कालचीच गोष्ट.
आमच एक प्रशिक्षण चालू होत. चार पाच वेगवेगळ्या राज्यांतली मंडळी होती. फारशी ओळख झाली नव्हती सगळ्यांशी कारण संख्या बरीच जास्त होती. त्यामुळे समोर आलेला प्रत्येक माणूस आपल्याच प्रशिक्षणातला असेल अस मी गृहीत धरून चालत होते.
जेवताना ओरिसातले एक गृहस्थ शेजारी होते. थोड बोलल्यावर लक्षात आल की ते आमच्या प्रशिक्षणातले नव्हते. पण गप्पा मारायला त्यामुळे काही अडचण असायचं कारण नव्हत. मी ऐकते आहे अस लक्षात आल्यावर ते गृहस्थ उत्साहाने जे बोलायला लागले ते थांबतच नव्हते. मला जरा गंमत वाटत होती आणि वेळही होता थोडा मोकळा. पंधरा वीस मिनिटांत माझ्या लक्षात आल की या गृहस्थांची प्रत्येक विषयावर अगदी ठाम मत होती - आणि मुख्य म्हणजे कोणताही विषय घेतला तरी त्यावर त्यांच मत (अर्थातच ठाम!) असायचच! म्हणजे सरकारी अधिकारी, सरकारी योजना, आदिवासी लोक, रस्ते, पाउस, सचिन तेंडुलकर, भ्रष्टाचार .... कोणताही विषय त्यांना वर्ज्य नव्हता.सगळ त्यांच्या मते अगदी वाईट होत, कशावरच त्यांचा विश्वास उरलेला नव्हता. त्यांची सगळी मत गृहितकावर आधारलेली होती ... आणि आपल्याला सगळ काही माहिती आहे हे त्यांच मुख्य गृहितक होत!
मला आपली नेहमी दुसरी बाजू पहायची सवय लागलीय. अनेकदा माझा तोटा झालाय या सवयीमुळे - पण तरी त्याचे फायदेही अनेक असतात म्हणून मी फारशी ती सवय बदलायच्या फंदात नाही पडले अजून तरी. त्यामुळे मी त्याना उगाच ती दुसरी बाजू सांगायला बघत होते - त्यामुळे ते अर्थातच अधिक उत्साहाने टीका करत होते. अशा गप्पांना काही शेवट नसतो, त्यामुळे काही निष्कर्ष न काढताच आमच बोलण संपल.
पण या प्रसंगामुळे मला माझा एक जुना मित्र आठवला. ऐन उमेदीतली पाच सहा वर्ष आम्ही बरोबर काम केल होत. त्यामुळे वाद-विवाद- चर्चा आमच्यात भरपूर व्हायच्या. तो लिहायचा चांगल - आणि मला लिहायची हौस होती . म्हणून लिखाणाची बरीच काम आम्ही मिळून केली. हल्ली तो ब-यापैकी लेखक म्हणून ओळखला जातो.
तर त्यादिवशी असेच एका समारंभात आम्ही अचानक भेटलो. तोवर 'मैत्री' या संकल्पनेबद्दलच माझ भाबडेपण बरच कमी झाल होत. 'सारे प्रवासी घडीचे' असा पुरेसा अनुभव आलेला होता. त्यामुळे मी त्याच्याशी फार न गुंतता आणि फार अलिप्तपणे पण नाही असा संवाद करत होते. तेवढ्यात त्याचा कॉलेजात शिकणारा मुलगा समोर आला - त्याला मी पाळण्यात पाहिलं होत आणि त्यावर आजच. त्यामुळे मित्राने त्याला माझी 'ही मावशी पण चांगल लिहायची' अशी ओळख करून दिली. मी आपली नुसती हसले आणि त्या मुलाशी गप्पा मारायला लागले.
पण माझा मित्र अचानक एकदम लेखकाच्या भूमिकेत शिरला. त्यान मला विचारल, "तू काही लिहितेस की नाही? की सोडलस सगळ आणि फक्त पैसे कमावतेस आता? सरस्वतीची उपासना करावी, लक्ष्मीची करू नये हे विसरलीस वाटत?"
आम्ही इतक्या वर्षानी भेटत होतो, की तो मला अनोळखीच वाटत होता. त्यामुळे मी आपल 'कधीतरी लिहिते क्वचित ..' अस थातुरमातुर उत्तर दिल. पण ती त्याला पर्वणीच मिळाली. "फक्त पोटासाठी लिहू नये माणसान' "तू उगीच लिहायचं सोडलस, बरी लिहित होतीस तेव्हा', 'लेखन म्हणजे कसा बुद्धीचा सर्वात योग्य वापर आहे' असा उपदेशाचा भडीमार तो माझ्यावर करत राहिला. त्याला तोडून टाकून त्याच्या मुलासमोर मला त्याचा अपमान करायचा नव्हता, म्हणून मी सगळ ऐकून घेतलं मुकाट्याने. पण तेव्हाही मला जाणवलं की माझ्याबद्दल काही गोष्टी गृहीत धरून त्याने एक ठाम मत बनविल होत .. आणि त्याला खात्री होती की तो बरोबर आहे!
मध्यंतरी अशीच एक ओळखीची भेटली. मी पुण्यात ब-याच महिन्यांनी गेले होते त्यामुळे सगळे मला त्यांच्या घरी राहायला बोलावत होते - तसच तिनेही आग्रह केला. पण मी त्या रात्री रणजीत आणि आरतीच्या घरी राहणार होते. रणजीत तिला माहिती होता, पण आरतीची आणि तिची ओळख नव्हती. "कस चाललाय ग रणजीतच आणि त्याच्या बायकोच?" तिने विचारल. "चांगल चाललाय .. आता सविस्तर बोलूच आम्ही रात्री" मी म्हटल.
त्यावर अधिक साशंक होत ती म्हणाली, "नाही ग, तिच्याबद्दल काही फार चांगल ऐकल नाही मी".
मी प्रश्नार्थक नजरेन तिच्याकड पाहिलं आणि त्याचा खुलासा म्हणून ती चांगली अर्धा तास मला सांगोवांगीच्या गोष्टी सांगत राहिली. त्यातल्या काही इतक्या भयानक होत्या की मी आरतीला ओळखत नसते तर माझ्या मनात नक्की तिच्याबद्दल संशय निर्माण झाला असता.
इतक ठाम मत आरतीबद्दल कशाच्या आधारावर? तर पुन्हा एकदा काही गोष्टी गृहीत धरून, कशाचीच शहानिशा न करता.
मला आणखी एक गंमत वाटते. बहुसंख्य लोक वाईट ठाम मत नुसत्या गृहितकाच्या आधारे करतात आणि कशाबद्दल, कोणाबद्दल चांगल मत होण्यापूर्वी हजारवेळा चौकशा करतात, खात्री करून घेतात, अनुभव घेऊन पाहतात.
वाईट मत बनवायचीच काय एवढी घाई असते आपल्याला?
अगदी अगदी! नावे ठेवण्यात अहमिकेने पुढे पुढे धावणारी वाचा कोणासंबंधी दोन गोष्टी चांगल्या जाऊदेत निदान न्यूट्रल बोलण्यासाठीही रेटत नाही. :( :(
ReplyDeleteबाकी, बहुतांशी लोकांना त्यांच्या मनात जशी समोरची व्यक्ती हवीशी असते तशीच पाहायची सवय जडलेली असते. मग अशावेळी त्या व्यक्तीने त्यांच्या विचाराची चाकोरी सोडली की त्यांना एकदम काहीतरी विचित्र घडल्यासारखे वाटू लागते... दुर्लक्ष करणे उत्तम !!
भाग्यश्री, माणसाची सहज प्रवृती अनेकदा आपल्याला अशी कोड्यात टाकते तर!
ReplyDeleteaste kharee ghai!!
ReplyDeleteAnonymous, :-)
ReplyDeletestrange but true...
ReplyDeleteDeven, :-)
ReplyDelete