ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Sunday, February 2, 2025

२७३. २०२४ मधला एक प्रयोग

(Want to read this post in English? It is available here!) 

तुमचे सगळ्यात आवडते शिक्षक कोणतुमचे सगळ्यात आवडते लेखक कोण? हे प्रश्न मला विनोदी (आणि कधीकधी तर निरर्थक) वाटतात. कारण अशा बाबतीत एक व्यक्ती अगदी शिखरावर आणि दुसरं कुणी त्यांच्या जवळपासही पोहोचू शकत नाही – अशी काही वस्तुस्थिती नसते. एकापेक्षा जास्त शिक्षक आणि लेखक आपल्याला एकाच वेळी आवडू शकतात.  माणसांसोबतच्या, माणसांबाबतच्या आपल्या आठवणींना अनेक संदर्भ असतात. त्यातली कोणती आठवण नेमकी कधी डोकं वर काढेल याबाबत काही आडाखा बांधता येत नाही.

याच धर्तीवर मला मध्यंतरी कुणीतरी २०२४ मधला तुझ्यासाठीचा सर्वात आनंदाचा क्षण कोणता असं विचारलं आणि मी गोंधळून गेले. मला अनेक गोष्टी आठवल्या, पण त्यांची क्रमवारी लावता येणं मला शक्य नव्हतं. म्हणजे मला एखादा सुंदर पक्षी अनपेक्षितपणे दिसला तो आनंद आणि मी अमूक एक नवं कौशल्य आत्मसात केलंय – यामुळे वाटणारा आनंद - यांची वर्गवारी नेमकी कशाच्या आधारे करायची? वर्गवारी केलीच पाहिजे का? एक श्रेष्ठ आणि बाकी सगळे मग कमी प्रतीचे असा अट्टहास केलाच पाहिजे का? अर्थातच हे सगळं काही मी त्या व्यक्तीशी बोलले नाही. काहीतरी थातुरमातुर उत्तर देऊन मी वेळ मारून नेली.

कामाची वेळ संपली आणि मग कपाटातून मी हे खोकं बाहेर काढलं. 


नाही, नाही,
श्रुजबरी कुकीज खाण्यासाठी नाही (त्या फार पूर्वीच खाऊन झालेल्या आहेत!)  या खोक्यात मागचं वर्षभर मी केलेल्या प्रयोगाची सामग्री होती. आता तिच्याकडं जरा निगुतीने पाहण्याची वेळ आली होती. काय होता हा प्रयोग?

जानेवारी २०२४ च्या सुरूवातीस मी फेसबुकवर एक पोस्ट वाचली होती. दर आठवड्याला – त्या आठवड्यात घडलेल्या - एखाद्या चांगल्या गोष्टीची नोंद एका कागदावर करायची. ते कागद दर आठवड्याला एका बरणीत टाकायचे. वर्ष संपताना ही बरणी उघडून वर्षभरात आपल्या आयुष्यात घडलेल्या सकारात्मक नोंदींचा एकत्र आस्वाद घ्यायचा – असा हा काहीसा उपक्रम.



मला उत्सुकता वाटली. प्रयोग करून पाहावा वाटला. बरणीऐवजी खोकं हा किरकोळ बदल केला. आणि सकारात्मक गोष्ट ही बाब मला जरा मोघम वाटली. म्हणून मी त्यातही थोडासा बदल केला – या आठवड्यात मला कशामुळे छान वाटलं, कशामुळे आनंद झाला – अशा नोंदी ठेवायला मी सुरूवात केली. मोबाईलमध्ये रिमाइंडर लावल्यामुळे दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मला तो Weekly Positive Note लिहायची आठवण करून देऊ लागला.

प्रत्येक वेळी त्या आठवड्यातल्या आनंदाची नोंद रविवारी संध्याकाळीच लिहिली असं काही घडलं नाही. कधीकधी दोन-तीन दिवस उशीरही झाला. खोकं उघडल्यावर वर्षभरातल्या ५२ पैकी ५१ आठवड्यांच्या नोंदी मला त्यात मिळाल्या. एक आठवडा कधीतरी राहून गेला असणार, किंवा चिठ्ठी कदाचित खोक्याबाहेर – कपाटात कुठंतरी – पडली असणार.

काय आहेत या नोंदी? भव्यदिव्य काहीच नाही. एरवी आठवणारही नाहीत अशा अगदी छोट्या घटना आणि प्रसंग आहेत. वर्षभराचा आढावा घेताना यातल्या कदाचित दोन-तीन गोष्टीच मला आठवल्या असत्या. उरलेल्या ४७-४८ प्रसंगांमध्येही मला आनंद मिळाला होता हे मी विसरून गेले असते. ४७-४८ नोंदीही आठवड्याला एक धरून निवडक लिहिलेल्या. प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळा मला आनंद वाटला असणार याची मला पूर्ण खातरी आहे.


काय दाखवतात या नोंदी
? माणसांच्या भेटींचा आनंद आहे. त्यांच्या यशाचा आनंद आहे. अनपेक्षितपणे एक अतिशय सुंदर पक्षी दिसला, तो आनंद आहे. पाऊस पडतोय मस्त – त्याचा आनंद आहे. रविवारी सकाळी सुखद गारव्यात मोकळ्या रस्त्यावर चालण्याचा आनंद आहे.

शहरातल्या शहरातच काही भागांमध्ये (कोंढवा, रामवाडी...) मी पहिल्यांदाच गेले, त्याचा आनंद आहे. मेट्रोने प्रवास करताना दिसलेल्या डेरेदार वृक्षांमुळे झालेला आनंद आहे. पुस्तक खरेदीचा आनंद आहे. वर्षात जितकी पुस्तकं वाचायची ठरवली होती, त्यातली बरीचशी वाचून झाली त्याचा आनंद आहे. काही लिहिण्याचा आनंद आहे.

काही आनंद कामातले सुद्धा आहेत. ज्यात आनंद वाटेल तेच काम करायचं हा मार्ग नेहमी वापरला आहे. पण त्यातले सूक्ष्म बारकावेही कसा आनंद देतात ते मागे वळून पाहताना आजही छान वाटलं. ग्रामीण भागातल्या लोकांशी एलबीजीटीक्यू या विषयावर सहजपणे संवाद साधता आला – हे कौशल्य आता आपल्यात आलं आहे – याचा आनंद आहे. एक ट्रेनिंग मॅन्युअल लिहून पूर्ण झालं, त्याचा आनंद आहे. एका प्रशिक्षणात फार प्रभावी रीतिने लोकांनी चर्चेत सहभाग घेतला, त्याचा आनंद आहे. नवी भाषा शिकता आली, त्या भाषेतला सिनेमा पाहताना आता सबटायटल्सची गरज कमी लागते - याचाही आनंद आहे. 

पुणे वेधशाळेला भेट देणं असो की राज्यघटनेवरच्या एका कार्यशाळेतला सहभाग असो – या दोन्ही गोष्टी नव्याने (पहिल्यांदाच) केल्या त्याचा आनंद आहे. पुण्यातल्या यशदा संस्थेच्या परिसरात सकाळी आणि संध्याकाळी वाद्यसंगीत ऐकल्याचा आनंद आहे. पॅनकेक बऱ्याच वर्षांनी खाल्ला, याचाही आनंद आहे 😊

२०२४ मध्ये मला एक अपघात झाला आणि त्यामुळे एक शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे या वर्षातले माझे बरेच आनंदाचे क्षण हे माझ्या वैद्यकीय प्रगतीशी निगडित आहेत. आता आपलं आपण उठता यायला लागलं, आता हात उचलता यायला लागला, आता उजव्या हाताने खाणं जमायला लागलं, लॅपटॉपवर टायपिंग करता यायला लागलं .... तीन-चार महिने या आणि अशाच नोंदींचे आहेत.

काही नोंदी कृतज्ञतेच्या आहेत. माणसांबद्दलची कृतज्ञता. आयुष्याबद्दलची कृतज्ञता. काही गोष्टी सहजपणे सोडून देता आल्या त्याचाही आनंद आहे.

आनंद, समाधान हे काही फक्त मोठ्या गोष्टींत असत नाही – हे ऐकून, वाचून आणि खरं तर अनुभवानेही माहिती होतंच. पण वर्षभर नोंदी ठेवण्याच्या या प्रक्रियेमुळे हे शहाणपण अधोरेखित झालं.

