ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, November 18, 2011

१००. कौतुक


मी तिच्याकडे पाहून सहज हसले. उत्तरादाखल तीही मोजकं हसली.
“वा! चहा फार छान झालाय, मला आवडला” मी म्हणाले. मला तिला ते सांगायचं होतंच म्हणून तर मी सुरुवात केली होती संवादाची.

मी शहादयातून पुण्याला चालले होते. चौदा तासांच ते अंतर एरवी बसने जाताना कठीणंच असतं – आत्ता मी ऑफिसची गाडी घेऊन आले होते पण अंतर तर तेवढं काटायचं होतंच. एरवी एकटीने प्रवास करताना सहसा चारचाकी घेऊन जात नाही  मी. पण यावेळी हात दुखावला होता, डॉक्टरांनी प्रवासाला परवानगी दिलेली नव्हती. पण हा इथला कार्यक्रम नवा होता, त्याची आखणी मी केली होती त्यामुळे मला यायचं होतं – मग पर्याय म्हणून – सुखाचा प्रवास म्हणून – गाडी घेऊन इथवर आले होते मी आणि आता परत चालले होते पुण्याला.

राहुरी कृषि विद्यापीठाच्या परिसरात वाहनचालकाला चहा प्यायची लहर आली आणि म्हणून आम्ही इथं थांबलो होतो.

रस्त्याच्या कडेला चहाची एक टपरी होती. लक्ष वेधून घेणारं त्या टपरीत काही विशेष नव्हतं. दोन प्लास्टिकची टेबलं, काही मोडक्या आणि रंग उडालेल्या तशाच खुर्च्या, एका खोक्यावर चहाचं सामान – तिथंच दोन बरण्यांत बिस्कीटं, क्रीम रोल आणि खारी, स्टोव्हचा भर्रकन येणारा आवाज, रॉकेलचा वास. तिशीतली एक स्त्री त्या टपरीची सर्वेसर्वा दिसत होती – चहा ती बनवत होती, ऑर्डर घेत होती, पैसे घेत होती, कप विसळत होती, गिऱ्हाईकांशी बोलत होती. ती एकटीच सगळं सांभाळताना दिसत होती. कामाने तिचा चेहरा रापलेला दिसत होता. दुपारचे साडेतीन वाजत आले होते त्यामुळे तिथं फारशी गर्दी दिसत नव्हती.

मी चहा प्यायला फार उत्सुक नसते. बरेचदा घशाला काही तरी गरम हवं म्हणून मी चहा पिते. मी पिते त्यातले बरेच चहा ‘गरम असणं’ ही माझी गरज पुरवतात – इतकंच. पण चांगला चहा मिळाला तर त्याला दाद कशी द्यायची हेही मला माहिती आहे. असे प्रसंग अपवादानेच येतात पण आज तो अपवाद होता.

माझ वाक्य ऐकून त्या स्त्रीचा चेहरा एकदम उजळला. ती मनापासून हसली. तिचे डोळे चमकले. तिचा चेहरा सैलावला. तिने थेट माझ्या नजरेत नजर मिळवून मी किती प्रामाणिक आहे हेच जणू तपासून पाहिलं. कशामुळे कुणास ठावूक पण तिची खात्री पटलेली दिसली.

 “ताई, अजून एक कप चहा घ्या”, तिने आमची जुनी ओळख असल्यागत फर्मान सोडलं.

आता याबाबतीत मी अगदीच वाईट आहे. म्हणजे एखादा पदार्थ आवडला म्हणून मी तो जास्त खाऊ शकत नाही कधीच. खाणं ही इतर अनेक कृतींसारखी  ‘गुणात्मक’ कृती असते असं  माझं मत – त्याचा पदार्थाच्या दर्जाशी संबंध असतो पण संख्यात्मक असं त्यात काही नसतं.

“चहा मस्त झालाय, पण अजून एक कप नाही घेता येणार मला – जास्त पीत नाही चहा मी, “ मी नम्रपणाने तिचा आग्रह धुडकावून लावला.

“तुम्ही काळजी करू नका ताई. हा चहा माझ्याकडून तुम्हाला फ्री आहे – म्हणजे पैसे नाही मागणार मी तुमच्याकडून या चहाचे.” तिन स्पष्टीकरण दिलं.

