ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, October 11, 2011

९४. अनिवार्य

“अनिवार्य”
आज सकाळी झोपेतून जागी होत असताना कुठून कोण जाणे पण हा शब्द मानगुटीवर येऊन बसला.
मी पूर्वी कधीतरी लिहिलं आहे की मला असंख्य स्वप्नं पडतात – इतकी जास्त की खरं काय आणि स्वप्न कोणतं याबाबत अनेकदा माझा गोंधळ होत राहतो.
त्यामुळे हा ’अनिवार्य’ शब्द बहुतेक स्वप्नातला असावा अशी मी स्वत:ची समजूत घातली आणि रोजच्या कामाला लागले.
पण तास दोन तासांनी लक्षात आलं, की ’अनिवार्य’ अजून आहे सोबत.
“माझा नेमका अर्थ काय?” “मी म्हणजे नक्की काय?” असले भयंकर गंभीर प्रश्न तो शब्द मला विचारत होता. एक प्रकारचं आव्हान होतं ते – फक्त ते खेळकरपणे सामोर येत होतं.
मनाला सतावणा-या विचारांना तोंड द्यायचं माझं एक धोरण आहे – दुर्लक्ष करण्याचं! पण “अनिवार्य” त्याला पुरून उरला. कुठुनही एखादी फट सापडली, एखादा क्षण जरी मोकळा मिळाला की हा पठ्ठा “सांग बघू माझं रहस्य” असा माझा पिच्छा पुरवत राहिला.
तसा हा शब्द काही अगदी अनोळखी नाही.
“प्रश्नपत्रिकेतील पहिले दोन प्रश्न अनिवार्य आहेत” हे शाळकरी वयात वाचलं होतं. क्रिकेटच्या कसोटी सामन्यांत ’अनिवार्य षटकं’ असतात हे ऐकलं होतं.
अखेर “अनिवार्य”ला गप्प बसवायचं म्हणून मी म्हटलं, “माहिती आहे रे बाबा! अनिवार्य म्हणजे सक्तीचं, अटळ, ज्यापासून सुटका नाही असं …”
अनिवार्य त्यावर मोनालिसासारखं गूढ (म्हणजे न कळणारं) हसला. म्हणाला, “ हे समानार्थी शब्द झाले; माझ्या कुळातले. पण म्हणजे मी तुला समजलो नाही हे कबूल का करत नाहीस सरळ?”
मी जरा वैतागले. पण नशीब माझं की त्यानं मला “सक्ती म्हणजे काय?”, “सुटका म्हणजे काय?”, “नसणं म्हणजे काय?” – असले प्रश्न विचारले नाहीत. कारण याही शब्दांचे नेमके अर्थ मला माहिती नाहीत. अनेक शब्द मी केवळ सरावाने आणि अंदाजाने वापरते. म्हणून बहुतेक मी आणि वाचणारे, मी आणि लिहिणारे, मी आणि बोलणारे, मी आणि ऐकणारे यांच्यात नीट संवाद होत नाही.
“ठीक आहे बाबा! पण तू मला काही क्लू (clue)  तर देशील?” मी नम्रतेनं विचारलं.
“क्लू? म्हणजे काय?” अनिवार्य पक्का मराठी माध्यमवाला दिसत होता.
“अरे, म्हणजे धागा, सूत्र, दिशा, खूण ….. “ मी परत एकदा समानार्थी शब्द अंदाजानेच वापरले.
“मी स्वत:च एक सूत्र आहे,” अनिवार्य शांतपणे म्हणाला.
एकूण अनिवार्यला मला खेळवायचं होतं तर! माझ्या नम्रतेचा परिणाम शून्य होता.
मग मी विचार करायला लागले.
सगळ्यात आधी चिडचिड झाली ती माझा आवडता इंग्रजी – संस्कृत – इंग्रजी शब्दकोष मी दिल्लीत आणायचा आळस केला त्याचा. मग राग आला तो अमक्यांनी सुचवलेला मराठी कोष अजून विकत घेतला नाही त्याचा.
पण मला सारखंच काहीतरी शोधायचं असतं – कोणकोणती पुस्तकं जवळ बाळगायची त्यासाठी?
असो. जे केलं नाही त्याचा विचार करण्यात अर्थ नव्हता.
एक पर्याय होता – गुगलबाबा.
पण का कुणास ठाऊक, मी ठरवलं – बाहेरच्या कशाचा आधार न घेता उत्तर शोधायचं म्हणून. माझा हट्टीपणाच तो!
कामाच्या ठिकाणी गेले. मागच्या आठवड्यातली बरीच कामं बाकी आहेत हे सोमवारी सगळ्यांच्या ध्यानात येतं. त्यामुळॆ धावपळ होती. मीटिंग, फोन, रिपोर्ट, चौकशा, चर्चा .. असं चालू होतं.
मधेच कधीतरी मनात विचार आला – ’अ’ म्हणजे अभाव, नसणं, विरोध – जसं शांती आणि अशांती, स्थिर आणि अस्थिर, शोक आणि अशोक, परा आणि अपरा.    हा ’अ’निवार्य म्हणजे कशाचा तरी अभाव आहे. कशाचं तरी नसणं आहे. कशाचं नेमकं?
