ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, September 7, 2017

२५१. यांगोंमधलं श्री. मोदी यांचं भाषण : भाग २

पहिला भाग एवढ्या उत्साहाने लिहिल्यानंतर प्रत्यक्ष भाषणाबद्दल सांगण्याजोगं विशेष काही नाही. एका शब्दात सांगायचं तर अपेक्षित .

I mean, come on!  भारताचे पंतप्रधान म्यानमामध्ये येऊन इथल्या भारतीय (आणि भारतीय वंशाच्या) नागरिकांशी जाहीर संवाद साधणार असतील तर अर्थातच ते काय बोलणार याचा एक साचा असतो. थोडा इतिहास, थोडी संस्कृती, थोडा भविष्यवेध, काही सद्भावना, काही नव्या सोयी, काही स्वप्नं आणि काही अपेक्षापूर्तींचे आकडे. अडचणींचा उल्लेख अशा जाहीर सभांमध्ये करायचा नसतो. कारण सभेचा उद्देश एकंदरित सकारात्मक भावना निर्माण करणं असा असतो आणि इतर मुद्दे अनुल्लेखाने मारणं स्वाभाविक असतं. अनेक लोकांनी पंतप्रधान रोहिंज्या (Rohingya) प्रश्नाबद्दल बोलतील किंवा पंतप्रधान दहशतवादाबद्दल बोलतील का असं मला म्हटल्यावर आश्चर्यच वाटलं होतं. एक तर असं म्हणणारे लोक फारच भाबडे असावेत किंवा आंतरराष्ट्रीय संकेतांबद्दल त्यांच्या मनात वेगळी प्रतिमा असावी.

यांगोंच्या सभेत श्री. मोदी म्यानमाविषयी कोणतंही नवं धोरण जाहीर करणार नाहीत, कोणत्याही संवेदनशील प्रश्नाविषयी ते काहीही भूमिका मांडणार नाहीत हे उघड होतं. ती त्यांच्या पदाची जबाबदारी असल्याने त्यांनी काही वेगळं केलं असतं तरच मला नवल वाटलं असतं. धोरणविषयक चर्चा आदल्या दिवशी त्यांनी म्यानमा सरकारशी केली होती. त्यातल्या ज्या गोष्टी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आल्या होत्या, त्याच श्री. मोदी यांनी सांगितल्या. लोकांना जे आधीच माहिती आहे तेच पुरेशा आकर्षकपणे आणि ठामपणे सांगणं हेच या सभेत अपेक्षित होतं. साक्षात पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलं याचा लोकांना आनंद असतो. मोदींना दीर्घकालीन प्रशासकीय अनुभव असल्याने सरकारशी बोलायचे मुद्दे आणि जनतेशी बोलायचे मुद्दे यात त्यांनी सरमिसळ केली नाही.

हं, मग काहीच झालं नाही का? तसं नाही, इतर भरपूर गोष्टी घडल्या. नवी माणसं भेटली, नव्या गप्पा झाल्या, आम्ही मिळून वैतागलो, मिळून हसलो. राष्ट्रगीत गाताना आणि वंदे मातरम् घोषणा देताना आम्ही सगळे काहीसे भावूकही झालो. ओळखदेख नसतानाही आम्ही एकमेकांसोबत साडेपाच-सहा तास मजेत होतो. त्या आघाडीवर बरंच काही घडलं. श्री. मोदी पाऊण तास बोलले, त्यांच्या भाषणातले मुद्देही सागंते नंतर.

तर आमंत्रणपत्रिकेतला बारा हजार हा आकडा वाचून मोठी रांग असेल या अपेक्षेने चार –सव्वाचारच्या सुमारास कार्यक्रमस्थळी पोचले. प्रवेश करतानाचं हे दृश्य.


पण रांग वगैरे काही नव्हती. सुरक्षा तपासणी झाली पण एकंदर परिसरात काहीच सुरक्षा व्यवस्था नव्हती. रस्त्यात मला नेहमीपेक्षा एकही जास्त पोलीस दिसला नाही – हे नाही म्हटलं तरी जरा विचित्र वाटलं.

स्टेडियमची आसनक्षमताही मी आधीच्या भागात लिहिलं तशी बत्तीस हजार नव्हती तर आठ हजार होती. कार्यक्रमाला पाचेक हजार माणसं आली असतील. म्हणजे बारा हजार, वीस हजार असले क्रमांक आमंत्रणपत्रिकेवर छापणं ही संयोजकांची एक युक्ती होती तर – कारण काही का असेना, पण युक्तीच. चालायचंच.

