ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, March 3, 2018

२५२. म्यानमा डायरी: १: बसप्रवास


जून २०१६ पासून मी म्यानमामध्ये (Myanmar) राहते. इथल्या वास्तव्यातल्या या काही नोंदी. या नोंदी विस्कळीत आहेत, कालानुक्रमानुसार नाहीत.
**************
या देशातला हा काही माझा पहिला बसप्रवास नव्हता. गेल्या दीड वर्षात कामानिमित्त अनेक प्रवास बसने केले, काही प्रवास भटकंतीसाठी केले. पण या प्रत्येक प्रवासात माझ्या स्थानिक सहकारी माझ्यासोबत असायच्या. त्यामुळे भाषेचा प्रश्न मला कधी आला नाही.
आजचा बसप्रवास मात्र वेगळा होता. मी कया (Kayah) राज्यात बसने निघाले होते आणि माझ्यासोबत होती माझी एक ब्रिटिश सहकारी. आम्हा दोघींचही बर्मी (म्यानमार) या स्थानिक भाषेचं ज्ञान अगदी कामचलाऊ. पण बसचं तिकिट काढलंय, लॉयकॉ (Loikaw) मध्ये यांगोंच्या मैत्रिणीने हॉटेल बुकिंग करून ठेवलंय, तिथल्या टूरिस्ट गाईडशी फोनवर बोलणं झालंय, त्यामुळे काही अडचण येण्याची शक्यता नाही असं समजून मी निर्धास्त होते.
बस सकाळी सहा वाजता सुटणार होती. साडेपाचला पोचा बरं का नक्कीअसं तिकिट देणाऱ्याने बजावून सांगितलं होतं. पाचेक घरं पलीकडं राहणाऱ्या टॅक्सीचालकाला दोन दिवस आधी सांगून आणि आदल्या रात्री आठवण करून देणारा निरोप देऊन झालं होतं. पहाटे चारला उठून, आवरून, ठरल्याप्रमाणे पाच वाजता आम्ही टॅक्सीची वाट पाहू लागलो, पण टॅक्सीचालकाचा काही पत्ता नव्हता. मग फोन केला तर तो उचलला गेला नाही. टेबलावरच्या कागदपत्रांतून त्याचा दुसरा नंबर शोधून काढला, पण तिथंही प्रतिसाद नाही. मग माझी मैत्रीण सायकलवर त्याच्या घरी गेली आणि तिच्या मागोमाग तो हजर झाला.
साडेपाचच्या मानाने बसस्थानकावर बऱ्यापैकी गर्दी होती. मग लोकांना विचारत विचारत हिंडत असताना एका ट्रॅवलर टेम्पोच्या छतावरून एकाने ओरडून सांगितलं - लॉयकॉवाले इकडं या. दहा आसनी वाहन पाहून 'आता पुढचे सात तास आपण कसा प्रवास करणार' असा मनात आलेला प्रश्न न उच्चारता सामान टपावर चढवून आम्ही आतमध्ये बसलो.
साधारणपणे पंचेचाळीस मिनिटांनी गाडी थांबली आणि गाडीतले सगळे खाली उतरले. टपावरचं सामान काढायला लागले. मग मीही उतरून चौकशी केली तर कळलं की इथल्या मोठ्या बसस्थानकावरून मोठी बस जाणार आहे. मग सामान या टपावरून त्या टपावर स्थानांतरित झालं, तिकिटं तपासून झाली. तिकिटं तपासणाऱ्या मुलीने दोन खुर्च्या आणून दिल्या आणि आम्हाला बसायला सांगितलं.
अर्धा तास बसून राहिल्यावर आम्ही कंटाळलो आणि इकडंतिकडं हिंडायला लागलो. तर आमच्या बसमध्ये पानांच्या (खायच्या पानांच्या) मोठ्या टोपल्या चढवल्या जात होत्या.

