ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, April 14, 2018

२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)
मागे कधीतरी मी तडिंजु' (Thadingyut) या म्यानमा पारंपरिक उत्सवाबाबत सविस्तर लिहिलं होतं. म्यानमामध्ये दर पौर्णिमेला काही ना काही धार्मिक महत्त्व असणारा कार्यक्रम असतोच. पण तडिंजुइतकाच महत्त्वाचा दुसरा सण म्हणजे तिंज्या’ (Thingyan). हा शब्द तिंज्या असा लिहिला जात असला तरी प्रत्यक्षात याचा उच्चार अनेक लोक तज्या असाही करतात.
बर्मी सण हे चांद्रगणनेनुसार असतात, त्यामुळे दरवर्षी ते एकाच तारखेला असत नाहीत- थोडे पुढेमागे होतात. पण साधारणपणे हा सण एप्रिल महिन्यात येतो. चार ते पाच दिवस हा सण असतो. जेव्हा सण पाच दिवसांचा असतो तेव्हा त्यातला एक दिवस बहुतेक भाकड असतो. या काळात पाचही दिवस सरकारी आणि अन्य कार्यालये बंद असतात. मागच्यावर्षीपर्यंत (२०१७) ही सुट्टी दहा दिवसांची असे. एनएलडी (National Democratic League) सरकारने मागच्यावर्षी ही सुट्टी कमी करण्याची योजना जाहीर केल्यावर शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली होती. अनेकांचे प्रवासाचे बेत खूप आधी ठरले होते आणि आयत्यावेळी सरकारी निर्णय आल्याने लोक नाराज झाले होते. सरकारने नमतं घेतलं आणि सुट्टी पूर्ववत दहा दिवसांची केली. २०१८ च्या दिनदर्शिकेत मात्र सरकारने पाचच दिवसांची सुट्टी जाहीर केली – त्यातही दोन दिवस शनिवार-रविवारचे गेले – आणि कर्मचाऱ्यांनी ते मान्यही केलं. १३ ते १७ एप्रिल या काळात २०१८ मधला तिंज्या महोत्सव आहे.
या उत्सवाला जलोत्सव’ (Water Festival) असंही म्हटलं जात. या काळात लोक एकमेकांच्या अंगावर पाणी फेकतात-टाकतात, म्हणून हा जलोत्सव. या सणाचा शेवटचा दिवस हा म्यानमा नववर्षाचा पहिला दिवस असतो. लाओस आणि थाईलँड देशांमध्येही अशाच प्रकारचा उत्सव Songkran नावाने साजरा होतो. संक्रमण या संस्कृत शब्दापासून Songkran हा शब्द आला असावा.
सणाच्या चार-पाच दिवस आधीपासूनच वातावरणनिर्मिती झाली होती. कार्यालयातल्या सहकारी डोक्यात पटाव (Padauk) ची फुलं माळून आल्या होत्या. (पटाव हे genus Pterocarpus मधलं एक झाड आहे.)एक दिवस तिंज्याचे खास पदार्थ मॉलोयोबा (Mont Lone Yay Baw – तांदळाच्या पीठाचे गोळे करून त्यात गूळ भरतात आणि तळतात – काहीसा मोदकासारखा पदार्थ) आणि माजिफ्योये  (चिंच पाण्यात उकळायची आणि त्यात गूळ घालायचा) कार्यालयात करून (आणि खाऊन) झाले.मग दुसऱ्या दिवशी आणखी काही पदार्थ दर तासादोनतासांनी येत राहिले. मी सध्या ज्या मंत्रालयात काम करते तिथं एकाच इमारतीत मंत्रालयाची अनेक खाती आणि उपखाती आहेत (Departments and Divisions.) मग प्रत्येक टीम इतर  सर्वांसाठी काही ना काही खाद्यपदार्थ बनवून पाठवत होती. एकूण उत्सवी वातावरण होतं.
सुट्टीच्या काळात नेपिडॉत (ही म्यानमाची राजधानी, सध्या मी इथं राहते) फारसं काही घडत नाही कारण बहुसंख्य सरकारी कर्मचारी आपापल्या गावी जातात. शिवाय नेपिडॉत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. कुठं जायचं तर टॅक्सीशिवाय पर्याय नाही आणि ती मिळेल याची काही खात्री नाही. यांगोंच्या शहरी गोंधळात मला जायचं नव्हतं. म्हणून मग मी कलौ (Kalaw – लो आणि लौ यांच्यामधला उच्चार) शहरात आले.
इथं मी मागच्या वर्षी एकदा कामानिमित्त येऊन गेले होते. ऐन मार्च महिन्यातली इथली हवा मला आवडली होती. ब्रिटिशांनी विकसित केलेलं हे एक हिल-स्टेशन. गाव छोटं, सुबक, स्वच्छ, शांत आणि सुरक्षित. म्हणून मग कलौला आले.


