ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, May 11, 2012

१२४.निष्ठा

दोन दिवस.
दोन प्रसंग.
दोन माणसं.
त्यांचा अनुभव घेणारे आम्ही तेच.
आमचं मोजमाप मात्र वेगळ.

एक प्रसिद्ध धरण.
ते आम्ही पहायला गेलो.
तिथले कार्यकारी अभियंता जातीने हजर.

"धरण पाहण्याआधी मी केलेलं एक प्रेझेंटेशन पाहणार का?" त्यांची विचारणा.
मला 'धरण' तंत्रज्ञानातलं काहीही कळत नाही.
पण त्यांचा स्वर इतका आर्जवी की मी "हो" म्हणून गेले.
अर्ध्या तासाचं नेटकं प्रेझेंटेशन, सोबत चहा, प्रश्नांना नेमकी उत्तर.
हा माणूस उत्साही, शांत, शिस्तीचा, ज्ञानी आणि नम्र आहे हे मला जाणवलं.
मला अशी माणसं आवडतात.

त्यानंतर धरण पाहण्यासाठी अर्धा पाऊण तास गृहित धरलेला.
प्रत्यक्षात आम्ही दोन अडीच तासांनी बाहेर पडलो.
कारण हा गृहस्थ अतिशय मनापासून माहिती सांगत होता.
प्रत्येक गोष्टीत त्याच हृदय आहे, प्रत्येक गोष्टीचा इतिहास आणि त्यामागचं स्वप्न त्याला आठवतं आहे आणि ते त्याला सांगायचं आहे आम्हाला हे क्षणोक्षणी जाणवत गेलं.
कामातली त्या माणसाची निष्ठा नक्कीच वाखाणण्याजोगी होती.
जणू मी त्यांच घर पाहायला आले होते तितक्या आस्थेने ते मला प्रत्येक गोष्ट दाखवत होते.
मला मजा आली.

दुस-या दिवशी संध्याकाळी एक संग्रहालय पाहायला गेलो.
एक राजा होता इथला, त्याच्या राजवाडयातलं संग्रहालय.
दोन माणसं आधी तयार नव्हती फारशी पण त्यांनी फिरून दाखवलं मला ते - माहिती दिली मी विचारलेल्या प्रश्नांची.
पण एक तासाचा वेळ गृहित धरून मी त्या ठिकाणी गेले होते ती दहा मिनिटांत बाहेर पडायची वेळ आली.
मी जरा नाराजीने मुख्य दरवाजातून बाहेर पडले.

एक पन्नाशीची स्त्री बाहेर उभी होती.
"इकडे या," तिने मला हुकूम सोडला.
मी तिच्या मागोमाग गेले.
मग दरवाजा उघडून तिने मला आत नेले.
तिथं देवीची एक मूर्ती होती.
कोण आहे ही देवी?
त्यावर ती स्त्री म्हणाली, "मला हिंदी नाही बोलता येत."

मग तिने मला दहा मिनिटे ती देवी राजावर प्रसन्न होऊन उज्जैनवरून इथं यायला कशी तयार झाली, तिने राजाला 'मागे वळून पाहायचं नाही' अशी अट कशी घातली, राजाचे शहर जवळ आल्यावर 'आपण महालात बंद होऊ आणि इतर भक्तांना आपलं दर्शन घेता येणार नाही' असं वाटून देवीने पैंजण काढून ठेवलं - त्यामुळे देवी मागे येत नाही अशी राजाला शंका आली आणि त्याने मागे वळून पाहिलं - मग देवी तिथंच थांबली अशी एक मोठी कथा सांगितली. मग देवी जिथं थांबली तिथं राजाने तिच देऊळ कसं बांधलं आणि राजवाडयापासून भुयारी मार्गाने जाऊन राजा देवीला भेटत असे रोज - हेही सांगितलं.

'समजली का गोष्ट? नसली तर पुन्हा सांगते." अस त्या मावशी म्हणाल्यावर मी हसले.
मग तिने मला पुढे नेउन अनेक फोटो दाखवले. या राजवाडयात ब-याच चित्रपटांच चित्रण होतं - त्यातल्या अभिनेत्यांचे आणि अभिनेत्रींचे फोटो आहेत इथं - ते तिने मला दाखवले.
इथल्या राजाला व्हिक्टोरिया राणीने एक बक्षीस दिले होते १८७७ मध्ये - ते दाखवले.
मग राजवाडयातला 'नाचाची जागा' दाखवली.
कोणत्यातरी चित्रपटात वापरल्या गेलेल्या 'जेल'ची जागा दाखवली.
कामातली त्या स्त्रीची निष्ठा नक्कीच वाखाणण्याजोगी होती.
जणू मी तिच घर पाहायला आले होते तितक्या आस्थेने ती मला प्रत्येक गोष्ट दाखवत होती.
मला मजा आली.

