मी अफगाणिस्तानमध्ये असताना शिया-सुन्नी, वहाबी-सलाफी,
इराण-सौदी अरेबिया ही द्वन्दवं जगात आहेत याचा जाणीव ठळक झाली होती. त्यानंतर इस्लाम
आणि अरब जगाबद्दल कुतूहल वाढलं होतं. बरेच प्रश्नही पडत होते. अरब जगाबद्दल मला दोनच गोष्टी माहिती होत्या – इथलं तेल आणि
इथला कडवा इस्लाम.
अरब जगातल्या बहुसंख्य देशांनी अफगाणिस्तानमधल्या तालिबान
राजवटीला मान्यता दिली नव्हती हे मला आश्चर्यजनक वाटलं होतं. यामागे नेमकं काय
कारण असेल? शिया आणि सुन्नी हे दोन्ही इस्लामचे पंथ आहेत, मग
त्यांच्यात भांडणाचा मुद्दा तरी काय आहे? इस्त्रायलला आपण
(भारत) पाठिंबा देतो खरा, पण ते सारखे हल्ले का करतात पॅलेस्टाईन जनतेवर? अरब देशांचे आणि अमेरिकेचे संबंध कसे आहेत? त्यांचा नेमका काय
इतिहास आहे? तेल सापडायच्या आधी कसं होतं जगणं अरब देशांचं? या देशांमध्ये राजेशाही कशी काय टिकली इतकी वर्ष? ट्युनिशियामध्ये, इजिप्तमध्ये क्रांतीनंतर इतक्या लवकर का भ्रमनिरास झाला
तिथल्या जनतेचा?
अरब जगाबद्दल हे असे कितीतरी प्रश्न. या प्रश्नांची उत्तर
शोधायची तर भरपूर वाचायला हवं. त्यासाठी मुळात आधी ‘काय वाचायचं’ ते समजायला हवं. सगळी नुसती गुंतागुंत होती.
विशाखा पाटील यांनी लिहिलेलं ‘धागे अरब जगाचे’ हे पुस्तक वाचलं आणि वरच्या
ब-याचशा प्रश्नांची प्राथमिक उत्तरं मिळाली. काही नवे प्रश्नही पडले – हे त्या
पुस्तकाचं यश म्हणता येईल. पुस्तक साध्या-सोप्या भाषेत आपल्याला माहिती देतं आणि
पुस्तकाचा आवाका प्रचंड आहे.
पुस्तकाचा प्रारंभ होतो २००८ मधल्या दमास्कस (सिरिया)
इथल्या ‘अरब संघा’च्या बैठकीच्या
वर्णनाने. वेगवेगळे अरब देश; त्यांचे नेते; त्यांचे घडोघडी बदलणारे
परस्परसंबंध; अमेरिका-ब्रिटन-रशिया-संयुक्त राष्ट्रसंघ आणि मुख्य
म्हणजे इस्रायल – अशी अनेक वळणं घेत निवेदन पुढं जातं. विचारांचा गुंता वाढत जातो.
सध्याची तिथली परिस्थिती समजते आहे असं वाटायला लागतं. सतरा अरब देश आणि त्यांचे
आपापसात तितकेच गुंतागुंतीचे व्यवहार. एका क्षणी गळ्यात गळे घालणारे कधी एकमेकांचं
तोंड पाहायचं नाकारतील, इतकंच नाही तर एकमेकांविरूद्ध उभे ठाकतील याचा भरवसा नाही.
आणि पुन्हा कधी एकत्र येतील तेही सांगता येत नाही.
ज्यू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या धर्मांचा इतिहास एकमेकांशी
जोडलेला आहे. अब्राहम हा या तिघांचाही पुराणपुरूष. पण पुढं रस्ते बदलले. या बदलाचा
फटका अरब जगाने आधी इतरांना दिला पण त्याची झळ त्यांनाही भोगावी लागली. ज्यू आणि
इस्लाम धर्मांच्या इतिहासाची रंजक माहिती या पुस्तकात मला वाचायला मिळाली.
त्यामुळे शिया-सुन्नी यांच्यातला संघर्ष, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष कळायला बरीच
मदत झाली. इस्रायलच्या राष्ट्रवादाबद्दल एके काळी मला असलेला आदरयुक्त दरारा संपत
आलाच होता. या पुस्तकामुळे इस्रायलची युद्धखोर बाजूही मला चांगलीच कळली (तो
लेखिकेचा हेतू आहे असं मी म्हणणार नाही). ज्यू समाजाला जे भोगावं लागलं त्याबद्दल
सहानुभूती नक्की आहे, पण इस्रायलच्या सर्व कृत्यांचं आंधळं समर्थन मात्र नाही.
असो. हे विषयांतर झालं, त्यामुळे थांबते.
अरब देशांचं भौगोलिक स्थान आणि अर्थातचं तेलामुळे आलेलं
महत्त्व यांचा सविस्तर ऊहापोह पुस्तकात आहे.
पुस्तकाचा पट इतका मोठा आहे की मला आणखी एकदा हे पुस्तक
वाचावं लागणार हे नक्की.
पुस्तकात अनेकदा भूतकाळ- वर्तमानकाळ – भविष्यकाळ यांचा
सांधा जोडला गेलाय, त्यामुळे माझा गोंधळ झाला. उदाहरणार्थ पान ३०-३१ वर इसवी सन
६८० मधल्या करबला लढाईचा इतिहास चालू असताना मध्येच पान ३१ वर एका परिच्छेदात १९७९
मध्ये इराणमध्ये क्रांती घडवून आणलेल्या अयातुल्ला खोमैनींचा उल्लेख मला नीटसा
समजला नाही.
पुस्तकाच्या अखेरीस शब्दकोष दिला आहे तसाच नामकोष पण असता
तर मदत झाली असती. पुस्तकात अनेक नावं असल्याने ‘कुणाचा कोण’, शत्रू की मित्र, ज्यू की मुस्लिम, शिया की सुन्नी हे चटकन लक्षात येत नाही.
मला काही नावांसाठी मागची पानं पाहावी लागली. पुढच्या आवृत्तीत नावांचा कोष अल्प
माहितीसह जरूर द्यावा.
अरब देशातल्या या सगळ्या घडामोडींचा परिणाम भारतावर काय झाला,
होतो आणि होईल याविषयी या पुस्तकाने उत्सुकता जागी केली आहे. ‘धागे अरब जगाचे’ हे पुस्तक एकदा तरी वाचावं
आणि संग्रही ठेवावं असं आहे इतकं नक्की.
राजहंस प्रकाशन
किंमत: रूपये ४००/-
मुखपृष्ठ प्रकाशचित्र ‘राजहंस प्रकाशन’च्या संकेतस्थळावरून साभार
No comments:
Post a Comment