ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, May 25, 2012

१२६. राग दरबारी

आजकाल पुस्तकं वाचताना मला माझ्यात झालेला एक बदल जाणवतो.
पूर्वी 'कोणतं पुस्तक छान आहे, आवडलं आहे?' या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं होतं.
जे पुस्तक वाचताना भूक, झोप, इतर व्यवधानं यांचा पूर्ण विसर पडतो; जे पुस्तक एकदा हातात घेतलं की शेवट होईपर्यंत हातातून सोडवत नाही; दुर्दैवाने ते बाजूला ठेवायची वेळ आलीच तर संधी मिळताक्षणी ते जिथं सोडलं होतं तिथून पुढे चालू केलं जातं - ते चांगलं पुस्तक!

पण आजकाल माझं मत बदललं आहे.
अनेक चांगली पुस्तकं वाचताना हा बदल जाणवतो.
'राग दरबारी' ही श्रीलाल शुक्ल यांची कादंबरी वाचताना हे पुन्हा एकदा प्रकर्षाने लक्षात आलं माझ्या. 

जे पुस्तक (खरं तर कोणतीही कलाकृती) मला विचार करायला भाग पाडतं; जे मला अस्वस्थ करतं; जे माझ्या मनात प्रश्न निर्माण करतं; जे मी घेतलेले अनेक अनुभव माझ्यात पुन्हा एकदा जागवतं; जे मला एकहाती वाचायची चैन करू देत नाही आणि अक्राळविक्राळ रुप धारण करुन नाचतं समोर, जे वाचताना हे आजही किती लागू आहे असं वाटत राहतं - ते चांगलं पुस्तक असं आता माझं मत बनलं आहे. आणि 'राग दरबारी' माझ्या या सगळ्या निकषांना पुरुन उरलं. ३३५ पानांच पुस्तक वाचायला मला जवळजवळ एक महिना लागला यातच माझ्यासाठी या पुस्तकाची गुणवत्ता आहे.

पुस्तकाच्या नावावरून संगीताबद्दल पुस्तक असेल किंवा राजकीय सत्तेबद्दल पुस्तक असेल असा अंदाज होता - यातला दुसरा अंदाज बरोबर आहे हे पहिल्या पानातच लक्षात आलं माझ्या.

'शिवपालगंज' हे तुम्ही आम्ही पाहिलेलं कोणतही गाव असू शकतं -आजही आहे ते. 'जे इतरत्र नाही ते इथं आहे आणि जे इथं नाही ते कुठेच आढळणार नाही' या महाभारताच्या गौरवाची आठवण यावी असं गाव आहे हे! शहरापासून हे जवळ आहे आणि मुख्य म्हणजे रस्त्याच्या बाजूला आहे. त्यामुळे बाहेरच्या जगापासून अलिप्त नाही हे गाव पण ते आपलं आपल्यात रममाण पण आहे. या गावाच्या छोटयाशा परिघात घडणारी एक गोष्ट.

हे गाव कसं आहे? रात्रीच्या अंधारात गावात प्रवेश करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्त्रिया शौचास बसल्या आहेत. कुत्री भुंकत आहेत. गावात काही दुकानं आहेत; सरकारी कार्यालयं आहेत; दारुच दुकान आहे. इथं रस्त्यावर येणारे घरांचे चौथरे आहेत. गावात एक कॉलेज आहे ज्याला वर्ग भरवण्यास पुरेशी इमारत नसल्याने ते जणू 'शांतीनिकेतन' आहे. या गावात एक 'गांधी चबुतरा' आहे - ज्याच्या आड गावाचे पुरुष मूत्रविसर्जन करतात आणि इथं निवांत कुत्री बसलेली असतात.  गावापासून पाच मैल अंतरावर एक मंदिर आहे - जिथं जत्रा भरते. इथं कर गोळा करताना आपला वाटा घेणारे कर्मचारी आहेत आणि फुकट हादडणारे गावगुंड आहेत. दरवर्षी नेमाने वृक्षारोपण होणारे उजाड मैदान आहे. गावाची घाण पोटात घेणारा एक तलाव आहे.  आपल्या गावची जी परिस्थिती आहे तीच दिल्लीची आहे याची इथल्या लोकांना अगदी स्पष्ट जाणीव आहे आणि त्यामुळे आपलं कोणी काही घडवू आणि बिघडवू शकणार नाही याची खात्रीही. 

