या जगात येणा-या प्रत्येकाला (आणि प्रत्येकीलाही अर्थातच) परमेश्वराने एक देणगी दिलेली असते. माझ्याबाबतीत सांगायचे तर माझे दिशांचे ज्ञान अगाध आहे! अगदी आयुष्याची दिशा वगैरे तर सोडूनच द्या, पण ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई या भानगडीही मला कळत नाहीत. माहीममधली एखादी इमारत जर मला शिवाजी उद्यानापासून (की मैदान?) माहिती असेल, तर माटुंगा स्थानकापासून आधी मी शिवाजी मैदानापाशी येते आणि माहितीच्या रस्त्याने परत माहीमपर्यंत जाते.
माझी ही खासियत मित्रमंडळींना माहिती आहे. त्यामुळे ओळखीची माणसे मला निमुटपणे नेण्या - पोचवण्यासाठी येतात. त्यामुळे दिशा, खुणा याबाबतचे माझे अज्ञान अबाधित राहायला - किंबहुना ते वाढायला मदतच झाली आहे. पोस्टमन, रिक्षावाले, टॅक्सीवाले मला थोर वाटतात. आणि आकाशाकडे (तेही रात्री!) पाहून दिशा वगैरे ठरवणारे खलाशी तर मला या भूतलावरचे वाटतच नाहीत!
त्यादिवशी मात्र अघटितच घडले. पुण्यात बसच्या भरवशावर राहण्याचा गुन्हा माझ्या हातून घडला होता. तिची वाट पाहताना अखेर रिक्षाने जाण्याविना पर्यायच उरला नव्हता. मी रिक्षात बसून ’कसबा गणपती ’ असे सांगितले.. पुण्यातला हा प्रसिद्ध आणि मानाचा गणपती कोणा एखाद्या रिक्षावाल्याला माहिती नसेल अशी मी कल्पनाही केली नव्हती. पुण्यातल्या कोणा एका केंद्रिय मंत्र्यांना तो माहिती नसल्याची अफवा एके काळी वाचल्याचे आठवते - पण मंत्र्यांचे सारेच वेगळे!
रिक्षावाला पोरसवदा होता, नवीनही असावा. कारण मी रिक्षात बसताच त्याने "ताई, कसे जायचे ते सांगाल का जरा?” असे नम्रपणे विचारले. नम्र रिक्षावाला भेटण्याचा अनुभव मला नवाच होता. मी काहीशी गांगरले. शिवाय याला कसबा गणपतीही माहिती नाही - म्हणजे दुहेरी संकट! मी इकडे तिकडे पाहिले, पण दुसरी रिक्षा दिसेना. ती मिळती, तर मी ही रिक्षा सोडून दिली असती. पण मला उशीर होत होता. एका थोर गृहस्थांची भेट ठरलेली होती आणि ’वेळ पाळणे’ या विषयावर त्यांचे भाषण ऐकायची माझी तयारी नव्हती.
“ठीक आहे! शनिवारवाडयाकडे घ्या", मी जरा बेफिकीरीचा आव आणत रिक्षावाल्याला सांगितले. तिकडे एखाद्या दुकानात विचारता येईल पत्ता - असा मी विचार केला. “ताई, शनिवारवाडा पण नाही सापडणार मला. पहिलाच दिवस आहे माझा. या गल्लीबोळांनी डोकं पार फिरलयं बघा माझं! तुम्ही सांगाल का रस्ता जरा?” रिक्षावाला काकुळतीने म्हणाला.
ते ऐकून माझ्या पोटात गोळाच आला. मी त्याला रस्ता दाखवणे अशक्यप्राय होते. पण त्या क्षणी कोंडाण्यावरच्या मावळ्यांसारखे माझे सारे दोर कापलेले होते. दुसरी रिक्षा नव्हती, दिग्गजांच्या भाषणाची भीती होती, बस येत नव्हती, हा रिक्षावाला नवा होता, शिवाय तो नम्रही होता. त्याच्या नम्रतेमुळे मी अधिकच हतबल झाले होते.
