ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, September 2, 2013

१७४. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १५: आत्मविचार (१)


आपल्याला भोवताली दिसून येणारे विश्व म्हणजे दुसरे तिसरे काही नसून देश-काल-कारण यातून प्रतीत  होणारे ब्रह्म आहे ही विवेकानंदांची भूमिका आपण यापूर्वीच पाहिली आहे. 'जीवो ब्रह्रौव नापर: या शंकराचार्यांच्या भूमिकेशी हा विचार अगदी मिळताजुळता आहे यात काहीच शंका नाही. पण हा विचार 'व्यवहार्य आहे का? - असा प्रश्न आपल्या मनात स्वाभाविकपणेच येतो.

माणसाच्या सामाजिक प्रगतीचा विकास जर आपण पाहिला तर एक गोष्ट लगेच लक्षात येते ती ही की, सारी प्रगती सहजासहजी झालेली नाही. हा सारा संघर्षाचा, युद्धांचा, लढयांचा इतिहास आहे. सर्वत्र आणि सर्व काही ब्रह्मच आहे अशी जाणीव जर सर्व माणसांना एकावेळी झाली तर मानवी जगाची भौतिक प्रगती पूर्णत: थंडावण्याचीच शक्यता जास्त आहे - कारण माणूस ना बैलांकडून शेतीची कामे करुन घेऊ शकेल ना यंत्रांकडून. प्राणी आणि वनस्पती यांच्या उपभोगावर (आणि शोषणावर) जे जे काही आधारलेले आहे ते ते सारे थांबले की एका अर्थी मानवी जीवन समूळ नष्ट होईल.

शिवाय आपला दैनंदिन अनुभव आपल्याला सांगतो की, माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे – अर्थात आपण माणूस आहोत त्यामुळे आपण माणसांना ‘वेगळे’ मानणार! हत्ती आणि वाघ सिंहासारखे अजस्र आणि काही प्रसंगी क्रूर होणारे प्राणी माणूस लीलया हाताळू शकतो, ते माणसामध्ये त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळे आहे म्हणूनच ना! मग माणूस आणि एखादे झाड यांची तुलना कशी होऊ शकेल? माणूस झाडापेक्षा वेगळा आहे हे तर एखादं लहान मूल देखील सहज सांगेल!

हे जग म्हणजे ब्रह्मच असले तरी ब्रह्म सर्वांमध्ये समान प्रमाणात अभिव्यक्त झाले आहे असे मात्र विवेकानंद मानत नाहीत. तसे असते तर मग सृष्टिप्रक्रियेचा काही प्रश्नच उदभवला नसता! मनुष्याच्या दुर्गुणांविषयी बोलताना स्वामीजी एका प्रसंगी मानवाची गायीशी आणि भिंतीशी तुलना करतात. गाय आणि भिंत कधी खोटे बोलत नाहीत हे खरे...... पण ते कायम गाय आणि भिंतच राहतात. मनुष्यात कितीही दुर्गुण असले तरी तो (यात ‘ती’ही आहे)  मात्र स्वत:च्या आंतरिक प्रकृतीवर विजय मिळवून स्वस्वरुप -  म्हणजे सचिचदानंद स्वरुप - जाणू शकतो.

विवेकचुडामणि ग्रंथात उल्लेख केल्याप्रमाणे 'दुर्लभं त्रयमेवैतत् देवानुग्रहहेतुकम्। मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरुषसंश्रय:।। हा शंकराचार्यांचा श्लोक विवेकानंदांना फार आवडत असे. मनुष्यजन्म दुर्लभ आहे आणि आणि केवळ मनुष्यजन्मातच मोक्षप्राप्तीची शक्यता आहे या दोन बाबींविषयी स्वामीजींच्या मनात कधीही संदेह नव्हता. 'सारेच नारायण आहेत हे खरे, तरी पण वाघनारायणापासून दूरच राहायला हवे. सगळेच पाणी नारायण हे खरे, परंतु गढूळ पाणी पीत नसतात या रामकृष्णांच्या उदगारांची स्वामीजी आपल्याला आठवण करुन देतात. तत्वत: ऐक्य पण व्यवहारात भेद – असे काहीसे स्वरूप आहे या विचारांचे. यातून समाजाला दांभिक व्हायला वाव मिळतो असेही मला वाटत आले आहे.

विवेकानंद म्हणतात की, क्रमविकास हाच होय - यात क्रमश: शरीराकडे कमी कमी लक्ष दिले जाते. या जगात मनुष्य हाच सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. मनुष्य हा शब्द संस्कृतमधील मनस् या शब्दापासून बनला आहे. मनस् म्हणजे विचार. मनुष्य मननशील म्हणजे विचार करणारी प्राणी होय, केवळ इंद्रियांच्या द्वारे विषय ग्रहण करणारी प्राणी नव्हे.

पण आहोत का आपण खरोखर विचार करणारे आणि अन्य प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ दर्जाचे? एका संस्कृत सुभाषितामध्ये मनुष्य आणि इतर प्राणी यांच्या स्थितीवर एक सुंदर भाष्य केले आहे. ते असे -
आहारनिद्राभयमैथुनंच ।सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम्
बुद्धिर्हि तेषामधिको विशेष: ।बुद्धयाविहीन पशुभि: समान:।।
आज आपण सगळेजण कसे जगत आहोत? तर अगदी पशुवत् - कधी कधी तर पशूंनाही आपली लाज वाटेल असे! विवेकानंद म्हणतात, उद्वेगाने म्हणतात की, आपली अवस्था घाण्याच्या बैलासारखी आहे. आपण जन्मत:च प्रकृतीचे गुलाम आहोत ..... हे सारे मृगजळ आहे. ज्याच्या आपण शोधात आहोत ते आपल्याला न मिळता असंख्य जन्मांच्या फे-यात आपण फिरत आहोत.... ....'सर्वसाधारण लोक जणू यंत्र बनले आहेत, इतके की ते विचार सुद्धा करत नाहीत. कुत्रयायामांजरासारखे किंवा इतर पशुंसारखे त्यांचे जीवन चाललेले असते .... प्रकृतीचा चाबूक त्यांना हाकत असतो ....

जसे आहे तसेच राहायचे ही पशुंचा स्वभाव असतो. प्रकृतीशी ते फारसे लढत नाहीत. केवळ जगण्यासाठीचा म्हणून जो काही लढा आहे तो प्रकृतीत सर्वांना अनिवार्य आहेच. बळी तो कान पिळी, जीवो जीवस्य जीवनम्”;  “survival of the fittest अशा अनेक शब्दांत त्याचे वर्णन केले जाते. पण यापलिकडे जाऊन, जगणे सुसहय व्हावे किंवा जगण्याचा दर्जा कायम सुधारावा म्हणून पशुपक्षी जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसत नाहीत. (अपवाद म्हणता येईल तो जॉर्ज ऑर्वेल यांच्या 'अ‍ॅनिमल फार्म' या कादंबरीतील प्राण्यांचा - पण अर्थात तेथे प्राणी मानवी प्रवृत्तीचे प्रतीक म्हणूनच येतात!) त्यांच्या जीवनात जे काही बदल होतात ते केवळ परिस्थितीच्या रेटयाने. जाणीवपूर्वक काही नाही! त्याउलट माणसाचे पाहा! इंद्रियसंयमाचे, मनाचे सामर्थ्य वाढविण्याचे, शरीर परिपूर्ण करण्याचे प्रयोग मानवप्राणी गेली हजारो वर्षे करीत आला आहे असे आपल्याला दिसून येते.

