ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, December 5, 2014

२१४. भीतीच्या भिंती: १

(नोंद: काबूलमधील वास्तव्यावर आधारित लेखमालिका. सुरक्षेच्या कारणांमुळे नावं बदलली आहेत. फार फोटोही देता येणार नाहीत.)

१. एक तास जास्तीचा 

“विमानतळातून बाहेर पडलं की डाव्या बाजूला वळायचं, पाच मिनिटं चाललं की ‘पार्किंग बी’ अशी पाटी दिसेल, मी तिथं उभा असेन तू पोचशील तेव्हा” असं जॉर्जने मला लिहीलं होतं. आत्तापर्यंतचे सोपस्कार त्याने सांगितल्यानुसार पार पडले होते – आधी दोन फोटो देऊन आणि पासपोर्ट दाखवून नोंदणी करण्याचा सोपस्कार अपेक्षेपेक्षा फार सहजतेने पार पडला होता. माझा पासपोर्ट पाहून त्या दोनपैकी एका युवकाने “इंडिया?” असं विचारलं होतं. बहुधा ‘एअर इंडिया’च्या विमानाने मी आल्यामुळे हा प्रश्न ‘प्रश्न’ नव्हताच खरं तर!  मी होकारार्थी मान हलवताच त्यानं माझ्याशी थेट हिंदीत बोलायला सुरुवात केली होती. त्यामुळे बसलेल्या आश्चर्याच्या धक्क्यातून मी सावरत होते; तोवर माझं सामान अचूक ओळखून सरकत्या बेल्टवरून ते माझ्या ताब्यात दुस-याने दिलं होतं. याला आपलं सामान कसं काय ओळखू आलं – हाही प्रश्न मनात होता माझ्या. कस्टमच्या अधिका-याने माझ्याकडे न पाहताच पासपोर्टवर शिक्का मारून दिला होता. आणि मी बाहेर आले होते. 

मी डावीकडे वळणार तितक्यात एक बंदूकधारी सैनिक समोर दिसला. त्याने समोरच्या बसमध्ये चढण्याची मला खूण केली. पण मला बसने जायचं नव्हतंच! पाच मिनिटं चालत जायला बस कशाला हवी? मी त्याला शांतपणे “पार्किंग बी” असं सांगितलं. त्यावर ठसक्यात “बस” असं तो म्हणाला. ते म्हणताना त्याची नजर इतकी शांत होती की मी घाबरले. मी आणखी काही बोलायच्या आधी तो पुन्हा म्हणाला, “नो डिस्कशन”. आमचा हा प्रेमळ संवाद ऐकत असणारा बसचा चालक समोर आला आणि मला म्हणाला, “चलिये,” आणि मी काही म्हणायच्या आत त्याने माझं सामान बसमध्ये चढवलं देखील. मलाही त्या बसमध्ये चढण्याविना पर्याय नव्हता. 

ही बस नेमकी कुठं घेऊन जाणार मला या विचारात मी पडले.
मग मी चालकाला विचारलं “मुझे तो ‘पार्किंग बी’ जाना था, क्यों नही जाने दिया?”
तो म्हणाला, ”व्हीआयपी है कोई आज! आप चिंता मत करो, मै आपको पार्किंग बी छोड दूंगा”. 

दिल्लीत काही काळ राहून “व्हीआयपी” ही काय चीज आहे हे मला माहिती होतं. मी विचार करायचं सोडून दिलं. 

पाचेक मिनिटांत ईप्सित स्थळी आमची बस पोचली होती. चालकाने सामान काढून दिलं. दुसरा कोणीतरी समोर आला – त्याला सांगितलं, “पार्किंग बी छोड दो इन्हे.” त्याने ट्रॉलीवर माझं सामान तोवर उतरवून घेतलं होतंच. 

“पैसा,” चालक म्हणाला.
बक्षीसी मागतोय तो, हे मला कळलं.
माझ्याकडे डॉलर्स नव्हते. दिल्ली विमानतळावर गडबडीत रुपयांचे डॉलर्स करून घ्यायचे राहिलेच होते. “डॉलर्स नही है मेरे पास” मी स्पष्टीकरण दिलं. हो, उगाच अपेक्षाभंग नको त्याचा व्हायला. 

“इंडियन रुपी चलेगा, चलता है वो यहाँ ”, तो शांतपणे म्हणाला. 
एक नोट त्याच्या हातात ठेवून मी निघाले. खरं तर पैसे देण्याइतकं काही काम त्याने केलं नव्हतं. पण परक्या देशात कंजूसपणा करून मित्रांचे शत्रू करण्याचं मी टाळायला हवं – निदान जॉर्ज भेटेपर्यंत तरी – हे मला कळत होतं. 

‘पार्किंग बी’ मध्ये सामसूम होती. जॉर्ज ‘वाटेल’ असा कुणी माणूस दिसत नव्हता. किंबहुना कुणी माणसं नव्हतीच. दुपारची तीनची वेळ होती – तरी एक क्षण मला भीती वाटली. अनोळखी प्रदेश; दहशतवाद्यांचा प्रदेश; युद्धाचा प्रदेश. “तिथं जायचं काही अडलंय का? एवढा अटटहास का? दुसरी ठिकाणं नाहीत का जगात जायला तुला?” या तिरकस प्रश्नाचा सामना करण्यात मागचे दोन तीन महिने गेले होते माझे.  “या प्रश्नाला काहीही अर्थ नाही कारण सगळं जग आता दहशतवादाचा सामना करतंय” असा माझा त्यावरचा युक्तिवाद एक क्षणभर का होईन डळमळीत झाला. 

पण आपल्या प्रतिक्रिया फार “क्षणिक” असतात, त्या बदलतात हे मला माहिती होतं आजवरच्या अनुभवाने. इथं काम करायला येण्याचा माझा निर्णय भावनिक नव्हता, पर्याय नसण्याच्या अगतिकतेतून नव्हता किंवा कसल्या उद्वेगातूनही नव्हता. ‘एक नवं जग पाहण्याची संधी’ म्हणून मी इथं आले होते. मग या जगाचे ताणेबाणे समजून न घेताच निष्कर्ष काढण्याची घाई कशाला करत होते मी ? मी स्वत:शीच हसले. 

तेवढ्यात मला माझ्या ऑफिसची गाडी दिसली. पण त्या गाडीत कुणीच नव्हतं. पण गाडीच्या मागच्या बाजूला एक माणूस फोनवर बोलताना दिसला. मी त्याला “जॉर्ज?” असं विचारल्यावर गडबडीने त्याने तो फोन बंद केला, दुस-या कुणाला तरी फोन केला, आणि सामान गाडीच्या मागच्या भागात ठेवायला सुरुवात केली. जॉर्ज मला शोधत तिकडे प्रवेशद्वाराशी उभा असणार. म्हणजे हा गाडीचा चालक होता तर! 

ट्रॉलीवर माझं  सामान आणणारा माणूस माझ्याकडे अपेक्षेने पहात होता. त्याच्या हाती पुन्हा एकदा काही पैसे देऊन मी सुटकेचा निश्वास टाकला. 

डोळे मिटले तर नुकताच पाहिलेला बर्फाच्छादित शिखरांचा हिंदुकुश दिसला. अखेर मी इथे पोचले आहे तर! आता हे माझं गाव असणार आहे आणि इथले रस्ते माझे होऊन जाणार आहेत – काही काळ तरी. 

कारण हे आहे काबूल!
**
काबूल!
चार महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानची राजधानी इतकीच मला त्याची ओळख होती.

