ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, April 15, 2013

१६३. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १०. व्यावहारिक वेदान्त

भाग ९ 

विवेकानंद हे मुळात एक लोकशिक्षक असल्याने तात्त्विक चर्चेत, केवळ पारलौकिकाविषयीच्या शब्दच्छलात त्यांना अजिबात रस नव्हता हे आपण यापूर्वीच्या प्रकरणात पाहिले आहेच. पण नीट पहिले तर असे दिसते की वास्तवात मात्र त्यांनी वेदान्ताचाच प्रसार केला आहे. 'प्रत्येक जीव अव्यक्त ब्रह्म आहे हेच स्वामीजींच्या गीताचे ध्रुवपद आहे.

वेदान्त तत्त्वज्ञान म्हणून उच्च असेलही; पण वेदान्ताच्या शिकवणुकीमुळे (त्याबाबतच्या आपल्या समजामुळे) आपल्यापुढे अनेक व्यावहारिक प्रश्न निर्माण होतात. सगळेच जर ब्रह्म असतील तर मग चांगले-वाईट, खरे-खोटे सारे काही ब्रह्माच्याच इच्छेने होत आहे!  त्यात मानवाने करण्यासारखे काय आहे – काही आहे का नाही - असा प्रश्न स्वाभाविकपणेच मनात येतो. माणूस आणि पाषाण यांत काहीच फरक न करणारी ही तथाकथित वेदान्ताची विचारसरणी कोणाला जर अत्यंत भयावह वाटली तर त्यात काहीच नवल नाही. म्हणून मग अशा प्रकारच्या तत्त्वज्ञानावर आपली सर्वसाधारण प्रतिक्रिया असते की - 'तत्त्व म्हणून हे सारे ठीक आहे. पोटभर खाणे झाल्यानंतर आणि उद्याची चिंता नसल्यावर घरात आरामशीर बसून बोलायला हे असले विषय ठीक आहेत. प्रत्यक्ष रोजच्या जगात मात्र त्याप्रमाणे वागून चालत नाही, व्यवहार पाहावाच लागतो. तात्पर्य? वेदान्त तत्त्वज्ञान म्हणून कितीही उच्च प्रकारचे असले तरी ते व्यावहारिक मात्र नाही असे सर्वसाधारण मत आढळून येते.

विवेकानंदांना अर्थातच आपले हे मत अमान्य आहे. ते म्हणतात, वेदान्त दर्शन पूर्णपणे व्यवहार्य आहे. त्याच्या आस-याने जीवन जगणे व घडविणे शक्य आहे, अगदी शक्य आहे. सर्वात आधी आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती ही की वेदान्ताची तत्त्वे काही अरण्यात जन्माला आलेली नाहीत. सर्वसंगपरित्यागी संन्याशांना नव्हे तर राज्याच्या व्यवस्थेत, प्रजेच्या रक्षणात गुंतलेल्या क्षत्रियांना ब्रह्मज्ञान प्रथम झाले. त्यांनी नंतर ते पुरोहितांना शिकविले. यातील कितीतरी सिद्धान्त अरण्यवासात, एकान्तात जन्मलेले नसून, ज्यांची जीवने सर्वात जास्त गडबडीची आणि धकाधकीची असणे स्वाभाविक होय अशा सिंहासनाधिष्ठीत सम्राटांनी जगाला त्याचे दान दिलेले आहे.

श्रीमद्भगवद्गीता तर कुरुक्षेत्रावर युद्धाच्या धुमश्चक्रीच्या वातावरणात सांगितली गेली आहे. (युद्धप्रसंगी हे तत्त्वज्ञान सांगायला-ऐकायला वेळ असतो का अशी शंका काहीजण घेतात, त्यावर बोलता येईल पण इथे नको!) आपण काय जनक, अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यापेक्षा कार्यव्यस्त आहोत काय? धकाधकीच्या जीवनात जर हे लोक वेदान्त तत्त्वज्ञानाचे आचरण करु शकले तर आपल्यासमोरच अशी काय मोठी अडचण आहे? आपल्यावर ना त्यांच्याइतका कामाचा ताण आहे, ना आपल्याला लाखो लोकांचे जीवन ज्यावर अवलंबून आहेत असे निर्णय घ्यायचे आहेत. मग का नाही आपण वेदान्त जगू शकत?

