ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, March 18, 2013

१५९. विवेकानंदाचा वेदान्त विचार: भाग ७. द्वैताद्वैत, शुद्धाद्वैत,

भाग , ...........६ 

निंबार्काचार्यांच्या द्वैताद्वैत मतात कृष्णभक्ती हीच मुख्य गोष्ट आहे. कृष्ण म्हणजे गोपालकृष्ण किंवा राधाकृष्ण. व्रजभूमीत ज्याने मनुष्यरुपाने अनेक लीला केल्या तेच  त्यांच्या मते ब्रह्माचे उत्कट रुप आहे.

पण निंबार्काचार्य लोकांना फारसे माहिती नाहीत असे दिसते. कृष्णभक्तीच्या संदर्भात विशेषत: राधाकृष्ण भक्तीच्या संदर्भात चैतन्य महाप्रभूंचे नाव आपल्याला जास्त माहिती आहे. गोपालकृष्ण भक्तीच्या संदर्भात वल्लभाचार्य प्रसिद्ध आहेत. कदाचित त्यामुळेच भारतीय विदया भवनसारख्या नामांकित संस्थेने प्रकाशित केलेल्या पी नागराज राव लिखित Introduction to Vadanta’ या पुस्तकात निंबांर्काचार्यांच्या मताची चर्चा केलेली नाही.

निंबार्काचार्यांच्या जन्म-मृत्यूबाबत स्वाभाविकपणेच काहीही माहिती उपलब्ध नाही. सर्वसाधारणपणे मध्वाचार्यांच्या नंतरचा आणि वल्लभाचार्यांच्या आधीचा कालखंड निंबार्काचार्यांचा मानला जातो. ब्रह्म, जगत् आणि जीव यांच्या नात्यासंबंधी निंबार्काचार्यांचे जे मत आहे त्याला द्वैताद्वैत मत म्हटले जाते. म्हणजे यातही अद्वैत आहेच. पण केवलाद्वैत नाही. ब्रह्मसूत्रांवर निंबार्काचार्यांनी 'वेदान्त पारिजात सौरभ या नावाचे भाष्य लिहिले आहे. इतर मतांच्या खंडनाकडे फारसे लक्ष न देता स्वत:चा विचार मांडणे हे निंबार्काचार्यांचे वैशिष्टय लक्षात घेण्याजोगे आहे.

निंबार्काचार्यांच्या मते वेदाध्ययनानंतरच व्यक्तीला ब्रह्मज्ञानाचा अधिकार प्राप्त होऊ शकतो. कारण या अध्ययनातूनच त्या व्यक्तीमध्ये नित्यानित्यविवे जागृत होण्याची शक्यता असते. श्रवण, मनन आणि निदिध्यास ही वेदाध्ययनाची तीन प्रमुख अंगे आहेत.

रामानुजाचार्यांप्रमाणेच निंबार्काचार्यही ब्रह्म, जीव व जगत् अशी तीन मूळ तत्त्वे मानतात. त्यापैकी शेवटची दोन तत्त्वे ब्रह्मावर अवलंबून असतात. जीव आणि जगत् हे ब्रह्माशी एकरुप जरी असले तरी ब्रह्माचे अस्तित्व  मात्र त्यांच्या अस्तित्वावर अवलंबून असत नाही.

ब्रह्माचे अस्तित्व जीव आणि जगताच्या अतीत आहे. शंकराचार्यांचा मायावाद निंबार्काचार्यांना मान्य नाही. कारण ब्रह्मावर माया कर्म करु शकेलच कशीब्रह्म मायेमुळे झाकले जाणे शक्यच नाही. निंबार्काचार्यांच्या मते दोरीच्या जागी साप दिसणे वेगळे आणि ब्रह्माच्या जागी जग दिसणे वेगळे आहे. अज्ञानामुळे ब्रह्माच्या ठिकाणी आपल्याला जग दिसते या शंकराचार्यांच्या मतावर निंबार्काचार्यांचा एक साधा प्रश्न आहे - हे अज्ञान असते कोठे? ब्रह्मात ते असणे शक्य नाही. मग एकदा अज्ञान नावाची एक वेगळी वस्तू आहे असे मानले की ब्रह्माचे एकत्व बाधित होते.

