गेले दोन तीन दिवस मी सातत्याने दोन नव्या भाषा ऐकते आहे. माझ्या भोवतालचे लोक तसे समंजस आहेत, मला या दोन्ही भाषा बोलता येणे तर दूरचेच, त्या मला समजतही नाहीत हे त्या सर्वाना चांगले माहिती आहे. त्यामुळे शक्यतो इंग्रजी भाषेचा वापर चालू आहे. इथे एक बरे आहे, की शिपाई आणि वाहनचालकही मस्त इंग्रजी बोलतात – माझ्यापेक्षाही सफाईने बोलतात. गावातही अनेकांना इंग्रजी बोलता येते. त्यामुळे मला संवाद साधायला अडचण अशी काही नाही. पण तरी अनेकदा लोक एकमेकांशी ज्या दोन भाषा सहजतेने बोलतात त्या आहेत खासी आणि गारो.
मी सध्या मेघालयात आहे, अजून चार दिवस असणार आहे. इतर वेळी मी त्या त्या भाषेतली कामचलाऊ वाक्य शिकून घेते; इथ मात्र तशी गरज नसल्याने मी तो विनोदी प्रयत्न करत बसले नाही.खासी आणि गारो दोन्ही भाषा रोमन लिपीत लिहिल्या जातात – त्यात वर्तमानपत्र आणि मासिकही निघतात. आज एकजण खासी भाषेतल वर्तमानपत्र वाचत होती, तेव्हा अक्षर ओळ्खीची दिसूनही त्या शब्दांचा अर्थ लागत नव्हता तेव्हा मजा वाटली.
=====================================
Pyllait im u khynnah 9 snem ialade bad ka pyrsa na u runar ba pyniap ia ka kmie kpa bad para
http://mawphor.com/
======================================
शब्दाना अर्थ असतो तो नेमका कशामुळे? अनेकदा तसा तो आपल्याला शिकवला गेल्यामुळे! उदाहरणार्थ ‘कागद’ या शब्दाने एक विशिष्ट प्रतिमा आपल्या मनात निर्माण होते. कागदाचा आकार, त्याचा रंग, त्याचा स्पर्श, त्याचा उपयोग, त्याचे मूल्य --- अशा अनेक प्रकारे ही प्रतिमा आपल्या मनात येते. त्यामागे ‘कागद' या शब्दातून आजवर आपल्याला आलेला अनुभवही असतो जमेस धरलेला. जेव्हा शब्द आणि अर्थ यांची सांगड बसत नाही, तेव्हा एक तर आपण शब्द बदलतो ('मला तस नव्ह्त म्हणायच' ही आपली सफाई असते) किंवा त्याचा अर्थ आपण नव्याने लावतो ('हे माझ्या लक्षात नव्ह्त आल' अस आपण म्हणतो!)
नवीन शब्द आपण शिकतो तेव्हा त्याचा अर्थ समजून घेतो आणि त्यानुसार तो शब्द योग्य प्रसंगी वापरतो. असे मग शब्द आपल्या अंगवळणी पडत जातात , सवयीचे होतात.
अगदी आपल्या रोजच्या वापरातले शब्द त्यातली अक्षर सुट्टी करून वापरली की निरर्थक वाटायला लागतात. ‘वापर' हा शब्द घ्या उदाहरणार्थ ‘वा', ‘प' आणि ‘र" अशी तीन अक्षरे वेगवेगळी उच्चारत राहिली; की त्या तीन अक्षरांचा एकत्र प्रयोग जो अर्थ देतो तो नाहीसा होतो; आणि मागे उरतात ती एकमेकांशी काहीही संबंध नसणारी तीन अक्षरे! अस करत राहिल, की हळूहळू मला बोलण, लिहिण, वाचण या सगळ्या क्रिया नेहमी निरर्थक वाटायला लागतात. अस वाटत, की आपल्याभोवती कसलीतरी भयंकर पोकळी आहे आणि ती जाणवू नये म्हणून आपण उगीच शब्दांचे इमले रचत बसलो आहोत. बोलता न येणारे, वाचता न येणारे , लिहिता न येणारे असंख्य जीव या सृष्टीतलावर आहेत – त्यांच जगण काही पूर्णत: निरर्थक असत नाही!
शिवाय आपले शब्द आणि त्याचे दुस-यानी काढलेले – लावलेले अर्थ यात अंतर राहणार!
दुस-यांचे शब्द आणि आपण त्याचा लावलेला अर्थ यातही अंतर राहणार!
हे सगळ मी या ब्लॉगवर लिहिते आहे हा पण एक विरोधाभास आहेच! शब्दांचा सोस - दुसर काय?
शब्दाना अर्थ असतो तो नेमका कशामुळे?
ReplyDeleteहा प्रश्न अनेकवेळा आपल्याला पडत असतोच. काही शब्द तर इतके गमतीशीर आहेत की कधीकधी तेच डोळे वटारून, वाकुल्या दाखवून, लाजूनबिजून दाखवत असल्याचा मला भास होतो.
शिवाय दोन अक्षरे जोडून जो शब्द होतो त्याला अजून एखादे अक्षर जोडताच तयार होणार शब्द अगदीच वेगळा असतो. अर्थाअर्थी एकमेकांशी कुठलेच साधर्म्य न दाखवणारा. आता हा ’सोस’ च पाहा नं. त्याला णे जोडला की... ’सोसणे” होऊन जाते.
सविता, एकदम विचार धावायला लागले बघ सैरावैरा तुझी पोस्ट वाचून. :)
एकदम पटलं!
ReplyDeleteखूपदा वाटतं कि लहान मुलांना भाषा शिकवून आपण नक्की बरोबर करतो का? अभिव्यक्तीच्या सोसापायी नि:शब्द विचार करण्याची क्षमता विसरायला लावतो कि आपण!
अशी कितीक मुलं असतील जी या सोसाला बळी पडत नाहीत...त्यांना मठ्ठ म्हणतो आपण?!
गारो अन खासी न येणारे आपण त्यांच्या संदर्भात मठ्ठच ठरणार....!
सोस एकदम छान, आवडल.
ReplyDeleteRajyashree
भाग्यश्री, बहुधा एका व्यक्तीचा 'सोस' दुस-यासाठी 'सोसण' होऊन बसत!
ReplyDeleteअनू, आपला नि:शब्द विचार करणही अनेकदा शब्दांच्या, प्रतिमांच्या पायावरच असत चालू .. आपण बोलत नाही म्हणजे शब्द नसतात अस नाही!
आभार राज्यश्री.