हं! आता एक मात्र खरे की वेदान्ताचा आदर्श आपल्या आदर्शाच्या कल्पनेपेक्षा फारच उच्च दर्जाचा आहे. एखाद्या माणसाने दिलेली वेळ पाळली, पत्राचे उत्तर लगेच दिले, शासकीय कार्यालयातील माणसाने वेळेत काम केले, रिक्षात विसरलेले पैशांचे पाकीट प्रामाणिकपणे परत केले अशा घटनांचे आणि लोकांचे कौतुक वाटावे अशी सध्याची स्थिती  आहे. आपण जर आपले आदर्श तपासायला गेलो, तर आपल्या असे लक्षात येईल की, जे आपल्या सोयीचे असते तेच आपल्याला व्यवहार्य वाटते. जे काही आपल्या गैरसोयीचे असेल, त्यावर लगेच आपण अव्यवहार्यतेचा शिक्का मारुन मोकळे होतो! चोराला चोरीइतके व्यवहार्य दुसरे काहीच वाटत नाही हे आपण लक्षातच घेत नाही. व्यवहार्यतेचा हा मुददा अतिशय सापेक्ष आहे हे आपण विसरता कामा नये.

मानवी मनाच्या या दुबळेपणाची, स्वार्थी प्रवृत्तीची जाणीव विवेकानंदांना नाही - असे कसे होईल? ते स्पष्टपणे सांगतात की, एक गोष्ट मी तुमच्या मनावर बिंबवू इच्छितो की, वेदान्त हा पूरेपूर व्यवहार्य असला तरी तो या असल्या सर्वसाधारण अर्थाने नव्हे. वेदान्त आमच्यापुढे एखादाही अव्यवहार्य आदर्श ठेवत नाही. आणि त्याचबरोबर शंभर टक्के व्यवहार्य असूनही वेदान्ताचा आदर्श हा 'आदर्श होण्याइतका उच्चही खासच आहे.

माणसाची एक स्वाभाविक प्रवृत्ती अशी असते की, अवघड गोष्टी सोप्या करुन घ्यायच्या. या प्रक्रियेत सोय होते खरी पण मूळ तत्व अथवा नियम शिथिल होतो. ‘सोपे द्या अन्यथा आम्ही करणार नाही’ (शुद्धलेखनाचे नियम माफ असले की कसे बरे वाटते!) ही एक सार्वजनिक प्रवृत्ती आहे. कुणाला ‘क्ष’ ही गोष्ट अवघड वाटेल तर दुस-या कुणाला ‘य’ ही गोष्ट – तो भाग वेगळा.

आपल्या स्वभावातील या उणीवेवर विवेकानंदांनी नेमके बोट ठेवले आहे. आदर्शाला खाली खेचू नका, तर तुम्ही स्वत: त्या आदर्शाइतके उन्नत व्हा असे त्यांचे आपल्याला कळकळीचे सांगणे आहे. वेदान्ताचा आदर्श व्यवहारात चालणार नाही असे तुम्ही का म्हणता? तुमचा व्यवहार तुम्ही वेदान्तातील आदर्शाप्रमाणे ठेवा. भोवतालचे जग कसेही असो, तुम्ही तुमच्या आदर्शानुसार जगा. भर्तृहरी त्याच्या नीतिशतकात म्हणतो,
निन्दन्तु नीतिनिपुणा: यदि वा स्तवन्तु।
लक्ष्मी: समविशतु गच्छतु वा यथेच्छम।
अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा ।
न्यायात पथ: प्रविचलन्ति पदं न धीरा:।।
(कोणी निंदा करो अथवाच स्तुती, लक्ष्मी येवो अथवा जावो, मरण समोर असेल वा युगांतराने, साहसी लोक न्यायाचा मार्ग सोडत नाहीत – म्हणजे ते आपले आदर्श कधी खाली आणत नाहीत)

याप्रमाणे वागणे तुम्हाला जमले की, तुमचा-आमचा व्यवहार आदर्श होऊन जाणार!

आपला आदर्श आपल्याला व्यवहार्य का वाटत नाही? कारण तशी आपल्या मनात इच्छा नाही म्हणून! एखाद्या खेळाडूकडे/गायिकेकडे पहा. त्या विशिष्ट खेळात/गायनात प्राविण्य मिळविण्याची त्याची किंवा तिची इच्छा असली की त्या व्यक्तीकडून केवढी मेहनत घेतली जाते! अशी व्यक्ती किती प्रकारच्या मोहांवर मात करते! पहाटे पाच वाजता उठून मैदानावर पळणे, विशिष्ट अन्नपदार्थांचे सेवन टाळणे अशा गोष्टी तुम्हा-आम्हाला अव्यवहार्यच वाटतात. पण विशिष्ट ध्येय समोर असणारी व्यक्ती मात्र इतरांना कितीही कठीण वाटले तरी त्यांचे आदर्श आचरणात आणतातच.

