ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, April 10, 2012

१२१. फिरोजशाह कोटला

दिल्ली आणि फिरोजशाह कोटला हा शब्दांच एकचं नात माहिती होत आजवर. बरोबर ओळखलत - क्रिकेट स्टेडियम. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी दिल्ली टुरिझमच्या बसने प्रवास करताना (हो हो बस) बसमधले अनेक जण 'फिरोजशाह कोटला' या ठिकाणी उतरले तेव्हा मला 'स्टेडियम काय पहायचं' असं वाटलं होत.

त्याआधी कधीतरी एकदा Delhi Metro Walk गटाबरोबर चांदणी  चौकात फिरायला गेले होते. त्यांच्याकडून मागच्या आठवडयात एक पत्र आलं - रविवारी सकाळी 'फिरोजशाह कोटला' कार्यक्रम असल्याच. मग माझ त्यादिवशीच कुतूहल पुन्हा एकदा फणा काढून जागं झालं आणि रविवारी सकाळी मी तिकडे गेले.

नेहमीप्रमाणे पटेल चौक मेट्रो स्थानकाच्या बाहेर भेट, तिथून नवी दिल्ली मेट्रो स्थानक, सायकल रिक्षाने ब्रॉडवे हॉटेलला पोचणे (वाटेत तुर्कमान गेट पाहणे)  आणि तिथून दिल्ली दरवाजा. चालताना एका बाजूचा रस्ता पूर्ण बंद केलेला दिसला. चौकशी केल्यावर कळल की या दर्यागंज भागात दर रविवारी 'पुस्तक बाजार' असतो.  वाटेत दिसलेलं 'तुर्कमान गेट' मला ऐकून माहिती होत ते १९७६ मध्ये आणिबाणीच्या काळात त्या परिसराची 'सफाई' करण्याचा संजय गांधी यांचा प्रयत्न आणि त्यावेळी झालेला गोळीबार या संदर्भात.  दिल्ली दरवाज्यापासून फिरोज शाह कोटलाकडे जाणारा मार्ग प्रशस्त आणि स्वच्छ होता.

खर तर दिल्लीच्या बाबतीत अशी एक धारणा आहे की जो कोणी इथं नवं शहर वसवायचा प्रयत्न करतो; त्याला  सत्ता सोडावी लागते.  अगदी ब्रिटीशांनीही 'आठव  शहर' निर्माण केल आणि त्यांना काही काळातच भारताची सत्ता सोडावी लागली.

तरीही ८व्या शतकापासून ते २० व्या शतकापर्यंत  निरनिराळ्या सत्ताधीशांनी नवनवी शहरे वसवली - आणि या प्रत्येक काळात 'दिल्ली' शहर म्हणजे काय याच्या व्याख्या बदलत राहिल्या. त्यामुळे शहजाहानाबाद या सातव्या शहरात 'दिल्ली दरवाजा' स्वाभाविक असतो - एरवी  दिल्ली शहरात 'दिल्ली दरवाजाच' प्रयोजन काय हे इतिहास माहिती नसेल तर गोंधळाच वाटू शकत. नवी दिल्ली आणि जुनी दिल्ली हे आता वापरले जाणारे शब्द नव्या जमान्यातले आहेत  - त्यांचा इतिहास मात्र वेगळा आहे याच भान ठेवावं लागत सतत.

सातव्या शहरात एकूण १४ दरवाजे होते त्यापैकी आता काश्मिरी , अजमेरी , तुर्कमान आणि दिल्ली हे चार दरवाजे शिल्लक आहेत.  दिल्ली दरवाजाची परिस्थिती - मुख्यत्वे त्याच्या समोरचा परिसर अगदी घाण होता. .

चालत आम्ही फिरोजशाह कोटलाकडे निघालो तेव्हा कळल की आम्ही दिल्लीच्या पाचव्या शहरात प्रवेश करत होतो आणि या शहरांच नावं होत फिरोजाबाद. १३५१ ते १३८८ या काळात फिरोजशाह तुघलक याने या शहराची निर्मिती केली. कोटला म्हणजे कोठी किंवा महाल. फिरोजशहाचा  महाल म्हणून फिरोजशाह कोटला. क्रिकेट स्टेडियम इथून काही मीटर अंतरावर - म्हणून त्याला नावं दिलं फिरोजशाह कोटला.

आज या  महालाचे अर्थात फक्त अवशेष आहेत. दिल्लीत असे अवशेष - खंडहर - जिकडे तिकडे पहायला मिळतात. त्यामुळे नजर मेल्यासारखी होते एका अर्थी. शिवाय अशा स्मारकांची माहिती ऐकण्यात कोणालाही फारसा रस नसतो आणि सांगणारेही नसतात. सुदैवाने मी ज्या समुहाबरोबर गेले होते त्या सगळ्यांना फोटो काढण्यातच फक्त रस नव्हता तर माहिती जाणून घेण्यात पण होता. गटातले निम्मे लोक दिल्लीबाहेरचे होते - पाच जण विदेशी, मी दिल्लीच्या बाहेरची आणि बाकी सगळे दिल्लीचे. आपण या शहरातले असून दिल्लीची आपल्याला माहिती नाही, त्याचा दिल्लीकरांना संकोच वाटत होता. पण त्यामुळे आमची चर्चा चांगली झाली.

फिरोजशाह तुघलक . १३०९ ते २० सप्टेंबर १३८८ हा त्याचा जीवनकाळ. मोहम्मद बिन तुघलकच्या मृत्यूनंतर याच्या हाती सत्ता आली. त्याच्याही राज्यात भ्रष्टचार होता हे वाचताना इतिहासाची नाळ अजून तुटली नाही म्हणून  हसावं की रडावं हे कळलं नाही. त्याच्या कारकीर्दीत पुष्कळ बागा तयार केल्या गेल्या, सराई (धर्मशाळा) आणि कबरी बांधल्या गेल्या  - त्यातून लोकांना काम मिळाले.  शिक्षण अधिक खुले करण्यासाठी त्याने मदरसा खुल्या केल्या. त्याने ३०० गावे वसवली आणि पाच मोठे कालवे  खोदून अधिकाधिक शेतीला पाणी मिळावे याची व्यवस्था केली. त्याने अंबाला आणि मीरतमधून अशोकाचे दोन स्तंभ आणले आणि त्यातला एक स्वत:च्या महालात उभा केला जो आजही आहे. कुतुब मिनारवर वीज पडून  त्याचा वरचा भाग कोसळला तेव्हा त्याने सर्वात वरचे दोन मजले नव्याने बांधले.  हिंदुंच्या दृष्टीने मात्र त्याची कारकीर्द फार सुखावह नव्हती कारण त्याच्या राज्यात हिंदुना जिझिया कर भरावा लागत असे आणि त्यांची कत्तलही मोठया प्रमाणात केली गेली.

या महालातल्या मशिदीला  'जामि मशिद' म्हटले जाते - जामा आणि जामि यात नेमका काय फरक आहे ते मला नाही माहिती.  आजही या मशिदीत तीन वेळा नमाज होतो. मशीद प्रचंड मोठी आहे आणि तिच्या बाजून एके काळी यमुना वहात होती तेव्हा दृश्य रमणीय असेल यात शंकाच नाही.  आता एका बाजूला सुमारे सातशे वर्षांपूर्वीचे बांधकाम आणि दुस-या बाजूला फ्लायओव्हरवरून धावणा-या आधुनिक गाड्या .. असा एक नव्या जुन्याचा संगम आढळतो.


अशोक स्तंभ ज्या चौथा-यावर आहे तिथून परिसराच एकंदर दृश्य दिसलं. त्या काळी आपल्यासारख्या सामान्य लोकांची इथवर यायची काही टाप झाली नसती हे जाणवून गमंत वाटली.

या ठिकाणच आणखी एक आकर्षण म्हणजे ''बाऊली". अनेक वर्ष हिची दुरुस्ती चालली होती म्हणून ती बंदच होती. शिवाय अपघात, दुर्घटना या होतातच अशा ठिकाणी. त्यामुळे पूर्वपरवानगी काढून सुरक्षा रक्षकांच्या सोबतच आता तिथे जावे लागते. "बाऊली" स्वाभाविकपणेच एकदम थंड होती. उतरायच्या पाय-या ब-यापैकी सुस्थितीत होत्या. पाण्यावर भरपूर शेवाळ साठलेले होते. यमुना पूर्वी जवळून वाहात होती - आजही झ-यांच्या पाण्याने विहीर भरलेली आहे. डागडुजी करून आता तिथले पाणी पंपाने उचलून भोवतालच्या बागेला पुरवले जाते.  आम्ही थेट आत उतरलो - म्हणजे पाण्यात नाही पण अगदी हातभर अंतरावरून ते जुने दिसणारे पण प्रत्यक्षात नवे असणारे पाणी न्याहाळताना मजा आली. पूर्वी हा फिरोजशाहच्या कुटुंबियांचा 'हमाम' होता म्हणे!

