ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, March 4, 2013

१५५. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग ५. विशिष्टाद्वैत

भाग २(अ) , २ (आ), ४(१), ४(२),

वेदान्त म्हणजे फक्त शांकरवेदान्त म्हणजेच केवलाद्वैत नव्हे हे आपण यापूर्वीही समजून घेतले आहेच. रामानुजांचा वेदान्त हाही अद्वैत वेदान्तच आहे पण तो केवलाद्वैत नसून विशिष्टाद्वैत आहे. शंकराचार्य आणि रामानुजाचार्य हे दोघेही स्वत:च्या भूमिकांच्या पुष्टयर्थ उपनिषदांतील शब्दांचा आधार घेतात. शब्द तेच पण त्याचे अर्थ मात्र लावणा-याच्या सोयीने वेगवेगळे रुप धारण करतात हे पाहताना गंमत वाटते. उपनिषदांची तत्त्वप्रणाली ठाशीव आणि बांधीव स्वरुपाची नाही तेही एका अर्थी बरेच आहे म्हणा! कारण त्यामुळे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात विविधता आली आणि मग त्या विविधतेच्या अनुषंगाने उदारता आणि परमताबददल सहिष्णुताही आली. पण दुर्दैवाने हे सारे थोर आचार्य ही सहिष्णुता त्यांच्या स्वत:च्या लेखनात मात्र अजिबात दाखवत नाहीत. ज्याला कोणाला स्वमताचा प्रचार आणि प्रसार करायचा असतो त्याला थोडेफार एकांतिक असावेच लागते की काय असे आचार्यांचा अभ्यास करताना वाटते.  

तमिळनाडूमध्ये असलेले श्रीपेरुंबुदूर हे रामानुजाचार्यांचे जन्मस्थान. त्यांचा जन्म इसवी सन १0२७ मध्ये झाला असे मानण्यात येते. त्यांचे श्रीभाष्य (ब्रह्मसूत्रे अथवा वेदान्तसूत्रावरील भाष्य), गीताभाष्य, वेदान्तसार, वेदान्तसंग्रह, वेदान्तदीप आदि ग्रंथ प्रसिद्ध आहेत. वैष्णव धर्माचा प्रसार करण्याचे श्रेय रामानुजाचार्यांना दिले जाते. इसवी सन ११३७ मध्ये ते मृत पावले असे मानण्यात येते.

रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैताची जी विचारप्रणाली मांडली आहे, तीही शंकराचार्यांप्रमाणेच प्रस्थानत्रयीचा आधार घेऊनच! पण रामानुजाचार्य केवळ तेवढयावरच थांबले नाहीत. त्यांनी पुराणांचाही आधार घेतला. त्याचबरोबर पांचजन्य नामक आगमग्रंथ व तामिळ अळवार संतांची परंपरा यांचाही आधार घेतला. भागवत धर्माच्या शिकवणुकीचाही प्रभाव रामानुजाचार्यांच्या मांडणीवर दिसून येतो. भागवत धर्माच्या मते परमेश्वर व्यूहरुपाने प्रकट होतो. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न व अनिरुद्ध हे चार व्यूह आहेत अशी भागवत धर्माची मान्यता आहे. प्रा. श्रीनिवास दीक्षित यांच्या मते भागवत धर्मातील वासुदेव भक्ती व उपनिषदांतील सगुणोपासना यांचा मिलाफ करुन विशिष्टाद्वैत बनविले आहे.

या ठिकाणी रामानुजाचार्यांच्या विचारांकडे आपण दोन दृष्टीकोनातून पाहणार आहोत. एक म्हणजे आधी पाहिलेल्या ‘केवलाद्वैत’ विचारांपेक्षा त्याचे मत कुठे वेगळे आहे ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. दुसरे म्हणजे विवेकानंदांनी पुढे जो विचार मांडला, त्याचा ‘विशिष्टाद्वैत’ विचारधारेशी असलेला संबंध आपल्याला समजावा इतपत आपण हा विचार समजून घेणार आहोत. अर्थातच विशिष्टाद्वैताची मर्यादित ओळख आपल्याला होणार आहे.

