ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, June 14, 2019

२५७. फिलिपिन्स नोंदी: भाग ३: कोताबातो, स्वातंत्र्यदिन आणि राष्ट्रीयता


भाग २

८ ते १४ जून २०१९

दोन गोष्टी. एक तर या आठवड्यात डवावच्या बाहेर गेले होते. त्यामुळे आता जे अनुभव आहेत ते केवळ डवावमधले नाहीत, म्हणून लेखमालेचं आधीचं शीर्षक फसवं ठरेल. मग आता मला फारसं न आवडलेलं काहीसं घिसंपिटं असं शीर्षक तूर्तास वापरते आहे. कुणाला अधिक चांगलं शीर्षक सुचलं तर जरूर कळवा. बदलता येईल ते कधीही.

दुसरं म्हणजे शीर्षकात नोंदवलेल्या तीन शब्दांचा एकमेकांशी तसा काही संबंध नाही. या तीन गोष्टींबाबत मी काही अनुभवलं एवढ्या आधारावर मी ती मोट बांधली आहे. म्हणजे शीर्षकही तसं फसवं आहे. तर असो.

कोताबातो

फिलिपिन्समध्ये बेटं किती आहेत? फेब्रुवारी २०१६ मधल्या एका सरकारी घोषणेनुसार फिलिपिन्समध्ये ७६४१ बेटं आहेत. ही बेटं तीन मोठ्या समुहांमध्ये विभागली आहेत. उत्तरेला लुझॉन (Luzon), मध्यभागी विसया (Visayas) आणि दक्षिणेला मिंडनाव (Mindanao). मी या दक्षिणेच्या बेटावर मिंडनावमध्ये राहते. फिलिपिन्सची मनिला हा नॅशनल कॅपिटल रिजन आणि अन्य १७ रिजन (एकूण १८) अशी प्रशासकीय रचना आहे. १७ रिजन्सची विभागणी अनेक प्रांतांमध्ये करण्यात आली आहे.

मिंडनावमध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत. डवाव हा एक प्रशासकीय विभाग आहे. मी ज्या कोताबातोमध्ये  (Cotabato)गेले ते शहर BARMM (Bangsamoro Autonomous Region in Muslim Mindanao) या प्रशासकीय विभागाची राजधानी आहे. हा रिजन आधी  Autonomous Region in Muslim Mindanao (ARMM) या नावाने आस्तित्वात होता. २१ जानेवारी २०१९ मध्ये झालेल्या मतदानानुसार आता हा BARMM झाला आहे. सध्या तीन वर्ष अंतरिम सरकार आहे आणि त्यानंतर लोकनियुक्त प्रतिनिधींच सरकार इथं स्थापन होईल. Bangsa हा मलाय शब्द असून त्याचा अर्थ रेस किंवा नेशन असा होतो, Moro म्हणजे लोक.  हा प्रदेश मुस्लिमबहुल आहे. Moro Islamic Liberation Front (MILF) सक्रिय असलेल् या प्रदेशाला संघर्षाचा मोठा इतिहास आहे, तो सवडीने कधीतरी सांगते – मलाही अजून तो नीट समजला नाहीये.

माझ्या दोन सहकाऱ्यांसोबत मी कोताबातोला निघाले ती दुपारच्या एक वाजता. दोनशे तीस किलोमीटरचं अंतर पार करायचं होतं, चालक अनुभवी होता, रस्ता चांगला होता आणि दुपारच्या वेळी रस्त्यावर फार वाहनं असण्याची शक्यता नव्हती.  पुर्वेकडून आम्ही पश्चिमेकडं चाललो होतो. रस्ता चांगला होता. काही भागात डोंगररांगा दिसल्या तर अनेक ठिकाणी खाचरांमध्ये भाताची लावणी चालली होती. नारळाची झाडं भरपूर दिसत होती. रस्ता रुंद होता आणि दोन्ही बाजूंना गावं होती. एकूण प्रवास सुखद झाला. वाटेत अर्लेनने भरपूर फळं घेतली होती – 
पोमेलो आणि रामबुतानचा आस्वाद घेत, गप्पा मारत प्रवास चांगला झाला. कामाच्याही गप्पा झाल्या.