आणखी एक गमतीशीर गोष्ट म्हणजे दर गुरुवारी संध्याकाळी इथे हजारो लोक येतात - इतक्या संख्येने की तिकीटविक्री बंद ठेवून प्रवेश खुला करावा लागतो. कशासाठी? आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून लोक इथं 'जिन'ची पूजा करतात - इतकेच नाही तर त्यांना पत्रही लिहितात. हे साधारणपणे १९७० च्या आसपास सुरु झाले - पण त्याचा नेमका इतिहास अजून नीट शोधायला लागेल मला. आमच्यातल्या एकाने सुरक्षा रक्षकाला "दिसतात का रे बाबा खरोखर जिन?" असे विचारल्यावर त्याने अगदी नेहमीचे यशस्वी उत्तर दिले, "साहेब, ज्याची श्रद्धा असते, त्याला दिसतात." मी त्यावर मनापासून हसले.

येताना आम्ही 'खुनी दरवाजा' पाहिला. याचे मुळचे नाव 'काबुली दरवाजा' असे साधे सरळ होते, पण इथे घडलेल्या घटनांमुळे आणि या जागेच्या वापरामुळे याला हे वाईट नावं पडले आहे. इथे डाव्या बाजूला मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत देखणी दिसते. त्यांनतर आम्ही पारसी धर्मशाळेत गेलो आणि त्यांची माहिती जाणून घेतली. दिल्लीत फक्त ८०० च्या आसपास पारसी धर्मीय लोक राहतात हे ऐकून आश्चर्य वाटलं.  मंदिरात अर्थात पारसी नसलेल्यांना प्रवेश नसतो, त्यामुळे ते लांबूनच पाहिलं. पारसी जेवणाचा स्वाद घेऊन आम्ही तिथून परत निघालो.

दिल्लीत फिरताना कधी कधी जाणवत की हे शहर एक प्रकारच्या आंतरिक संघर्षात अडकून बसलं आहे. पुढे जायचं तर इतिहास ओझ होऊन बसलेलं आहे - कारण इथला सत्तेचा इतिहास भयानक आहे. एका अर्थी तो आजच्यासारखाच आहे म्हणा! इतिहास जपायचा तर त्याला जी एक आर्थिक आणि मानसिक सुबत्ता लागते, ती इथं आमच्याजवळ नाही - बहुसंख्य लोक त्यांच्या स्वत;च्या समस्यांनी  ग्रस्त आहेत.   मला वाटत इतिहासाने वेढलेल्या सगळ्याच शहरांची ही एक शोचनीय स्थिती असते - इतिहासात रमणारे लोक या परिसरात राहत नाहीत  - ते उच्चभ्रू वस्तीत राहतात आणि इतिहास अनुभवायला इकडे येतात. जे ऐतिहासिक परिसरात राहतात त्यांचे रोजचे जगण्यामरण्याचे प्रश्न जास्त महत्त्वाचे असतात. त्यामुळे हा तिढा सुटणे अवघड दिसते.

पण दिल्ली जी आहे, ती जशी आहे - तशी का आहे या प्रश्नच उत्तर थोड थोड मिळत आहे मला दिल्लीच्या भटकंतीतून. अर्थात माझ्या या अति आत्मविश्वासाला दिल्ली हसत असणार आणि एखाद्या दिवशी ती मला वेगळच काही दाखवेल  याची मला  खात्री आहे ... त्यासाठी मी अर्थातच तयार आहे! 

18 comments:

  1. बाकीच्या सहा शहरांबद्दल पण लिहा तुम्ही अशी विनंती.

    ReplyDelete
  2. मी किती दिवसानंतर ब्लॉग्स वाचतेय गं ताई... दिल्लीबद्दल मुळातच खूप कमी माहिती आहे, त्यामूळे पोस्ट अगदी मनापासून वाचली.... शेवटच्या ओळी पटल्याही आणि आवडल्याही!!!

    ReplyDelete
  3. मैं दिल्ली हूँ, मैं दिल्ली हूँ,
    मैं धरतीपर पनाही ढुंडते
    इन्साँ की मंझिल हूँ
    मैं दिल्ली हूँ, मैं दिल्ली हूँ ।

    अशा मोहमयी दिल्लीचा तुम्ही छान वेध घेतला आहेत. आवडला!

