ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, April 30, 2012

१२३. साक्षर देव

देवाबद्दल आजवर बरच काही ऐकलेलं आणि वाचलेलं. त्यात त्याच्या/तिच्या गुणांची वर्णनं भरपूर. म्हणजे कोणताही देव किंवा देवी कसे सर्वशक्तिमान असतात, कसे दयाळू असतात, कसे सर्वज्ञ असतात, कसे सर्वव्यापी असतात, भक्तांची ते कशी काळजी घेतात आणि दुष्टांचा कसा संहार करतात अशा कथा नेहमीच कानावर आलेल्या. त्यातल्या काही रंजक, काही उद्बोधक, काही विचारांत पाडणा-या, काही नकळत त्यातल्या निरागसपणाने हसवणा-या. या सगळ्या गुणांच्या यादीत एक गुण कधी ऐकलेला नव्हता पण तो त्यादिवशी मला दिसला  (म्हणजे भक्तांची तशी श्रद्धा आहे हे दिसलं ). 'गोलू देवतेच्या' मंदिरात श्रद्धेच आजवर कधी न दिसलेलं एक स्पष्ट रूप होतं - ते म्हणजे 'ईश्वर साक्षर आहे; त्याला वाचता येत' ही भक्तांची श्रद्धा. 

मी एकदम निष्कर्षच सांगितला का तुम्हाला? थांबा, जरा नीट सांगते. 

मी होते अल्मोडा शहरात. उत्तराखंड (मला त्याच खर तर उत्तरांचल हे आधीच नाव जास्त आवडत!) राज्यातलं हे एक जिल्ह्याच शहर. या शहरांच एक आकर्षण डोक्यात होत आधीपासून ते विवेकांनंद वाड्मय वाचल्यापासूनच. १९९३ च्या शिकागो सर्वधर्मपरिषदेत भाषण देऊन गाजलेले विवेकानंद चार वर्षांनी भारतात परतले. त्यांच्या व्याख्यानांचा एक झंझावती दौरा मग सुरु झाला कोलंबो शहरापासून आणि त्यातलं शेवटाच भाषण झालं ते अल्मोडा शहरात. 'From Colombo to Almora' हे पुस्तक मी अर्थातच वाचलेलं होत. मायावतीचा 'अद्वैत आश्रम' पण तिथून जवळच आहे असा माझा समज होता पण पहाडात १२० किलोमीटरच अंतर म्हणजे एका दिवसाचा प्रवास असू शकतो हे मला अनुभवाने माहिती होत. पण तरीही अल्मोडा शहरात गेल्यावर जरा चाचपणी करून पाहायची अंतराची हे मी ठरवलं होत. 

हिमालयातल्या हवामानाचा फटका इथून निघतानाच आम्हाला बसला. ज्या दिवशी संध्याकाळी चार वाजता आम्ही अल्मोडा शहरात पोचण अपेक्षित होत त्यापेक्षा आम्ही तिथं एकोणीस तास उशीरा म्हणजे दुस-या दिवशी सकाळी अकरा वाजता पोचलो. तीन जिल्ह्यांतून आलेल्या स्वयंसहायता गटाच्या प्रतिनिधी स्त्रियांशी चर्चा झाली, उशीरा एकत्र जेवण झालं, संस्थेच्या कार्यकर्त्यांशी कार्यक्रमाविषयी चर्चा झाली, उद्याचा कार्यक्रम ठरला .. तोवर पाच वाजले. मी आपलं एकाला सहज 'अद्वैत आश्रम' किती दूर आहे ते विचारलं. तिथं जायला मला वेळ मिळणार नव्हता हे उघड होत - ते पुन्हा एकदा सिद्ध झालं. 

मग तिथल्या एक वरिष्ठ अधिका-याने सांगितलं, " दीदीला गोलू देवता मंदिरात घेऊन जा."