विशिष्टाद्वैत या शब्दाचा अर्थ पाच सहा वेगवेगळया प्रकारांनी लावला जातो. १ रामानुजाचार्यांचे अद्वैत सर्वथा द्वैततरहित नाही. इथे द्वैतही आहे आणि अद्वैतही आहे. ते भेदसापेक्ष आहे. म्हणजेच ते विशिष्ट आहे. विशिष्टाद्वैत या सामासिक शब्दाचा 'विशिष्टम् अद्वैतम् यत्र असा विग्रह करता येतो. २ चित् (जीव) आणि अचित् (जगत्) ही तत्त्वे ईश्वरावर अवलंबून आहेत. ईश्वर मात्र स्वतंत्र आहे. (याचा विस्ताराने विचार आपण नंतर करु.) अशा या तिघांच्यात जे ऐक्य संभवते तेच विशिष्टाद्वैत होय. ३ चित् किंवा जीव हे अनेक आहेत. पण त्यांच्यात प्रकाराद्वैत आहे - हेच विशिष्टाद्वैत. ४ आपले शरीर व आत्मा हे भिन्न असूनही त्यांच्यात एक प्रकारचे अद्वैत असते. तसेच ईश्वर आणि त्याचे चिद्रूपी शरीर यांच्यातही अद्वैत आहे. या अद्वैताचे नाव विशिष्टाद्वैत. ५ चित् आणि अचित् यांनी विशिष्ट असलेल्या परमेश्वराचे जे अद्वैत तेच विशिष्टाद्वैत ६ जगत्कर्तृत्व, अनंतत्व वगैरे गुणांनी विशिष्ट असलेले ब्रह्म व जड शरीर आणि चेतन जीव यांनी विशिष्ट असलेले ब्रह्म यांच्यात अद्वैत आहे. 'विशिष्टयोर्यदद्वैतं तद विशिष्टाद्वैतम् '- दोन विशिष्टांचे अद्वैत ते विशिष्टाद्वैत. ७ कारणशरीराने विशिष्ट असलेला परमात्मा व कार्यशरीराने विशिष्ट असलेला परमात्मा हे दोन्हीही एकच होत. त्यांच्यात अद्वैत आहे, असाही विशिष्टाद्वैत शब्दाचा अर्थ लावला जातो.

मूळ सिद्धान्त

शंकराचार्यांचा अभ्यास करताना आपण ब्रह्म, जगत आणि जीव यासंबंधीचे त्यांचे विचार पाहिले. अंतिम अथवा शाश्वत सत्य काय, जगताचे अस्तित्व सत्य आहे काय, जीव आणि मोक्षमार्ग हे रामानुजाचार्य यांच्या विवेचनाचे प्रमुख पैलू आहेत.

विशिष्टाद्वैत शब्दाच्या वर केलेल्या विवेचनावरुन रामानुजाचार्यांचे मूलभूत सिद्धान्त आपल्या ध्यानी येतात. रामानुजाचार्यांच्या मते परमेश्वर अथवा सद्वस्तु निर्विशेष नाही. सविशेष अथवा भेदसंग्राहक आहे. हे भेद म्हणजे १ चित् २ अचित् आणि ३ ईश्वर.

१ चित्: चित् म्हणजे ज्ञान हे ज्याचे स्वरुप आहे असे कर्तृत्व आणि भोक्तृत्व यांनी युक्त असलेले जीव. ते अनंत आहेत. वेगवेगळे आहेत. नित्य, बद्ध व मुक्त अशा तीन प्रकारांत त्याचे वर्गीकरण केले जाते. २ अचित्: अचित् म्हणजे सर्व जड विश्व. प्रकृती हे याचे मूल कारण असून सत्व, रजस आणि तमस हें या प्रकृतीचे गुण आहेत. ३ ईश्वर: चित् व अचित् याच्या आधीन आहेत. तर ज्ञान, शक्ती, बल, ऐश्वर्य, वीर्य व तेजस हे सहा गुण त्याच्या ठिकाणी वास करतात. ईश्वर हा पूर्णत: स्वतंत्र आहे. या ईश्वराची भक्ती करून मोक्ष मिळतो.

ब्रह्म

एक गोष्ट आपण आवर्जून लक्षात घ्यायला हवी आणि ती म्हणजे सर्वच वेदान्ती ब्रह्मवादी आहेत. सर्वांसाठी ब्रह्म हीच अंतिम सत्ता आहे. त्यांच्यात मतभेद आहेत ते ब्रह्माच्या स्वरुपाबददल, ब्रह्माच्या स्वरुपाचे वर्णन कसे करायचे याबददल आणि जीव आणि ब्रह्म (म्हणजेच आत्मा आणि परमात्मा) यांच्या नात्याबद्दल.

शंकराचार्यांची निर्गुण ब्रह्माची कल्पना रामानुजाचार्यांना राक्षसी वाटते. हे निर्गुण  ब्रह्म त्यांना शून्यासारखे पोकळ वाटते. ज्याच्याबददल काहीच सांगता येत नाही, ज्याने मस्तकाची वा हृदयाची भूक भागत नाही - असले ब्रह्म काय कामाचे? रामानुजाचार्यांच्या मते 'यतो वाचो निवर्तन्ते सारखी ब्रह्माची वर्णने इतकेच दर्शवितात की मानवी बुद्धीची झेप ब्रह्माचे यथार्थ वर्णन करु शकत नाही. उपनिषदांतील ब्रह्माचे नकारात्मक म्हणजे ‘नेति नेति वर्णन असे सुचविते की,  ब्रह्म हे अनंत गुणमय असल्याने मानवी गुणांच्या भाषेत त्याचे नेमके वर्णन करता येणे अशक्य आहे. ब्रह्म निर्गुण  नसून 'अनंत कल्याण परिपूर्ण आहे. ब्रह्म सगुण आहे असे म्हटले जाते तेंव्हा ते सान्त आहे असा मात्र त्याचा अर्थ नाही. रामानुजाचार्यांचे ब्रह्म एकाच वेळी सगुण आहे आणि अनंतही आहे.

रामानुजाचार्यही ब्रह्माचे वर्णन 'सच्चिदानंद’ अशाच शब्दात करतात. परब्रह्माच्या ठिकाणी वाणीची आणि मनाची गती नाही असे उपनिषदांत म्हटले आहे. त्याचे कारण ब्रह्म निर्गुण  आहे असे नसून त्याचे गुण अपरिमेय आणि अचिंत्य आहेत असे आहे. वास्तविक परमात्मा अनंत कल्याण गुणांनी युक्त, ऐश्वर्यसंपन्न, परमकारुणिक, भक्तवत्सल व सर्वनियामक आहे. केशव, नारायण, वासुदेव, विष्णू इत्यादी त्याचीच नावे आहेत. त्याची भक्ती केल्याने मोक्ष मिळतो.

चित् (जीव) आणि अचित् (जगत्) हे ब्रह्माचाच, ईश्वराचाच एक भाग आहेत. श्रीभाष्यात आचार्य म्हणतात, All sentient and non-sentient beings together constitute the body of the Supreme Person, for they are completely controlled and supported by Him, for His own ends and are absolutely subordinate to Him.” यालाच ‘शरीर शारीरी भाव म्हणतात.

जीव, जगत् आणि ब्रह्म यांच्या नात्यासंबंधी बोलताना रामानुजाचार्य तीन वेगवेगळया रंगांच्या धाग्यांनी बनलेल्या कापडाची उपमा आपल्यापुढे सादर करतात. ईश्वर, चित् आणि अचित् यांच्या अशा प्रकारच्या विणीतून, नात्यातूनच विश्वाची उत्पत्ती होते. पण हे घडत असताना ब्रह्मामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न होत नाही. त्याचे अनंत कल्याणमयी स्वरुप कायम राहते.

पांचरात्र अथवा भागवत धर्माचे अनुकरण करुन रामानुजाचार्य पाच प्रकारच्या ईश्वराबददल बोलतात. १. परमात्म्याच्या मूळ अथवा सूक्ष्म स्वरुपास नारायण किंवा वासुदेव म्हणतात. शुद्ध सत्त्वाने बनलेल्या दिव्य शरीराने युक्त होऊन वैकुंठ नगरीत मुक्त जीव आणि नित्य जीव यांच्यासह तो क्रीडा करत असतो. यास परवासुदेव असेही म्हणतात. २. अर्चावतार म्हणजे मंदिरातील प्राणप्रतिष्ठादि संस्कार केलेल्या मूर्ती ३. दुर्जनांचा विनाश करण्यासाठी प्रसंगोपात घेतलेले मत्स्य, कूर्म वगैरे दहा अवतार म्हणजे विभज हा प्रकार होय. ४. वासुदेव, संकर्षण, प्रधुम्न व अनिरुद्ध हे चार व्यूह होत. या व्यूहांच्या आश्रयाने विश्वाची उत्पत्ती, धारण, पोषण वगैरे कार्ये होतात. ५. अंतर्यामी म्हणजे आत राहून नियमन करणारा. जड वस्तूंच्या आणि जीवाच्या अगदी आत राहून परमात्मा त्यांचा प्रेरक, सहकारी, अनुमति देणारा, साक्षी आणि कर्माप्रमाणे फळ देणारा होतो.

शेषिन, अंशी, आधार, रक्षक अशा अनेक शब्दांनी रामानुजाचार्य  ब्रह्माचे अथवा ईश्वराचे वर्णन करतात. शेष - शेषी संबंधांमध्ये जीव ईश्वरावर पूर्णत: भार टाकून मोकळा होतो. ईश्वर हाच जगताचा नियंता आहे.

रामानुजाचार्यांच्या ईश्वरासंबंधी पी. नागराज राव असे म्हणतात: Ramanujacharya’s conception of God is intimate and it answers the purpose of religion. God is with us. He is close to us and works in our lives. He is seated in the hearts of all men. The God of Ramanujacharya is neither an intellectual abstraction that is inoperative in the behaviour of men nor is it a conventional and barren verbal formula tht we keep on repeating because it is our habit.”

ब्रह्मासंबंधी रामानुजाचार्यांची ही भूमिका पाहिल्यानंतर त्यांना मायावादाची गरज नाही हे सहजच लक्षात येते. त्यांच्या मते जग मिथ्या नाही तर ते ब्रह्मापासून बनलेले असल्याने सत्यच आहे. सृष्टीसंबंधीचे त्यांचे विचार आपण आता जरा विस्ताराने पाहू. ब्रह्म सत्य आहे, जगत् सत्य आहेत आणि जीवही सत्य आहेत असे रामानुजाचार्यांचे प्रतिपादन आहे.

जगत्

‘जगन्मिथ्या’ हे रामानुजाचार्य यांना मान्य नाही. जे साक्षात ईश्वरापासून निर्माण झाले आहे, ज्यात साक्षात ईश्वर आहे – ते सत्यच आहे. ब्रह्म अथवा ईश्वर जितके सत्य तितकेच जगही सत्य आहे. सत्तात्रयाचा सिद्धांत रामानुजाचार्य यांच्या मते अनावश्यक आहे. ईश्वराने स्वत:च्या इच्छेने हे जग निर्माण केले आहे.

अखिल जड विश्वाचे मूल कारण प्रकृति आहे. रामानुजाचार्यांची प्रकृति ईश्वराप्रमाणे अनादि व शाश्वत आहे. जीव व ईश्वर यांच्यासमवेत प्रकृतिचाही तत्त्वत्रयामध्ये समावेश होतो. सत्त्व, रजस व तमस या तीन गुणांनी युक्त अशा प्रकृतिचा उपयोग ईश्वर विश्वनिर्मितीसाठी करुन घेतो. प्रकृति अनादि असली तरी अनंत मात्र नाही. ती ईश्वराच्या नियंत्रणाखाली असते. एका बाजूने ईश्वराशी तर दुस-या  बाजून जीवाशी तिचे अतूट नाते असते.

सांख्यांची प्रकृति अनंत, अमर्याद आहे तर रामानुजाचार्यांच्या प्रकृतिला नित्यविभूतिच्या प्रदेशाने मर्यादा येते. या नित्यविभूतिच्या प्रदेशातच वैकुंठ वसलेले आहे. त्यात ईश्वर, मुक्त जीव व नित्य जीव असतात. हा शुद्धसत्त्वाचा प्रदेश होय. रजस व तमस यांना या प्रदेशात स्थान नाही. सृष्टीच्या रचनेत काल, जीव, धर्मभूत ज्ञान यांचीही चर्चा रामानुजाचार्यांनी केली आहे.

रामानुजाचार्यांच्या मते हे जग केवळ तत्वत: ब्रह्म नसून वास्तविक ब्रह्म आहे. इथल्या कणाकणात ब्रह्म आहे. हे जग म्हणजे ब्रह्माचे शरीर आहे – ते भासमान कसे असेल? प्रलयात याच जगाचे काही अंश शिल्लक राहतात आणि त्यातून नव्या जगाची उत्पत्ती होते. म्हणजे जगही शाश्वत आहे, त्याचा कधीच पूर्ण विलय होत नाही. पण हे जग पूर्णत: ईश्वरावर अवलंबून आहे. तोच कर्ता, धाता आणि त्राता आहे.

प्रकृति तीन गुणाचीं आहे – सत्त्व, रज आणि तम. इथे रामानुजाचार्य ‘शुद्ध सत्व’ ही संकल्पना मांडतात. ईश्वरामध्ये तम आणि रज नसतात तर फक्त शुद्ध सत्व असते असे त्यांचे मत आहे.

रामानुजाचार्य माया मानत नाहीत त्यामुळे शंकराचार्यांच्या सत्तात्रयापेक्षा त्यांची ‘सत्ता’ वेगळी आहे. पण रामानुजाचार्यांचीही ‘सत्ता’ एकच आहे – तिचेच द्रव्य आणि अद्रव्य असे दोन प्रकार आहेत. द्रव्याचे जड आणि अजड असे दोन विभाग होतात. प्रकृति आणि काल हे जड द्रव्य आहेत तर जीव, ईश्वर, धर्मभूत ज्ञान आणि शुद्ध हे अजड द्रव्य आहेत. सांख्य तत्त्वज्ञानात प्रकृतिचे जे स्थान आहे, त्याहून ते इथे वेगळे आहे. अद्रव्यात पंचमहाभूते, त्रिगुण यांच्यासोबत साक्षी आणि संसार यांचा समावेश होतो. विवेकानंदांचा वेदान्त विचार समजावून घेताना या सगळ्या संकल्पनांची सखोल गरज पडत नसल्याने आपण त्याची चर्चा इथे करणार नाही.

जगताची संकल्पना मांडताना रामानुजाचार्यांनी मायावादाचे पूरेपूर खंडन केले आहे. आश्रयानुपपत्ती, स्वरुपानुपपत्ती, अनिर्वचनानीयामुपपत्ती, प्रमाणानुपपत्ती हे मायेच्या स्वरुपासंबंधी खंडन, मायेच्या परिणामासंबंधी विरोधानुपपत्ती, मायेच्या विनाशाविषयीच्या निवर्तकालानुपपत्ती व निवृत्यनुपपत्ती असे या खंडनाचे स्वरुप आहे. आपल्या चर्चेचा हा मुख्य विषय नसल्याने आपण त्याच्या खोलात जाणार नाही.

जीव

जीव अनंत असून प्रत्येक जीव हा ब्रह्माचा अंश आहे. आगीपासून ठिणग्या जशा वेगळ्या असतात आणि नसतातही  तद्वतच जीव आणि ईश्वर यांचे नाते आहे. जीव आणि ईश्वराच्या नात्यात ऐक्य आणि भेद दोन्हीही आहे. जीव शरीरापेक्षा भिन्न आहे. ईश्वर प्रत्येक जीवात साक्षीरुपाने विराजमान आहे. जीव शरीराचा माध्यम म्हणून उपयोग करतो. मानवाचे अस्तित्व  ईश्वराच्या असितत्वाहून वेगळे कधीही करता येत नाही. पण माणूस सान्त असल्याने अनंत ईश्वराशी तो कधी एकरुपही होऊ शकत नाही. प्रा. एल. के. आरावस्कर रामानुजाचार्यांची जीवविषयक भूमिका स्पष्ट करताना म्हणतात, “Ramanuja  criticizes Shankara’s view that the relation between the Brahman and the Jiva is that of identity (अभेद) and also emphasizes so much difference between the Seflf and Brahman (God) that one is naturally led to believe that the relations is that of difference (भेद). This is also confirmed by his statement in the commentary that the Brahman is other than the embodid Self. From his commentary on the Sutra (2.3.4.2) it is clear that the individual Self is part of Brahman. If so, THAT THOU ART (तत्त्वमसि) becomes THOU ART HIS (तस्य त्वम् असि)…. What Ramanuja seems to make out is that Brahman never becomes a Self as the hole never becomes a part.”

नित्य, मुक्त आणि बद्ध असे तीन प्रकारचे जीव आहेत. जीवाला शरीर प्राप्त होते ते त्याच्या पूर्वकर्मानुसार.  जीव संसारात लिप्त होतो, गुंततो तेव्हा त्याच्या ज्ञानाचा संकोच होतो. ज्यान्वये हृदयाचा अथवा जीवाचा संकोच होतो - त्या सर्व कृती वाईट तर ज्यामुळे जीवाचा विस्तार होतो त्या कृती चांगल्या. इथे रामानुजाचार्य ज्ञानाचा संकोच आणि विस्तार याबद्दल बोलत आहेत. 

ज्ञान हे जीवाचे स्वरुप आहे. हे स्वरुपज्ञान अणू असून नित्य आहे. ते स्वयंप्रकाश आहे व त्यात कोठलेही बदल घडत नाहीत. जीव अजड आहे. धर्मभूत ज्ञानाच्या आकुंचन प्रसरणामुळे जीवाच्या ज्ञानाचा विस्तार कमी जास्त होऊ शकतो व त्यास गाढ झोपही शक्य होते. जीव हा कर्ता आणि भोक्ता आहे. रामानुजाचार्यांच्या विचारांचे सार मांडताना एम. यमुनाचार्य म्हणतात, “Summing up, we  may say that from the standpoint of Shri Ramanujacharya, the Jiva is self-luminous (स्वस्मैभासमानत्व), sentient (चेतनत्व), subject of experience (ज्ञानाश्रयित्व), agent (कर्तृत्व). Its special characheristics in relations to Ishwara are dependence (शेषत्व) or subservience (परतंत्रत्व) and the quality of being supported (विधेयत्व), and controlled (अधेयत्व). At the same time Ramanuja points out, “The activity of the Self (कर्तृत्व) is due to its own nature but to its contact with the different gunas.” Its original nature however is one of purity (अमलत्व). It is open to the Self to be inactive if it so chooses.’

मोक्षविचार

मोक्ष म्हणजे तापत्रयातून सुटका. रामानुजमताप्रमाणे भक्ती आणि प्रपत्ती हीच काय ती मोक्षाची साक्षात साधने होत. कर्म आणि ज्ञान पूर्णत: निरुपयोगी आहेत असे नव्हे - पण रामानुजांच्या विचारांत त्या दोहोंनाही दुय्यमच स्थान आहे.

रामानुजाचार्यांचा ईश्वर सगुण असल्याने प्रेमाला, भावनेला, भक्तीला आपोआपच महत्त्व आले आहे. भक्ती म्हणजे परमात्म्याविषयी असीम प्रेम. अळवार संतांचा भक्तीमार्ग रामानुजाचार्यांना प्रभावित करुन गेला असल्याचे या ठिकाणी स्पष्टपणे जाणवते. मानवाच्या भक्तीला ईश्वर जो प्रतिसाद देतो, त्याला 'प्रसाद म्हटले जाते. हा प्रसाद मिळणे हा जीवांचा जन्माधिष्ठीत हक्क नसतो तर असा प्रसाद मिळणे ही परमेश्वराची कृपा असते. रामानुजाचार्यांच्या मते भक्ती म्हणजे परमेश्वराचे सततचे स्मरण - ध्रृवानुस्मृति! परमेश्वराबददलचे हे उत्कट प्रेम पूर्णत: निर्हेतुक असते. भक्तीने प्रसन्न झालेला ईश्वर जीवाला मोक्ष देतो. ईश्वराची करुणा हा मोक्षप्राप्तीत महत्त्वाचा आहे. येथे मोक्ष म्हणजे 'ब्रह्रौव भवति ही स्थिती  होत नाही. रामानुजाचार्यांच्या मते मोक्ष म्हणजे ईश्वराशी परमसाम्य पावून, दिव्य शरीराने युक्त होऊन वैकुंठलोकी चिरंतन निवास करणे. याचाच अर्थ असा की शंकराचार्यांनी मांडलेली ‘जीवन्मुक्त’ (या जीवनात, या देहात मुक्तावस्था) विशिष्टाद्वैतानुसार शक्य नाही.  जीव आणि ब्रह्म अविदयेमुळे वेगळे वाटतात असे नाही तर वास्तवातच त्यांच्यात भेद आहे असे रामानुजाचार्यांचे मत आहे. त्यामुळे मोक्षावस्थेतही जीव व ब्रह्म यांच्यातील हा भेद टिकून राहतो. हा भेद शाश्वत स्वरुपाचा आहे.

भक्तीहून उत्कट अशी जी शरणागतीची, संपूर्ण शरणागतीची अवस्था असते, तिला म्हणायचे प्रपत्ती. ही संकल्पना वैष्णव पंथाची विशेष देणगी मानली जाते. प्रपत्तीत अहंकार पूर्ण लयाला गेलेला असतो – निदान तसे अपेक्षित तरी असते. प्रपत्तीची पाच अंगे सांगितली आहेत. १ विनासंदेह ईश्वराला शरण जाणे २ ईश्वराची याचना करणे ३ ईश्वरावर दृढ विश्वास असणे ४ इष्टाचीच इच्छा असणे ५ अनिष्टाचा त्याग करणे.

रामानुजाचार्यांनी भक्तीचे आणि शरणागतीचे हे जे सिद्धान्त मांडले त्यामुळे भारतातील सामाजिक व  धार्मिक जीवन ढवळून निघाले. सर्व जातींच्या, पंथांच्या लोकांना त्यांच्या भक्तिमार्गात मुक्त प्रवेश आहे. वैष्णव धर्माचे स्वत:चे असे एक वेगळे सामाजिक नीतिशास्त्र काळाच्या ओघात निर्माण झाले. हे जग खरेच आहे आणि त्यामुळे जगाच्या भल्यासाठी आपण आपल्या क्षमतेनुसार झटले पाहिजे असाही विचार नंतरच्या काळात मांडला गेला. रामानुजाचार्य हे पहिले असे आचार्य की ज्यांनी केवळ संस्कृत ग्रंथांच्या आधारे आपले तत्त्वज्ञान मांडले नाही तर तामिळ ग्रंथांचाही त्यांनी आधार घेतला. रामानुजाचार्यांच्या ईश्वराची द्वारे म्हणूनच की काय पण सर्वांसाठी खुली आहेत.

रामानुजाचार्यांच्या भकितमार्गाला विवेकानंदांच्या वेदान्त विचारांत फार महत्त्वाचे स्थान आहे. केवळ ज्ञानाने मोक्ष मिळतो असे शंकराचार्य सांगतात तर भक्तीने(ही) मोक्ष मिळतो, हा रामानुजाचार्य यांचा विचार विवेकानंदांनी पुढे स्वीकारला हे. जग हे ईश्वराचा केवळ तत्वार्थाने नाही तर प्रत्यक्षात अंश आहे हाही विशिष्टाद्वैताचा धागा धरून विवेकानंद पुढे जातात.  आपण त्याचा सविस्तर विचार पुढील काही भागांत करणार आहोत. 
क्रमश: 

No comments:

Post a Comment