शीर्षक वाचून गोंधळात पडणारे तुम्ही काही एकटेच नाही. मीही हा शब्द पहिल्यांदा वाचला तेव्हा गोंधळले. झालं असं की व्हॉट्सऍपवरच्या अनेक निरर्थक फॉरवर्ड्सच्या मांदियाळीत मला हा शब्द दिसला. रणरागिणी शब्द माहिती होता, पण रातरागिणी?
नवं काहीतरी दिसंतय म्हणून पाहिलं. ‘लोकमत’ दैनिकाच्या वतीने ‘सखी रातरागिणी नाईट वॉक’ आयोजित करण्यात आल्याची ती बातमी होती. २२ डिसेंबरची रात्र ही वर्षातली सर्वात मोठी रात्र असते. या रात्री पुणे शहरात एक छोटा वॉक ‘दैनिक लोकमत’ने आयोजित केला होता.
रात्री दहा
वाजता अलका टॉकीज (हा शब्द आता वापरातून गेलाय, पण अलका टॉकीज हे अलका टॉकीजच आहे)
चौकात जमायचं आणि तिथून शनिवारवाड्यापर्यंत चालत जायचं असा कार्यक्रम होता. अलका
चौक ते शनिवारवाडा म्हणजे फार फार तर दोन किलोमीटरचं अंतर. अगदी रमतगमत चालत गेलं
तरी अर्ध्या तासात पार पडणारं. पण कार्यक्रम तर दोन-अडीच तास चालेल असं संयोजकांनी
सांगितलं होतं. तर रस्त्यात गाणी, पथनाट्य, तारपा नृत्य, खाण्याचे आणि चहाचे
स्टॉल्स असणार होते. रात्रीचं असं निरुद्देश भटकून मला कितीतरी वर्ष उलटली होती. तसं
भटकण्याची ही एक नामी संधी चालून आली होती.
मग कधी नव्हे ते
व्हॉट्सऍप मेसेज फॉरवर्ड करण्याचा गुन्हा मीही केला. अर्थात फक्त पुणे शहरातल्या
स्त्रियांना मी हा निरोप पाठवला. काही ओळखीच्या पुरूषांनाही पाठवला – त्यांच्या घरातल्या
स्त्रियांना सामील व्हायचं असलं तर या विचारांनी. मला आलेल्या प्रतिसादांमध्ये
वैविध्य होतं. कुणी ‘यांना विचारून सांगते’ असं म्हणालं, तर कुणी ‘वेळ फारच
उशिराची आहे, पुढच्या वेळी संध्याकाळी सहा ते आठ घ्यायला सांगा म्हणजे मी येईन’ असं म्हणालं. कुणाची मुलं लहान होती, तर कुणाच्या घरी आजारी माणूस होतं.
कुणाला इतक्या रात्री परत यायला रिक्षा-टॅक्सी मिळणार नाही याची खात्री होती. तर
कुणाला ‘स्त्री-पुरूष समानता मानणाऱ्यांनी असं खास
स्त्रियांसाठीच्या कार्यक्रमात सामील व्हावं का’ अशी अत्यंत प्रामाणिक शंका होती.
शेवटी आम्ही चौघीजणी तयार झालो. तसंच बाणेरमधून एक मैत्रीण तिच्या सासूबाई
आणि लहान मुलीसह निघाली. एका मैत्रिणीचा दुसरीतला मुलगा घरातून निघायच्या अगदी दहा मिनिटं आधी झोपी
गेला. घरात दुसरं कुणी नसल्याने तिचं येणं रद्द झालं.
