ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, November 12, 2011

९९. बोच


मुंबईत मी राहायला आले, ती थेट दादरमधेच. तस पाहायला गेलं तर गर्दी, धावपळ मला मानवत नाही. माझ्या स्वभावात एक प्रकारचा ’निवांतपणा’ आहे . त्यामुळे मुंबईत किंबहुना कुठल्याच मोठ्या शहरात जाण्याची महत्त्वाकांक्षा मला कधीच नव्हती. पण हाती घेतलेल्या कामाने मला मुंबईत आणलं.आपण या अफाट गर्दीत हरवून जाऊ अशी भीती एका बाजूने वाटत होती. तर दुस-या बाजूने मुंबई म्हणजे स्वत:च जगणं; स्वत:ची मूल्य तपासून पाहण्याची एक आव्हानात्मक  संधीही वाटत होती
.
पहिल्या दिवशी मी प्रशांतला विचारलं, “दादर स्टेशन किती लांब आहे इथून?” त्याने प्रश्नार्थक नजरेन माझ्याकडं पाहिल,  म्हणाला, “आज इथच काम आहेत सगळी. बाहेर नाही जायचय.” घाईने मी स्पष्टीकरण दिलं, “काम नाही म्हणूनच तर सहज चक्कर मारून येते तिथवर. जरा मुंबईची ओळख करून घेते. पाहू आमच दोघींच जमतय का ते!”

प्रशांतने मग मला नकाशा काढून दिला. गडकरी चौक, शिवसेना भवन, प्लाझा (थिएटर), आयडियल (पुस्तकांचे दुकान) अशा ठळक खुणांच्या मदतीने माझ दैनंदिन जाणं –येणं सुरु झालं. जरा आत्मविश्वास बळावल्यावर टिळक पुलावरचा जिना उतरून आयडियलच्या गल्लीत उतरणं, प्लाझाच्या बाजूने बादल-बिजलीच्या (ही आणखी दोन चित्रपटगृहे!) दिशेने आत शिरून कार्यालयात परत येणं असे उद्योग मी सुरु केले. आता गंमत वाटते, पण तेव्हा मला ते नवे रस्ते शोधण्याचे काम फार सर्जक वाटायचे. ठरलेल्या ठिकाणी पोचायला अनेक मार्ग उपलब्ध असले की मला बरं वाटतं! कंटाळा टाळण्यासाठी असले छोटे ’शोध’ फारच उपयुक्त ठरतात!

हळूहळू माझ मुंबईत बस्तान बसलं. घडयाळाच्या काटयावर मी देखील स्वत:चं जगणं आखायला शिकले. कार्यालयातून दादर रेल्वे स्थानकापर्यंत जायला बरोबर चौदा मिनिटं लागतात – असाही हिशेब मनात पक्का झाला. अंगावर येणारी गर्दी चुकवत, स्वत:ची गती अबाधित ठेवून चालण्याचं मुंबईतलं म्हणून एक खास तंत्र आहे – तेही मी ब-यापैकी आत्मसात केलं.

पण का कोणास ठावूक; मुंबईत मी ब-यापैकी स्थिरावल्यावर मात्र माझ हे चौदा मिनिटांचं गणित चुकायला लागलं! ठाण्याला, बोरिवलीला जायच असेल, तर ही चूक महागात पडायची नाही. कारण एक गाडी चुकली तरी पाठोपाठ दुसरी गाडी असायचीच. पण चार दिवसांच्या अंतराने माझ्या कर्जत आणि कसारा गाडया चुकल्या तेव्हा मात्र घोटाळा झाला बराच. दोन्ही ठिकाणी मला पोचायला दीड-दोन तासांचा उशीर झाला आणि कार्यक्रमाची गडबड झाली होती.

कसा-यात झालेला गोंधळ निस्तरून परत येताना मी विचार करत होते नेमक काय चुकत होत याचा. वेळ का चुकत होते मी गाडीची? माझ घडयाळ माग पडलं होत का? का माझी चाल मंदावली होती? की आणखी काही? ….कार्यालयातून निघाल्यापासूनच्या घटनांचा मी आढावा घेत होते.

आज दादर स्थानकात येता येता वाटेत दोन-तीन लोक भेटले होते. “मी घाईत आहे, नंतर वोलू” असे म्हणण्यातही दोन मिनिटं तर गेलीच होती. परवाही तर असच झालं होतं. माझ्या एकदम लक्षात आलं, की मुंबईत येऊन आता मला बरेच दिवस झाल्याने ओळखी वाढल्या होत्या. रस्त्यावर सारखे कोणी ना कोणी भेटत होते. त्यांच्याशी जुजबी एखादे वाक्य बोलतानाही वेळॆचं आणि अंतराचं माझ गणित चुकत होत!!

पाहता पाहता ओळखी अधिकच वाढल्या. नाती अधिक पक्की झाली. चौदा मिनिटांचं ते अंतर कापायला मला तीस  आणि कधी कधी तर चाळीस मिनिटांचा वेळ सहज लागायला लागला. घाईने कधी मी माणसांना चुकवून पुढे जाऊ लागले.

कालांतराने मी मुंबई सोडली.

परवा ब-याच वर्षांनी दादरला उतरले. हाताशी थोडा मोकळा वेळ होता म्हणून गडकरी चौकापर्यंत चालत गेले. चालायला सुरुवात करताना नकळत मोबाईलवर नजर टाकली होती – किती वाजलेत ते पाहायला. गडकरी चौकात पोचल्यावर परत एकदा घडयाळ पाहिलं  - मोजून चौदा मिनिट लागली होती मला!! अचूकतेचा आग्रह धरणारं मन सुखावलं!

पण त्याचबरोबर मन दुखावलही गेलं!! हे अंतर चालायला तीस मिनिटांचा वेळ लागेल अस कुठतरी गृहित धरल होत मी जुन्या सवयीने ! पण या रस्त्यावर आता कुणीही ओळखीच भेटल नाही! वर्षानुवर्ष जिच्याशी मैत्री होती त्या जागेला आपण परकं होऊन बसलो आहोत हे स्वीकारणं त्या क्षणी अवघड गेल मला!

नवे रस्ते चालायचे तर जुने सोडावे लागतात हे कळत मला.

पण ते कळूनही  कसलीतरी बोच राहते मागे … निदान काही काळ तरी ….

12 comments:

 1. वर्षानुवर्ष जिच्याशी मैत्री होती त्या जागेला आपण परकं होऊन बसलो आहोत हे स्वीकारणं त्या क्षणी अवघड गेल मला....


  व्यक्तींच्या बाबतीतही अस होवून बसत कधीकधी... आणि बोच तेवढीच दुखरी....

  ReplyDelete
 2. ही बोच आपण प्रत्येक जण कधी ना कधी अनुभवून गेलेलो आहोत... "सरले ते दिन सरले" हे यालाच म्हणत असावेत बहुदा...

  ReplyDelete
 3. बोच... खंत... हळहळ ... अनोळखीपण.... कसही व्यक्त होऊ देत पण ते जुने रस्ते साद घालतात आणि तिथे गेल्यावर वाटणार परकेपण खरच फार कठीण वाटतं गं...
  आम्ही गेल्यावर्षी आमच्या कॉलेजला गेलो होतो पण नकळत किंवा जाणिवपुर्वक रविवार ठरवला तिथे जाण्यासाठी... मनात जाणिव होतीच कारण की न जाणो ओळखीच्या रस्त्यांवर आपणच अनोळखी असण्याची ही ’बोच’ लागेल मनाला....
  मनात अगदी सहज काही काळ येणारी भावना अगदी परिपुर्ण व्यक्त केलीयेस ताई!!!

  ReplyDelete
 4. लीना, माणसं आणि रस्ते; रस्ते आणि माणसं .... कोण कुणाच प्रतीक आहे हे मी कधीकधी विसरून जाते!

  ReplyDelete
 5. राजेश, दिवस सरतात हे बरंही असत अस जेव्हा लक्षात येत, तेव्हा मग ही बोच उरत नाही तितकी!!

  ReplyDelete
 6. तन्वी, भूतकाळात रमायला सगळ्यांनाच आवडत .. पण काळ तर कोणासाठी थांबत नाही, त्यामुळे ही बोच जगण्याचा अपरिहार्य भाग आहे.

  ReplyDelete
 7. अरे, ह्या तर सगळ्या माझ्या आठवणीतल्याही जागा आहेत. मी आकाशवाणीत नोकरीला असताना दादरला रहायची. गेल्या महिन्यात मीही अचानक दादरला गेले होते. दहा बारा वर्षानी. आईच्या मामांना भेटायला जायचं होतं. ड्रायव्हरला म्हटलं फार सोपं आहे, चैत्यभूमीच्या जवळ पोचायचं आणि जावेला बढाया मारत होते हा सगळा भाग पायाखालचा आहे. पण चैत्यभूमीही बदललेली आणि तिथे पोचेपर्यंतचा भागही. चुकत माकत पोचलो एकदाचे. इतकसं काही शोधायला जातो आपण आणि लक्षात येतं बरंच काही हरवून गेलं आहे.

  ReplyDelete
 8. मोहना, हो - पुन्हा शोधायला गेलं तर गोष्टी हरवून जातात - म्हणून जेव्हांच तेव्हाच समरसून जगण महत्त्वाच!

  ReplyDelete
 9. ही पोस्ट जास्त भावली ती "दादर"मुळे...:)

  बाकी खरंय की ओळखीच्या जागा अशाप्रकारे अंतर पडलं की अनोळखी झाल्या की वाईट वाटतं...माझं मागच्या मायदेशवारीत असं अक्ख्या मुंबईबद्दल झालं...नशीब की जेव्हा ते दिवस होते त्यावेळी समरसून आनंदही घेतलाय पण जे गेलंय त्याची बोच आहेच..आणि राहीलच...:(

  ReplyDelete
 10. दादर, सेना भवन, प्लाझा, आयडियल....!!! :)

  ReplyDelete
 11. अपर्णा, हो जे गेलंय, त्यातल्या काहीची बोच राहते आणि काही जागा आठवणीतून पार नाहीशा होतात. ही एक मजेदार प्रक्रिया आहे !!

  ReplyDelete
 12. अनघा, आणखी एक दादरकर?

  ReplyDelete