तुझ्या
बेफिकीर ऐटीचा
काही अंश
माझ्यात
नक्कीच उतरला आहे;
सलगीच्या
तुझ्या विविध त-हा
कदाचित मला
त्याच्याच बळावर
उपभोगता येत आहेत.
*********
प्रथमदर्शनीच
जीवलग सखा बनून जाण्याची,
अंतरंगाचा ठाव घेण्याची;
सा-यांना मोहात पाडून
स्वत: निर्मोही राहण्याची
तुझी किमया मला नको आहे.
जर अखेर नसायचेच
कोठे आणि कशातही
तर व्याप उभारण्याचा
निरर्थक खेळ कशाला पुनश्च?
*********
तुझ्या भव्य
प्रचंड अस्तित्त्वाने
बरेच काही पाहिले असेल;
पण तू जणू
त्यांच्या पल्याड -
सा-या अनुभवांना पेलून
दशांगुळे आत्ममग्न.
इतक्या उंचीवरून,
इतक्या विस्तारातून
तुला जे जग दिसते
ते कसे आहे
- मी न विचारताही
तू आस्थेने सांगतोस खरा!
******
तू कधीपासून आहेस?
काय घेऊन उभा आहेस?
कोणाचे काय देणे लागतोस?
काही सायास न करता
केवळ नुसते असण्यातून
असण्याला अर्थ लाभतो का?
- हे प्रश्न तुला पडत नाहीत?
की
या सा-याला भेदून जाणा-या
गाभ्याची खोल जाण
मला मुठीत पकडता येत नाही?
******
या सगळ्या खटाटोपात
कणाकणाने
जीर्ण होत चालला आहेस;
तुझे स्वत्व गमावत चालला आहेस
त्याबद्दल तुला काय वाटते?
जाऊ दे, असो!
तू ’वासांसि जीर्णानि...’
वगैरे ऐकवणार
हे मला
आधीच कळायला हवे होते!
******
इतक्या अवाढव्य
भौतिक पसा-यासह
तुला इकडे तिकडे
भटकता येत नाही -
याचे नाही म्हटले तरी
मला वाईटच वाटते.
तुझे बोट धरून
रोजच्या गर्दीत हिंडायला
कदाचित आवडले असते मला.
सारे मागे ठेवून
केवळ तुझी ओढ लेवून
तुला भेटणारी मी
आणि एरवी
माझ्या जगात वावरणारी मी
यात फरक आहे
- हे एव्हाना
तुझ्या लक्षात आलेच असेल.
हृदयांच्या नात्यांत
असले किरकोळ तपशील
मन मोडून टाकत नाहीत
- हे शिकते आहे मी तुझ्याकडून.
******
तुझी ही सात रूपे;
सात अवस्था, सप्त स्वर;
अग्नीच्या झळाळत्या सात जिव्हा;
अज्ञाताचा प्रदेश धुंडाळणारी
सात विराट पावले;
आकाशात अकस्मात उमलणारे
इंद्रधनुचे सात रंग;
कर्मयोगी सूर्याच्या रथाचे
सात अवखळ अश्व;
महारूद्राच्या नर्तनाने
डगमगणारे सप्त पाताळ;
समाधीमध्ये अलगद रूजलेले
ते सात ऋषीवर;
अजाणतेपणी वाहिलेले
वेदनेचे सात दगड;
ज्यांचा थांग नाही
असे सप्त समुद्र;
आणि मीलनास उत्सुक
सात खळाळते प्रवाह;
अव्यक्त असणारे
तुझे अन माझे
सात युगांचे नाते;
'सत्'च्या तेजाने उजळलेली
तुझी ही सात शिखरे.....
******
तू सप्त; तू व्यक्त.
तू तप्त; तू मुक्त.
तू आकाश.
तू प्रकाश.
तू प्राण.
तू आण.
तू काळाची जाण.
****
पंथ पुष्कळ झाले, आता
भटकंती झाली रगड;
त्रैलोक्याच्या नाथा, फिरून
एकवार दार उघड!!
सातपुडा, २५ नोव्हेंबर २००४
At last!Poem on Satpuda comes out :-)
ReplyDeleteसातपुडा - विंध्याद्री यांनी मला कविता जगायला शिकवले आणि मी अभिजात साहित्यापासून कायमचा दुरावलो. तुमच्या कवितेने अनेक आठवणी पुन्हा चालवल्या! धन्यवाद.
ReplyDeleteAnonymous, as if you knew of its existence :-)
ReplyDeleteरेमीजी, सातपुड्यात मला काही वर्ष काम करता आलं आणि त्यामुळे त्याच 'दर्शन' मनसोक्त घेता आलं. अक्कलकुव्यातून मोलगीकड जाणारा रस्ता माझ्या विशेष आवडीचा होता. पण जास्त वेळा मी अर्थात धडगावला जात असे ती शहाद्यातून. तोही रस्ता माझ्या आवडीचा होता.
ReplyDeleteमला आता कधीकधी त्या आनंदाची उणीव जाणवते इथे :-)
Art of Living is most popular subject of discourses among the ordinary as well as celebrities. What I did not mention here is the Art of Dying, which I learnt in the Satpuda-Vindhya ranges: Without exchanging words! ( Pardon me for being personal or subjective, but couldn’t resist.)
ReplyDeleteRemijee, you are most welcome to share personal experiences. (My) Blog is all about personal space - shared with others by conscious choice.
ReplyDeleteYes, Art of Dying .. that is important and I guess Satpuda gave me glimpses of that .. I was fortunate enough to pick up those threads it was offering!
Will write more about it to you later - will send e-mail.
दोन शब्दात...सुरेख काव्य! :)
ReplyDeleteThanks Shriya :-)
ReplyDeleteतुझ हे टैलंट माहित नव्हत ... छानच ....
ReplyDeleteदेवेन, :-)
ReplyDelete