भाग १, २(अ) , २ (आ), ३, ४(१), ४(२), ५
मूळ सिद्धान्त
श्रीमध्वाचार्यांचे (माधवाचार्य असेही म्हटले जाते) तत्त्वज्ञान ‘द्वैत वेदान्त’ या नावाने ओळखले
जाते. पण या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की, द्वैत हा शब्द शंकराचार्यांच्या अद्वैत या
शब्दाच्या सापेक्ष येथे वापरण्यात आला आहे. भारतीय दर्शनांचा विचार केल्यास सांख्य
हेच एकमेव द्वैतवादी तत्त्वज्ञान आहे असे आपल्याला म्हणता येते. कारण सांख्यमत ‘प्रकृति’ आणि ‘पुरुष’ या दोन तत्त्वांचे स्वतंत्र अस्तित्व
मानते. मध्वाचार्य दोन तत्त्वे मानतात हे खरे. पण त्यापैकी एकाला ते ‘स्वतंत्र’ तत्त्व म्हणतात आणि
दुस-याला ‘अस्वतंत्र’ (परतंत्र) तत्त्व म्हणतात. म्हणजे वास्तविक तेही एकच अंतिम तत्त्व मानतात. मध्वाचार्य स्वत: त्यांच्या सिद्धांताला ‘तत्त्ववाद’ असे म्हणतात. डॉ. बी. एन. के. शर्मांसारखे आधुनिक काळातील अभ्यासक मध्व तत्त्वज्ञानाला ‘द्वैत वेदान्त’ असे न म्हणता 'स्वतंत्र ब्रह्मवाद’ असे म्हणतात आणि मध्वमताचा विचार करता हेच नाव
जास्त इष्ट ठरते.
मध्वाचार्यांना ‘वायूचा तिसरा अवतार’ समजण्यात येते. (हनुमान आणि भीम हे वायूचे पहिले दोन अवतार मानले जातात.) त्यांचा जन्म इसवी सन ११९७ मध्ये उडुपीजवळ झाला. आजही त्या
परिसरात मध्व संप्रदायाचे अनुयायी मोठया प्रमाणात आढळून येतात. मध्वाचार्यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. त्यांचे ३७ प्रसिद्ध ग्रंथ आजही अभ्यासले जातात. मध्वाचार्यांच्या
मृत्युसंबंधी निश्चित अशी काहीही माहिती
उपलब्ध नाही. वयाच्या ७९व्या वर्षी ते वायुतत्त्वात विलीन झाले असे त्यांचे भक्त
मानतात.
आपल्या तत्त्वज्ञानाची मांडणी करताना आधीच्या दोन्हीही
आचार्यांप्रमाणे मध्वाचार्यांनीही ‘प्रस्थानत्रयी’चा (उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे) आधार घेतला आहे. पण वेदांची कर्मकांड आणि ज्ञानकांड
अशी विभागणी ते मानत नाहीत. ‘वेदान्तसूत्रे व भगवद्गीता वेदानुसारी असल्याने ती
प्रमाण म्हणून स्वीकारण्यास हरकत नाही’ असे मध्वाचार्य म्हणतात. त्याचबरोबर मूळ रामायण, महाभारत, पुराणे पांचरात्र आदि ग्रंथांचा
आधारही मध्वाचार्य घेतात. ‘वेद ईश्वराने
निर्माण केले नसून ते अनादि आणि अनंत आहेत’ अशी त्यांची धारणा आहे.
शंकराचार्यांचे अद्वैत तत्त्वज्ञान आणि मध्वाचार्यांचे द्वैत तत्त्वज्ञान एकमेकांपेक्षा भिन्न आहे, इतकेच नव्हे तर ते
एकमेकांच्या विरोधी आहे.
शंकराचार्यांवे तत्त्वज्ञान खोडून काढणे आणि आपल्या तत्त्वज्ञानाची उभारणी करणे
अशी दुहेरी कामगिरी मध्वाचार्यांनी केली आहे.
मूळ सिद्धान्त
मध्वाचार्यांच्या तत्त्वज्ञानातील मूलतत्त्वे कोणती?