निंबार्काचार्य यांच्या मते एखाद्याचे ज्ञान नंतर विसंगत वाटले तरी ते खोटे ठरवता येत नाही. ते ज्ञान त्या क्षणी तसेच झालेले असते आणि ते तेव्हा खरेच असते. त्या क्षणापुरते ते सत्यच असते.
ब्रह्म हे अद्वैत सत्पदार्थ असून सच्चिदानंद स्वरुप आहे. ब्रह्म स्वत: भोक्ता बनू शकते आणि भोग्य वस्तुही बनू शकते. सर्वशकितमान ब्रह्माला अशक्य असे काय आहे? त्यालाच अक्षरब्रह्म अशी संज्ञा ते देतात. ब्रह्म सदैव चार स्वरुपांत विद्यमान असते. ती चार  रुपे म्हणजे अक्षरब्रह्म,  ईश्वरब्रह्म, जीवब्रह्म आणि जगतब्रह्म. ईश्वरब्रह्मही पूर्णाशांने चिन्मयरुपी असते. रमाकांत, वासुदेव, नारायण, कृष्ण ही सारी त्या ब्रह्माचीच नावे आहेत.

जीव हा ब्रह्माचाच अंश. तो अणुआकारी असून अल्पज्ञ व अल्पशक्तिमान आहे. पण तोही चिन्मयरुपी असून इंद्रियांच्या मदतीशिवाय त्याला ज्ञान होऊ शकते. तो ब्रह्मावर अवलंबून असतो; पण ईश्वराप्रमाणेच तोही ज्ञानस्वरुप व ज्ञानाश्रयी  होऊ शकतो. जीव असंख्य आहेत. जीव नित्य, अज व अनादि आहे. मुक्तावस्थेतही जीव ब्रह्माशी एकरुप होत नाही. फक्त त्याला ब्रह्मानंदाचा अवस्था प्राप्त होऊ शकते. बद्ध जीव दोन प्रकारचे असतात - मुमुक्षु आणि बुभुक्षु. मुक्त जीवही दोन प्रकारचे असतात. गरुड आणि विश्वसेनासारखे नित्यमुक्त जीव आणि कृष्णाचा मुगुट, दागिने, अलंकार व बासरी यासारखे जीव. राधा व कृष्णाच्या कृपेनेच जीवाला मुक्ती मिळू शकते.

जगत् अचित् असून प्राकृत, अप्राकृत व काल अशा तीन प्रकारचे ते आहे. प्राकृत म्हणजे प्रकृतीपासून निर्माण झालेले. अप्राकृत म्हणजे कृष्णाचे शरीर - त्याचे हात, पाय वगैरे. जगत् आणि ब्रह्माचे नाते सर्प व त्याचे वेटोळे यासारखे आहे. - सर्पकुण्डलवदिदमवमन्तव्यम्.

निंबार्काचार्य प्रत्यक्ष, अनुमान व शब्द ही तीन प्रमाणे मानतात. राधा ही कृष्णाची आल्हादिनी शक्ती आहे. मोक्ष म्हणजे ब्रह्माशी एकरुपता नव्हे तर सारुप्यता. मोक्षावस्था प्राप्त करुन घेण्यासाठी कर्म, ज्ञान, उपासना, प्रपत्ती आणि गुरुपसत्ती अशी पाच साधने सांगितली आहेत.

निंबार्काचार्यांचा द्वैताद्वैत आतापर्यंत पाहिला. आता वल्लभाचार्यांच्या शुद्धाद्वैताकडे एक नजर टाकू.

शुद्धाद्वैत

श्रीवल्लभाचार्यांचे तत्त्वज्ञान शुद्धाद्वैत या नावाने ओळखले जाते. पुन्हा हे देखील अद्वैतच आहे पण केवलाद्वैत नाही. शंकराचार्यांच्या अद्वैतापेक्षा हा विचार वेगळा आहे हे दर्शविण्यासाठीच येथे शुद्ध या शब्दाची योजना करण्यात आली आहे.

वल्लभाचार्यांचा जन्म इसवी सन १४७९ मध्ये झाला. पुषिटमार्गाच्या स्थापनेचे श्रेय वल्लभाचार्यांना दिले जाते. त्यांच्या नावे किमान ३५ ग्रंथ आज उपलब्ध आहेत. अणुभाष्य हे त्यांचे ब्रह्मसूत्रांवरील भाष्य प्रसिद्ध आहे. भागवत पुराणावरील सुबोधिनी ही त्यांची टीकाही विख्यात आहे. आपल्या तत्त्वज्ञानाची उभारणी त्यांनी प्रस्थानत्रयी व भागवत पुराण यांच्या आधारे केली आहे.

पुष्टिमार्गाच्या उपासनेत दैवी कृपेला अपरंपार महत्त्व आहे. यात मानवी प्रयत्नांचे स्थान अगदीच नगण्य आहे.

ब्रह्म सचिचदानंद स्वरुप असून ते स्वतंत्र आहे. ती एक स्वतंत्र सत्ता आहे. जगत् ही त्याचीच अभिव्यक्ती असल्याने जगत् खरे आहे. पुरुषोत्तम हेच सर्वश्रेष्ठ तत्त्व आहे. या ठिकाणी एक फरक लक्षात घेतला पाहिजे की ब्रह्म या संकल्पनेपेक्षा पुरुषोत्तम या संकल्पनेवर वल्लभाचार्यांचा भर आहे. पुरुषोत्तम रसपूर्ण आहे. किंबहुना तेच त्याचे रुप आहे. तोच श्रीकृष्ण आहे. त्याच्यात अनंत गुण आहेत. त्याला अशक्य असे काहीच नाही. श्रीकृष्ण गीतेत 'दैवी हयेषां गुणमयी मम माया दुरत्यया असे म्हणतो - पुरुषोत्तम हाच मायिन आहे.

ईश्वरच जरी जगात परिणीत होतो हे खरे असले तरी त्याच्यात मात्र परिवर्तन होत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. याला वल्लभाचार्य अविकृत परिणामवाद असे म्हणतात. ईश्वर जगाच्या बाहेर नसतो तर जगातच असतो. तो आपल्याबरोबर आणि आपल्यात असतो. ब्रह्म पुरुषोत्तम आहे, अंतर्यामी आहे आणि अक्षरही आहे.

ईश्वराच्या लीलेने जगत् आणि जीव बनतात. आपली ममता आणि अहंता यांच्यामुळेच या जगात आपल्याला दु:ख सहन करावे लागते.

जीव तीन प्रकारचे असतात. प्रवाह (ज्यांना भूत भविष्याची काहीही तमा नसते ते), मर्यादा (जे वैदिक धर्माचे पालन करतात) आणि पुष्टि (उच्च प्रतीचे). जीव अणुमय असतात. त्यांना वर्णाश्रमाचे पालन करावे लागते.

पुष्टिमार्ग सर्वांसाठी खुला आहे. नवविधा भक्तीची चर्चाही वल्लभाचार्य विस्ताराने करतात. गोपींची श्रीकृष्णावरील भक्ती ते सर्वश्रेष्ठ प्रतीची मानतात. ती भक्ती म्हणजे प्रेम आहे, काम नाही. श्रीकृष्णाला आनंदात पाहणे हाच गोपींचा जीवनोद्देश आहे. गोपींना लाभलेला स्वरुपानंद ब्रह्मानंदापेक्षा उच्च दर्जाचा आहे असे वल्लभाचार्यांचे मत आहे.

मोक्ष म्हणजे ईश्वराशी एकरुपता! त्याचे स्पष्टीकरण करताना पी. नागराज राव म्हणतात, “Vallabha’s theism brings out that particular form of Bhakti, which is based on LOVE. His system marks an attempt to set forth a type of monism without Maya doctrine. The system affords full play to all the aspects of devotion to LORD….”

शुद्धाद्वैत आणि द्वैताद्वैत या दोन्ही संप्रदायातील भक्तीला विवेकानंदांनी आपल्या विचारांत महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. पण त्यातील इतर कोणत्याही विचारांचा ठसा विवेकानंदांवर पडल्याचे दिसून येत नाही.

थोडक्यात महत्त्वाचे

वेदान्त विचाराचा भारतीय तत्त्वज्ञानातील वाटा, वेदान्त विचारांचे पाच मुख्य विचारप्रवाह, त्यातली मुख्य तत्त्वे, त्यातील साम्य आणि भेद हे सर्व आपण भाग ४ ते ७ मध्ये पाहिले आहे. हा भाग पारिभाषिक संकल्पनांमुळे थोडा क्लिष्ट झाला.

आपल्या रोजच्या भाषेत या संकल्पनांचा विचार पुढीलप्रमाणे करता येईल.

