ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, July 23, 2010

३६. समुद्रभेट

अखेर एकदाचा पाऊस आला.
पण येताना साथीला चक्रीवादळही घेऊन आला.
चालायचेच! पावसालाही सोबत हवीशी वाटणारच!

मुंबईच्या रस्त्यांवर झेपावत आलेल्या समुद्राच्या लाटांची प्रकाशचित्रे जिकडेतिकडे झळकली. ती पाहताना मला एक खूप जुनी गोष्ट आठवली.

किती बरे वर्षे झाली असतील त्याला आता? निदान दोन दशके तरी नक्कीच उलटून गेलीत.

आम्ही काही जणांनी मिळून एक युवक शिबिर घेतले होते. शिबिर तीन महिने रोज संध्याकाळी दोन तास चालायचे. साधारण दुस-या महिन्याच्या शेवटी आम्ही या मुला-मुलींना सहलीला नेले. सहलीत आम्ही एका सामाजिक प्रकल्पाला भेट दिली. सर्वेक्षण केले. शिबिरार्थी सहलीवर एकदम खूष होते.


काही दिवसांनी ते म्हणाले, “चांगली झाली ती सहल. पण ही तर तुमची सहल झाली. ती तुम्ही आयोजित केलेली सहल होती, तुमच्या कल्पनांची. पण आता आम्ही तुम्हा कार्यकर्त्यांना सहलीला नेणार. पहा आम्हालाही सहल आयोजित करणे नीट जमते का नाही ते!”

शिबिरार्थींच्या उत्साहाला मोडता घालायचे काही कारण नव्हते. सर्वांची सोय पाहून, वेळ पाहून निघालो.

याही वेळी एका सेवा प्रकल्पाला भेट. तेथील कार्यकर्त्यांशी बातचीत. गरमागरम चर्चा.
शेवटचा कार्यक्रम होता समुद्रभेट.

आता समुद्राने वेढलेल्या मुंबईकरांना समुद्राचे काय अप्रूप? पण तरीही काहींच्या उत्साही आग्रहास्तव गेलो. दुपारची चार साडेचारची वेळ होती.

किनारा अगदी ओस होता.
वाळूवर खूप दूरवर नजर टाकली तरीही पाणी दिसूच नये इतका समुद्र लांब खेळायला गेला होता.
बहुतेकांनी ’ओहोटी!’ असा उद्गार काढून पर्यायच नसल्याप्रमाणे रस्त्यावरच्या झाडाखाली बैठक मारली. त्यांच्या गाण्यांच्या भेंडया सुरूही झाल्या. (गाण्यांच्या भेडयांना तोवर ’अन्ताक्षरी’ म्हणत नसत – त्या काळची ही गोष्ट आहे!)

आम्ही तिघे चौघे समुद्रवेडे मात्र चुळबुळत होतो.
पाण्यात पाऊल भिजवल्याशिवाय समुद्राच्या सहवासाची खरी मजा येत नाही.
आम्ही पाण्याच्या दिशेने चालायला लागलो.
खूप वेळ चाललो, पण पाणी काही जवळ येत नव्हते.
डावी उजवीकडे पाहावे तर पाणी होते. पण तोंड वळवून ती दिशा धरावी तर आमच्यात तितकेच अंतर उरत होते. समुद्र जणू हट्टाला पेटला होता आणि त्या हट्टाची लागण आम्हालाही झाली होती.

किती वेळ गेला कोण जाणे!
पण आता लाटांचा आवाज अगदी जवळून येऊ लागला.
समुद्राच्या भिनत जाणा-या वासाने माझे मन टवटवीत होऊ लागले होते.
आता पाण्यात आणि आमच्यात जेमतेम काही फुटांचे अंतर उरले होते.
पाण्यात पाय घालायला आम्ही अगदी अधीर झालो होतो.

मागून काहींच्या ओरडण्याचा आवाज आला पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. दुस-या एखाद्या गटाची काहीतरी गंमत चालली असावी असेच मला वाटले. पण अचानक त्या हाकांची तीव्रता वाढली. माझे नाव ऐकून मी मागे वळून पाहिले आणि माझ्या डोळयांवर माझा विश्वासच बसेना! गेला अर्धा तास आम्ही जी वाळू चालून आलो होतो, तिचे नामोनिशाणही आता शिल्लक नव्हते! आमच्या चारी बाजूंना फक्त पाणी होते आणि ते पाणी आमच्या पावलांना स्पर्श करत होते.

आमचा एक मित्र दोन तीन कोळ्यांच्या पोरांसह आमच्या मागे धावत येत होता.
“भरती! भरती! लवकर मागे फिरा" असा त्याचा आक्रोश चालू होता.
आम्ही सर्वजण सुसाट धावत सुटलो.
पण ओल्या वाळूत पळणेही अवघड!
अर्ध्या पाऊण तासाचे अंतर समोर होते आणि समुद्राचे पाणी क्षणाक्षणाला वाढत होते.

ज्या समुद्राची त्या क्षणापर्यंत आस होती, त्याच्यापासून पळ काढण्यासाठी आम्ही आता धडपडत होतो.

आणखी काहीजण मदतीला धावून आले.
आम्ही किनारा गाठला तेव्हा केवळ आमचा नव्हे तर सर्वांचाच जीव भांडयात पडला.

आज दर वेळी समुद्र पाहताना मला तो क्षण आठवतो.
इतक्या अनुभवानंतरही मनात आज पाऊल लाटांमध्ये भिजवण्याची आस उरलेलीच असावी याची गंमत वाटते.
कुतुहलापायी, आसक्तीपायी, मनाच्या वेडेपणापायी पळ काढण्याचे असे प्रसंग पुन:पुन्हा येतच राहिले.

आपण आपले किना-यावर बसून राहावे, भरतीची लाट कधी ना कधी तिथवर पोचतेच – हा सिद्धान्त मनाला कळतो - पण वळत मात्र नाही. दर वेळी गुंतणे आणि जीवावर बेतल्यावर पळ काढणे हे चक्र चालू राहते.

ज्याचे त्याचे मन! दुसरे काय?

आता इतक्या वर्षांनंतर मला त्या दिवशीचे पळणे हास्यास्पद वाटते हे मात्र खरे!
पण हे वाटणेही अलिकडचेच!

पूर्वप्रसिध्दी: मुंबई तरूण भारत २४ जुलै १९९६

7 comments:

  1. मलाही समुद्र खूप आवडतो.तुमचा हा अनुभव तुम्हीं ज्या तऱ्हेने लिहिला आहे,खरच डोळ्यापुढे चित्र उभे राहिले.जेव्हां तुम्हीं मागून हाका येत होत्या इथपर्यंत लिहिलेत तोवर सगळे स्थिर होते,मग तुम्हीं असे काही वर्णन केलेत कि अचानकपणे मनात भय दाटले,अश्या वेळी लेखकाच्या लेखनाची कसोटी असते,आणि वाचकापर्यंत ते तुम्हीं कसे पोहोचवता,शब्दांची योग्य निवड,मांडणी कशी करता हे सगळे महत्वाचे असते,तुम्हीं खरच खूप छान लिहिले आहे!

    तुमची काही वाक्य आवडून गेली...ती खाली देत आहे....

    "पण येताना साथीला चक्रीवादळही घेऊन आला.
    चालायचेच!पावसालाही सोबत हवीशी वाटणारच!

    वाळूवर खूप दूरवर नजर टाकली तरीही पाणी दिसूच नये इतका समुद्र लांब खेळायला गेला होता.

    त्यांच्या गाण्यांच्या भेंडया सुरूही झाल्या. (गाण्यांच्या भेडयांना तोवर ’अन्ताक्षरी’ म्हणत नसत – त्या काळची ही गोष्ट आहे!)

    समुद्र जणू हट्टाला पेटला होता आणि त्या हट्टाची लागण आम्हालाही झाली होती."

    असेच अनुभव आमच्यापर्यंत येउ देत,खूप छान वाटले वाचून!

    ReplyDelete
  2. फारच छान! वरवर केवळ अनुभव कथनाचा 'आव' - वाईट अर्थाने म्हणत नाही आहे हं! - आणला असला तरी प्रत्यक्षात त्यातून फार छान शब्दचित्र तर तयार झालेच आहे शिवाय त्याला तत्वज्ञानाची एक सुंदर किनारही लाभली आहे.

    ReplyDelete
  3. श्रिया, तुम्हाला अनुभव आवडला हे वाचून बरं वाटल. अनेकदा अनुभव नेमके शब्दांत पकडता येत नाहीत, पण कधीकधी जमून जातं अचानक .. त्यातलाच हा एक प्रसंग.

    रवीन्द्र देसाई, आभारी आहे तुमच्या प्रतिसादाबद्दल.

    ReplyDelete
  4. samudrache darshan konala ved lavat nahi?? mala pan samudra pahila ki bhan rahat nahi. majhe lahanpan athavale ... mala etake changale lihane jamnar ka???

    ReplyDelete
  5. मला एवढे दिवस वाटायचं की असा अनुभव फक्त मलाच आला असेल!!
    प्रयत्न केला तर तुम्हालाही लिहायला जमेल.. लिहून तर बघा!

    ReplyDelete
  6. Hi,in the last week i was at visakhapattanam for a presentation,after presentation maximum women participants from various cities of India like Banarua,Delhi, Banglore etc gathered in a group and we all visited seasour(Samudrakinara).I was seen sea at Mumbai but from long distance like professionals but this time we went in the sea and stand on the sand and water,its so different experience for me.(samudramadhe Chimb ole hone,latanshi khelane)

    ReplyDelete
  7. मलाही वैझागचा समुद्र आवडतो.. पण दोन्ही तीनही वेळा मी तो लांबूनच पाहिला आहे

    ReplyDelete