प्रकाश यांनी लिहिलेली कावळा ही कथा वाचली
http://www.mimarathi.net/node/8136
त्यावर निरंजन यांनी लिहिलेली 'कुमार' ही कथा वाचली.
http://mimarathi.net/node/8151
आणि मलाही एक अनुभव आठवला.
***********
पुणे- नाशिक प्रवासात वाटेत 'दौलत'वर नेहेमीप्रमाणे बस थांबली. दहा मिनिटंच बस थांबते इथं. तेवढयात धावाधाव करत खाणं - मग कितीही भूक लागलेली असली तरी - मला आवडत नाही आणि जमतही नाही. 'खाणं' ही इतर अनेक गोष्टींप्रमाणे निवांतपणे करायची आनंददायी कृती असावी अशी माझी धारणा आहे.पोट भरण्याच्या खटाटोपात ते केवळ 'उदरभरण नोहे' हे आपण जवळजवळ विसरूनच गेलो आहोत!
मी पॉपकॉर्न घेतलं आणि सगळ्या गर्दीपासून आणि गोंगाटापासून थोडी लांब जाऊन उभी राहिले. डाव्या बाजूच्या शेतात हिरवगार पीक डोलत होत. लांबून कुठूनतरी दयाळाच सुरेल गाणं ऐकू येत होत पण तो दिसत मात्र नव्हता मला.
तेवढयात 'काव काव' असा ओळखीचा स्वर आला. एक कावळा खायला मिळेल अशा हिशोबानं माझ्याजवळ आला होता. 'माणसांच्या नादाने प्राणी आणि पक्षीदेखील काहीबाही खायला लागलेत' असा विचार माझ्या मनात आला. मी दोन पॉप कॉर्न कावळ्यासमोर फेकले. मग त्यावर तीन चार कावळ्यांचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. त्यांची आपापसात 'लढाई' होऊ नये असं मला वाटलं म्हणून मी आणखी काही पॉप कॉर्न जमिनीवर टाकले. पण आश्चर्य म्हणजे दुसरा कोणताही कावळा ते मटकावायला आला नाही. पहिल्या कावळ्याची आता भीड चेपली होती. एक उडी मारून तो माझ्या आणखी जवळ आला. मी परत दोन पॉप कॉर्न त्याच्यासमोर टाकले. पुन्हा दोन चार कर्कश 'काव काव' झाले पण समोर माझ्या कोणीच आलं नाही.
साधारणपणे खायला काही मिळालं की कावळ्यांची झुंड येते. आज मात्र हा कावळा एकटाच खात होता. माझ कुतुहल वाढल या प्रकारामुळे. मी नीट पाहिल्यावर दोन बाबी ठळकपणे नजरेत भरल्या. एक म्हणजे पॉप कॉर्न खाण्यासाठी माझ्या जवळ आलेला कावळा लंगडत होता. तो उडया मारत होता तोही एकाच पायाच्या आधारे. त्याला बहुधा लांबवर उडताही येत नसणार. दुसरं म्हणजे वरती आजुबाजूला तीन चार कावळे होते - ते या जमिनीवरच्या कावळ्याचे जणू रक्षक होते. कारण मी पॉप कॉर्न जमिनीवर टाकल्यावर त्यावर झडप घालायला येणा-या इतर कावळ्यांना हे तिघे चौघे 'संरक्षक कावळे' हुसकावून लावत होते.
मला ते दृष्य फार विलक्षण वाटलं होत तेव्हा आणि आजही माझ आश्चर्य कमी झालेलं नाही.
आपला सहकारी जखमी आहे; पूर्ण ताकद पणाला लावून तो अन्न मिळवू शकणार नाही; त्याला मिळणारे अन्न आपण त्याच्या तोंडातून काढून घेऊ नये - अशी अत्यंत संवेदनशील जाण त्या इतर कावळ्यांचा व्यवहारातून प्रकट होत होती.
ज्यांचे शोषण झाले आहे; जे आजारी आहेत; जे संकटग्रस्त आहेत; ज्यांची स्पर्धेत भाग घेण्याची क्षमता कमी आहे - अशांची विशेष काळजी घेतली पाहिजे - हे माणसांना कधी समजेल? हा प्रश्न मला आजही पडतो अनेकदा.
पूर्वप्रसिद्धी: मी मराठी http://mimarathi.net/node/8157
हे खरंच विलक्षण आहे... म्हणजे मी समजत होतो की अशी समज फक्त माणसात आढळते की काय.
ReplyDeleteअप्रतिम आहे हे !!!! माणसांत ही जाण शिल्लक आहे काय ह्याचा आजकाल संशय येत असतो !
ReplyDeletemucही जाण माणसांतही शिल्लक आहे . :) आपल्याकडेही आजारी, निरुपाय लोकांची काळजी घेतली जातेच. कधीकधी दिसत नसले तरी ह्याबाबतचा माझा दृष्टीकोण सकारात्मक आहे. उणे-अधिक होतच असते. हां, कावळ्यात ही जाण दिसली याचे आश्चर्य वाटले असेल तर एक सांगावेसे वाटते की कावळा हा सर्व पक्ष्यांमध्ये अतिशय हुशार आणि सामाजिक पक्षी आहे. त्यांची कौटुंबिक वीण अगदी घट्ट असते. त्याचे रक्षण करणारे कावळे त्याच्याच कुटुंबाचे सदस्य असावेत.
ReplyDeleteतन्मय केणी, स्वागत आहे तुमच. वाचते तुमचा ब्लॉग आणि कळवते.
ReplyDeleteश्रीराज, निसर्गात बरच काही आहे .. कधीतरी असे आपले डोळे उघडतात ... आपल्याला माहिती नसलेलं केवढ जग आहे नाही!!
ReplyDeleteअनघा, माणसं अशी नेहमीच होती? की खरच बदलली आहेत आजकाल? मला वाटतं चांगली - वाईट माणसं सगळ्याच काळात असणार ...
ReplyDeleteसंकेत, तस कधीच काही पूर्ण संपत नाही असा अनुभव आहे. त्यामुळे जगातल्या सगळ्या माणसांमधली सगळी माणुसकी लयाला गेली असं नाही म्हणत मी .. पण दहा गोष्टी समोर येतात तेव्हा त्यातल्या पाच सहा या अनुभवाच्या विरोधी चित्र मांडतात ...
ReplyDeleteकमालच म्हणायला हवी! नाहीतर आजकाल सगळे पायापुरतेच पाहतात... :(
ReplyDeleteभाग्यश्री, कमाल तर खरीच! आपल्याला किती गोष्टी माहिती नाहीत हे अशा वेळी कळत!!
ReplyDeletethoughtful story
ReplyDeleteThanks sm.
ReplyDelete