ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Sunday, February 3, 2013

१४९. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग २ (आ) पाऊलखुणा

भाग: , २ (अ)

देशासाठी

विवेकानंदांनी तत्त्वज्ञान कधीही केवळ चर्चेच्या पातळीवर जास्त काळ ठेवले नाही. चर्चेला त्यांनी नेहमीच क्रियाशीलतेची जोड दिली. ''आता अन्य देवदेवतांना मनात स्थानच नको. आपले एकमेव दैवत म्हणजे आपले राष्ट्र. त्याचीच आराधना करा. ते जागृत आहे. सर्वत्र त्याचेच चरण. त्याचेच हात. त्याचेच श्रवण. तो सर्वव्यापी आहे. बाकी सर्व दैवते झोपली आहेत. त्या विराटाचे दर्शन सर्वत्र होत असताना अन्य देवतांची ही व्यर्थ आराधना कशाला? या एकमेव उपास्य दैवताची उपासना आपल्या हातून घडू दे. त्यातच इतर दैवतांची उपासना आपोआप घडेल, असे आवाहन काळाच्या अक्षुण्ण प्रवाहात विवेकानंद नावाच्या या संन्याशाने केले आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. 'सर्वं खल्विदं ब्रह्म’ या औपनिषदिक वाक्याचा हा किती तेजोमयी अविष्कार आहे!

व्यक्तीच्या विकासाला स्वामीजींनी जितके महत्त्व दिले, तितकेच राष्ट्राच्या विकासाला दिले. राष्ट्राच्या विकासाचा धागा विकसित व्यक्तिमत्वे असतात हे भान त्यांना होते. म्हणूनच व्यक्तिमत्व विकासाची दिशा राष्ट्रहितविरोधी असू नये अशी त्यांची भूमिका होती. 'प्रत्येक राष्ट्राला काही नियतीनियोजित कार्य असते असा त्यांचा दृढ विश्वास होता. अध्यात्म हाच भारताचा स्वभाव आहे आणि तेच त्याचे उर्वरित जगाला देणे आहे याची त्यांना जाणीव होती. म्हणूनच 'अध्यात्मावर तुमचा विश्वास असो वा नसो, तुम्हाला राष्ट्रजीवनासाठी अध्यात्माला धरुन राहिलेच पाहिजे’, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. अवास्तव व्यकितस्वातंत्र्याची मागणी करणारांना हा विचार म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा अथवा आक्रमण वाटेलही कदाचित. पण शेवटी व्यक्तीपेक्षा राष्ट्र आणि व्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा राष्ट्राचे स्वातंत्र्य (भौतिक आणि वैचारिकही!) अनेकदा जास्त मोलाचे असते हा धडा इतिहासाने आपल्याला वारंवार शिकविला आहे.

संघटना

सुधारणेची, परिवर्तनाची कोणतीच कामे एकटयाच्या हातून होत नाहीत. सुधारणा केवळ कायदा करुनही होत नाही. त्यासाठी लोकांनी एकत्रित येणे फार गरजेचे असते. स्वामी विवेकानंदांना अमेरिकेत सर्वात प्रभावित करुन गेलेली गोष्ट म्हणजे 'संघटना! आळसाइतकाच मत्सर हा देखील भारतीय समाजाचा सर्वात मोठा शत्रू आहे असे त्यांना नेहमीच वाटे. पण या सर्व दुर्गुणांवर मात करुन संघटित स्वरुपात आपण लोकशिक्षणाचे कार्य केले पाहिजे असे विवेकानंद आग्रहाने प्रतिपादन करीत असत. 'रामकृष्ण मठ आणि मिशनची त्यांनी केलेली स्थापना म्हणजे समाजपरिवर्तनाच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल होते. संन्याशांची संघटना बांधणे आणि तिच्या द्वारे भारताच्या आध्यात्मिक आणि भौतिक प्रगतीचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करणे ही गोष्ट अलौकिक होती यात काहीच शंका नाही!

हे काम करत असताना विवेकानंदांवर काही कमी टीका झाली नाही. त्यांच्या हेतूंबद्दल संशय व्यक्त केले गेले. मनस्तापाचे प्रसंग त्यांच्याही आयुष्यात आले. पण विनम्र वृत्तीने आणि नि:स्वार्थ बुद्धीने विवेकानंदांनी आपले काम केले. 'मदांध आणि एकांतिक होऊ नका हा त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेला संदेश त्यांच्या उदारमतवादाची साक्ष देतो!

मातृदेवो भव

स्त्रियांबद्दल अत्यंत उदार असा मानवी दृष्टिकोन हे मला विवेकानंदांचे आणखी एक वैशिष्टय वाटते. सामान्यत: संन्यासी म्हटला की त्याने स्त्रियांपासून चार हात दूर राहावे असाच आपल्याकडे संकेत आहे. पण 'सर्वांमध्ये एकच आत्मा वि़द्यमान आहे असे सांगणा-या स्वामींजींच्या व्यवहाराने त्यांच्या तत्त्वज्ञानाला कधीही छेद दिला नाही. स्वत: सांगितलेल्या तत्त्वज्ञानाच्या विरोधात त्यांचा व्यवहार कधीच गेला नाही. भगिनी निवेदितांनी एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे 'स्त्रियांचे भय वाटावे इतकी स्वामीजींची वैराग्यवृत्ती उथळ नव्हती. स्वामीजींच्या उदार मनोवृत्तीचे मोहक दर्शन यातून घडते.