गोलू देवता? मला एखाद्या लहान मुलाच नावं वाटलं 'गोलू' हे; म्हणून गंमत वाटली. तसाही हातात वेळ होता, म्हटलं चला, आज गोलू देवतेच्या दर्शनाच भाग्य आहे ते घेऊया. 

गोलू देवतेच मंदिर बाहेरून कोणत्याही मंदिरासारखं वाटलं आधी. म्हणजे बाहेरचा अरुंद रस्ता, तिकडे दुकानांची गर्दी.. एक वातावरण असत ते वैशिष्टयपूर्ण. त्यामुळे आपण मंदिराच्या परिसरात पोचलो आहोत ते कळत आपण अगदी झोपेत असलो तरी.  आत्ता मात्र संध्याकाळची  वेळ असल्याने आमच्याव्यतिरिक्त कोणी भक्त नव्हते तिथे.  देऊळ बाराव्या शतकात चंद राजवटीत बांधलं गेलं आहे अशी माहिती नंतर मिळाली. 

मंदिराच्या आत प्रवेश करताना दोन्ही बाजूंना असंख्य घंटा दिसल्या टांगलेल्या. मला घंटा आवडतात .. देवळातल्या घंटा वाजवायला मला आजही मजा वाटते. एरवी देवळात गाभा-याकडे जाणा-या मार्गावर घंटा असतात - इथं मात्र त्या सगळीकडे दिसत होत्या. चारी भिंतींवर जिथं शक्य आहे तिथं घंटा होत्याच. त्यांची अगदी दाटीवाटी झाली होती. वेगवेळ्या आकाराच्या घंटा एकमेकीना खेटून बसल्या होत्या. उत्सवात भक्तांची व्हावी तशी त्यांची गर्दी होती. या देवळाला 'लक्ष घंटांच देऊळ' असंही म्हटलं जात हे मला एकाने सांगितलं - त्यात तथ्य असावे -  म्हणजे असतील अगदी एक लाख नाही पण हजारो घंटा. इतक्या सगळ्या घंटा एका वेळी वाजवता आल्या तर काय मजा येईल असं वाटून उपयोग नव्हता. कारण त्या सगळ्या घंटा वाजवायच्या तर मला तिथं काही वर्ष नाही निदान काही महिने तरी नक्कीच घालवावे लागले असते. त्यातल्या छोटया घंटा वा-याच्या झुळूकीसोबत किंचित किणकिणत होत्या ते ऐकून 'अद्वैत आश्रमात' जाण्याची संधी  हाताशी नसल्याने खट्टू झालेलं माझ मन सुखावलं. इथं पशुबळीही देतात भक्त -पण आज आम्हाला काही ते दृश्य सुदैवाने पहायला लागलं नाही. 

"इतक्या घंटा का आहेत इथं" या माझ्या प्रश्नाची अपेक्षाच करत होते स्थानिक लोक. त्यांनी उत्साहाने सांगितलं की, नवसाला देव पावला की भक्त त्याची खूण म्हणून एक नवी घंटा देवाला अर्पण करतात. म्हणजे इथं जितक्या घंटा दिसताहेत, कमीत कमी तितक्या लोकांचे नवस पूर्ण झालेले आहेत तर! 

अशा स्थानांभोवती परंपरेच्या, इतिहासाच्या, श्रद्धेच्या, संस्कृतीच्या  अनेक कथांचे पदर असतात. इथेही ते आहेत. गोलू देवता हा 'गौर भैरवाचा' म्हणजे शिवाचा अवतार मानला जातो. या अवताराचे वैशिष्टय म्हणजे ही एक 'न्याय देवता' मानली जाते. आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार इथे करायची आणि गोलू देवता या अन्यायाचे परिमार्जन करते अशीही भक्तांची श्रद्धा आहे. उत्तराखंडमधल्या कुमाऊ परिसरात गोलू देवतेची अनेक मंदिरे आहेत. 

दुस-या एका कथेनुसार चम्पावत प्रदेशात गोलू  नावाचा एक राजा होऊन गेला , तिस-या एका कथेनुसार तो एका सैन्याचा अतिशय शूर सेनापती होता आणि तो धारातीर्थी पडल्यावर त्याच्या स्मरणार्थ हे मंदिर उभारले गेले. चुकीचा आळ घेतला जाऊन गोलूची एका राजाने हत्या केली अशीही एक कथा आहे. राजाच्या आवडत्या राणीला मुलगा झाला तेव्हा इतर राण्यांना मत्सर वाटून त्यांनी त्या मुलाला पिंज-यात घालून नदीत सोडून दिला तो पिंजरा आणि राणीच्या कुशीत दगड ठेवून दगड जन्माला घातला अशी बतावणी केली. पिंज-यात सोडून दिलेला तो मुलगा एका कोळ्याच्या घरी वाढला. पुढे तो मुलगा राजाला सापडतो , हाच आपला मुलगा आहे याची त्याला खात्री पटते आणि तो मुलगा पुढे 'ग्वाल्ला देवता' म्हणून ओळखला जातो अशी आणखी एक कथा आहे. 

इसवी सन ७०० ते इसवी सन १३०० या कालावधीत अल्मोडा जिल्ह्यात ४०० मंदिरे बांधली गेली असं इतिहास सांगतो. या परिसरात भैरवाची आठ देवळे आहेत - आठही दिशांनी ते शिवाचे संरक्षण करतात असे मानले जाते. 

देवळात थोड आणखी आत गेल्यावर माझ लक्ष गाभा-याकडे गेलं आणि मी चकित झाले. कारण आता पहिल्यांदाच माझ लक्ष तिथे लटकत असलेल्या कागदांकडे गेलं. मी मागे वळून पाहिलं, चारी दिशांना पाहिलं आणि मला एवढा वेळ न दिसलेले कागद सगळीकडे दिसायला लागले. 

'कसले कागद आहेत हे? आणि ते इथं कुणी आणि कशासाठी लावले आहेत?" मग त्यावर मला जे कळलं ते आजवरच्या माझ्या इतक्या भटकंतीत मी पहिल्यांदाच ऐकत होते. आपल्याला न्याय मिळावा म्हणून कोर्टात जसा  stamp पेपरवर लोक अर्ज करतात, तसाच अर्ज  इथंही केला जातो. विशेषत: न्यायालयात ज्यांच्या बाजूने निकाल लागत नाही, ते भक्त  पुढच्या न्यायालयात जावं या पद्धतीने इथं येतात. या कागदांची संख्या मोजदाद करण्याच्या पलीकडे होती. 

भक्त मंडळी चार प्रकारची असतात हे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे -आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. इथले भक्त पहिल्या आणि तिस-या प्रकारातले असणार - आर्त आणि अर्थार्थी - हे समजण्याजोग आहे. कदाचित एखादा जिज्ञासूही असेल म्हणा - देव भक्तांना असा पावतो का याची जिज्ञासा बाळगून कोणी तिथं अर्ज केला असेल तर माहिती नाही. अर्ज साधारण कोणत्या विषयांवर असतील हे कळायला कोणा समाजशास्त्रज्ञाची गरज नाहीये. शतकानुशतके लोकांच्या भौतिक गरजा आणि आकांक्षा एकाच प्रकारच्या राहिल्या आहेत - त्यांची बाह्य अभिव्यक्ती बदलते इतकेच काय ते बदलते! बाकी सारे तसेच नाळ जोडून असते जुन्याशी. 


मी सहज म्हणून दोन चार अर्ज वाचले. खर तर मी ते वाचण अपेक्षित नाही. गोलू देवता आणि त्याचे भक्त यांच्यातला हा मामला आहे. माझ्यासारख्या त्रयस्थ व्यक्तीच तिथं काही काम नाही. 

एका अर्थी वैयक्तिक इच्छा, आकांक्षा, स्वप्न, भ्रमनिरास, अपेक्षाभंग जगजाहीर करण्यातून माणसांच्या सुख-दु:खाचा योग्य पद्धतीने निचरा करण्याची ही एक समाजमान्य पद्धत असेल का? माणसाने भावनांच दमन करण्यापेक्षा त्या भावना व्यक्त करण्याचे वैध मार्ग समाजाने उपलब्ध करून देण्यात व्यक्तींचे आणि अंतत: समाजाचेही अधिक भले असते काय? कधीकधी प्रचलित शहाणपण अधिक उपयोगाचे ठरते म्हणतात. 

देवाला वाचता येत, देव साक्षर आहे - ही कल्पना अगदी अलिकडचीच असणार. ती नेमकी कधी आली ती सांगणारे मला कोणी भेटले नाही - पण ब्रिटीश राजवटीत शिक्षण, न्यायालय, अर्ज या गोष्टींना आलेले महत्त्व याच्यामागे असणार असा अंदाज बांधता येतो. धर्माच्या, परंपरेच्या, देवतेच्या शक्तीच्या, रुढीच्या आपल्या कल्पना बदलत जातात हे पुन्ह्पुन्हा दिसते. पण देवतेकडून आपल्या अपेक्षा मात्र त्याच आहेत - माझे, माझ्या कुटुंबाचे भले व्हावे - ते भले म्हणजे माझ्या इच्छेनुसार व्हावे. देवाने भले केले तर आम्ही त्याला परत काहीतरी देऊ - नवस फेडू असं म्हणायचं, पण तो एका अर्थी 'देव-घेवी'चा व्यवहार आहे आपला देवाशी. हे सगळ  काय आहे आणि जे आहे ते असं का आहे? 

गोलू देवतेला एका अर्ज लिहून मी या अशा प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी प्रार्थना करायला हवी होती - पण ते राहूनच गेलं .. पुन्हा कधीतरी ..

14 comments:

  1. देव या शब्दाचा अर्थ जाणिवा प्रकाशित करतो तो असा आहे.

    ReplyDelete
  2. तुमचा लेख आणि माझी कविता - देवाच्या दिशेला नेणारं एकदम लिहलं गेलं, त्याची गंमंत वाटली.
    छान आहे लेख. नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण.

    ReplyDelete
  3. आवडली पोस्ट, पोस्टेतली देवाची गोष्ट आणि एकंदरितच सगळं. घ्या आणि मुलं सांताला पत्र लिहितात तर आपण त्यांची मजा बघतो.. :)

    असो... दोन गोष्टींबद्दल एकमत "उत्तरांचल" मलाही आवडायचं...उत्तराखंड म्हणताना त्याचा तुकडा पडेल असा भार द्यावा लागतो बोलताना असं उगाच वाटतं... :P

    आणि "घंटा" मलाही आवडतात....छोट्या छोट्या घंट्या असणारं एक सुंदर विंड चाइम दिलं होतं मैत्रीणीने आणि मी ते वेड्यासारखं बाल्कनीत लावून त्यातले दोन मजले वार्‍यामुळे हरवलेत..आता आहे तो एक मजला घरात आणायला हवा..:)

    ReplyDelete
  4. शरयुजी, माहितीबद्दल आभार. पण या ठिकाणी लोकांनी देवाला अर्ज लिहिणे हे मला विशेष वाटल्याचे फक्त नमूद केले आहे. ही कृती ईश्वरविषयक काही वेगळ्या जाणीवेतून होते असे मला तरी दिसले नाही. जाणीव असली तर तीच पुरातन आहे - संकटातून रक्षण व्हावे, भले व्हावे अशा अर्थाची.

    तुम्हाला आणखी काही म्हणायचे होते आणि ते माझ्यापर्यंत पोचले नाही नीट असे तर होत नाही नां? मला आवडेल तुमचे मत विस्ताराने जाणून घ्यायला.

    ReplyDelete
  5. मोहना, हा एक योगायोगाच!