अलका चौकात आम्ही पोचलो तेव्हा व्यासपीठावरून गाणं गायलं जात होतं आणि जमलेल्या स्त्रियांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. हळूहळू गर्दी वाढत गेली. स्त्रियांचीच गर्दी असल्याने नकोशी धक्काबुक्की नव्हती. सार्वजनिक ठिकाणी अंग चोरून वावरावं लागण्याच्या अनुभवातून काही काळ तरी मुक्ती मिळाली. (अर्थात स्त्रियांचीही अती गर्दी असती तर तेव्हाही अंग चोरावं लागलं असतं म्हणा.) रातरागिणीचं थीम साँग ऐकायला मला आवडलं. ‘वस्त्रहरण आता होणे नाही, अपहरणाचा मुद्दाच नाही, रस्त्यावर आज उतरल्या नव्या वाघिणी, अंधारावर चालून जाणार रातरागिणी….’ अशा त्या गाण्याच्या सुरूवातीच्या ओळी होत्या. त्या गाण्याची लय छान आहे. सोबत "बादल पे पाव है, छोटासा गाव हैं, अब तो चल पडी, अपनी नाव हैं" यासारखी काही लोकप्रिय गाणीही होती.
‘अंधाराला घाबरत नाय, अंधाराला घाबरत नाय,’ ‘होऊ दे कितीही अंधार, आम्ही मागे नाही फिरणार’ अशा वेगवेगळ्या घोषणाही चालू होत्या. फुलगावच्या लोकसेवा शाळेतल्या मुली मोठ्या संख्येने आल्या होत्या. त्यात ढोलवादक पथकही होतं, एनसीसी कॅडेट्स होते, आणि नृत्याचा पोशाख धारण करून आलेला मुलींचा एक गट होता. हे सगळे गट एकाच शाळेतले होते की वेगवेगळ्या शाळांमधले हे मात्र माहिती नाही.
गाणी चालू होती तोवर आजूबाजूच्या (अनोळखी) स्त्रियांशी गप्पा झाल्या.
बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात रहात असलेल्या एक आजी एकट्याच आल्या होत्या. ‘माझ्यासोबत यायला कुणी मैत्रीण नव्हती, पण इथं आलं की काय मग सगळ्या मैत्रिणीच’ असं त्या हसतहसत म्हणाल्या. ‘लोकमत सखी मंच’चा मोठा गट आहे हे काहीजणींशी बोलताना कळलं. या गटात अनेक
साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रम चालतात असंही कळलं. हळूहळू ढोल वाजायला लागले आणि त्याच्या
त्रासाने आम्ही गर्दीपासून दूर जायला लागलो. शनिवारवाड्याच्या दिशेने चालायला
लागलो.
आम्ही रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत होतो आणि उजव्या बाजूला बऱ्याच
रिक्षा उभ्या होत्या. रिक्षाचालक हातात फलक घेऊन उभे होते. पुणे शहर स्त्रियांसाठी
सुरक्षित असावे यासाठी हे रिक्षाचालक कटिबद्ध असल्याचं सांगत होते. त्यांच्याशी
थोड्या गप्पा मारून पुढं निघालो.
एका ठिकाणी कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सर्वांसाठी गुळाचा
चहा ठेवला होता. तिथं दोन महिला पोलिसांशी गप्पा झाल्या. एक महिला पोलिसाला तिची
दोन वर्षांची मुलगी घरी झोपली आहे का नाही याची काळजी होती. रात्रीची ड्युटी
नेहमीच असते (शिफ्ट्स असतात) असं त्या सांगत होत्या.
बऱ्याच काळाने रात्री असं निवांतपणे, कसलीही घाई न करता चालायला मजा आली.
सोबत मैत्रिणी होत्या, त्यांच्याशीही गप्पा झाल्या. त्यांच्या मुलांशीही गप्पा
झाल्या. अनेक फोटो काढून झाले. नदीपात्रातल्या रस्त्यातून रात्री जाताना
ओंकारेश्वर देऊळ फार मोठं आहे असा साक्षात्कार झाला. डेक्कन आणि संभाजी उद्यान
मेट्रो स्थानकं इतकी जवळ आहेत, की ट्रेनला एक डबा जास्त जोडला की दोन्ही स्थानकं
जोडली जातील असा विनोद करून झाला.
शनिवारवाड्यावर पोचलो तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते. नाही म्हणता
म्हणता आम्ही दोन तास चाललो होतो तर. शनिवारवाडा सजवला होता. एका मैत्रिणीचा
तिसरीतला मुलगा शनिवारवाडा आत जाऊन पाहता येईल या आशेने आमच्यासोबत आला होता.
वाड्याचा दरवाजा बंद आहे हे कळल्यावर तो खूपच निराश झाला 😊
एकूण मजा आली तरी
बारकाईने पाहताना काही गोष्टी मात्र खटकल्या
ध्वनी प्रदूषणाचा खूप
मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर असताना पुन्हा याही कार्यक्रमात ढोल वाजले.
मान्य आहे, की मुलींचंच पथक होतं. पण उत्सव म्हणला की ढोल गरजेचा आहे का? गणेशोत्सवातले ढोल बंद करणं अवघड आहे. पण
निदान नवे उत्सव, त्या उत्सवांच्या परंपरा निर्माण करताना आपण काही भूमिका घेणार
आहोत? की नवे उत्सव फक्त
बाह्य स्वरूपातच नवे असणार आहेत? सौम्य
संगीताचेही अनेक पर्याय आहेत (जसं तारपा, तुतारी, सनई) ते पाहता येतील.
प्रखर दिवे डोळ्यांवर
येत होते. सगळं काही व्हिडिओसाठी करायची गरज नाही. सौम्य दिवे लावूनही कार्यक्रम
चांगला करता आला असता. प्रकाश प्रदूषण ही गोष्ट तर आपल्या गावीही नाही. माईकचा
कर्कश आवाजही नियंत्रणात ठेवता आला असता. रात्री बारा वाजता शनिवारवाड्यावर माईक
लावून कार्यक्रम करण्याने परिसरातल्या लोकांना त्रास झाला असणारच. 'एक दिवस काय
होतंय' असं म्हणून चालणार नाही. वर्तमानपत्रांकडून अजूनही आशा असणारे अनेक लोक
समाजात आहेत. चांगले पायंडे पाडायची जबाबदारी आपलीही आहे, आपल्या कार्यक्रमातून
आपण उत्सव साजरे करण्याचे पर्याय उभे केले पाहिजेत.
शिवाय कार्यक्रम
स्त्रियांचा आणि स्त्रियांसाठी असताना व्यासपीठावर सातत्याने पुरुष बोलत होते. कार्यक्रम
जर महिलांसाठी आहे तर व्यासपीठावरही महिलांना(च) जागा मिळू द्या. पुरुषांसाठी अन्य
अनेक जागा आहेत. स्त्रियांनी फक्त गाणी म्हणायची, घोषणा द्यायच्या आणि त्यांना
मार्गदर्शन वगैरे करायची वेळ आली की पुरूष पुढं येणार.... ही नेहमीचीच पद्धत याही
कार्यक्रमात दिसली.
स्त्रियांच्या
विकासासाठी स्त्रियांनी अमुक केलं पाहिजे आणि तमुक केलं पाहिजे (घाबरायला नाही
पाहिजे, रात्री बाहेर पडायला पाहिजे .... वगैरे) हे पण आता कंटाळाच नाही तर उबग
यावा इतकं जुनं झालंय. प्रश्न फक्त स्त्रियांच्या क्षमतांचा नाहीये. तसा असलाच तर
तो फार कमी आहे. स्त्रियांनी अनेक क्षेत्रांत आपली क्षमता वेळोवेळी सिद्ध केली
आहेच. प्रश्न आहे समाजाच्या संवेदनशीलतेचा. ती वाढवण्यासाठी स्त्रियांसोबत पुरूषही
सहभागी असले पाहिजेत. सामाजिक वागणुकीत बदल घडून आला पाहिजे. आणि त्यासाठी आवश्यक ते
पाठबळ प्रशासनाकडूनही मिळालं पाहिजे (कायदे, धोरणं, प्रशासकीय व्यवस्था, मूलभूत
सोयी वगैरे). या तिन्ही पातळ्यांवर काम झालं तरच स्त्रियांना खऱ्या अर्थाने
अंधारावर मात करायला आणखी बळ मिळेल.