मोदींबरोबर सेल्फी काढायची लोकांना हौस असणार हे जाणून संयोजकांनी मोदींचे लाईफ साईज कटआउट्स ठेवले होते. लोकांची तिथं गर्दी होती.



तरूण (मुलं-मुली) उत्साहाने स्वयंसेवकाचं काम करत होते. भगवा टी शर्ट, मागच्या बाजूला मोदींचा फोटो अशा वेशात ही मंडळी वावरत होती. काही हिंदी बोलत होते, तर काही फक्त म्यानमा. माझ्या बर्मी भाषेची परीक्षाच घेतली गेली म्हणा ना.

गर्दी असलेल्या कार्यक्रमात स्त्रियांनी एकटं जाणं हा एक अनुभवच असतो. पण माझ्या सुदैवाने माझ्या डावीकडं आणि उजवीकडं दोन स्त्रिया त्यांच्या कुटुंबियांसोबत येऊन बसल्या. मग त्या दोन्ही कुटुंबाशी गप्पा सुरू झाल्या. एकजण फार्मा कंपनीत वितरण विभागात काम करतात आणि गेली दहा वर्ष यांगोंमध्ये राहतात. हे कुटुंब दिल्लीतून इथं आलंय. मग दिल्ली मेट्रो, दिल्ली की सर्दी (आणि गर्मी), केजरीवाल, दिल्लीमध्ये स्त्रियांना येणारे अनुभव अशा आमच्या गप्पा होत राहिल्या. हे कुटुंब वर्ष-दोन वर्षातून एकदा भारतात जातं.

दुसऱ्या ताई आणि त्यांचे पती मूळ गुजरातचे. इथं व्यवसायानिमित्त आले. ताई लग्न होऊन इथं आल्या ते वीस वर्षांपूर्वी. काका इथंच जन्मले आणि वाढले. त्यांचं भारतात कुणी नाही. माझ्या मागे मंडलेहून आलेला एक पुरूषांचा ग्रुप बसला होता. ते हिंदीत बोलत होते. माझ्या पुढच्या रांगेत तामिळ बोलणारं पण म्यानमा नागरिक असलेलं भारतीय वंशाचं कुटुंब बसलं होतं. मी तामिळ आणि गुजराती बोलायची थोडी हौस भागवून घेतली. थोडं पल्याड एक पंजाबी कुटुंब होतं – मुलं आणि आई यांचा संवाद पंजाबीत चालला होता. एकूण मिनी इंडिया समोर होतं.

खालच्या मजल्यावर व्हीआयपी आणि वरच्या मजल्यावर अन्य नागरिक अशी व्यवस्था होती. आत व्यासपीठ होतं आणि बाजूला दोन मोठे स्क्रीन्स होते.


त्या दोन्ही स्क्रीन्सवर मोदी सरकारची तीन वर्षांची कामगिरी ही व्हिडिओ क्लिप दाखवत होते. यात कदम कदम बढाये जा या गीताच्या ओळींवर केलेलं संस्करण काही मला आवडलं नाही. पहिल्या पाच-दहा वेळा लोकांनी जरा नीट पाहिली ती क्लिप. पण नंतर मात्र थट्टामस्करी सुरू झाली. व्हिडिओतल्या एटीएममध्ये दिसणाऱ्या नोटा पाहून अरे, इस एटीएममें पैसा है असं कुणीतरी म्हणालं आणि आम्ही सगळे नकळत हसलो. जीएसटी, स्वच्छ भारत, काळा पैसा, वेगवेगळ्या सरकारी योजना .... असे अनेक विषय. जाऊ द्या. आपल्या सरकारची आणि पर्यायाने आपल्याच देशाची थट्टा ऐकणंं काही सुखद नसतं.

लोकांचं मोदींवर प्रेम आहे, लोकांच्या मोदी सरकारकडून अपेक्षा आहेत हे खरं आहे. पण म्हणून आधी जणू काही अंधारयुग होतं आणि सगळं काही चांगलं फक्त मे २०१४ नंतर घडलं आहे या मोदी सरकारच्या (आणि खासकरून त्यांच्या समर्थकांच्या) बोलण्याला लोक वैतागलेही आहेत. माझ्या शेजारचे काका म्हणालेच, इनको तो अभी लोगोंका प्यार मालूम है, लोगोंका अंगार देखेंगे तो पता चलेगा’.  तिथं जमलेले कुणीच मोदी-विरोधक, डावे, नक्षलवादी, समाजवादी वगैरे नव्हते – सगळे 'भारतीय' किंवा 'भारताचे हितचिंतक' होते. खरं तर त्यांच्या सतत किंचाळणाऱ्या समर्थकांच्या गराड्यातून बाहेर पडून मोदी सरकारने टीकाकारांचेही आवाज ऐकले पाहिजेत. सरकारच्या धोरणावर टीका म्हणजे देशद्रोह या बालिश मानसिकतेतून मोदी सरकार जितक्या लवकर बाहेर पडेल तितकं भलं होईल. ते एक असोच.

तर आमच्या अनेक विषयांवर गप्पा झाल्या. जुनं यांगों कसं होतं याच्या मस्त आठवणी लोकांनी मला सांगितल्या. जगभरात अनेक जागा मरत चालल्या आहेत, त्यात यांगोंचा नंबर पहिल्या पन्नासात नाही, पण शंभरात नक्कीच लागेल. भारताच्या दूतावासाबद्दल (म्हणजे मुख्यत्वे तिथल्या कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेबद्दल), भारतीय नागरिक संघटनेतल्या राजकारणाबद्दल अनेक गोष्टी कळल्या. गॉसिप अनेकदा प्राथमिक माहिती मिळवण्याचा चांगला स्रोत असतो, ही माहिती अर्थातच वेगळ्या पद्धतीने तपासून घेतल्याविना त्यावर विश्वास ठेवता येत नाही.

पुढचे तीन तास दूतावासाच्या बौध्दिक दिवाळखोरीचं दर्शन झालं. चार-पाच हजार माणसं तीन-साडेतीन तास आपल्यासमोर आहेत. केवढा सदुपयोग करता आला असता त्या वेळेचा. पण तो सगळा वेळ गेला वेगवेगळ्या भाषांमधल्या गाण्यांवरचे नाच पाहण्यात आणि डॉल्बी ऐकण्यात. छोट्या मुला-मुलींची नृत्यं चांगली होती आणि त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी अशा कार्यक्रमांत त्यांचं सादरीकरण आवश्यकही असतं. सुफी गायनही मला आवडलं. पण प्रोफेशनल नर्तकांचा ग्रुप आणून, त्यांच्या चकाकत्या कपड्यांवर झगझगते दिवे सोडून, त्यांचे बॉलीवुड चित्रपटांतले रिमिक्स आणि बीभत्स नाच पाहणं ही शिक्षाच होती. गणेशोत्सवाच्या काळात मी पुण्यात नव्हते – त्याची कसर त्या तीन तासांत भरून निघाली. मी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या, नृत्य-संगीताच्या विरोधात नाही – मी कोणत्याही प्रकारच्या सक्तीच्या आणि अतिरेकाच्या विरोधात आहे. आणखी एक असो.

दोन निवेदक सूत्रसंचालन करत होते, ते बर्मी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये होतं. मध्येच पुरूष निवेदकाला लोकांना जागं करायची हुक्की आली. ‘What will we do when Modiji arrives?’ – त्याने विचारलं. त्यावर भयाण शांतता पसरली. मग तोच गृहस्थ म्हणाला, ‘We will welcome him by chanting Mo… di,  Mo …di’. दोन चार लोक त्याच्यापाठीमागं ओरडले पण एकूण त्याचा शाळकरी मुलांना शिस्त लावण्याचा अविर्भाव लोकांना आवडला नव्हता हे उघड होतं. आम्ही मग नव्या नाचाकडं वळलो. :-)

पंतप्रधान साडेसहाच्या सुमारास येतील अशी अपेक्षा होती. पण पावणेसात वाजले तरी नाचगाणी चालूच होती म्हणून मी इंटरनेट पाहिलं तर पाच वाजून वीस मिनिटं या वेळात पंतप्रधान बगानच्या आनंदमंदिरात होते अशी माहिती मिळाली. पंतप्रधान आठ वाजेपर्यंत काही येत नाहीत, आल्यावर ते एक तासभर तरी बोलणारच आणि बाहेर पडायला साडेनऊ होणारच हे लक्षात आलं. पिण्याचं पाणी आत आणायची परवानगी नव्हती. पण जागा सोडायचीही परवानगी नव्हती. त्यामुळे वैताग वाढला होता.

अखेर साडेसातला नाच थांबले. मग पंधरा एक मिनिटं एकजण स्टेज झाडून काढत होता, त्यावरही विनोद झाले. 'पंतप्रधान आल्यावर मोबाईल बंद करायला' सांगितलं गेलं. पण पुढं पंतप्रधान आल्यावर व्हीआयपी कक्षातल्या अनेकांचे मोबाईल झगमगले आणि मग सामान्य नागरिकांनीही मोबाईलवर भरपूर फोटो काढले.



पंतप्रधान काय बोलले ते एव्हाना तुम्ही वाचलं असेल. पण दोन गोष्टी – पंतप्रधानाच्या चाळीस-पंचेचाळीस मिनिटांच्या भाषणात ते जेमतेम दहा वाक्यं इंग्रजीत बोलले असतील, बाकी हिंदी भाषेत. यांगो रिजनचे मुख्यंमंत्री स्क्रीनवर दिसत होते – त्यांना काय समजलं असेल देव जाणे. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश अशा अ-हिंदी पट्ट्यातले नागरिक मोठ्या संख्येने म्यानमात आहेत. त्यांनाही कितपत काय समजलं असेल देव जाणे. बाकी नाच-गाण्यांवर इतका खर्च केला त्याऐवजी थोडा खर्च अनुवादावर केला असता तर?

पंतप्रधान त्यांच्या चिरपरिचित शैलीत बोलले. राजकीय नेत्यांना लोकांची नाडी अचूक माहिती असते याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. उदाहरणार्थ म्यानमामें भारत के एक राजदूत है, लेकिन आप सबके रूप में अनेकों राष्ट्रदूत है (आशय हा, शब्द कदाचित माझ्याकडून बदलले गेले असतील) म्हटल्यावर लोकांनी जाम खूष होऊन जोरदार टाळ्या वाजवल्या. ते सगळे लोक भले राष्ट्रहित साधत असतील किंवा नसतील, पण साक्षात पंतप्रधानांनी असा गौरव केलेला कुणाला नको असेल? इरावती, भगवान गौतम बुद्ध, विपश्यना, गोयंका गुरूजी... हे सगळे नस पकडणारे अचूक उल्लेख योग्य वेळी झाले. मिलबाँटकर खाते है तो आनंद दुगुना होता है’  आणि मदद करते समय हम पासपोर्टका रंग नहीं देखते है ही वाक्यं खरंच चांगली होती. सुषमा स्वराज यांचं त्यांनी कौतुक केलं,  त्यालाही टाळ्या मिळाल्या. दूतावास तुमच्यासाठी चोवीस तास खुला आहे हे ऐकल्यावर मात्र लोक खवट हसले. लोकांचा इथल्या दूतावासाचा अनुभव फारच वाईट दिसतो आहे.

अशा रीतीने सभा संपली. ठीकठाक होती सभा. बाहेर पाणी आणि खाद्यपदार्थ मिळवताना लोकांनी त्यांचं भारतीय मूळ कायम असल्याचं सिद्ध केलं – इतकी गर्दी केली होती आणि धक्काबुक्की चालू होती, की विचारता सोय नाही. बाहेर पडताना पाण्याच्या बाटल्या परिसरात फेकून देत लोक पुढं जात होते. तेही असोच.

मस्त पाऊस कोसळत होता. मी शहराच्या अनोळखी भागात गर्दीत एकटी होते. मग एका म्यानमा पोलिसाच्या मदतीने मी योग्य रस्त्याला लागले. नंतर यांगोंमध्ये रहात असलेल्या एका मुंबईच्या मुलीने दिलेल्या लिफ्टमुळे मी निदान रात्री अकरा वाजता तरी घरी पोचू शकले.

अवांतर - यांगोंमध्ये भारतीय पंतप्रधानांची भारतीय नागरिकांसाठी सभा होते यांचं आपल्याला कौतुक वाटतं. याच सहजतेने बिहारचे मुख्यमंत्री मुंबईतल्या बिहारी नागरिकांसाठी किंवा केरळचे मुख्यमंत्री कलकत्त्यातल्या केरळी नागरिकांसाठी सभा घेऊ शकतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बंगळुरमधल्या मराठी नागरिकांसाठी सभा घेऊ शकतील .... तर भारतीय लोकशाही योग्य दिशेने चालली आहे असं म्हणता येईल. .... 

समाप्त

20 comments:

  1. छान लिहिलं आहेस.
    राज्यश्री

    ReplyDelete
    Replies
    1. अरे, एवढाच प्रतिसाद? मला वाटलं होतं आता मला ऐकून घ्यावं लागणार.

      Delete
  2. सविता, तुझं सडेतोड आणि भावनांच्या आहारी न जाणारं लिखाण आवडलं.
    का आपली लोकं अशी कधी खायला न मिळाल्यासारखी वागतात? आणि तरीही आपण आपल्या संस्कृतीचे गोडवे गातच असतो.
    वासंती

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्याइतके - म्हणजे भारतीयांइतके - दांभिक लोक दुसरीकडं कुठं असतील का असा प्रश्न मला वारंवार पडतो. लोक चांगले-वाईट सगळीकडं असतात. पण बोलायचं एक आणि करायचं दुसरंच यात आपण माहिर आहोत अगदी.

      Delete
  3. प्रामाणिक लिहिलं आहे. आवडलेलं आहे.
    यशवंत

    ReplyDelete
  4. उन्मादी प्रादेशिकवादाच्या काळात, शेवटचा परिच्छेद विशेष मननीय वाटला. लिखाण नेहमीप्रमाणे उत्तम!
    -क्षिप्रा

    ReplyDelete
    Replies
    1. प्रादेशिक उन्माद फार जुना आहे आपल्याकडं. आपण कसे 'एक' असतो आणि कसे 'वेगवेगळे'असतो हे नेहमीच अनुभवण्याजोगं असतं. मला या सभेत बिहारच्या नागरिकांविरूद्ध महाराष्ट्रात झालेल्या गोष्टी आठवत होत्या - आणि त्या संदर्भात बिहारच्या ग्रामीण भागात मला आलेले अनुभवही.

      Delete
  5. पंतप्रधानांच्या सार्वजनिक भाषणाविषयीचे मुद्दे अगदी पटणारे आहेत. पण तू थोडी स्तुती करायला हरकत नव्हती :-)
    गेलीस भाषण ऐकायला, हेच खूप झालं ;-)
    स्मिता

    ReplyDelete
    Replies
    1. स्तुती करण्याची संधी मी शोधली, अगदी नीट वाचणाऱ्यांना यात स्तुतीही दिसेल.
      विरोध व्यक्तीचा करायचं काही कारण नाही. चांगलं वाटतं त्याला चांगलं म्हणायचं, वाईट वाटतं त्याला वाईट म्हणायचं - आणि मुख्य म्हणजे आपलं मत अंतिम नसून नवी माहिती समोर आल्यास आपलं मत बदलायचं - हे नेहमी करत आलेले आहे. काळजी नसावी, अगदीच नसावी :-)

      Delete
  6. वृत्तांत त्रोटक वाटला. पण ते स्वाभाविक आहे. तिथल्या प्रसारमाध्यमांंनी या भेटीला किती महत्त्व दिलं याबद्दल सांगाल का?
    BTW, it is difficult to post comment on your blog. I don't know why.
    Sachin

    ReplyDelete
    Replies
    1. Sachin, sorry. Lately experiencing SPAM comments (obviously), so have turned 'moderation' on. I don't like to control comments in this way. So I will remove it after some days, which will make posting comment easy.
      इथल्या वृत्तपत्रांत काही लेख आले, पण सामान्य नागरिकांसाठी काही फार गाजावाजा झाला नाही या भेटीचा. सरकारी मालकीच्या वृत्तपत्रांत सविस्तर बातम्या आल्या - पण त्या प्रत्येक देशाच्या वा सरकारच्या प्रमुखांच्या भेटीच्या असतात.टीव्ही पाहत नसल्याने तिथं कितपत सांगितलं गेलं ते माहिती नाही.

      Delete
  7. ते 'कदम कदम बढाये जा' चं काय केलं आता?
    राजेश

    ReplyDelete
    Replies
    1. कदम कदम बढाये जा
      विकास को बनाये जा
      तू ... (शब्द विसरले) देश की
      तू विकास को बढाये जा
      असं काहीतरी केलं आहे. मूळ गाण्याची आठवण विस्मृतीत जाण्याची शक्यता वाढली आहे!

      Delete
  8. पण एक सांगा ताई, साहेब तिथं 'मितरों' असं म्हणाले का नाही? :-)

    ReplyDelete
    Replies
    1. नाही. साहेब 'मितरों'म्हणाले नाहीत.
      तसंच 'बचपनसे मैं बर्मा आना चाहता था' असंही म्हणाले नाहीत. नेपिटॉमध्ये म्हणाले असतील तर माहिती नाही :-)

      Delete
  9. तिकडं का नाही प्रकाशित केला हो हा लेख तुम्ही?
    एक वाचक

    ReplyDelete
    Replies
    1. प्रश्न चांगला आहे, एक वाचक :-)
      तिकडून इकडं येऊन लेख वाचल्याबद्दल आभार.

      Delete