    ReplyDelete
  6. अपर्णा, सांताला पत्र लिहिण्याची तर ही नक्कल नसेल ना? किंवा नक्कल म्हणण्याऐवजी 'त्या प्रथेचा प्रभाव तर इथं पडला नसेल ना?" असा विचार मनात आला. जरा शोधायला हव इतिहासात. आणि खर तर स्थानिक माणसांशी बोलून बघायला हवं - काहीतरी धागा मिळेल त्यातून.

    ReplyDelete
  7. मस्तच.. देवाकडे अर्ज करून दाद मागणे हा प्रकार खरोखरच मनोरंजक..

    असाच एक मनोरंजक प्रकार माझ्या हैद्राबादच्या वास्तव्यात पाहायला मिळाला होता. श्रीशैलम् मंदिराच्या समोर एक गणपती मंदिर आहे. नाव विसरलो त्या देवळाचं पण तिथला गणपती एका वहीत काहीतरी नोंदवून घेतोय अशा प्रकारे बसला आहे. आपण तिकडे आपलं नाव, गोत्र वगैरे सांगायचं आणि (अर्थातच) तिथल्या ब्राह्मणाला दक्षिणा द्यायची. म्हणजे मग गणपतीने आपल्या नावाची नोंद केली हे गृहीत धरलं जातं. ते नाव तो पुढे श्रीशैलम् देवस्थानात आणि (बहुतेक चित्रगुप्ताकडेही) पाठवतो जेणेकरून आपण श्रीशैलम् ला येऊन दर्शन घेऊन गेलो हे त्या 'वरच्या' च्या बुकात नोंदलं जातं आणि पापपुण्याचा हिशोब करताना आपल्याला फायदा होतो. :))))))) I know I know.. it's so freaking funny !!

    ReplyDelete
  8. हेरंब, 'देव अर्ज वाचू शकतो' ही कल्पना तुलनेने अलिकडची असणार हे उघड आहे. पूर्ण भारतात अशी देवस्थानं कुठे कुठे आहेत याची एक नोंद केली पाहिजे असं आता वाटायला लागलं आहे. महिन्याभरापूर्वी दिल्लीतल्या 'फिरोजशाह कोटला' (स्टेडीयम नाही, स्मारक) तर तिथेही आता मेणबत्त्या घेऊन काही 'जिन' दिसतात त्यांची पूजा होते म्हणे .. श्रद्धा कशा नवनव्या उत्पन्न होत जातात याची ही साक्ष आहे एका अर्थी.

    ReplyDelete
  9. Very interesting! इथे देवाकडूनच वाचण्याची अपेक्षा केलेली दिसते. एरवी दस्तावेजाकडे चित्रगुप्तसाहेब असतात. चित्रगुप्त व त्याची वही ही कल्पना कधी आली कोण जाणे? मला वाटतं, देवाच्या दरबारी पापपुण्याचे हिशेब या समजुतीचे रूप म्हणजे चित्रगुप्त. (उत्तरांचलच्या स्थानिक परंपरेत चित्रगुप्त नसेलही कदाचित)
    पापपुण्याबरोबर देवाच्या दरबारी आपल्या इच्छाही नोंदल्या जाव्यात अशी इच्छा असावी गोलू देवाच्या भक्तांची. इंग्रजी राजवटीत कागदाला किंमत आली, अनेक ठिकाणच्या साध्या भोळ्या आदिवासींना हे कळायचं नाही कारण त्यांच्या दृष्टीने शब्द पाळणे ही संस्कृती होती, तिथे कागदाचं काय काम?
    बदलाच्या या प्रक्रियेचं हे कदाचित एक दृश्य स्वरूप असावं.