                          

एक बस आली, दुसरी आली, तिसरी आली तरी टोपल्या काही संपत नव्हत्या. दरम्यान बसचालकाशी थोड्या गप्पा मारून झाल्या. अखेर एकदाची आठ वाजता आमची बस निघाली.
रस्ता सुंदर होता. एका बाजूला डोंगररांगा, दुसऱ्या बाजूला दरी, मध्येच दिसणारी चिमुकली गावं .. असं सगळं स्वप्नवत चाललं असताना अचानक बस थांबली. पुढचे काही प्रवासी उतरले. मागच्या प्रवाशांच्या आपापसातल्या बोलण्यावरून बसमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे इतपत आम्हाला समजलं आणि पाय मोकळे करायला आम्हीही उतरलो. आमची बस जिथं बंद पडली होती, तिथं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना केळीच्या बागा होत्या.

एक स्त्री हिरव्या केळ्यांचे घड वरून तोडून आणून ठेवत होती. ते पुरेसे साठले की एक पुरूष मोटरसायकलवर दोन्ही बाजूंना टांगलेल्या बास्केटमधून ते घेऊन जात होता.

आमचा वाहनचालक आणि त्याचा साहाय्यक मोबाईलवर बोलत होते, गाडीत जाऊन काहीतरी खटपट करत होते आणि पुन्हा मोबाईलवर बोलत होते. सगळे प्रवासी शांतपणे उकिडवे बसले होते. वेळ जसजसा जास्त लागत गेला, तसतशी प्रवाशांनी फक्त सावली शोधली. कुणीही वैतागलेलं दिसत नव्हतं, कुणाचाही चेहरा त्रासिक नव्हता, बस कंपनीवर कुणीही तोंडसुख घेत नव्हतं. लहान मुलं शांतपणे खेळत होती. लोक गप्पा मारत होते.

घड्याळाचे काटे पुढं सरकत होते. अर्ध्या तासाचा एक तास झाला. एका तासाचे दोन तास झाले तरी दृश्य तेच होतं. मोबाईलवर बोलून गाडीत खटपट करून परत मोबाईलवर बोलणारे चालक आणि साहाय्यक, शांतपणे उकिडवे बसून बस दुरूस्त होण्याची वाट पाहणारे प्रवासी. येणारी-जाणारी इतर वाहनं जुजुबी चौकशी करत होती. एक-दोघा वाहनचालकांनी थांबून मदतीचा अयशस्वी प्रयत्न केला.
उन्हाला कंटाळून आम्ही बसमध्ये येऊन बसलो. तर तेवढ्यात एक बस येऊन थांबली आणि आमच्या बसमधले काही प्रवासी पळतपळत तिकडं गेले. आम्हीही उतरलो. ती लॉयकॉच्या दिशेने जाणारी दुसरी बस होती. आमच्या बसमधल्या प्रवाशांनी ती पुढं असणाऱ्या एका उपाहारगृहापर्यंत सोडायला तयार होती. पण लक्षात आलं की त्या बसमध्ये जागा नसल्याने आमच्या बसमधले प्रवासी तिच्या टपावर चढून बसले होते. आमच्यासाठी त्या बसमध्ये जागा नसल्याने आम्ही परत फिरलो.
दोन छोट्या मुली माझ्या मागच्या सीटवर होत्या. आजीबरोबर त्या लॉयकॉला चालल्या होत्या. त्यांच्याशी मोडक्यातोडक्या बर्मीत गप्पा मारायचा प्रयत्न केला. परीक्षा संपून शाळांना सुट्टी लागल्याचं त्यातून समजलं. त्यातली एक लहानगी हुषार होती. तिने मला एबीसीडी म्हणून दाखवलं, माय नेम इज .. असं म्हणत स्वत:चं नाव सांगितलं. बमासगा तै खेटे (बर्मी भाषा फार अवघड आहे) असं मी म्हणताक्षणी ती उस्फूर्तपणे इंग्लेसगा तै खेटे(इंग्रजी भाषा फार अवघड आहे) म्हणाली तेव्हा हसू आलं. तिला अर्थात कया भाषा जास्त आवडते. कयापेक्षा बर्मी अवघड आहे असं तिचं मत होतं. ते ऐकताना राज्यभाषा आणि मातृभाषा याबाबत आपल्याकडं लोकांच्या मनात असणारा गोंधळ आठवला.

बसच्या दारावर मिस्टर बीनचं चित्र होतं. त्या मुलींना बीनचं नाव बरोबर सांगता आलं आणि बीनचं नाव काढताच त्या खुदुखुदू हसायला लागल्या होत्या. म्यानमामध्ये लहान मुला-मुलींमध्ये मिस्टर बीन फार लोकप्रिय आहे. माझ्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांची मुलं-मुली (शाळेला सुट्टी असल्याने) आईसोबत कार्यालयात येतात. तीही मोबाईलवर मिस्टर बीन पाहताना मस्त हसत असतात.
दोन मुलींनी झाडाच्या सावलीत जाऊन आपला डबा उघडला. बसचालक आणि त्याच्या साहाय्यकालाही त्यांनी डब्यातला खाऊ दिला. मी सकाळी सातपासून बघत होते तो साहाय्यक तर उभाच होता. एक मिनिटही तो बसला नव्हता आणि सतत धावपळ करत होता.
आणखी एक वाहनचालक मदतीला आल्यावर आमची बस सुरू झाली. आणि दहाच मिनिटांत पुन्हा थांबली. पुन्हा काही काळ खटपट सुरू झाली आणि अर्धा तास बस मस्त चालत होती. आता किती वाजता आपण लॉयकॉला पोचू याचा हिशोब करेतोवर बस पुन्हा थांबली. पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या उपाहारगृहात गेलो. आमच्या बसमधले दोन तासांपूर्वी इथं येऊन बसलेले प्रवासी जणू काही आपले नातेवाईक घरी आलेत अशा थाटात आमच्या स्वागताला उभे राहिले. कोणी मेन्यूकार्ड आणून दिलं, कोणी गरम चहा आणायला गेलं (इथल्या उपाहारगृहांमध्ये ग्रीन टी कायम टेबलावर असतो आणि तो मोफत असतो, कितीही कप पिता येतो). आम्ही पोटपूजा उरकली. एकेक प्रवासी आणि उपाहारगृहांमधले मालक-कर्मचारी आमच्याशी येऊन बोलत होते. त्यांच्याशी बोलताना लक्षात आलं की इंग्रजी भाषा न जाणणाऱ्या समुहामध्ये कोणाही अनुवादकाच्या मदतीविना मी घालवत असलेला हा पहिलाच दिवस होता.
एव्हाना दुपारचा एक वाजून गेला होता, तरी सहप्रवासी शांतच होते. माझी सहकारी ब्रिटिश आहे, ती म्हणाली, ‘’एव्हाना आमच्या देशात पोलीस येऊन सर्वांना घेऊन गेले असते, इथं मात्र काही सपोर्ट व्यवस्थाच नाहीये’’. लोकांच्या शांत असण्यावर आम्ही बरीच चर्चा केली आणि या निष्कर्षाप्रत आलो की माणसांना जेव्हा पर्याय उपलब्ध असतात तेव्हा माणूस ते शोधण्याची धडपड करतो. इथल्या सर्वसामान्य गरीब माणसांकडं तिकिटाचे पैसे गेले वाया तर जाऊदेत, आपण दुसरी बस पकडून जाऊ असं म्हणण्याइतपत जास्तीचा पैसा नसतो. मी आणि माझी मैत्रीण असे पैसे खर्च करायला (आणि पर्यायाने वेळ वाचवायला) तयार झालो असतो, पण पर्याय कुठं होता? मागच्या तीन तासांत लॉयकॉच्या दिशेने फक्त एक बस गेलो होती, तीही भरलेली होती. मग आम्हीपण काही न करता निवांत बसलो. एवीतेवी चार दिवस सुट्टी होती म्हणून तर लॉयकॉला चाललो होतो. इथल्या लोकांमध्ये मिसळायचं होतं म्हणून तर बसने चाललो होतो. मग आम्ही अगदी बर्मी लोकांप्रमाणे निवांत बसलो. त्यांच्यासारखं तासन् तास उकिडवं बसता येत नव्हतं म्हणून आधी बसमध्ये आणि मग उपाहारगृहांतल्या खुर्चीवर बसलो, इतकाच काय तो फरक.
