आम्ही सगळेजण हैराण होतो. आणि आमची अडचणही मजेदार होती. आम्हाला नको इतक्या संख्येने, आम्ही बोलावलेलं नसतानाही स्त्रिया येत होत्या.
'स्त्रियांचे आरोग्य आणि सबलीकरण' असे भारदस्त नाव असलेला तो एक प्रकल्प होता. त्या आदिवासी क्षेत्रात आमच्या संस्थेचं आधीपासून काम होतं, त्यामुळे स्त्रियांसोबत काम करायला फार अडचणी नाही आल्या. गावोगावी स्त्रियांचे गट तयार झाले, त्यांच्या नियमित बैठका व्हायला लागल्या, पैसे बचत आणि कर्ज याव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांतही स्त्रियांचा चांगला सहभाग होता. दर वर्षाचं नियोजन असायचं कार्यक्रमांचं, त्यानुसार कार्यक्रम व्यवस्थित व्हायचे. या कार्यक्रमांची आखणी करताना सगळ्या नाही, तरी काही स्त्रियांना सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नांनाही थोडंफार यश येत होतं.
हं, आता गावांत जायला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नव्हती, रस्ते नव्हते, पाऊस खूप पडायचा .. असली कारणं होती अनेक. पण लोकांकडून आम्हाला सहकार्य मिळत होतं. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनाही उत्साह होता भरपूर. आता तसं 'अजिबात अडचणी न येणं' प्रत्यक्षात शक्य नसतं. अडचणी यायच्या पण त्या सोडवता यायच्या - कधी सहज, कधी कष्ट घेऊन. पण दर अडचणीतून शिकत शिकत पुढं जात होतो.
स्त्रियांना तोवर 'मीटिंग' हा शब्द माहिती झाला होता आणि तो त्यांनी सरसकट वापरायला सुरुवात केली होती. 'बैठक' शब्द वापरला तर तो कुणालाच कळायचा नाही. आम्ही गावात प्रवेश केला की पोरंसोरंही 'आज मीटिंग आहे बायांची' असं एकमेकांना ओरडून सांगायचे. पुरुषमाणसंही आम्हाला पाहिलं की 'मीटिंगच्या ताई आल्या बरं का' अशी घोषणा करायचे. गटाची मीटिंग, पंचवीस तीस गटांच्या अध्यक्ष- सचिवांची मीटिंग म्हणजे क्लस्टरची मीटिंग हे एव्हाना सर्वांना माहिती होतं. तालुक्याच्या दुस-या गावांत गटांच 'फेडरेशन'ही झालं होतं. त्यामुळे 'आपलीही फेडरेशनची मीटिंग लावा बघू एकदा' अशी मागणीही अधूनमधून व्हायची.
आमच्या प्रकल्पाच्या रचनेत दर सहा महिन्यांनी प्रत्यक्ष प्रकल्पात सहभागी असणा-या स्त्रियांची मुलाखत घ्यायची (खरं तर ते सर्वेक्षण होतं - पण ते कुणीतरी प्रश्न विचारायचे आणि माहिती लिहून घ्यायची अशा प्रकारे करायचं होतं - म्हणून टीममध्ये त्याला नावं पडलं ते 'मुलाखत'!) आणि प्रकल्पाची परिणामकारकता तपासून पाहायची असं अपेक्षित होतं. या मुलाखतींच्या आधारे आम्ही आमचा सहामाही अहवाल तयार करत असू. आमचा हा प्रकल्प पाच राज्यांत नऊ वेगवेगळ्या ठिकाणी चालू होता. प्रकल्पात सहभागी स्त्रियांची संख्या पाच हजारांच्या आसपास होती. प्रत्येक वेळी एवढ्या सगळ्या स्त्रियांची मुलाखत घेणं शक्य नव्हतं हा एक भाग. आणि दुसरं म्हणजे दर सहा महिन्यांनी तेच तेच प्रश्न ऐकून स्त्रियांनी 'आम्हाला जी अपेक्षित आहेत' ती उत्तरं दिली असती अशी शक्यता जास्त. तसंचं त्यांना कंटाळा येऊनही चालणार नव्हतं आम्हाला.
