मी ओरिया बोलणा-या
स्त्रिया आणि मुला-मुलींमध्ये आहे. त्यांना हिंदी बोलता येत नाही आणि मला ओरिया/ओडीया
बोलता येत नाही, पण आमच्यात संवाद चालू आहे. माझ्यासोबत अनुवाद करणारे म्हणून दोन
तीन लोक आहेत – पण त्यांना पुरुषांशी बोलण्यात जास्त रस आहे. माझ्या ओडिया न
येणा-या सहका-यांनी त्या अनुवादकांना जणू बांधून ठेवले आहे. त्या अनुवादाकांवर
अवलंबून बसले तर मला काहीच बोलता येणार नाही इथल्या लोकांशी हे माझ्या चांगलेच
लक्षात आले आहे कालच्या अनुभवावरून. म्हणून मी एकटीच गावात भटकते आहे.
मला पाहून स्त्रिया
माझ्याभोवती गोळा होतात. मी त्यांना त्यांच्या घराबाबत विचारते. भाषा येत नसल्यामुळे
आमचे बोलणे हातवारे आणि खाणाखुणा यांच्या माध्यमातून चालले आहे. मी त्यांच्या घराकडे
बोट दाखवून आत जायची इच्छा व्यक्त करते आणि त्या मला घरात घेऊन जातात. काल दोन
गावांत जाऊन आल्यामुळे मी काही ओडिया शब्द उचलले आहेत. जमलेल्या स्त्रियांना किती
मुले आहेत, ती शाळेत जातात का, पाणी किती लांबून आणावे लागते, स्त्रियांचा स्वयंसहायता
समूह आहे का, त्यांच्याकडे किती गायी आहेत, रोज त्या काय खातात, जळणासाठीचा लाकूडफाटा
आणायला जंगलात किती लांब जावे लागते असे माझे अनंत प्रश्न.
कधीकधी आमचा गोंधळही
होतो. उदारणार्थ मी विचारते की “अंगणवाडीत किती मुले आहेत?” ती स्त्री म्हणते “गुट्टे”.
– म्हणजे एक. आता अंगणवाडीत फक्त एक मूल असणार नाही इतके मला समजते. मी पुन्हा तो
प्रश्न विचारते, पुन्हा तेच उत्तर येते – “गुट्टे”. त्या संवादाला बहुधा कंटाळून
दुसरी एक स्त्री धावत जाते आणि एका तीन वर्षाच्या मुलाला बखोटीस धरून माझ्यासमोर
उभी करते. त्या बाईला एकच मुलगा आहे हे त्या स्त्रिया मला समजावून सांगायचा
प्रयत्न करताहेत. “मूल” म्हणजे “मुलगे” हे पुन्हा एकदा माझ्या लक्षात येत. असो.
माझ्या इतर प्रश्नांना काय प्रकारची उत्तरे मिळाली असतील हे माझ्या ध्यानात येत.
पण त्यामुळे माझे काही बिघडत नाही – आमचे एकमेकींशी बोलणे होते आहे याचाच आम्हाला
आनंद आहे.
माझ्याभोवती
जमलेल्या स्त्रिया आणि मुले-मुली मनसोक्त हसत आहेत. त्यांची भाषा येत नाही अशा
कोणा व्यक्तीला ते सगळे आयुष्यात पहिल्यांदाच भेटताहेत बहुतेक – त्यांना या
वास्तवाच प्रचंड आश्चर्य वाटतय. मी एखादा दुसरा ओडिया शब्द बरोबर बोलले की ते मला
प्रोत्साहन देताहेत.
आम्ही चार दिवसांत
आठ वेगवेगळ्या आदिवासी गावांत जातो आणि मला अनेक गोष्टी पहायला मिळतात. म्हणजे
आपल्या लहान मुलांची प्रेमाने काळजी घेणारे पुरुष इथे दिसतात. जे शहरी लोकांना
शिकवाव लागत ते हे लोक सहज करतात.
मला ‘न बोलता येणारी’
(मुकी) एक स्त्री भेटते. तिला मला खूप काही सांगायच आहे. ती माझा हात धरून मला
तिच्या घरात ओढून नेते आणि ती एक चटणी बनवणार आहे त्याची तयारी मला खुणांनी
दाखवते. मला तीन स्त्रिया भेटतात – ज्या मला नियामगिरीतल्या धरणी मातेच्या देवळात
घेऊन जायला तयार आहेत. त्यांची अट एकच आहे – मी साडी नेसून आलं पाहिजे. त्यांच्या
धरणी मातेला सलवार-कुर्ता चालत नाही आणि आज मी तो घातलेला असल्यामुळे त्या मला
देवळात नेऊ शकत नाहीत.