"मी कोण आहे? मी कुठून आलो? मी कुठे जाणार? माझ्या भोवताली हे सगळे दिसते ते काय आहे? मी गेल्यावर याचे काय होणार? मी मेल्यावर जिकडे कुठे जाईन तिकडे माझे काय होणार? जगात चांगले आणि वाईट असे दोन्ही दिसते - ते कुठून येते? काही माणसांना सहजगत्या सुख मिळताना दिसते पण काहींच्या वाटयाला दु:खच दिसते - असे का? काही जीव माणसाइतक्या हालचाली, विचार करु शकत नाहीत - त्यांच्या असण्याचे प्रयोजन काय? मुळात माझ्या तरी असण्याचे प्रयोजन काय? मला किती निर्णयस्वातंत्र्य आहे? इच्छा कुठून येतात? शरीरात व्याधी कुठून येतात? मला मरण येणार - त्याच पद्धतीने हे जगही कधीतरी पूर्ण नष्ट होणार का? मग त्यापुढे काय असेल? ..........." असे अनंत प्रश्न आपल्या मनात डोकावून जातात. कुणी त्याचा पाठपुरावा करतात, कुणी हसून दुसरं काहीतरी करायला लागतात.

तत्त्वज्ञानात या आणि अशाच प्रकारच्या प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. इथं मी - म्हणजे जीव. ते अनेक आहेत. शरीर नष्ट झाले की जीव नष्ट होतो का? की 'वासांसि जीर्णानि यथा विहाय ..." (वस्त्र जीर्ण झाल्यावर त्याचा त्याग करुन नवे परिधान करावे) तसे जीव नवीन शरीर धारण करतो? हे जीव कुठून येतात? कुठे जातात? त्यांच्यात वेगळेपणा असतो फक्त की काही एक समान तत्त्वही असते? (आपण वेगवेगळी माणसं असलो, तरी माणूसपणा हा आपल्यात समान धागा आहे)

या जीवांचं नियंत्रण करणारी ती अज्ञात शक्ती म्हणजे ब्रह्म ती सान्त असू शकणार नाही, कारण ब्रह्म सान्त म्हटले की त्यालाही उत्पत्ती, स्थिती आणि विनाश लागू होणार. म्हणून ते अनंत आणि अनादि. ते निर्गुण (म्हणजे गुणरहित नाही तर गुणांच्या पलिकडे, ते गुणांच्या आपल्या कल्पनेतून व्यक्त होऊ शकत नाही, आपल्या कल्पना, आपले शब्द तोकडे आहेत) की सगुण आहे? तो दयाळू आहे का? या शक्तीचे स्वरुप काय आहे? तिने हे जग आणि हे जीव का बरे निर्माण केले असावेत? आपण या शक्तीचे अंश आहोत का? की आणखी काही? .. वगैरे सगळा विचार हा ब्रह्म या संकल्पनेच्या विचारात केला गेला आहे.

माझ्या सभोवताली जे आहे ते जगत्. माझे आजोबा गेले, आजी गेली, आई-वडील गेले - तरी जग आहेच. उद्या माझी नातवंडे-पतवंडे असतील तेव्हाही जग असेल. मग हे जग आणि जीव यांचा संबंध काय? हे जग आणि ब्रह्म यांचा संबंध काय? मला दिसते ते सत्य आहे की सत्य काही वेगळेच आहे? ....

थोडक्यात सांगायचे तर 'मी' आणि 'माझ्या प्रत्ययाला येणारे भवताल' यांना जोडणारा धागा काय (ते अव्यक्त आहे की व्यक्त?) याचा शोध घेणा-या चिंतनशील माणसांनी जीव, जगत, ब्रह्म ... असे पारिभाषिक शब्द वापरले आहेत. पण ते बोलताहेत आपल्याच प्रश्नांबद्दल ....
अगदी थोडक्यात सांगायचे तर.
१.      पाचही वेदान्त विचार ब्रह्मवादी आहेत. ब्रह्म हीच त्यांच्या मते अनादि आणि अनंत सत्ता आहे.
२.      पाचही वेदान्त विचार ब्रह्म, जीव आणि जगत् या तीन संकल्पना मानतात.
३.      माया ही संकल्पना फक्त शंकराचार्य मानतात, इतर आचार्यांनी तो खोडून काढली आहे.
४.      ब्रह्म, जगत् आणि जीव यांचे नाते काय याबद्दल पाचही वेदान्त विचार भिन्न मते मांडतात. पण ब्रह्म आहे, जग आहे, जीवही आहे; जीव आणि जगत् हे ब्रह्माचे अंश आहेत याविषयी त्यांच्यात मतैक्य आहे.
५.   मोक्ष म्हणजे काय आणि मोक्ष मिळवण्याचे मार्ग याबद्दल पाच आचार्य वेगवेगळे विचार मांडतात.

इथून पुढे आपण या सर्व मुद्द्यांचा विवेकानंद कसा समन्वय साधतात, त्यात ते काय भर घालतात हे आपण विस्ताराने समजून घेणार आहोत. 

क्रमश: 

No comments:

Post a Comment