ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, March 14, 2013

१५८. हसू

शाळेत पावणे आलते.
कशाला कायकी.
आमाला कायबाय इचारलं.
धडा वाचाया लावला, पाडे इचारले.
अंक्या, भान्या, निमी हुशार हायेत बक्कळ.
त्यास्नी समदं येतं.
माज्या टकु-यात शिरतं, -हात नाय.
आमचे अण्णा म्हणत्यात “डोस्क्याला भोक हाये एक”.
गवासलं न्हाय ते बेणं – एक चिंधी बांधली की काम जालं!

मला  इचारलं कायतरी पावण्यानी. भ्याव वाटलं येकदम.
कांडल्यावानी झालं छातीत. ठोके नुस्ते. धाडधाड धाडधाड.
आवाज खोल हिरीतून आला.  
पावणे हसले. गुर्जीबी हसले.
समदी हसली. म्याबी हसली.

पावणे गेले.
गुर्जी आले.
माजे केस वडत सनकिनी ठिउन दिली गालावर. दातच तुटला येक.
रडत म्या चिराकले, “काSओ गुर्जी”
“बक्षीSस” ते म्हणले.
समदी पुन्ना हसली.

म्या रडतच व्हती.
तरीबी हसली. 

(केवळ शंभर शब्दांत - शीर्षक सोडून शंभर शब्द-  अनुभव मांडण्याचा हा प्रयोग.)

1 comment: