ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, September 11, 2012

१३५. भारतीय स्त्रिया आणि विवेकानंद विचार: भाग १

भारतीय स्त्रीहा शब्दप्रयोग जितका दिसतो तितका साधा नाही. आपण नेमक्या कोणत्या भारतीय स्त्रीबद्दल बोलत आहोत हे समजल्याशिवाय पुढे जाता येत नाही. भारतीय स्त्री हीएक प्रकारची आहे असे वास्तवात दिसत नाही. जात, धर्म, प्रांत, शिक्षण, वय, वर्ग, शहर-खेडे अशा अगणित प्रकारे विभागल्या गेलेल्या स्त्रियांचे प्रश्न काही प्रमाणात एकसारखे आहेतही, पण त्यांचे अनेक प्रश्न वेगळेही आहेत. 'साप्ताहिक सुट्टी' हा असंघटित क्षेत्रात काम करणा-या स्त्रियांचा मोठा प्रश्न आहे पण संघटित क्षेत्रात काम करणा-या स्त्रियांचा नाही;  हे एक उदाहरण झाले.  पण सार्वनजिक असुरक्षितता, कौटुंबिक हिंसा, संधीचा अभाव, असे प्रश्न मात्र जवळजवळ सर्वच स्त्रियांचे आहेतआज स्त्रिया उत्पादन, प्रजोत्पादन आणि समूह व्यवस्थापन अशा तिहेरी भूमिका निभावून नेत आहेत. या तीनही स्तरांवर स्त्रियांचे प्रश्न वेगवेगळॆ आहेत.

भारतातील स्त्री चळवळीला गेल्या किमान शंभर-दीडशे वर्षांचा इतिहास आहे. १९व्या शतकातल्या भारतात स्त्रियांचे जीवनमान उंचावणॆ हा सुधारक चळवळींचा महत्त्वाचा विषय होता. ब्रिटीश राजवटीच्या माध्यमातून भांडवलशाहीचे  आगमन झाले होते आणि भारतीय समाजरचना या नव्या बदलाला सामोरी जाताना अनेक धक्के खात होती. राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, ब्राह्मो समाज, १८५७चे स्वातंत्र्ययुद्ध , पाश्च्यात्य शिक्षण, आणि त्याचे जनमानसावर उमटत असलेले पडसाद या काळात विवेकानंद जन्माला आले आणि वाढले. विवेकानंदांचे कुटुंब उदारमतवादी आणि सुधारक होते आणि विवेकानंदांनी पाश्च्यात्य पद्धतीचे शिक्षणही घेतलेले होते. या सर्व बाबीचा त्यांच्या विचारांवर नक्कीच प्रभाव पडला. पण अर्थातच विवेकानंदांवर सर्वात मोठा प्रभाव होता तो एकाच व्यक्तीचा आणि ती व्यक्ती होती रामकृष्ण परमहंस. रामकृष्णांचे स्त्रियांबाबतचे विचार मातीशी नाळ तोडणारे आणि तरीही अत्यंत प्रागतिक स्वरूपाचे होते.
पण एकविसाव्या शतकातल्या भारतीय स्त्रियांची स्थिती आणि विसाव्या शतकाच्या उंबरठयावर असलेल्या भारतीय स्त्रियांची स्थिती यात बराच  फरक पडला आहे. तंत्रज्ञान, शिक्षण, कुटंबांचा लहान होत जाणारा आकार अशा अनेक गोष्टी बदलल्या आहेत. काही सुधारणा झाल्या आहेत आणि काही  प्रश्नही नव्याने समजले आहेत.स्त्रियांचे सबलीकरण. लिंगभाव समता, दारिद्र्याचे स्त्रीकरण, लिंगभाव संवेदनशीलता, स्त्रियांचा राजकीय व्यवस्थेतला सहभाग , कायद्यातल्या सुधारणा , स्त्रियांचे आर्थिक योगदान, मानवी हक्क, स्त्रियांचा स्वत:च्या शरीरावरचा हक्क ….अशा परिभाषेत आज स्त्रियांच्या स्थितीबद्दल चर्चा होते. दीडशे वर्षापूर्वी जन्माला आलेला हा विवेकानंद नावाचा पुरुष, जो स्वत: संन्यासी होता, त्याच्याकडून या विषयावर प्रागतिक काही विचार मिळतील का अशी शंका मनात येणे स्वाभाविक आहे 
आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनविषयक दृष्टिकोनापेक्षा कितीतरी वेगळ्या पातळीवरून विवेकानंद जीवनाकडे पाहतात. त्यांची जीवनविषयक दृष्टी एकांगी नसून सर्वसमावेशक आहे. त्या विशिष्ट जीवनदॄष्टीपर्यंत  पोचायचे कसे याचे मार्गदर्शन आपल्याला त्यांचाकडून निश्चितपणे मिळते.
स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचताना मला नेहमीकॅलिडोस्कोपची आठवण येते. ’कॅलिडोस्कोपमधून ज्या कोनातून पहावे त्यातून आतल्या काचांची अमर्याद रूपे दिसतात. आपल्याला दिसणारे दृष्यच फक्त खरे असा बघणाराचा समज होऊ शकतो. आपल्या चष्म्यानुसार, विचारांनुसार, अपेक्षेनुसार विवेकानंदांच्या विचारांचे वेगवेगळे पैलू आपल्या समोर येत राहतात. पण जसजसे आपण बदलतो तसतसे विवेकांनंद आपल्याला वेगळे कळत राहतात असा माझा आजवरचा अनुभव आहे.
विवेकानंदांचास्त्रीविषयक विचार त्यांच्या संपूर्ण विचारांच्या संदर्भात पहावा लागतो. केवळस्त्रियाअसा तुकडा वेगळा काढून पाहून भागणार नाही. विवेकानंद केवळ धार्मिक अथवा आध्यात्मिक क्षेत्रात मार्गदर्शन करणारे पारंपरिक गुरु नव्हते; वेदान्ताचा वसा घेऊन समाजपरिवर्तनाची अखंड स्वप्ने पाहणारेत्यासाठी परिश्रम करणारे ते एककार्यकर्तेहोते. विवेकानंदांच्या सामाजिक विचारांवर त्यांच्या तात्त्विक विचारसरणीचा फार मोठा प्रभाव जाणवतोते विचार समजावून घेतले नाहीत तर विवेकानंदांचे स्त्रीविषयक विचार अर्धवट समजण्याचा धोका आहे. त्यांच्या व्याख्यानांचा मागचा पुढचा संदर्भ, समोर कोणत्या प्रकारचा श्रोत्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी काय होती अशा अनेक मुद्यांचाही आपल्याला विचार करावा लागतो