हॉटेलमध्ये सामान ठेवलं आणि कॉफीसोबत मग उद्याच्या कार्यक्रमांची सविस्तर चर्चा झाली. कोणत्या मीटिंगमध्ये कुणी काय बोलायचं आहे, कोणते प्रश्न येऊ शकतात वगैरे चर्चा झाली.

दुसऱ्या दिवशी पाच तरूण मुस्लिम मुलींशी चर्चा झाली. या भागातल्या स्त्रियांचे प्रश्न काय आहेत, त्यांची स्वप्नं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी ही चर्चा होती. या पाचही मुली अस्खलित इंग्लीश बोलत होत्या. भाषेचा अडसर नसला की किती चांगला संवाद होऊ शकतो याचा हा आणखी एक अनुभव होता. एरवी इतर देशांमध्ये (आणि भारतातल्या अन्य राज्यांमध्येही) काम करताना भाषा-अनुवादक या सगळ्यांसोबत काम करण्याचं आव्हान पेलल्यानंतर सहज संवादाचा अनुभव फारच सुखद वाटतो आहे. अर्थात या सगळ्याचा एक दुष्परिणामही मला दिसतो आहे – तो म्हणजे स्थानिक भाषा शिकण्याबाबत मी एरवी जेवढी उत्साही असते त्याच्या दहा टक्केही उत्साह मी इथं फिलिपिनो शिकण्याबाबत दाखवत नाहीये.

या मुलींनी पंधरा एक मिनिटांत बावीस वेगवेगळे प्रश्न सांगितले. मग त्या प्रश्नांचं पाच मुद्द्यांमध्ये आम्ही वर्गीकरण केलं आणि त्यांचा प्राधान्यक्रमही ठरवला.
हे सगळं करत असताना या मुली त्यांचे व्यक्तिगत अनुभवही सांगत होत्या. उदाहरणार्थ 'मुलींवर लहान वयात लग्न करण्याची बळजबरी होते' हा प्रश्न सांगत असताना एकीने तिच्यावर कशी लग्नाची बळजबरी झाली होती आणि त्यातून तिने कसा मार्ग काढला हे सविस्तर सांगितलं. सामाजिक प्रश्नांवर काम करणं हे अनेकदा नैराश्य आणणारं असतं हे खरं आहे – कारण समस्या कधी संपताना दिसत नाहीत. पण समस्येवर मात करून मार्गक्रमण करणारी अशी एखादी मुलगी (अथवा स्त्री – आणि खरं तर कुणीही व्यक्ती) भेटली की मन उजळून निघतं. एका व्यक्तीचं आयुष्य बदलणं  - तेही मुस्लिमबहुल समाजातल्या मुस्लिम मुलीचं – तेही अशा भागात की जिथं गेली दोन दशकं समाजजीवन विस्कळीत होतं – अशा भागात की जिथं दहशतवाद फोफावलेला आहे  - हे अतिशय प्रेरणादायी होतं. एकवीस वर्षांच्या त्या मुलीकडून त्या दिवशी मला सकारात्मक उर्जा मिळाली, प्रेरणा मिळाली. तिचा पुढचा प्रवासही खडतर असणार आहे यात शंका नाही. पण तिच्या डोळ्यांतली चमक पाहताना मला खात्री पटली की तिची वाट चालायला ती समर्थ आहे.  

दुपारी डॉ. सुसान यांना भेटले. २०१९ ते २०२२ या काळात या परिसरात अंतरिम सरकार असणार आहे याचा उल्लेख मी आधी केला आहेच. या काळात कामकाज चालवण्यासाठी राष्ट्राध्यक्षांनी अनेक नियुक्त्या केल्या आहेत. डॉ. सुसान या Bangsamoro Transition Authority च्या कमिशनर आहेत. या बाई मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या असून Peace and Development या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. त्या एका विद्यापीठात अध्यापनाचं काम करतात. BARMM मुस्लिमबहुल रिजन असल्याने इथल्या ख्रिश्चन लोकांना आणि मूळच्या एथनिक गटांना आता त्यांच्या भवितव्याची चिंता भेडसावते आहे. सर्व गटांना सामावून घेत, BARMM सगळ्यांसाठी आहे (फक्त मुस्लिमांसाठी नाही) हे सर्व लोकांपर्यंत कसं पोचवावं याबाबत तासभर आमची चांगली चर्चा झाली. 'भारतात मुस्लिम आणि अन्य समूह कसे गुण्यागोविंदाने एकत्र राहतात' यासंबंधी मी त्यांच्या टीमला माझे अनुभव सांगावेत अशी त्यांनी मला गळ घातली. आपल्याला आपल्या देशातल्या समस्या माहिती असतात, पण तरीही इतर देश मात्र आपल्याकडून काही शिकायचा प्रयत्न करत असतात – हे मला आपल्यावरील जबाबदारी वाढवणारं वाटतं.

Institute of Autonomy and Governance च्या डेप्युटी डायरेक्टरशी पण चर्चा झाली. पॉलिसी रिसर्च क्षेत्रात काम करणाऱ्या या संस्थेचं कार्यालय भपकेबाज होतं. त्यांनी त्यांची काही प्रकाशनं मला भेट दिली. 

ती वाचून ज्ञानात नक्कीच भर पडेल. संध्याकाळी रुकसाना या आणखी एका  मुस्लिम तरूण मुलीची भेट झाली. फिलिपिन्समधला राष्ट्रीय महिला आयोग देशभरात National Gender Resource Persons तयार करत असतो. रूकसाना त्यापैकी एक. तिनेही या परिसरातल्या स्त्रियांच्या प्रश्नांविषयी मला बरीच माहिती सांगितली. मी मनिलात महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन भेटलं पाहिजे असा आग्रह केला आणि तत्परतेने तिथला संपर्क क्रमांकही मला दिला. या तरूण मुलीचं ज्ञान आणि उत्साह पाहून पुन्हा एकदा छान वाटलं. या सगळ्यांसोबत काम करताना मजा येणार आहे पुढचे काही महिने.

जाता जाता फिलिपिन्स आणि भारत यांची तुलना करण्याचा मोह होतो आहे. संक्षेपात सांगायचं तर २०१८ च्या Human Development Report नुसार १८६ देशांमध्ये  भारताचा क्रम १३० आहे तर फिलिपिन्सचा आहे ११३ वा.  एकूण आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्याही फिलिपिन्स भारतापेक्षा प्रगत आहे असं आकडेवारी सांगते आहे. येत्या काही महिन्यांत थोडं खोलात जाऊन हे तपासावं असा विचार आहे.

बाकी कोताबातोमध्ये फारसं काही पाहिलं नाही. सुरक्षेचं वातावरण नॉर्मल नाही हे रस्त्यात लष्कराकडून ठिकठिकाणी होत असलेल्या तपासणीवरून लक्षात आलं आहे. पण न पाहण्याने फारसं काही बिघडत नाही. इथं मला पुन्हा यायची संधी नक्कीच मिळेल.

स्वातंत्र्यदिन

१२ जून हा फिलिपिन्सचा स्वातंत्र्यदिन. मी या दिवशी कोताबातो ते डवाव प्रवासात असणार होते. पण हा जेमतेम पाच तासांचा प्रवास होता, आणि ऑफिसला सुट्टी असल्याने दुपारचा वेळ मोकळा होता. स्वातंत्र्यदिनाचा शहरात काय कार्यक्रम असतो, त्यात कुठे सामील होता येईल का यासंबंधी मी विचारणा केली असता माझे डवावमधले सहकारी फक्त हसले होते. कोताबातोमध्ये भेटलेल्या तरूण मुलींशी या विषयावर बोलताना त्याही फक्त हसल्या होत्या. ऑफिसला सुट्टी असल्याने संघटित कार्यक्षेत्रातला वर्ग मॉल, बागा, समुद्रकिनारे अशा ठिकाणी जाऊन मनोरंजनात आपला दिवस घालवतो असं कळलं. शहरात परेड झाली असणार याबद्दल मला शंका नाही पण त्याबद्दल फारसा उत्साह दिसत नव्हता. आपल्याकडं जागोजागी लहरणारा तिरंगा, देशभक्तीपर गीतांची उधळण, गाड्यांवर लावलेले छोटे ध्वज ... असं जे एकूण वातावरण असतं त्याचा इथं काही पत्ता नव्हता.

स्पेन-अमेरिका युद्धाचा फायदा घेऊन १२ जून १८९८ या दिवशी फिलिपिन्सच्या सशस्त्र क्रांतिकारी गटाने स्पॅनिश राजवटीपासून मुक्तता जाहीर केली. १३ फेब्रुवारी १५६५ पासून असलेली स्पॅनिश राजवट संपुष्टात आली.  या दिवशी पहिल्यांदा फिलिपिन्स ध्वज फडकवला गेला आणि पहिल्यांदा फिलिपिन्स राष्ट्रगीत गायलं गेलं. पण हे स्वातंत्र्य अल्पकालीन ठरलं. स्पेनने वीस मिलियन अमेरिकन डॉलर्सना फिलिपिन्स अमेरिकेला विकलं. हो, एका देशाने दुसऱ्या देशाला - त्या दोघांचाही नसलेला - भूभाग विकला. अमेरिकेने फिलिपिन्सला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता न देता फिलिपिन्स ही अमेरिकेची वसाहत बनवली.

फिलिपिन्सच्या सशस्त्र क्रांतिकारी गटाने अमेरिकेच्या विरोधात संघर्ष चालू ठेवला. फिलिपिन्स –अमेरिका युद्धात ४२३४ अमेरिकन सैनिक आणि १२००० ते २०००० फिलिपिनो सशस्त्र क्रांतिकारक मारले गेल्याची नोंद आहे. सुमारे दोन लाख फिलिपिनो नागरिकनांही प्राण गमवावे लागले. ४ फेब्रुवारी १८९९ रोजी सुरू झालेलं हे युद्ध अशी अनेक लोकांची आहुती घेऊन २३ मार्च १९०१ रोजी संपलं – ते अमेरिकेच्या बाजूने.

१९३५ मध्ये अमेरिकेच्या परवानगीने Commonwealth of the Philippines स्थापन झालं. ४ जुलै १९४६ रोजी फिलिपिन्स स्वतंत्र झालं. अमेरिकेने ४ जुलै ही तारीख जाणीवपूर्वक निवडली होती. ४ ऑगस्ट १९६४ रोजी फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी १२ जून हा फिलिपिन्सचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येईल असा अध्यादेश काढला. तेव्हापासून १२ जून हा स्वातंत्र्यदिन आणि ४ जुलै हा रिपब्लिक दिवसअथवा फिलिपिन्स-अमेरिक मैत्री दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

स्वातंत्र्यदिन कोणता याबाबत झालेल्या या घडामोडींमुळे लोकांमध्ये स्वातंत्र्यदिनाबाबत फारसा उत्साह नसावा का? का माझ्या संपर्कात असलेल्या शहरी उच्च मध्यमवर्गीय लोकांवरून सबंध देशाबद्दल अंदाज बांधायची मी घाई करते आहे? दुसरी शक्यता जास्त असावी.

राष्ट्रीयता आणि राष्ट्रवाद

मुरूगन हा माझा सहकारी श्रीलंकेचा आहे. श्रीलंकन हिंदू. तिथल्या वंशिक दंगलीच्या काळात तो फिलिपिन्समध्ये आला. तो पीस ऍक्टिविस्ट आहे. त्याची बायको, दोन मुलं-एक मुलगी हे सगळे इथं आले त्याला पंधरा वर्ष होतं आली. तो सांगत होता की मुलगी आजी-आजोबांकडं श्रीलंकेत गेली पण महिनाभरात कंटाळली आणि परत आली. तिला श्रीलंका आपली वाटत नाही याबद्दल तो तक्रार करत होता. मी सहज म्हटलं, खरं म्हणजे जितक्या जास्त लोकांना एकापेक्षा जास्त देशांबद्दल आपुलकी आणि प्रेम वाटेल तितकं राष्ट्रवादाच्या अतिरेकातून निर्माण होणाऱ्या युद्धखोर भावनांना आळा बसेल. लोक अशा परिस्थितीत जगाचे नागरिक बनत असतील तर ती स्वागतार्ह गोष्ट आहे. मुरूगनला अर्थातच माझा मुद्दा पटला नाही. तो म्हणाला, हे बघ. कितीही झालं तरी आम्ही फिलिपिन्समध्ये उपरे आहोत. माझी मुलगी इथंच लहानाची मोठी झाली आणि डवाव हेच तिचं घर आहे हे कबूल. पण उद्या आम्हाला इथून बाहेर काढलं तर ती जाणार कुठं? श्रीलंका हेच तिचं घर आहे हे तिने समजून घेतलं पाहिजे. जगाचे नागरिक वगैरे फार स्वप्नाळू बोलते आहेस तू. प्रत्यक्षात तुमच्या वंशिक आणि नागरिकात्वाच्या आयडेंटिटीज आता दिवसेंदिवस कळीच्या बनत जाणार आहेत. तू वर्षभरासाठी फिलिपिन्समध्ये आली आहेस ते ठीक, पण कायमचं राहावं लागलं तर तू काय करशील?” मी विचारांत पडले.