विवेकानंद म्हणतात, आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी अधिक सवड आपल्याला आहे असे आपल्यापैकी बहुतेकांना आढळून येईल. प्रश्न वेळेचा नसतो, प्रश्न असतो वेळेचा सदुपयोग करण्याच्या इच्छेचा! खरोखरच इच्छा असेल तर, आपल्याला जी  सवड आहे तीत एकच काय पण असले पंचवीस आदर्श आपण याच जीवनामध्ये प्रत्यक्ष आणू शकू. इच्छा मात्र हवी. पण काही झाले तरी आपल्या आदर्शाला खाली खेचणे मात्र उचित् नाही.

वेदान्ताने सांगितलेल्या सत्याचा अनुभव प्रत्येकाला येणे शक्य आहे, असे विवेकानंद आवर्जून सांगतात. वेदान्त तत्त्वज्ञान काही निवडक लोकांसाठी मुळीच नाही; ते सर्वांसाठी आहे, ते सर्वसमावेशक आहे. वेदान्त तत्त्वज्ञान कोणालाही कमी लेखत नाही; कोणाचाही तिरस्कार करीत नाही;  कोणालाही नाकारत नाही. माणूस पापी आहे आणि तो हळूहळू पवित्र होत जातो अशी कल्पना वेदान्ताला मान्य नाही. जो मूळचा पापी आहे, तो पवित्र होईलच कसा? आपण पवित्र होऊ शकतो याचा अर्थ असा की, आपण सारे मूलत: पवित्रच आहोत. अज्ञानाने आपण स्वत:ला दुबळे अथवा पापी म्हणवून घेत आहोत. पण वस्तुत: आपण सारे ‘सच्चिदानंद’ स्वरुप आहोत.

अर्थात वेदान्ताचे ध्येय व्यवहार्य जरी असले तरी सोपे मात्र नाही. कोठल्याही ध्येयाप्रत जायचे म्हणजे, काही ना काही त्याग करावाच लागतो. पण आपली गंमत अशी आहे, की हातातले काहीही न सोडता आपल्याला उच्च ध्येयाचा लाभ हवा असतो. ध्येयप्राप्ती ही काही लोकांसमोर, बाहेरच्या जगात मिरवण्याची गोष्ट नाही याचा आपल्याला सोयिस्करपणे विसरच पडलेला असतो. आपल्या आजच्या वागणुकीशी जुळेल असा सिद्धान्त आपण 'सोळा आणे व्यवहार्य म्हणून लगेच स्वीकारतो. पण ध्येयासाठी कोणी आपल्याला एक कप चहा कमी करायला सांगितला तर आपली पहिली प्रतिक्रिया असते - ' नको रे बाबा! कोणी सांगितले आहे इतका अवघड आदर्श ठेवायला? आम्ही आपले आहोत तेच आणि आहोत तसेच बरे आहोत!

इंद्रियांच्या दुर्बलतेचे समर्थन करणारा आदर्श आपल्याला व्यवहार्य वाटतो. पण 'इंद्रियांचे गुलाम असण्यात कसला आलाय आदर्श? - असा विचार आपण कधीही करत नाही. विवेकानंद सांगतात, जे संप्रदाय भोग आणि भगवान यांची सांगड घालण्याचा, त्या दोघांचा मेळ बसविण्याचा कधीच प्रयत्न करत नाहीत, त्यांचीच उन्नती होत असते. जे मिलाफ साधतात, त्यांचा -हास नक्की आहे.

आपल्या शरीरात जर एखाद्या रोगाने प्रवेश केला, तर त्याचा नुसता विचार करुन काय उपयोग?  त्यावर काहीतरी औषध घेणे हाच खरा उपाय आहे. एक गोष्ट आपण जरुर समजावून घ्या की,  वेदान्ताचा ईश्वर काल्पनिक नाही. तो अनेकांना प्रत्यक्ष दिसलेला आहे. तो अनेकांचा अनुभव आहे. आणि ज्याअर्थी मानवी जाणीवेच्या प्रांतात या अनुभवांची नोंद झाली आहे, त्या अर्थी प्रत्येक मानवाला कधी ना कधी हा अनुभव येणारच आहे.

वेदान्ताला व्यावहारिक वेदान्त असे नाव स्वामीजी का देतात हे आता आपल्या लक्षात आलेच असेल. या वेदान्ताचे मुख्य सूत्र म्हणजे 'आत्मविश्वास! आपल्या पुराणातील तेहतीस कोटी देवांवर आणि परकीयांनी आपल्यात घुसवलेल्या आणखी देवदेवतांवर तुमचा विश्वास असेल, पण स्वत:च्या ठायी मात्र अविश्वास असेल, तर तुमच्या नशीबी मुक्ती लिहिलेली नाही. आधी स्वत:वर श्रद्धा ठेवा. त्या श्रद्धेच्या शिळेवर दृढपणे उभे रहा. सामर्थ्यसंपन्न व्हा! आजची आवश्यकता जर काही असेल तर ही आहे! आजची काळाची ही गरज वेदान्त पूर्ण करु शकतो.