 विवेकानंदांचे साहित्यहा शब्दप्रयोग तसे पहायला गेले तर फसवा आहे. विवेकानंदांनी एका जागी बसून, ठरवून काही लिहिले असे क्वचितच दिसते. ’राजयोग’ , 'प्रबुद्ध भारत' आणिउद्बोधनमधील लेख वगळता विवेकानंदाचे सर्व साहित्य लोकांसमोर केलेली उत्स्फूर्त भाषणे आहेत किंवा इतरांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखती आहेत. ही भाषणॆ त्यांनी अमेरिका आणि इंग्लंडच्या निवडक नागरिकांसमोर केली तशीच ती भारतातील समुदायांसमोरही केली. दोन वेगळया समाजांना आणि संस्कृतींना एकमेकाच्या शक्तीस्थानांचा परिचय करून देणे हे त्यांचे एक महत्त्वाचे काम होते. पाश्चात्य नागरिकांसमोर बोलताना भारतीय संस्कृतीबाबत विवेकानंद आतिशय चांगल्या गोष्टी बोलतात. त्याउलट भारतीय लोकांसमोर ते आपल्या समाजाला बदलण्याचे आव्हान सतत उभे करताना दिसतात. वरवर पाहताना विवेकानंदांच्या विधानांमध्ये पुष्कळ विसंगती आढळतेजसेबालविवाहया विषयावर विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात: विवाहस्वातंत्र्यातून व्यक्तित्ववादी दृष्टिकोन वाढीस लागतो. या दृष्टीने पाहता बालविवाह ठीकच म्हणायला हवेत. (पान ११, भारतीय नारी, रामकृष्ण मठ, नागपूर, नोव्हेंबर २००९ ) आणि दुस-या ठिकाणी ते म्हणतात: बालविवाह मला अत्यंत घृणास्पद वाटतो. … ही प्रथा गाडून टाकण्याचा शक्य तितका प्रयत्न मला केलाच पाहिजे ….बालिकेसाठी वर पाहून देणा-याचा मी खूनही करू शकेन. (पान ७०-७१, भारतीय नारी, )  या दोन विधानांमागची पार्श्वभूमी माहिती नसेल तर आपला गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विवेकानंद साहित्य वाचताना अशा अनेक विसंगत वाटणा-या विधानांचा संदर्भानुसार अर्थ लावण्याचे काम आवश्यक आहे.
स्त्रियांबद्दल अत्यंत उदार दृष्टिकोन हे मला विवेकानंदांचे आणखी एक वैशिष्ट्य जाणवते. सामान्यत: संन्यासी म्हटला की त्याने स्त्रियांपासून चार हात दूर रहावे, त्यांना आपल्या आध्यात्मिक प्रगतीतली बाधा मानावे अशीच आपल्याकडची सर्वसामान्य पद्धत आहे. पणसर्वांमध्ये एकच आत्मा विद्यमान आहेअसे सांगणा-या स्वामीजींच्या व्यवहाराने त्यांच्या तत्त्वज्ञानाला कधीही छेद दिला नाही. भगिनी निवेदितांनी म्हटल्याप्रमाणे  ’ही गोष्ट ध्यानात ठेवणे आवश्यक आहे की त्यांना स्त्रियांचे भय वाटत नसे. त्यांना भय वाटत असे प्रलोभनाचे. जगभर सर्व ठिकाणी त्यांना नारीसमाजात बरेच मिसळावे लागले होते. स्त्रिया त्यांच्या शिष्या होत्या, त्यांच्या कार्यात सहकारिणी होत्या एवढेच नव्हे तर खेळगडी आणि मैत्रिणी पण होत्या.’ ( पान ११४, भारतीय नारी )
समाज परिवर्तनशील असतो, सतत तो नव्या गोष्टींना सामोरा जात असतो. अगदी शंभर वर्षांपूर्वीचा भारत आणि आजचा भारत यातही फरक पडलेला आहे. पण समाज हा माणसांचा बनलेला असतो आणि माणसांच्या जीवनविषयक दृष्टिकोनावर कुटुंबाचे, समुहांचे, राष्ट्रांचे व्यवहार आधारलेले असतात. व्यक्तीचा स्वभाव आणि स्वधर्म जसा महत्त्वाचा, तसाच राष्ट्राचा स्वभाव आणि स्वधर्मही महत्त्वाचा. तो विसरून एखादा समाज वाटचाल करू पाहतो तेव्हा प्रगती होत नाही अशी विवेकानंदांची अतिशय स्पष्ट धारणा होती. भारतीय स्त्रीचा विचार भारतीय मानसिकतेच्या संदर्भात केला पाहिजे असे ते आपल्याला सांगतात. स्त्रियांचे प्रश्न काही आभाळातून टपकलेले नाहीत  - तो आमच्या आजवरच्या सामाजिक वाटचालीचा  परिणाम आहे याची विवेकानंद आपल्याला आठवण करून देतात.
धर्म हा भारताचास्वभावआहे, त्यामुळे इथे जे काही बदल करायचे ते धर्माच्या माध्यमातून करायचे असे विवेकानंद आग्रहाने सांगतात. धर्म मुळात वाईट नाही, आपण तो वाईट पद्धतीने वापरतो. समाजातील काही रुढी सद्यस्थितीत योग्य नसतील तर रुढी बदलल्या पाहिजेत,नव्या परंपरा निर्माण केल्या पाहिजेत असे त्यांचे मत होते. गूढवाद आणि अंधश्रद्धा यांचा आधार घेऊन चालणा-या धार्मिकांवर त्यांनी कठोर प्रहार केले . आपल्याकडच्या जुनाट भ्रामक समजुती आणि युरोपीयन लोकांचा जडवाद यातून मधला मार्ग आपल्याला काढायचा आहे याचे त्यांना भान होते.
 पाश्च्यात्यांची भ्रष्ट नक्कल म्हणजे सुधारणा अस विवेकानंद कधी मानत नसत. सुधारणा म्हणजे मोडतोड नव्हे तर पुनर्बांधणी. क्रांतिकारक विचार मांडताना त्यांना कसल्याही विध्वंसाचा आधार घ्यावा लागला नाहीत्यांनी आवाहन केले ते नेहमी माणसाच्या उपजत सत-प्रवृत्तीला. हे आवाहन करण्याचे बळ त्यांना मिळते ते वेदान्त विचारावरील त्यांच्या प्रगाढ विश्वासातून. विवेकानंदांचा विचार हा मूलत: वेदान्त विचार आहे. वेदान्त हा केवळ वाचनाचा अथवा मननाचा मार्ग नसून तो प्रत्यक्ष जीवन जगण्याचा मार्ग आहे अशी त्यांची धारणा होती. ते म्हणतात, वेदान्त दर्शन पूर्णपणे व्यवहार्य आहे, त्याच्या आस-याने जीवन जगणे घडविणे शक्य आहे, अगदी शक्य आहे ..” (पान , वेदान्त आणि जीवन, स्वामी विवेकानंद, १९८६, रामकृष्ण मठ, नागपूर)
वेदान्त विचार स्त्री पुरुष समतेच्या विचारांना बळ देतो. वेदान्त सर्वांमध्ये एक आत्मतत्त्व पाहण्याची आपल्याला शिकवण देतो. पाश्चात्यांना विवेकानंद सांगतात, स्त्रीपूजा म्हणजे तिच्या सौंदर्याची, यौवनाची पूजा नाही तर स्त्रीची आनंदमयी जगदंबा या द्न्यानाने केलेली पूजा होय.’" तर  देशवासीयांना विचारतात,  “स्त्री पुरुषात येथे इतका भेद का केला जातो हे समजणे कठीण आहे. एकाच चित्सत्तेने अवघे भूतजात व्यापले आहे असे वेदान्त सांगतो. तुम्ही स्त्रियांची फक्त निंदा करायला पुढे येता, पण त्यांच्या उन्नतीसाठी तुम्ही काय केलेआणि काय करता ते सांगा पाहू. स्मृती इत्यादी लिहून कठोर नीतिनियमांनी करकचून जखडून टाकून या देशातील पुरुषांनी त्यांना केवळ प्रजोत्पादनाची यंत्रे करून ठेवले आहे. स्त्रिया म्हणजे महामायेच्या साक्षात प्रतिमा. त्यांचा उध्दार केल्याखेरीज तुमच्या भावी उन्नतीचा काही अन्य मार्ग आहे असे तुम्हाला वाटते काय? स्त्रियांना ज्ञान भक्तीचा अधिकार नाही असे कुठल्या शास्त्रात सांगितले आहे…. (पान ३७, भारतीय नारी)  या ठिकाणी दोन विभिन्न आदर्श असलेल्या समाजांना पुढे नेण्यासाठी मदत करण्याचा विवेकानंदांचा उद्देश स्पष्ट आहे
भारतात जे काही करायचे ते धर्माच्या माध्यमातून असे ठासून सांगणारे विवेकानंद अंध संस्कृतीरक्षक मात्र नव्हते  . सीतेचा आदर्श स्त्रियांपुढे ठेवणारे विवेकानंद धर्ममार्तंडांना रोखठोक विचारतात की, स्त्री पुरुषांच्या ठिकाणी बाह्य भेद असले तरी स्वरूपत: त्यांच्यात काही फरक नसतो. यामुळॆ पुरुष जर ब्रह्मज्ञ होऊ शकत असेल, तर स्त्री का नाही   होऊ शकणार?” ते पुढे म्हणतात की, “बालविवाह मला अगदी घृणास्पद वाटतोही प्रथा गाडून टाकण्याचा शक्य तितका प्रयत्न केलाच पाहिजेबालिकेसाठी वर पाहून देणाराचा मी खूनही करू शकेन…” (पान ९२, भारतीय नारीबालविवाहाद्वारे स्त्रीला केवळ प्रजोत्पादनाचे यंत्र बनवून टाकणे अत्यंत घृणास्पद बाब होय. बालविवाहाचे मूळ तत्त्व नष्ट होता उशीरा विवाह व्हावेत असेही ते आग्रहाने सांगतात. इथे बालविवाहाचे तत्त्व म्हणजे व्यक्तीस्वातंत्र्याची आतिरेकी मागणी विसरून समाजातील अधिकाधिक लोकांच्या सुखाला प्राधान्य द्यायचे.

(हिंदुस्थान प्रकाशन संस्थेच्या 'कृतिरूप विवेकानंद' या लेखसंग्रहातील लेख) 

(विवेकानंदांचा  फोटो आंतरजालावरून साभार) 

7 comments:

  1. स्वामी विवेकानंद म्हणजे हिंदूंच्या वतीने अवघ्या विश्वाला सत्याची शिकवण देणारा महामानव... जो विचार आताचे सुधारित म्हणवणारे लोकही करू शकत नाही तो त्यांनी दीडशे वर्षांपूर्वी केलेला दिसतो. वरील माहितीबद्दल अनेक धन्यवाद...

    ReplyDelete
  2. स्वामीजींसारखा महापुरुष आपल्या देशात जन्माला आला ही एक गोष्टही आपल्याला जगात ताठ मानेने मिरवण्यासाठी पुरेशी आहे !

    ReplyDelete
  3. इंद्रधनू, तुम्ही 'विवेकानंदाची पत्रे' जरूर वाचा. तुम्हाला आवडतील ती.

    ReplyDelete
  4. हेरंब,पण आपण त्यांच्या विचारांचं अनुसरण करत असू तर! नाहीतर नुसतेच 'ताठ' अनुयायी काही कमी नाहीत आपल्या देशात :-)

    ReplyDelete

  5. 'विवेकानंदाची पत्रे' नक्की मिळवून वाचेन... त्यांची काही व्याख्याने वाचली आहेत. विवेकानंद केंद्रातर्फे होणारी परीक्षा एकदा दिली होती. पण त्यापुढे काहीच नाही याचं वाईट वाटतंय... :(
    अवांतर: ताई मला 'तुम्ही' नका म्हणू... 'तू'च म्हणा... :)

    ReplyDelete
  6. मी वाचलंय 'विवेकानंदाची पत्रे'.. अप्रतिम आहे.

    रच्याक.. प्राची, सविताताई ऐकणार नाहीत. मी त्यांना कधीपासून सांगतोय मला तुम्ही म्हणू नका म्हणून :)

    ReplyDelete
  7. प्राची, हेरंब, आपल्या (आता हे तुम्ही दोघे असल्याने 'आपल्या'!)विनंतीवजा तक्रारीची नोंद घेण्यात आलेली आहे. योग्य ते बदल केले जातील याची खात्री बाळगा :-)

    ReplyDelete