मग अर्लेनने चर्चेत भर घातली. तिने सुमारे वीस वर्ष फिलिपिन्सच्या बाहेर काम केलं. वर्षातून एकदा महिनाभराची सुट्टी घेऊन कुटुंबिय फिलिपिन्समध्ये यायचे खरे पण तिचा मुलगा वाढला तो बाहेरच्या देशांत आणि संस्कृतीत. मुलगा सोळा-सतरा वर्षांचा झाल्यानंतर मात्र तिने फिलिपिन्सला परत येण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीचं एक वर्ष मुलाला इथं स्थिरावणं फार जड गेलं (भाषा येत होती कारण घरात ते फिलिपिनो बोलत होते). तिचंही तेच म्हणणं होतं – जगाचे नागरिक वगैरे ठीक आहे, पण आपल्या देशाशी-संस्कृतीशी आपल्या मुलांची मुळं रूजलेली असायला हवीत. ते कुठेही जावोत आणि राहोत, त्यांना परतायला त्यांची हक्काची भूमी असायला हवी.

मग मला मोझाम्बिकमधली माझी सहकारी आठवली. ती मूळची बोस्नियाची. तिथल्या संघर्षाच्या काळात तिने पळ काढला (ती एक मोठी जबरदस्त गोष्ट आहे – मी तिला कायम तू या अनुभवावर पुस्तक लिहीअसा आग्रह करत असते) आणि ती अमेरिकेच्या आश्रयाला गेली. तिथं तिने अगदी पडेल ती कामं केली आणि आता मोझाम्बिकमध्ये ती एका आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेची कंट्री डायरेक्टर आहे. तीही मला एकदा सांगत होती की तिचा सध्याचा पासपोर्ट अमेरिकन आहे पण तिने बोस्नियन पासपोर्टही ठेवला आहे. उद्या काही झालं तर परतायला आपली जागा हवी हे तिचंही मत होतं.

कायम देशात राहणाऱ्या लोकांचा राष्ट्रवाद आणि देशाबाहेर अनेक वर्ष वास्तव्य केलेल्या लोकांचा राष्ट्रवाद (फक्त भारतीय नव्हे तर इतरही लोकांचा) यात दिसणाऱ्या साम्याने मी विचारांत पडले आहे. कारणमीमांसा वेगळी आहे दोघांची पण बाह्य भावनेचं रूप तेच आहे का? की समजून घेण्यात माझी गफलत होते आहे? ‘जगाच्या नागरिकत्वाच्या संकल्पनेबाबत मी जरा नीट विचार करणं गरजेचं आहे तर.

क्रमश: 
भाग ४

Friday, June 7, 2019

२५६. 'मी' आणि 'डवाव' भाग २ : १ ते ७ जून २०१९

भाग १


जून
काल संध्याकाळी परत येताना दोन-तीन दुकांनात डोकावले. एका ठिकाणी ब्राऊन ब्रेड मिळाला. दुसऱ्या ठिकाणी ब्राऊन राईस होता, पण दोन किलोंचं पाकिट होतं. माझं हे घर छोटं आहे आणि साठवण करायला फार जागा नाही म्हणून मी एक किलोचं पाकिट घेता येईल का ते बघत होते, पण नाही झालं काम. पण सगळे लोक इंग्लीश बोलतात हे किती सुखावह आहे. इथं सगळे सेटलिंग ट्रबल्स जणू नाहीसेच झाले आहेत. जरी अन्य काही आहेत म्हणा ...