आपल्या आदर्शांच आपण सतत चिंतन केले पाहिजे. 'आत्मा वा अरे श्रोतव्य: मन्तव्य: निदिध्यासितव्य: असे उपनिषदांनी सांगितलेले आहेच. आपण त्याचे अनुसरण केले पाहिजे. मग पाहा, आपल्याभोवतालचे जग कसे बदलून जाते ते! 'जशी दृष्टी, तशी सृष्टी अशी जी म्हण आहे त्यात तथ्य आहेच. सृष्टी बदलण्याचे काम अवघड आहे, पण आपली दृष्टी मात्र आपण बदलू शकतो. हे काम अगदी सोपे आहे अशातला भाग नाही, अशक्यप्राय मात्र नक्कीच नाही!

'आपण सारेच स्वरुपत: ईश्वर आहोत अशा म्हणण्याने जगात नुसता गोंधळ माजून जाईल अशी भीती काही लोकांना वाटते. कोणी काहीही करेल आणि त्याचे उत्तरदायित्व मात्र ईश्वरावर टाकेल अशी एक शक्यता या विचारामुळे निर्माण होते. विवेकानंदांना वाटते की, होऊ दे असला गोंधळ! नाहीतरी आम्ही पापी आहोत, आम्ही सैतान आहोत असा घोष करुन जगाचे काय भले झाले आहे? यापेक्षा जगाचे आणखी काय वाईट होणे बाकी राहिले आहे? मग मी ईश्वर आहे असे म्हणताना लोक निदान सत्याच्या निकट तरी असतील. म्हणून भयाचे काहीच कारण नाही.

वेदान्तधर्म सर्वसमावेशक असल्याने भांडणांना, तंटाबखेडयांना येथे अजिबात जागा नाही. निर्गुण  ईश्वराच्या उपासकांपेक्षा सगुण ईश्वराच्या उपासकांनी जगावर जास्त युद्धे लादली आहेत हे विवेकानंद आपल्या लक्षात आणून देतात. वेदान्तधर्मानुसार जर आपण सारेच आचरण करु, तर मग जगात युद्धांना आणि तंटाबखेडयांना जागाच उरणार नाही, सर्वत्र शांतीचे साम्राज्य प्रस्थापित होईल असे विवेकानंदांचे मत आहे. जगाच्या भल्यासाठी आणि स्वत:च्या विकासासाठी आपण वेदान्तधर्माचे पालन करणे आज खरोखरच 'व्यवहार्य ठरेल  यात शंकाच नाही!

छांदोग्य उपनिषदातील सत्यकाम जाबालाची कथा आपणा सर्वाना ठावूक असेल. या बालकाला अग्नीने, क्षाने, वृषभाने ब्रह्मज्ञान दिले असा पुढील कथाभागात उल्लेख आहे. यातील कथेचा भाग सोडला तर तात्पर्य असे निघते की, सर्व ज्ञान हे अंतरंगातच असते आणि बाहय कालादि निमित्तांनी, कारणांनी त्या ज्ञानाची आपल्याला जाणीव होते इतकेच! ज्ञानविषयक वेदान्ताचे हे व्यवहार्य सूत्र आपण लक्षात घेतले तर आजच्या शिक्षणक्षेत्रातील आपल्या ब-याचशा समस्यांचे निराकरण होईल – निदान शक्यता तरी वाढेल.

वेदान्तमत हे जग मिथ्या – खोटे - असल्याचे सांगते असा आपला एक समज आहे. विवेकानंद वेदान्ताची जगत्’विषयक भूमिका फार चांगल्या त-हेने मांडतात. ते म्हणतात, 'वेदान्त जग उडवून देत नाही, तर तो त्याचे स्वरुप खरोखर काय आहे हे स्पष्ट करुन सांगतो. वेदान्त 'मी चा नाश करत नाही, तर खराखुरा 'मी कोणता हे दाखवून देतो. हे जग व्यर्थ आहे, त्याला अस्तित्व नाही असे वेदान्त म्हणत नाही. वेदान्त एवढेच म्हणतो की, हे जग खरोखर काय आहे ते जाणून घ्या म्हणजे तुमचे ते अनिष्ट करु शकणार नाही,  तुम्हाला ते घायाळ करु शकणार नाही.

विवेकानंदांचे हे विचार वाचल्यावर वेदान्त आणि जीवन हातात हात घालून चालू शकतात अशी आपली नक्कीच खात्री पटली असेल! 

क्रमश:

2 comments: