भाग ३
मूळ सिद्धान्त
मायावाद
शंकराचार्यांचा वेदान्त हा सर्वात प्रसिद्ध व
लोकमान्य असा वेदान्त आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शंकराचार्यांचा जन्म
केरळमधील कालडी या गावी इसवी सन ७८८ मध्ये झाला व इसवी सन ८२0 मध्ये त्यांनी समाधी
घेतली याबाबत सर्वसाधारणपणे एकमत आढळते. (ठाणे शहरातील प्रसिद्ध अभ्यासक श्री.
श्री. द. कुलकर्णी यांच्या मते मात्र हा कालावधी इसवी सन पूर्व ५0९ ते ४७७ असा आहे.)
बालपणीच पितृछत्र गमावलेल्या शंकराने वयाच्या आठव्या वर्षीच चारी वेदांचे अध्ययन
पूर्ण केले. वेदान्तमताचा म्हणजेच अद्वैतमताचा प्रसार करण्यासाठी त्यांनी
भारतभ्रमण केले. द्वारका, ज्योर्तिमठ, पुरी व शृंगेरी या चार ठिकाणी त्यांनी मठांची स्थापना केली.
आचार्यानी लिहिलेली मधुर स्तोत्रे आजही लोकांना आवडतात. त्यांना मायावादाच्या
केलेल्या आग्रही प्रतिपादनामुळे काही विद्वान त्यांच्यावर ते 'प्रच्छन्न बौद्ध’ असल्याचाही त्यांच्यावर आरोप करतात. त्याचा
विचार आपण पुढील विवेचनात करणार आहोत.
मूळ सिद्धान्त
वास्तविक शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान हा
आयुष्यभराच्याच अभ्यासाचा विषय आहे. पण त्यांच्या तत्त्वज्ञानाचे सार त्यांनीच दोन
ओळींत पुढीलप्रमाणे सांगितले आहे:
श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथ कोटिभि: । ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्रौव, नापर: ।।
(कोटी ग्रंथांनी जे सांगितले आहे, ते मी अर्ध्या श्लोकात
सांगतो. ब्रह्म सत्य आहे, जगत् मिथ्या आहे, जीव आणि ब्रह्म एक आहेत, वेगळे नाहीत.)
शंकराचार्यांचा पहिला महत्त्वाचा सिद्धान्त म्हणजे ब्रह्म
हेच काय ते सत्य होय. आणि सत्य म्हणजे काय? तर ज्याचा कधीही विनाश होत नाही
ती वस्तू. 'नाभावो विद्यते
सत:’ असे भगवद्गीतेतही त्याचे वर्णन आहेच.
हे सत्य एकमेव आहे. त्यालाच ब्रह्म म्हणायचे! त्याशिवाय दुसरे काहीही विद्यमान नाही. 'सर्वं खल्विदं ब्रह्म’ या औपनिषदिक महावाक्याचे
शंकराचार्य पूर्णत: समर्थन करतात.
ब्रह्म स्वयंप्रकाशी आहे. ते चिन्मय आहे. 'सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म’ किंवा 'सच्चिदानंद’ असे त्याचे शब्दांत
वर्णन केले जाते. पण वस्तुत: ब्रह्माचे शब्दांत कधीही वर्णन करता येणार नाही. ते
अनिर्वचनीय आहे. 'यतो वाचो निवर्तन्ते, अप्राप्य मनसा सह’ (जिथून वाणी माघारी येते, मनालाही त्याचा थांग लागत नाही) असे उपनिषदातही त्याचे वर्णन आहेच. ब्रह्म निर्गुण आहे,
निराकार आहे,
निरवयव आहे. सत्, चित्, आनंद हे काही ब्रह्माचे गुणधर्म
नव्हेत. ब्रह्म हे दुस-या कशामुळचे निर्माण झालेले नाही. ते आहेच. अनादि आहे आणि
अनंतही आहे. ते कोणत्याच मर्यादेने बांधले गेलेले नाही. म्हणून शब्दांत त्याचे
वर्णन करताना ' ब्रह्म म्हणजे अमुक नाही अन तमुक नाही - नेति नेति (न इति – हे नाही)’ असे म्हणावे लागते.