कोपऱ्यावर एस ऍन्ड आर नावाचं एक सुपरमार्केट आहे. तिथं फक्त सभासदांना प्रवेश आहे असं कळलं म्हणून मी जरा कुतुहलाने तिकडं डोकावले. वर्षाला सातशे पेसो भरून सभासद व्हायचं हे कळलं. पण सभासद होण्याचे नेमके काय फायदे आहेत हे मात्र तिथल्या कर्मचारी वर्गाला नीटसं सांगता आलं नाही. कदाचित सुपरमार्केटमध्ये प्रवेश करता येतो हाच मोठा फायदा असेल.

घरी येऊन निवांत चहाचा आस्वाद घेत होते. ही ग्रीन टी आणि विविध फ्लेवर्ड टी (साखर आणि दूध नसलेले) घेण्याची सवय मला म्यानमामध्ये लागली. खरं तर दुपारी तीनपर्यंत बाहेर प्रचंड उकाडा होता. पण वातानूकुलित कार्यालयात दिवसभर बसले आणि नंतर ढगाळ हवा होती, त्यामुळे चहाची गरज भासली. तर अचानक सोफा जोरजोरात हलायला लागला. दोन सेकंदांनी माझ्या लक्षात आलं की भूकंप होतो आहे. मी हातातला चहाचा कप बाजूला ठेवला, पंखा बंद केला आणि बाहेर पडले. शेजारची दोन-तीन कुटुंबही बाहेर आली होती. मी दार ओढून घेईतो भूकंप थांबला आणि मी परत आत जाण्याचा विचार करत होते तेवढ्यात सायरन वाजला. मग आम्ही सगळे खाली गेलो. जॉय आणि रोझा अशा दोन शेजारणी, जॉयची मुलं (मोठी मुलगी, लहान मुलगा) असे आम्ही सगळे एकत्र उभे होतो. रोझा खूप घाबरली होती आणि जॉयच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. आम्ही उभ्याउभ्या दहा मिनिटं गप्पा मारल्या. जॉयच्या मते पूर्वी डवावला भूकंप होत नसे, अलिकडे मात्र कंप जाणवतो आहे. दोनेक महिन्यांपूर्वी मनिला शहराला भूकंपाचा धक्का बसला होता आणि तिथल्या काही इमारती खचल्या होत्या. त्यामुळे इथले लोक चिंतेत आहेत.

जोआन आली. तीही घाबरलेली होती. मग तिला जरा शांत केलं. पुन्हा भूकंपाचा धक्का बसला तर आम्ही दोघींनी काय करायचं याचं नियोजन केलं.

आमच्या घरात मोबाईल रेंज अजिबातच नाही. मग खाली जाऊन स्विमिंग पूलाजवळ रेंज मिळाली तेव्हा भूकंपाची माहिती वाचली. भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता . होती आणि सुमारे नव्वद किलोमीटर अंतरावर (आणि ऐशी किलोमीटर खोलीवरतपशिलातली चुभूदेघे.) त्याचा केंद्रबिंदू होता हे कळलं. भूकंपाचे तुमचे अनुभव लिहा असं या साईटवर आवाहन असतं. मग तिथं इमानेइतबारे अनुभव लिहून आले. डवाव शहरातल्या काही लोकांनी लिहिलेले अनुभव वाचले. आमच्यातल्या काहींनी सौम्य धक्का असं ज्याचं वर्णन केलं होतं, त्यालाच काहींनी तीव्र धक्का असं म्हटलं होतं. कदाचित घराची रचना, कितव्या मजल्यावर त्यावेळी व्यक्ती होती, खुल्या जागेत होती की बंदिस्त जागेत होती अशा अनेक गोष्टींवरून धक्क्याची परिणामकारकता बदलत असावी असं वाटलं. याविषयी जरा अधिक वाचायला हवं. बाकी या भूकंपाच्या धक्क्यामुळे आपलं इथलं वास्तव्य तात्पुरतं आहेइथलं म्हणजे डवावमधलं नाही तर पृथ्वीवरचंयाची जाणीव झाली. आपण लॅपटॉप, पासपोर्ट वगैरे फार जपतोपण कोणत्या क्षणी हे सगळं सोडून जायला लागेल त्याचा काही भरोसा नाही. अर्थात आहोत तोवर या गोष्टींना जपणंही क्रमप्राप्त आहे. प्रश्न मरणानंतरचे नसतातच (असले तर आपल्याला माहिती नाहीत), ते जगण्यातलेच असतात...

