"बहनजी," कुणीतरी मला हाक मारत होतं.
मी थांबले, माझ्या विचारांतून बाहेर आले आणि इकडंतिकडं पहायला लागले कोण बोलतंय म्हणून.
एक तरुण - साधारण पंचविशीचा असावा तो - माझ्याकडे हसत पाहत होता.
त्या हसण्याचा अर्थ काही मला लागला नाही. ओळखीच्या लोकांच्या हसण्याचा अर्थ लक्षात येतो, पण हा तरुण तर अनोळखी होता मला.
पण हास्याची एक गंमत असते - ते तुमच्याही नकळत तुमचा भाग बनून जातं.
मीही हसले.
माझ्या हसण्याने त्याला आणखी धीर आला असावा.
"माझ्याकडे चांगल्या कानटोप्या आहेत. एक घेऊन तर बघा," तो म्हणाला.
मग मी त्याच्याकडे नीट पाहिलं.
रसत्यावर मफलर, टोप्या, मोजे .. असं थंडीसाठीच (म्हणजे थंडी कमी होण्यासाठी) सामान विकणारा एक किरकोळ विक्रेता होता तो.
पण मला काही नको होतं.
मी नकारार्थी मान हलवली आणि पुढे चालायला लागले.
तो घाईघाईने म्हणाला, "अहो, थंडी आहे खूप. तुम्ही कुडकुडताय. घ्या कानटोपी माझ्याकडची. एकदम कमी होऊन जाईल थंडी. बघा तर एकदा घेऊन. अगदी खरं सांगतोय मी. शिवाय आता थंडी वाढेल अजून."
शनिवार होता तो. दुपारचा एक वाजला होता. मी बँकेत चालले होते पासबुक भरून घ्यायला. दिल्लीच्या थंडीचा कडाका इतका होता की एक वाजताही थंडी वाजत होती. धुक्याचा पदर अजून तसाच होता आणि सोबत बोचरा वारा होता. सूर्य गेले बरेच दिवस ढगांआड लपलेलाच होता. आत्ताही होता तो चंद्र की सूर्य असा प्रश्न पडावा इतका मलूल दिसत होता.
मला धुकं आवडतं. मला हिवाळा आवडतो. खरं सांगायचं तर निसर्ग जसा असतो तसा मला आवडतो. ही एक अशी गोष्ट आहे की जी तुमच्यापासून अलिप्त असते आणि तरी तिच्यामुळे तुम्हाला अपरंपार सुख मिळतं. निसर्गावर हुकुमत चालत नाही आपली, त्याला आपण ताब्यात ठेवू शकत नाही. त्याच्या लहारीपुढे आपल्याला नमतं घ्यावं लागतं नेहमी - आणि तरीही त्याचा राग मात्र येत नाही. त्याच्यातून पोषण मिळतं, मदत मिळते, आनंद मिळतो. अतिशय जवळ आणि तरीही अतिशय दूर ...
म्हणूनच हवापाण्याबद्दल, तापमानाबद्दल मी क्वचितच तक्रार करते. त्यामुळे आता जितक्या उत्साहाने मी थंडीबद्दल बोलतेय तितक्याच उत्साहाने उन्हाच्या झळा किंवा बेफाम पाऊस यांच्याबद्दल बोलले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
असो. हे विषयांतर झालं.
मन कितीही चिरतरुण असल्याचा दावा करत असलं, तरी शरीर मनाला बरोबर जमिनीवर आणतं. आत्ताही माझ्या लक्षात आलं की वाढतं वय लक्षात न घेता मी दिल्लीच्या थंडीत रस्त्यावर आले होते आणि त्यामुळे मी खरंच कुडकुडत होते. मला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी काहीतरी घेणं आवश्यक होतं याची मला त्या क्षणी जाणीव झाली.
"ठीक आहे, कोणती कानटोपी उपयोगी आहे मला? दाखवा बरं..." मी म्हणाले.
त्याने मला चार पाच प्रकार दाखवले. मला खरेदीतलं शून्य कळतं. त्यामुळे मी त्यालाच निवडायला सांगितली टोपी. ती घेतली. मग तो मुलगा म्हणाला, "मोजे पण आहेत माझ्याकडं." मी तेही घेतले दोन जोड.
"किती पैसे झाले?" मी विचारलं.
त्याने हिशोब केला आणि सांगितलं, "एकशे तीस रुपये."
मी त्याला एक शंभरची आणि एक पन्नासची अशा दोन नोटा दिल्या.
त्याने मला दहा रुपयांच्या तीन नोटा परत केल्या.
"तुम्ही मला फक्त वीस परत द्यायचेत. दहा जास्त दिलेत तुम्ही," असं म्हणत मी दहाची नोट त्याला द्यायला लागले.
आश्चर्य म्हणजे त्याने ती नोट घेतली नाही.
याचा बिचा-याचा हिशोबात गोंधळ झालेला दिसतोय असं मी स्वत:शीच म्हणत होते तोवर त्याच्या चेह-याकडं पाहून मी थबकले.
तो मिस्कीलपणे हसत होता.
तो म्हणाला, "हिसाब ठीक है, बहनजी,"
मग मला समजावून सांगत म्हणाला, " कुठलचं गि-हाईक घासाघीस केल्याविना पैसे देतच नाही. त्यामुळे नेहमी मी सांगितलेल्या पैशांपेक्षा दहावीस रुपये कमीच मिळतात मला. पण तुम्ही काही पैसे कमी करून मागितले नाहीत. तुमच्यासारखं गि-हाईक काय रोज भेटत नाही. म्हणून माझे मीच दहा रुपये कमी केले - तुम्ही न मागताही."
मला त्या तरुणाचं आश्चर्य वाटलं.
मीही देते - न मागता देते - ते फक्त ओळखीच्या लोकांना.
अनोळखी लोकांनाही देते अनेकदा - पण ते त्यांनी मागितलं तरच.
अनोळखी लोकांना, त्यांनी न मागता काही देणं - ही गोष्ट माझ्या हातून क्वचितच घडते.
मला त्या तरुणाचं कौतुक वाटलं.
मी त्याची थोडी गंमत करायचं ठरवलं.
मी त्याला विचारलं, "जर मी घासाघीस केली असती, तर मला किती पैसे कमी द्यावे लागले असते?"
त्याने एकदम चिंतेत पडून माझ्याकडं पाहिलं. आता त्याच्या कपाळावर एक आठी उगवली होती. त्याच्या चेह-यावर मघापासून असलेलं हसू गायब झालं. त्याने डोळे बारीक करत माझ्याकडं 'आता काय' अशा नजरेनं पाहिलं.
मी म्हटलं, "काळजी करू नकोस. मी काही तुला पैसे परत मागणार नाही आणखी. तू दहा रुपयाची सूट दिलीस मला आपणहोऊन त्यातच मी खूष आहे. मी आपलं सहज कुतूहल म्हणून विचारतेय. कदाचित पुढच्या वेळी खरेदी करताना मला या माहितीचा उपयोग होईल."
त्याचा काही माझ्यावर विश्वास बसला नाही. पण त्याने बहुधा थोडा धोका पत्करायचा ठरवलं. माझी नजर चुकवत, खाली मान घालून तो म्हणाला, "शंभर रुपये."
आणि मग आता त्याला मी वीस रुपये परत मागणार अशा शंकेने त्याने माझ्याकडं पाहिलं.
मी हसले आणि पुढं निघाले.
एक तरुण माणूस, जो गरीब आहे, तो माझ्यासारख्या अनोळखी व्यक्तीसाठी, मी मागितलेले नसतानाही, जाणीवपूर्वक दहा रुपये सोडू शकतो.
मध्यमवयीन आणि मध्यमवर्गीय मी, एका अनोळखी माणसासाठी, त्याने थेट न मागितलेले वीस रुपये सोडून देण्यात मला कसली आलीय अडचण?
त्या तरुण माणसाचं स्मितहास्य, न मागितलेली सूट देताना त्याने दिलेलं सुखद आश्चर्य, त्याचा खरेपणा, त्याचा भाबडेपणा .... त्यातली गंमत आणि त्यातला आनंद ....
वीस रुपयांत एवढा मौल्यवान आणि आनंददायी अनुभव एरवी कुठं मिळाला असता मला?
म्हणजे त्या दृष्टीने पाहता हा सौदा चांगला पडला म्हणायचा मला.
तुम्हाला काय वाटतं?
**
वेगळाच अनुभव...........मला १०० रु मध्ये intrest नाही पण मला कोणीतरी फसवतंय ह्याचा फार त्रास होतो...........पण अनुभव मस्तच
ReplyDeleteApart from this............निसर्ग जसा असतो तसा मला आवडतो.. ही एक अशी गोष्ट आहे की जी तुमच्यापासून अलिप्त असते आणि तरी तिच्यामुळे तुम्हाला अपरंपार सुख मिळतं.
अश्लेषा, फसवलं जाणं कुणालाच आवडत नाही - विक्रेत्यालाही :-)
Deletechan.
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteघासाघीस करून वीस रुपये वाचविण्यासाठी तेवढ्या किमतीचे रक्त जाळणे शहाणपणाचे ठरते असे मला वाटत नाही.
ReplyDeleteअनामिक/का, घासाघीस करणं ही(ही) अखेर एक कला आहे. काही लोक रक्त न जाळता विक्रेत्याने प्रथम सांगितलेल्या निम्म्या भावात वस्तू घेताना मी पाहिलं आहे :-)
Deleteएक चांगला अनुभव लिहिला आहे तुम्ही! आजकाल असे प्रामाणिक तरुण आहेत म्हणायचं!
ReplyDeleteमानसीजी, असतात हो प्रामाणिक माणसं भरपूर, आपल्याला ती भेटायला लागतात इतकंच!
Deleteहो तर! एकदम फायद्यात आहे तुझा सौदा!
ReplyDeleteहे अगदी असं भाजी घेताना खूपदा होतं माझं. माझा अवतार बघून भाजीवाल्यांना वाटत नाही कि मला भाव महिती असतील.
अगदीच अवाच्यासवा नसेल तर मी निमूट पैसे देते बरेचदा.... माझे पाचपन्नास अधिक गेले तर फार नुकसान होत नाही. पण तेच अधिक मिळाले तर त्यांना अधिक आनंद होत असू शकतो!
अन हीच घासाघीस मी मोठ्या चकाचक दुकानात कित्तीही फसवणूक झाली तरी नाही करू शकत ना! मग रस्त्यावर का ऐट दाखवायची?!
अनुज्ञा, हो 'फिक्स्ड रेट' अशी पाटी असते तेव्हा आपण काय करतो? तेच रस्त्यावरच्या विक्रेत्यांसोबतही करावं. फार फार तर दहा-वीस रुपयांचा फरक पडतो. त्यांनी ती कमाई उपयोगी पडते. शिवाय इथं दिसलं तसं असे विक्रेते आपली जास्त लूट करत नाहीत.
Deleteपोस्ट आवडली... मलाही खरेदी करताना आजीबात घासाघीस करता येत नाही. आणि अति-घासाघीस करणाऱ्या व्यक्ती "तुला फसवलं" म्हणतात, खरेदी करताना कधीकधी माझ्यासमोर जग जिंकल्याच्या अविर्भावात असतात. पण कुठे ५ कुठे १० रुपये वाचवल्याने किती बचत झालेली असते त्यांचं तेच जाणे....
ReplyDeleteपण इथून पुढे मी फसवली गेले यापेक्षा त्या व्यक्तीला आनंद मिळाला हे मी जास्त लक्षात ठेवेन.... :)
इंद्रधनू, मी वरती म्हटलं आहे तसं 'घासाघीस करणे ही एक कला आहे'. पण तिच्याविना आपल्यासारख्यांच काहीही बिघडत नाही. दहा रुपये आपण सुदैवाने सहज खर्च करू शकतो - त्यांची कुणालातरी फार गरज असते - आपल्यापेक्षा जास्त.
Deleteसविता, तुझेमाझे विचार जुळतात. त्याच्या चेहर्यावरच्या आनंदाची, तुमच्यातल्या सहजतेची आणि त्याने त्याचा वैयक्तिक स्वार्थ आहे म्हणून तरी केलेल्या तुझ्या काळजीपोटी तुझे थंडीपासून केलेले संरक्षण हे महत्वाचे.
ReplyDeleteअगदी खरे, अनोळखी व्यक्तीसाठी तिने न मागता आपण ओळखून काही देऊ करणे... हे किती जण करतात. हा भावच आनंद देऊन जातो. बाकी रोजचे आहेच की... :)
हो, बाकी रोजचं सुसह्य होतं ते अशा काही क्षणांमुळेच!
Deleteखूपच छान आहे अनुभव. :) अशा छोट्या गोष्टीतून माणुसकी दिसली की किती आनंद होतो. मीही अशा वेळी विचार करते मी घेतलेली वस्तू मी देत असलेल्या भावात घेणं मला परवडतं ना? मग कशाला घासाघीस? पण काय माहित हे रिक्षावाल्या बरोबर नाही होत माझं. त्यांच्यावर माझा जरा विशेष राग आहे बहुतेक. :)
ReplyDeleteअसो. छान पोस्ट. आणि ते निसर्गाबद्दल लिहिलेलं ही आवडलं.
-विद्या.
आभार विद्याजी.
Deleteरिक्षावाले!! तेही काही असतात हो असे चांगले!! :-)
खूप आवडला लेख ,आणि विचारसुध्दा. आपण घासाघीस नेहमी अशा किरकोळ विक्रेत्यांकडे करतो, भाजीवाल्यांकडे करतो. मोठमोठ्या दुकानांत निमूट्पणे छापील किमती मोजतो. "वीस रुपयांत एवढा मौल्यवान आणि आनंददायी अनुभव एरवी कुठं मिळाला असता मला?" हे सर्वात आवडलं ! थोड्याशा आर्थिक फायद्यापुढे हे असले मौलिक आनंद आपण गमावतो हे शिकले पाहिजे
ReplyDeleteशुभांगीजी, आभार. घासाघीस सोडली की जास्त मिळतं असा माझा अनुभव आहे.
ReplyDeleteमस्त पोस्ट. खरंय घासाघीस न करता मिळालेल्या सवलतीचं मानसिक मोल खूप जास्त असतं. फ़क्त हा आनंद मिळवायला आपण जरा शिकलं पाहिजे नाही का :)
ReplyDeleteअपर्णा, असे क्षण "आनंद मिळवण्याची" गरज आणि उपलब्ध असणा-या (अगणित) संधी अधोरेखित करतात!
DeleteChanach lihilas ..
ReplyDeleteMalahi ashi ghasaghis karayla nahi avdt pn Mumbait alyapasun samor kon aahe he pahun mi ghasaghis karaychi ki nahi te tharvte.
Maza ek anubhav sangava vatato,
ekda mi Iron ghenyasathi gele hote, 740 ka asech kahitari paise zale, Mi dya mhanalyavr tyane pavti banvayla ghetli. warenty card pn bharaych hot.
Tyane Iron ch purn nav lihil, mi pahil tr tyach akshar khupach sundar hot. mi sahaj mhanale "kay chan akshar aahe"
tyala bharich vatal.. maybe kuni comment dili nasen tyala
ani cost chya rakanyat tyane kimmat takli 700 rs only.
Chanach lihilas ..
ReplyDeleteMalahi ashi ghasaghis karayla nahi avdt pn Mumbait alyapasun samor kon aahe he pahun mi ghasaghis karaychi ki nahi te tharvte.
Maza ek anubhav sangava vatato,
ekda mi Iron ghenyasathi gele hote, 740 ka asech kahitari paise zale, Mi dya mhanalyavr tyane pavti banvayla ghetli. warenty card pn bharaych hot.
Tyane Iron ch purn nav lihil, mi pahil tr tyach akshar khupach sundar hot. mi sahaj mhanale "kay chan akshar aahe"
tyala bharich vatal.. maybe kuni comment dili nasen tyala
ani cost chya rakanyat tyane kimmat takli 700 rs only.