कादंबरीत पात्रं तशी पाहायला गेली तर मर्यादित आहेत; पण त्यांच विश्व मात्र असीम आहे. पुस्तकाची सुरुवात रंगनाथच्या नजरेतून होते. रोजच्याप्रमाणे रेल्वे दोन तास उशीरा येणार अशा अंदाजाने रंगनाथ रेल्वे स्थानकावर पोचतो तर गाडी आज फक्त दीड तास उशीर होऊन निघून गेलेली आहे. "शिकायती किताब के कथा-साहित्य मे अपना योगदान देकर" रंगनाथ बाहेर पडल्याचा उल्लेख पहिल्याच पानावर आहे. पुस्तकात उपहास ठासून भरलेला आहे याची खूण इथे मिळते, या उपहासात्मक टिपण्यांनी पुढे हसू येत राहतं, ते पटत राहतं, लेखकाची निरीक्षणशक्ती एकदम 'भारी' आहे अशी दाद आपण देत राहतो. पुस्तक इथंच थांबलं असतं तर बरं झालं असतं - असं नंतर वाटायला लागतं; कारण हा उपहास नंतर नंतर अंगावर यायला लागतो; विषण्ण करायला लागतो. 

शिवपालगंजइतकाच प्रातिनिधिक आहे तो रंगनाथ. शहरातून खेडयात आपल्या मामाकडे काही महिने प्रकृती सुधारण्यासाठी तो चालला आहे. त्याने एम.ए. केलं आहे इतिहासात. तिथं आहेत वैद्यजी - रंगनाथचे मामा. वैद्यजी बरंच काही आहेत. ते वैद्य तर आहेतच शिवाय कॉलेजचे व्यवस्थापक आहेत; सहकारी संस्थेचे व्यवस्थापक आहेत. त्यांना अशा दोन दोन पदांवर राहायला आवडत नाही. पण काय करणार? दुसरं कोणी जबाबदारी पेलण्याइतकं लायक नाहीच या गावात! 'ब्रह्मचर्या'वर उपदेश करतात ते आणि वीर्यनाश टाळण्यासाठीच्या त्यांच्या गोळ्या कॉलेज विद्यार्थ्यांमध्येही चांगल्या खपतात. ते संस्कृतही वाचू शकतात.

रुप्पन हा वैद्यजींचा कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा. बरीच वर्ष तो एकाच वर्गात आहे. तो एक 'युवा नेता' आहे. बाप नेता असल्याने त्याची नेतागिरी जन्मजात आहे. काहीही मनाविरुद्ध व्हायला लागलं की रुप्पन 'कॉलेजचे विद्यार्था रस्त्यावर उतरतील' अशी धमकी देतो. इथले दरोगाजी दोन पुढा-यांना खेळवत स्वतःचा फायदा करून घ्यायचा प्रयत्न करतात आणि फसतात. छंगामल कॉलेजातले शिक्षक वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचे आहेत - त्यांच्यापैकी कुणालाच विद्यार्थ्यांना शिकवण्यात रस नाही आणि त्यांच्याकडे ते कौशल्यही नाही. विद्यार्थीही उगाचच कॉलेजात येतात. प्राचार्यांच्या मते वैद्यजींच्या 'दरबारात' हजेरी लावणे हे सर्वात महत्त्वाचे काम, तेवढे ते इमानेइतबारे करत राहतात. इथे शिकवणा-यांत तट पडतात, कोर्टबाजी होते वगैरे ब-याच घडामोडी होत राहतात.  अर्धाअधिक उघडाच असणारा आणि वैद्यजींच्या दरबारात भांग घोटण्याचे काम करणारा सनीचर एके दिवशी गावचा प्रधान बनवला जातो. 

बद्री पैलवान आहे. हा वैद्यजींचा मोठा मुलगा. त्याचा शिष्य छोटू पैलवान आहे जो स्वतःच्या वडिलांना नियमित मारहाण करतो. मुलाने बापाला मारहाण करण्याची त्या घराण्यात परंपराच आहे. 'फ्लश' खेळण्याचे कौशल्य असणारा जोगनाथ आहे - त्याला कसे गुन्ह्यात अडकवले जाते आणि कसे सोडवले जाते याची रोचक कहाणी आहे. एक लंगड आहे इथं. लाच न देता तहसील कार्यालयातून एक कागद मिळवण्याची त्याची लढाई आहे. इथल्या सहकारी संस्थेत घोटाळा होतो. रामाधीन कलकत्त्यात अफूचा व्यापार करण्याचा अनुभव घेऊन गावी परतला आहे. तो आता वैद्यजींचा विरोधक आहे. त्यावरुन गावात राजकारण होत. कॉलेजच्या व्यवस्थापन समितीची बैठक व्हावी अशी रामाधीन मागणी करतो. गयादीन व्याजाने पैसे देतो आणि त्याचे एक कपडयांचे दुकान आहे. त्याच्याकडे कॉलेजातली शिक्षक मंडळी सतत सल्लामसलतीसाठी येतात - पण तो प्रत्यक्ष कुणा एकाची बाजू घ्यायचे नेहमीच नाकारतो. कॉलेजच्या व्यवस्थापन समितीचा हा उपाध्यक्ष. एका अर्थी वैद्यजींच्याच पक्षातला.

शिवपालगंजमध्ये घडणा-या अनेक घटनांचे सविस्तर चित्रण या कादंबरीत येतं. सहकारी संस्थेतला घोटाळा;   कॉलेजच्या व्यवस्थापकीय समितीची बैठक आणि नव्या कार्यकारी मंडळाची निवडणूक; सनीचरचा निवडणूक प्रचार आणि निवडणूक 'जिंकण्याच्या' तीन यशस्वी पद्धती; शिक्षकांची कोर्टबाजी आणि त्यावरचे कोर्टाचे ताशेरे; दरोगाजींची बदली;  बापाने मुलाविरुद्ध केलेली मारहाणीची तक्रार ऐकणारी न्याय-पंचायत; सरकारी योजनाच्या जाहिराती आणि विकासाची  भाषणबाजी; हिंदी सिनेमाचा जनमानसावर असलेला प्रभाव ; कॉलेजचे विद्यार्थी आणि त्यांचे  दिशाहीन जगणे; कोर्टात साक्ष देण्यात वाकबगार असलेले खेडूत; ताकदवान बापाला विरोध करणारी मुलं आणि त्यामुळे हतबल झालेला बाप; आंतरजातीय विवाहाचे राजकारण आणि त्यातून सुटका; शहरातल्या लोकांशी ग्रामीण सत्तावानांचे नाते; कुटुंब नियोजनाचा गावात प्रसार करणारा एक अविवाहित कर्मचारी; कोर्टातला खटला बाहेर मिटवू पाहणारे दरोगाजी;  सहकारी संस्थेत घोटाळा झाला या आरोपाची जबाबदारी घेत पदाचा राजिनामा देणारे वैद्यजी आणि त्याच सभेत बद्रीला बिनविरोध त्याच पदावर बसवणारे गावकरी ....एकामागून एक घटना होत राहतात .. अगदी ख-या जगण्यात घडाव्यात तशा .. त्याच गतीने, त्याच पद्धतीने, त्याच फळांना जन्म देत ...