ही स्त्री तिच्या वयाच्या अठराव्या वर्षी, लग्नानंतर इथल्या राणीच्या सेवेत आली.
आता ती ५४ वर्षांची आहे. गेली ३६ वर्ष ती इथंच आहे.
दरम्यान तिचा नवरा मरण पावला.
ती इथंच काम करते.
ही स्त्री उत्साही, शांत, शिस्तीची, ज्ञानी आणि नम्र आहे हे मला जाणवलं.
मला अशी माणसं आवडतात.

मी सहज आमच्या टीमला विचारलं (त्यात सगळे पुरुष - दोन चाळीशीचे आणि दोन पंचविशीतले - सगळे टेक्निकल काम करणारे) - "कालच्या आणि आजच्या अनुभवात काही एकसारखं वाटलं का तुम्हाला?"
त्यांनी विचार केला. म्हणाले, "नाही."

मी प्रश्न बदलला - मी विचारलं, "कालचे अभियंता आणि आजच्या मावशी यांच्यात काही सारखेपणा वाटला का तुम्हाला?"
'छे! ते गृहस्थ किती शिकलेले, केवढया मोठया पदावर .. या बाई अडाणी, साध्या पगारी सेवक .. त्यांच्यात काय सारखेपणा असणार?" .. त्यांनी मलाच उलटा प्रश्न विचारला.

कामातली एखाद्याची निष्ठा आपण कोणत्या चष्म्यातून पाहतो?
ज्या व्यक्तीच शिक्षण जास्त;  वय जास्त; पद मोठं; प्रतिष्ठा जास्त; मिळणारा पैसा जास्त; सफाईने बोलता येणा-या भाषा अधिक  .........त्या व्यक्तीची कामावरची निष्ठा जास्त - असं आपल्याला का बरं वाटत असेल?
*

10 comments:

 1. सविता ताई,तुमचा हा लेख खूप छान आहे. आजकाल च्या जगात हा असा अनुभव अगदी सहज येऊ शकतो कारण लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे...मी म्हणेन कोणी अतिशिक्षित ,उच्चपदावर असेल तोच हुशार असे समजणे आणि साधे काम करणारा एखादा अडाणी असे समजणे दोन्ही चूकच आहे. हुशारी हि माणसाच्या बोलण्यातून आणि व्यवहारातून दिसते. कित्येक लोक हुशार असूनही अहंकारग्रस्त असतात असेही दिसून येते. तुम्हाला आलेल्या या अनुभवातल्या दोन व्यक्ती ,खरच मला त्या दोघांमध्ये साम्य आढळते.आपल्या कामाबद्दल निष्ठा,जी आजकाल कमी झाली आहे,'जे काम मी करेन ते मी पूर्ण व्यवस्थित करेन आणि मी जे काम करते त्याचा मला अभिमान आहे,गर्व नाही'..असे विचार कमी झाले आहेत.पैश्यासाठी काम करणे किंवा पगार किती मिळतो आहे हे आधी बघणे आणि मगच काम स्विकारणे इत्यादी अनेक गोष्टी जाणवतात.कामाबद्दलची निष्ठा मग ते काम लहान असो मोठे असो, काम करणारी व्यक्ती उच्च विद्या विभूषित असो किंवा सर्वसाधारण शिक्षण घेतलेली,कायम हवी....हेच महत्वाचे.

  ReplyDelete
 2. सविता तुमचा लेख नेहेमीप्रमाणेच मार्मिक! कमी शब्दात खूप काही सांगून जाणारा. कुणाला कमी लेखायचं असं नव्हे पण सरासरी तुमच्या टेक्निकल टीमसारखंच माणसं दुसर्‍या माणसांचा, घटनांचा, कलाविषयांचा नेमका किंवा खोल अभ्यास करत नाहीत असं दिसतं. ते अज्ञान असेल किंवा वरवरचा विचार करणं असेल..

