ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, March 26, 2012

११९. पुन्हा जंतर मंतर: भाग १

'नरेन्द्र ट्रॅक्टर से कुचला गया; सोनवणे जिंदा जला दिया गया' हे वाचून मला कुठल्यातरी टी.व्ही. मालिकेची माहिती दिसते आहे असं वाटलं होत. पण लागोपाठ दोन तीन दिवस तोच निरोप येत राहिल्यावर मी तो नीट वाचला. त्यातून लक्षात आलं की तो 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' कडून आलेला निरोप आहे आणि दुसरं म्हणजे २५ मार्चला 'जंतर मंतर' वर एक दिवसाच लाक्षणिक उपोषण आहे. अनायासे तो रविवार होता आणि मी दिल्लीत असणार होते; त्यामुळे जायच ठरवलं.

साधारणपणे साडेदहाला मी पोचले तोवर आधीच भरपूर गर्दी जमली होती. मागच्या वेळी 'जंतर मंतर' वर पोलिस होते पण ते निवांत होते. याहीवेळी ते निवांत होते पण सावध होते - त्यामुळे सुरक्षा तपासणीतून जावं लागलं - ज्याबद्दल माझा कधीच आक्षेप नसतो. एप्रिल २०११ मधलं 'जंतर मंतर'वरचे उपोषण आणि ऑगस्ट २०११ मधलं रामलीला मैदानावरचं उपोषण हे दोन्ही मी काहीसं जवळून, म्हणजे त्यात थोडी सहभागी होऊन पाहिलं होतं. रामलीला मैदानाने तर माझा भ्रमनिरास केला होता. त्यानंतर मुंबईत फार कमी प्रतिसाद मिळाल्याचंही पाहिलं होतं. तरीही मी यावेळी परत जायच ठरवलं कारण भ्रष्टाचार हा माझ्याही मते एक मोठा सामाजिक मुद्दा आहे. शिवाय आधीच्या चुकांमधून आंदोलन काही शिकलं आहे की नाही हे पाहण्याचीही उत्सुकता होती.

यावेळच वातावरण एकदम वेगळं होत हे प्रथमदर्शनीच लक्षात आलं. एप्रिल २०११ मधल वातावरण भाबडं आणि उत्साही होतं. त्यावेळी जो तो स्वतंत्रपणे काही ना  काही करत असे. तिथे पाठीशी 'भारतमातेच' चित्र होतं आणि व्यासपीठ छोटं होतं. रामलीला मैदानावर वातावरण जास्त आक्रमक आणि काहीसं धोरणी होतं. अण्णा तोवर 'दुसरे गांधी' झालेले होते आणि 'मै अण्णा हूं' अशी टोप्या आणि टी शर्ट यांचा सुळसुळाट होता.  दोन्ही ठिकाणी घोषणाबाजांचा सुकाळ होता. 'जीत के कगार पर हम है' अशी भावना होती, काहीसा उद्दामपणा होता. जमलेली गर्दी म्हणजे आंदोलनाला पाठबळ असा साधा हिशोब तेव्हा होता.  संसदेने अधिवेशन बोलावलं म्हणजे झालंच आता काम अशी मानसिकता होती.


यावेळीही 'मै अण्णा हूं' टोप्या आणि टी शर्ट होते पण त्यांची संख्या  तुलनेने कमी होती. घोषणाही फार अंगावर येणा-या नव्हत्या - माफक होत्या - ज्या वातावरणनिर्मितीसाठी आवश्यक होत्या. गीतेही मोजकीच होती - दिवसभरात फक्त चार (किंवा पाच फार फार तर). व्यासपीठावर सगळे एकत्र बसले होते आणि मुख्य म्हणजे व्यासपीठाच्या भिंतीवर दोन तिरंगा आणि काही शहीदांचे फोटो होते. हे शहीद कोण - या प्रश्नाचे उत्तर तसं मला आलेल्या एस. एम. एस. मधे होतच म्हणा!

कार्यक्रमाची सुरुवात या शहीदांना श्रद्धांजली वाहून झाली. त्यानंतर गेल्या काही वर्षांत भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवल्याने मारल्या गेलेल्या शहीदांची ओळख करून देण्यात आली. या प्रत्येक व्यक्तीवर एक मिनिटाची फिल्म केली होती (कोणी ते माहिती नाही) ती दाखवून मग त्या व्यक्तीच्या कुटुंबियांपैकी एकजण अधिक तपशील देत होता. हा सगळा कार्यक्रम अंगावर काटा आणणारा होता. राज्यांच्या सीमा ओलांडून लोक भ्रष्टाचाराविरुद्ध लढताहेत आणि शासन कोणत्याही पक्षाचे असो, त्याची किंमत कार्यकर्ते मोजत आहेत हे चित्र विषण्ण करणारं होतं.