लगेच मेंदूच्या एका कप्प्याने आक्षेप घेतला – सगळेच ’अ’ काही विरोध दाखवत नाहीत –’अनुभव’ मधला अ , ’अगदी’ मधला ’अ’ काय दाखवतात? माहिती नाही.  अ वजा केला तर नुभव आणि गदी या शब्दांना काही अर्थ उरतो का? बहुतेक नसावा – कारण नुभव आणि गदी हे शब्द वापरात नाहीत. निदान मी तरी कधी ऐकले, वाचले नाहीत.
ग्रेट! तर मला ’अ’ कधी काय सांगतो हेही माहिती नव्हतं तंतोतंत!
एका फोनवर समोरचे गृहस्थ बोलायला यायची वाट पहात असताना मी ’र्य’ ने संपणा-या शब्दांचा शोध घेतेय असं माझ्या लक्षात आलं – शौर्य, क्रौर्य, धैर्य. मौर्य असाही एक शब्द मला आठवला.माझा एक मित्र आणि एक मैत्रिण त्यांच्या लग्नानंतर “मौर्य नेस्ट” नावाच्या इमारतीत रहात होते इतकाच त्याचा संबंध होता. पण “मौर्य साम्राज्य” असाही एक शब्द ऐकला होता. मौर्य म्हणजे मोरे वंशाचे असं गृहित धरलं तर शौर्य म्हणजे शूरपणाचं, क्रौर्य म्हणजे क्रूरपणाचं असा अर्थ आहे का? – मी मुद्दा सोडून भरकटते आहे हे लक्षात आलं माझ्या.
मधेच कधीतरी  ’निर’ शब्द पण अभाव दाखवतो – निर्जळी एकादशी, निर्धूर चूल असं काही आठवलं. पण ’अनिवार्य’ मध्ये केवळ ’नि’ आहे; ’निर’ नाही. शिवाय ’अ’ आणि ’निर’ असे दोन्ही शब्दप्रयोग लागोपाठ करण्यातून काहीच साधलं जात नाही. तसा काही शब्दच नाही असं मी म्हणत असताना मला ’अनिर्वचनीय’ आठवलं!
आणखी काही कामं करत असताना मी ’अनिवार्य’ शब्दाचं लिंग कोणतं असा विचार करतेय हे जाणवलं. पण परिस्थिती अनिवार्य असते, निर्णय अनिवार्य असतो आणि षटक अनिवार्य असतं – म्हणजे सोबतीच्या शब्दाबरोबर अनिवार्य स्वत:ची ओळख विसरून जातो. म्हणजे एका अर्थी तो पाण्यासारखा आहे – अनिवार्य शब्द असा विचार मी करतेय म्हणून मी त्याचा उल्लेख पुल्लिंगी करते आहे. पण ते बरोबर आहे की नाही माहिती नाही.
निवारा शब्दाशी काही देणं-घेणं आहे का याचं? निवारा नाही असं असणं – म्हणजे अनिवार्य का ? पण ते तर भरकटणारं होईल – आणि अनिवार्य तर पक्केपणा, ठामपणा दाखवतं. शिवाय शौर्य शब्दाला जसा एक अर्थ आहे (असा भास होतो) तसा ’वार्य” शब्दाला काही अर्थ दिसत नाही – म्हणजे असं वाटतं तरी!
दिवसभर आमचा – माझा आणि वेगवेगळ्या शब्दांचा -  असा लपंडाव चालू राहिला.
लहानपणी लपाछपीच्या खेळात आपल्यावर राज्य आल्यावर कोणीच आपल्याला सापडू नये म्हणून सारखं पुन्हापुन्हा आपल्यावरच राज्य यावं  - तशी काहीशी माझी अवस्था झाली दिवसभर! एखादा रस्ता दिसतोय असं वाटावं आणि तो रस्ता फिरून पुन्हा पहिल्याच ठिकाणी यावा; चालावं तर भरपूर पण कुठेच पोचू नये अशी मनस्थिती मी पुन्हा एकदा अनुभवली आज.
दमून घरी परतले. अनिवार्यचा अर्थ कळला नाही त्याचं ओझं मनावर घेत आले.
मी एकटी सापडायची तो जणू वाटच पहात होता.
त्याने विचारलं काहीच नाही. गप्प बसला मी बोलेन म्हणून वाट पहात.
बोलण्यासारखं माझ्याकडं काही नव्हतं. ज्या शोधातून गवसलं काही नव्हतं; त्याबद्दल काय बोलायचं म्हणून मीही गप्प  होते.
थोड्या वेळाने ’अनिवार्य’ने एक दीर्घ उसासा टाकला. थोडं मला आणि थोडं स्वत:शीच म्हणाला, “आणि तू म्हणे नियमित लिहितेस! शब्द, भाषा, विचार, भावना .. कशाच्या मुळाशी न जाता केवळ वरवर तू सगळ्या गोष्टी वापरतेस, त्याचा हा अनिवार्य परिणाम…”
अनिवार्य  कोणत्या अनिवार्यतेचा परिणाम भोगतो आहे? ते भोगणे माझ्यासाठीही अनिवार्य आहे का?

