ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, January 28, 2013

१४८. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग २ (अ) पाऊलखुणा'व्यक्तीपेक्षा विचार श्रेष्ठ असतात असे आपण म्हणतो आणि त्यात तथ्यही आहे. पण एखाद्या व्यक्तीचे विचार जाणून घेताना त्या व्यक्तीवर आयुष्यात कोणकोणत्या गोष्टींचा प्रभाव पडला आहे हे जाणून घेणेही आवश्यक आहे. त्यातून त्या व्यक्तीची जडणघडण आपल्या ध्यानात येते. श्री. अरविंद आश्रमाच्या माताजींनी सामान्य माणसाबाबत केलेले एक विधान येथे उदधृत करण्याचा मोह मला होतो आहे.  माताजी म्हणतात, “One believes he has his own way of thinking. Not at all. It depends totally upon the people one speaks with or the books he has read or on the mood he is in. It depends also on whether you have a good or bad digestion; it depends on whether you are shut up in a room without proper ventilation or whether you are in the open air; it depends on whether you have a beautiful landscape before you; it depends on whether there is a sunshine or rain! You are not aware of it; but you think all kinds of things; completely different according to a heap of things which have nothing to do with you!” तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या बाबतीत किती तंतोतंत खरे आहे हे!

विवेकानंदांसारखे महापुरुष अर्थातच बाहय प्रकृतीचे असे गुलाम नसतात. पण कोटयवधींची लोकसंख्या असलेल्या या देशात जेंव्हा एखादाच विवेकानंद जन्माला येतो तेंव्हा त्यांच्या आयुष्याच्या, परिस्थितीच्या  त्यांना भेटलेल्या माणसांच्या अभ्यासातून विवेकानंद अधिक चांगले समजायला मदत होते. विवेकानंदांच्या विचारांइतकेच त्यांचे चरित्र समजून घेणेही म्हणून मला महत्त्वाचे वाटते.

जॉर्ज विल्यम्स (George Williams) यांनी Swami Vivekananda: Archetypal Hero or Doubting Saint? या त्यांच्या लेखात विवेकानंदांच्या आयुष्याची विभागणी पुढीलप्रमाणे केली आहे -
      I.      Wondrous Child: Visions, Meditations
      II.      Exceptional College Student: Master of Western thought, Independent Thinker
     III.      Carefully trained by Sri Ramakrishna
     IV.      Warrior Monk: Conquers West, Awakens India

विवेकानंदांचे सर्वच चरित्रकार तपशीलातील बदल सोडल्यास सर्वसाधारणपणे याच प्रकारे त्यांच्या जीवनाचा अभ्यास करताना दिसून येतात. मी विवेकानंदांच्या चरित्राची मांडणी करताना पहिल्या दोन टप्प्यांना फारसे महत्त्व देणार नाही. पण विल्यम्स यांनी न मांडलेला 'परिव्राजक काळ मला स्वत:ला महत्त्वाचा वाटतो. त्याचा विचार येथे केला जाईल. स्वामीजींच्या वेदान्तविषयक विचार वगळून इतर विचारांचाही येथे मी थोडक्यात परामर्ष घेतला आहे.

पहिली काही वर्षे

विवेकानंदांचे मूळ नाव नरेन्द्रनाथ दत्त. त्यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी कलकत्त्यात झाला. त्यांचे वडील विश्वनाथबाबू दत्त हे प्रख्यात वकील होते. आई भुवनेश्वरी देवी अत्यंत धार्मिक प्रवृत्तीची स्त्री होती. नवसायासाने झालेल्या या मुलाचे फाजील लाड मात्र त्या दोघांनीही अजिबात केले नाहीत. प्रत्येक प्रसंगातून आपल्या मुलाला चांगले शिक्षण कसे देता येईल हेच त्यांनी सदैव पाहिले.

नरेन्द्राचे लहानपण मजेत गेले. त्याच्यातील आध्यात्मिक भूक, मनाचा मोठेपणा, साहस, निर्भयता, विरक्तता या मोठेपणी विशेषत्वाने दिसून आलेल्या गुणांची चाहूल त्याच्या बालपणीच्या अनेक प्रसंगांतून दिसून येते.

उघडया डोळयांनी जग पाहणे हे नरेन्द्राचे आणखी एक वैशिष्टय! ब्रिटीश राजवटीच्या निमित्ताने पाश्चात्त्य जडवादी विचारांचे आक्रमण भारतावर झाले होते. कलकत्ता ही तर त्या वेळची भारताची राजधानी. पण परंपरागत संस्कार आणि उपजत आध्यात्मिक प्रेरणा नरेन्द्राला वेगळे काही सांगत होत्या. त्यावेळच्या सर्व युवकांप्रमाणेच नरेन्द्रही नेमका कोणता रस्ता निवडायचा या द्वंद्वात सापडला व काही काळ तो सुधारणावादी 'ब्राह्मो समाजाकडे आकृष्ट झाला. पण अनुभवाची आस काही त्याला स्वस्थ बसू देईना. पाश्चिमात्य विचारवंतांचे वाचन त्याने केले. पण त्यातील उणीवांमुळे त्याची भूक भागू शकली नाही. 'देव आहे का? न् असला तर तो मला दिसलाच पाहिजे या विचारांनी नरेन्द्र झपाटला गेला. साधुसंन्याशांनी गजबजलेल्या या देशात वास्तविक ईश्वराची अनुभूती घेतलेले खूप लोक असायला हवेत. पण नरेन्द्राची निराशाच झाली!

रामकृष्ण ...... रामकृष्ण

'ज्याअर्थी देव दिसत नाही त्याअर्थी तो नसावाच अशा पक्क्या नास्तिकतेकडे नरेन्द्र झुकत असतानाच दक्षिणेश्वरच्या कालीमातेच्या मंदिराच्या पुजा-याशी त्याची भेट झाली. हे पुजारी म्हणजेच श्री. रामकृष्ण परमहंस. नरेन्द्राचे हृदय उर्वरित आयुष्यात याच माणसाचे गीत गाणार होते! ही भेट केवळ नरेन्द्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातही महत्त्वाची ठरली. 'होय, ईश्वर आहे आणि जितक्या स्पष्टपणे मी तुला पाहतो त्याहून कैक पटींनी स्पष्टपणे मी ईश्वराला पाहतो या त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण उद्गारांनी नरेन्द्र आश्चर्यचकित आणि आनंदितही झाला! अंधश्रद्धाळू भक्ती नरेन्द्राच्या स्वभावात अर्थातच नव्हती. पण रामकृष्णांबद्दलच्या त्याच्या प्रत्येक संशयाचे निराकरण झाले अन वरवर रुक्ष दिसणा-या नरेन्द्राच्या अंतरंगातील कोमलता प्रकट होऊ लागली.

रामकृष्णांच्या परिसस्पर्शाने नरेन्द्राचे जीवन उजळून निघाले. रामकृष्ण-नरेन्द्राच्या सहवासाचा चार वर्षांचा हा कालावधी (१८८२ ते १८८६) मला सर्वार्थाने विलोभनीय वाटतो. नरेन्द्राच्या रुक्ष वादविवादांनी रामकृष्णांचे हळवे अंत:करण घायाळ होई; तर नरेन्द्राच्या वैज्ञानिक दृष्टीला रामकृष्णांच्या अनेक कृती, त्यांचे अनेक अनुभव सहजासहजी पचनी पडत नसत. पुढे अनेक वर्षांनी स्वामीजी भगिनी निवेदितांना म्हणाले,  “Let none regret that they were difficult to convince! I fought my Master for six long years, with the result that I know every inch of the way! Every inch of the way!!”

