ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Wednesday, August 31, 2011

८७. रामलीला मैदानावर


वर्ष: १९८७. ठिकाण: राळेगण सिद्धी. अण्णा हजारे तेव्हाही प्रसिद्ध होते, पण आजच्यासारखे प्रसारमाध्यमांच्या गराड्यात नव्हते. त्या वर्षी मला अण्णांना अनेकदा भेटायची संधी मिळाली होती. आम्ही आठ दिवसांच एक युवक शिबीर राळेगणमध्ये घेऊ इच्छित होतो. त्याच्या परवानगीसाठी, पूर्वतयारीसाठी आणि प्रत्यक्ष शिबिरात अण्णांना मी अनेकदा भेटले, त्यांच्याशी बोलले. शिबिराच्या काळात आठही दिवस अण्णा राळेगणमध्ये होते; रोज एक तास ते आमच्या युवकांशी बोलायचे. एरवीही ते आमच्या आसपास, हाकेच्या अंतरावर असायचे. कधीही त्यांच्याकडे गेले तर ते बोलायचे. त्यांच बोलण सौम्य, मृदू, कधीही आवाज चढला नाही की कधी कपाळावर आठी उमटली नाही. शांतपणे समजून घेऊन बोलायची त्यांची पद्धत होती तेव्हा. मी खूप केलय, मला सगळ कळतंय असा त्यांचा अविर्भाव अजिबात नव्हता. पण हा माणूस विरोधाला नमणार नाही, संकटाला घाबरणार नाही अशी साक्षही मिळत होती त्यांच्याशी होणा-या संभाषणातून. 
  
ते आठ दिवस राळेगणमध्ये आम्ही लाडक्या पाहुण्यांसारखे राहिलो. तसं पाहिलं तर अण्णांच्या समोर आम्ही तेव्हा नगण्य होतो – धडपडणारे युवक यापलीकडे आमच काही कर्तृत्व नव्हत. पण अण्णांनी आमची खूप काळजी घेतली. त्यांच्या साधेपणाने, त्याच्या त्यागाने, त्यांच्या मृदू स्वभावाने त्यांनी आमच्या शिबिरातल्या सगळ्यांची मन जिंकून घेतली. मी तशी कोणाच्या पाया वगैरे कधी पडत नाही. पण राळेगणमधून निघताना मी अण्णांना वाकून नमस्कार केला होता हे आजही मला आठवत.
*****
वर्ष २०११. ठिकाण: दिल्ली. रविवार, २८ ऑगस्टची सकाळ. सगळ्या देशाच लक्ष आज इथ असण स्वाभाविक होत. अण्णा हजारे सकाळी दहा वाजता उपोषण सोडणार हे प्रसारमाध्यमांनी आधीच जाहीर केल होत. गर्दी असणार भरपूर हा अंदाज येणा-या लोकांनाही होता – आणि बसायला पुढे जागा मिळावी म्हणून लोक लवकर आले होते. मागच्या शनिवारी मी इथे येउन गेले होते – त्यावेळची रांग लक्षात घेऊन मीही आज लवकर आले होते. 

नवी दिल्ली मेट्रो स्थानकावर फारशी गर्दी नव्हती – म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा कमीच होती. बहुतेक सगळे बाहेर गावाहून आलेले प्रवासी होते. स्थानकाच्या बाहेर कमला मार्केटच्या परिसरात बसेस उभ्या होत्या, हातात अवजड सामान घेतलेले नवखे प्रवासी नेमकी कोणती बस पकडायची या चिंतेत होते. कोणत्याही रेल्वे स्थानकाबाहेर रोज जे दृश्य दिसत, त्यापेक्षा वेगळ इथे काहीही नव्हत. मी चुकून दुस-याच ठिकाणी तर नाही ना उतरले अशी माझ्या मनात आलेली शंका क्षणभरात विरून गेली कारण तिरंगा आणि ‘मी अण्णा आहे’ अस इंग्रजी-हिंदीत लिहिलेल्या टोप्यांची विक्री करणारे लोक, मुख्यत्वे लहान मुल आणि स्त्रिया लगेचच समोर आल्या. आज आंदोलनाचा शेवटचा दिवस आहे हे त्यांना माहिती होत अस दिसलं – कारण आज मिळेल त्या भावात हातातला माल विकून मोकळ व्हायची त्यांची लगबग दिसत होती. रस्त्यावर सामोसे आणि इतर खादय पदार्थही विकले जात होते. जर आंदोलनाचा मुद्दा एखाद्याला माहिती नसेल तर एकंदर वातावरण एखादया राजकीय सभेच वाटलं असत! 

मागच्या शनिवारी मला बराच वेळ रांगेत उभ राहायला लागल होत. म्हणून रविवारचा दिवस असूनही मी लवकर इकडे आले होते. यावेळी रांग फार मोठी नव्हती – मी पाच मिनिटांतच रामलीला मैदानावर पोचले, पावसाने निम्म मैदान अजून चिखलात होत; त्यामुळे ‘मुंगीला शिरायलाही जागा नसण्याइतकी गर्दी असल्याची’ वृत्तपत्रांची बातमी दुस-या दिवशी वाचून मला हसायला आलं. माध्यम किती अतिशयोक्ती करतात – चांगली आणि वाईटही हे अशा प्रसंगीच माझ्यासारख्या सामान्य माणसांच्या लक्षात येत.

रामलीला मैदान अर्थात प्रचंड मोठ आहे. त्यामुळे अर्ध्या भरलेल्या मैदानात सकाळी आठ वाजताच त्यादिवशी हजारोंची गर्दी होती. मी आपली गर्दीच्या एका भागात स्वत:साठी जागा करून घेत होते, तेवढयात ‘स्त्रियांसाठी वेगळी व्यवस्था असल्याच’ मला सांगण्यात आलं. धक्के कमी खावे लागतील या अपेक्षेने मी तिकडे गेले खरी पण अण्णा दिसल्यावर गर्दी त्यांना बघायला जागा सोडून उन्मादाने उभी राहिली तेव्हा स्त्रियांच्यासाठी केलेल्या व्यवस्थेभोवतीचे बांबू कोसळून पडले आणि गर्दीत पुरुषांचे धक्के खाण काही चुकल नाही. पण ही अर्थातच पुढची गोष्ट झाली.

सभास्थानीच वातावरण एकदम भावूक होत. जिकडे तिकडे तिरंगा लहरत होता, देशभक्तीपर गाणी होती, घोषणा होत्या. स्त्रिया बसल्या होत्या त्या भागातही घोषणा चालू होत्या. कोणी उभ राहिलं की, स्वयंसेवक ताबडतोब येऊन ‘बसून घ्यायला’ सांगत होते. सगळ कस बराच काळ शिस्तीत चालल होत. बसायची सवय आता लोकांना फारशी राहिली नसल्याने, नऊच्या आसपास चुळबूळ सुरु झाली. तेवढयात टी.व्ही. कॅमेरे इकडे वळले आणि एवढा वेळ शिस्तीत बसलेली जनता उधळली. दोन मिनिटांच्या प्रसिद्धीची लोकांना किती हाव असते, त्याच एक विलक्षण दर्शन त्या तासाभरात मला झालं. वय विसरून स्त्रिया धावत होत्या (याचा अर्थ फक्त स्त्रिया अस वागत होत्या असा मात्र नाही, पुरुषांच्या बाबतीतही हेच घडत असणार, मी ते त्यावेळी पाहिलं नाही इतकच!), देशभक्तीपर गाण्यांच्या तालावर नाचत होत्या. पुढे बसलेल्या गर्दीला ढकलत मागून पुढे येत कॅमेरासमोर जाण्याची अहमहिका शिसारी आणणारी होती. तीच अवस्था पिण्याच्या पाण्याचे पाउच (अर्थातच फुकट) मिळवण्यासाठी झाली. प्रसंग कोणताही असो, लोकांचा स्वार्थ काही सुटत नाही हे पुन्हा एकदा लक्षात आलं!  गर्दीच्या वेडेपणाची ही केवळ सुरुवात होती.

अण्णा आल्यावर ती सगळी गर्दी एकदम पुढे झेपावली. सगळा गोंधळ माजला. संसदेला ‘जन संसद’ पुरून उरेल याची ग्वाही मला पुन्हा एकदा त्या सकाळी मिळाली. ‘इतक्या लांबून काही नीट दिसणार नाही, सगळे बसले तर सगळ्यांना व्यासपीठ नीट दिसेल’ अस सांगता सांगता आमचा काही जणींचा घसा सुकून गेला. पण इथ अगदी भारतीय मनोवृत्तीच दर्शन झालं – ती खाली बसत नाही तर मी तरी का बसू? – असा प्रत्येकीचा प्रश्न होता. नियम पालनाची, स्वयंशिस्तीची सुरुवात स्वत:पासून करायला हवी, इतर कोणी नियम पाळत नसेल तेव्हाही स्वत:चे जीवनमूल्य म्हणून काही गोष्टी पाळायला हव्यात हे कोणाच्या गावीही नव्हते. लोकपाल आला तरी ‘इतर भ्रष्टाचार करतात, मग मीच का नुकसान करून घेऊ माझ पैसे न देऊन?” असा प्रश्न विचारणारे लोक तरीही संख्येने अगणित असतील हे लक्षात येऊन मला फार निराश वाटलं.

श्री. अरविंद केजरीवाल यांच्या भाषणाची सुरुवात ‘आभार प्रदर्शनाने’ झाली. गेल्या काही महिन्यांत त्यांच्याबद्दल बरच काही वाचलं होत आणि म्हणून मी त्यांना ऐकायला उत्सुक होते. पण माझा पूर्ण भ्रमनिरास झाला. म्हणजे ‘प्रसारमाध्यमांचे आभार’ मला आवडले नाहीत तरी मी समजू शकते. पण ‘अनेक दिल्ली पोलिस दिवसभर गणवेषात काम करत आणि संध्याकाळी गणवेष उतरवून आंदोलनात सामील होत’ हे तिथ सांगणारे केजरीवाल मला तरी प्रगल्भ वाटले नाहीत. आता बिचा-ऱ्या त्या पोलीसांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागू नये म्हणजे झालं!

आणखी एक गोष्ट म्हणजे अण्णांसोबत उपोषणाला बसलेले तीस लोक कुणाच्याच खिजगणतीत नव्हते. त्यांच नाव घेऊन त्यांच कौतुक करण तर दूरच, त्यांचा उल्लेखही सगळ्यात शेवटी घाईघाईने (बहुधा कोणीतरी लक्षात आणून दिल्यावर) केजरीवालांनी केला तेही खटकल. अनाम वीरांना जनता ‘नंतर’ विसरते अस नाही तर त्यांच्या जीवनकाळातही विसरते हेच दिसलं तिथ! शिवाय ‘आम्ही काही सगळे राजकीय नेते वाईट आहेत अस म्हटल नव्हत कधी’ अशी सफाई द्यायची काय गरज होती? विशेषत: आदल्या संध्याकाळी सरकारच्या ज्या प्रतिनिधींबरोबर व्यासपीठावर सगळे उभे होते, त्यातून अण्णांच्या     सहका-यांच मतपरिवर्तन जगजाहीर झालं होतच की!

केजरीवालांनी ‘संध्याकाळी इंडिया गेटवर विजय साजरा करायला जमा’ सांगितलं ते मला विनोदी वाटलं. कसला आणि कोणाचा विजय झाला होता? मला तर वाटत की रोजच्या सवयीने केजरीवालांनी ती घोषणा केली असेल. अन्यथा दिल्लीच्या वर्तुळात वावरणा-या केजरीवाल आणि किरण बेदी यांना मागच्या चार पाच दिवसांतल्या घटनांचा अर्थ समजला नसेल अस मानण म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेबाबत शंका घेण्यासारखच आहे!

तिथ जमलेल्या लोकांमध्ये ‘अण्णांनी उपोषण सोडलं एकदाच, बर झालं’ अशीच भावना जास्त होती. चेंगराचेंगरी होताना स्त्री पुरुषांच्या गर्दीतले संवाद केजरीवाल आणि सहका-यांनी अवश्य ऐकायला हवे होते. नंतर बाहेर पडतानाही “अण्णांनी उपोषण सोडल ते बर केलं, उगाच या म्हाता-या माणसाला मारलं असत यांनी’ अस लोक म्हणत होते आणि सहमतीचे सूर उमटत होते. एकजण म्हणाला, “अण्णा हुशार आहेत. जन लोकपाल पास होवो अथवा न होवो, आपल्यासारख्या फालतू लोकांसाठी जीव गमावण्यात शहाणपण नाही हे त्यांना एकदाच लक्षात आलं ते चांगल झालं!” भ्रष्टाचार, जन लोकपाल हे मुद्दे मागे पडून अण्णांची तब्येत हाच मुद्दा होता. अण्णा इतक्या खणखणीत आवाजात बोलत होते याबद्दल अनेकांना आनंद वाटत होता पण आश्चर्यही वाटत होत!

