ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Wednesday, August 3, 2011

८३. गरज


त्या दिवशी घरी यायला बराच उशीर झाला होता. रात्रीचे दहा वाजून गेले होते. कधी नाही ते मी एका शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत गेले होते.. ज्ञानाच्या अभावामुळे आनंदात उणीव राहते हे मला माहिती आहे. संगीतातल मला कळत काहीच नाही, तरीही (की त्यामुळे?) मी जे ऐकल त्याबाबत खूष होते. भूकही लागली होती. तसाही मला स्वयंपाक घरात राहण्याचा उत्साह कमी असतो आणि आता रात्री दहा वाजता तर नक्कीच मी काही करत बसले नसते.

रस्त्यावर एक भेळेच दुकान दिसलं आणि मी दुचाकी थांबवली. काउंटरवरून तिथल्या पद्धतीप्रमाणे कूपन घेतलं आणि भेळेच्या काउंटरवर गेले. तिथल्या माणसाला मी भेळ खाणार आहे हे तितकस आवडलेल दिसत नव्हत त्याच्या चेह-यावरून. माझा अंदाज खरा ठरला, कारण तो माणूस म्हणाला, “ताई, रगडा पाटीस आहे गरमागरम. तो देतो तुम्हाला.” माझ्या खाण्यापिण्याच्या विशेष आवडीनिवडी नाहीत. पण आत्ता भेळ खायचं मनात आलं होत म्हणून मला भेळच खायची होती. त्या माणसाने पुन्हा आग्रह केल्यावर मी शांतपणे म्हटल, “काका, आज मला भेळच खायचीय. पुढच्या वेळी नक्की तुम्ही शिफारस कराल ते खाईन.”

आता एवढयावर खर तर ते प्रकरण संपायला हव होत. पण ते काका नाराजीच्या स्वरांत म्हणाले, “ताई, मागच्या वेळी पण तुम्ही असच बोलला होतात ...”

मी चमकून त्या काकांकड पाहिलं. हं! मी आधी दोन तीनदा आले होते या ठिकाणी पण हे गृहस्थ काही मला आठवत नव्हते. मी जरा निरखून पाहिलं. पन्नाशीच्या आसपास वय असणारा गृहस्थ बहुधा बिहारमधून आलेला असावा. बहुतेक रोजंदारीवर काम करत असणार हा माणूस. ‘मी काय खाव’ यात याला इतका रस असण्याच काय कारण? माझ्या चेह-यावरचा संशय त्या काकांना वाचता आला असणार लगेच. कारण ते म्हणाले, “ताई, भेळेपेक्षा मी रगडा पाटीस जास्त चांगल बनवतो. आता एवढया  रात्री तुम्ही इथ खाताय, म्हणजे घरी जाऊन काही खाणार नाही. तुम्ही माझ्या हातची जास्त चांगली डिश खावी इतकच मला वाटतय ..म्हणून म्हणालो तुम्हाला. मागच्या वेळी मी तुमच ऐकून मी तुम्हाला भेळ दिली होती. आज आता तुम्ही माझ ऐका.”

ते  काका इतक बोलल्यावर मला सहा महिन्यांपूर्वीचा प्रसंग आठवला. त्यावेळीही त्यांनी मला हीच विचित्र विनंती केली होती – भेळेऐवजी रगडा पाटीस खाण्याची. पण तेव्हाही  मी भेळच खाल्ली होती. रोज शेकडो ग्राहक येत असताना या माणसाला नेमकी मीच कशी लक्षात राहिले याच मला कुतुहल वाटलं! मग मी हसून म्हटल, “काका, तुम्हाला भेळ बनवायचा कंटाळा आलाय का?”

“नाही, नाही, तस अजिबात नाही. ताई, तुम्ही एकदा माझ्या हातचा रगडा पाटीस खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल! खूप लोकाना आवडतो तो, एकदा माझ ऐका तर खर!” अस त्यांनी लगबगीने स्पष्टीकरण दिल.

फार तत्त्वाचा मुद्दा नसेल तर मी ताणत नाही. शिवाय त्या संगीतामुळे माझा मूड चांगला होता. मग मी काकांनी दिलेला रगडा पाटीस खाल्ला. ठीकठाक होता तो. ते कौतुक करत होते तितका काही ‘ग्रेट’ नव्हता तो. खाण संपवून मी निघाले तेव्हा ते काका माझ्या टेबलापाशी आले आणि म्हणाले, “मग, ताई, आवडला ना रगडा पाटीस?” मी नुसती हसले आणि होकारार्थी मान डोलावून पुढे निघाले.