संध्याकाळी बाहेर पडलो तर पाऊस आला. पाऊस इथं बाराही महिने (आणि महिन्यातले बारा ते पंधरा दिवस नक्की) असतो. पावसामुळे कामं पुढं ढकलण्यात काहीही अर्थ नसतो. मग चालत राहिलो. मला मॉल दाखवायची जोआनला इच्छा होती आणि मला मात्र काहीही खरेदी करायची नव्हती, मग ते समजल्यावर चाळीस एक मिनिटांनी आम्ही परत फिरलो. वाटेत एक कप कॉफी घेतली. तिथंही पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवलाअगदी दोन ते तीन सेकंद इतकाच होता तो.

जून
आज सकाळी मला पहिली पोलिस वॉर्निंग मिळाली. त्याचं असं झालं की वाहनांसाठी सिग्नल लाल झाल्यावर मी रस्ता ओलांडला. असं करणारी मी एकटीच होते हे माझ्या तितकंस लक्षात आलं नाही.

समोर फूटपाथवर पिवळा शर्ट घातलेला एक पुरूष माझ्याशी बोलायला आलं. “Do you speak English?” त्याने विचारलं. मी हो म्हटल्यावर तो म्हणाला (आमचा संवाद आता मराठीत लिहिते) , तू आत्ता जिथून रस्ता ओलांडलास ती रस्ता क्रॉस करण्याची अयोग्य जागा आहे. थोडं पलिकडं पहा, तुला ते पांढरे आडवे पट्टे (Zebra crossing) दिसताहेत ना? ती रस्ता क्रॉस करायची योग्य जागा आहे. बघ, सगळे लोक तिथूनच रस्ता ओलांडत आहेत. या बाजून रस्ता ओलांडणारी तू एकटीच आहेस. मी म्हटलं, माफ करा. मी इथं नवीन आहे. मी नियम माहिती करून घेण्यात आळस केला आणि माझ्याकडून चूक झाली. त्यावर तो हसून म्हणाला, ठीक आहे, इथून पुढं लक्षात ठेव. मीही मान डोलावली. आणि पाहिलं तर तो डवाव पोलिस दलाचा कर्मचारी होता.

पादचारी आणि वाहनचालक या दोघांसाठीही अतिशय सोयीची व्यवस्था आहे. पादचाऱ्यांना शिस्त लावण्याचं काम इथले पोलिस करताना पाहून आदर वाटला. नंतर मी पहात होते तर खरोखर सगळे लोक झेब्रा क्रॉसिंगचा वापर करत होते. सिग्नल नसलेल्या ठिकाणी आपण झेब्रा क्रॉसिंगवर चालत असलो तर वाहनं थांबतात, हॉर्न वगैरे वाजवता शांतपणे सगळ्या लोकांना रस्ता ओलांडू देतात हे चित्र दिवसभर सर्वत्र दिसलं.

भाषा शिकण्यासाठी काल एक मोबाईल ऍप डाऊनलोड करून घेतलं होतं. बातम्यांच्या खालच्या ओळी वाचून, त्यातले शब्द ऍपवर शोधून बातम्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न चालला होता. बातम्यांच्या ओळी थोड्या वेळाने परत समोर येत असल्याने शब्द ते वाक्यं असा प्रवास करता आला. ते करत असताना मात्र एक धक्का बसला. Hindi या शब्दाचा अर्थ इथल्या भाषेत पूर्ण नकारात्मक आहे .



-  not, no, negative vote, negative answer, didn’t, weren’t , doesn’t ….असे या शब्दाचे अर्थ पाहून विचारांत पडले.

जून

मागचे दोन-तीन दिवस ऑफिसातल्या लोकांशी ओळख करून घेणं, इथलं काम समजून घेणं यात जात आहेत. फिलिपिन्सचा इतिहास आणि भूगोल समजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या देशाबद्दलची माझी पाटी कोरी असल्याने जरा वेळ लागणार आहे खरं, पण वेळ आहे माझ्याकडं भरपूर त्यामुळे काळजी नाही.