शान राज्यातलं हे एक महत्त्वाचं शहर. पहिल्या दिवशी संध्याकाळी गावात फेरफटका मारला. इथं नेपाळी समाज मोठ्या संख्येने आहे त्यामुळे नेपाळी जेवण (पोळी-भाजी-भात-डाळ वगैरे) मिळतं.
माझी मंडलेमधली एक मैत्रीण रात्री दोन वाजता येऊन पोचली. आल्यावर तिच्या लक्षात आलं की तिचा फोन सापडत नाहीये. आपल्या भारतीय अनुभवावरून फोन गेला असं मी समजले. पण तरीही माझ्या मोबाईलवरून तिचा फोन नंबर फिरवला तर समोरून तो चक्क उचलला गेला. फोन बंद करून सिमकार्ड फेकून द्यायची कला इथल्या लोकांना अजून अवगत नाहीये. बसच्या मालकाकडे फोन होता आणि तो व्यवस्थित होता. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरून फोन घेऊन यायचा असं ठरलं. म्यानमा लोकांची ही निरागसता किती काळ टिकून राहील असा प्रश्न मला नेहमीच पडतो. यांगों, मंडलेसारखी मोठी शहरं आणि उर्वरित देशात हा फरक आत्ताही दिसतो आहेच. तो एक वेगळाच विषय.
तिंज्याचा पहिला दिवस उजाडला. कलौ परिसरात दर पाच दिवसांनी एका गावात बाजार भरतो. (म्यानमामध्ये अनेक ठिकाणी ही पाच दिवस पाच गावांत बाजार ही पद्धत अस्तित्त्वात आहे.) सकाळी तिकडं चक्कर मारली. भरपूर गर्दी होती. तिंज्यानिमित्त पुढचे चार दिवस बाजार बंद राहणार आहे आणि सर्वांनाच सणासाठीची विशेष खरेदी करायची आहे, त्यामुळे गर्दी प्रचंड होती. पण कुठंही धक्काबुक्की नव्हती हे विशेष.

                              

तिंज्याचा पहिला दिवस अच्यो (a-kyo) या नावाने ओळखला जातो. पूर्वी खरं तर या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत पाणी फेकलं जात नसे. या दिवशी लोक फक्त एक वेळा जेवत असत आणि पगोडात आणि मठात जाऊन दानधर्म करत असत. शहाळं आणि कच्ची केळी देण्याला विशेष महत्त्व आहे असं दिसतं. संध्याकाळी पाण्याचा खेळ सुरू होतो.

कलौच्या बाजारानंतर आम्ही टाँजीच्या दिशेने रवाना झालो. शान राज्याची ही राजधानी कलौपासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही तिथं गेलो ते मैत्रिणीचा फोन आणण्यासाठी. इथं रस्त्यांवर मोठमोठे मंडप उभारून आणि पाणी साठवण्याची व्यवस्था करून जोरदार तयारी चालली होती. महापालिकेतर्फे मोठा मंडप घातलेला दिसला.जिकडंतिकडं पोलीसही मोठ्या संख्येने हजर होते. शासनातर्फे अधिकृतरीत्या हा उत्सव साजरा केला जातो. (म्यानमा अधिकृतरीत्या बौद्ध धर्मीय राष्ट्र आहे.) काही पोलीस मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने परिसर पिंजून काढण्याच्या कामात मग्न होते. ते पाहताना शान राज्यात चालू असलेल्या संघर्षाची आठवण पुन्हा एकदा झाली. (म्यानमा लष्कर आणि शानमधले काही सशस्त्र गट यांच्यात अनेक दशकांपासून अविरत संघर्ष चालू आहे.) लहान मुलांना दम धरवत नसल्याने रस्त्याने येणाऱ्याजाणाऱ्यांवर पाणी फेकणं चालू झालं होतं. आपल्याकडच्या रंगपंचमीची आठवण करून देणारं वातावरण होतं.टाँजीतल्या सुलामुनी पगोड्यामध्ये येणाऱ्या सर्वांचं या मैत्रिणी असं स्वागत करत होत्या. यानमामधली अनेक कुटुंब सणांच्या-उत्सवांच्या दरम्यान असं अन्नदान करत असतात. दुसऱ्या दिवशी कलौमध्येही तीन-चार ठिकाणी आम्हाला खाद्यपदार्थ आणि फळांचे रस दिले गेले. अनोळखी माणसांनाही हे दिलं जातं.

                      


या सणामागे नेमकी काय पारंपरिक कथा आहे असं मी आमच्या चालकाला आणि माझ्या मैत्रिणीला विचारत होते. पण त्यांना नेमकं काही सांगता येत नव्हतं. आंतरजालावर शोध घेतल्यावर काही संदर्भ सापडले आणि त्यावरून समजलं ते असं :-
बौद्ध धर्मामध्ये शक्र अथवा सक्क (पाली शब्द) नामक एक देवता आहे. ही हिंदू धर्मातली इंद्रदेवता होय. पण बौद्ध परंपरेतला इंद्र युद्धं कमी करतो आणि अर्थातच भगवान बुद्धाची पूजा करतो. सक्क जरी देवांचा राजा असला तरी जन्म-व्याधि-जरा-मरण या चक्रातून त्याचीही सुटका नाही. त्याचीही टिंगलटवाळी होते आणि मानहानीचे प्रसंग त्याच्याही आयुष्यात येतात. ऐरावत नामक धवल हत्ती हे सक्काचं वाहन आणि ऐरावताला एक नाही तर तीन डोकी आहेत.
एकदा इंद्र आणि एक राजा यांच्यातली पैज (किंवा तो जुगार होता असं वाटतं, अजून फारसे संदर्भ मिळाले नाहीत मला) इंद्राने जिंकली. आधी ठरलेल्या अटीनुसार इंद्राने त्या राजाचा शिरच्छेद केला आणि त्या राजाच्या शरीरावर हत्तीचं शिर बसवलं. तो झाला गणपती. पण त्या राजाची ताकद इतकी मोठी होती की त्याच्या शिराचं काय करायचं ही समस्या तयार झाली. ते शिर समुद्रात टाकलं तर समुद्र आटून गेला, जमिनीवर ठेवलं तर जमीन हलायला लागली (भूकंप झाला असं म्हणायचं आहे की काय ते कळत नाही) आणि आकाशात फेकलं तर आकाश ज्वाळांनी भरून गेलं.
सक्काने मग आदेश दिला की एकेका राजकन्येने या मृत राजाचं शिर वर्षभर धारण करावं. नवीन वर्ष येतं म्हणजे त्या दिवशी हे शिर धारण करण्याची जबाबदारी एका राजकन्येकडून दुसऱ्या राजकन्येकडं जाते. आता या सगळ्या कहाणीत राजपुत्रांऐवजी राजकन्या का आल्या, त्या किती होत्या वगैरे काहीही मला माहिती नाही. एखाद्या जाणत्या भिक्षुशी या विषयावर संवाद साधायला पाहिजे, मग कदाचित सविस्तर कळेल कथा. दुसऱ्या एका संदर्भानुसार या राजकन्या नव्हत्या तर नट होते. नट म्हणजे कोण हे पुढच्या परिच्छेदात आहे.
ही पहिली कथा. ही गोष्ट वाचून मला बर्मी नव्या वर्षाबद्दल थोडंस कळलं. पण तरी पाण्याचं यात काय काम हे कळत नव्हतं.
बर्माच्या थेरवाद बौद्ध धर्मात नटही अतिशय महत्त्वाचे आहेत. ३७ मुख्य नट आणि इतर अनेक गौण नट आहेत. यांच्यामध्ये अमानवी भौतिक-आध्यात्मिक शक्ती असते अशी धारणा आहे. पगोडांमध्ये मुख्य मूर्ती बुद्धाची असली तरी (त्या बहुतेक वेळा चारी दिशांना एकेक अशा असतात), तरी भवताली नटही असतात आणि त्यांचीही उपासना केली जाते. पारंपारिक धार्मिक समजुती आणि बुद्धाची शिकवण यांचा असा अनोखा संगम म्यानमामध्ये दिसतो.
इंद्रदेवता किंवा सक्क हा पुढे परंपरेत दिसतो तो तज्यामिं नामक नट म्हणून. हा बदल नेमका कधी आणि कसा झाला हेही मला माहिती नाही. याच्या एका हातात शंख असून याचं वाहन तीन डोक्यांचा पांढरा हत्ती आहे. याचा संबंध आहे तिंज्या सणाच्या दुसऱ्या दिवसाशी – जो अच्या (a-kya) नावाने ओळखला जातो. या दिवशी तज्यामिं (उर्फ सक्क उर्फ इंद्र) स्वर्गातून पृथ्वीवर अवतरतो असं मानलं जातं. ठरलेल्या वेळी लोक रस्त्यावर पाणी ओतून तज्यामिंची प्रार्थना करतात. तज्यामिं कोणत्या वाहनावरून येतो आणि त्याच्या हातात काय असतं यावरून येणाऱ्या वर्षाबद्दलचं भाकित shaman मंडळी (देव-नट आणि माणूस यांच्यात संवाद साधणारी माध्यममंडळी- भगत) करतात. (आता त्यांना तज्यामिं कसा काय दिसतो वगैरे तार्किक प्रश्न बाजूला ठेउयात.) चांगलं वागणाऱ्या मुला-मुलींचं नाव तज्यामिं सोनेरी पुस्तकात लिहितो असं मानलं जातं.
माझ्या बमा बौद्ध मैत्रिणीला पहिली कथा माहिती नव्हती. तिच्या म्हणण्यानुसार दुसरी कथा तिंज्यासाठी जास्त योग्य आहे, कारण म्यानमामध्ये तीच जास्त प्रचलित आहे.
