(भाग १ : कन्याकुमारीच्या दिशेने)
(Want to read this post in English? It is here!)
कन्याकुमारी रेल्वे स्थानकं खरं तर एक टुमदार आणि देखणं स्थानक आहे.
पण यावेळी का कुणास ठाऊक त्याचं पहिलं दर्शन फारच उदासवाणं होतं. सगळीकडं फक्त धूळ होती, . बाहेर पडताना लक्षात आलं की स्थानकाचं दुरूस्तीचं काम चालू होतं. छोट्या छोट्या गोष्टींत आपल्याला किती अपेक्षा असतात आणि आपले अपेक्षाभंग देखील किती इवल्याशा गोष्टींमध्ये असतात हे जाणवून हसूही आलं. यावेळी काही मी कन्याकुमारी रेल्वे स्थानकाचा फोटो काढला नाही. एक दिवस चालत गांधी मंडपापर्यंत आले होते, तेव्हा तर रेल्वे स्थानकाच्या दिशेने मी नजरसुद्धा टाकली नाही.
हा २०११ साली काढलेला फोटो. घरी आल्यावर शोधला.
विवेकानंदपुरम
विवेकानंदपुरम हा सुमारे शंभर एकरांचा परिसर आहे. हे ‘विवेकानंद शिला स्मारक’ आणि ‘विवेकानंद केंद्र’ यांचं मुख्यालय आहे. इथं त्यांच्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण केंद्र आणि निवास व्यवस्था आहे. सुमारे एक हजार पर्यटक एका वेळी इथं राहू शकतात अशी सोय आहे. नाश्ता-जेवणासाठी एक उपाहारगृह आहे. दिवसातून काही ठराविक वेळा कन्याकुमारी गावात जाण्या-येण्यासाठी मोफत बससेवा आहे. ग्रंथालय आहे, विवेकानंद चित्र प्रदर्शनी आहे, गणपतीचं देऊळ आहे, स्वातंत्र्ययोद्ध्यांचं स्मारक आहे, रामायण प्रदर्शन आहे, पर्यावरणविषयक कामाची माहिती देणारं केंद्र आहे, विवेकानंद केंद्राचे संस्थापक कै. एकनाथजी रानडे यांची समाधी आहे, त्यांच्या जीवनाची माहिती देणारं प्रदर्शन आहे, ध्यानमंदिर आहे, भरपूर झाडं आहेत, मोरांचं अभयारण्य असल्याने मोरही खूप दिसतात, केंद्राचा समुद्रकिनारा (बीच) आहे - जिथून सूर्योदय दिसतो. अशा बऱ्याच गोष्टी परिसरात आहेत. एक कॉन्फरन्स हॉलही दिसला. आणि अर्थातच विवेकानंद केंद्राची शाळाही आहे.
दुपारी चारच्या सुमारास ‘विवेकानंद चित्र प्रदर्शनी’मध्ये गेले. हे या परिसरातलं माझं एक आवडतं ठिकाण. १९८३ मध्ये मी पहिल्यांदा कन्याकुमारीला गेले तेव्हा हे ठिकाण टुमदार, स्वच्छ, आणि मला नवा दृष्टिकोन देणारं होतं. आजही ते तसंच आहे. काही गोष्टी अपरिवर्तनीय असतात, त्यातली जणू ही एक. त्यावेळच्या विवेकानंद केंद्राच्या नेतृत्वाची दूरदृष्टी आणि पुढील पिढ्यांनी त्याची घेतलेली काळजी हे दोन्ही यातून दिसून येतं. प्रदर्शनाच्या मुख्य प्रवेशद्वारात स्वामी विवेकानंदांचे पूर्णाकृती चित्र आहे, जे लक्षवेधक आहे.
