ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Wednesday, April 18, 2012

१२२. भीमनी घंटी

" मॅडम, भीमनी घंटी  इकडं आहे, या बाजूने या," माझ्या सहका-याचा आवाज.

मी गुजरातमध्ये ऑफिसच्या कामासाठी आले आहे. दोन आदिवासी गावांना भेट देऊन इथे चालू केलेल्या  काही कार्यक्रमांची नोंद करायची आहे. इथं एक डॉक्युमेंटेशन टीम आहे -  तिचं प्रशिक्षण आणि कामाची नोंद असा दुहेरी उद्देश आहे. सोबत माझी कार्यक्रमाची पाहणी पण करून होईल. सगळा कार्यक्रम आधीच ठरवलेला आहे.

आदल्या दिवशी एकाने मला हळूच, "जाम्बुघोडा जवळच आहे तिथून. जाऊ यात का वेळ मिळाला तर?" असं विचारून घेतलं आहे. " काय आहे तिथं पाहण्यासारखं?" या प्रश्नावर "हनुमानाची प्रचंड मोठी मूर्ती" असं उत्तर उत्साहाने मला मिळालं. पण एकंदर मी देवभक्त नाही हे माझ्या टीमला माहिती आहे. म्हणून एकजण लगेच पुढे सांगतो, " तिथं मस्त जंगल आहे, तुम्हाला आवडेल ते खूप. ते एक अभयारण्य आहे...". पूर्ण टीमच्या मनात तिकड जायची इच्छा आहे त्यामुळे मी नकार द्यायचा प्रश्न उद्भवत नाही. "काम पूर्ण झालं पाहिजे पण आपण ठरवलेलं, बरं का" अशी फक्त मी सगळ्यांना आठवण करून दिली आहे कालच.

आम्ही पंचमहाल जिल्ह्यात आहोत. वडोदरा शहरापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर.  येताना रस्त्यावर आम्हाला पावागड दिसतो. हा पहाडी किल्ला आहे आणि १६ व्या शतकातल्या संस्थानाची राजधानी होती इथं. आम्ही वेळ नसल्याने तिकडे जात नाही पण एकदा जाण्यासारखी दिसती आहे जागा. रस्त्यावरच्या जाहिराती वाचून तिथं आता 'रोप वे'ची व्यवस्था आहे हे कळत - म्हणजे पर्यटक मोठया संख्येने येत असणार इथं.

आम्ही 'झंड हनुमान' या ठिकाणी पोचतो. 'झंड' शब्दाचा अर्थ काय याबद्दल आधी मी विचारलं, पण कोणाला सांगता नाही आलं  नेमकं - पण झंड म्हणजे भव्य असणार. वाटेत मोहाची झाडे आहेत भरपूर आणि त्यांच्या फुलांचा मंद वास वेडावून टाकतो आहे. काही आदिवासी स्त्रिया आणि पुरुष मोहाची फुले गोळा करताना दिसतात. ती विकून थोडेफार पैसे मिळतात त्यांना - या काळात ती एक उपजीविकाच असते त्यांची. एप्रिल महिन्याचे दिवस असल्याने जंगल  हिरवं नाही पण एकदम थंड आहे हवा. पावसाळ्यानंतर हे जंगल कसं दिसत असेल याची नुसती कल्पना करूनही मी एकदम ताजीतवानी होते. अर्थात एप्रिल-मे या काळातही जंगलाच सौंदर्य वेगळच  असतं हे काही मुद्दाम सांगायला नको. 


हनुमानाची २१ फूट उंच मूर्ती देखणी आहे. इथं फोटो घ्यायला बंदी आहे, त्यामुळे मी डिजीटल कॅमेरा उघडला नाही. गाडीचा चालक आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत जातो. तो सांगतो की, पांडव त्यांच्या वनवासाच्या बारा वर्षांनतर म्हणजे अज्ञातवासाच्या तेराव्या वर्षी या परिसरात राहिले होते. अर्जुनाने एका बाणाने जमिनीतले पाणी मोकळे करून पांडवांची तहान भागवल्याची एक गोष्टही तो मला सांगतो. आता हा झरा कोरडा पडला आहे पण पावसाळ्यात तो ओलांडणे अवघड असते असेही तो सांगतो. आता रामायणातला हनुमान महाभारतातल्या पांडवांच्या भेटीला इथं कशासाठी आला होता हे मात्र त्याला सांगता येत नाही. मी विचारल्यावर सगळेजण हसतात फक्त - एखाद्या  प्रश्नाचं उत्तर माहिती नसलं की फक्त हसायचं हे धोरण सगळीकडे दिसतं! असो, काहीतरी कथा असेल ती, शोधायला हवी. 