रामकृष्णांचे नरेन्द्रावरील नितांत प्रेम, मातेचे कार्य करण्यासाठीच नरेन्द्र जन्माला आला आहे हा त्यांचा दृढ विश्वास आणि रामकृष्णांचे खुले अंत:करण, त्यांच्या भावातीत अवस्थेचे वेळोवेळी घडणारे दर्शन, त्यांच्या तत्त्वज्ञानाची व्याप्ती आणि त्यानुसार घडणारे आचरण यामुळे याच गुरुकडून आपल्याला मोक्षप्राप्ती मिळेल असा नरेन्द्राचा दृढ विश्वास .......!! या परस्पर विश्वासाच्या आधारावरच दोघांचे एकमेकांशी नाते टिकून राहिले! नरेन्द्र खूप मोठे काम करणार आहे अशी रामकृष्णांची खात्री (स्वत: नरेन्द्रला मात्र तसे अजिबात वाटत नसे) त्यामुळे त्यांनी नरेन्द्रच्या विरोधात एक चकार शब्दही कधी कोणाकडून ऐकून घेतला नाही.

रामकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करीत असतानाच अचानक नरेन्द्रचे वडील मृत्युमुखी पडले. मायेचे छत्र तर गेलेच शिवाय आर्थिक सुरक्षितताही गेली. आईचे अन भावंडांचे पोट भरण्यासाठी नरेन्द्र वणवण फिरु लागला. सुस्थितीतून अचानक दारिद्र्यात फेकले गेल्याने अवाक् आणि हताश बनलेली नरेन्द्रची आई ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल साशंक झाली आणि ही साशंकता नरेन्द्रच्या मनापर्यंत पोहोचली. पण त्याचवेळी रामकृष्णांनी अद्वैताचा असा एक अनुभव नरेन्द्रला दिला की, उर्वरित आयुष्यात नरेन्द्रने प्रतिकूल परिस्थितीतही ईश्वराबददल कधीच शंका घेतली नाही.

रामकृष्णांचे आजारपण वाढले आणि १८८६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. कोवळया नरेन्द्रवर हा दुसरा मोठा आघात होता. पण त्याचे उपजत नेतृत्व इथे सिद्ध झाले. त्याच्या अभ्यासाची धार इथे लखलखीत झाली. त्याच्यामधले संघटन कौशल्य इथे दिसून आले. समवयस्क संन्यासी बांधवांना गुरुच्या मृत्युनंतर एकत्र बांधून ठेवणे, त्यांची आध्यात्मिक प्रगती होईल हे पाहणे, एकत्रित साधनेबरोबरच आर्थिक व्यवहार सांभाळणे ही सगळी कामे त्याने इतक्या तयारीने केली की 'नरेन्द्र तुम्हाला शिकवेल हे रामकृष्णांचे उद्गार त्याने सार्थ ठरविले.

पण नुसत्या अभ्यासाने नरेन्द्रचे मन शांत होत नव्हते! आयुष्यात नेमके आणि नक्की काय करायचे आहे याची स्पष्ट कल्पना नसल्याने त्याच्या मनाची तगमग होत होती. गुरुने मुक्त हस्ते उधळलेले ज्ञान आपल्यापर्यंत का पोहोचले नाही याची त्याला खंत होती. अन नरेन्द्र भारतभ्रमणाला बाहेर पडला.

भारतभ्रमण

हा परिव्रजनाचा काळ नरेन्द्रच्या आणि भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला यात शंकाच नाही. हिमालय ते कन्याकुमारी या प्रवासात नरेन्द्र समाजाच्या विविध अंगांना, व्यक्तींना, घटनांना सामोरा गेला. एक साधा संन्यासी या प्रवासातच झपाटून गेला. जडवाद आणि चैतन्यवाद, पाश्चात्य विज्ञान आणि भारताची आध्यात्मिकता यांची एकमेकांना ओळख झाली नाही तर माणसाचे माणूसपण हरवून जाईल, या दोहोंना जोडणे हेच आपले काम आहे याचीही या तरुण संन्याशाला या प्रवासातच जाणीव झाली.

स्वामीजींनी भारतभ्रमंतीच्या काळात जी दैन्यावस्था पाहिली त्यामुळे ते व्याकूळ झाले. धर्माच्या नावाखाली इथल्या दीनदलितांचे जे शोषण उच्चवर्णीयांनी चालवले होते, त्याची जाणीव त्यांना झाली. 'अहो, भारतातील उच्चवर्णीयांनो! या मायामय जगात तुम्हीच खरोखर आभासमय आहात, गूढ आहात, वाळवंटातील मृगजळ आहात! तुम्ही भूतकाळाचे प्रतिनिधी आहात. भूतकाळातील विविध प्रकारांचे तुम्ही नुसते प्रतिनिधी आहात..............भविष्याच्या दृष्टीने तुम्ही नुसते शून्य आहात.......प्राचीन भारताच्या मृत शरीराच्या रक्तमांसहीन अस्थिपंजरांनो, तुम्ही ताबडतोब धुळीला मिळून हवेत विलीन का नाही होत? एक गोष्ट मात्र खरी, अजून तुमच्या बोटांच्या हाडांवर तुमच्या पूर्वजांनी सांभाळलेल्या हि-याच्या अमूल्य अंगठया झळकत आहेत...... आता तुमचा तो खजिना अगदी झटपट आपल्या वारसदारांना देवून टाका बघू...... या त्यांच्या घणाघाती उद्गारांमागे भारतभ्रमणाचा जिवंत अनुभव होता!

धर्म हा मूठभर लोकांसाठी सत्तासाधन म्हणून उपयोगात आणला जातो आहे हेही त्यांनी पाहिले. ज्या देशामध्ये अद्वैत तत्त्वज्ञानाचा उद्घोष झाला त्याच देशात तत्त्वज्ञान पोपटपंचीसाठी आणि व्यवहार मात्र माणुसकीला काळीमा फासणारा............. हा विरोधाभास पाहून त्यांचे अंत:करण हळहळले. वर्षानुवर्षे अंध:कारात खितपत पडलेल्यांना या समाजरचनेत अंध:कार, अन्याय आणि शोषण याव्यतिरिक्त काही मिळणार नाही हीही वस्तुस्थिती  त्यांनी उघडया डोळयांनी पाहिली.

समाजाच्या अवनतीचे मुख्य कारण म्हणजे धर्मातील कर्मकांडांना दिलेले अवाजवी महत्त्व. एखादी गोष्ट माणूस कशी वापरतो यावरच त्या वस्तुची उपयुक्तता व उपद्रवता अवलंबून असते. आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीतही आपण हेच पाहत आहोत. स्वामीजींच्या हे प्रकर्षाने लक्षात आले होते. म्हणूनच त्यांच्या उर्वरित आयुष्यातील विचारांचा आणि कृतींचा धागा माणसाची फक्त बाहय परिस्थिती बदलविणे हा कधीच नव्हता, तर माणसाला स्वत:मधील सत्प्रवृत्तींची ओळख करुन देणे त्यांनी स्वत:चे जीवितकार्य मानले. धर्म हा मुळात वाईट नाही, आपण त्याला वाईट पद्धतीने वापरतो. आपल्या समाजरचनेतील काही रुढी या सद्यस्थितीत योग्य नसतील तर आपण नव्या परंपरा निर्माण केल्या पाहिजेत असा क्रांतिकारी विचार त्यांनी मांडला.

विधायक क्रांती

स्वामीजींचे वैशिष्टय हे की, क्रांतिकारक विचार मांडताना त्यांना कसल्याही विध्वंसाचा आधार घ्यावा लागला नाही. धर्मावर आघात करुन सुधारणा आणू पाहणा-या समकालीन सुधारकांबद्दल, त्यांच्या प्रामाणिक हेतूंबद्दल त्यांना आदर होता. पण त्यांनी स्वत: मात्र तो मार्ग कधीही चोखाळला नाही. पाश्चात्यांची भ्रष्ट नक्कल म्हणजे सुधारणा असे मानण्याइतके उथळ विचारवंत विवेकानंद कधीच नव्हते. सर्व प्रकारची प्रगती ही आतूनच होत असते असे त्यांचे ठाम मत होते. 'Each soul is potentially Divine’ ही औपनिषदिक तत्त्वाची त्यांनी केलेली घोषणा इतर कोणत्याही वादाच्या जाहीरनाम्यापेक्षा मला श्रेष्ठ वाटते. कारण त्यामधून जात, प्रांत, भाषा, इतकेच नव्हे तर धर्म, लिंग आणि देश यांच्याही पल्याड जाऊन सर्व माणसांना विकासाची समान संधी असल्याचे शाश्वत सत्य विवेकानंद आपल्या समोर मांडतात.

सुधारणा म्हणजे मोडतोड नव्हे तर पुनर्बांधणी’ हा नवा दृष्टिकोन त्यांनी सुधारकांना दिला. आणि त्याच वेळी पुराणमतवाद्यांवर त्यांच्याइतकी प्रखर टीका त्या काळात तरी अन्य कोणीच केली नसेल. विवेकानंद म्हणतात, 'आमचा धर्म स्वयंपाकघरातल्या सोवळया-भांडयांमध्ये गुदमरुन जात आहे. आम्ही वेदान्ती कसले, पौराणिक कसले नि तांत्रिक कसले! आम्ही आहोत 'शिवू नको वादी! आमचा धर्म आहे स्वयंपाकघरात, देव आहे चुलीवरच्या भांडयात.........

गूढवाद आणि अंधश्रद्धा यांचा आधार घेऊन उभ्या असलेल्या धर्मावर त्यांनी कठोर प्रहार केले. आपल्याकडच्या जुनाट, भ्रामक समजुती आणि युरोपीयनांचा भोगवाद नि जडवाद - दोन्हीही आपल्याला नको आहेत - या दोन्हींमधूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. भारताचा स्वभाव 'अध्यात्म हाच आहे आणि त्याला यात्किंचितही धक्का न लावता, किंबहुना त्याचाच योग्य तो उपयोग करुन आपण आपल्या राष्ट्रीय जीवनाचा स्तर कसा उंचावू शकतो याचे स्पष्ट चित्र विवेकानंदांनी रंगविले.

भारतभ्रमणात स्वामीजींना जे अनेक अनुभव आले त्यातून अध्यात्म हाच भारताला एकसंध राखणार दुवा आहे याबाबत त्यांची खात्री पटली होती. भारताची मर्मस्थळे कोणती याची त्यांना जाणीव झाली. अंधार आहे म्हणून नुसतेच उसासे टाकत राहण्यापेक्षा 'आपण प्रकाश आणण्याचा प्रयत्न करु याअशा विधायक भूमिकेतून विवेकानंद अंतापर्यंत काम करत राहिले.

क्रमश: 

5 comments:

 1. देवाने स्वामीजींना १०० वर्ष आयुष्य दिलं असतं तर किती छान झालं असतं.... धर्माची सर्वार्थाने पुनर्बांधणी झाली असती कदाचित जी आता अपूर्ण राहिलीये....

  ReplyDelete
  Replies
  1. इंद्रधनू, काही गोष्टी प्रक्रिया म्हणून मोलाच्या असतात जास्त.. ज्या त्या व्यक्तींनी, समाजाने त्या जगायच्या असतात.

   Delete
 2. तू हि सगळी लेखमाला ओळीने वाचता येईल अशी सोय कर ना या ब्लोगवर ! आफ्घानिस्तान अनुभवांबद्दल पण तेच. खूप मोठ्ठा झालाय न हा ब्लोग आता

  ReplyDelete