मला त्या रिक्षावाल्याची नाही, पण स्वत:चीच कीव आली. ’करा किंवा मरा’ अशी वेळ आली की मग मरण्यापेक्षा करणेच परवडते. माझ्यावरच्या संकटाचे निवारण करण्यासाठी आता ईश्वरी अधिष्ठानाचीच गरज होती. या ठिकाणापासून शनिवारवाडयापर्यंत मी आजवर किमान हजार वेळा तरी गेले होते. देवाचे नाव घेऊन मी आजवरच्या त्या प्रवासांच्या असंख्य अनुभवांवर मन एकाग्र केले. डावीकडे - उजवीकडे बघत, दुकानांच्या पाटया वाचत मनाचा हिय्या करून मी रिक्षावाल्याला रस्ता सांगायला सुरूवात केली.
अमूक पेठ कोणती? हा तिरका रस्ता पुढे कुठे जातॊ? इकडून बालगंधर्वला जायला जवळचा रस्ता कोणता? ---- असे नाना प्रश्न विचारून रिक्षावाला मला हैराण करत होता. मी आपली सुचेल ती उत्तरे देत होते – बरोबर चूक पाहायला आम्ही थोडेच पुन्हा भेटणार होतो? आणि भेटलोच समजा चुकून तरी थोडेच एकमेकांना ओळखणार होतो?
लांबून शनिवारवाडयाची भिंत दिसली तेव्हा मला अपरिमित की काय म्हणतात तसला आनंद झाला. माझी सगळी भीती पळाली. बोलण्यात आत्मविश्वास आला. माझ्या आत्मविश्वासाने आणि सहजतेने ते थोर गृहस्थही प्रभावित झाले! माझे त्यांच्याकडचे काम यशस्वी झाले. अशा रीतीने दिवस फारच चांगला गेला!
रात्री या घटनेचा विचार करताना मला फार आश्चर्य वाटले. जो रस्ता मला नीट माहिती नव्हता, ज्याची माझी मला खात्री नव्हती, तो मी बिनधास्त ( नाही, खरे म्हणजे धास्तावतच!) रिक्षावाल्याला सांगितला - आणि त्यातून आम्ही योग्य ठिकाणी पोचलो देखील!
माझ्याभोवती अज्ञानाच्या भिंती रचून घेणे माझे मलाच आवडत असावे! कारण अज्ञानात निष्क्रियतेची, आपला भार दुस-यांवर टाकण्याची सोय आली! पण रस्ता माहिती आहे म्हटल्यावर चालले पाहिजेच, पुढे गेले पाहिजेच! ज्ञानात जबाबदारी येते, काहीतरी करावे लागते. डावीकडे वळावे, उजवीकडे वळावे की सरळ जावे असे निर्णय वारंवार घ्यावे लागणारच रस्ता माहिती असला की! शिवाय आपल्या चुकण्याचे खापर दुस-यांवर फोडता येत नाही! म्हणून मग ’मला रस्ताच माहिती नाही, मला काही कळतच नाही’ अशा मनाच्या पळवाटांना एरवीही किती महत्त्व द्यावे? निदान ही पळवाट आहे इतके तरी भान मला आले आहे का?
पूर्वप्रसिद्धी: मुंबई तरूण भारत,१७ जुलै १९९६६
मस्त अनुभव आणि छान लिहिलयं सुध्दा!
ReplyDeleteज्ञानात जबाबदारी येते,........बरोबरच आहे, छान लेख आहे.. पुलेशु
ReplyDelete"ज्ञानात जबाबदारी येते, काहीतरी करावे लागते. डावीकडे वळावे, उजवीकडे वळावे की सरळ जावे असे निर्णय वारंवार घ्यावे लागणारच रस्ता माहिती असला की! शिवाय आपल्या चुकण्याचे खापर दुस-यांवर फोडता येत नाही! ".........
ReplyDeleteVery True Savita tai....... pavalo pavali yache apalyala anubhav yetat... very nicely put......
आभार भुंगा आणि प्रसिक. स्वागत आहे तुमच दोघांचही.
ReplyDeleteराजेश आभार, post वाचल्याबद्दल..
kharacha prateyka jan palwat shodhun vel marun neto.... saglyat soppa shabda mala mahit nahi.... ani get escape ....
ReplyDeletewell worded..
संध्या आभारी आहे.. आणि स्वागतही.
ReplyDeleteहे वाचायचं राहून गेलं होतं. खूप छान लिहिलंय.. !! नेहमीप्रमाणेच..
ReplyDeleteधन्यवाद हेरंब.
ReplyDeleteरस्त्यांवरून सुरू झालेला विचार वाटेपाशी येऊन विराम घेतोय, हे सूचक आहे!
ReplyDeleteअनामिक/का, अचूक निरीक्षण आहे तुमच!
ReplyDelete