त्यावर एक उपाय असा की दर वेळी प्रश्न बदलायचे. पण मग एका सहामाहीची तुलना दुस-या सहमाहीशी करता येत नाही. शिवाय प्रकल्पाचे उद्देश स्पष्ट होते - त्यामुळे दरवेळी आम्ही काही प्रश्न बदलायचो पण मुलाखतींच स्वरूप मुख्यत्वे तेच असायचं. प्रश्न अगदी साधे असायचे आणि त्या विषयांवर पुरेसं प्रशिक्षण दिलेलं असायचं त्या स्त्रियांना. म्हणजे - भाजी आधी चिरण्याआधी धुवावी की चिरून धुवावी, पाणी शुद्धीकरणाची पद्धत, जुलाबावरचे घरगुती उपाय, लसीकरणाचे वेळापत्रक - अशा थाटाचे प्रश्न. त्या त्या सहामाहीत जे आम्ही काम करणार आणि प्रशिक्षण देणार त्यावर आधारित प्रश्न. काही बदलायचे, तर काही कायम असणार होते. अर्थात हे प्रश्न विचारताना केवळ माहितीवर भर नव्हता तरप्रकल्पात सहभागी स्त्रियांचा व्यवहार आणि दृष्टिकोन यात काही बदल झाले का यावरही भर होता.
ही मुलाखत गटाच्या बैठकीत घ्यायची नाही, कारण मग ते सामूहिक उत्तर होतं. ही मुलाखत त्या स्त्रीच्या घरात घ्यायची नाही, कारण घरातील इतर माणसांना ती त्या स्त्रीची परीक्षा वाटू शकते. ही मुलाखत संस्थेच्या तालुक्याच्या कार्यालयातही घ्यायची नाही - कारण तिथं स्त्रिया थोड्या दडपून जायच्या, गप्प बसायच्या. प्रकल्पाच्या दहा गावांना केंद्रस्थानी असणारी एक जागा स्त्रियांच्या गटांच सामूहिक ऑफिस म्हणून तयार केली होती एका गावात. तिथं आमची प्रशिक्षणं आणि मीटिंग व्हायच्या नेहमीच्या. प्रकल्पातील गावं तिथून चारी दिशांना विभागलेली होती. तालुक्याच्या ठिकाणी जायचं तर याच गावातून जावं लागायचं सगळ्यांना. कुणालाही निरोप द्यायचा असेल पंचक्रोशीत, तर तो या गावात दिला की पोचत असे.
दर सहा महिन्यानी ज्या मुलाखती घ्यायच्या आहेत स्त्रियांच्या; त्या या गावातल्या ऑफिसात घ्यायच्या असं आम्ही ठरवलं. ठरलेल्या पद्धतीने आम्ही स्त्रियांची नावं निवडली. त्यांना मुलाखतीला बोलावायचं कसं हा प्रश्न पडला. अगदी पहिल्या वेळी स्त्रिया एकट्या गावातून इथवरही येणार नाहीत हे माहिती होतं. शिवाय हे 'मुलाखत' प्रकरण नवीन असल्याने त्या घाबरणार नाहीत, बिचकणार नाहीत हेही आम्हाला पहायचं होतं. म्हणून आम्ही एक युक्ती केली. एक प्रशिक्षणाचा कार्यक्रम ठेवला - त्यात 'प्रत्येक गटातून कमीत कमी तीन तरी स्त्रियांनी यावं' असं आम्ही त्यांना सांगितलं. कार्यकर्त्यांपैकी एक दोघींनी प्रशिक्षण घ्यायचं आणि दोघींनी निवडलेल्या स्त्रियांच्या मुलाखती घ्यायच्या असं ठरलं. कागदावर तरी आमची योजना परिपूर्ण वाटत होती.
पण प्रत्यक्षात ती फसली. एकीकडे प्रशिक्षण चालू असताना मुलाखतीसाठी एकेका स्त्रीला बोलावून न्यायचं ठरलं होतं. अशी स्त्री तिला हाक मारल्यावर तत्परेतेने उठत होती - पण ती दोन मिनिटांत परत येत होती मुख्य सभागृहात. एका मुलाखतीला कमीत कमी दहा मिनिटांचा वेळ लागायला पाहिजे होता. पण कुणीच दहा मिनिटं आत थांबताना मला दिसत नव्हतं. मुख्य कार्यक्रम सोडून मग मी तिकडं गेले तर माझ्या दोन सहकारी कपाळाला हात लावून बसल्या होत्या. जी ती बाई, 'हे काय, कारेक्रम संपू दया तो तिकडला, मग सांगते मी' असं म्हणून बाहेर पळ काढत होती. तीन तासांत आम्हाला एकाही स्त्रीची मुलाखत घेता आली नाही. आणि कार्यक्रम संपल्यावर त्या तीस स्त्रिया - 'हं, विचारा मघा काय विचारत होता ते' म्हणत बसल्या आणि उरलेल्या पस्तीस-चाळीस स्त्रियाही तिथंच ठाण मांडून बसल्या. "आता उशीर होईल तुम्हाला घरी जायला, पुढच्या वेळी बोलू" असं म्हणत आम्ही तो विषय संपवला.
