ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Wednesday, June 29, 2016

२४१. बँकॉक:धावती भेट ४: सुवर्णमयी वट

साधारण अर्ध्या तासाचा प्रवास झाल्यावर मी महाराज धक्क्यावर उतरले. इकडेतिकडे पाहतापाहता अचानक मुख्य रस्त्यावर आले. इथं प्रश्न आला – डावीकडे वळावं का उजवीकडेएका टूरिस्ट वाटणा-या गटाच्या मागे चालायला लागले. दहा मिनिटं चालल्यावर एका दुकानात मला ग्रॅन्ड पॅलेसला  जायचं आहे असं सांगितल्यावर एका थाई आजींनी माझ्या पाठीवर हात फिरवून, मला उलट्या दिशेला वळायला लावून बरोबर रस्ता दाखवला. दहा मिनिटं चालल्यावर मला ग्रॅन्ड पॅलेसचं पहिलं दर्शन झालं. 

सुरक्षा अधिका-यांनी तपासणी करून आत सोडलं. प्रवेश करताना दिसलेली दृश्यं 



मग एका ठिकाणी ५०० Baht  प्रवेशशुल्क दिलं आणि पुढं सरकले. 

हा राजवाडा १७८२ मध्ये बांधला गेला आणि सुमारे १५० वर्ष या जागेतून राज्यकारभार झाला. तिथं खरं तर टूर गाईडचीही सशुल्क सोय आहे. पण इंग्रजी गाईडसाठी मला दोनेक तास थांबावं लागलं असतं. म्हणून मग मी एकटीच भटकले. अशा ऐतिहासिक ठिकाणी काहीही माहिती नसताना भटकणं निरर्थक असतं हे पुन्हा एकदा लक्षात आलं. गौतम बुद्धाचं जीवन आणि तत्त्वज्ञान याविषयी थोडी माहिती आहे. पण बौद्ध धर्मातल्या लोककथांचा अभ्यास नसताना काहीही समजणं शक्य नव्हतं. मी फक्त अचंबित होऊन गोष्टी पहात राहिले. कितीही पाहिलं तरी मनाचं समाधान काही होत नव्हतं.

इथली काही प्रकाशचित्रं. 











कंबोडियातल्या अंकोरवटया प्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती इथं आहे.


ज्या अनामिक कलाकारांनी हे निर्माण केलं असेल, त्यांचं कौतुक करायला माझ्याकडं शब्द नाहीत. पण त्याचबरोबर सर्वसंगपरित्याग करणा-या गौतम बुद्धाला इथं इतकं सोन्याने झळाळून टाकलंय की काही विचारायची सोय नाही.  

बाहेर पडल्यावर मागे वळून पाहताना दिसलेलं हे दृश्य. 

            

मी प्रवेश केला होता तो मुख्य प्रवेशद्वारातून, पण बाहेर पडले ते दुस-याच प्रवेशद्वारातून. मग रस्ता चुकून अर्धा एक तास भटकत राहिले. इंग्रजी बोलणारा एक टुकटुक चालक भेटला आणि मग मी पोचले ती वट फो मध्ये. इथं आराम करणा-या, कुशीवर पहुडलेल्या बुद्धाची भव्य मूर्ती आहे. भव्य म्हणजे किती भव्य४६ मीटर लांबीची, सोन्याच्या मुलाम्याने झळकणारी बुद्धमूर्ती अतिशय देखणी आहे. प्रसन्न वाटलं ती पाहताना. 



बुद्धाचे कुरळे केस पाठीमागून असे दिसतात.



आपण मंदिरात देवाला प्रदक्षिणा घालतो, त्याच पद्धतीने इथं लोक बुद्धमूर्तीला प्रदक्षिणा घालत होते. भिंतीलगत हारीने मांडलेली पात्रं होती.

काही लोक या प्रत्येक पात्रात नाणं टाकत होते. त्यामागेही काही श्रद्धा असतील, पण मला माहिती नाहीत.

या मंदिराच्या परिसरातली अन्य प्रकाशचित्रं.





या देशात पाहण्याजोगं इतकं काही आहे, की कदाचित एक महिनाही अपुरा ठरेल. मी फारशा गोष्टी पाहिल्या नाहीत, मोजून चार ठिकाणं पाहिली. पण त्यातून थाईलँडच्या समृद्ध इतिहासाची झलक दिसली. (शोषितांच्या इतिहासाची झलक कधीच राजरोसपणे समोर येत नाही, ती मुद्दाम शोधावी लागते - पण असो. हे विषयांतर झालं.)

आता मुख्य म्हणजे थाईलँंडबद्दल भरपूर वाचलं पाहिजे. कदाचित अशीच अचानक पुन्हा संधी मिळाली इकडं यायची, तर त्यावेळी थाईलँड समजून घेण्यासाठी मी अधिक लायक असेन याची मी तयारी करत राहिलं पाहिेजे अशी खूणगाठ मनाशी बांधली आहे.

समाप्त

3 comments:

  1. नमस्कार
    १५ भारतीय भाषांमधील मोबाईल ई-बुक्सचे एकमेव वितरक व प्रकाशक असलेले डेलीहंट यांचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याशी संपर्क साधत आहे. आपल्या ब्लॉगवरील साहित्य ई-बुक्स स्वरुपात प्रसिद्ध करण्यास आपण उत्सूक असाल तर आपल्याला मदत करायला आम्हाला आनंद होईल. आपले स्वतःचे लेखन असल्यास तेही आपण इथे प्रसिद्ध व वितरीत करू शकता. डेलीहंटवर तुम्ही हे साहित्य विकत किंवा मोफत ठेवू शकता. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. रितसर करारपत्र होऊन सर्व व्यवहार ऑनलाईन केले जातात. याशिवाय आम्ही बुक्स बुलेटीन नावाचा एक ब्लॉग चालवतो. त्यात तुम्ही लिखाण करू शकता. आमच्यासोबत काम करण्याची आपली इच्छा असल्यास आपण जरूर संपर्क साधा – pratik.puri@dailyhunt.in

    ReplyDelete

  2. नमस्कार ताई, मागच्या रविवारच्या लोकसत्ता मध्ये तुमचा लेख वाचला. अगोदरही वाचला होताच पण परत एकदा वाचला. पुस्तकासाठी अभिनंदन !!!

    ReplyDelete
  3. Namaskar,

    I got your contact from Bloggers network
    I would like to invite you to send any related article for this edition . we give proper credit to all writers , you can also mention about your blog. check out the guidelines and let me know if you are interested. Sending you the link to our last year's Diwali Edition as well for your reference.


    link to guidelines: http://www.marathicultureandfestivals.com/diwali-e-edition-rules

    LInk to Diwali Edition 2015

    Please let me know if interested.

    Thanks

    ReplyDelete