दोन स्त्रियांना ‘त्यांचे
नाव त्यांना लिहिता येते’ हे मला सांगायचं आहे. त्या माझ्या वहीत त्यांच नाव
आत्मविश्वासाने लिहितात.
मग एक स्त्री मला
माझ नाव लिहायला सांगते – मला लिहिता येत की
नाही याची जणू त्या परीक्षा घेताहेत. मला ओडिया येत नाही अस सांगितल्यावर
त्या मला ‘इंग्रजीत’ लिहायला सांगतात. मी ते लिहिते. एक मुलगा ते नाव मोठ्याने (आणि
बरोबर) वाचतो आणि सगळे पुन्हा एकदा हसतात.
मला एक वृद्ध स्त्री
भेटते – ती दुकान चालवते. मी तिचा फोटो काढते तेव्हा ती मला तो फोटो मागते. ती
सांगते की तिला तो फोटो तिच्या दुकानात लावायचा आहे. मी तिला तो फोटो ‘नंतर पाठवून
देते’ अस म्हटल्यावर ती ‘सगळे असच म्हणतात, पाठवत मात्र कोणी नाही फोटो’ अस म्हणते
– हे ती ओडीया भाषेत म्हणते पण मला समजत! भाषा किती भावानावाही असते याच मला तिथ
प्रत्यंतर येत!
एका गावात मुली मला
नदी किनारी ओढून नेतात. तिथ स्त्रिया अंघोळ करतात, भांडी घासतात आणि कपडेही धुतात.
त्यासाठी साधारण ५० फूट उतरून जावे लागते – ती उतरण घसरडी आहे त्यामुळे दोन मुली
माझे हात पकडून मला नेताहेत. मी उतरताना मला जो वेळ लागतो आहे त्यामुळे त्या
मनसोक्त हसताहेत.
एका गावात देवळाबाहेर
एक दगड आहे. बरीच चालल्यामुळे दमून मी त्या दगडावर टेकते ते पाहून एक आदिवासी
पुरुष धावत माझ्याकडे येतो. ज्याला मी दगड समजले तो त्यांचा देव आहे असे तो मला
समजावून सांगतो. मी या चुकीबद्दल त्याची क्षमा मागते आणि तो हसून मला माफ करतो – ‘आमच्या
भावना/श्रद्धा तुम्ही दुखावाल्यात’ अस काही म्हणून लगेच हिंसक व्हायचं असत हे
त्याला माहिती नाही. तो मला त्या देवळाची सविस्तर माहिती देतो – तो माझ्यावर खरच
रागावला नाही याची जणू ती एक प्रकारची पावती असते! मी मुद्दाम काही केलेल नाही
केवळ अजाणतेपणान मी त्यांच्या देवाला दगड समजले हे त्याने सहज स्वीकारल आहे.
नियामगिरी परिसरातली
ही माझी पहिली भेट. मी ‘नियामगिरी’च्या प्रथमदर्शनी प्रेमात पडते. त्या
हिरव्यागर्द डोंगराच्या आसपासची शांती अभूतपूर्व आहे. खर तर या परिसरात एका खाण कंपनीच्या विरोधात
वातावरण तापलेले आहे. म्हणून मी आधी इथ यायला तयारही नव्हते – भीतीने नाही तर आपण
कोणाच्या बाजूने आहोत (म्हणजे मी काम करत असलेली संस्था कोणाच्या बाजूने आहे) याच
नेमक उत्तर माहिती नसल्याने! पण तरी मी इथ आले आहे आणि त्याचा मला आनंद आहे. कारण
या भेटीमुळे खर काय चित्र आहे या परिसरातल याचा मला अंदाज आला आहे.
या परिसरातल्या तीन
दिवसांच्या वास्तव्याने माझ्या जगण्यात मोलाची भर टाकली आहे. म्हणजे भाषेचा गंध
नसताना अस लोकांमध्ये मिसळण, त्यांच्याशी संवाद साधण, त्यांनी खुल्या मनाने मला
सामावून घेण .... ही एक प्रकारची जादू आहे आयुष्यातली आणि त्याचा अनेकदा अनुभव
घेऊनही प्रत्येक वेळी मला नवल वाटत राहत. केवळ भाषेतून, शब्दांतून संवाद साधण्याची
कला आपल्याला शिकवली जाते – पण इथे तर किती वेळा भाषेविना, शब्दांविना केवळ
हसण्यातून आम्ही एकमेकांशी नात्यांचे पूल बांधलेले आहेत, परस्पर विश्वासाचे धागे
जोडले आहेत!