अर्थात ही सगळी कामं 'लोकमत' या दैनिकाने केली पाहिजेत असं मला म्हणायचं नाहीये. त्यांनी त्यातला एक भाग केला. तो करताना या गुंतागुंतीच्या प्रक्रियेची जाणीवही अधिक ठळक असली तर जास्त चांगलं होईल. पुणे शहरातील अनेकींसाठी हा एक नवा अनुभव होता. या अनुभवाची प्रासंगिकता कायम राखायची असेल तर आत्मपरीक्षणाला, बदलांना पर्याय नाही – ‘लोकमत’लाही आणि आपल्यालाही! नाहीतर कार्यक्रम फक्त प्रतिकात्मक होऊन जाण्याचा धोका राहतो.
Khup sundar likhan aahe tai 😊
ReplyDeleteधन्यवाद, शीतल.
DeleteInteresting and nice program by लोकमत.
ReplyDeleteपण शेवट वाचून माझे पण मत तुमच्या प्रमाणे आयोजकांसाठी जरा नकारात्मक झाले.
ध्वनी आणि प्रकाश प्रदूषण 🥲.
आम्ही स्त्रियांना संधी/ प्लॅटफॉर्म/ स्वातंत्र्य देतो असे म्हणणारे काही अती शाहणे पुरुष असतील आयोजकांमध्ये.
मंचावरून नक्की कोण बोलत होते, ते (सुदैवाने) माहिती नाही 😉
Deleteआणि अजून एक उत्सुकता. यात महिला कुस्ती खेळाडूंबद्दल काही उल्लेख झाला की नाही? काल दिवसभरातच ते प्रकरण झालेले.
ReplyDeleteमहिला स्वातंत्र्य आणि सुरक्षितता बद्दल हा कार्यक्रम होता म्हंटल्यावर त्या विषयावर काहीतरी उल्लेख झाला असेल अशी अपेक्षा करतो.
ढोलांच्या आवाजामुळे आमचा गट व्यासपीठापासून खूप दूर होता. नंतर शनिवारवाड्यावरून आम्ही रात्री साडेबारा वाजता निघालो -त्यानंतर किती काळ कार्यक्रम चालला, आणि कोण बोललं हे माहिती नाही. पण जेवढं ऐकलं, आणि कार्यक्रमाचा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ पाहिला, त्यावरून तरी कुस्तीगीर महिलांचा विषय बोलला गेला असेल असं वाटत नाही. मी संपूर्ण कार्यक्रम ऐकला नसल्याने माझी माहिती अपुरी आहे.
DeleteMissed first part. But happy to have missed it when I read the last part! Thanks for sharing.
ReplyDeleteहे दोन्ही भाग मिळून एक अनुभव तयार होतो - हीदेखील त्यातली एक गंमत आहे.
Deleteमस्त 👍
ReplyDeleteधन्यवाद, शिल्पा.
Deleteखूप छान विचार समर्पक मांडणी 👌🏻
ReplyDeleteधन्यवाद, मीनल.
Deleteखूप छान लिहिलं आहेस, मुद्दे अगदी पटले, व्यासपीठावरून स्त्रिया देखील बोलल्या का? आणि साक्षी मलिक ने आदल्या दिवशीच कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली त्या बद्दल व्यासपीठावरील किंवा अन्य जमावातील स्त्रिया बोलल्या का? हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
ReplyDeleteधन्यवाद. जमावातल्या स्त्रियांशी या विषयावर माझं काही बोलणं झालं नाही. वरच्या एका प्रतिसादात मी लिहिल्याप्रमाणे मी संपूर्ण कार्यक्रम ऐकलेला नाही. त्यामुळे माझी माहिती चुकीची असू शकते. पण जेवढं ऐकलं-पाहिलं, त्यावरून या विषयावर काही बोललं गेलं असण्याची शक्यता कमी वाटते.
Deleteखरेतर reclaim night हे किती जुनं campaign आहे, स्त्री वादी चळवळी ने केलेलं. UK मध्ये Yorkshire मध्ये स्त्रियांच्या हत्येच्या घटना घडत होत्या. स्त्रियांनी अंधार पडला की public places ला जाऊ नये असं पोलिसांनी सांगितल्याने त्याला response म्हणून असे march तिकडे केले जात होते. Late 1970s ते late 1990s हे campaign तिकडे चालू होते.
ReplyDeleteनारी समता मंचाने अशी प्रकाश फेरी आयोजित केली होती, बहुधा १९८८ मध्ये. तेव्हा UK मधलं हे reclaim the night campaign चालू होतं. मंजुश्री सारडा च्या पाचव्या स्मृतिदिनी आणि तेव्हा अशा काही अत्याचाराच्या घटनाही होत होत्या त्यासाठी ती प्रकाश फेरी केली होती. या कार्यक्रमाला ही गीताली ताईंना स्टेज वर बोलावलं तेव्हा हे काही मांडायला संधी दिली जाईल असं वाटलं होतं
मलाही 'असा पहिलाच प्रयोग आहे' हे आयोजकांचं म्हणणं ऐकताना जरा नवल वाटत होतं. Reclaim the Night या अभियानाची माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद. त्याबद्दल अधिक शोधून वाचते. पुण्यातली प्रकाशफेरी माझ्याही स्मरणात नव्हती. मी रात्री साडेबारा वाजता तिथून निघाले, त्यामुळे गीतालीताई काय बोलल्या हे माहिती नाही. त्यांनाच विचारायला लागेल 😊
Deleteनेहमीप्रमाणे balanced लिहिले आहेस. नुसतं वाचून अनुभवता आलं.
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteप्रिती खूप चांगली आठवण करुन दिलीस. दोन वर्षापुर्वी दिल्लीच्या लोधी बागेत स्रियानी अशिच रात्र जागवली.
ReplyDeleteहोय. रात के अफसाने असं त्या कार्यक्रमाचं शीर्षक होतं असं मला आठवतंय.
DeleteHe punha suru keles likhan he mast ch ha 👌🏻👍🏻- SB
ReplyDeleteThanks, SB.
DeleteNicely captured...I was wondering how it went, and your blog provided a good neutral review. Thanks.- KK
ReplyDeleteThanks, KK.
Deleteसविस्तर वृत्तांत आहे. माझाही फेर फटका झाला 🙂
ReplyDeleteक्षणभर मला वाटलं की तू खरंच येऊन गेलीस की काय 😂
Deleteमस्त लिहिलं आहेस. हल्ली बरेच (90%) कार्यक्रम म्हणजे फक्त event असतात.
ReplyDeleteहो ना. या सार्वजनिक कार्यक्रमांच्या दर्जाबाबत काहीतरी केलं पाहिजे लवकरच.
Deleteखूपच सुंदर
ReplyDeleteधन्यवाद.
DeleteVaa
ReplyDeleteMast👌👌
धन्यवाद.
Deleteअनुभव छान शब्दबद्ध केलाय. लोकमतशी संबंधितांपैकी कोणी वाचला असेल की नाही? - PK
ReplyDeleteकार्यक्रमाच्या संयोजकांपैकी एकीशी माझं आधी बोलणं झालं होतं. त्यांना पाठवली आहे लिंक. त्यांनी वाचलं का नाही ते मात्र कळायला काही मार्ग नाही.
DeleteVery nice article.Nutan
ReplyDeleteधन्यवाद, नूतन.
DeleteKhup chan mat Mandalay
ReplyDeleteTumhi 👏👏👏
धन्यवाद, भारती.
Deleteसविता खुप छान अनुभव वर्णन केलास. सहभाग न घेता ही सर्व कल्पना आली. तुझे परखड विचार नेहमीच उल्लेखनीय असतात. फार उत्कृष्ट लेख. धन्यवाद शेअर केल्याबद्दल.
ReplyDeleteपोस्ट आवडल्याचं आवर्जून कळवलंत, त्यासाठी आभारी आहे.
Deleteखूप छान लिहिलंय....👌👌👍👍
ReplyDeleteधन्यवाद.
Delete