    ReplyDelete
  4. माझ्या इतिहासप्रेमी मित्राने सांगितलेली फिरोझ तुघलकाची एक गंमत आठवली. त्याच्या राज्यात लाचखोरी एवढी बोकाळली होती, की फिरोझ तुघलकाने स्वतः त्यापुढे हात टेकले होते. त्याचा अधिकारी लाच मागतोय म्हणून तक्रार करायला एकदा एक नागरिक फिरोझ तुघलकाकडे गेला. फिरोझ तुघलकाने त्याला लाच देण्यासाठी पैसे दिले!

    ReplyDelete
  5. अनामिक/का,
    आभार. बघू, जमेल तसे लिहीन.

    ReplyDelete
  6. तन्वी, मलाही दिल्लीबद्दल खूप कमी माहिती आहे, शिवाय जी आहे ती अपुरी आहे ... पण शहर आणि माणसं यांच नात असं मजेदार असतच सगळीकडे.

    ReplyDelete
  7. नरेंद्रजी, कोणाच्या ओळी आहेत या? पूर्ण कविता वाचायला आवडेल.

    ReplyDelete
  8. गौरी, अशा ब-याच गमतीजमती आहेत त्याच्या. विकिपीडिया सांगतो: Firuz's reign has been described as the greatest age of corruption in medieval India. It can be imagined from the fact that Firuz once gave a golden tanka to a distraught soldier so that he could bribe the clerk to pass his sub standard horse.

    कोणाला महान मानायचे आणि कोणाला नाही हा आपला राष्ट्रीय संभ्रम दिसतो आहे जुनाच :-)

    ReplyDelete
  9. जुनीच परंपरा आहे ही :(

    ReplyDelete
  10. परंपरेचे पाईक आपण!!

    ReplyDelete
  11. दिल्ली...ती सुरक्षित नाही अशी माझी भावना झालेली आहे. चुकीची की बरोबर माहित नाही. परंतु, ती स्त्रियांसाठी सुरक्षित नाही हेच मी ऐकलेले आहे...माझ्या दिल्लीत रहाणाऱ्या मैत्रिणींकडून.

    "मला वाटत इतिहासाने वेढलेल्या सगळ्याच शहरांची ही एक शोचनीय स्थिती असते - इतिहासात रमणारे लोक या परिसरात राहत नाहीत - ते उच्चभ्रू वस्तीत राहतात आणि इतिहास अनुभवायला इकडे येतात. जे ऐतिहासिक परिसरात राहतात त्यांचे रोजचे जगण्यामरण्याचे प्रश्न जास्त महत्त्वाचे असतात. त्यामुळे हा तिढा सुटणे अवघड दिसते."
    नेहेमीप्रमाणे हे तुझं बारीक निरीक्षण...पटलं.

    ReplyDelete
  12. तुम्हांला खो दिलाय - http://meghanabhuskute.blogspot.in/2012/04/blog-post.html :)

    ReplyDelete
  13. अनघा, दिल्लीत राहताना मला माझ्या काही सवयी बदलून घ्याव्या लागल्या (उदाहरणार्थ सातच्या आत घरात) - पण अनोळखी शहरात असुरक्षितता असतेच आपल्या सोबत.

    निरीक्षण पटलं - हे वाचून अर्थातच बर वाटलं.

    ReplyDelete
  14. मेघना भुस्कुटे, :-)

    ReplyDelete
  15. छान वाटलं वाचून. बाकी, इतिहासात रमणारे लोक या परिसरात राहत नाहीत - ते उच्चभ्रू वस्तीत राहतात आणि इतिहास अनुभवायला इकडे येतात हे निरीक्षण मार्मिक.
    आणखी लोकसत्ताच्या सदरात तुमच्या ब्लॉगचा उल्लेख कौतुकाने केला होता. त्यासाठी खास अभिनंदन. :)

    ReplyDelete
  16. देविदासजी, आभार. निरीक्षण तुम्हाला पटलं, कारण तुमचाही तेच असणार निरीक्षण!

    ReplyDelete
  17. दिल्लीची वारी आवडली. माझा नवरा दिल्लीचा, (आता पुणेकर) आहे, त्यामुळे ’दिल्ली’ हा त्याच्या आवडीचा विषय. त्याच्याकडून ऐकून आणि दिल्लीवरचे असे लेख वाचून हळुहळु दिल्ली परिचयाची होत चालली आहे :-).

    ReplyDelete
  18. मोहना, दिल्लीला इतका इतिहास मोठा आहे की दमायला होत .. शिवाय संघर्ष, सत्तापिपासा.. हेही कायम. अजबघर आहे दिल्ली म्हणजे एक! मागच दीड वर्षच झालं मला इथं येऊन .. पण काही कळलच नाही अजून तिच्याबद्दल अशी स्थिती आहे!

    ReplyDelete