारून’ अस म्हणत घराकडे चालायला लागले. “ताई, दहा रुपये राहिलेत ...” अस काकांच वाक्य पूर्ण व्हायच्या आत मी म्हटलं, “राहू दया हो काका, दहा रुपयांच काय एवढ नाही महत्त्व ...”

माझ वाक्य पूर्ण व्हायचा आत काका हसायला लागले. क्षणभर मला त्यांच हसण जरा वेगळ आणि विचित्र वाटलं. “का हो काका, हसायला काय झालं?” माझा आवाज नकळत जरा चढला असणार कारण काका एकदम बिचकले आणि शांत झाले. “नाही, हे दहा रुपये घ्या तुम्ही परत,” ते मला म्हणाले. आता आश्चर्य करण्याची वेळ माझी होती. मी परत एकदा ती दहाची नोट त्यांच्या हातात दिली आणि घराकडे निघाले.

मी मागे वळून पाहिलं तर काका हातात ती नोट तशीच ठेवून स्वत:शीच हसत होते. आता मात्र मला राहवल नाही. मी दोन पावल परत आले. काका मला पाहून चपापले आणि रिक्षा सुरु करायला लागले. मी हसत आणि शांतपणे विचारल, “काका, तुम्हाला कशाच हसू येतय ते मला सांगाल का?” त्यावर काकांनी नुसतीच मान हलवली. मी त्याना परत आर्जवाने म्हटल, “काका, मला न सांगण्यासारख काही असेल तर ठीक आहे. पण तुमच्या मनात आत्ता आलेला विचार माझ्यासाठी पण महत्त्वाचा ठरू शकतो.”

काकांनी माझ्याकडे पाहिलं. “ताई, राग तर नाही येणार न तुम्हाला?” त्यानी विचारल. असा प्रश्न समोरच्या माणसाने विचारला की आता आपल्यापुढे न आवडणार काहीतरी वाढून ठेवलय इतक मला समजत. पण मीच त्यांना बोलण्याचा आग्रह करत होते, आता माघार घेण्यात काही अर्थ नव्हता. “काका, तुम्ही सांगितल्याशिवाय कस काय कळणार मला राग येतोय की नाही ते ..” मी जरास हुशारीने उत्तर दिल.

काका क्षणभर थांबले. मग म्हणाले, “मी रेल्वे स्टेशनवर होतो आज सकाळी.” मला त्यांच्या वाक्याचा काही अर्थ कळला नाही. “बर मग?” मी विचारल. “नाही, तुम्ही जास्त पैसे द्यायचे नाहीत म्हणून तिथल्या रिक्षा सोडल्यात आणि आता मला मी न मागताच दहा रुपये देताय....” अच्छा! इतकाच मुद्दा होता तर! मी म्हटल, “काका, ते तिथले रिक्षावाले मागत होते, इथे मी स्वखुषीन देतेय. “

“त्याचच तर मला हसू आलं ताई.” काका माझ्याकडे पहात, मला कितपत राग येण्याची शक्यता आहे हे अजमावत म्हणाले. “काम एकच आहे – दहा रुपये जास्त दयायचं! पण तुमचा विचार बदलतो त्यामागचा ..” ते अर्धवट थांबले. हा माणूस काहीतरी वेगळ आणि महत्त्वाच बोलतोय हे माझ्या लक्षात आलं. अर्थातच कृती करणारी मी असल्यामुळे संकोचाने ते जास्त मोकळेपणाने बोलत नव्हते ते मला जाणवलं.

“काका, तुम्हाला अस म्हणायचय का की माणूस स्वखुशीने आनंदाने काम करतो आणि लादल गेल त्याच्यावर काही तर ते त्याला आवडत नाही?” मी विचारल.

रिक्षावाले काका पुन्हा एकदा ‘बोलाव की नाही’ या विचारत पडले. मग निश्चय केल्यासारख म्हणाले, “मी तुमच्याबद्दल नाही बोलत ताई, त्यामुळे वाईट वाटून नका घेऊ. पण तुम्ही म्हणलात तो मुद्दा आणखी थोडा पुढे नेऊन मला अस म्हणायचय की आपला विचार माणसाला महत्त्वाचा वाटतो – दुस-याचा नाही. म्हणजे माझच बघा ना, मी दहा रुपये जास्त मागितले असते तर मी ते तुमच्याकडून हक्काने घेतले असते, तसे घेण्यात मला समाधान मिळाल असत. पण तेच तुम्ही देताय तर मला घ्यायला नको वाटतात.”

मी विचारत पडले. त्यांच उदाहरण मलाही लागू पडत होत. थोडक्यात ते माणसाच्या अहंकाराबद्दल बोलत होते. रिक्षावाले मला जास्त पैसे मागतात तेव्हा मी देत नाही, पण मी आपण होऊन मात्र जास्तीचे पैसे देते. पैसे देण्याची कृती एकच असते – फक्त एका प्रसंगात माझा अहंकार सुखावतो तर एकात तो दुखावतो. अहंकार सुखावणारी कृती करण्याकडे आपला स्वाभाविक कल असतो आणि अहंकार दुखावणारी कृती आपण शक्यतो टाळतो – त्याला तात्विक मुलामा देतो अनेकदा.

“काका, मला समजल तुम्ही काय म्हणताय ते! तुमच म्हणण मला एकदम पटल. कधी लक्षात नव्हत आलं आजवर हे.” मला त्यांचे कसे आभार मानावेत ते कळत नव्हत.

“दया काका ती दहाची नोट परत मला. “ मी हात पुढे करत म्हटल.

काका परत एकदा हसले. म्हणाले, “मी त्याच तर धर्मसंकटात आहे. पैसे तुम्हाला परत द्यावे तर तो माझा अहम् होतो – मी मागितले नव्हते ना ते पैसे. पैसे ठेवावेत तर त्या पैशांचा लोभ मला आहे असं दिसतय.. त्यामुळे हसायला आलं मला. कसे आपण सगळे या ‘अहम्’ ची शिकार आहोत हे कळून!”

काही कळल तरी प्रश्न आहेत; काही न कळल तरीही प्रश्न आहेतच!
ज्ञानाने, माहितीने सगळे प्रश्न सुटतात असा आपला एक भ्रम असतो – त्याने बरेचदा प्रश्न वाढतात! छोटे वाटणारे प्रश्न मोठ रूप धारण करतात; नसलेले प्रश्न उपस्थित होतात वगैरे ब-याच गोष्टी घडतात!

एक गोष्ट खरी की माझ्यासारख्या माणसांना संभ्रमात राहायला अस काही ना काही निमित्त मिळतच!