आम्ही अजिबात कटकट न केल्याचा एक फायदा झाला तो म्हणजे सगळे प्रवासी आमच्याशी मस्त गप्पा मारायला लागले. आमच्या 'फॉरिनरपणाचं' त्यांच्यावरचं दडपण थोडं कमी झालेलं दिसत होतं. आम्ही कोण आहोत, कुठून आलो, घरी कोणकोण असतं, इकडं काय काम करतो, लॉयकॉत काय करणार, अमुक पया (पगोडा)ला जाणार का .... वगैरे सगळ्या चौकशांना आम्ही अनेकदा उत्तरं देऊन झाली. परके लोक आपली भाषा बोलायचा प्रयत्न करताहेत हे पाहून लोक हरखले होते. मग त्यांच्यातले काहीजण एखादा-दुसरा इंग्रजी शब्द बोलायचे, आणि बाकी सगळे त्यावर हसायचे अशी एकंदर धमाल चालू होती.
बघताबघता दुपारचे अडीच वाजले. म्हणजे गेले साडेपाच-सहा तास आम्ही रस्त्यावरच होतो. एकदाची बस सुरू झाली आणि आमचा प्रवास सुरू झाला. पंधराएक मिनिटांनी बस पुन्हा थांबली. दोन लोक बसमध्ये चढले, त्यांनी परत काहीतरी खटपट केली. मग चाक त्या नव्या माणसाने ताब्यात घेतलं आणि आमच्या जुन्या चालकाची रवानगी कारमध्ये झाली. ही कार आमच्या बसच्या मागोमाग येत राहिली.
पाच वाजता चहा प्यायला एके ठिकाणी थांबलो तेव्हा आमच्या बसच्या चालकाने सांगितलं की हे नवे चालक त्यांच्या कारने आम्हाला लॉयकॉतल्या आमच्या हॉटेलमध्ये सोडतील. रात्री उशिरा अनोळखी शहरात टॅक्सी कुठं शोधायची हा आमचा प्रश्न मग मिटला. गप्पा मारताना कळलं की हे नवे चालक म्हणजे प्रत्यक्षात बसचे मालक होते. बस बंद पडल्याचं कळल्यावर लॉयकामधून कारने पाचेक तासांचा प्रवास करून ते मदतीला आले होते.
लॉयकॉचा रस्ता म्हणजे डोगंरातला चढ-उताराचा रस्ता होता. तो संपल्यावर मालकांनी वाहनचालकाच्या ताब्यात बस दिली. चला, बसा कारमध्ये. तुम्हाला मी हॉटेलमध्ये सोडतोअसं ते म्हणाल्यावर आम्ही सामान उचलून कारमध्ये बसलो. मला आधी वाटलं की पंधरा-वीस किलोमीटर फक्त बाकी असतील, प्रत्यक्षात साठ-सत्तर किलोमीटरचा रस्ता बाकी होता. कारने आलो म्हणून मग आम्ही आठ वाजता तरी लॉयकॉत पोचलो, बसने आलो असतो तर बहुतेक दहा-साडेदहा झाले असते.
या बसमालकालाही इंग्रजी येत नव्हतं, पण आम्ही भरपूर गप्पा मारल्या. आमचा लॉयकॉत काय करायचा बेत आहे हे त्यांना जाणून घेतलं. तीन दिवसांनी परत जायचं आहे, पण तिकिट नाही म्हटल्यावर त्यांनी लगेच एक फोन फिरवला आणि रविवार सकाळच्या बसमध्ये दोन जागा आरक्षित केल्या. पहाटे साडेसहाला हीच कार तुम्हाला घ्यायला येईल असं त्यांनी आपणहोऊनच सांगितलं. तिकिटाच्या पैशांसंबंधी विचारणा केल्यावर बसमध्ये बसल्यावर द्याअसं म्हणाले. वाटेत एके ठिकाणी त्यांनी आमच्यासाठी संत्री आणि पाण्याच्या बाटल्या खरेदी केल्या. काही गरज लागली तर मला फोन करा म्हणत त्यांनी स्वत:चं कार्डही दिलं. हॉटेलमध्ये पोचल्यावर कारच्या प्रवासाचे पैसे देऊ केले तर त्यांनी ते घेतले नाहीत.
पहाटे पाचपासून ते रात्री आठपर्यंत असे अठरा तास म्यानमामधल्या सर्वसामान्य नागरिकांचं जे दर्शन झालं ते चकित करणारं होतं. इथले लोक नेहमीच मैत्रीपूर्ण वागतात, मदतीला तयार असतात हे माहिती होतं, अनुभवलं होतं अनेकदा यापूर्वीही. तरीही आज त्यांच्याबरोबर घालवलेला हा मोठा दिवस बरंच काही शिकवून गेला. एखाद्या समाजाची संस्कृती पुस्तकांत किंवा देवळांत नसते, तर ती त्या समाजाच्या रोजच्या जगण्यात असते हे पुन्हा एकदा लक्षात आलं.
आता मी पुढच्या बसप्रवासासाठी उत्सुक आहे. 