अर्थात सगळीच माणसे असा प्रयोग करीत नाहीत आणि समजा प्रयोग केला तरी त्यात यशस्वी होत नाहीत. असे प्रयोग करणा-यांची आणि त्यात पूर्ण यश मिळविणारांची संख्या कमी आहे हे स्वामीजींना माहिती आहे. ते म्हणतात की, ज्यांना आपण मानव म्हणतो, ते सगळे खरे पाहता, अजून मानव नाहीत. प्रत्येकाला आपापल्या बुद्धीने जगाचे स्वरुप ठरवावे लागते. जगासंबंधीचे उच्च ज्ञान ही फार कठीण गोष्ट आहे. अनेकांना सूक्ष्म तत्त्वापेक्षा स्थूल भौतिक वस्तूच जास्त ख-या वाटत असतात. पण आपल्याकडे पशुपेक्षा जास्त काहीतरी आहे. कुत्रा जितका चवीने हाड चघळतो तितक्या चवीने आपण अन्न खाऊ शकत नाही!

याचा अर्थ असाही नाही की, आपण या चराचर सृष्टीहून श्रेष्ठ दर्जाचे आहोत किंवा तिच्याहून भिन्न आहोत. आजच्या माणसाचे बरेचसे दु:ख या आसक्तीतून, या अहंकारातून येते. माणसाला असे वाटते की, या सा-या  विश्वाच्या केंद्रस्थानी जणू काही तोच आहे आणि ईश्वराने या जगाची उत्पत्ती जणू काही आपल्याच भोगासाठी केली आहे अशा थाटात तो वावरत असतो. त्यातूनच एक तर 'परमेश्वराला रिटायर करा अशी टोकाची मागणी येते किंवा दैनंदिन जगात थोडी जरी प्रतिकूल परिस्थिती  निर्माण झाली की 'या जगात ईश्वर आहे का? अशी शंका माणसाच्या मनात येते. भूकंप किंवा अपघात अशा प्रसंगी हृदयद्रावक दृष्ये पाहून आपण ईश्वराच्या असितत्वाविषयी प्रश्न विचारतो. पण माणूस रोज अन्नासाठी म्हणा, वैज्ञानिक प्रयोगासाठी म्हणा अथवा स्वत:च्या आरोग्यासाठी म्हणा.... कोटयवधी प्राण्यांची हत्या करत असतो. तेंव्हा ईश्वराच्या असितत्वाचा प्रश्न त्याला का नाही सुचत? कारण त्याची अशी प्रामाणिक धारणा असते की हे जग त्याच्या उपभोगासाठीच निर्माण झाले आहे अथवा करण्यात आले आहे.

स्वामीजी म्हणतात, विश्व हे त्या विश्वपुरुषाचेच दृश्य स्वरुप आहे. आपल्या इंद्रियांद्वारा गोचर होणारे त्याचे रुप म्हणजेच हे विश्व ....  आणि आपण या विश्वापासून भिन्न नाही. तसे असते तर मग या विश्वात आपण काही पाहू शकलो नसतो की काही ऐकू शकलो नसतो आणि कशाचाही अनुभव घेऊ शकलो नसतो. ज्या अर्थी आपण हे करु शकतो, त्या अर्थी आपण या विश्वाचाच एक भाग आहोत हे निश्चित आहे. आपली शरीरे म्हणजे जड द्रव्याच्या महासागरातील केवळ भोवरे आहेत. हा पर्वत, ही नदी, हा वृक्ष, हा पक्षी ..... आपली नामे आणि रुपे जरी वेगवेगळी असली तरी वस्तुत: आपण सारे एक आहोत.

माणसाचे उदाहरण घेतले तरी हा मुददा स्पष्ट होतो.ऑस्ट्रेलियन आणि भारतीय माणूस यांच्यात आपल्याला कितीतरी भेद आढळतात. दोन्हीकडच्या आदिवासींना तर कदाचित एकमेकांशी संवाद सुद्धा साधता येणार नाही. पण त्यांच्या दैनंदिन जीवनातील त्यांचे भावविश्व, त्यांचे विचार, त्यांच्या धार्मिक संकल्पना, थोडक्यात सांगायचे तर त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन जणू एकमेकांचे प्रतिबिंबच असतो. याचे कारण काय? तर माणूस 'एक आहे. तरीही त्यांच्यातील वरवरच्या भेदांना बळी पडून आपण एकमेकांशी लढतोच ना!

तसेच विश्वातील आपण सारेजण वस्तुत: 'एक आहोत. मायेच्या, अविद्येच्या आवरणामुळेच आपल्याला भेदांचा, विविधतेचा केवळ भास होतो इतकेच! विवेकानंद म्हणतात, सर्व दृष्टींनी आपण एक आहोत...ही गोष्ट कधीही कळत नाही आपल्याला. सर्व विश्व हे देश-काल-निमित्त यांचे बनलेले आहे आणि ईश्वर या विश्वरुपाने प्रकट झालेला आहे....

मनुष्यजन्माचे हे महत्त्व लक्षात घेऊन आपले भवितव्य अधिक उज्ज्वल करण्याच्या दिशेनेच मानवाने आपली वाटचाल केली पाहिजे. त्याने लक्षात ठेवले पाहिजे की, स्वर्ग हे त्याचे ध्येय नव्हेच! त्याचे ध्येय आहे मुक्ती .... मोक्ष! मोक्ष ही काही प्राप्त करुन घेण्याची गोष्ट नव्हे असे शंकराचार्यांप्रमाणेच विवेकानंदांचेही मत आहे. या मोक्षाचा, मोक्षमार्गांचा सविस्तर विचार आपण पुढे करणार आहोतच. तत्पूर्वी माणसाच्या अस्तित्वासंबंधी विवेकानंदांनी मांडलेल्या विचारांचा आपण परामर्ष घेऊ.

अस्तित्व

मानवी अस्तित्वासंबंधीचे विवेकानंदांचे विचार आपण जेंव्हा वाचतो तेंव्हा त्यातील प्रबळ आशावादाने मन थरारुन जाते. आज आपल्याभोवती इतके नकारात्मक आणि विघातक वातावरण आहे की, बहुसंख्य लोक केवळ मरण येत नाही म्हणून जगतात असेच वाटत राहते. हीच जणू त्यांच्या जीवनाची प्रेरणा आहे. आला दिवस कसाबसा ढकलायचा हेच त्यांचे ध्येय! थोडी प्रतिकूल परिस्थिती  निर्माण झाली की आत्महत्या करणारांचे प्रमाण आपल्या देशातही अलिकडे दखल घेण्याइतके वाढू लागले आहे. सारेजण फक्त इंद्रियसुखाच्या मागे धावत आहेत. आणि त्यात थोडे काही उणे अधिक झाले की, आयुष्यात अजिबात अर्थ नसल्याची तक्रार करत आहोत. आपण का केवळ आपल्या इंद्रियांचे, भावनांचे, विचारांचे गुलाम आहोत  - याचा आपण काही विचारच करत नाही.

विवेकानंद म्हणतात, तुम्ही असे निराश व्हायचे काहीच कारण नाही! तुम्हाला शरीर आहे पण तुम्ही म्हणजे केवळ शरीर नाही! तुम्हाला मन आहे पण तुम्ही म्हणजे केवळ मन नाही! .... दु:खाची ही अवस्था केवळ स्वप्नवत आहे.....तुम्ही तिच्यावर मत करु शकता”.  विवेकानंद वाड्मय वाचल्यावर मन निराश  अथवा उदास राहणे अशक्य आहे असा माझा व्यक्तिगत अनुभव अनेकांना स्वत:चाही वाटेल याची मला खात्री आहे.

श्री. मुजुमदारांच्या मते One striking feature of Advaita that is very often stressed by Vivekananda is the unshakable optimism. The Advaita alone can make man strong and self-reliant, non-resisting, calm, steady, worshipful, pure and meditative. By urging that every man is potentially divine, the Advaita gives hope of infinite progress to every man, however degraded and lowly he may be. As a true Advaitist Vivekananda restored the lost spirit of man and thereby made him conscious of his heritage, dignity and responsibility. याबाबत दुमत असण्याचे मला तरी काहीच कारण दिसत नाही!

माणूस सभोवताली जेंव्हा जाणीवपूर्वक पाहू लागला तेंव्हा एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की, अस्तित्वातअसणारी प्रत्येक गोष्ट विनाशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आपण नेहमीच या प्रक्रियेला नाश म्हणत नाही, कधीकधी आपण त्यालाच परिवर्तन म्हणतो. पण परिवर्तन देखील आधीच्या अवस्थेच्या नाशानंतरच शक्य असते ही बाब आपण नजरेआड करतो.

या प्रकारच्या विचारांच्या फरकातून दोन प्रकारचे विचारप्रवाह जगात उदयास आले. एक विचारप्रवाह  म्हणतो की:  या जगात आपल्याला कशाचाच शोध लागणे शक्य नाही. जगाच्या अवाढव्य पसा-यात मी (म्हणजे मानव) इतका क्षुद्र जीव आहे की, माझ्या आयुष्यात काही हेतू आहे असे मानणेही वेडेपणाचे आहे. दुसरा संप्रदाय म्हणतो की:  माझे हे शरीर, सृष्टी ज्या मूलद्रव्यापासून बनली, नेमक्या त्याच मूलद्रव्यांचे बनलेले आहे. मग शरीर हेच सर्वस्व मानून का जगू नये? या जगाचा पूरेपूर उपभोग आणि आस्वाद मी का घेऊ नये?

पण विवेकानंद आणखी एक पाऊल पुढे जातात. आपण म्हणजे फक्त शरीर नाही हे तर त्यांनी सांगितले आहेच. शरीर हे आध्यात्मिक शक्तीच्या अभिव्यक्तीचे एक साधन मात्र आहे असे विवेकानंदांचे मत आहे. माणूस हा आत्मा आहे हे त्यांनी वारंवार सांगितले आहे.

माणूस हा आत्मा आहे - या मताचेही परिणाम दोन प्रकारांनी दिसून येतात. एक म्हणजे शरीराला अजिबातच महत्त्व द्यायचे नाही, त्याला अगदी तुच्छ लेखायचे, त्याचा अगदी तिरस्कार करायचा किंवा शरीर नाही असेच म्हणत त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे. व्यावहारिक पातळीवर शरीराला अस्तित्व  आहे, त्याचे भरणपोषण आणि त्याची काळजी घेणे आवश्यक आहे हे विसरुनच जायचे. दुसरे मत असे की शरीराला खूप अवास्तव महत्त्व द्यायचे, त्याचे खूप लाड करायचे, त्याच्या उपभोगाभोवतीच आपले जगणे केंद्रित ठेवायचे!

विवेकानंद या दोन्ही टोकांच्या भूमिकांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करतात. माणसाच्या अंतर्यामी विकसित होण्याच्या अनंत शक्यता असतात पण त्यासाठी शरीर नावाचे बाहय साधनही आवश्यक आणि उपयोगी असते.

शरीराची माणसाला आवश्यकता आहे हा मुददा आपण वर पाहिला आहेच. या भौतिक अस्तित्वाविषयी विचार करताना तैत्तिरीय उपनिषदातील पंचकोष विवरणाची येथे आठवण येणे स्वाभाविक आहे. या उपनिषदात माणसाच्याअस्तित्वाचे पाच स्तर प्रतिपादन करण्यात आले आहेत. अन्नमय कोष म्हणजे आपले स्थूल शरीर; प्राणमय कोष म्हणजे चैतन्यशक्तीच्या प्रवाहाचा स्तर;  मनोमय कोष म्हणजे भावनांचा आणि विचारांचा स्तर;  विज्ञानमय कोष म्हणजे प्रज्ञायुक्त जाणीवेचा स्तर आणि आनंदमय कोष म्हणजे आपले सचिचदानंद स्वरुप!