  ReplyDelete
 3. "मला अशी माणसं आवडतात".....आणि ही अशी माणसं आपले क्षण सुंदर करून जातात.
  उगाच आमच्या कॉर्पोरेट जगातील अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली माणसं माझ्या डोळ्यासमोर येतायत.
  आजच एका दीड शहाण्या बाईशी चांगलं कडाक्याचं भांडण करून आलेय मी ! आमच्याच गल्लीत ! :)

  नेहेमी सारखाच हा ही लेख आवडला. माणसांच्या स्वभावाचे विविध पैलू पकडणारा ! :)

  ReplyDelete
 4. एकदम मस्त अनुभव..
  आपण खरं तर अशा बर्‍याचशा गोष्टी पैशात/शिक्षणात मोजतो आणि तिथेच सगळं चुकतं..
  एकीकडे कॉलेज ड्रॉप आउट असून पुढे गेलेल्या बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्स सारखी उदा. द्यायची पण अगदी तितकं मोठं नसले तरी आपापली कामं नेटाने करणारी सर्वसामान्य माणसं ओळखण्यातली गल्लत बरेचदा केली जाते..

  छान पोस्ट...

  ReplyDelete
 5. सुंदर लिहिलंय !!

  ReplyDelete
 6. श्रिया, कामाबद्द्लची किंवा विचारांबद्द्लची निष्ठा कोणत्याही व्यक्‍तीत असू शकते - ती आपल्याला 'पाहता' आली पाहिजे इतकंच!

  विनायक पंडित, आपण अनेकदा दुस-याबद्दल केवळ वरवर विचार करतो इतकंच नाही तर तो विचार कसा करायचा याचा आपला साचा ठरलेला असतो. पैसे, पद अशा गोष्टींना आपण अवास्तव महत्त्व देतो त्यामुळे ज्यांच्याकडे लौकिक यश नसते त्यांच्यातही काही गुण असतात हे 'वास्तव' आपण विसरतो - किंवा त्याकडे डोळेझाक करतो.

  अनघा, अशी माणसं आपलं जगणं सुंदर तर करतातच पण आपल्याला विचारांत पाडून आपल्याला मस्त जमिनीवर पण आणतात. (भांडण केलसं? बरं, लिही आता त्याबद्दल :-) )

  अपर्णा, तू पुन्हा यशस्वी माणसांची उदाहरणं दिली आहेस. मला असं म्हणायचं आहे की एखादी व्यक्‍ती लौकिक आयुष्यात तितकी 'मोठी' नसेलही, पण तिच्यात काही गुण नक्की असतात. माणसं आपल्याला त्यांच्या 'सजावटीशिवाय' - जशी आहेत तशी पाहता आली पाहिजेत, नाही का?

  आभार हेरंब.

  ReplyDelete
 7. खूप सुंदर लेख आहे. व्यक्ती कोणीही असला; शिक्षित, अशिक्षित, श्रीमंत, गरीब, तरी निष्ठा कोणाकडेही असू शकते, ती शिक्षणाने किंवा पैशाने येत नाही. तशी वृत्ती अंगी बाणवली गेलेली असली पाहिजे... तुमचं निरीक्षण एकदम सुरेख...

  ReplyDelete
 8. आभार, इंद्रधनू. निष्ठा अंगी बाणलेली असणं महत्त्वाच - ती एक प्रकारे आंतरिक प्रवृत्ती असायला हवी, असते हेच मला आलेला अनुभवही सांगतो.

  ReplyDelete
 9. निष्ठा ही गोष्ट खूप सापेक्ष आहे. तीत इतके पदर आहेत....
  निष्ठा "कामाबद्दल" असावी यात दुमत तर नाहीच. पण "ज्यांच्यासाठी" काम करतो त्यांच्यावर किती निष्ठा असावी?
  निष्ठा पागाराशी असावी का?
  कितीकदा या सगळ्या निष्ठांमध्ये गल्लत केली जाते...सगळं कॉर्पोरेट जग तर या निष्ठांना उलटपालट करून वर गुळगुळीत मेकअप करून समोर ठेवतं... त्यातून आपली योग्य निष्ठा पक्की करणं हेच एक दिव्य आहे!
  त्या देवीच्या सेवेतल्या मावशींचा हेवा वाटला दोन क्षण!!

  ReplyDelete
 10. अनू, निष्ठा 'कोणाशी' आहे हा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे खरा.

  तुला त्या मावशींचा हेवा वाटला? का बर?

  त्यांच्यासारख्या निष्ठेने आपणही काम करू शकतोच की. त्यांना त्यांच्या आवडीच काम मिळालं होत की नाही माहिती नाही, पण त्यांनी त्या कामात जीव ओतला आहे - हीदेखील बाब शिकण्यासारखी आहे आपल्याला job satisfaction च्या चर्चेच्या युगात असं मला वाटत. आपण मनासारख काम मिळालं तर निष्ठा जरूर दाखवू .. पण काम मनासारखं नसेल तर ती दाखवण जास्त अवघड आहे - नाही का?

  ReplyDelete