म्हणजे वर्षभरात काही त्रासदायक, वेदनादायी वगैरे घडलंच नाही असं नाही. निसर्गनियमाप्रमाणे त्याही घटना घडल्याच. पण आज या सगळ्या आनंदी नोंदींकडे पाहतानाही मला पुन्हा एकदा मजा आली. बेरीज-वजाबाकी केली तर या आनंदाच्या गोष्टी टिकल्या, रूजल्या असं म्हणता येईल.

एरवीही या अशा असंख्य सकारात्मक गोष्टी माझ्या आयुष्यात घडत आल्या असणारच आहेत. पण त्याकडं कधी एवढं लक्ष देऊन पाहिलं नव्हतं. आता अजून नेटाने पहात गेलं तर त्यातले अनेक बारकावे समोर येतील.

हा प्रयोग २०२५ मध्येही चालू ठेवायचा विचार तरी आहे. 😊

 

19 comments:


  1. सुंदर कृतियुक्त संकल्प पूर्ण झाल्याचा एक आनंदही असेलच ☺️
    धन्यवाद

    ReplyDelete
  2. परफेक्ट,करून बघावं असा प्रयोग.

    ReplyDelete
  3. छान आहे हा उपक्रम. आयुष्याबद्दल कृतज्ञ रहायला मदत करणारा. मी पण सुरू करायचा विचार करतेय.

    ReplyDelete
  4. मीही असे सुरू करीन.कल्पना खूप छान आहे

    ReplyDelete
  5. तू इतक्या नेटाने वर्षभर केलंस हे मात्र कौतुकाचं आहे.

    ReplyDelete
  6. स्तुत्य उपक्रम. मलाही आवडेल करायला हा.

    ReplyDelete
  7. करून पाहतो मीही अशा आनंदी गोष्टिंची वही ठेवायचा प्रयोग...

    ReplyDelete
  8. हा प्रयोग भन्नाट आहे. तू नेहमीप्रमाणे छानच लिहिलं आहेस. मी लेकीबरोबर हा प्रयोग करून बघेन.

    ReplyDelete
  9. हे फारच भारी आहे. मलाही सुरु करायला हवं असं वाटतंय. तू किती सहज आणि छान लिहिलंयस, नेहमीप्रमाणे 😊

    ReplyDelete
  10. ताई खुपचं छान विचार आलेले मनात. जगणं व प्रसंग अनुभव यांची खरीखुरे वास्तविक चित्रण विचारातून मांडलं आहे.मला कमेंट करता जमले नाही लेखनाचा शेवटी म्हणून WhatsApp वर  लिहिले...👌 - तारा मराठे

    ReplyDelete
  11. छान आणि positive read ..
    Truly inspiring 👍👏👏👏

    ReplyDelete
  12. मस्त आहे idea.. करायला हवं.

    ReplyDelete
  13. वा! फारच भारी!

    ReplyDelete
  14. खूपच आवडला हा प्रयोग.तुझ्या खास शैलीत तू लिहिलंस पण मस्त त्याविषयी. प्रत्येकाने करून पाहावा असा आहे.

    ReplyDelete
  15. खूप छान लेख आणि संकल्पना!
    Will try it out.

    ReplyDelete
  16. हे फारच छान आहे. म्हणजे रोजच्या नोंदी शक्य नाही, पण आठवड्यातून एकदा नक्कीच जमू शकतं. फार आवडलं मला हे, मी करून बघेल जमतय का 😊

    ReplyDelete
  17. मस्त!!! खूपच आवडला तुझा हा प्रयोग. सातत्याने तू करत राहिलीस हे विशेष.👍👌👌

    ReplyDelete
  18. Great!! Very nice write up.Mind which usually goes into negativity can be directed by this effective experiment! You did it so committed ly is amazing.

    ReplyDelete

पोस्टवरती प्रतिसाद नोंदवण्यात अडचण येत असल्याचे काही वाचकांनी कळवले आहे. तांत्रिक बाबी तपासून पहात आहे. प्रतिसाद येथे प्रकाशित होत नसल्यास मला इमेलवर तो पाठवावा ही विनंती. धन्यवाद.