हे काहीतरी वेगळं घडत होतं. एक गरीब बाई तिच्यापेक्षा ब-या परिस्थितीतल्या बाईला काही कारण नसताना फुकट चहा पाजत होती – काही ओळखदेख नसताना.

“तुमचा हट्टच असेल, तर दया मग एक कप चहा,“ मी माघार घेतली – मला जास्त ताणता येत नाही. पैसे तर देईनच मी त्याचेही. ती आणखी मोकळेपणान हसली आणि उत्साहाने आणखी एक कप चहा तिने मला दिला.

मी खुर्चीवर ऐसपैस बसले. वाहनचालकाला माझ्याबरोबर असण्याची सवय होती – त्यामुळे तोही निवांत होता. मग आम्ही गप्पा मारल्या – तिचा चहाचं दुकान, तिचं घर, तिची मुलं, तिचं जगणं, तिचे अनुभव, तिचं दु:खं .. असं आम्ही बरंच काही बोललो. तिलाही प्रश्न होते माझ्याबद्दल – मी नोकरी करते का, ही चारचाकी माझी होती का वगैरे. मी तिच्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरं दिली.

मी तिला पैसे दिले तेव्हा तिने या आग्रहाच्या चहाचे पैसे खरंच घेतले नाहीत माझ्याकडून – मला जरा संकोच वाटत होता त्याचा. निघतानिघता मी तिला सहज विनोदानं म्हटलं, “असा सगळ्या येणा-या जाणा-यांना फुकट चहा पाजला तर पैसे कसे सुटणार तुला यातून?”

ती एक क्षण गप्प बसली. माझ्याशी बोलावं की नाही याचा ती विचार करत होती बहुधा. तिच्या कसल्यातरी रहस्याला मी नकळत हात घातला होता. तिने एक दीर्घ श्वास घेतला – तिची नजर आता क्षितिजापल्याड होती. त्या क्षणी ती मला काहीशी दु:खी भासली – भासच असावा तो कदाचित!

मग ती पुन्हा हसली आणि हळुवारपणे म्हणाली, “ माझ्या दुकानात रोज दोनशेच्या आसपास लोक येतात चहा प्यायला. त्यातले बरेचजण अगदी रोज येतात. मी मागची पाच वर्ष इथं चहा विकतेय. पण ताई, माझ्या चहाचं कौतुक करणा-या तुम्ही पहिल्याच! मी इतकं काम करते त्याचं चीज झाल्यागत वाटलं मला तुमचे कौतुकाचे शब्द ऐकून.”

त्यावर काय बोलावं ते मला सुचेना. कुणाकडून कौतुकाचा शब्द कानी न येणा-या पण आयुष्यभर राबणा-या या बाईची मन:स्थिती मला चांगलीच समजली. लोक त्या चहाचे पैसे देतात हे खरं, आणि त्या पैशांची त्या स्त्रीला गरज आहे हेही खरं – पण सगळा देवघेवीचाच व्यवहार असतो का फक्त? कामाचा दर्जा सदोदित चांगला ठेवणं हे किती कमी लोक करतात – मग त्याबद्दल एखादा कौतुकाचा शब्द उच्चारायला लोकांना एवढं जड का जातं?

प्रसंगाचं गांभीर्य हलकं करण्यासाठी मी हसत म्हटलं, “एकदा चहाला छान म्हटलं की एक कप चहा फुकट मिळतो हे एकदा कळलं की सगळे लोक तुझ्या चहाला छान म्हणायला लागतील आणि मग तुझी पंचाईत होईल...”

“ताई, खरं मनापासून केलेलं कौतुक आणि स्वार्थासाठी केलेली तरफदारी यातला फरक ओळखता यायला पाहिजे .. तीच तर खरी मेख आहे ...” तिनं मला सांगितलं.

मला तिचं म्हणण समजलं नाही. मी तिला म्हटलं, “अग, समजलं नाही मला तू काय म्हणतेस ते, जरा समजून सांगशील का मला?”

तिन परत एकदा माझ्याकड पाहिलं. मग समजावणीच्या सुरात ती म्हणाली, “लोक फार कमी वेळा मनापासून कौतुक करतात. ब-याचदा आपल्याकडून काहीतरी साधून घ्यायचं असलं तर लोक आपलं तोंडावर कौतुक करतात. आपण जे सहजासहजी करणार अथवा देणार नाही ते कौतुकाला बळी पडून करू असा त्यांचा अंदाज असतो – आणि आपण बरेचदा फसतोही तसे! काही वेळा स्वत:ची चूक लपवायला लोक आपलं कौतुक करतात – मग आपण त्यांच्यावर पटकन रागावू शकत नाही ना! म्हणजे एका अर्थी आपलं कौतुक करून लोक आपल्याला त्यांचं गुलाम बनवून टाकतात – थोडा वेळ का असेना! पण जुन्या काळाची राजहंसाची गोष्ट आहे ना – तो पक्षी ज्याला पाणी आणि दूध वेगळ करता येतं – तसं आपल्याला जमलं पाहिजे. खोट कौतुक कोणतं आणि खर मनापासून केलेल कौतुक कोणतं – आपल्याकडून काहीतरी काम करून घेण्यासाठी केलेल कौतुक कोणतं आणि काही स्वार्थ नसणार कौतुक कोणतं – यातला फरक कळला पाहिजे. खरं कौतुक घ्यायचं आणि खोटं कौतुक टाकून द्यायचं असं करावं लागतं. जे आपलं सुख पाहत नाहीत त्यांच्या वरवरच्या शब्दांना कधी भुलून नाही जायचं ताई “ ती स्वत:शीच बोलत होती .. मी त्या क्षणी निमित्तमात्र होते खरी!

मला त्या स्त्रीचं मनापासून कौतुक वाटलं आणि तिच्या जगण्यातून आलेला अनुभव मला तिनं दिला म्हणून तिच्याबद्दल आदरही वाटला.  त्यादिवशी मला फक्त चांगला चहा नाही मिळाला .. एक अविस्मरणीय धडाही मिळाला.  मला वाटतं तिनं मला इतकं सगळं सांगणं – ओळखीविना, कसल्याही अपेक्षेविना -  हे एका प्रकारे माझं केलेल कौतुकच होतं अस मी मानते..

मला अजून तिनं सांगितलेल्या वाटेवर चालायला नीट जमलेलं नाही. कधीतरी जमेल तेही अशी आशा मात्र आहे.
**

6 comments:

 1. >>>खोट कौतुक कोणत आणि खर मनापासून केलेल कौतुक कोणत – आपल्याकडून काहीतरी काम करून घेण्यासाठी केलेल कौतुक कोणत आणि काही स्वार्थ नसणार कौतुक कोणत – यातला फरक कळला पाहिजे.

  खूप महत्वाच आहे ग हे ...

  >>खर कौतुक घ्यायचं आणि खोट कौतुक टाकून द्यायचं अस करावं लागत.

  हे बोलण सोप आहे ,आचरणात आणण खूप कठीण आहे ... कारण मनुष्यप्राणी इतर गोष्टींपेक्षा स्वत:च्या कौतुकाने लवकर भुलतो...

  त्या स्त्री ने तुला दुसरया चहात एक चांगला धडा मिसळून दिला तो आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल आभार्स...

  आणि हो शतकाबद्दल अगदी खूप खूप अभिनंदन...!!!

  तुझी ही कामगिरी खरच कौतुकास्पद आहे पण जाऊ दे नाही करत आता कौतुक ... :)

  ReplyDelete
 2. देवेन, हो छान शिकायला मिळाल त्या दिवशी मला चहाबरोबर! ते आचरणात आणण सोप वाटत पण तू म्हणतोस तस कठीण आहे ते प्रत्यक्षात ... म्हणून त्या स्त्रीच खरच कौतुक वाटत मला!

  ReplyDelete
 3. खूप आवडला तुमचा लेख.खूप सुंदर.
  धन्यवाद.

  ReplyDelete
 4. भूषणजी, तुम्हाला लेख आवडला हे वाचून बर वाटल. कदाचित तुमचाही असा एखादा अनुभव असेल आणि म्हणून तुम्हाला हा लेख आवडला असेल.

  ReplyDelete
 5. हो असे काही अनुभव आहेत म्हणा. पण तुमच्या लेखातील प्रामाणिकपणा आणि तटस्तभाव फार आवडला.असे काही मला लिहायला जमावे अशी फार इच्छा आहे.

  ReplyDelete
 6. भूषणजी, तुम्ही यापेक्षाही अधिक ताकदीच लिहाल .. माझ्या शुभेच्छा.

  ReplyDelete