काबूल आणि यांगून या दोन्ही ठिकाणी एक पाहिलं होतं की फिलिपिन्सच्या लोकांचं नेटवर्क जबरदस्त असतं. सगळे एकमेकांना कायम मदत करत असतात. अडचण आली तर फिलिपिन्सचे नागरिक त्यांच्या दूतावासाकडं सहज जाऊ शकतात. यांगूनला ते सगळे एकत्र बॅडमिंटन खेळायचे, पार्ट्या करायचे हे माझ्या फिलिपिनो सहकाऱ्यांकडून नेहमी ऐकलं होतं. कोण कोणत्या संस्थेत आणि कोणत्या पदावर आहे याचा त्यांना फरक पडत नाही. ते सगळे एकमेकांना धरून असतात.

मी इथं आल्याचं कळल्यावर लगेच सिसिलिया आणि पिटा यांचं मनिलाला त्यांच्या घरी येण्याचं आमंत्रण आलं. सिसिलिया आणि मी काबूलमध्ये एकाच संस्थेचं काम करत होतो. तर पिटा म्यानमामध्ये माझ्याचं संस्थेचं पण मंडले शहरात काम करत होती. कोरा माझ्याबरोबर काम करत होती, ती सध्या बांगलादेशमध्ये आहे, तर ज्युल्स म्यानमातच आणखी काही काळ राहण्याचा विचार करत आहे. त्या सगळ्यांचं अगत्यपूर्ण बोलणं ऐकताना हे फक्त फिलिपिन्स नागरिकांशीच नाही तर इतरांशीही तितकेच मैत्रीपूर्ण वागतात असं लक्षात आलं.

देशातली सध्याची ठळक बातमी म्हणजे ‘Trash Shipped Back to Canada’.


२०१३-१४ मध्ये रिसायकल करण्यासाठी या नावाखाली कॅनडातून काही हजार टन कचरा फिलिपिन्समध्ये पाठवण्यात आला होता. गेली पाच वर्ष या मुद्द्यावरून मनिला-ओटावा संबंध बिघडले होते. अखेर शुक्रवारी (३१ मे) ६९ कंटेनरमधून हा कचरा कॅनडाला परत पाठवण्यात आला. पडद्यासमोर आणि पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडून गेल्यावर ही कृती झाली आहे. विकसित देश आता त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावताना अधिक काळजी घेतील अशी एक आशा या घटनेतून निर्माण झाली आहे.

जालावर वाचत असताना अचानक लक्षात आलं की मिंडनाव विभागात मे २०१७ मध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला होता. त्याची कालमर्यादा वाढवत वाढवत आता डिसेंबर २०१९ पर्यंत करण्यात आली आहे. आपण मार्शल लॉ लागू असलेल्या शहरात आणि विभागात राहतो आहोत हे मला मागच्या आठवड्यात कधी जाणवलंच नव्हतं. शहरातल्या मॉलमध्ये प्रवेश करताना सुरक्षा तपासणी होणं हे आता नेहमीचं दृष्य असल्याने त्याबाबत काही वेगळं वाटलं नव्हतं. लायका (माझी सहकारी) मला आजच सांगत होती, डवावमध्ये तुला जे दिसतं आहे त्यावर जाऊ नको. या शहराबाहेर दहा-वीस किलोमीटर गेलं की जग एकदम बदलून जातं. आमचा देश गरीबी, आंतरिक संघर्ष आणि क्लायमेट चेंज या तीन महाकाय समस्यांशी एकाचवेळी लढतो आहे. आणि उद्याचं चित्र काही फारसं आशादायक नाही...

भारतात मी हेच म्हणते. अफगाण सहकारी हेच सांगत होते. मोझाम्बिक आणि म्यानमा सहकाऱ्यांचंही हेच म्हणणं होतं. देश बदलला, भाषा बदलली, रीतीरिवाज बदलले, सत्ताधारी बदलले तरी समस्या मात्र कमीअधिक त्याच आहेत. ग्लोबल विलेज या संकल्पनेच हे एक स्पष्ट उदाहरण. आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत? आपण कुठं पोचणार आहोत? जिथं कुठं जेव्हा कधी आपण पोचू तेव्हा कितीजण शिल्लक असतील? त्यांच्यापुढं काय वाढून ठेवलं असेल?

क्रमश:
भाग ३