ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, July 31, 2010

३७. सांत्वन

मला पुष्कळ गोष्टी करायला आवडत नाहीत! काही करायचं म्हणजे झडझडून करावं लागतं - त्यापेक्षा न करणं सोपं, म्हणून नाही म्हणत मी! उलट कित्येक वेळा एखादी गोष्ट न करण्यातून खूप चर्चा अंगावर ओढवून घेतली जाते! लोकांच्या विरोधात जायचं धाडस नसतं म्हणून काही वेळा नावडत्या गोष्टी कराव्या लागतात!

त्यादिवशी तसच झालं! धावत पळत वासंतीकडे पोचले. तशी वेळ सहाची ठरलेली होती; पण ठरलेल्या वेळी कोणीच येत नाही हे माहिती असल्याने हातातलं काम उरकत बसले, तर थेट साडेसहाच वाजले! कधी नव्हे ते सगळयाजणी वेळेवर जमल्या होत्या. माझीच वाट पाहत होत्या. "कळलं का तुला, देशमुख बाईंचा नवरा गेला!" सुमन गंभीरपणे म्हणाली.

एक तर मला आडनाव वापरायची फारशी सवय नाही. त्यामुळे देशमुख बाई म्हणजे नेमक्या कोण, याबद्दल मी चाचपडत होते. मरणा-याशी आपल्या असणा-या नात्यावर मरणाच्या बातमीचा आघात अवलंबून असतो, हे मला अनुभवाने माहिती आहे. म्हणून देशमुख बाईंची मी जरा नीट चौकशी केली.

मग लक्षात आलं, की त्या आमच्या संस्थेच्या सभासद. दोन तीन वर्षांपासून कधी कधी कार्यक्रमांना येतात. सतरंजी उचलणं, सभागृह झाडून काढणं, सामानाची आवराआवरी करणं अशा कामांत मदतही करतात. बाई तशा साध्या, सरळ. फारशा कुणाच्या अध्यात-मध्यात नसणा-या. काहीशा अबोल, लाजाळू. देशमुख बाई आता मला नीटच आठवल्या. त्यांच्या नव-याला मी कधी पाहिलं नव्हतं. पण मला त्याच्या मरणाच वाईट वाटलं. देशमुख बाईंचा चेहरा आठवून जरा जास्तच वाईट वाटलं.

दु:खाचा प्रसंग आला की जरा निवांत बसून विचार करावासा वाटतो मला. विशेषत: मृत्युची बातमी म्हणजे स्वत:च्या आयुष्याकडे वळून पाहण्याचा प्रसंग! आपल्या तरी जगण्याला काही अर्थ आहे का, असा विचार मनात येतोच अशा वेळी!

माझ्या मैत्रिणी देशमुख बाईच्या सांत्वनाला निघाल्या होत्या. आजच. कारण पुढच्या आठवडयात कोणाच्या मुलांची परीक्षा होती, कुणी सहलीला जाणार होतं, कुणाच्या घरी मंगळागौर होती, वगैरे! त्यांना विरोध करण्यात अर्थ नव्हता. त्या आजच जाणार होत्या. त्यांच ’सांत्वन’ मी यापूर्वीही पाहिलेलं असल्याने त्यांच्याबरोबर जाण्यात काही राम नव्हता. पण सांत्वनाला न जाणं म्हणजे क्रूरपणा असा माझ्या मैत्रिणींचा समज! माझी भावनाशून्यता, असंवेदनशीलता याबद्दल बरच काही ऐकून घेतल्यावर मी त्या वाचाळ समुहापुढे शरणागती पत्करली.

देशमुख बाईंच्या घराचं दार उघडच होतं. दारात चपलांचा ढीग होता. शेजा-यांच्या घरात समंजस शांतता होती. माणसं एकमेकांत कुजबुजत होती. बायाबापडया हलकेच डोळे पुसत होत्या. माणसांच्या गराडयात देशमुख बाई हरवल्यासारख्या बसल्या होत्या. त्यांच्या चेह-यावरचे भाव मला वाचता येत नव्हते. प्रत्येक माणूस त्यांना ’धीराने घेण्याचा’ उपदेश करत होता. त्यांच्या विशी पंचविशीतल्या मुलाला आणि मुलीला अनेक सल्ले मिळत होते. कुणी सूचकपणे तर कुणी उघडपणे आर्थिक व्यवहारांची, स्थितीची चौकशी करत होते. आणखी लोक आले, की आधीची मंडळी काढता पाय घेत होती.

देशमुख बाई बेचाळीस पंचेचाळीसच्या असतील. शाळेत असताना हुशार होत्या. पण लवकर लग्न झालं आणि शिक्षण थांबलं. का कोण जाणे, पण बाईंच्या वाटयाला नव-याकडून कायम हिडिसफिडिसच आली. शहरात राहायला आल्यावर बाईंचा एकटेपणा आणि न्यूनगंड वाढला. काही नवं करायचं म्हटलं की नवरा टोमणे मारायचा - ’मी मर मर मरतोय आणि तू नुसती आयती बसून खातेस!’ असं नवरा बाईंना मुलं, पाहुणे, शेजारी यांच्यादेखत बिनदिक्कत सुनवायचा.

हळूहळू बाई विझत गेल्या. मुलं मोठी झाली आणि आईचा आधार बनण्याऐवजी तीही बापाच्या स्वरांत स्वर मिसळू लागली. ’बाईंना डोकं नाही’ याबाबत घरात मतैक्य होतं. स्वत:च्या घरात बाईंना कधी मोकळेपणाने वावरता येत नसे. सतत नव-याची, मुलांची भीती असे.

या सा-या वातावरणाचा परिणाम बाईंच्या व्यक्तिमत्त्वावर झाला होता. शेजारणीही त्यांना बावळट समजत. त्यामुळे चारचौघींत वावरायला बाईंना नकोच वाटे. हातात कधी पैसे नाहीत, कधी कोणते निर्णय घेतलेले नाहीत, दुस-यानं सांगितलेलं निमुटपणे ऐकण्यात बाईंच आजपर्यंतच आयुष्य गेलेलं. त्या स्त्री असल्याने त्यांच असं जगणं कुणालाच खटकत नव्हतं.

एका उमद्या स्त्रीचं आयुष्य कोमेजून गेलं होत. पण सांत्वन त्याबद्दल नव्हतं. त्याला निमित्तमात्र असा तो पुरूष या जगातून निघून गेला होता म्हणून जग बाईंच सांत्वन करत होतं. वास्तविक अशी कितीतरी आयुष्यं आपल्या डोळयांदेखत संपून जातात. उरतात माणसांची कलेवरं! शरीराचा नाश अटळ आहे. पण आयुष्यात काहींची फुलण्याची, उमलण्याची संधी दुस-यांच्या हातात असते. ज्याच्या साथीने जगायचं, उमलायचं त्याच्यावर /तिच्यावर कुरघोडी करण्यात, सत्ता गाजवण्यात काहींना धन्यता वाटते. ही ’सत्तावान’ माणसं आयुष्यात किती काय गमावतात, हे त्यांच त्यांनाही कळत नाही.

पुरूष - स्त्री नातं हा या उद्दाम सत्तेचा एक पैलू झाला, पण तो एकमात्र पैलू नव्हे. एका स्त्रीच दुस-या स्त्रीशी, एका पुरूषाच दुस-या पुरूषाशी या प्रकारच नात असतं हे आपण पाहतो. जात, वर्ग, धर्म, वय ज्ञान, कौशल्य, वर्ण, बुद्धी, पद असे वेगवेगळे मुखवटे आपण धारण करतो. त्यांनाच आपला चेहरा मानून सत्तेच्या खेळात आपण सर्वजण सहभागी होत असतो. कधी आपण शोषित असतो, आणि संधी मिळाली की आपण शोषक बनतो.

जगताना हरवून जायचं नसेल तर आपल्यामुळे कुणी उजाड होत नाही ना, हे तपासून बघणं गरजेच आहे. केवळा शोषणापासून स्वत:ला वाचवणं पुरेसं नाही; शोषक बनण्यापासूनही आपण आपल्याला वाचवलं पाहिजे.

सत्तेच्या या खेळातून आपण जाणीवपूर्वक बाहेर नाही पडलो, तर आपलं सांत्वन करायलाही कोणी उरणार नाही! आणि स्वत:लाच स्वत:चं सांत्वन करावं लागणं याइतकी वाईट गोष्ट नाही! शोषणाविरूद्ध बंड ही नाण्याची एक बाजू झाली. आपणही कोणाच शोषण करत नाही हे पाहणही तितकच महत्त्वाचं!!

5 comments:

 1. Both your blogs English as well as Marathi are cool. Keep writing.

  ReplyDelete
 2. Thank you Anonymous for your compliments.

  ReplyDelete
 3. तुमच्या सारखे विचार करणारे खूप थोडे लोक या जगात आहेत.
  प्रत्येक माणूस आपले शोषण झाले म्हणून रडतो आणि वेळ आलीतर निसंकोच पणे दुसर्याचे शोषण करणार, जणू काही तो त्यांचा हक्क आहे.
  आणि का करणार नाही जर कोणी असे केले नाही तर शेवटी हेच जग तुम्हाला मुर्खात काढत.
  किती विचित्र आहेना हे जीवन? काश हम इसको बदल सकते???????
  जहीर

  ReplyDelete
 4. आज तुमच्या पोस्ट वाचताना वारंवार जाणवतेय, मी आधि का नाही वाचले हे सगळे लिखाण..
  असो आता मात्र जमेल तसे वाचतेय सगळे...

  ह्या पोस्टबद्दल तर काय लिहू... मला स्वत:लाही असे उपचारादाखल सांत्त्वन करायला किंवा कुठलीच भावना दाखवायला आवडत नाही... मी ते उद्मेखून टाळते... कारण ते करून न ते केल्याचे समाधान मिळते उलट स्वत:ची आणि समोरच्याचिही फसवणुक केल्याची बोच मनाला लागते....

  अंतर्मुख व्हायला लावणारे लिखाण आहे!!

  ReplyDelete
 5. जहीर, स्वागत आहे तुमच.
  आपण सगळं जग बदलू शकतो की नाही माहिती नाही, पण आपल्यापुरतं बरचं काही बदलू शकतो असा माझा अनुभव आहे.

  तन्वी, मलाही दु:ख होते, पण सांत्वन करणे जमत नाही.

  ReplyDelete