मी प्रशंसापर उद्गार न काढल्यामुळे काका काहीसे निराश झाले आणि विचारांत पडले. ते म्हणाले, “तुम्हाला अजून पण भेळ खायची आहे का?” माझ पोट भरल असल्याने अर्थातच आता मला आणखी काही नको होत! पण काका म्हणाले, “ तुम्हाला पाटीस आवडल नसेल तर मी तुम्हाला भेळ पार्सल देतो. नाही, तुम्ही त्याचे काही पैसे देऊ नका. माझ्या बेस्ट डिशचा मी तुम्हाला आग्रह केला आणि म्हणून तुम्ही ती खाल्लीत – पण तुम्हाला ती आवडली नसेल तर मी त्याची भरपाई केली पाहिजे.”

हे बोलताना त्या काकांना त्रास होत होता हे मला जाणवलं. आधी मी थोडी गोंधळले. मग मला माझ्यात आणि त्या काकांच्यात असलेल साम्य जाणवलं.

या माणसाकडे काही विशेष कौशल्य होती, त्याच्या मते ती इतरांपेक्षा चांगल्या दर्जाची होती. आणि त्याच्यासमोर मी होते – जिला त्याच्या विशेष कौशल्याशी काही देण-घेण नव्हत! मी माझ्याच जगात मग्न होते. तो माणूस मला त्याचे सर्वोत्कृष्ट प्रयत्न दयायला तयार होता, मी मात्र काहीही, ,कमी गुणवत्तेच चालवून घ्यायला तयार होते. पर्यायाने मी त्याला सांगत होते की ‘इतक चांगल काम करण्याची काही गरज नाही’. वानवा देणा-याची नव्हती, घेणा-याची होती.

अर्थातच त्या काकांना माझ्यासमोर काही सिद्ध करायचे नव्हत. समोरच्याला जे द्यायचे ते सर्वोत्तम या त्यांच्या स्वाभाविक प्रेरणेनुसार ते काम करत होते. त्यांना माझ्या प्रमाणपत्राची गरज नव्हती, ‘आपण चांगल काम करत आहोत’ या समाधानाची गरज मात्र होती. ते कामाकडे एका दृष्टिकोनातून  पहात होते, मी वेगळ्या दृष्टिकोनातून.  ते पदार्थाचे मूल्य वेगळ्या पद्धतीने – त्याच्या दर्जावरून – करत होते आणि मी पदार्थाचे मूल्य वेगळ्या पद्धतीने – पोट भरले म्हणजे झाले, त्याच्या उपयोगितेवरून – करत होते. मी त्यांचा हेतू लक्षात घेतला नाही आणि त्यांच्या गुणवत्तेची मी नोंद घ्यावी असे मला वाटले नाही याबद्दल – म्हणजे आपले काम कमी पडले याबद्दल त्यांना वाईट वाटत होते. मला पदार्थ आवडला नाही म्हणजे त्यांचा कामाचा दर्जा कमी पडला असा अर्थ त्यांनी काढला होता!

मला त्या काकांच मन एकदम समजल्यासारख वाटलं. तुम्ही आम्ही सगळेच अशा जाळ्यात अडकलेले असतो. जगाची रीत वेगळी असते – आपल्याजवळ काय चांगल आहे, आपली बलस्थान काय आहेत त्याच्यानुसार फार कमी वेळा आपल्याला काम करायची संधी मिळते. अनेकदा परिस्थितीशी जुळवून घेत आपल्याला आपल्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाच, कमी गुणवत्तेच काम करत बसाव लागत कारण समोरच्याची अपेक्षा तेवढीच मर्यादित असते. मागणी आणि पुरवठा या चक्रात न बसणार काही विशेष आपल्याकड असेल तेव्हा हे फार प्रकर्षाने जाणवत! आणि ते काहीही असू शकत ... कोणत्याही क्षेत्रातल असू शकत ..कोणाहीकडे असू शकत!

पुढच्यावेळी भेळ खावीशी वाटल्यावर मी त्याच ठिकाणी जाईन आणि कदाचित पुन्हा एकदा भेळच खाईन. कधीतरी त्या काकांना महत्त्वाचा  वाटणारा, त्यांच्या मते ‘बेस्ट’ असणारा  त्यांचा रगडा पाटीस मला आवडेल अशी मी आशा करते. तो आवडला नसताना उगाच त्यांना खूष करायला मी खोट बोलणार नाही....तो दांभिकपणा ठरेल.

त्या साध्या माणसाकडून मी त्यादिवशी एक महत्त्वाचा धडा शिकले .....
लोकांची मागणी काहीही असो, आपल्या सर्वोत्कृष्ट क्षमतेनुसार आपण चांगले काम करत राहण्याची गरज आहे .. ती गरज लोकांची असो वा नसो! 
**

12 comments:

 1. अशीही माणस असतात तर जगात.

  - मुकुंद

  ReplyDelete
 2. मानवी स्वभावाच्या नाना परी.....हेच खरे! सविता ताई लेख खूप आवडला.
  आपल्याला स्वतःला आपल्या कामाबद्दल श्रद्धा आणि विश्वास हवा.आपले काम हे आपला प्रयत्न शंभर टक्के देऊन इतरांकडून कौतुकाची अपेक्षा न ठेवणे.....उत्तम धडा!

  ReplyDelete
 3. छान लिहिले आहे.
  तुमच्या अनुदिनीवरचे चित्र सुद्धा आवडले.
  माझ्या ब्लॉगचा पत्ता:
  http://www.prashantredkarsobat.blogspot.com/

  ReplyDelete
 4. wow
  साध्या साध्या प्रसंगातून असे गहिरे अर्थ तुम्हीच काढू शकता..

  ReplyDelete
 5. मुकुंदजी, आभार आणि स्वागत.

  श्रिया, माझ्याही लक्षात राहिलाय हा धडा!

  प्रशांतजी, आभार. आणि ते चित्र कोणी अनामिक (मला माहीत नसलेल्या) चित्रकारांचे कर्तृत्व आहे.

  लीना, :-) तोच माझा छंद आहे :-)

  ReplyDelete
 6. साध्या साध्या प्रसंगातून असे गहिरे अर्थ तुम्हीच काढू शकता.. +1

  सहीच ग ताई ... आपल्या कामाप्रती अशी इमानदारी दाखवणारी खूप कमी लोक असतात ,लवकरच त्यचा रगडा पेटीस तुला आवडो अस वाटते ...कारण कदाचित अती उशीर झाल्यावर (म्हणजे नेहमीच अनेकाकडून असाच रीस्पोंस मिळाल्यावर ) त्याचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. आणि त्याच एकूण व्यक्तित्व बदलू शकते... मी अस उदाहरण पाहिलं आहे म्हणून सांगतो...

  ReplyDelete
 7. Great article. Really inspiring.

  ReplyDelete
 8. Deven, this experience is from Pune.. so I am sure I can not visit the place frequently ...

  Ramjee, welcome to AbdaShabda and thanks for your response.

  ReplyDelete
 9. सविता, समोरच्याच्या दृष्टिकोनातून स्वत:कडे पाहता आले निदान त्याला काय म्हणायचे आहे इतके जरी आपल्यापर्यंत पोचण्याइतपत मनाची कवाडे उघडी ठेवायला हवीत हे अनेक प्रसंगातून आपल्याला जाणवते. परंतु जाणवून विश्लेषण किती मनं करत असतील? तू जाणीवपूर्वक ते केलेस हे मला खूप आवडले.

  आता रगडापॅटिस बद्दल म्हणशील तर मला वाटते की त्याच्या मते सर्वोत्तम असलेल्या त्याच्या डिशचा काहीच उल्लेख न केल्याने जणू अनुल्लेखाने तू त्याला मारल्यासारखेच त्याला वाटले असावे. म्हणजे कदाचित तू, " काका, तु्म्ही म्हणालात तितकी खास काही नाही वाटली मला " असे जरी म्हणाली असतीस तरीही त्याला चालले असते.

  ReplyDelete
 10. भाग्यश्री,अनुल्लेखाने मारण्याची चूक ब-याचदा समोरच्याला दुखवायचे नाही अशा हेतूने केली जाते - पण तू म्हणालीस तस अनुल्लेखापेक्षा 'आवडलं नाही' अस सांगण जास्त चांगल!

  ReplyDelete
 11. एक छोटा अनुभव पण किती काही शिकवून जाऊ शकतो नाही? मस्त मांडलय तुम्ही ....मला त्या भेळवाल्याच marketting आवडल आणि मग नंतर भेळ देऊ करायचा प्रामाणिकपणाही

  ReplyDelete
 12. अपर्णाजी, स्वागत तुमच आणि प्रतिसादाबद्दल आभार. तुम्ही म्हणता तस मार्केटिंग आणि ग्राहक जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न असे अपवादानेच एकत्र असतात!

  ReplyDelete