पण सहामाही अहवाल देण्यासाठी आम्हाला या मुलाखती लवकर घेणं आवश्यक होतं. इतर आठ ठिकाणचे वृत्तांत यायलाही लागले होते तोवर आमच्याकडे. आम्ही बरीच चर्चा केली. मग गावा-गावात जाऊन त्या ठराविक तीन स्त्रियांच्या मुलाखती शाळेत अथवा ग्रामपंचायतीत त्यांना बोलवून करायच्या असं ठरलं. पण तिथंही गावातल्या ब-याच स्त्रिया जमा झाल्या. "अगं, तुम्हाला तिघी जणींना फक्त बोलावलं होतं ना? बाकीच्या गेल्या तरी चालतील" अस म्हटल्यावर "नाही, तुम्ही एवढ्या आमच्या गावात आलात, आहे की आम्हाला वेळ" असं म्हणत सगळ्याजणी बैठक मारून बसल्या. त्याही दिवशी आमचं काम झालं नाही.
दोन दिवसांनी आमचे लोक त्या त्या स्त्रियांच्या घरांत गेले- तिथंही तेच झालं पुन्हा एकदा. सभोवतालच्या बायांची गर्दी जमा झाली. "कशाला सगळ्यांना बोलावतेस?" असं मी शेवंताला म्हटलं तर गोड हसून म्हणाली, "तुम्ही काही तरी महत्त्वाचं सांगितलं आन त्या बाया नसल्या तर त्यांच नुस्कान नाही का व्हायचं?" तिचा उदात्त हेतू पाहून मला काय बोलावं ते सुचेना.
शेवंता हुशार होती एकदम. त्यामुळे काहीतरी गडबड आहे हे तिच्या लगेच लक्षात आलं. मीटिंग झाली, बाया आपापल्या घरी गेल्या, आम्ही निघालो. तेव्हा शेवंता आपणहोऊन म्हणाली, "चला, मी येते तुमच्याबरोबर तिथवर." लांब झाडाखाली आमची गाडी होती तिथवर ती आली. "ताई, काय झालंय? बाया गोळा होताहेत चांगल्या तर तुम्हाला का नको आहेत त्या? मागच्या आठ-धा दिवसात तिस-यांदा असं होतंय. काही चुकलं का आमच्या बायांच? " शेवंता अगदी काळजीत पडली होती.
"नाही गं शेवंता, चुकलं वगैरे काही नाही बायांच. पण त्याचं काय आहे ..." असं म्हणत मग मी तिला निवडल्या गेलेल्या बाईने एकटीने प्रश्नांची उत्तरं देणं कसं गरजेचं आहे, दर सहा महिन्यांनी वेगळ्या बाईला ही संधी कशी मिळेल, असे प्रश्न विचारण्याचा काय उद्देश आहे - हे सगळं सोप्या भाषेत समजावून सांगितलं. ती एकदम जोरजोरात हसायला लागली. ते पाहून चिंतेत असलो तरी आम्ही पण हसायला लागलो.
मी म्हटलं, "आता कसं करायचं तूच सांग. आपणच मागे पडलोय सगळ्यात."
"तुम्ही चार दिवसानी या. तोवर कोण बाया हव्यात तुम्हाला त्यांची नावं मला दया. मी करते बरोबर काय करायचं ते", शेवंता म्हणाली.
आम्ही शेवंताला त्या तीस बायांची नावं दिली. त्यापैकी बहुतेक स्त्रियांना शेवंता ओळखत होतीच.
आमची वेळ संपत आली होती. आता काहीही करून चार दिवसांत मुलाखती संपवयाला हव्या होत्या आम्हाला. आता बघू शेवंता काय चमत्कार करतेय ते म्हणून पुढचे तीन दिवस आम्ही तो विषय डोक्यातून काढून टाकला.
चौथ्या दिवशी आम्ही आमच्या त्या गटाच्या ऑफिसात परत आलो. पाच-सहा स्त्रिया होत्या. शेवंताही होती. "ताई, यादीतल्या नंबरानिशी नाहीत बाया हजर" तिचा स्वर काळजीचा होता. पण मुलाखत नंबरानुसार घेतली पाहिजे असं काही आमच्यावर बंधन नव्हतं. ज्या आहेत त्यांच्यापासून आम्ही सुरुवात केला. एकेका बाईची ती मुलाखत पंधरा-वीस मिनिटं चालली. त्या उत्तरांतून आम्ही काय चांगलं केलं आणि आमचे कोणते प्रयत्न फसले, नवे प्रयत्न कसे करायला हवेत याचं स्पष्ट दर्शन होत होतं आम्हाला. मी एकदम खूष झाले.
मधेच रखमाने कोरा चहा आणून दिला. काही काळाने आम्ही नाचणीची भाकरी खाली. मुलाखती चालूच होत्या. शेवंता जागेवरून हलत नव्हती. येणा-या बाईचे नाव लिही, तिला चहा दे, जेवणाची चौकशी कर, मुलाखत संपलेल्या बाईला इतरांशी त्या विषयावर बोलू न देणे - अशी सगळी कामं ती सराईतपणे हाताळत होती. मला तिचं फार कौतुक वाटलं. एक दोनदा तिचं कौतुकही केलं मी जमलेल्या स्त्रियांसमोर आणि आमच्या टीमजवळ.
सगळ्या मुलाखती संपल्या. पुन्हा एकदा शेवंताचं आम्ही तोंड भरून कौतुक केलं.
मी तिला विचारलं, "शेवंता, आम्हाला चार वेळा जे जमलं नाही ते आज तू एका फटक्यात करून दाखवलंसं! चमत्कारचं केलास तू आज. काय सांगितलंस तू या स्त्रियांना आणि इतरही स्त्रियांना?"
"अहो काही नाही ताई, मी प्रत्येक बाईला सांगितलं की आज तिची एकटीची मीटिंग आहे म्हणून!! बाकी कुणी विचारलं तर त्यांचा नंबर पुढच्या वेळी येईल म्हणून सांगितलं", शेवंता सहजपणे म्हणाली. "एकटीचीच मीटिंग आहे म्हणल्यावर मग एकटीच येणार ना बाई?" तिचा पुढचा प्रश्न.
एकटीची मीटिंग!
वा! काय मस्त शब्द शोधला शेवंताने!
एकदम समर्पक.
काय करायचं याची थेट माहिती देणारा शब्द.
एकदम समर्पक.
काय करायचं याची थेट माहिती देणारा शब्द.
आपल्याला कधी हा शब्द सुचला नसता!
एक नवा शब्दप्रयोग.
एक नवी संकल्पना.
एक नवा व्यवहार.
पुढच्या साडेचार वर्षांत आम्हाला त्या सर्वेक्षणात काहीच अडचण आली नाही!!
आणि एकटीची मीटिंग हा शब्द सगळ्यांच्या तोंडी अगदी रुळून गेला सहजपणे!
Getting a new mirror.... thru this experience ..........Those women R in a cage then also applied new, innovative approach ..........आणि आपण शिकलेल्या शहाण्या - ashlesha
ReplyDeleteहे खूप भारी आहे गं! कित्ती सोपी गोष्ट, पण ती शेवंताच करू शकते... तिला ज्या प्रकारे दोन्ही बाजू समजतात त्या प्रकारे दुसरं कोणी नाही नाहीच समजू शकत! ती समजू शकते म्हणूनच बरोब्बर समजावू ही शकते!
ReplyDeleteतसंच, एका कारणाने बोलावून दुसरंच काम साधण्यापेक्षा ती सगळ्यांना विश्वासात घेते! म्हणून तिचं काम सोप्पं झालंय!
शब्द, शब्दामागचा इतिहास - सगळंच सुरेख. भाषा भ्रष्ट होते म्हणून इंग्रजी शब्दांच्या जागी बोजड मराठी प्रतिशब्द आणणार्या पंडितांना अशा जागी पाठवायला हवं.
ReplyDeleteकसला नेमका शब्द आहे हा! सगळ्यांना समजणारा, आणि अगदी नेमका अर्थ पोहोचवणारा. आणि तो शेवंतालाच सुचू शकतो. मस्त!