अण्णा उपोषण सोडताना व्यासपीठावर दोन लहान मुली होत्या त्यांच्या सोबत – सिमरन आणि इकरा. सिमरन दलित आहे आणि इकरा तुर्कमान गेट परिसरात राहते (म्हणजे मुस्लिम आहे) हे केजरीवालांनी प्रसारमाध्यमांच लक्ष वेधून घेत अधोरेखित केल. सात वर्षाच्या मुलींचा असा वापर पूर्ण अयोग्य वाटला मला. भ्रष्टाचार म्हणजे काय, संसद म्हणजे काय, लोकपाल म्हणजे काय .. हे सगळ कळण्याच त्यांच वय नाही. ती आत्ता त्यांची जबाबदारीही नाही. केवळ राजकीय नेते अशी ‘सहभागाची’ नाटकं करतात अस माझ आजवर मत होत! जात आणि धर्म यांच्या नावावर माणसांना ओळखण्याच, त्यांना स्थान देण्याच आपण टाळू शकलो नसतो का या आंदोलनात? दलित समाज बाबासाहेब आंबेडकरांच नाव घेतलं की खूष होतो अस समजण म्हणजे आंबेडकर केवळ दलितांचे आहेत असा संदेश देण आणि दलितांना मूर्ख समजण! ‘आम्ही लाच देणार नाही आणि घेणार नाही’ ही सार्वजनिक शपथ इतकी निर्जीव होती, की ती कोणाच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल तर तो चमत्कार मानावा लागेल या शतकातला! एकदा लोकानुनय करायचा म्हणला की कशी तडजोड करतात माणस याचा उत्तम नमुना मला रामलीला मैदानावर त्या सकाळी पहायला मिळाला.

गर्दी इतकी अनावर होती की ती ना स्वयंसेवकांच्या ताब्यात होती ना केजरीवालांच्या नियंत्रणात होती! “तुम्ही आता शांत बसला नाहीत तर अण्णा उपोषण सोडणार नाहीत, इतके दिवस केल तसं आणखी काही तास ते उपोषण करू शकतात’ ही केजरीवालांची धमकी त्यांची हतबलता दाखवणारी होती. तिथ आलेले ‘समर्थक’ कसे होते याची झलक दाखवणार वाक्य होत ते! या गडबडीत अण्णांनी उपोषण कधी सोडलं ते अनेकांना कळलच नाही. अण्णांच भाषण संपल तरी ‘ते कधी सोडणार उपोषण?’ अशी चौकशी लोक करत होते.

अण्णा काय बोलले ते आधीच पेपरमध्ये येऊन गेलय – त्यामुळे त्याबद्दल काही लिहीत नाही मी. अण्णांच भाषण चालू असताना गर्दीचा एक लोंढा मंडपाच्या बाहेर पडत होता आणि नवा लोंढा आत येत होता.  जाणारा लोंढा ‘अण्णा की रसोई” आणि ‘अण्णा की मुफ्त चाय’ या दोन ठिकाणी रांगेत उभ राहत होता. उपोषण करणा-या लोकांच्या समर्थकांसाठी फुकट खाण आणि चहा वाटण्याच  काय प्रयोजन होत हे समजण माझ्या अल्प मतीच्या पल्याड होत! या समर्थकांना आंदोलनाच्या पुढच्या दिशेत, कार्यक्रमात काही गम्य नव्हत! चेंगराचेंगरीत बाजूला होत होत मीही तोवर मंडपाच्या शेवटच्या टोकाला येऊन पोचले होते. येणारी गर्दी घोषणा देत होती आणि जाणारी गर्दी त्यांना प्रतिसाद देत होती; अण्णा काय बोलत होते त्याकडे फारसं कोणाचं लक्ष नव्हत. मला मात्र अण्णांनी एकदाही ‘वंदे मातरम’ म्हटलं नाही त्यांच्या पंचवीस मिनिटांच्या भाषणात हे जाणवलं.

‘जंतर मंतर’ आंदोलनाच्या काळात एका संध्याकाळी ‘वंदे मातरम’ म्हणणारा मुस्लिम तरुणांचा एक गट मला भेटला होता, मी त्यांच्याशी या विषयावर बोललेही होते. “हम भी तो इस मिटटीसे पले हुये है” हे त्यांचे भावूक आणि हृदयातून आलेले उद्गार आजही मला आठवतात. अशा सगळ्या तरुणांना – मग ते हिंदू असोत की मुसलमान – आपण पुन्हा एकदा धर्ममार्तन्डाच्या ताब्यात देणार आहोत का? – अशी मला शंका येते. युवकांची जागृती वगैरे सगळ सुरुवातीलाच संपून जाईल अशा आपल्या वागण्याने.
******
राळेगणमध्ये पंचवीस वर्षांपूर्वी मला भेटलेले आणि कळलेले अण्णा बदलले आहेत का असा प्रश्न माझ्या मनात वारंवार येत राहिला. म्हणजे एका बाजूने अण्णा तसेच आहेत – साधे, सौम्य बोलणारे, निश्चयी, सरळ, काहीसे भोळेभाबडे, दुस-यांसाठी त्याग करणारे, विरोधाला न नमणारे. त्यांच्या या गुणांवर तर देशातले इतके लोक फिदा झाले. कधी नाही ते निस्वार्थी नेतृत्व लाभलेय अशी अनेकांची भावना झाली – ज्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे.

पण इथे व्यासपीठावर बसलेले, कॅमेऱ्याच्या गराड्यात लोकांपासून दूर असलेले अण्णा वेगळे वाटत होते. ‘मी अण्णा आहे’ हे छापलेले स्वीकारणारे; स्वत:चा चेहरा तिरंग्याच्या मध्यभागी टी शर्टवर छापायला परवानगी देणारे; स्वत:वर रचलेल गाण रामलीला मैदानावर इतरजण गाताना विनातक्रार ऐकणारे; ज्यांच्याबद्दल भ्रष्टाचाराची तक्रार आहे अशा लोकांबरोबर व्यासपीठावर उभे राहणारे (भले मग ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून तिथे असोत!); उपोषण करणा-या सहका-यांना विसरणारे: एके काळी विवेकानन्दाबद्दल भरभरून बोलणारे पण आता ‘युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती’ आहे अस म्हणताना विवेकानन्दान्चा साधा उल्लेखही न करणारे; हे अण्णा तेच आहेत का असा मला संभ्रम पडला. हजारोंच्या, लाखोंच्या गर्दीत मला अण्णा एकदम परके, अनोळखी वाटले. माझ्या बाजूने त्यांच्याशी माझ जे नात होत, मी जे आजवर जपल होत  – ते एकदम तुटून गेल्यासारख वाटलं मला त्या क्षणी! 

परत एकदा राळेगणमध्ये जाऊन अण्णांना भेटायला हव. माझ्या या असल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर १९८७ मध्ये  देत होते, तशीच  पुन्हा एकदा अण्णा हसत, शांतपणे, विचारपूर्वक देतील अशी मला आशा आहे. निदान त्यापूर्वी मी त्यांच्याबद्दलच माझ मत बदलण्याची घाई करू नये. माणसाच मूळ जिथं रुजलेल असत, तिथ तो माणूस खराखुरा कळतो. तिथच त्या माणसाला शोधायला हव – रामलीला मैदानावरची गर्दी ही काही योग्य जागा आणि वेळ नाही त्यांना समजून घेण्याची!


या विषयावरच्या आणखी काही पोस्ट्स : मतभिन्नतेतून, जंतर मंतरलेल्या संध्याकाळी 

32 comments:

 1. ह्म्म्म... माणसं कुठून कुठे जातात नाही... काही वळणं चांगली तर काही संभ्रमात टाकणारी... आपल्या मनात आपण पहिल्या अनुभवाच्या बळावर एक प्रतिमा तयार करतो... पण सतत बदलत जाणार्‍या काळाबरोबर प्रत्येकजण बदलत जाणारच ( कधी चांगल्या रितीने कधी.. ) हे माहीत असूनही प्रतिमेलाच चिकटून राहतो... :(

  किती विविध मनोवृत्तीची झलक दिसली नं तुला या काही दिवसात..

  ReplyDelete
 2. गर्दी जमली म्हणजे माणसं हरवून जातात, नाही का?

  ReplyDelete
 3. गर्दी, प्रसिद्धी, पैसा काहीही करू शकतो का असा प्रश्न पडतो ...
  अजून तरी आण्णा आपलेच आहेत असे मला तरी वाटतंय ..
  बघू. काळच ठरवेल !!

  ReplyDelete
 4. भाग्यश्री, माणसं बदलतात, परिस्थिती बदलते आणि आपणही बदलतो .... म्हणून एक फायदा नक्की होतो - सगळ्याबद्दल सारख कुतुहल वाटत राहत आणि शक्यतो चांगल घडेल असा आशावादही जागा राहतो!

  ReplyDelete
 5. गौरी, गर्दीत बहुतेक मी पण हरवून गेले होते त्या दिवशी, अन्यथा इतका नकारात्मक विचार मी कधी करत नाही!

  ReplyDelete
 6. BinaryBandya, अण्णा अजूनही 'आपले' आहेत अस मलाही वाटतंय. एकदा त्यांना कळल काय होतंय सभोवताली (उपोषणाच्या काळात ते शक्य नसण स्वाभाविक आहे) की गोष्टी सुधारतील अशी मलाही आशा आहे.

  ReplyDelete
 7. वटवृक्ष कधी काळी
  गृहस्थाश्रमात असतो ,
  आजूबाजूच्या घटनांमध्ये लक्ष घालत
  मोठा होत असतो ;
  मग एक वेळ अशी येते
  कि वानप्रस्थाश्रमात
  त्याच्या पाराम्ब्यांवर
  अनेक लोम्ब्काळतात ,
  चढायचा प्रयत्न करतात ;
  वटवृक्ष आपल्या जागी
  आपल्याच विचारात
  आपल्या जागी आढळ असतो .
  कोणे कसा लोम्ब्काळतोय
  ह्या कडे लक्ष द्यायचं नसतं.
  पडणारा पडतोच.

  ReplyDelete
 8. सुरंगाताई, मला पण अशी आशा आहे :-)

  ReplyDelete
 9. प्रसारमाध्यमाबाबत काहीच न बोललेलं बरं...हे सगळं लिहिल्याबद्दल तुमचे आभार मानले पाहिजेत...
  बऱ्याच गोष्टी न आवडण्यासारख्याच आहेत..म्हणजे लहान मुलींचा राजकारणी वापर आणि एकंदरीत श्रेय लाटण्याची वृत्ती शेवटी राजकारणी ही एक जात आहे नाही..आणि आपल्याकडचे सगळे राजकारणी एकाच माळेचे मणी..केजरीवाल त्यातलेच असणार नाही?

  ReplyDelete
 10. >> संसदेला ‘जन संसद’ पुरून उरेल याची ग्वाही मला पुन्हा एकदा त्या सकाळी मिळाली.

  एकदम परफेक्ट होतं हे..

  अण्णांनी उपोषणं सोडलं ते आज तक वर ऑनलाईन बघत होतो मी. जवळपास सगळे खटकलेले मुद्दे तुम्ही मांडले आहेत.

  त्या दोन मुलींच्या दलित आणि मुस्लीम असण्याचे उल्लेख आवर्जून आणि वारंवार वारंवार वारंवार होणं आणि ते अण्णांवरचं गाणं हे दोन्ही प्रकार मला विशेषच खटकले होते !!

  ReplyDelete
 11. अगदी अगदी! मलाही कसेतरीच वाटले. प्रत्येक गोष्टीचे भांडवल करायलाच हवे का? मुळात ते करण्यासाठीच हा सगळा खेळ अण्णांच्या भोवती मांडलेला. :(:(

  ReplyDelete
 12. अपर्णाजी, स्वागत आहे 'अब्द शब्द' वर तुमच. केजरीवाल त्यातलेच आहेत की वेगळे आहेत हे लवकरच कळेल आता. मला वाटलं तितक वाईट काही नसाव अशी मी आशा करते :-)

  ReplyDelete
 13. हेरंब, ऑनलाईन बघण्यात काही गोष्टी कळतात पण त्या कॅमेऱ्याच्या चष्म्यातून! गर्दीत सहभागी होताना त्याच बाबी समोर येत असल्या तरी पुष्कळ गोष्टी नव्याने कळतात हा एक फायदा असतोच.

  ReplyDelete
 14. नेहमीप्रमाणे विचार करायला लावणारण पोस्ट आहे!

  लोक अन लोकप्रतिनिधी यांत फरसा फरक नसतोच कधी. लोक जितके बेशिस्त तितकेच बेशिस्त त्यांतून पुढे आलेले पुढारी असणार. खरोखर लोकांच्या पुढे असणारा, मनाने, बुद्धीने अन आचाराने पुढे असणारा सर्वगुणसंपन्न! नेता सापडणं अवघडच असतं.
  अण्णांमधे कदाचित सगळे हेच शोधू पाहत आहेत....त्यांच्या प्रत्येक कृतीकडे अख्खा देश आशाळभूत डोळे लावून बसला आहे!

  तुला ज्या ज्या गोष्टी खटकल्या त्या सगळेच साशंकतेनें पाहतोय आपण...आणि अण्णांच्या मौनाचा आपण आपल्या परीने अर्थ लावत आहोत. त्यांच्या या सगळ्या लढाईचा मुख्य मुद्दाच वेगळा होता. त्यांचं संपूर्ण लक्ष एका मुद्द्यावर एकवटलं होतं. अशा वेळी सगळ्याच आघाड्यांवर विरोध नोंदवत बसल्यास एका शहाण्या माणसाची ताकद वाटली जाते. मला अण्णांच संयत मौन अधिक हुशारीचं, अधिक practical वाटलं.
  आंदोलनाच्या काळात टीम अण्णा नावच्या entity कडून जे काही चुकीचं झालं असेल ते नंतर पाहता येईल. पण मुख्य आंदोलन भरात असताना आपल्या सोबत्यांच्या अपरिपक्वतेवर बोट न ठेवलेलंच योग्य नव्हे का?
  राजकीय ताकदीशी दोन हात करण्या़चा जेवढा अनुभव अण्णांना आहे तेवढा त्यांच्या सहकार्‍यांना अर्थातच नाही. अशात लोकांच्या अवाढव्य प्रतिसादाने अण्णा सोडून सगळेच बावचळले त्यात नवल कसले?!
  तू म्हणतेस तसंच अण्णांशी कधीतरी शांत वेळी संवाद साधल्यास कदाचित या सगळ्याच आंदोलनाचे वेगळे पैलू प्रकाशात येतील.... त्यावरल्या पोस्टची वाट पाहतेय!

  ReplyDelete
 15. समाजाची एक गरज असते कोणी त्यांचे नेतृत्व करावे. सध्या आपल्याकडे सुयोग्य माणसांची वानवा असल्याकारणाने अयोग्य माणसे नेतृत्व करत आहेत.
  तिथे घडत असलेला रोजचा घटनाक्रम वेगवेगळ्या वर्तमानपत्रांतून वाचनात आला. बऱ्याच गोष्टी न पटणाऱ्या होत्या.

  मनाची समजूत घातली आहे...भारतातील नागरिक ह्यापुढे 'कोणापुढे नोट धरताना' व 'कोणाकडून नोट घेताना' कचरेल.

  हे जरी घडले तरीही बरेच मोठे काम होईल...असे वाटले.

  ReplyDelete
 16. भाग्यश्री, एका पोस्टवर दोन दोन प्रतिक्रिया :-) अर्थात त्यातली एक प्रतिक्रियेवरची प्रतिक्रिया आहे म्हणा :-)

  ReplyDelete
 17. अनू, बघू आता राळेगणला कधी जायला मिळतंय ते ... आणि अण्णा आता तेव्हाइतके निवांत भेटायचे पण नाहीत कदाचित!

  ReplyDelete
 18. अनघाजी, ही तुमची इथे पहिलीच भेट दिसतेय, स्वागत आहे तुमच. मला वाटत जागृतीच फार मोठ काम गेल्या चार पाच महिन्यांत घडल आहे. यात खूप सामान्य माणसंही सामील होती हे उघड आहे - त्यांना अपेक्षा आहे फक्त अधिक चांगल्या समाजाची. नीट पाठपुरावा करत राहील तर पुष्कळ गोष्टी होऊ शकतील अस मला वाटत.

  ReplyDelete
 19. मला अनघाजी न म्हणता फक्त अनघा म्हटलं तर किती बरं वाटेल ! :)

  ReplyDelete
 20. बापरे जी ?? मला आजी झाल्यासारख वाटतय...:D :D :D "अपर्णा"च ठीक आहे....

  आता या ब्लॉगचा मी मोठा पंखा झालेय...

  ReplyDelete
 21. अपर्णा, :-), दिल्लीच्या उकाडयात 'पंख्याची' गरज भासते .. पण ब्लोगला मात्र वेळप्रसंगी - आवश्यक भासल्यास - वेगळ मत मांडणारे आणि सहमत न होणारेही वाचक हवेत. पाय जमिनीवर रहायला आणि एकमेकांची वाढ होण्यास सहाय्यक बनायला ते जास्त गरजेच! अर्थात तू काय म्हणतेस ते मला समजल आणि हा ब्लोग तुला आवडला हे वाचून बर वाटल.

  ReplyDelete
 22. Savita tai chan lihale ahe, vachun khup khahi shikayala milale

  Bharat Bhosale

  ReplyDelete
 23. आभार भरतभाई.

  ReplyDelete
 24. Anna team ne baryachda 'Politicians' sarkhich vagali. pan kadachit tyaveli tech yogya hot.
  Khup chaan post aahe.

  ReplyDelete
 25. deepbaazigar, welcome to Abda Shabda. I am not sure whether what team Anna did was right even then ...is not the whole movement about changing the standards? Then why fall for the norms?

  ReplyDelete
 26. नेहमीप्रमाणे तुझं पोस्ट एक नवी खिडकी उघडणारं आहे. तू ’आत्मनेपदी’ वाचलं आहेस का? असशील तर एखाद्या चांगल्या गोष्टीचाही स्वतःच्या स्वर्थासाठी गैरफायदा घेणार्‍या 'धूर्ता'ची आठवण आली असेल. चलनी नाण्याच्या शोधात सारेच असतात....मग ती प्रसिद्धी माध्यमे असोत, अण्णा टोपी, टी शर्ट आणि आता साडीही विकणारी बाजारपेठ असो की सगळ्यात कळस म्हणजे अण्णा टीममधलेच काही सदस्य असोत.

  आंदोलन चालू होतं त्याच सुमारास एक शिक्षक प्रशिक्षण आयोजित केलं होतं. आंदोलनावर पोटतिडकीने लेख, कविता, नाटके लिहीणारे हेच शिक्षक प्रशिक्षणाच्या वेळेत आपली खाजगी कामे करण्यासाठी बाहेर गेले आणि जेवायलाच आले, वाचनासाठी ठेवलेली पुस्तके त्यांनी स्वतःच्या पिशवीत घातली आणि योग्य प्रवासखर्चच लावावा यासाठी आम्हाला त्यांच्याशी वादावादी करायला लागली.

  खरं तर हे आपल्या सर्वांनाच लागू आहे. आपण स्वतः १००% भ्रष्टाचार मुक्त आहोत का? जेव्हा जेव्हा आंदोलनात सक्रीय सहभागाची वेळ आली तेव्हा तेव्हा मी हा प्रश्न स्वतःला विचारत राहिले- कळत-नकळत, पटो न पटो आपण व्यवस्थेचा भाग होऊन जातॊ. व्यवस्थेत टिकण्यासाठीसुद्धा तुम्हाला काही गोष्टी स्विकाराव्या लागतात. आणि तसं करणं नाकारलत तर व्यवस्थेतली माणस तुमच्याविरूद्ध आंदोलन उभारतात!

  राजश्री

  ReplyDelete
 27. राजश्री, इतक्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आभार. मला वाटत या आंदोलनाने आपल्या मनात अनेक 'आंदोलन' निर्माण केली ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. बाकी फक्त राजकारणी लोकाना टार्गेट करण्याने लोक खूष झाले तरी त्यातून मूळ प्रश्न सुटत नाही .. हे अजून अण्णा टीमच्या लक्षात यायला काही वेळ लागेल अस दिसतंय.

  ReplyDelete
 28. I also wanted to share one more experience. SMS or mail requests to support the Andolan were quite vague as well as misleading at times. One of the sms said that if there are given no of supporters only then Govt would accept Jan Lokpal Bill which is not true. Similarly those who are aware of the clauses of Lokpal, Janlokpal and then 3rd draft by Aruna Roy would like to support the demand that Govt should sincerely and ob-jectively work on the just draft of this Bill considering all the drafts. But most of the mails and sms were asking the support for Jan Lokpal so I always in dilemma because I wanted to support the cause but not Janlokpal in particular.

  Rajashri

  ReplyDelete
 29. Rajashree, the best way is to ignore such bulk SMSs .. but I agree, when your friends forward such SMSs to you , it is hard to ignore them before reading.. and the reading affects!!

  ReplyDelete
 30. >>>गर्दी जमली म्हणजे माणसं हरवून जातात, नाही का?
  सहमत ..तसच अपेक्षेपेक्षा जास्त मिळाल्यावरही ...

  ReplyDelete
 31. देवेन, अपेक्षा पु-या न होण्याचे काय फायदे असतात ते अशा वेळी कळत!

  ReplyDelete