या सबंध कादंबरीत  स्त्रियांचे उल्लेख ठराविक प्रसंगी आणि ठराविक संदर्भात येतात. एक आहे: गावचा राधेलाल शहरात जाऊन दुस-याची बायको पळवून घेऊन आला आहे - लग्नाची म्हणून. तिची छेड काढणे हा विद्यार्थ्यांचा आवडता उद्योग आहे. बकरी चारणारी एक तरूण मुलगी आहे. गयादीनची मुलगी बेला आहे, जिला रुप्पन प्रेमपत्र लिहितो, छोटा पैलवान भर कोर्टात तिचे नाव दुस-याशी जोडतो, बद्री तिच्याशी लग्न करु इच्छितो, आणि गयादीन तिचे लग्न जातीतल्या मुलाशी लावायची धडपड करतो. ही मुलगी बेला कधीच समोर येत नाही - तिला काय वाटते, तिच्या भावना काय आहेत याची काही किंमत नाही. ती फक्त एक साधन आहे इतरांच्या भावनांचे! तिला जणू काही अस्तित्वच नाही. देवीच्या जत्रेत नटूनथटून वावरणा-या स्त्रिया आहेत. जत्रेच्या परिसरात एका 'गाणा-या स्त्रीची दलाली करणारा' पुरुष आहे.  हिंदी सिनेमातली गाणी माहिती असणारी ग्रामसेविका आहे - जी दुस-यांना प्रेमपत्र लिहायला मदत करते असा एक उल्लेख आहे. स्त्रिया इथं अदृश्य आहेत, त्यांची भूमिका आणि स्थान दुय्यम आहे - समाजात आणि पुरुषांच्या भावविश्वातही  .... १९६८ मधल्या एका प्रातिनिधिक खेडयात काही वेगळ चित्र कसं दिसेल? 

१९६८ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकातला ग्रामीण भारत आजही बराचसा तसाच आहे, काहीही बदल झालेला नाही या जाणीवेने पुस्तक वाचता वाचता जीव गुदमरायला लागतो. या सगळ्यातून सुटका नाहीच या अपरिहार्यतेने घुसमट वाढते. साहित्याचा आणि जीवनाचा काय संबंध असतो हे धारदारपणे सांगणारी लेखकाची शैली चकित करून जाते आधी; आणि वेदना देते शेवटी शेवटी. 

'शायनिंग इंडिया'च्या  भूलाव्यातून ज्यांना बाहेर पडायचं आहे त्यांनी हे पुस्तकं अवश्य वाचावं .. कारण आजही आपल्या देशात असंख्य शिवपालगंज आहेत. आजही हे पुस्तकं तितकंच खरं आहे जितकं पाच दशकांपूर्वी होतं!  बदल झाले आहेत - पण ते किती वरवरचे आहेत हे 'राग दरबारी' जाणवून देतं! हे पुस्तक आपण अजून किती प्रवास करायचा बाकी आहे याची जाणीव करून देत राहत.

हे पुस्तक मनोरंजन करत नाही, हे पुस्तक तुम्हाला आभासी स्वर्गात नेत नाही; हे पुस्तक तुमचा निवांतपणा घालवतं - तुमची झोप उडवतं....अशी अस्वस्थ करणारी पुस्तकं वाचावीत का? आहेत  ते प्रश्न काय कमी आहेत म्हणून अशी गंभीर पुस्तक वाचावीत? .. असे प्रश्न पडू शकतात ...अशा प्रश्नांची उत्तरं आपण आपल्यालाच द्यायची असतात - खरीखुरी! हे पुस्तक अशा गंभीर आत्मचिंतनासाठीही अतिशय मोलाचं आहे. 

राग दरबारी
श्रीलाल शुक्ल 
राजकमल पेपरबैक्स, नयी दिल्ली 
२०१२
किमत:  रुपये २५०/- 
(या पुस्तकाला १९६९ चा  'साहित्य अकादमी' पुरस्कार मिळाला आहे आणि बाजारात सध्या या पुस्तकाची चौदावी आवृत्ती आहे. कादंबरी हिंदी भाषेत आहे.  तिचा मराठीत अनुवाद आहे की नाही ते माहिती नाही. 

15 comments:

  1. उम्‍दा प्रस्‍तुति पहली बार आपके ब्‍लाग पर अच्‍दा लगा यूनिक तकनीकी ब्‍लाग

    ReplyDelete
  2. शायनिंग इंडिया हा काही भुलावा नाही. तेही एक वास्तव आहे. पण तो शायनिंग इंडिया म्हणजेच इंडिया असे मात्र निश्चितपणे नाही. तेवढे भान नसते अनेकांना हे खरेच. ते भान आणण्यासाठी ही कादंबरी साठीच्या दशकातली असली तरी आजही रेलेव्हंट आहे हे लेखनावरून कळले. परवाच माझ्यासमोर एका मित्राने ही कादंबरी काढली. तेव्हाच त्याच्याशी करार करून टाकला, त्याची वाचून झाली की त्यानं मला द्यायची. अर्थात, दरम्यान मिळाली तर मी घेईनच. पुस्तकाचा परिचय आवडला. वाचनाच्या प्रवासाविषयी सुरवातीला व्यक्त केलेले 'किंचित' विचारही आवडले. :-)

    ReplyDelete
  3. हम्म...आजही हे असच...या विचाराने विषण्णता दाटून येते मनात. पुस्तक परिचय चांगला.

    ReplyDelete
  4. सुरवातीचे चांगल्या पुस्तकाबद्दलचे विचार आवडले आणि पटलेही. मला पण एक गणेश देवींचं वानप्रस्थ वाचायला एक महीना लागला होता आणि एका बैठकीत वगैरे प्रश्न त्या पुस्तकाला लागू होतच नाहीत :)

    बाकी लेखन आवडलं, पुस्तक वाचावंसं वाटतंय तुमच्या ब्लॉगपोस्टमुळे.

    ReplyDelete
  5. विनोदजी, आप शायद 'राग दरबारी' शब्द देखकर आये थे - लेकिन मुझे पता है कि आप इसको पढकर समझ नाही पाये होंगे!!

    अनामिक/का १ , शायनिंग इंडिया हा काही पूर्ण भुलावा नाही याची आठवण करून दिल्याबद्दल आभार.

    मोहना, 'विषण्ण' - हाच शब्द योग्य आहे इथं.

    अनामिक/का २, पुस्तक नक्की वाचा आणि कळवा तुम्हाला कसं वाटलं पुस्तक ते!

    ReplyDelete
  6. अस्सल कादंबरी सविताताई. एक एक पात्र असं ठाशीव नि कोरीव की पूछो मत. खेड्याकडे चला तिथे सगळा साजरा-गोजरा भारत आहे या स्वप्नाळू कल्पनांना जोरदार धक्का देण्याचं काम 'राग दरबारी' ने केलं. माणूस मूलतः चांगलाच असतो, परिस्थिती त्याला वाईट बनवते हे गृहितकही किती फसवं असतं याचे दर्शन घडवणारी. माणसाच्या मनात नैसर्गिकरित्याच अस्तित्त्वात असणार्‍या वर्चस्ववादी प्रेरणा घेऊनच त्याला जगावे लागते, त्या पूर्णपणे पुसून टाकण्याचा प्रयत्न बहुधा अयशस्वी ठरतो हे ठसवणारी. वास्तवाचे भान राखणारी एक नितांतसुंदर कादंबरी.

    राग दरबारीचा मराठी अनुवाद नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केला आहे. अजूनही उपलब्ध आहे.

    ReplyDelete
  7. रमतारामजी, प्रतिसादाबद्दल आभार. नॅशनल बुक ट्रस्टने 'राग दरबारी'चा मराठी अनुवाद प्रसिद्ध केला आहे या माहितीबद्दलही आभार. शोधेन मी तो आता. बाकी 'राग दरबारी' या कादंबरीला लोक 'विनोदी' का म्हणतात हे मात्र मला समजलं नाही. त्यात विनोद नक्की आहे - पण तो तुम्ही म्हणता तसं 'वास्तवाचं भान आणणारा' आहे.

    ReplyDelete
  8. पोस्टचा दुवा दिल्याबद्दल आभार! कादंबरीचा सारांश आवडला. खूप वर्षांनी पुन्हा राग दरबारी बद्दल वाचले.

    शायनिंग इंडिया चा जयजयकार करणार्‍यांनी तर ही कादंबरी वाचावीच, पण शुक्ल यांचा रोष खरंतर १९९१ पूर्व काळातील नेहरू-प्रणीत कल्याणकारी राज्यावर आहे. ही टीका भांदवलशाहीवादी, नव-उदारमतवादी दृष्टीकोनाची नाही. तर "कल्याण" करायला निघालेल्या राज्याचे, त्याच्या विशाल महत्त्वकांक्षांचे, शहरी, सुशिक्षित पाया असलेल्या सरकारी एलीटमध्ये ग्रामीण जगाबद्दल असलेल्या गृहितकांचे परखड परीक्षण आहे. रंगनाथ हा "इंडॉलॉजी" त एम.ए शिकून गावात येतो; त्याच्या समाजाबद्दल, इतिहासाबद्दल, आणि ग्रामीण जीवनाच्या "शुद्धते" बद्दल त्याच्या बर्‍याच कल्पना असतात. पण त्याचे शिक्षण, शहरी अनुभवांचा काही उपयोग होत नाही; शिवपालगंज या सगळ्या कल्पनांना हाणून पाडतं. शेवटी तोच निराश होतो, शिवपालगंज मात्र तसंच राहतं.

    शुक्ल स्वत: भारत सरकारचे आय ए एस ऑफिसर होते; त्यांनी हे सरकारी "विकास" आणि "कल्याण" कारी जग फार जवळून पाहिले होते. ते वास्तविक या कल्पनांच्या विरोधात नव्हते, पण त्यांना अंमलात आणणार्‍या संस्थांत्मक पद्धतींबद्दल ते उत्तरोत्तर निराश होत गेले. राजकारण, सरकार आणि सत्ता यांचे किती विविध रूप समाजात असू शकतात, त्यांच्यातले अन्योन्य संबंध किती गोंधळ घालू शकतात याचा त्यांनी त्यांच्या कादंबर्‍यांमधून विचार केला. राजकारण आणि सत्ता हे फक्त पार्लमेंट मध्ये नाहीत, तर घरोघरी, गावागावत आहेत; त्या सत्याला सामोरे न जाता एका विशाल, रूढीप्रिय समाजाला "आधुनिक" ज्ञानाचे शस्त्र घेऊन बदलू पाहणार्‍या सरकारी स्कीम्स (उदा. मलेरिया च्या किस्सात सरकारी जाहिरातीत इंग्रजी अक्षर बघून पळून जाणारे डास) यांचीच दृष्टी किती संकुचित आहे, पोकळ आहे, हे दाखवतात. याचा अर्थ शुक्ल यांना गावांमध्ये बदल नको आहे असे अर्थान नाही; पण अगदी जवळून पाहिलेल्या, अनुभवलेल्या सिस्टेम द्वारे त्यात फक्त भ्रष्टाचार वाढतो, असलेल्या रूढीच कायम होतात (काळाबरोबर विचार-पार्टी बदलणारे, आणि अनंत टिकणारे वैद्यजी!). "कल्याण" असे कोणाचेच होत नाही - ते करायला गेल्यास खरोखर 'गंजहा' होणे गरजेचे आहे, टॉप-डाउन प्रकार चालत नाहीत असा त्यांचा निष्कर्ष होता असे वाटते.

    शुक्ल यांच्या आधी हिंदी ग्रामीण कादंबरी प्रेमचंद व फणीश्वरनाथ रेणू या सारख्या दिग्गजांनी लिहिली होती. ग्रामीण विश्व कितीही कष्टाळू आणि कठीण दाखवले तरी ते शेवटी सुंदर, पवित्र आणि रमणीय आहे असा या कादंबर्‍यांचा शेवटी सूर होता. रेणू यांनी "आंचलिक" कादंबरी द्वारा हिंदी भाषिक विश्वच किती विविध आहे हे दाखवले. पण शुक्ल हिंदीच्या सर्व प्रांतिक विविधतेचा फक्त प्रादेशिकतेसाठी नाही, तर राजकीय टीकेसाठी मार्मिक वापर करतात. यातच कादंबरीचा विनोद दडलेला आहे. हिंदी भाषेच्या "सरकारी" शैलीचा, आणि गावात इंग्रजीमुळे होणार्‍या गफलतीं द्वारे म्हणूनच शुक्ल इतका मस्त उपहासपूर्वक उपयोग करतात. (याने कादंबरी भरगच्च आहे) रंगनाथ ला गंजहांची भाषाच कळत नाही. सरकारी इंग्रजी मुळे, आणि त्याचा हिंदीत केलेल्या शब्दश: अनुवादामुळे अर्थाचा गोंधळ होतो, भांडणं लागतात. निरनिराळ्या भाषा-बोलींतून एक स्वच्छ "सरकारी" हिंदी तयार करणे जसे मूर्खपणा आहे, तसेच दिल्लीत बसून दूर गावात आयोग आणि मंडळ तयार करून कल्याण करणे मूर्खाचे आहे, याची सांगड शुक्ल घालतात.

    कितीही विषण्ण करणारा असले, तरी या उपहासपूर्वक लेखनाला मी विनोदच म्हणेन. तो हलक्याफुलक्या गोग्गोड विनोदापेक्षा कठीण, पण अधिक धारदार आणि बोचरा, वास्तवाचे निराळ्या पद्धतीने भान करून देणारा विनोदच आहे. इंग्रजीत ज्याला ब्लॅक ह्यूमर, किंवा क्रूएल जोक म्हणतात तसा. आणि तो भाषिक पातळीवर त्यांनी सर्वात यशस्वी रित्या घडवून आणला.

    ReplyDelete
  9. रोचना, आवर्जून पोस्ट वाचून त्यावर प्रतिसाद नोंदवलात यासाठी आभार.

    तुम्ही म्हणता तशा कल्याणकारी राज्य या कल्पनेच्या आणि त्यासोबत येणा-या सत्तेच्या वाटणीच्या सीमा फार धूसर आहेत. आजही आहेत. शहरी चष्म्यातून ग्रामीण जीवनाकडे (आणि खरं तर कोणत्याही एका नजरेतून दुस-या जगाकडे) पाहण्याची मर्यादा यातून फार स्पष्ट होते. शिवाय सरकारी योजनाची 'तळातून वर' अशी स्थिती नसण्यातून हा विरोधाभास वाढतच जातो. पण तळात तरी काय आहे?

    सत्ता किती वेवेगळ्या स्तरांवर असते हे फार चांगलं कळत हे पुस्तकं वाचून.

    मी सुरुवातीला छान हसत होते त्यातला उपरोध वाचताना. पण नंतर नंतर मात्र तो विनोद अंगावर यायला लागला माझ्या. तो 'ब्लॅक ह्यूमर' आहे या तुमच्या मताशी सहमत आहे मी.

    ReplyDelete
  10. >>पण तळात तरी काय आहे?

    हे खरंय. तळात ही तेवढीच घाण आहे असं दिसतं. यामुळे शुक्ल यांना परिवर्तन हे अशक्य, आणि ग्रामीण परिसर हा परिवर्तनाच्या लायकीचाच वाटत नाही अशी अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. पण मला तसा निराशाजनक, किंवा स्टॅटस-कोइस्ट सूर जाणवत नाही. ग्रामीण जीवनाला रोमॅंटिक चष्मा काढून खरेखुरे, जीवित, सत्तासंबंधांनी रेलचेल असे दाखवले. तोही भाषेचा इतका सुरेख वापर करून. तुम्ही मकान वाचले तर त्याबद्दलही मत ऐकायला आवडेल.

    ReplyDelete
  11. रोचना, मी 'मकान' वाचलं नाही अद्याप - पण आता श्रीलाल शुक्ल यांच पुस्तक आहे तर ते 'वाचले पाहिजे' या यादीत गेले आहे आधीच.

    'तळात तरी काय आहे?' हा प्रश्न विचारताना मला शुक्ल यांना परिवर्तन अशक्य वाटते अशी टीका करायची नव्हती. तर गाव आणि दिल्ली यांचे सत्तासंबंध एकमेकाना प्रभावित करण्याच्या पलीकडे गेले आहेत का - असा प्रश्न मला पडला आहे. म्हणजे एका बाजूने वातावरण आपल्याला घडवते (समाज आणि व्यक्ती) आणि दुस-या बाजूने काही वेळा आपण वातावरण बदलवू शकतो. पण यातला प्रवाह नेहमी बदलता असतो - त्याचे काही गणित नाही. सत्तापिपासा ही तळातही आहे (फक्त वर नाही) हे समजून घेतलं की परिवर्तनाची प्रक्रिया करण्याचे काम निदान योग्य बिंदूवर तरी सुरु होईल. मला वाटलं की शुक्ल या कादंबरीतून 'वास्तवाला सामोरे जा, ते समजून घ्या' असा अत्यंत मोलाचा सल्ला देत आहेत.

    ReplyDelete
  12. सविता, ही अतिशय सुंदर कलाकृती परत एकदा स्मरणात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. मी ही कादंबरी वाचली नाहीये. पण या कादंबरीवर आधारित याच नावाची एक मालिका खूप पूर्वी (साधारण तीसेक वर्षांपूर्वी) दूरदर्शनवर दाखवली जात असे. ती आवर्जून बघायचो. त्यात ओम पुरीने रंगनाथचे काम केले होते असे स्मरते. मालिका बघतानाच या कादंबरीची ओळख झाली.

    सुरूवातीला चांगल्या पुस्तकांबद्दल जे काही लिहिलं आहे ते तर एकदमच चोक्कस!

    ReplyDelete
  13. बिपिनजी, दूरदर्शनवरच्या मालिकेचे नाव आठवत असेल तर जरुर सांगा. खरं म्हणजे या कथानकावर अगदी वास्तववादी उत्तम चित्रपटही काढता येईल. कोणाचे तिकडे लक्ष गेलेले दिसत नाही अजून.

    आणि चांगल्या पुस्तकांबद्दल आपण सगळेजण बहुतेक त्याच अनुभवातून जातो असं दिसतंय.

    ReplyDelete
  14. इकडं मॅजेस्टिकमधे हे पुस्तक मिळू शकेल का? काही आयडिया? मराठी नकोय. थेट हिंदीच वाचेन म्हणतो.

    ReplyDelete
  15. आल्हादजी, मॅजेस्टिकमधे हिंदी पुस्तकं मिळतात का? - हे मला माहिती नाही. साधारणपणे रेल्वे स्थानकांवर असलेल्या दुकानांत हिंदी पुस्तकं मिळतात असा अनुभव आहे - तिकडे शोधल्यास कदाचित मिळेल. आणि अर्थात हे पुस्तक हिंदीतून वाचण्याचा तुमचा विचार योग्यच आहे. मराठी अनुवाद मी वाचलेला नसल्यामुळे अनुवादाच्या दर्जाबाबत हे भाष्य नाही हे कृपया ध्यानात घ्यावे.

    ReplyDelete