    ReplyDelete
  10. प्रथमच सांगतो : नाही मी आस्तिक, ना नास्तिक, ना अज्ञेयवादी. मायकल आंजेलोचे एक चित्र आहे. ते नोकियाने फरक करून मोबायल फोनवर ठेवले आहे. ते अनेकांना परिचित आहे. यांचे अनेक अर्थ होतात.
    अ. सुसंस्कृत माणसाने देवाला आपले रूप दिले. पण बायलात चक्क उलटे सांगितले आहे.
    आ. साक्षरता आणि संगणकीय साक्षरता सामाजिक सत्तेच्या (वर्ग व वर्ण) अधिश्रेणींशी संलंग्न आहेत. यांचे देव अर्थातच साक्षर तर असतातच, पण माणसांचे सर्व गुण-अवगुण पण घेऊन येतात.
    इ. निरक्षर कृषीवलाना किंवा आदिवासींना जळ-जमीन-जीव यांची सृष्टी वाचता येते. मला ते जमत नाही.
    ई. मनुष्येतर प्राणी व वनस्पती संवेदनशील असतात, असे जगदीश चंद्र बोस सांगतात. ग्रामीण जनतेला ते हजारो वर्षांपासून माहित आहे.
    देवदेवताना मात्र मी सर्व वादविवादापासून सहेतुक दूर ठेवतो.
    आपण लिहिलेला प्रसंग तसा नवीन नाही.

    ReplyDelete
  11. प्रीति, चित्रगुप्त किती आहे उत्तराखंडच्या परंपरेत हे बघावचं लागेल. पण तरी चित्रगुप्त माणसाच्या पाप-पुण्याच्या ज्या नोंदी करतो त्या माणसाला माहिती नसतात (म्हणजे नेमकं काय लिहिलंय ते माहिती नसत) अशीच कल्पना आहे. इथं मात्र लिहिणारा/री माणूस आहे आणि काय लिहिलं आहे त्यात काही गुप्तता नाही - म्हणून जरा बघावं लागेल आणखी नीट काय इतिहास आहे तो!

    ReplyDelete
  12. रेमीजी,
    देव माणसाच्या कल्पनाशक्‍तीची, अनुभवांची आणि आकांक्षांची रुपं धारण करुन येतो असं म्हटलं तर ते आजपर्यंतच्या या विषयातल्या माहितीशी सुसंगत होईल.

    मी लिहिलेला प्रसंग माझ्यासाठी नवा आणि अनपेक्षित अनुभव होता म्हणून तो लिहिला इतकंच. या विषयावर काही वाद घालावा, निर्माण करावा असा हेतू अर्थातच नाही. तसा अर्थ माझ्या लिखाणातून निघत असेल, तर मला नीट मांडता आलेले नाहीत माझे विचार असं म्हणावं लागेल.

    ReplyDelete
  13. सवितादी,
    कोणतीही घटना पाहताना-वाचताना मी माझी आवड-नावड यांना स्थान देत नाही. मोजकं वाचतो, मोजकं लिहितो, त्यांच्या शंभरपटीने विचार करतो.
    अण्णाची 'हरित' राळेगण सिद्धी आणि हा 'साक्षर देव' एकाच कोटीतले .
    हिंदुस्थानातील अठरा कोटी देव साक्षर असते तर एकविसाव्या शतकात चाळीस कोटी जनता निरक्षर राहिली असती का ? आणि सहा लक्ष खेडी 'हरित' झाली असती तर आधुनिक इंडियातील शेतकर्‌यांनी हजारोंच्या संख्येने आत्महत्या केल्या असत्या का ? इथे असते सत्ताधारी वर्गांचे-वर्णांचे-जातींचे राजकारण . असं रेमीच्या देशभक्तीला वाटतं ! त्याचे बुद्धिजिवी उच्चभ्रूना काय ? हा माझ्या टिपणीचा खुलासा आता करावा लागत आहे, जे मी टाळत होतो .
    'वाद' शब्दाचा अब्द करून गंगायमुना वाहणे म्हणजे मुख्य मुद्याला कलाटणी देणे .
    अरेऽऽमी नाविन्यातून काय शिकतो ? हा प्रश्न शेवटी उरतोच की !
    सवितादी, E & OE - या बालकाची चूकभूल माफ करावी. ऐसे विनंती !

    ReplyDelete