एक दिवस उगाच ‘काबूलमध्ये अमुक एक काम आहे’ अशी जाहिरात वाचली. अर्ज ऑनलाईन करायचा होता तो केला आणि गंमतीचा अनुभव घेऊन हसत ती विसरून गेले. पुढे यथावकाश मुलाखतीचं आमंत्रण आलं. या आंतरराष्ट्रीय मुलाखतींचं  एक चांगलं असतं. आपल्याकडे किती माहिती आहे यापेक्षा आपलं ज्ञान काय आहे आणि मुख्य म्हणजे दृष्टिकोन काय आहे हे तपासतात ते. त्यामुळे मुलाखत देणं हा दडपणाचा मुद्दा न ठरता आत्मपरीक्षणाची संधी ठरते. मजा आली मला ती मुलाखत देताना. मुलाखत झाल्यावर लोक ‘आपली निवड होणार का नाही’ याचा आडाखा कसा बांधतात याबद्दल मला कुतूहल वाटतं – कारण आपण इतर उमदेवार पाहिलेले नसतात. मी आपली पुढच्या कामांना लागले. 

दोन-तीन आठवडे निवांत गेले. गडबड सुरु झाली ती ‘तुमची निवड झाली आहे’ हे पत्र आल्यावर. एखादी संधी आपल्यासमोर आली तर त्याला काहीतरी अर्थ असतो – त्यामुळे ती विनाकारण नाकारू नये हे माझं मत. शिवाय संस्था युनायटेड नेशन्सच्या संस्थांपैकी एक. त्याच संस्थेच्या दिल्ली ऑफिसबरोबर मी अडीच वर्ष काम करत होते – त्यामुळे संस्थेची विश्वासार्हता हा प्रश्न नव्हता. “सौदीत पासपोर्ट कंपनीला द्यावा लागतो” या बातमीचा बराच पगडा आपल्या लोकांच्या मनावर आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी मी “युएनमध्ये असं काही नसतं; माझा पासपोर्ट माझ्याकडेच राहील; मला पाहिजे तेव्हा मी परत येऊ शकते” म्हणत होते. हे वाक्य मी पुढच्या दोन महिन्यांत किमान शंभर वेळा उच्चारणार आहे याचा मला अंदाज आलाच. 

‘ही संधी घ्यावी असं वाटतंय’ हे कळल्यावर मी जरा गंभीरपणे माहिती काढायला सुरुवात केली. इंटरनेटवरच्या सगळ्या बातम्या भयावह होत्या – एकही सकारात्मक बातमी नाही. तालिबानी हल्ले, बॉम्बस्फोट, अपहरण आणि मृतांची संख्या. त्यात भर पडली ती अमेरिका २०१४ पर्यंत अफगाणमधून सैन्य माघारी घेणार आणि एप्रिल २०१४ मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणूक असणार या बातम्यांची. २०१४ नंतर देश पुन्हा तालिबानच्या ताब्यात जाणार की काय, अंतर्गत यादवी होणार की काय... अशाच बातम्या.

मग मी एक काम केलं. प्रत्यक्ष काबूलमध्ये कामासाठी एक वर्ष राहून आलेल्या दोन तीन लोकांशी बोलायचं ठरवलं. पत्रकार निळू दामले यांचा नंबर मिळाला, त्यांच्याशी बोलले. “बिनधास्त जा” असं त्यांनी सांगितलं तरी मी काही पत्रकार नाही; त्यामुळे त्यांचा सल्ला जसाच्या तसा स्वीकारण्यात अर्थ नव्हता. शिवाय ‘स्त्रियांसाठी कितपत धोकादायक आहे तिथं’ हे एखादी स्त्रीच जास्त चांगलं सांगू शकेल. म्हणून मग इंडियन इकॉनॉमिक सर्विसच्या अधिकारी मंजुळा यांच्याशी बोलले. त्या २००८ मध्ये एक वर्ष तिथं काम करत होत्या. त्यांनीही “चांगला अनुभव आहे, तुला खूप काही नवं पहायला मिळेल, शिकायला मिळेल” असं प्रोत्साहन दिलं. सध्या अमेरिकेत असलेल्या रेणू यांच्याशी स्काईपवर बोलणं झालं तेव्हा काबूलमधल्या राहायच्या व्यवस्था कोणत्या आहेत, त्यापैकी मी कोणत्या व्यवस्थेचा आग्रह धरावा याबद्दल त्यांनी आवर्जून सांगितलं. सुचिथ या श्रीलंकेच्या गृहस्थांशी एकीने जोड घालून दिली होती; तोही तासभर माझ्याशी बोलला. यातल्या कुणाशीच माझी काहीही ओळख नव्हती – पण ज्या आपुलकीने त्यांनी माझ्या प्रश्नांना न कंटाळता उत्तरं दिली, त्यातून माझ्या लक्षात आलं की काबूलला मी जाण्यापूर्वीच त्या धाग्याने ते माझ्या मदतीस तयार होते. यातला ‘सुचिथ’ तर प्रत्यक्ष काबूलमध्ये होता आणि मी ज्या संस्थेत जाणार तिथं काम करत होता. त्याची पुढे मला खूप मदत झाली. 