चैतन्य महाप्रभूंचे एक शिष्य
विद्याभूषण बलदेव यांनी 'प्रमेय रत्नावली’ नामक ग्रंथात या मूलतत्त्वांची एक यादी देऊन आपले काम सोपे केले आहे. बलदेवांच्या
मते ही मूलतत्त्वे नऊ आहेत. त्यांची आपण थोडक्यात माहिती घेऊ.
१. हरी सर्वोच्च,
सर्वश्रेष्ठ आहे - शंकराचार्यांची निर्गुण ब्रह्माची संकल्पना
मध्वाचार्यांना मान्य नाही हे उघडच आहे. मध्वाचार्यांचे ब्रह्म सगुण आहे. या ब्रह्मालाच ते विष्णू, नारायण, हरी अशा विविध नावांनी ओळखतात. हा नारायण क्षर - अक्षराच्या पलिकडचा
आहे. आपल्याला इंद्रियांद्वारे अथवा तर्काने त्याचे ज्ञान होऊ शकणार नाही. ‘तो’ स्वतंत्र आणि एकमेव आहे.
त्याच्यासारखे दुसरे कोणीही नाही. लक्ष्मी, रुद्र, ब्रह्मा वगैरे देवदेवतासुद्धा त्याच्यावर अवलंबून आहेत. या हरीची विविध नावे म्हणजे त्याच्या विविध
गुणांचे वर्णन आहे. तो सर्वव्यापी आहे. सर्व पापांचा नाश केवळ तोच करु शकतो. हा
हरी परिपूर्ण आहे. त्याच्यात कसलाही दोष नाही. तो ‘सच्चिदानंद’ स्वरुप आहे. सर्वाना त्याचे थोडेबहुत ज्ञान होऊ
शकते, पण त्याचे संपूर्ण
ज्ञान ही अशक्यमेव गोष्ट आहे. म्हणून त्याचे वर्णन 'नेति नेति’ असे केले गेले आहे.
तो म्हणजेच त्याचे ज्ञान. तो म्हणजेच त्याचे गुण. 'अचिंत्य अदभुत शक्ति, अणोरणीयान् महतो महीयान्, आसीनो दूरम् व्रजति’... अशा शब्दांत मध्वाचार्य ब्रह्माचे वर्णन करतात.
ब्रह्म निराकार आहे याचा अर्थ इतकाच की कोणत्याही आकाराने ते मर्यादित नाही. तो अनंत आहे म्हणूनच त्याच्या इच्छेने तो कधी कधी आपल्यासमोर
अवतारांच्या स्वरुपात प्रकट होतो. पण वास्तवात तो त्रिगुणातीत आहे. तोच विश्वाचा
निर्माता, धाता, त्राता, संहारक सर्व काही आहे.
लक्ष्मी ही त्याचीच चित्प्रवृत्ती आहे. प्रत्येक
वेदवाक्याचा तीन प्रकारांनी अर्थ लावता येतो. त्यापैकी एक अर्थ नेहमीच हरीची
स्तुती करणारा आहे म्हणून कर्मकांड व ज्ञानकांड यांच्यात श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद
नाही. तो सर्वशक्तिमान आहे. 'कर्तुम् अकर्तुम् अन्यथा कर्तुम्’ या सा-या शक्ती त्याच्यातच
आहेत. तो आत्मकाम आहे. विश्वाची निर्मिती करण्याचे कसलेही बंधन - अगदी स्वत:च्या
इच्छेचेही बंधन - त्याच्यावर नाही. त्याच्यातून जग निर्माण
होताना तो बदलत नाही किंवा नाशही पावत नाही. त्याच्यातून हे जग निर्माण होते आणि त्याच्यातच
हे जग विलीन पावते.
२. जगत् सत्य आहे - शाश्वत आणि अशाश्वत, चिरंतन आणि तात्पुरते या दोघांचाही अनुभव आपल्याला
येऊ शकतो, तसा तो आपल्याला
येतो देखील. ज्याचा अनुभव आपल्याला येतो त्यालाच मध्वाचार्य सत्य म्हणतात. जगत् अनुभवास येते म्हणून ते सत्य आहे. ज्या प्रसंगी इंद्रियांचा अनुभव अपुरा ठरतो त्या
ठिकाणी शब्दप्रामाण्याचा आधार आपल्याला घ्यावा लागतो. हे जग म्हणजे केवळ हरीची
लीला होय.
मातीतून घट बनतो तेव्हा मातीचे गुणधर्म बदलून जातात त्या
पद्धतीने ईश्वरातून जग निर्माण होत नाही.