पुढे आहे 'भीमनी घंटी'. मला खर तर गुजराती चांगलं समजतं, त्यामुळे घोटाळा व्हायला नको होता. पण तरीही कुठेतरी आपल्यावर मातृभाषेचे संस्कार जास्त खोल असल्याने  'घंटी' म्हणजे एका मोठया 'घंटेचं' - देवळात असतात त्या 'घंटेचं' - चित्र माझ्या नजरेसमोर येतं. 'ही घंटी भीम कशासाठी वाजवत असेल' असा विचार मी त्यामुळे करते आहे मनातल्या मनात. त्यामुळे 'भीमनी घंटी' पाहिल्यावर क्षणभर माझा विरस होतो. मग माझ्या लक्षात येतं की, मराठी, हिंदी, गुजराती अशा भाषांची सरमिसळ केलीय मी म्हणून घोटाळा झालाय; मग मी स्वत:शीच हसते. कारण माझ्यासमोर जे काही दिसत ते आहे एक प्रचंड मोठं जातं - त्याच्या आकारामुळे आणि पांडवांच्या इथल्या वास्तव्याच्या कथेमुळे ते झालं 'भीमाचं जातं' - भीमनी घंटी! 

अज्ञातवासाच्या तेराव्या वर्षात भीमाने 'बल्लवाचार्याचे' काम केले ही कथा आपल्याला माहिती आहेच. त्यावेळी हे जातं वापरलं गेलं होत का? म्हणजे  या भागाची बरीच प्राचीन पाळेमुळे आहेत म्हणायची. हल्ली असली काही माहिती शोधायची म्हणजे इंटरनेट हे एक हाताशी असलेलं सोपं साधन झालं आहे. नव्या-जुन्याचा हा संगम मला नेहमी गंमातीदार वाटतो. आपली संस्कृती, आपला इतिहास वाचायचा तो इंग्रजीतून! 



त्या जात्याच्या आसपास मला एकावर एक रचलेले भरपूर दगड दिसतात. "हे काय आहे?" माझा स्वाभाविक प्रश्न. आता माझ्या टीमला माझ्याकडून कधी आणि कोणत्या प्रश्नांची अपेक्षा करायची याचा अंदाज आलेला आहे एव्हाना. आमच्यातला एकजण सांगतो, "इथं पडलेल्या दगडांतून आपल्या मनातलं घर बांधायचं आपण. ते जर स्थिर राहिलं, (म्हणजे ते एकावर एक रचलेले दगड खाली पडले नाहीत) तर आपल्या ख-या आयुष्यात आपल्याला आपण इथं बांधलेल्या घरासारखं घर मिळतं. स्वत:च्या मालकीच्या घराची आपली इच्छा पूर्ण होते इथलं घर टिकलं तर." माझे सहकारी उत्साहाने दोन मजली, तीन मजली घर, चार मजली घर बांधतात. त्यांच्यात ते घर 'बांधताना' लहान मुलांसारखा उत्साह आहे.

अनेक धार्मिक ठिकाणी अशा प्रकारच्या 'इच्छापूर्तीच्या' काही ना काही धारणा, समजुती आढळतात. मला माझ्या सहका-यांच्या डोळ्यात एक स्वप्न दिसते. मला एकदम जाणवत की अशा प्रकारच्या 'इच्छापूर्ती' च्या धारणा म्हणजे काही फक्त अंधश्रद्धा नाही. जे बेघर आहेत,  जे जन्मभर भाड्याच्या घरात राहत आहेत  ज्यांचे स्वत:च्या मालकीचे घर नाही, ज्यांची सध्याच्या घरात कुचंबणा होते आहे .. अशा लोकांच्या मनात एक आशा जागवण्याचे, त्यांना प्रेरणा देण्याचे काम ही जागा करते आहे. एका नजरेत मला तिथे अज्ञात लोकांनी आशेने बांधलेली असंख्य घरं दिसतात.  किती लोकांना आत्ताच्या त्यांच्या जगण्यातून पुढे जाण्याची उमेद हवी आहे, एक नवा रस्ता हवा आहे  त्याच एक चित्रच तिथं आहे. माझ्या हृदयात वेदनेची एक कळ उठते. मी तिथं घर 'बांधत' नाही - पण मी आता इतरांना हसतही नाही. 'इथं ज्यांनी घरं बांधली आहेत त्या सर्व लोकांना त्यांच्या स्वप्नातले घर मिळो' अशी एक प्रार्थना माझ्या मनात उमलते.

आम्ही परत फिरतो. येताना परिसरात असंख्य पोलिस दिसले होते, आता त्यांच्या संख्येत आणखी भर पडली आहे आणि अधिकारीही दिसत आहेत. मी एक दोन पोलिसांकडे पाहून हसते, तेही हसतात. एका अधिका-याला मी विचारते, "आज कोणी व्ही. आय. पी. येणार आहेत का?" एक अधिकारी हसतो पण उत्तर देत नाही.  मी पुढे म्हणते, "सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही मला माहिती न देणे मला समजू शकते. पण मीही सहज, फक्त कुतूहल म्हणून विचारते आहे. तुमची संख्याच आहे हा प्रश्न मनात आणणारी." दुस-या अधिका-याला माझ्या साधेपणाची बहुधा खात्री पटते. तो सांगतो, " गुजरातचे सरन्यायाधीश (मुख्य न्यायाधीश?) येत आहेत  इथं दर्शनाला. तुम्ही आधीच लवकर आलात ते बरं केलंत. आता कोणत्याही क्षणी साहेब येतील आणि तुम्हाला अर्धा पाऊण तास थांबायला लागलं असतं ते परत जाईपर्यंत." मी त्याचे आभार मानते.

त्या पाहुण्यांच्या आधी आमची भेट झाली या जागेला आणि वेळ वाचला याचा आम्हाला आनंद होतो. पोलिस उगाच त्रास देत नाहीयेत कोणाला पण वेळ तर गेलाच असता आमचा वाया. आम्ही निघताना समोरून गाडयांचा ताफा येतो. मी उगीच गाडया मोजते. एक, दोन, तीन ..... वीस गाडया धूळ उडवत येतात. सबंध जिल्ह्याची यंत्रणा आज याच कामात दिसते आहे. आज खरं तर कोर्टाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी हे  मुख्य न्यायाधीश जाम्बुघोडा इथं आलेले आहेत. एकदा मला  मोह होतो त्या दृश्याचा फोटो काढावा म्हणून. पण मी काही व्यावसायिक फोटोग्राफर नाही - उगीच कशाला पोलिसांचं लक्ष वेधून घ्यायचं?

तर राज्याच्या मुख्य न्यायाधीशांनीही आमच्यासारखी ' थोडं काम आणि थोडी मजा' अशी योजना केलेली दिसते आहे. आमच्या मौजेचा खर्च कोणी उचलला आहे ते मला माहिती आहे - पण या साहेबांच्या मौजमजेच्या खर्चाचा बोजा कोणावर पडणार? - असा एक प्रश्न माझ्या मनात येतोच. उत्तर अर्थातच माहिती आहे आणि पर्याय नसल्याने आपण ते स्वीकारलेलं पण आहे.

त्या न्यायाधीशांनीही 'भीमनी घंटी' ला त्यांच्या स्वप्नातले घर बांधलं की नाही ते मला माहिती नाही. कदाचित नसेलही - स्वतःचं घर असणारे भाग्यवान लोक आहोत आम्ही. कदाचित स्वप्नं पाहण्याइतका  निरागसपणा आता आमच्यात उरलेला नाही. जगताना सारखी बुद्धीची तलवार वापरून आम्ही स्वप्नं पाहण्याची ताकद गमावली आहे का?

आपण सुखी असतो तेव्हाच फक्त बुद्धीवादी असण्याची चैन आपल्याला परवडते का? हाही एक प्रश्नच! अनुत्तरीत प्रश्न!

** 

14 comments:

  1. इंटरेस्टिंग आहे, एकदा जायला पाहिजे.

    ReplyDelete
  2. मी भीमाशंकरला गेले होते तिथेही असेच दगड एकमेकांवर रचून ठेवलेले आहेत, तिथे आम्ही ज्यांना विचारलं त्यांना काही माहिती नव्हतं, पण कदाचित हेच कारण असावं, कारण तिथली दगडांची उतरण अगदी अशीच होती.

    ReplyDelete
  3. घरघर करणारा अनुभव. जात्याचीही घरघरच असते. छान टिपली आहे सगळीच वावटळ. वावटळीत धूळ उडते खूप. मग आसमंत थोडा स्वच्छही होत असतो. तसंच काही तरी... :)

    ReplyDelete
  4. कॅनडात रेड इंडियन्स हे आदिवासी आहेत. तिथल्या भागात अशाचप्रकारे कधी लहान कधी मोठी दगडांची उतरंड एकमेकांवर रचलेली दिसते. काहीवेळा त्यातून माणसासारखा आकार दिसतो. त्याला "इनुकशुक" असं म्हणतात. आता त्याचा अर्थ वगैरे काय हे समजण्यासाठी त्याभागात अधिक फेरफटका मारावा लागेल. पण मानवी स्वभाव संपूर्ण विश्वात सारखाच असतो त्यामुळे माझी खात्री आहे की अशाच काही समजुती त्या इनुकशुक शी जोडलेल्या असतील. :-)

    ReplyDelete
  5. शेवटच्या प्रश्नाचे उत्तर सापडणे तसे कठीणच आहे; पण अतिशय दु:खात असताना ही बुद्धीची कास न सोडणारे काही प्रमाणात तरी नक्कीच असतील. शेवटी प्रत्येक गोष्टीला अपवाद हे असतातच

    ReplyDelete
  6. अनामिक/का (१), नक्की आवडेल तुम्हाला. जरुर जावून या.

    इन्द्रधनू, भीमाशंकरला जायची संधी मिळेल पुन्हा कधी तेव्हा अवश्य पाहते. पण तिथली गोष्ट काही मला माहिती नाही.

    अनामिक/का (२), जात्याच्या घरघरीची तुम्हाला आठवण आली हे गंमतीशीर वाटलं - कारण तसं आहेच ते थोडंस.

    शांतीसुधा, माण्सांच्या ब-याच प्रेरणांमध्ये साम्य आढळतं - ही बहुधा त्यातलीच एक गोष्ट असावी. - घर बांधणी असेल किंवा नसेल पण 'इच्छापूर्ती' ही बाब असावी असे म्हणता येईल.

    श्रीराज, नियमांच्या अपवादाने नियम सिद्ध होतो असंच काहीसं इथंही असणार!

    ReplyDelete
  7. हे बाकी खरे!

    ReplyDelete
  8. भीमनी घंटी खूप आवडली, मलाही सुरुवातीला घंटाच वाटली होती. भाषांची सरमिसळ मजेदार आहे. अशी असंख्य स्थानं अनेकांना स्वप्न पहायचं बळ देत असतील हे खरंच!

    ReplyDelete
  9. आपण भाषा जितके मोठे झाल्यावर शिकू, तेवढा बहुतेक हा भाषिक गोंधळ वाढतो. कारण आपली संदर्भाची भाषा - म्हणजे मातृभाषा - तोवर विचारप्रक्रियेत रुजलेली असते पक्की.

    ReplyDelete
  10. इनुकशुक बद्दल अधिक माहिती इथे आहे.
    पुरातन काळचे रस्त्याकडेचे 'साईनबोर्डस' असावेत हे, या दिशेने जात राहा, हा रस्ता योग्य आहे, अशा बेसिक गोष्टी सांगण्यासाठी उभे केले गेले आहेत.

    ReplyDelete
  11. इनिगोय, तुम्ही दिलेली लिंक रोचक आहे. इतिहासात मानवी समाज कसे एकमेकांशी जोडले गेले असतील हा विचार करण अनेकदां रंजक असत. की मानवाच्या आदिम प्रेरणा एकसारख्याच असतात? माहिती नाही. वाचलं पाहिजे या विषयावर अजून!

    ReplyDelete
  12. मानवाच्या आदिम प्रेरणा हा पुष्कळसा अनुभूतीच्या पातळीवर समजता येण्यासारखा विषय वाटतो. आणि म्हणून त्याबद्दल जास्त कुतूहल वाटतं. कारण या संदर्भातली निरीक्षणं आणिक निष्कर्ष
    प्रत्येकालाच "दो दुनी चार" हे समजावं तितक्या सहजतेने समजतीलच असं नाही. असे अनुत्तरित प्रश्न मेंदूचा एक कोपरा कायम अडवून ठेवतात एवढं मात्र खरं.
    गाभ्यात एक असूनही व्यक्त स्वरूपात इतका विविधांगी असल्यानेच का माणसाने सगळे गुंतागुंतीचे करून ठेवले आहे?
    (हा तसलाच एक प्रश्न!)

    ReplyDelete
  13. इनिगोय, माणसाने खरचं गुंतागुंत केली आहे की ही गुंतागुंत आहेच - हाही एक प्रश्न माझ्या मनात! आदिम काय अगदी आधुनिक प्रेरणांबद्दलचीसुद्धा आपली समज कसकशी बदलत जात हे पाहाणही मनोरंजक असत. मला वाटत त्यानिमित्ताने आपण स्वत:लाच शोधत असतो.

    ReplyDelete