पण दरम्यान मी माझ्या मनातले सगळे प्रश्न – विशेषत: सुरक्षेविषयीचे प्रश्न – लिहून पाठवले; आणि संस्थेच्या लोकांकडून त्याचं सविस्तर उत्तरही आलं. कामाबाबत मला काळजी नव्हती, ते आव्हानात्मक असेल तितकं चांगलंच असतं. माझ्या मनाची पूर्ण तयारी झाली होती. मग ‘नको जाऊ’ असा आग्रह धरणा-या जवळच्या लोकांचं मतपरिवर्तन करण्याचं कामही पार पडलं. 

मग विसा मिळण्यात ज्या यायच्या त्या अडचणी आल्या. अफगाणमध्ये नोकरीसाठी यायचं तर इथल्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक क्रमांक आपल्या देशातील अफगाण दुतावासाला कळवला जातो. तिकीट ऑफिस काढणार असल्याने विसा मिळाला नाही म्हणून प्रवास पुढे ढकलला गेला, तर त्यात माझं आर्थिक नुकसान काहीच नव्हतं म्हणून मी निवांत होते. नउ एप्रिलला मला तो नंबर मिळाला, दहा एप्रिलला मी मुंबईत. तिथल्या एका मराठी स्त्रीच्या (कर्मचारी) सहकार्यामुळे त्याच संध्याकाळी विसा मिळाला.

१३ एप्रिल. दिल्ली विमानातळ. अफगाण स्त्रिया आधुनिक पेहरावात होत्या पण डोकं झाकलेलं होतं त्याचं. पुरुष सूट-टाय-कोट या वेशात होते. म्हणजे अफगाणी लोक काही मागच्या शतकात राहत नाहीत असा दिलासा मिळाला. ते आपापसात बोलत होते; हळू आवाजात, त्यामुळे फार काही ऐकू येत नव्हतं आणि कळतही नव्हतं. बरेच विदेशी लोकही दिसत होते सोबत प्रवास करणारे. विमानतळावर वर्तमानपत्राच्या  कागदात बांधून आणलेले काहीतरी सगळे अफगाण स्त्री-पुरुष आनंदाने खात होते – काय असावं ते? 
काबूलमध्ये प्रवेश करताना हिंदुकुश पर्वताच्या रांगा दिसल्या - त्यावर अजून थोडं बर्फ शिल्लक होतं - हिवाळ्यात काय दृश्य दिसते असेल ना ते! काबूल खूप मोठ शहर दिसतंय  - घर मातीची दिसताहेत - आणि बहुमजली इमारती जवळजवळ नाहीतच. 


एरवी उजाड दिसणारा भाग एकदम हिरव्या तुकड्यांचा दिसला. काय लावतात हे आत्ता उन्हाळ्यात? पाणी कुठून येतं?
प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. यथावकाश या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. 