आम्ही दुसऱ्या दिवशी (अच्या) फिरत फिरत कलौमधल्या Hnee Pagoda मध्ये गेलो होतो. Hnee या शब्दाचा बर्मी भाषेत अर्थ होतो बांबूची पट्टी. इथली बुद्धाची मूर्ती बांबूपासून बनवलेली आहे. पगोडामध्ये अनेक लोक होते.लोक शांतपणे बसले होते, वस्तू देणगी म्हणून बुद्धाच्या मूर्तीपुढे ठेवत होते. अशा सर्व प्रसंगी पगोडा येणाऱ्या सर्व भक्तांसाठी चहापाण्याची व्यवस्था करतो. लोकसहभागातून आणि लोकश्रमातून हे काम बिनबोभाट चालू असतं. भाविकांना मार्गदर्शन करण्याचं काम भिक्षु करत होते तर चहापाण्याची जबाबदारी भिक्षुणी सांभाळत होत्या – हे पाहून मी आणि माझी मैत्रीण एकमेकींकडे पाहून फक्त हसलो. अर्थात ती बमा (म्यानमामधला एक गट) बौद्ध असल्याने तिला हे नवीन नव्हतं – तिने मग तिच्या लहानपणच्या मठांच्या आणि अशा उत्सवांच्या अनेक आठवणी मला सांगितल्या.
जुन्या काळी Padauk च्या डहाळीने पाणी एकमेकांवर फक्त शिंपडलं जायचं. जुनी पापं वाहून जावीत, तन-मन स्वच्छ व्हावं आणि नव्या वर्षाची सुरूवात लोकांनी नव्याने करावी अशी त्यामागची संकल्पना होती. पण आता मात्र पिचकाऱ्या आणि पाईप यांचा सर्रास वापर केला जातो.
तिसरा दिवस आहे अच्च्या (a-kyat). Leap year मध्ये दोन दिवस असतो. चौथा दिवस आहे अट्टे (a-tet) – या दिवशी तज्यामिं स्वर्गात परत जातो. जलमहोत्सवाची सांगता होते. एका संदर्भानुसार या तीन दिवसांत तज्यामिंने पृथ्वीतलावर चांगलं काम करून काही पुण्य कमवावं लागतं, अन्यथा त्याचं स्वर्गातलं स्थान डळमळीत होईल.
पाचवा दिवस म्हणजे म्यानमा नववर्षदिन – न्हिह्सांटय्ये - hnit hsan ta yet. पूर्वी या दिवशी घरातल्या ज्येष्ठांचे केस लहानांनी धुवायचे अशी प्रथा होती. लहान जलाशयांतून मासे मोठ्या जलाशयांमध्ये सोडले जातात. लहान मुलांना बौद्ध धर्माच्या शिक्षणाची दीक्षाही या दिवशी दिली जाते. या समारंभानंतर मुलं काही काळ तरी (किमान तीन दिवस) मठात राहतात.
बदलत्या काळानुसार या पारंपारिक उत्सवाचं स्वरूप बदलत चाललं आहे. शहरात आणि ग्रामीण भागांत उत्सवाचं स्वरूप भिन्न आहे हे कलौ आणि टाँजी या दोन शहरातल्या अनुभवांवरून मला स्पष्ट दिसलं. छोट्या शहरांत, ग्रामीण भागात अजूनही परंपरेला महत्त्व आहे आणि उत्सवाचं स्वरूप काहीसं निरागस आहे. कलौमध्ये लोक आपापसात स्पर्धा करताना दिसले नाहीत. टाँजीमध्ये मात्र प्रायोजकांच्या मदतीने उत्सवाचं बाजारीकरण घडताना दिसलं. कुणाचा मंडप मोठा, कुणाकडं पाण्याचा साठा जास्त, कुणाकडं वाटायचे खाद्यपदार्थ जास्त चांगले ... हे हळूहळू आकार घेऊ लागलं आहे असं स्थानिक लोकांशी बोलताना कळलं.
रोजच्या जगण्यातले प्रश्न काही काळापुरते विसरून जाण्याला, त्या प्रश्नांना नव्याने सामोरं जायला असे उत्सव ताकद देतात असं मला वाटलं खरं. पण कितीही म्हटलं तरी हा माझा पहिलाच तिंज्या (मागच्या वर्षी मी भारतात आले होते) आणि तोही वरवर पाहिलेला. त्यामुळे त्याचे सगळे ताणेबाणे माझ्या लक्षात आलेच असतील असं अजीबात नाही. एकंदर मला मजा आली इतकंच काय ते खरं.
यावर्षीच्या तिंज्याचे अजून तीन दिवस बाकी आहेत, त्याकडे कुतुहलाने पाहते आहे.
संदर्भWikipedia, The Myanmar Times,  The Irrawaddy,  स्थानिक लोकांशी झालेला संवाद

4 comments:

 1. Prajakta Joshi खूप माहितीपूर्ण,मस्त.

  ReplyDelete
 2. Enjoyed very much - PD

  ReplyDelete
 3. व्वा.. सगळी माहिती, भौगोलिक आणि लोकजीवनाविषयीची, पेरत पेरत हे जे तुझं लिखाण असतं ना, ते मला फार आवडतं....
  - वासंती

  ReplyDelete
 4. आश्चर्य म्हणजे तामिळ लोकांचंही नववर्ष इकडे उद्या आहे. आपण कडुलिंबाची फुलं वापरतो तसे हे बहाव्याची फुलं वापरतात. पटाव फुलं बहाव्यासारखीच दिसत आहेत. आणि नववर्षाला तामिळ लोकही तांदूळ पीठ आणि गुळाचे मुटके करून तळतात.
  - मुक्ता ढवळे

  ReplyDelete