पुण्यात मी परतते
तेव्हा सभोबताली दिवाळीमय वातावरण आहे. सगळेजण आनंदात आणि मजेत आहेत. मला मात्र नियामगिरीच्या
आदिवासींची झोपडी आठवते आहे – त्यांच्या ताटात फक्त डाळ-भात आहे, अंगावर पुरेसे
कपडे नाहीत, त्यांची गरीबी डोळ्यात पाणी आणणारी आहे. त्यांना रस्ते नाहीत, वीज
नाही, अंघोळ करायची तर ५० फूट खाली उतरून जाण्याला पर्याय नाही .. मला ते सगळे आठवते.
माझे हे सुखसमृद्धीचे
जग आणि नियामगिरीच्या आदिवासींचे मूलभूत सुखसोयींच्या अभावाचे जग यात पूल सांधण्याची,
पूल बांधण्याची गरज आहे. अन्यथा आयुष्यभर चालून मी शेवटी मुक्कामाला पोचणार नाही
कोणत्याच! मग आजवरचे सगळे पूल निरर्थक होऊन जातील.
**
chhan...mala aamacha melghatatalaa abhyaas doura aathavala...kiti dari aahe aapalyaat...ti kashi sandhayachi....aani kadhi?
ReplyDelete:((
ReplyDelete:((
ReplyDeleteखरय हे असे पूल बांधण खूप आवश्यक आहे.....
अश्विनी, आपण पूल बांधत राहायचे, त्याचा गरीबांना खरच किती उपयोग होतो हा प्रश्नच आहे!
ReplyDeleteहेरंब, ही वस्तुस्थिती आहेच भवताली.
अपर्णा, जे मी अश्विनीला म्हटल, तेच पुन्हा म्हणते.
माझे हे सुखसमृद्धीचे जग आणि नियामगिरीच्या आदिवासींचे मूलभूत सुखसोयींच्या अभावाचे जग यात पूल सांधण्याची, पूल बांधण्याची गरज आहे. अन्यथा आयुष्यभर चालून मी शेवटी मुक्कामाला पोचणार नाही कोणत्याच! मग आजवरचे सगळे पूल निरर्थक होऊन जातील. >>>>>
ReplyDeleteसत्यवचन!
आपल्या आणि आपल्या स्वकियांच्या आशा-आकांक्षांमध्ये पडत चाललेली दरीच आपण मिटवून टाकण्याची गरज आहे.
आपली मूलभूत इप्सिते काय आहेत, याचा शोध घ्यायला हवा आहे. तोही सत्वर!!
आपले लिखाण यथातथ्य आणि संयमित आहे. आवडले.
संत सोहिरोबा म्हणतात,
"विवेकाची ठरेल ओल
ऐसे बोलावे की बोल
आपुल्या मते उगीच चिखल
कालवू नको रे
हरीभजनाविण काळ
घालवू नको रे"
तुमचे लिखाण "विवेकाची ओल" ठरावे इतके नितळ आहे.
उर्जस्वलजी, तुमची बहुतेक इथली ही पहिलीच भेट आहे, तुमच स्वागत आहे. तुम्ही म्हणता तशी मूलभूत शोधाची प्रक्रिया सत्वर व्हायला हवी आणि तशीच ती निरंतर चालायलाही हवी.
ReplyDeleteसंत सोहिरोबांचे शब्द फार मोठे (व्यापक आणि गहिरे) आहेत. आकाशवाणीवर सकाळी हे भजन नेहमी लागते - ते पूर्वी मी नियमित ऐकत असे त्याची आठवण आली.
तुमच्या शुभेच्छांबद्दल कृतज्ञ आहे मी.
तसे पूल बांधण्याची खरच गरज आहे ग ....तुला भेटलेल्या वेगवेगळया स्त्रियाबरोबर घडलेल्या प्रसंगातून त्याचं भावविश्व छान सादर केल आहेस...
ReplyDeleteबाकी हा असा मुकसंवाद ह्या जानेवारी महिन्यात मलाही करावा लागला होता कर्नाटकाच्या जंगलात ... मनापासून बोलायला गेल कि भाषेच काही अंतर राहत नाही....
देवेन, ब-याच दिवसांनी फडशा पाडायला बसलेला दिसतोस तू :-)
ReplyDeleteहो, मूक संवाद अनेकदा शब्दांपेक्षा जास्त चांगला होतो!