शंकराचार्यांच्या मते ब्रह्म हे भेदरहित आहे. हे भेद
तीन प्रकारचे असतात - विजातीय, स्वजातीय व स्वगत. गाय आणि घोडा यांच्यातील भेद विजातीय
स्वरुपाचा आहे. काळी गाय आणि पांढरी गाय हा स्वजातीय स्वरुपाचा भेद झाला. गायीचे
शिंग, शेपूट,
पाय हे स्वगत भेद
दर्शवितात. ब्रह्माशिवाय येथे दुसरे काहीच विद्यमान नसल्याने विजातीय, आणि स्वजातीय भेदाचा
प्रश्नच उदभवत नाही. ब्रह्म निर्गुण असल्याने त्यात स्वगत भेदही नाही. ब्रह्माचे
वर्णन करताना शंकराचार्य 'स्वरुपलक्षण’ आणि 'तटस्थलक्षण’ असे दोन शब्दप्रयोग करतात. हे दोन शब्द समजून न घेता आपण पुढे
गेल्याने सध्याच्या चर्चेत फार मोठा अडथळा येणार नाही, त्यामुळे आपण त्याची चर्चा करणार
नाही.
आता हे ब्रह्म आहे हे तरी कशावरुन? तर श्रुतिंवरुन!
शंकराचार्य श्रुतिप्रामाण्य, शब्दप्रामाण्य मानतात. 'अहं ब्रह्मास्मि’ सारखी वाक्ये ज्या अर्थी
श्रुतिंमध्ये आहेत, त्या अर्थी ब्रह्म आहेच. अर्थात शंकराचार्यांचे शब्दप्रामाण्य म्हणजे
अंधश्रद्धा नव्हे. 'जरी शतश्रुतिंनी सांगितले की अग्नी शीत आहे तरी त्यावर विश्वास ठेवू नका’ असेही शंकराचार्य सांगतात!
प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, उपलब्धि ..... या सर्व प्रमाणांची स्वत:ची अशी वेगवेगळी क्षेत्रे आहेत असे
शंकराचार्यांचे मत आहे. म्हणून 'प्रत्यक्षाद्वारे ब्रह्मज्ञानाची अपेक्षा करणे’ शंकराचार्यांच्या मते व्यर्थ
ठरते!
मायावाद
'सर्व जग म्हणजे ब्रह्म आहे’ असे म्हणणे तर फारच सोपे! पण
प्रत्यक्षात जगताना आपण या जगात भेदच पाहतो. अगदी हरघडीला पाहतो. सगळेच ब्रह्म
असेल तर दंगली, खून, मारामारी,
हत्याकांडे होतीलच
कशी? आणि
कशासाठी? चोरही
जर ब्रह्मच असेल तर त्याला किंवा तिला शिक्षा करण्याचा इतरांना काय अधिकार?
उपनिषदांच्याच
भाषेत सांगायचे तर ' सारे ब्रह्मच असल्यावर कोण कोणाला पाहणार?’ .. वगैरे. आता हे सगळे तत्त्वज्ञान
म्हणून चर्चा करायला, भाषणे द्यायला
आणि लेख लिहायला म्हणून ठीक आहे. पण खरे सांगायचे झाले तर हे जग आणि ब्रह्म
यांच्या एकत्वावर विश्वास ठेवायचा म्हणजे वेडेपणाच आहे असे आपल्याला वाटते, जे स्वाभाविक
आहे.
आता यावर एक उपाय असा की, ब्रह्माचा आणि जगाचा काही संबंधच
नाही असे मानायचे! पण मग ब्रह्माच्या एकमेवाद्वितीयत्वाचे काय? जग ही दुसरी एक सत्ता
मानली की ब्रह्म आपोआपच सान्त, सीमित आणि मर्यादित होते.
शंकराचार्यांना मात्र ही अडचण जाणवत नाही. 'जगत् मिथ्या’ असे त्यांनी आधीच आपल्याला
सांगून ठेवले आहे. या मिथ्या शब्दाबाबत आपण फार घोळ घातला आहे. केवळ या एका
शब्दामुळे 'शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान पलायनवादी आहे’ असे म्हणण्याइतपत काही
टीकाकारांची मजल गेली आहे. पण शंकराचार्यांचा मायावाद जर आपण नीट समजावून घेतला तर
आपला गोंधळ दूर होईल.
मिथ्या म्हणजे खोटे नव्हे, तर मिथ्या म्हणजे अशाश्वत,
परिवर्तनीय! जग सत् नाही कारण ते सतत बदलत राहते.
जगात अनेक गोष्टींचा नाश होतो आणि अनेक नव्या गोष्टी जन्माला किंवा उदयाला येतात.
जगाला अस्तित्व आहे हेही खरेच. कारण जर जग पूर्णत: खोटे असेल तर त्याचा आपल्याला
बोध होणार नाही. पण जगाच्या आपल्याला झालेल्या ज्ञानाच्या आधारे आपण दैनंदिन
व्यवहार करत असतो. म्हणून जग पूर्णत: खोटे नाही. पण जग शाश्वत आणि अपरिवर्तनीय पण
नाही. जग ‘सत्’ नाही आणि ते ‘असत्’ ही नाही - ते मिथ्या आहे.