********
तुम्हाला कदाचित "सोस" वाचायला आवडेल. 

11 comments:

  1. Excellent reflections!

    ReplyDelete
  2. अनिवार्य चा मला समजलेला अर्थ असा....
    अनिवार्य हा शब्द अनिवार या शब्दापासून तयार झाला असावा आणि अनिवार म्हणजे ज्याचे निवारण करता येत नाही किंवा जे नष्ट करता येत नाही असे (उदा. अनिवार ओढ वाटणे)
    अनिवार हा शब्द निवारण या शब्दाचेच एक रूप असावे...
    निवारण करणे - एखादी गोष्ट नाहीशी करणे / दूर करणे/ वगळणे या अर्थाने वापरलेला आढळतो.
    निवारण / निवार करणे या शब्दाच्या मूळ संस्कृत रूपावरून निवार्य हा शब्द आला असावा (जसे क्रूर - क्रौर्य, धीर - धैर्य इ.) जो मराठीत वापरलेला आढळत नाही. पण देवीच्या आरतीत संकट निवारी असे मराठीकरण आढळते.
    निवार्य म्हणजे जो नाहीसा करता येतो किंवा दूर करता येतो किंवा वगळता येतो - थोडक्यात ज्याची पीडा टाळता येते असा...
    अनिवार्य मधला अ सुद्धा अभावच दर्शवितो.
    जो वगळता येत नाही तो अनिवार्य.

    अनिर्वचनीय - मूळ संस्कृत शब्द अनिःवचनीय ज्याचा उच्चार अनिर्वचनीय असा होतो.
    या शब्दातला वच या संस्कृत धातूचा अर्थ बोलणे, शब्दांत व्यक्त करणे असा होतो. तर अ आणि निः ही दोन्ही अक्षरे एखाद्या गोष्टीचा संपूर्ण अभाव दाखवतात.
    म्हणून अनिर्वचनीय म्हणजे जे शब्दांत संपूर्णपणे /नीटसे / स्पष्ट व्यक्त करता येत नाही असे... असा अर्थ होतो (उदा. अनंत, अनिर्वचनीय परमेश्वर)
    [याचप्रमाणे अनिर्बंध (ज्याला कोणतेही बंधन नाही असा - मुक्त )- अनिःबंध... हाही शब्द तयार झाला आहे.]

    अनुभव म्हणजे मनात सूक्ष्मरूपाने जाणीव स्थित होणे...
    अनुभव - यातील भव या शब्दाचा अर्थ होवो, व्हावे, होणे, स्थित होणे अशा प्रकारे होतो....
    तर ही जाणीव मनाच्या आत सूक्ष्मरूपाने स्थित होते आहे, जी बाह्य डोळ्यांना दिसत नाही म्हणून अनु हा शब्द वापरला आहे... जो त्या गोष्टीचा सूक्ष्मपणा / झाकलेपणा / लपलेपणा /आतला स्तर निर्देशित करतो.
    मात्र अनुभव हा शब्द ज्या जाणीवेसंदर्भात आहे... ती बहुधा सूक्ष्मरूपात असल्याने प्रत्यक्ष शब्दांतही कुठे व्यक्त झालेली दिसत नाही.

    असो. चूकभूल द्यावी घ्यावी.

    ReplyDelete
  3. अनामिक/का, आभारी आहे.