प्रकृति आणि जीव ईश्वरातून येतात पण ते ईश्वरापेक्षा भिन्न असतात. त्या प्रक्रियेत
ईश्वराचे गुण बदलून जातात असे काही होत नाही. यामुळे मध्वमत प्रकृति आणि जीव यांचे शाश्वत अस्तित्व मान्य करते. सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधी पांचरांत्रांचे ‘व्यूह’ स्पष्टीकरण मध्वाचार्य मान्य करतात असे दिसते. मध्वाचार्यांच्या मते मायावाद
शंकराचार्यांवरील बौद्ध धर्माच्या प्रभावातून जन्माला आला आहे.
३ भेद सत्य आहेत - जगात आपण
जे भेद पाहतो, तेही सत्य आहेत. मध्वाचार्यांच्या मतानुसार भेद अनंत आहेत आणि सर्व पदार्थ
एकमेकांपासून भिन्न आहेत. भेद हा पदार्थांचा स्वभावच आहे असे ते मानतात. प्रत्यक्ष,
अनुमान आणि शब्द या तीनही
प्रमाणांनी भेदाचे अस्तित्व सिद्ध होते. हे भेद पाच प्रकारचे आहेत - जीव आणि ईश
भेद, जीव आणि जीव
यांच्यातील भेद, जीव आणि जड भेद, जड आणि ईश भेद, आणि जड आणि जड यांच्यातील भेद. यालाच ते ‘प्रपंचभेद’ म्हणतात. या
भेदांना धर्मस्वरुप असेही म्हटले जाते. या भेदांमुळे जगत् अस्तित्वात येते. भेद नसतील तर जग कसे
निर्माण होईल?
४. जीव हरीवर अवलंबून आहेत - जीव सत्य आहेत. जीव कर्ता आणि भोक्ता असून तो बंधनात राहू शकतो तसाच मुक्तही होऊ शकतो. जीव असंख्य, अनंत असून त्यांच्यात भेद
आहेत. विमुक्त व दु:खी असे
त्यांचे दोन विभाग आहेत. जीव अणुस्वरुप असला तरी त्याच्या जाणीवेने सर्व शरीर व्याप्त असते. सात्त्विक, नित्यसंसारी आणि तमोयोग्य असे तीन प्रकारचे जीव असतात. जीव
हे ईश्वराचे सोपाधिक नव्हे तर निरुपाधिक (अथवा अनुपाधिक) प्रतिबिंब आहेत. चंद्राचे पाण्यातले प्रतिबिंब हे ‘सोपाधिक’ आहे. प्रतिबिंबासाठी इथे पाणी या
उपाधीची गरज आहे आणि प्रतिबिंब मूळ चंद्रापेक्षा अस्पष्ट असते. सोपाधिक
प्रतिबिंबात मूळ वस्तू आणि प्रतिबिंब दोन्ही दिसते. निरुपाधिक प्रतिबिंबात मूळ
वस्तू आणि प्रतिबिंब यांच्यात साम्य नसते पण मूळ वस्तुविना हे प्रतिबिंब उत्पन्न
होऊ शकत नाही. इंद्रधनुष्याचे उदाहरण घ्या. सूर्यप्रकाश नसेल तर
इंद्रधनुष्य दिसेल का? याच तर्कानुसार जीव ईश्वरावर अवलंबून असतात, त्याविना
जीवांचे अस्तित्व नाही, पण जीव म्हणजे ईश्वराचे प्रतिबिंब मात्र नाहीत. जीव हाच अविदयेला आश्रय देतो. या
अविदयेचेही चार प्रकार मध्वाचार्य
सांगतात.
५. जीवांमध्ये भेद असतो - जीवांचे तीन प्रकार आपण वरील परिच्छेदात पाहिले आहेतच. सर्व जीव एकसारखे
नसतात तर त्यांच्यातही भेद असतो असे मध्वाचार्यांचे ठाम मत आहे. जीवांमध्ये साम्य असते पण
म्हणजे त्याचा अर्थ ते एक आहेत असा नाही. ‘भेद सत्य आहेत’ या परिच्छेदात
प्रपंचभेदांचा उल्लेख आधी आला आहेच. जीव कर्ता आणि भोक्ता आहे; जीव बंधनात असतो
आणि त्याला मुक्तीही मिळू शकते; - अर्थातच वेगवेगळे जीव यातल्या वेगवेगळ्या
टप्प्यावर असतात. जीवाच्या स्वरुपानुसार आणि योग्यतेनुसार तो वेवेगळ्या श्रेणीत
असतो. प्रत्येक जीवाचा आनंद, त्याचे ज्ञान आणि त्याची क्षमता वेगवेगळी असते. प्रत्येक जीव एकमेवाद्वितीय
असतो. जीव ईश्वराचा अंश आहे.
६. मुक्ती म्हणजे आनंद - मोक्ष हेच माणसाचे ध्येय आहे. कर्माची निर्मिती ईश्वराने केली असून
त्यामुळेच संसार चालतो. म्हणून बद्धावस्था आणि मोक्षावस्था ही जीवाच्या इच्छेवर
अवलंबून नसून ईश्वराच्या इच्छेवर अवलंबून असते. सर्वच जीवांना मोक्ष मिळेल असे
नाही, सात्त्विक जीवांच्या बाबतीत मोक्षाची
शक्यता अधिक असते. कर्म अचेतन असल्याने ते आपल्या बद्धावस्थेचे अथवा मोक्षावस्थेचे
कारण होऊ शकत नाही. मोक्ष म्हणजे स्वस्वरुपाचे ज्ञान. ईश्वरकृपेविना मोक्ष मिळणे
असंभव आहे. शंकराचार्यांच्या
मते ‘जीवाला स्वस्वरूपाची – ब्रह्मरूपाची – जाणीव होणे म्हणजे मोक्ष’ तर
मध्वाचार्यांच्या मते ‘जीवाला स्वस्वरूपाची जाणीव होणे, आपण ब्रह्मापेक्षा वेगळे
आहोत, आपण त्याच्यावर अवलंबून आहोत ही जाणीव होणे म्हणजे मोक्ष’. जीव आणि ब्रह्म
यांच्या नात्यातला हा भेद मध्वाचार्यांच्या मते अत्यंत महत्त्वाचा आहे.
७. शुद्धभक्ती हाच मोक्षमार्ग होय - ईश्वरी कृपाप्रसादाचा लाभ एकाच मार्गाने होऊ शकतो आणि तो
मार्ग आहे भक्तीचा! भक्ती म्हणजे काय? मध्वाचार्य भक्तीची व्याख्या पुढीलप्रमाणे करतात, ''माहात्म्यज्ञानपूर्वस्तु सुदृढ: सर्वतोधिक: स्नेहो भक्तिरिति प्रोक्त: तया मुक्तिर्न चान्यथा।।‘ (ईश्वरावर असलेली दृढ, अढळ अशी ज्ञानाधारित श्रद्धा म्हणजे भक्ती. केवळ भक्तीनेच
मोक्ष मिळतो, अन्य कशानेही नाही) मध्वाचार्यांच्या मते काही वेळा ज्ञान या शब्दानेही वास्तविक भक्तीचाच संकेत
दिलेला असतो.
मोक्षमार्गाच्या अधिका-याची वीस लक्षणे मध्वाचार्य सांगतात. अध्ययन,
गुरुभक्ती, अयोग्यनिंदा, श्रवण, मनन ही त्यापैकी काही
महत्त्वाची लक्षणे आहेत. शंकराचार्यांच्या मते मोक्ष ही ‘मिळवण्याची’ वस्तू नाही पण
माध्वमतानुसार मात्र मोक्ष हा मिळवावाच लागतो. जीव भिन्न असल्यामुळे त्यांच्या
साधनेमध्येही भिन्नता असणे अपरिहार्य आहे. यामुळे जीवांच्या मोक्षावस्थेतही
भिन्नता असते असे मध्वाचार्यांचे मत आहे. यालाचे ते ‘आनंदतारतम्य’ असे म्हणतात.
सलोकता, सरुपता, समीपता आणि सायुज्यता अशा
मुक्तीच्या चार अवस्था (चार प्रकार नव्हे!) मध्वाचार्य सांगतात. मोक्षाच्या या
अवस्थांमध्ये जीवाला आनंद आणि वैकुंठातील भोग हे दोन्हीही मिळतात.
जीवांनी त्यांच्याकडून काहीही हालचाल न करता स्वस्थ बसून
राहायचे असा ईश्वरकृपेच्या सिद्धान्ताचा अर्थ नाही. मोक्षासाठी जीवाचे स्वत:चे
प्रयत्न अत्यंत आवश्यक आहेत किंबहुना तीच पहिली पायरी आहे. मध्वाचार्यांच्या
वेदान्ताचे विश्लेषण करताना पी नागराज राव म्हणतात, “The
philosophy of Shri Madhva is not a type of fatalism where man needs to do
nothing at all and all things are done by God. Effort has a prominent place and
without proper effort of the soul the Lord does not give his ‘Prasada’.
Unstinted Bhakti and total self surrender are necessary for the Grace of the
Lord.”
८. प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द ही तीन प्रमाणे होत. यथार्थ ज्ञान कसे होते याविषयी भारतीय तत्त्ववेत्त्यांनी अतिशय विस्ताराने
चर्चा केली आहे. यथार्थ ज्ञान म्हणजे काय, ते कशाद्वारे होते, ते होण्याची
प्रक्रिया काय असते असा हा स्वतंत्र विषय आहे. ही चर्चा रोचक असली तरी आपल्या
विषयाच्या संदर्भात तितकीशी आवश्यक नाही – त्यामुळे ती टाळून आपण पुढे जाऊ.
९. श्रीहरीचे पूर्ण ज्ञान फक्त वेदांनाच, वेदवेत्त्यांनाच होऊ शकते. इथे पुन्हा मध्वाचार्य या तत्त्वातून ज्ञान आणि
मोक्ष काही विशिष्ट समूहांसाठी मर्यादित करत आहेत असे दिसते. कारण त्यांच्या काळात
वेदाध्ययनाचा अधिकार सर्वांना नव्हता. हा मुद्दा विवेकानंदांना अमान्य आहे हे उघड
आहे. त्यांचे याविषयीचे विचार आपण पुढे पाहणार आहोत.
मध्वाचार्यांनी जीवांचे जे वर्गीकरण केले आहे त्यात एका
प्रकारचे जीव हे केवळ तमोयोग्य आहेत. त्यांच्यासाठी जणू मोक्षाची वाट बंदच आहे. एखाद्या
जीवाला मोक्षासाठी कायमचा नकार देणे हे माध्वमताचे एक वैशिष्टय म्हणता येईल. असे
सहसा भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेत घडलेले नाही. म्हणून काही अभ्यासक याला
मध्वाचार्यांवरील ख्रिश्चन धर्माचा प्रभाव मानतात. त्यामध्ये कितपत तथ्य आहे याची चर्चा आपण येथे करणार
नाही. भक्ती हाच मोक्षाचा
एकमेव मार्ग आहे आणि मोक्षावास्थेतही जीव ब्रह्माशी तादात्म्य न पावता भिन्न
राहतो, हे जग म्हणजे हरीची लीला आहे – हे ‘तत्त्ववादाचे’ मुख्य मुद्दे आहेत.
क्रमश:
Aativas, tu ek mehanati shikshika aahes, yaat vadach nahi... itka kathin vishay tu kashi kay hatalat aahes!?
ReplyDeleteआभार श्रीराज.
Deleteबाकी सगळं जमतंय...
ReplyDeleteपण नववा मुद्दा कळेना मला. anti recycle असं काही मुळात असू शकतं का?!
नववा मुद्दा काहीसा चक्राकार आहे. म्हणजे अमुक जातीत जन्माला आलात तरच वेदाध्ययनाचा अधिकार आणि वेदाध्ययन केलं तरच मोक्ष. म्हणजे तुम्ही काही ठराविक जातीत जन्म घेतलात (!!) तरच तुमची पात्रता - अन्यथा तुम्ही मुक्तीला लायक नाही. ही भूमिका आज पचनी पडायला अवघड आहे हे नक्की!
Delete
ReplyDeleteखुप छन.Read all your articles on vedanta.superb! Very clear
logical and systamatic analysis of all the three types of opinions about the same parabraman.I personally feel these opinions must have come from different stages of consciousness
I cannot agree with madhavacharya.If I cannot become brahman or I am not brahman then who has created Him? Nutan.
नूतन, हो, मध्व विचारांशी सहमत होणे अवघड आहे!!
Delete