होळीच्या दिवशी (८ मार्च २०१२) बेकायदेशीर खाणकामाविरुद्ध आवाज उठवणारा पोलिस अधिकारी नरेन्द्र कुमार ट्रॅक्टर अंगावर घालून मारला जातो; सत्येन दुबे (२८ नोव्हेंबर २००३) राष्ट्रीय महामार्गातील भ्रष्टाचार पंतप्रधान कार्यालयाला 'माझे नाव गुप्त ठेवा' अशी विनंती करत कळवतो. त्यावेळी केंद्रात वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एन. डी. ए. चे सरकार होते आणि बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचे. तरीही पंतप्रधान कार्यालयातून हे पत्र 'फुटते' आणि दुबे यांची हत्या होते. लखनौ आय. आय. एम. मधून पदवी घेतल्यावर मंजूनाथ इंडियन ऑईल मध्ये काम स्वीकारतो आणि तेलात भेसळ पकडताना २७व्या वर्षी (१९ नोव्हेंबर २००५) गोळ्या घालून मारला जातो.

अमित जेटवा हा गुजरातमधील 'माहिती अधिकाराचा' कार्यकर्ता. सौराष्ट्रातल्या बेकायदेशीर खाणकामाबद्दल त्याने रीतसर तक्रार नोंदवली होती. २० जुलै २००९ रोजी कोर्टासमोर गोळ्या घालून त्याचा जीव घेण्यात येतो. आंध्र प्रदेशातील सीतारामपूर भागातील सोला रंगा राव हा तीस वर्षांचा पोलिओग्रस्त तरूण. गावातील विकास कामासाठी किती पैसे आले आहेत अन ते कसे खर्च झाले आहेत हे कळावे म्हणून 'माहिती अधिकारा'अंतर्गत तो अर्ज दाखल करतो, त्यापायी त्याला १५ एप्रिल २०१० रोजी जीव गमवावा लागतो. त्याला सळईने मारहाण झालेली दिसते. झारखंडमधला ललितकुमार मेहता रोजगार हमी योजनेतील घोटाळे उघडकीस आणतो आणि त्यालाही १४ मे २००८ या दिवशी मारण्यात येते. झारखंडमधल्या कामेश्वर यादवची याच गोष्टीसाठी ७ जून २००८ रोजी हत्या होते. याच राज्यातल्या नियामत अन्सारीने आपले प्राण असेच गमावले.

बेगुसराय (बिहार)मधल्या शशिधर मिश्राची तर रोजगार हमी घोटाळे उघडकीस आणले म्हणून त्याच्या घरासमोर त्याला गोळ्या मारून त्याची चाळणी केली गेली ती १४ फेब्रुवारी २०११ या दिवशी. पुण्याचे 'माहिती अधिकार' कार्यकर्ते सतीश शेट्टी (१३ जानेवारी २०१०) आणि कोल्हापूरचे दत्ता पाटील (२६ मे २०१०) यांच्या हत्यांची आपल्याला माहिती आहेच. महेन्द्र शर्मा, विश्राम ढुढिया, तामिळनाडूचा सतीशकुमार, उत्तर प्रदेशातले डी.पी. सिंग ... एकामागून एक घटना आणि त्यातले साम्य जाणवत होते. एक जण कोणीतरी घोटाळा शोधून काढतो, संबंधितांना त्याचा कायदेशीर जाब विचारला जातो आणि शेवटी तो स्वतःचे प्राण गमावतो. जाणारा तर गेला पण भ्रष्टाचाराचा भस्मासूर मात्र तसाच कायम आहे. यातल्या अनेक खटल्यांचे निकाल लागणं तर सोडून द्या, आरोपीही अद्याप सापडलेले नाहीत.  लोकपाल' कायदा असता तर या लढणा-या कार्यकर्त्यांना संरक्षण देता आले असते, निदान काही जीव तरी वाचले असते - अशी संयोजकांची हळहळ अनेकांना स्पर्श करून गेली आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढणे हे  फक्‍त  तिरंगा लहरवत 'वंदे मातरम' म्हणण्याइतके सोपे नाही याची जाणीव जमलेल्या लोकांना होते आहे असं त्यांच्या संवादावरून, त्यांच्या विचारमग्न चेह-यांवरून जाणवलं मला. या शहीदांच्या घरच्यांची हिंमत खरच दाद देण्याजोगी होती. ललितकुमारची पत्नी जेव्हा म्हणाली, "मी तर या एका आशेवर जगतेय की ज्यासाठी माझ्या पतीला प्राण द्यावा लागला, त्या भ्रष्टाचाराचा कधीतरी नाश होईल ..." तिच्या या जिगरबाज शब्दांनी  तिथे जमलेले लोक क्षणभर निस्तब्ध झाले.

मी मागेही म्हटले होते तसे दिल्लीच्या एरवी अतिशय आक्रमक आणि स्त्रियांशी गलिच्छ वागणा-या गर्दीचा मला आणखी एक चांगला अनुभव आला. लोकांच्या एकत्र येण्याचे कारण जर चांगले असेल तर लोक आपणहोऊन चांगले वागतात हे पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. सात तास मी एकटी स्त्री अनोळखी लोकांच्या गर्दीत होते पण मला काहीही त्रास झाला नाही. सहा सात तास एकत्र बसल्यामुळे आसपासच्या लोकांशी थोडी ओळख झाल्यासारखे वाटायला लागले होते. साधारण संध्याकाळी पाचच्या सुमारास माझ्याशेजारी एक पुरुष येऊन बसला तेव्हा त्याला मात्र मला 'नीट बसा तुम्ही' असं सांगायला लागलं. माझ हे वाक्य ऐकून शेजारच्या अनेकांनी त्याच्याकडे पाहिलं. तिस-यावेळी मी पुन्हा तेच त्या गृहस्थाला सांगितल्यावर अचानक माझ्या पुढे बसलेला दुसरा एक पुरुष त्याला म्हणाला, "ते बघा, तुम्हाला हात करताहेत." त्या गृहस्थाने त्या दिशेला वळून पाहिलं तर कोणीच नव्हत. त्यावर माझ्या पुढचा पुरुष त्याला म्हणाला, "ते बघा, ते चहाच्या टपरीकडे गेले ते, पोलिसांच्या आड आहेत ते त्यामुळे तुम्हाला दिसत नाहीत ते. जा तुम्ही तिकडे." मग हा माणूस उठून तिकडे गेल्यावर मागचा एक पुरुष पुढे सरकला. तो गृहस्थ परत आला तरी त्याला आता ती जागा परत मिळणार नव्हती. मग पुढचा माणूस माझ्याकडे पाहून हसून म्हणाला, "बसा आता तुम्ही निवांत. तो पिऊन आला होता, पण त्याला आता पळवून लावलय आम्ही." त्याच्या या हुषारीच मला  मनापासून कौतुक वाटलं.

उत्तरेत वावरताना कवींना एक वेगळा मान असल्याच जाणवतं. कविता लिहून सामाजिक क्रांती घडवून आणायची स्वप्नं आजही इथले कवी पाहतात. या कवींना स्वतःच्या रचना अत्यंत तालासुरात गाता येतात हे आणखी एक विशेष.  कुमार विश्वास या तरूण कवीची 'होठों पे गंगा हो, हाथों मे तिरंगा हो' ही रचना तिथं जमलेल्या लोकांना बेभान करायला समर्थ होती. 'जंतर मंतर कब तक' अशी कोणत्यातरी वाहिनीवर चर्चा चालू असल्याचे सांगून तो म्हणाला, "याच उत्तर सोप आहे: भ्रष्टाचार जब तक, जंतर मंतर तब तक” - यावर लोकांनी उस्फूर्त पाठिंबा दिला त्याला. अजमेर जिल्ह्यातल्या शहनाझ राजस्थानी या आणखी एका कवीने 'वंदे मातरम' या घोषणेसह सुरुवात केली आणि 'मी ही घोषणा देतोय याच अनेकांना आश्चर्य वाटत असेल' हेही सांगितल. क्षणभर थांबून पुढे तो म्हणाला, "मै मुसलमान हूं, मगर हिन्दुस्थानी मुसलमान हूं" - अशी वाक्य एरवी ऐकताना काही वाटत नाही; पोकळ वाटतात ती - पण त्या समुहात बसून ऐकताना त्या वाक्याने समुहात किती उर्जा पेटवली ही अनुभवण्याचीच गोष्ट आहे. 'कुछ भी हो जाये, हमको ये तस्वीर बदलनी है' या त्याच्या कवितेवर मग सगळेजण डोलत होते. सामाजिक आंदोलनांत कलेचा माध्यम म्हणून उपयोग करणं हे काही नवीन नाही आपल्याला - पण इतिहासाचा वारसा पुढे न्यायला नवीन पिढीतही तितके समर्थ कलाकार आहेत हे जाणवून बर वाटलं.


मागच्या वेळी आपण लढाई तर जिंकली पण तहात हरलो, ही जाणीव 'टीम अण्णा'ला अखेर एकदाची झाली आहे हे पुढच्या काही तासांत त्यांच्या बोलण्यावरुन लक्षात आलं. उपोषण दिल्लीत असल्यामुळे अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांचे समर्थक मोठया संख्येने तिथे आले असणार हे स्वाभाविक आहे. पण किरण बेदी आणि केजरीवाल यांच ज्या पद्धतीने लोक स्वागत करत होते, त्यावरून त्या दोघांवर झालेल्या आरोपाला निदान दिल्लीच्या जनतेने तरी फारशी किंमत दिलेली नाही हे स्पष्ट झालं.  त्या दोघांच बोलणं ऐकून मला हे आंदोलन आता योग्य दिशा पकडतय असं वाटलं; कारण आंदोलन दीर्घ काळ चालवावं लागणार आहे, त्यासाठी नुसती भावनिक एकता पुरेशी नाही तर आपले विचार जुळेले पाहिजेत, चर्चा आणि अभ्यास केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं.

लेख फार मोठा होतोय म्हणून इथे थांबते सध्या. कदाचित थोड लिहीन आणखी पुढच्या भागात.

10 comments:

  1. सविता, अण्णांच्या आंदोलनाविषयीच्या सगळ्या पोस्ट एकत्र करून एक सुंदर लेख होऊ शकेल या आंदोलनाविषयीचा! सगळेच लेख सुंदर झालेत हे!

    ReplyDelete
  2. :(
    बापरे किती काय काय सुरू आहे......मी हे वाचताना मला भारताचा मेक्सिको झालाय की काय अशी शंका येतेय...
    गौरीशी सहमत...

    ReplyDelete
  3. लेख अतिशय सुंदर झालाय यात संशय नाहीच. सुंदर यासाठी की अतिशय बारीक सारीक तपशील आणि त्यावरून मांडलेली तुमची स्वतःची मतं. हे आवडतं आहेच. प्रत्यक्ष हे सगळं अनुभवणं हे एक वेगळंच.

    आंदोलन योग्य मार्गाने, योग्य व्यक्तींच्या माध्यमातून चालवलं तर अतिशय वेगळंच काही घडवून जाईल.

    ReplyDelete
  4. गौरी आभार. तटस्थपणे लिहिल्यामुळे बहुधा हे लेख वेगळे वाटले तुला!

    ReplyDelete
  5. अपर्णा, आणि या तर समोर आलेल्या गोष्टी. पडदयाआड अजून काय असेल कोण जाणे!

    ReplyDelete
  6. बिपिनजी, आंदोलन योग्य मार्गाने जाईल अशी आशा ठेवायला हवी आपल्याला, नाहीतर मग अवघड आहे परिस्थिती.

    ReplyDelete
  7. बापरे, वर शहीद झालेल्या लोकांबद्दल वाचून अंगावर काटा आला. पैशापुढे माणसाचा जीव किती स्वस्त झालाय आपल्या देशात...

    ReplyDelete
  8. इंद्रधनू, तोच तर मोठा प्रश्न आहे खरा!

    ReplyDelete
  9. वाचताना अंगावर काटे आले, डोळे पाणावले, अभिमानही वाटला! मीडियातून अशा प्रकारे आंदोलन लोकापर्यंत पोहोचत नाही! एकूणच आंदोलन प्रगल्भतेकडे चाललंय अशी आशा वाटली.

    ReplyDelete
  10. प्रीति, प्रसारमाध्यम फार वरवरच्या आणि निवडक गोष्टी दाखवतात असं माझही मत केव्हाचच झालेले आहे!

    ReplyDelete