    ReplyDelete
  4. देवयानीजी, तुमच मत इतक सविस्तर नोंदवल्याबद्दल मनापासून आभार. पुढे कधीही ’शब्दांबद्दल’ अथवा भाषेबद्दल मला बोलावस वाटेल तेव्हा तुम्हाला त्यात रस आहे हे माझ्या सहज लक्षात राहील :-)

    ’अनिवार’ शब्दही एकदा माझ्या मनात येऊन गेला. पण माझी गाडी पुन्हा निवार म्हणजे काय याच्यापाशी अडली. निवारा म्हणजे काय ते माहिती आहे (अंदाजानेच पुन्हा) पण निवार म्हणजे काय ...म्हणून तो रस्ता तो मी सोडून दिला. ’संकट निवारी’ हे शब्द तुम्ही म्हणालात तेव्हा आठवले. पण म्हणजे निवारण आणि अनिवार मधला निवार एकच आहेत की नाहीत हा संभ्रम मनात आहेच माझ्या.

    अनिर्बंध हा शब्दही तुम्ही सांगितल्यावर आठवला. किती तरी शब्द आपण आता वापरत नाही हेही त्यानिमित्ताने जाणवले.

    अनु म्हणजे पुनरुक्ती का? अनुसरण, अनुवाद तसा अनुभव ... त्या भावनेत पुन्हा जाणे? माहिती नाही. पण ’अ’ आणि ’अनु’ हे दोन पूर्ण वेगळे शब्द आहेत - अनुमध्ये ’अ’ ला काही वेगळी भूमिका नसावी असो वाटते.

    शाळेत व्याकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम .. दुसर काय?

    एकंदर तुम्ही मला विचार करायला आणखी काही शब्द दिलेत तर!

    ReplyDelete
  5. सविताजी,
    तुमच्या प्रश्नामुळेच मी इतका विचार केला. याबद्दल तुम्हांला धन्यवाद!

    निवारा हा शब्द सुद्धा निवारण शब्दांशी संबंधित असण्याची शक्यता वाटते. ज्या जागी आपल्यावर येणार्‍या संकटांपासून किंवा पीडेपासून आपण दूर राहू शकतो म्हणजेच जिथे संकटांचे निवारण करता येऊ शकते आणि आपण निश्चिंत होऊन राहू शकतो, ती जागा म्हणजे निवारा असा अर्थ असण्याची शक्यता वाटते. एखादा तज्ज्ञ यावर अधिक प्रकाश टाकू शकेल.

    अनु म्हणजे संपूर्ण पुनरुक्ती नाही, पण गणिती भाषेत सांगायचे झाले तर सेटचा सबसेट... म्हणजे या अर्थाने अनुभव हा भावनेचा सबसेट म्हणता येईल...
    अनुसरण हा सरण या शब्दाचा सबसेट (सरण हा शव्द हालचाल, किंवा एखादी कृती करणे असे अर्थ दर्शवतो.) ....
    अनुवाद हा वाद या शब्दाचा सबसेट म्हणता येईल (इथे वाद हा शब्द लिखित संवाद या अर्थाने आलाय असे म्हणता येईल. अर्थत हा माझा तर्कच आहे.)

    आणि तुम्ही म्हणताय तसं अनु मध्ये "अ" ला काही वेगळी भूमिका नसावी असेंच मलाही वाटतंय.

    तुम्ही अशाच अजून काही पोस्ट लिहिल्या तर तुमच्यामुळे माझाही शब्दसंचय वाढेल आणि शब्दांचा अभ्यासाही होईल. :)

    ReplyDelete
  6. Devayaneejee, thanks again.

    Presently traveling in areas with very poor connectivity and hardly any free time. Will respond to you later - by email.

    ReplyDelete
  7. hehehehe
    kay maja ali wachayla!
    maurya nest la hi jaun alis ki tu! :D
    tujha blog wachane divasendivas aniwarya hot chalale ahe!

    ReplyDelete
  8. अनू, मौर्य नेस्ट :-)
    आणि ’अनिवार्य’चा आणखी काही अर्थ आहे का या वाक्यात? :-)

    ReplyDelete
  9. तुझा ब्लॉग वाचण दिवसेंदिवस अनिवार्य होत चालल आहे ...अगदी अगदी सहमत ... अनिवार्य शब्दही त्याच्याबद्दल इतका विचार केल्यामुळे आणि अब्द शब्द मध्ये जागा मिळवल्यामुळे खूप खुश झाला असेल .... अनिवार्य वरून तुझ्या मनात आलेली इतर आवर्तनही आवडली वाचायला ...

    ReplyDelete
  10. देवेन, विचारांची आवर्तन पण एका अर्थी अनिवार्यच म्हणायची!

    ReplyDelete