स्वामीजी म्हणतात, 'पाश्चात्यांच्या दृष्टीने सारी नारी शक्ती पत्नीत्वात केंद्रिभूत झाली आहे. आणि भारतातील सामान्य माणसाच्या दृष्टीने सारी नारी शक्ती घनीभूत झालेली असते मातृत्वात! पण त्याचबरोबर बालविवाह, विधवांच्या पुनर्विवाहास असंमती यासारख्या काही मुद्यांवर स्वामीजींची मते काही वेळा अत्यंत मागासलेली, प्रतिगामी वाटतात हे नाकारता येत नाही. 'स्त्रिया जर पवित्र असतील तर माणूस (पुरुष) अपवित्र, पतित होईलच कोणामुळे? हा विवेकानंदांचा प्रश्न मला अत्यंत धक्कादायक वाटलेला आहे. विवेकानंद असे बोलले नसते तर अधिक बरे झाले असते अशी हळहळही मला अनेकदा वाटली आहे. पण व्याख्यानाचा मागचा-पुढचा संदर्भ, समोरच्या श्रोत्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी काय होती अशा अनेक मुद्यांचाही आपल्याला विचार करावा लागतो.

विवेकानंद अंध संस्कृतीरक्षक नव्हते असे मात्र नक्कीच म्हणता येईल. सीतेचा आदर्श स्त्रियांपुढे ठेवणारे विवेकानंद धर्ममार्तंडांना रोखठोक विचारतात की, 'स्त्री पुरुषांच्या ठिकाणी बाहय भेद असले तरी स्वरुपत: त्यांच्यात काही फरक नसतो. यामुळे पुरुष जर ब्रह्मज्ञ होऊ शकत असेल तर स्त्री का नाही होऊ शकणार? ते पुढे म्हणतात की, 'बालविवाह मला अगदी घृणास्पद वाटतो. ..... ही प्रथा गाडून टाकण्याचा शक्य तितका प्रयत्न मला केलाच पाहिजे..............बालिकेसाठी वर पाहून देणाराचा मी खूनही करु शकेन......

स्त्री दाक्षिण्यासंबंधीचे त्यांचे काही विचार आधुनिक काळातील आपल्या विचारांच्याही दोन पाले पुढे आहेत असे जाणवते. स्त्रियांकडे भोगवस्तू म्हणून पाहिले जाऊ नये तर माणूस म्हणून पाहिले जावे असे त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केले. त्यांच्या शिष्य परिवारात अनेक स्त्रिया होत्या. स्त्रियांना शिक्षण दया (आणि शिक्षण म्हणजे आंतरिक क्षमतांचा विकास) म्हणजे त्यांचे प्रश्न त्या स्वत:च सोडवतील अशी भूमिका विवेकानंदांनी काळाच्या फार पुढे जाऊन सहजतेने मांडलेली आढळते.

मानवतावाद

विविध विषयांवरचे स्वामीजींचे विचार हा एक अनमोल खजिना आहे. त्यांच्या सर्वच विचारांचा विस्ताराने उहापोह येथे करता येणे शक्य नाही. पण शंभर वर्षांपूर्वी मांडले गेलेले विचार आजही तितकेंच महत्त्वाचे आहेत हे विशेष  आहे.

वास्तविक गेल्या शतकात जगाची फार मोठी प्रगती झाली आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या मदतीने दळणवळणामध्ये क्रांती घडून आली आहे. त्यामुळे कोणत्याही नव्या विचारांची लाट वेगाने जग पादाक्रांत करत आहे. जगावरती आपला प्रभाव टाकणा-या समाजवाद, मार्क्सवादासारख्या विविध विचारप्रणाली येथे निर्माण तर झाल्या पण त्या फार काळ, सर्वत्र तग धरु शकल्या नाहीत. त्या येथे रुजल्या नाहीत. चंद्रावर आणि मंगळावर स्वारी करणारा माणूस स्वत:च्या विचारांना काबूत ठेवण्या, त्यांना योग्य दिशा देण्यात अयशस्वी ठरतो आहे ही आधुनिक युगाची मोठी शोकांतिका आहे.

'सत्य फक्त आम्हालाच समजले आहे...... या पृथ्वीतलावर राहण्याचा अधिकार फक्त आमचाच आहे..असा सत्याचा बाजार मांडणारांच्या गदारोळात 'एकं सत विप्रा: बहुधा वदन्ति’ (सत्य एकच आहे, विद्वान त्याला वेगवेगळया नावांनी ओळखतात) असा उदघोष पुन्हा करणारे विवेकानंद खचितच वेगळे जाणवतात. शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेतील इतर विचारवंतांची भाषणे आणि स्वामीजींचे भाषण यात फरक असेल तर तो केवळ स्वामीजींच्या उदारमतवादी सहृदयतेचा आणि सर्वधर्मसमभावावरील त्यांच्या दृढ निष्ठेचा! पण त्यामुळे परिणामांमध्ये केवढा फरक पडतो!

स्वामीजींचा राष्ट्रवाद संकुचित कधीच नव्हता. श्री. इ. टी. स्टर्डी यांना ९ गस्ट १८९५ रोजी लिहिलेल्या पत्रात विवेकानंद म्हणतात, 'भारताविषयी मला प्रेम आहे यात शंका नाही. पण दररोज माझी दृष्टी अधिकाधिक स्वच्छ होत चालली आहे. आपल्याला भारत, इंग्लंड, अमेरिका यांचे काय? अज्ञानी लोक ज्याला मानव समजतात, त्या ईश्वराचे आपण सेवक आहोत. जो वृक्षाच्या मुळाला पाणी घालतो तो सबंध वृक्षालाच पाणी घालत नाही काय? स्वामीजींच्या मते राष्ट्रवाद ही मानवतावादाच्या प्रवासातील पहिली पायरी होय.

विवेकानंद केवळ धार्मिक अथवा आध्यात्मिक क्षेत्रात मार्गदर्शन करणारे पारंपरिक गुरु नव्हते. वेदान्ताचा वसा घेऊन समाजपरिवर्तनाची स्वप्ने पाहणारा अन त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी अखंड धडपडणारा तो एक मनस्वी आणि निष्ठावान कार्यकर्ता होता! त्यांचे विचार चिरंतन काळापर्यंत महत्त्वाचे राहतील. त्यांचे युवाशक्तीला आणि राष्ट्र पुनरुत्थानाला शाश्वत आवाहन आहे - 'मृगेंद्राचे धैर्य, ईश्वरावरील श्रद्धेतून लाभलेले सामर्थ्य यांनी संपन्न असे लक्षावधी स्त्री पुरुष येथील पददलितांविषयीच्या अपार करुणेने प्रेरित होऊन जेंव्हा देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत संचार करतील आणि मुक्तीचा, सेवेचा, सामाजिक जागृतीचा आणि एकतेचा संदेश सर्वत्र पोहोचवतील तेंव्हा हिंदुस्थानच्या पुनरुत्थनाची पहाट उजाडेल!

क्रमश:

5 comments:

 1. Eka thor vyaktichya vicharancha tu tatastha magova ghete ahes hi bab kharach kautuk karnyajogi ahe!

  ReplyDelete
  Replies
  1. श्रीराज, आभारी आहे तुझ्या प्रतिसादाबद्दल.

   Delete
 2. स्वामीजी एकोणिसाव्या शतकात बोलले. त्यांची राष्ट्राची कल्पना काय होती हे लक्षात घ्यायला हवे.
  राष्ट्र म्हणजे तळहातावर मावणारा नकाशा नव्हे; राष्ट्र म्हणजे तिरंगा झेंडा नव्हे; असं मला वाटतं. राष्ट्र म्हणजे जळ-जमीन-जीव यात सर्व काही आले : भारताची विलक्षण नैसर्गिक जैवविविधता, आणि तेणेकरून निर्माण झालेली सांस्कृतिक विविधता -- अन्न, निवारा, वस्त्र, भाषा, कला... हे सर्व कोणत्याही नकाशावर किंवा पुस्तकात मावणारे नाही.
  चारशे वर्षांपूर्वी आमचे नामदेव, ज्ञानदेव इ. संत देशभर फिरून येत असत. आता आम्ही थंड हवेच्या जागी फिरायला जातो. आणि बहुतत्वी समाजाचे ध्रुवीकरण करायच्या मागे लागतो.
  मुंबईत आलेले विस्थापित आम्हाला बेकायदेशीर वाटतात. रस्त्यावरच्या भिकाऱ्यात आम्हाला राष्ट्र दिसत नाही. त्याला भिकेला कोणी लावले ते दिसत नाही.

  मला वाटते स्वामीजी त्यांचा "वर्तमान" पाहत होते. मला स्वत:ला काहीही भविष्य नाही. आणि माझा कालचा दिवस भूतकाळात जमा झालेला आहे. मला तरी वर्तमानात राहणे अपरिहार्य आहे.
  शेवटी कोणाचे शब्दप्रामाण्य किती मानावे व कसे समजावे हे ज्याचे त्याने ठरवावे.

  ReplyDelete
  Replies
  1. रेमीजी, "देश म्हणजे देशातील माणसं" - असा स्वामीजींच्या विचारांचा अर्थ आहे माझ्या मते. त्यांचे शब्द "प्रमाण" मानायचे की नाही हा अर्थात आपापला निर्णय असतो - स्वामीजींची तशी अपेक्षा नाही - असाही मला लागलेला अर्थ आहे.

   Delete
  2. मी विवेकानंद वाचलेले नाहीत. आता तर शक्यच नाही. स्वामीजी जे काय बोलले असतील ते स्पष्ट असेल किंवा असावे, अशी माझी अपेक्षा आहे.

   Delete