ReplyDeleteGud one. We can 'easily adopt' 'One on one' and coining a simple adoptable of our own is so Easy! Thanks Shevanta!
ReplyDeleteखूप मस्त, पोस्ट आवडली..
ReplyDeleteआश्लेषा, नवं कुणालाही सुचू शकतं - हे आपण ध्यानात घेतचं नाही कधी!
ReplyDeleteअनू, शेवंताला दोन्ही बाजू माहिती होत्या हे खरचं! प्रश्न माहिती असला की उत्तर शोधता येतं - आम्हाला बहुतेक प्रश्नच नीट कळला नव्हता!
ReplyDeleteराज, आम्हीही बहुतेक तसले 'पंडित' होतो तेव्हा! म्हणून आम्हाला 'प्रयत्न' करावा लागला आणि तरीही यश मिळालं नाही.
ReplyDeleteगौरी, नेमका अर्थ पोचवणारा शब्द .. आम्ही उगीच कडेकडेने हिंडत होतो बराच काळ.
ReplyDeleteअनामिक, :-)
ReplyDeleteआभार अनिकेतजी.
ReplyDeleteपोस्ट आवडली!
ReplyDeleteस्वागत आणि आभार अनघाजी.
ReplyDelete(आता दोन अनघांना वेगळ कसं ओळखायचं हा एक नवा प्रश्न :-))
एकटीची मिटिंग - भन्नाट शब्द आहे. कॉलेजात क्लास घेताना आमच्या लक्षांत आले. जास्तीत जास्त बारा विद्यार्थी सांभाळता येतात. आदिवासी किंवा किसानांचा गट नेहमी लहान असावा - पंधरा ते वीस माणसे. वाटोळे बसायचे. म्हणजे सर्वाना सर्वांचे चेहरे दिसतात. आणि गप्पा मारायच्या. आदिवासींच्या पण मिटींगा होतात. त्यात लहान - थोर सर्व असतात. सर्वजण सहभागी होतात. ही पद्दत मी आपलीशी केली. हे सर्व निरीक्षणाने / अनुभवाने शिकायचे.
ReplyDeleteरेमीजी, हो, साधारण पंधरा - वीस व्यक्तींचा गट नेहमी परिणामकारक ठरतो असा माझाही अनुभव आहे.
ReplyDeleteतुमचे लेख वेगळे असतात, छान असतात, अनुभवावर आधारीत असतात.
ReplyDeleteमला इन जनरलच अनुभव, सत्यकथा वाचायला आवडतात.
त्यामुळे तुमचं लेखन वाचायला छान वाटतं.
----------------------------------------------------------------------
-----------------------------------
(कमेंट अॅप्रूव्ह करताना कृपया ही ओळ व खालच्या ओळी काढून टाका.)
माझ्या ब्लॉगवर मी 'अजून काही ब्लॉग्ज…' या शिर्षकाखाली तुमच्या ब्लॉगची लिंक दिली आहे. आणि ती देताना तुमची ती इंफाळवाली इमेज तुमच्या लिंकला लावली आहे.त्याबद्दल तुमची काही हरकत नाही ना, ते एकदा पाहून घ्या.
माझा ब्लॉगः
http://tivalyabavalya.wordpress.com/
या माझ्या ब्लॉगवर 'अजून काही ब्लॉग्ज…' या शिर्षकाखाली तुमच्या ब्लॉगची इमेज व लिंक
मी टाकली आहे.
धन्यवाद टिवटिव. मी इथले प्रतिसाद अॅप्रूव्ह करत नसल्याने तुमच्या कमेंटमधला भाग कसा काढून टाकायचा हे कळत नाही. प्रयत्न करून पाहते.
ReplyDeleteइम्फाळच्या फोटोचा दुवा तुमच्या ब्लॉगवर देण्यास काहीच हरकत नाही. पण ब्लॉगवरचे या ठिकाणचे फोटो मी बदलत राहते. त्याचा या तुमच्या दुव्यावर काय परिणाम होईल ते मला माहिती नाही.
हा हा...मजाच वाटली मला वाचून..."एकटीची मिटिंग" :)
ReplyDeleteअपर्णा, मजेदार अनुभव होता तो माझ्यासाठीही :-)
ReplyDeleteशिकलेली माणसं म्हणजे सोप्या गोष्टी अवघड पद्धतीने करणारे लोक असं कुठेतरी वाचल्याचं आठवतयं......:-)
ReplyDeleteफारच छान लेख.....!