15 comments:

  1. Kshipra Kankariya: Beautiful experience captured by a sensitive author!

    ReplyDelete
  2. Seema Ajgaonkar: मस्तच, तुझ्या बरोबर प्रवास घडला.

    ReplyDelete
  3. Interesting.

    Meera N.

    ReplyDelete
  4. Read. Very nice. I do agree that many alternatives make people more unstable.

    Shrinivas

    ReplyDelete
  5. Wonderful blog-post. Enjoyed the journey with you.
    Nutan

    ReplyDelete
  6. >संस्कृती पुस्तकांत किंवा देवळांत नसते, तर ती त्या समाजाच्या रोजच्या जगण्यात असते हे पुन्हा एकदा लक्षात आलं.
    So true nice post.

    ReplyDelete
  7. Rohini Govilkar: बढिया बस प्रवास! आपल्या अरूणाचलची आठवण आली. म्यानमार अनुभवांचही पुस्तक निघूदे ही सदिच्छा.

    ReplyDelete
  8. Sandhya Deopurkar: खूपच छान लिहिले आहे.

    ReplyDelete
  9. Preeti Karmarkar वा, प्रवासातला निवांतपणा अगदी जाणवला आणि म्यानमामधल्या सामान्य माणसांचा गोडवाही......

    ReplyDelete
  10. Vinayak Rao केवळ शब्दांमधून वास्तवाचा प्रत्यय देणाऱ्या तुमच्या लेखनाला सलाम..

    ReplyDelete
  11. "निवांत" प्रवासाचं सुंदर वर्णन!
    आपला हा शेजारी अगदीच अनोळखी आहे - अजून माहिती येऊ देत तिथल्या लोकांविषयी!

    ReplyDelete
  12. Ashlesha Hinge-deo: म्यानमार च्या अनुभवांच्या पुस्तकाच्या अपेक्षेत

    ReplyDelete
  13. निवांत बसचा प्रवास आम्ही पण लेख वाचताना अनुभवला. भाषा येत नसतानाही छान गप्पा मारता येतात हे छान रेखाटले आहेस. अप्रतिम लेखन.
    संध्या सुपनेकर

    ReplyDelete
  14. सुरेख लिहिलं आहेस नेहमीप्रमाणे.
    राज्यश्री

    ReplyDelete
  15. आपला ब्लॉग उत्कृष्ट वाटला.मराठी साहित्यातील काही अप्रतिम कालसुसंगत लेख,कथा आणि इतर साहित्य शोधून ते आम्ही आमच्या #पुनश्च या पोर्टलवर प्रसिध्द करतो. त्यासाठी १०० ते १५० व्र्षांपुर्वीचेही साहित्य आम्ही वाचतो आणि उत्तम निवडून वाचकांना पोर्टलवर देतो. नुकतीच मराठी ब्लॉगर्स साठी आम्ही एक अभिनव स्पर्धा जाहीर केली आहे. कुठलेही प्रवेशमुल्य नसलेल्या या स्पर्धेत तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर www.punashcha.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पर्धेबद्दल सविस्तर जाणून घेऊन भाग घ्या.

    ReplyDelete