ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, September 24, 2012

१३७. झाड

१.
पुस्तकाच्या पानातून
अचानक प्रकट होत
(मी प्रश्न विचारलेला नसतानाही)
तू म्हटलंस:
"जीवन समजून घ्यायचे आहे?
तर मग जरा नीटपणे झाड पहा."

असलं काही गूढ तत्त्वज्ञान सांगण्यासाठी
जगात प्रसिद्ध आहेस तू -
म्हणून  दुर्लक्ष केलं मी.

तशा सगळ्याच गोष्टी
मनाच्या तीरावर
पेलून न्यायच्या म्हटलं तर
जगणं  मुश्किल होतं
हा अनुभव गाठीशी ताजातवाना
म्हणून कदाचित सौम्य हसता आलं मला.

२.
पण तेव्हापासून नकळत
जाणीवेच्या - नेणीवेच्या
त्यांच्या अस्फुट तीरावर रेंगाळणा-या
जीवनाच्या
अगाध तृष्णेचा
झाड एक भाग बनले.

Tree in Lalbag, Bangaluru, Age: 200 Years only
       
इकडं तिकडं भटकून,
सुख-दु:खांचं ओझं पेलून,
प्रश्नचिन्हं, विरामचिन्हं  घेऊन मी परत येते
तेव्हा घराइतकीच
स्थिर असतात
आणि परत अचूक सापडतात
माझ्या अंगणातील झाडं.

कधी पानं टाकून संन्यस्त होतात;
कधी रंगाने
उधळत माखून जातात;
वा-याच्या तालावर
सर्वांगे नाचतात;
सा-यात असून
नसल्यासारखी असतात.

मला वाईट वाटायचं
झाडांना मनसोक्त
भटकता येत नाही याचं;
उन्हाच्या तापातून
झाड मायेच्या सावलीत
आणून ठेवता येत नाही याचं;
मूळ तोडून निघून जावं
अशी शक्यताच नसलेल्या
त्यांच्या स्थिर आयुष्याचं.

काहीही झालं,
तरी तिथंच राहायचं;
रोज भोवताली
तेच पाहायचं;
पाखरांच तेचं गाणं
सकाळ-संध्याकाळ ऐकायचं;
गर्दी असूनही
हरवून एकटचं राहायचं.

तशी सगळी झाडं
सारखीच भासतात मला;
कुठेही- कधीही- कशीही भेटली तरी-
अंतर्मनाशी जोडलं जाण्याची
एक जन्मजात देणगी
लाभली आहे त्यांना.

३.
हे सगळं
कधीतरी तुला सांगितलं.
तू ऐकून घेतोस
म्हणून सांगत जाते मी.
कधी तू ऐकलंच नाहीस तर
काय करेन मी
काही कल्पना नाही.

असो.
हे विषयांतर झालं.

तर नेहमीच्याच
प्रगल्भ समंजसपणाने
तू म्हटलंस:
"झाडांची कीव करू नकोस.
तो अधिकार तुझा नाही.
झाडं अशी आहेत '
कारण त्यांनी खुलेपणाने
स्वधर्माचा स्वीकार केला आहे."

बराच काळ
मौनात गेल्यावर
तू आणिक म्हटलंस:
"स्वयंनिर्णयाचा अधिकार पुन्हा मिळाला तरी
बहुसंख्य झाडं
हे असंच जगणं मागून घेतील
किंवा मिळवतील
याची खात्री आहे मला"

आकाश आणि माती
यांचा दुवा सांधताना
झाड सत्य पाहते;
क्षुद्र गोष्टींकडे
दुर्लक्ष करत वाढताना
झाड आत्ममग्न राहते;
अंग सैलावत
वा-याबरोबर मस्त झुलताना
झाड स्थिर राहते;
सारे गळून गेले
तरी त्यापल्याड
झाड जीवनाचा अर्थ पाहते.

देणारा आला
तर झाड घेते;
घेणारा आला
तर झाड देते;
कोणी नाही आलं
तरी झाड
खुशीत राहते.

बाकी सारे विश्व
कस्तुरीच्या शोधात
भटक भटक भटकते
तेव्हा झाड
मूळ रोवून
स्तब्ध साक्षी असते.

४.
शरीर, मन, बुद्धी, अहंकार,
वासना, स्वप्नं, आकांक्षा, लालसा,
सल, अपराध,  महत्त्वाकांक्षा, दौर्बल्य,
असमाधान, अस्वस्थता,
सुख, उत्कटता, आवेग
या फांद्यांचे
कुठेच न रुजणारे आयुष्य
आता अलगद
गूढ, तत्त्वज्ञ झाडांच्या
सलगीसाठी
राखून ठेवले आहे मी!!

12 comments:

  1. आह्ह... झाडाला तपस्व्याची उपमा देतात, पण खरं तर ते चुकतं. तपस्व्याला झाड म्हटलं पाहिजे. तेव्हा त्याच्या तपस्येची खरी कसोटी लागेल. पण झाडाला असली कसोटी वगैरे घ्यायची नसतेच. ते त्याच्या जागी असतं. स्थिर, स्थूल-सूक्ष्मात एकाचवेळी.
    दमदार रचना. थोडी लांबल्यासारखी वाटली. पण दुसऱ्यांदा वाचली तेव्हा कळलं की, 'अरे जिथं लांबल्यासारखी वाटते त्या तर त्या झाडाच्या पारंब्याच एक प्रकारे. त्या हव्यातच.'
    दमदार!

    ReplyDelete
  2. आभार.
    कविता लांबल्यासारखी जिथं वाटतेय - त्याचा तुम्ही लावलेला अर्थ आवडला :-)

    ReplyDelete
  3. सुंदर रचना.....काय बोलावे...अव्यक्त अशा झाडाला व्यक्त केले शब्दांनी तुमच्या..

    कधी पानं टाकून संन्यस्त होतात
    कधी रंगाने
    उधळत माखून जातात;
    सर्वांगे नाचतात;
    सा-यात असून
    नसल्यासारखी असतात.
    सा-यात असून
    नसल्यासारखी असतात

    झाडाला हे शब्द ऐकवले तरी....झाड म्हणेल.....सन्यस्त झाल्याशिवाय देवपण येत नाही....आणि मला जुनी पानं टाकल्याशिवाय नवी पानं घेवून रंग उधळता येत नाहीत...

    ....आवडले मनापासून....अतुल.

    ReplyDelete
  4. प्रतिसादाबद्दल आभारी आहे अतुलजी.
    हं, झाड काय म्हणेल तेही बरंच काही आहे म्हणायला आपल्याला :-)

    ReplyDelete
  5. तशा सगळ्याच गोष्टी
    मनाच्या तीरावर
    पेलून न्यायच्या म्हटलं तर
    जगणं मुश्किल होतं
    हा अनुभव गाठीशी ताजातवाना
    म्हणून कदाचित सौम्य हसता आलं मला..........मनापासून भावले....................खूपच मस्त

    ReplyDelete
  6. आवडली !!!!

    देणारा आला
    तर झाड घेते;
    घेणारा आला
    तर झाड देते;
    कोणी नाही आलं
    तरी झाड
    खुशीत राहते.

    हे सगळ्यात आवडल ..! सोप्प आणि अवघड !

    ReplyDelete
  7. अपूर्वा, सोपं आणि अवघड .. हं, विचारांत पाडणारं आहे खरं!!

    ReplyDelete

  8. "मला वाईट वाटायचं
    झाडांना मनसोक्त
    भटकता येत नाही याचं"
    महाजनसर म्हणतात कि photosynthesis आणि भटकंती एकत्र होऊ शकत नाही...त्यामुळे झाडं स्थिर आहेत.

    सगळ्या पृथ्वीचं अन्न तयार करण्यासाठी त्यांनी केलेला हा सगळ्यात मोठा त्याग आहे!!
    वनस्पतीशास्त्र, उर्जाशास्त्र अन तत्त्वज्ञान सगळं मिळून एकच झाड!!

    आणि,
    "झाडं अशी आहेत
    कारण त्यांनी खुलेपणाने
    स्वधर्माचा स्वीकार केला आहे"

    यातच झाड असण्याचं सार आलं
    सुंदर आहे कविता.... पुन्हा पुन्हा वाचावी अशी!!

    ReplyDelete
  9. झाड इतके समरसून गेलेत, जीवनाशी कि आपली दखल घेणे हा एक निव्वळ उपचार होऊन जातो.
    >>> पुन्हा पुन्हा वाचावी अशी!!..हे निश्चित.
    झेन तत्त्वज्ञानाची आठवण झाली, कविता वाचून.

    ReplyDelete
  10. अनुज्ञा, "photosynthesis आणि भटकंती/स्थिरता" हा महाजन सरांनी सांगितलेला मुद्दा मी विसरून गेले होते पार.

    हा झाडांचा स्वधर्म असेल तर त्याला 'त्याग' म्हणावं का - हाही प्रश्नच!

    ReplyDelete
  11. दुरितजी, आपलं स्वागत आणि आभार प्रतिसादाबद्दल.
    झेन तुम्हाला आठवलं, कारण झाडं ते स्वाभाविकपणे जगतात - असं असावं.

    ReplyDelete