अभिषेक, अगदी मार्मिक वाक्याची आठवण करून दिलीस!
ReplyDelete'शिकलेली माणसं म्हणजे सोप्या गोष्टी अवघड पद्धतीने करणारे लोक' :) :)
ReplyDeleteरिसर्च किंवा ब्रीफिंग ज्यावेळी मी अटेंड करत असते त्यावेळी नेहेमी मला हे असंच वाटत असतं ! सोप्या सोप्या गोष्टी इतक्या कुटील करून ठेवतात की आपलं डोकं एकदम पिसून जावं ! :) :)
एकटीची मिटिंग !!! :D माझी स्वत:शी सतत चालू असते ही !!! :)
खूप छान. रिफ्रेशिंग ! :) :)
अनघा, स्वसंवाद या अर्थी तो शब्द नाहीये .. आणि त्या अर्थी ती अगदी 'एकटीची मीटिंग'ही नाहीये .. पण आमची जी गरज होती, त्यासाठी तो अगदी परिपूर्ण शब्द होता हे मात्र खरं!
ReplyDeleteफारच छान! नेमका अर्थ समोरच्यांना समजणारा शब्द शोधणे सोपे नाही.
ReplyDeleteज्यांच्याशी बोलायचे आहे, त्याच समाजातल्या व्यक्तींना ते अधिक चांगले जमू शकते म्हणजे आपल्याच गावातील लोकांना त्यांना कळेलशा भाषेत सांगणे.
:) ते कळलं मला!
ReplyDeleteपण मी म्हटलं अगदी एकटीची मिटिंग ह्या अर्थाने माझी पण चालूच असते ! . :) असं एकदम वाटलं ना म्हणून म्हटलं. :)
प्रीति,हो भाषा किती सापेक्ष असते ते अशा वेळी (पुन्हा एकदा) कळतं!
ReplyDeleteअनघा, हो, एका शब्दाचे असे संदर्भांनुसार अर्थ बदलतात. तू म्हणतेस त्याच अर्थाने आपण 'एकटीची मीटिंग' हा शब्दप्रयोग वापरतो नेहमी. कसे शब्दांचे अर्थ बदलतात ना परिस्थितीनुसार आणि वापरणारी व्यक्ती कोण आहे त्यानुसार - ती पण एक गंमतच असते!
ReplyDeleteघास सरळ खाणे सहज सोपे असून उगाचच अवघडवून खायचा... मात्र काहीवेळा हा असा अचूक अर्थ सांगणारा आणि समजणारा शब्द असा सहज सुचून जातो... शेवंतासारखीला...
ReplyDeleteपर्फेक्ट !
छानच शब्द शोधलाय गं ... ’एकटीची ्मीटींग ’ :)
ReplyDeleteमस्त वाटलं पोस्ट वाचताना....
भानस, काही वेळा योग्य शब्द सुचतच नाही - ही आपली मर्यादा.
ReplyDeleteसहजच, शेवंताला माहितीही नाही की तिने केवढा नवा शब्द शोधलाय - जो इतरांना अत्यंत कौतुकास्पद वाटतोय!
ReplyDeleteAativas, tuzya kamabaddal vachto tevha nehami mla mazya bahinichi athvan hote. Ti nurse hoti ani tila hi asach gavogav kutumb-niyojanachya prasarasathi firave lagayche. Ata ti retire zaley.
ReplyDeleteMla khup kautuk vatte tuzya kamache... ani hi post vachlyavar shevanta sarkhya striyanche hi. Ground-level la kam karne kharech kathin ahe.
श्रीराज, तुझ्या बहिणीला लिहायला सांग त्यांच्या आठवणी. किंवा त्यांनी लिहिल्या असतील तर मला लिंक पाठव. मला आवडतील वाचायला त्या.
ReplyDeleteशेवंताचं कौतुक आहेच. गावातल्या लोकांना अनेक गोष्टी आपल्यापेक्षा जास्त चांगल्या कळतात - ते आपल्याला कळायला वेळ लागतो इतकंच!!
Kharech ki! Tila sangayla have tiche anubhav lihayla. Tila bheten tevha nakki tuza nirop dein :-)
Delete