दहा रूपये प्रवेशशुल्क देऊन आत गेले. माझ्या आठवणीप्रनुसार यात मूळ सत्तरच्या आसपास फलक (पोस्टर्स) होते. आता त्यात विवेकानंद केंद्राच्या कामाचा तपशील पुरवणाऱ्या फलकांची भर पडली आहे. अत्यंत उत्तम चित्रं आहेत ही. हे चित्रकार कोण आहेत यासंबंधी आंतरजालावार माहिती मिळाली नाही. पुण्यात परत आल्यावर विवेकानंद्र केंद्रातल्या एका वरिष्ठ कार्यकर्तीला विचारलं, तेव्हा समजलं की कोलकाताचे रघुनाथ गोस्वामी यांनी ही चित्रं काढली आहेत. या प्रदर्शनातलं नचिकेताचं चित्र माझ्या अतिशय आवडीचं आहे. (नचिकेताची कथाही अर्थातच आवडीची.)
इंग्रजी, तामिळ, आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रत्येक चित्राखाली स्पष्टीकरण आहे. भारताचा इतिहास आणि संस्कृती, नरेंद्रनाथ दत्त या युवकाचा स्वामी विवेकानंद बनण्याचा प्रवास, त्यांची शिकवण, त्याचा भारतावर आणि जगावर झालेला परिणाम ... अशा दोन तीन भागांत या प्रदर्शनाची विभागणी करता येईल. निवांत वेळ काढून या ठिकाणी जावं असं मी सुचवेन.
पर्यटकांच्या अर्ध्या किंवा एक दिवसाच्या सहलीचा विवेकानंदपुरम आता एक मोठा भाग आहे. अशा कुठल्याही सहलीत असतो तसा प्रत्येक ठिकाणासाठी अर्ध्या तासाचा वेळ दिला जातो. या अर्ध्या तासात लोक किती आणि काय वाचत असतील याचा अंदाज आपण बांधू शकतो. १९८० च्या दशकात त्या वेळच्या युवकांना बांधून ठेवणारी, प्रभावी वाटणारी भाषा आता बदलली आहे. इन्स्टा आणि ट्विटरच्या पिढीला ही पोस्टर्स शब्दबंबाळ वाटू शकतात. असो.
पुन्हा अपेक्षाभंग
तिथून विवेकानंदपुरममधल्या समुद्रकिनाऱ्यावर गेले. समुद्रात - पाण्यात - थेट उतरता येत नाही कारण संरक्षक भिंत बांधलेली आहे. सकाळी सूर्योदय पाहायला मोठ्या संख्येने लोक येतात, तेव्हा एक तास त्या भिंतीतला छोटा दरवाजा उघडतात. तिथं सुरक्षारक्षक सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असतो. या किनाऱ्यावरून समोरच्या विवेकानंद शिला स्मारकाचं छान दर्शन होतं.
पण आज आणखी एक अपेक्षाभंग झाला. समुद्रात ठिकठिकाणी भराव घालण्याचं काम चालू आहे. आणि एक भराव नेमका ‘शिला स्मारक’ आणि समुद्रकिनारा यांच्या मध्ये येतोय. आता किनाऱ्यावरून शिला स्मारक नीट दिसत नाहीय.
वैतागवाणी भेट
समुद्रकिनाऱ्यावर मी वगळता सुरक्षारक्षक आणि आणखी एक तरूण माणूस होता. मी निवांत उभी होते, तेवढ्यात मला एक फोन आला. बोलणं झालं, मी फोन ठेवला आणि लगेच “आप महाराष्ट्रसे हो क्या दीदी” असं म्हणत तो तरूण मुलगा माझ्याशी बोलायला आला. मीही त्याची चौकशी केली. मेवाड(राजस्थान)मधला हा तरूण मुलगा चालत चार धाम आणि बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा करतो आहे. गेले एक महिना तो विवेकानंदपुरममध्ये राहतो आहे. मी त्याच्याशी जुजबी बोलून पुन्हा समुद्र पहायला वळणार इतक्यात त्याने “महाराष्ट्रात अमराठी लोकांवर हल्ले का होताहेत”, “महाराष्ट्र नवनिर्माण सेना का आक्रमक झाली आहे” वगैरे चर्चा सुरू केली. मी त्याला शांतपणे “हल्ले वगैरे काही झाले नाहीयेत”, “पहिलीपासून तिसऱ्या भाषेची सक्ती”, “काही अमराठी लोकांचा उद्दाम अविर्भाव” असं समजावून सांगत होते. पण लगेच माझ्या लक्षात आलं की याला ऐकायचं काही नाहीये, फक्त बोलायचं आहे. धर्म, संस्कृती, परंपरा .... या मार्गावर त्याची गाडी अपेक्षेप्रमाणे जात राहिली.
पुढं त्याने ‘उद्धव ठाकरे भाजपची सोबत सोडून काँग्रेससोबत गेले ही कशी चूक आहे’ वगैरे सुरू केलं. मी त्यावरही काही न बोलता त्याचं ऐकून घेत होते. मी काही उद्धव ठाकरेंच्या पक्षाची प्रवक्ती नाहीये 😀धर्म आणि पक्षीय राजकारण एकत्र करणारे लोक भेटणं यात आता काही नवल राहिलेलं नाही. असले लोक प्रचंड प्रेडिक्टेबल आणि म्हणून कंटाळवाणे असतात. मी त्या संवादातून बाजूला होण्याचा प्रयत्न केला, पण तो अर्थातच अयशस्वी झाला.
हळूहळू त्याची गाडी केरळ-तामिळनाडूवर टीका करण्याकडं वळली. इथले लोक कसे हिंदी बोलत नाहीत, इकडे कसा सारखा भात आणि इडलीच खावी लागते वगैरे. पुढं मात्र तो जे काही बोलला, त्यावर मी त्याला जवळजवळ फैलावरच घेतलं. “दीदी, आप कैसे सभ्य कपडे पहने हुए हो, लेकिन मै यहाकी मंदिरोंमे कई लडकियोंको देखता हूँ तो उनके आधे-अधुरे कपडे देखकर मुझे अजीब लगता है”. त्याचं हे वाक्य मला संताप आणणारं होतं. मी त्याला म्हणलं, “भावा, मुलींना कोणते कपडे घालायचेत ते घालू दे, तू कोण त्यांना सांगणारा? त्या काय तुझ्याकडं कपड्यासांठी पैसे मागतात काय? आणि काय रे, तू देवळात जातोस तेव्हा मुलींकडं कशाला बघतोस? देवाचा विचार कर ना. देवळात जायचं निमित्त करून मुलींकडं बघायला जातोस की काय तू? असली दांभिकता काही बरी नाही. सुधरा जरा.”
तो थोडा वरमला. मग त्याने गाडी दुसऱ्या मार्गावर नेली. एकदम ‘परदेशस्थ भारतीयांवर’ (एनआरआय). ते कसे आईबापांना इकडं सोडून परदेशात चैन करत असतात, इकडं त्यांच्या आई-वडिलांची काळजी घ्यायला कुणी नसतं वगैरे. त्यावरही मी त्याला फटकारलं. म्हणलं, “त्यांना नावं ठेवतोस खरी, पण तू तरी काय करतो आहेस? आई-वडिलांना घरी सोडून तूही महिनोनमहिने धाम आणि ज्योतिर्लिंगांची यात्रा करतो आहेस ना? मग तुझ्यात आणि त्या एनआरआयमध्ये काय फरक आहे?” मग तो आणखी वरमला. “नाही दीदी, मी यात्रा संपल्यावर घरीच जाणारेय. मी आयुष्यभर माझ्या आई-वडिलांची सेवा करणार आहे. मी तुम्हाला वचन देतो की मी आजन्म अविवाहित राहीन.” मला खुदकन हसायलाच आलं.
सगळं जग सोडून (ही आपली म्हणायची पद्धत, काही सोडून वगैरे नव्हते गेले मी!) कन्याकुमारीला गेले, तिथं समुद्रकिनाऱ्यावर हा एकच पर्यटक होता, तो नेमका मलाच भेटावा .... या योगायोगाचंही मला हसू आलं. जगं तेच असतं. माणसं तशीच असतात - चांगली, वाईट, निरागस, स्वार्थी, दुष्ट, मतलबी, सरळ, सज्जन ...... त्यातली कुणी अध्यात्माची फुलबाजी (ग्लोरिफाईड) भाषा बोलतात, तर आणखी कुणाला तसली भाषा बोलायला जमत नाही इतकाच फरक असतो का माणसां-माणसांत?
तेवढ्यात अचानक पाऊस आला. मी सोबत छत्री नेली नव्हती. तो पळत पळत निघून गेला. मागे उरलो मी, पाऊस, समुद्र, आणि तो सुरक्षारक्षक. त्याच्याशी दोन वाक्यं बोलले आणि मग छान भिजत सावकाश चालत परत आले.
काही जुनं, काही नवं
पुढच्या दोन तीन दिवसांत विवेकानंदपुरममधल्या जमेल तितक्या ठिकाणांना भेटी दिल्या. एके ठिकाणी तिथं बसलेले गृहस्थ रेडिओ ऐकत होते. मी एकटीच पर्यटक होते. मी आत जाऊन सगळं बघून आले, तिथून निघाले. त्या अर्ध्या-पाऊण तासात ते गृहस्थ माझ्याशी अवाक्षरही बोलले नाहीत. किंबहुना मी तिथं आले आहे याची त्यांनी दखलही घेतली नाही याची मला फारच गंमत वाटली. पॅशनचं तुम्हाला प्रशिक्षण देता येत नाही, ती आतूनच यावी लागते हे पुन्हा एकदा जाणवलं.
“रामायण” प्रदर्शनाची इमारत छान आहे.
आतमध्ये भास्कर दास (चेन्नै) यांनी काढलेली चित्रं आहेत. १०८ चित्रं आहेत. कलाकाराबद्दल आदर व्यक्त करूनही मी म्हणेन की मला ती चित्रं एकसुरी वाटली. रामायणाची कथा माहिती आहे त्यामुळे सगळं काही वाचत बसले नाही मी. थोडी कमी चित्रं चालली असती, पण १०८ संख्येचं महत्त्व असावं कदाचित. वरच्या दालनात भारतमाता आणि मा अमृतानंदमयी यांच्या प्रतिमेसह इतर काही प्रतिमा आणि मूर्ती आहेत. शेजारीच “सस्टेनेबल लिविंग” या विषयावरचं डिजिटल प्रदर्शन आहे. ते मला काहीच कळलं नाही. दोन दिवसांनी केंद्रातल्या एका वरिष्ठ सहकाऱ्याने ते मला सविस्तर दाखवलं. या इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे सौरऊर्जेचा वापर. हे चांगलं आहे. तसंच पावसाचं पाणी इमारतीच्या तळघरात साठवण्याची सोय आहे (Rain Water Harvesting). एका अर्थी हा नव्या-जुन्यांचा (धर्म आणि विज्ञान) संगमच म्हणायला हवा. तिथं अर्थातच सौरऊर्जा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग पाहायला कुणी येत नाही म्हणा.
काही जुने लोक भेटले. गप्पा झाल्या. जुनी नावं. जुन्या आठवणी. वगैरे.
एका सकाळी समुद्रकिनाऱ्यावर गेले. सूर्योदय पाहायला प्रचंड गर्दी होती.
सूर्य उगवला की लोक निघून जातात. बहुधा त्यांचे पुढचे प्रवास ठरलेले असतात. सुरक्षारक्षकही तासाभराची वेळ संपल्यानंतर निघून गेला. मी निवांत बसून राहिले. समुद्राची गाज, सौम्य झुळुक, समोर दिसणारं शिला स्मारक. मग एक नीलपंख (किंवा नीलकंठ) उडत आला. गिरक्या घेणं आणि फांदीवर किंवा जमिनीवर बसणं - असा त्याचा कार्यक्रम चालू होता. ज्यांनी नीलपंख उडताना पाहिला असेल, त्यांना माझ्या भाग्याचा हेवा वाटेल याची मला खात्री आहे. दोन मोरही आले. इथं अर्थात मोरांचं अभयारण्य आहे, त्यामुळे ते मोठ्या संख्येने दिसतात.
कै. एकनाथजी रानडे यांची समाधी आणि त्यासमोर विवेकानंदांचा आणखी एक पुतळा असंही एक स्मारक बीचजवळ आहे. तिथं फारसं कुणी येत नाही. दोन दिवस सकाळी काही काळ तिथंही निवांत बसून राहिले.
पुढं जाताना
इथं लोक एक तर पर्यटक म्हणून येतात किंवा या ना त्या संदर्भात विवेकानंद केंद्राशी नातं असणारे लोक येतात. मी यापैकी काहीच नव्हते. मी फक्त एके काळच्या माझ्या आयुष्यातल्या खुणांपैकी काय काय शिल्लक आहे ते तपासून पाहणारी एक प्रवासी होते. या खुणा फक्त बाहेरच्या परिसरात नव्हत्या, त्या माझ्या मनातही होत्या. आतल्या आणि बाहेरच्याही अनेक खुणा लोप पावल्या आहेत हे कळताना दु:ख झालं नाही. आपण पुढची वाट चालतो, तेव्हा मागचं नामशेष होणार हे अपेक्षितच असतं. त्यातूनही जे काही अजून शिल्लक आहे ते सुखावणारं होतं - हेदेखील कालांतराने कधीतरी संपेलच या जाणीवेतही 😊
मी (फार पूर्वी) कन्याकुमारीत असताना ‘विवेकानंद केंद्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारात आहे की नाही’ अशा चर्चा व्हायच्या. विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांचं निधन होऊन तेव्हा जेमतेम दीड वर्ष झालं होतं, त्यामुळे या चर्चा स्वाभाविक होत्या. अगदी “हे आरएसएस आरएसएस तुम्ही जे म्हणताय, ते काय आहे” असं विचारणारे निरागस कार्यकर्तेदेखील आमच्यात होते. (विवेकानंद केंद्रातला माझा एक सहकारी मित्र परवाच या वाक्याची आठवण काढत होता आणि आम्ही दोघेही आमच्या बावळटपणावर खूप हसलो होतो). “जाणीव” संघटनेची स्थापना आणि काम या प्रक्रियेत असताना आम्ही मित्रांनी समाजातल्या विविध विचारसरणींचा प्राथमिक अभ्यास केला होता, त्यामुळे आरएसएसच्या विचारप्रणालीची मला तोंडओळख होती - इतकंच. पण आज आता हा प्रश्न (विवेकानंद केंद्र आणि संघ) विचारण्याचं कुणालाही कारण पडणार नाही. विवेकानंद केंद्र ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातली संस्था आहे याच्या खुणा जागोजागी दिसतात. ठळकपणे दिसतात.
मी कन्याकुमारीत येण्याइतकंच मी कन्याकुमारीतून परत जाणंही माझ्या आयुष्यात महत्त्वाचं होतं, आहे, राहील. मुक्कामाइतकाच - किंबहुना काहीसा जास्तच - महत्त्वाचा असतो तो प्रवास. तो चालूच आहे. आजही.
No comments:
Post a Comment
पोस्टवरती प्रतिसाद नोंदवण्यात अडचण येत असल्याचे काही वाचकांनी कळवले आहे. तांत्रिक बाबी तपासून पहात आहे. प्रतिसाद येथे प्रकाशित होत नसल्यास मला इमेलवर तो पाठवावा ही विनंती. धन्यवाद.