मग हे जग नेमके आहे तरी काय? तर हे जग ब्रह्मावरील ‘विवर्त’ आहे. जगाचा आधार, जगाची प्रतिष्ठा,
जगाचा पाया ब्रह्मच
आहे. ब्रह्म नसतेच तर जगही नसते. पण जग असले काय अन नसले काय, त्याचा ब्रह्मावर मात्र
काहीही परिणाम होत नाही. जगाच्या असण्याने ब्रह्मत्वाच्या मुकुटात काही तुरा घातला जात नाही आणि जगाच्या
नसण्याने त्यात काही उणीव निर्माण होत नाही. ‘सर्प-रज्जूचे’ शंकराचार्यांचे उदाहरण अगदी
प्रसिद्ध आहे. रात्रीच्या काळोखात रस्त्यावर पडलेल्या निरुपद्रवी दोरीला साप समजून
आपण घाबरतो. आपण ओरडतो, आपल्या हृदयाची धडधड वाढते, आपल्याला घाम फुटतो ...... आपल्याला असे कितीही आणि
काहीही वाटले तरी त्यामुळे प्रत्यक्षात त्या दोरीचे काही सर्पात रुपांतर होत नाही.
आपल्या भाव-भावनांच्या अविष्कारांचा त्या दोरीवर काहीही परिणाम होत नाही.
अर्थात हे उदाहरण केवळ संकल्पना समजावून
घेण्यापुरतेच ठेवायचे. कारण दोरी आपल्या नेहमीच्या अर्थाने अचेतन आहे तर ब्रह्म चैतन्यमय
आहे. दोन्ही परिस्थितींमध्ये एक साम्य मात्र नक्कीच आहे. ते म्हणजे अज्ञानामुळे आपण एका वस्तूला
दुसरीच काहीतरी समजतो. दोरीला साप समजून प्रतिक्रिया देतो तसेच ब्रह्माला जग
समजतो. अविद्येमुळे आपण ब्रह्मावर
जगाचा 'अध्यास’ करत असतो, आरोप करत असतो. जे त्या
वस्तूचे (इथे
वस्तू म्हणजे entity असे म्हणायचे आहे मला, कदाचित
हा शब्द चुकीचा आहे, पण अन्य योग्य शब्द आठवत नसल्याने तोच वापरते आहे) वास्तविक स्वरुप नाही,
त्या प्रकारे वस्तूला
समजणे म्हणजे त्या वस्तुवर दुस-या वस्तूचा आरोप करणे! प्रथम पाहिलेल्या वस्तूचे दुस-या वस्तूच्या ठिकाणी
होणारे स्मरणाच्या स्वरुपाचे ज्ञान म्हणजे अध्यास होय! ब्रह्म
अविकारी, निश्चल,
निरवयव असल्याने
जगातील दोषांनी अथवा गुणांनी ब्रह्म लिप्त होत नाही.
ब्रह्मावर जगाचा जो काही भास आपल्याला होतो, तो ‘माये’मुळे होतो. मायेची कल्पना
सर्वप्रथम शंकराचार्यांनी मांडली असे काहीजण मानतात. तर काही तिचा उगम थेट
ऋग्वेदापर्यंत नेऊन भिडवतात. मायावादाचा जनक कोण या वादात आपण फारसे लक्ष घालणार
नाही. शंकराचार्यांनी मायावादाचा सिद्धान्त अतिशय लोकप्रिय केला इतके खात्रीने
म्हणता येईल.
मायेची शक्ती दोन प्रकारची आहे. असलेली दोरी झाकून
ठेवणे ही एक - हिला म्हणायचे ‘आवरण’ शक्ती. आणि असलेल्या वस्तूच्या जागी दुसरीच वस्तू दाखवणे -
जसे दोरीच्या जागी साप - तिला म्हणायचे ‘विक्षेप’ शक्ती. विशेष म्हणजे माया अनादि आहे पण अनंत मात्र नाही. ही
दोरी आहे, साप नाही हे व्यक्तीला कळल्यावर सापाच्या भावनेतून व्यक्ती मुक्त होते. ब्रह्मसाक्षात्कार
झालेली व्यक्ती मायेच्या पाशातून सुटते म्हणून माया सान्त आहे. यातून ज्या व्यक्तीला साप
(प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष) माहिती नाही, तिला दोरीच्या जागी साप दिसणार नाही, दोरीच
दिसेल – अशी व्यक्ती ब्रह्मज्ञानी मानायची का असा एक तार्किक प्रश्न लगेच येईल. साप
आणि दोरी हे उदाहरण आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. आजच्या जमान्यात कदाचित ही संकल्पना
समजण्यासाठी वेगळे उदाहरण द्यावे लागेल – गरज असल्यास.
मायेला शंकराचार्य 'सद्सद्विलक्षण’ असे म्हणतात. माया सत् आहे का? तर नाही! कारण तिचा नाश होतो.
म्हणजे माया असत् आहे
का? तर
तसेही नाही. कारण दोरीच्या जागी त्या क्षणापुरता का होईना पण आपल्याला खरोखरच साप
दिसतो. तो खोटा आहे हे कळत नाही तोवर आपण घाबरुन पळ काढतोच.
या मायेमुळेच आपण आत्म्यावर देहाचा, भावनांचा, अहंकाराचा अध्यास करतो. '
मी लठठ
आहे......मी आंधळा आहे.......मी रागीट आहे ......हे माझे आहे....... हे मला आवडत
नाही....... हे सारे भावाविष्कार म्हणजे आपल्या सच्चिदानंद स्वरुपावर आपण केलेले
आरोप होत......अध्यास होय.
जग आणि ब्रह्म यांच्या नातेसंबंधात शंकराचार्यांनी
हा जो काही सिद्धान्त मांडला त्यालाच 'विवर्तवाद’ असेही म्हटले जाते. तो थोडा विस्ताराने समजावून घेऊ.
कोणत्याही गोष्टीच्या निर्मितीसाठी जो मालमसाला
लागतो त्याला 'उपादान’ कारण
म्हणायचे. ज्या क्रियेच्या
अथवा हालचालीच्या योगाने उपादान कारणात गुणांचा अथवा अवस्थांचा बदल घडून येतो,
ते 'निमित्त’ कारण होय. ब्रह्मच या जगाचे
उपादान कारण व निमित्त कारण आहे. माया ही ब्रह्माचीच शक्ती आहे. ज्याप्रमाणे जादुगाराला त्याच्या जादूची कधीही भूल पडत नाही त्याचप्रमाणे ब्रह्मही
मायेत कधीच अडकत नाही. जग ज्या अर्थी दिसते, भासते, असते त्या अर्थी मायेने ब्रह्मावर
कुरघोडी केली असे मानणारांनी शंकराचार्यांचे माया - ब्रह्माचे विवेचन नीटपणे
समजावून घेतले पाहिजे.
नैयायिकांच्या मते 'कारण व्यापारानंतर कार्य
नव्यानेच उत्पन्न होते. ते पूर्वी नसते. त्याच्या अस्तित्वाला खराखुरा आरंभ असतो’. नैयायिकांचे हे मत 'आरंभवाद या नावाने ओळखले
जाते. सांख्यकार म्हणतात की, 'प्रत्यक्ष उत्पन्न होण्यापूर्वी कार्य हे अस्तित्वात असतेच. पण फक्त
निराळया स्वरुपात’!
सांख्यांचे हे मत 'सत्कार्यवाद’ या
नावाने ओळखले जाते. 'उपादानकारणाच्या घटकांचा संघात दर क्षणाला संपूर्णपणे नष्ट होऊन त्याच्या जागी
दुसरा संघात उत्पन्न होतो’ असे बौद्ध मानतात. या मताला 'संघातवाद’ म्हटले जाते. शंकराचार्यांच्या
अद्वैतवेदान्तालाही 'जे पूर्वी नव्हते ते नव्याने निर्माण होऊ शकणार नाही’ हे सर्वस्वी मान्य आहे. पण
त्याचबरोबर ब्रह्मामध्ये काही परिवर्तन होऊन सृष्टी घडली हे मात्र त्यांना अमान्य
आहे. 'ब्रह्म हे अविकृतच राहते. मात्र त्याच्यामुळे
सृष्टीची प्रचिती येते’ असे
शंकराचार्य मानतात. हा सिद्धान्त 'विवर्तवाद’ या नावाने ओळखला जातो.
क्रमश: भाग ४(२)
खूप सोपं करून सांगितलं आहे तुम्ही हे सगळं, त्यामुळे समजतंय....
ReplyDelete>>यातून ज्या व्यक्तीला साप माहिती नाही, तिला दोरीच्या जागी साप दिसणार नाही, दोरीच दिसेल – अशी व्यक्ती ब्रह्मज्ञानी मानायची का असा एक तार्किक प्रश्न लगेच येईल.
मला वाटतं की, ज्या व्यक्तीला साप माहिती नाही ती ज्ञानामुळे नव्हे तर अज्ञानामुळे त्या वस्तूला घाबरणार नाही. ज्या व्यक्तीला दोन्ही माहिती आहेत, आणि ती व्यक्ती दोरी पाहून लगेच त्याचे साप असे विश्लेषण न करता तिच्याजवळचे दोरी आणि साप यातील फरक ओळखण्याचे ज्ञान वापरेल ती ब्रह्मज्ञानी म्हणता येईल...
Vachun thoda damayla zaala... pan vishay baghta tu baryapaiki sopa karun sangitla aahes
ReplyDelete