त्या दिवशी पुणे दिल्ली आणि मग दिल्ली काबूल असा प्रवास करत मी इथं पोचले. इथलं घड्याळ भारतापेक्षा  एक तास मागं आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आयुष्यात एक तास जास्तीचा मिळालाय.

क्रमश:

19 comments:

  1. सविता....इतक्या सहजतेने हे सारे तुम्ही सांगत आहात की मला तर वाचताना असे वाटू लागले आहे आपण आपला सारा मित्रवर्ग पर्वतीवर वा तुळशीबागेत जमलो आहोत आणि तुमची अनुभवसिद्ध अशी वाणी सुरू आहे. मंत्रमुग्ध होवून जाईल वाचक काबुलच्या वातावरणातील तुमचे प्रवासवर्णन वाचून यत बिलकुल संदेह नाही. प्रवासातील अनुभव म्हणजे केवळ "मी हे पाहिले, ते पाहिले, इथे गेले तिथे गेले..." असे नसून तुम्ही टिपलेले समाजदर्शन फ़ार उपयुक्त ठरणार आहे. बाकी काबुलमध्ये बहुमजली इमारती नाहीत याचे काहीसे आश्चर्य वाटते खरे.....पण पुढील वर्णनात त्याचे कारणही समजेलच. त्या भागांच्या प्रतिक्षेत आहेच मी.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, अशोकजी. लिहिते लवकर पुढचा भाग.

      Delete
  2. छान जमला आहे लेख. खूप वेळा आपण ऐकतो त्यापेक्षा प्रत्यक्षात वेगळेच अनुभव (चांगले) येतात अशा देशांमध्ये. पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत.

    ReplyDelete
    Replies
    1. हो, अनुभव अनपेक्षित असण्यात पण एक मजा असते!

      Delete
  3. सवितादी , धन्यवाद ! काबूल - अफगाणिस्तान येथील 'आंखोदेखी' वाचून हायसे वाटले. नुकतीच डेबोरा एलीस हिची द ब्रेडविनर , परवानाज जर्नी आणि शैझिया या पुस्तकांची मराठी भाषांतरे वाचली. काळीज पिळवटून टाकणारा अनुभव -- कोठेही का असेनात -- आला. आता माझी भटकंती संपलीय. पण रोज मुंबईच्या वेगवेगळ्या परिसरात चालणे मात्र नियमित होते. तोच अनुभव. मी त्याला म्हणतो "War Without Bang" ! एवढाच फरक ! रेमीच्या शुभेच्छा !!!

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्ही उल्लेख केलेल्या पुस्तकांपैकी एकही वाचलेलं नाही मी - वाचायच्या यादीत नावं लिहून ठेवतेय.

      Delete
  4. सुरुवात अतिशय छान .. प्रवाही..मस्तच!
    गीतांजलि

    ReplyDelete
  5. And I am going to read every bit of it!
    -K

    ReplyDelete
  6. अरेच्चा!! हा ही एक कालप्रवास नाही का केलास तू?! एक तस मागे गेलीस की! मस्त!

    ReplyDelete
    Replies
    1. हं! काल-प्रवास आणि "काळ" प्रवासही!

      Delete
  7. सविता ,ARTICLE मस्तच . अगदी उत्सुकता वाढवणारे . तुझ्या पुढच्या POST ची वाट बघत आहे . तुझी लिहिण्याची शैली इतकी COMPACT पण तरीही वाचकाचे समाधान करणारी,त्रोटक नाही पण साऱ्या गोष्टींचा आढावा घेणारी अशी आहे . समोर चित्र उभे राहते तू सांगत असलेल्या प्रसंगाचे . .. यावर कदाचित एखादी सुंदर मालिका होऊ शकेल . … वंदना

    ReplyDelete
    Replies
    1. 'लेखमालिका' तरी करायचा बेत आहे तूर्त :-)

      Delete
  8. Very interesting, waiting for your next post.

    ReplyDelete
  9. मस्त प्रवाही

    ReplyDelete