विवेकानंद या पारंपरिक भाषेत मानवी शरीराचे वर्णन करत नाहीत, पण ते वेदान्ताची परिभाषा वापरतात. ते म्हणतात, वेदान्त दर्शनानुसार मनुष्य हा तीन घटकांचा बनलेला आहे असे म्हणता येईल. सर्वात बाहेरचा भाग म्हणजे शरीर होय. हेच माणसाचे स्थूल स्वरुप आहे. यातच संवेदनांची सारी साधने विद्यमान असतात. पण ही इंद्रिये म्हणजे फक्त साधने आहेत. मनाच्या साहचर्याविना ही इंद्रिये संवेदना ग्रहण करु शकत नाहीत...... त्यानंतर इच्छाशक्तीच्या रुपात प्रतिक्रिया होणे जरुरीचे आहे. जिच्याद्वारे ही प्रतिक्रिया होते, त्या ज्ञानशक्तीला अथवा विचारशक्तीला बुद्धी अशी संज्ञा आहे. स्थूल शरीरात सतत परिवर्तन होत असते. आंतरइंद्रिये, मन, बुद्धी आणि अहंकार ही इतकी सूक्ष्म असतात की ती युगानुयुगे टिकू शकतात.....

केवळ भौतिक किंवा स्थूल शरीराच्या पातळीवरही माणूस इतर जीवांपेक्षा श्रेष्ठ आहे असे विवेकानंदांचे मत आहे. माणसाकडे खूप शक्ती, सामर्थ्य, बळ आहे अशातला भाग नाही.  श्रवणेंद्रिय, घ्राणेंद्रिय, स्पर्शेंद्रिय या सा-याच बाबतीत माणसापेक्षा इतर प्राण्यांची क्षमता कैक पटींनी चांगली आहे हे आपण जाणतो. मग माणसाला त्या सर्वांपेक्षा सामर्थ्यवान कशामुळे म्हणायचे? एक कारण म्हणजे माणसाची शरीरयंत्रणा जास्त व्यवस्थित सुनियोजित आणि अधिक विकसित स्वरुपाची आहे. निसर्गामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याबाबत प्राण्यांचे प्रतिसाद अत्यंत प्राथमिक स्वरुपाचे, ठरीव आणि साचेबंद प्रकारचे असतात. माणसांचे प्रतिसाद, प्रतिक्रिया मात्र इतक्या यांत्रिक नसतात. त्यात काही विकास दिसून येतो, त्यात काही निवडप्रक्रिया  दिसून येते, काही हेतू दिसून येतो. माणसाचा विकसित मेंदू हेच यामागचे प्रमुख कारण होय!

शिवाय माणसाला ‘तो म्हणजे फक्त सान्त शरीर नाही याचीही जाणीव आहे. माणूस एकाच वेळी सान्तही असतो आणि अनंतही असतो. म्हणूनच आपण स्वत:चा शोध सान्त परिभाषेत घेण्याचा प्रयत्न तर करतो पण त्याला यश येत नाही. आत्म्याशिवाय दुसरे काहीच अस्तित्वात नसून दिसणारे विभिन्न पदार्थ हे त्याचेच उत्तरोत्तर स्थूल होत जाणारे भिन्न भिन्न विष्कार आहेत.

पण सद्यस्थितीतला माणूस अगदी सदगुणांचा पुतळा आहे असेही नाही. विवेकानंद म्हणतात, दैवी, मानवी व पाशवी अशा तीन प्रकारच्या गुणांनी मनुष्य बनला आहे. तुमच्यातील देवत्वाचा ज्यामुळे विकास होतो ते सदगुण होत व ज्यामुळे पाशवी वृत्ती बळावते ते दुर्गुण होत.

मानवी मनाच्या संकुचित्पणाविरुद्ध स्वामीजी आपल्याला सूचना देवून सावध करतात. आपले शरीर सान्त, मर्यादित, सीमित आहे पण मन मात्र अज्ञानाने, स्वार्थाने, क्षुद्रपणाने ते शरीर अनंत, अमर्याद, असीम असल्याचा दावा करते. हे दुसरे तिसरे काहीही नसून माणसाचा अहंकार होय याची माणसाला जाणीव होणे आवश्यक आहे.


आपण अमर्याद आहोत ते सान्त शरीररुपाने नव्हे तर आत्मरुपाने! कोणी मग असा प्रश्न विचारेल की, कशावरुन आपण आत्मरुप आहोत? अनंत आहोत? अमर्याद, असीम आहोत?

क्रमश:

No comments:

Post a Comment