ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, April 21, 2026

२८२. 'बोशांको'ची भेट: भाग ३: जुनं कोलकाता

 

अखेर एक दिवस बोलपूरचा मुक्काम संपवून आम्ही कोलकात्याच्या दिशेने निघालो. हा प्रवास ट्रेनचा होता. प्रान्तिक नावाच्या रेल्वे स्थानकावर गेलो. छोटंस स्थानक. तीन-चारच फलाट.
प्रान्तिक रेल्वे स्थानक

गर्दी अजिबातच नाही. प्रान्तिक नावाचा अर्थ शोधताना लक्षात आलं की रवीन्द्रनाथांच्या एका कवितासंग्रहाचं हे नाव आहे. रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांसाठी प्रान्तिक शांतिनिकेतनला जवळ आहे. एका अर्थी शांतिनिकेतनचं हे प्रवेशद्वारच.

हल्ली ट्रेन जशा उशीरा असतात, तशी आमचीही ट्रेन सुमारे दोन तास उशीरा आली. बोलपूरला इतक्या सगळ्या खाद्यपदार्थांच्या जत्रेत झालमुडी मात्र खायची राहून गेली होती. भूक नव्हती तरी मग हौस म्हणून ट्रेनमध्ये झालमुडी खाल्ली. 


धावती भेट

हावडा स्थानकावर देबाहुती आम्हाला घ्यायला आली होती. हावडा रेल्वे स्थानकात काही फलाटांजवळ थेट चारचाकी येऊ शकते, हे मला फार आवडलं. दोन फलाटांच्या मध्ये प्रशस्त रस्ता पाहून मजा वाटली.

हावडा रेल्वे स्थानकात दोन फलाटांच्या मधला रस्ता

स्थानकाच्या बाहेर पडलो. थेट घरी न जाता थोडं फिरून जाण्याचा बेत होता. आणि मग लगेच कोलकातातल्या वाहनांची (इतर कोणत्याही मोठ्या शहरात असते अगदी तशीच) गर्दी दिसायला लागली. हुगळी नदीकडं गेलो. तिथल्या घाटावर काही काळ शांतपणे थांबलो. समोर पसरलेलं पाणी, त्यावर हलकेच उमटणाऱ्या लाटांची हालचाल, आणि त्यामागे उभा असलेला भव्य हुगळी ब्रिज. थोड्याशा अंतरावरून सुप्रसिद्ध हावडा ब्रिज दिसला आणि कोलकात्यात आपण आलो हे जणू अधोरेखित झालं.
हावडा ब्रिज

घाटाला लागून असलेल्या रुळांवरून एक लोकल ट्रेन धडधडत गेली तेव्हा बोलणं थांबवून आम्ही सगळ्यांनी लहान मुलांप्रमाणे ती ट्रेन पाहिली.

नदीत काही मोठाल्या मूर्ती तरंगत होत्या. त्याबद्दल विचारलं असता इथल्या सरस्वती पूजन उत्सवाबद्दल नव्यानेच कळलं. बंगाल म्हणजे दुर्गापूजा हे समीकरण डोक्यात होतं. सरस्वती पूजनाबद्दल मला काही माहिती नव्हतं. वसंतपंचमीच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक रीत्याही सरस्वतीची पूजा होते. इथल्या लहान मुला-मुलींसाठी शिक्षणाचा श्रीगणेशा, मुळाक्षरं शिकण्याची प्रक्रिया वसंतपंचमीच्या दिवशी होते. शाळांमध्ये, महाविद्यालयांत वह्या-पुस्तकांची पूजा होते. सार्वजनिक उत्सवांमधल्या मूर्ती मोठ्या असतात आणि त्या मोठाल्या मंडपांमध्ये असतात. दुर्गा आणि सरस्वती या दोन्ही परंपरांचा संगम बंगालच्या संस्कृतीत झालेला दिसतो.

घाटावरून परतताना दूरवर विधानभवन आणि आकाशवाणीची इमारत दिसली.  या छोट्याशा भटकंतीचा शेवट करताना आम्ही कोलकात्याचा प्रसिद्ध रोल खाल्ला — गरमागरम, मसालेदार आणि अतिशय चविष्ट.

जुनं कोलकाता

कोलकाता. समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा असणारं शहर. एक महिना राहिलं तरी अनेक गोष्टी पाहायच्या राहून जातील इतकं भव्य शहर. माझ्याकडं ते पाहायला फक्त दोन दिवस होते. फारसं समजून न घेता खूप काही पाहता येतं – पण त्या बकाबक पर्यटनाला काही अर्थ नसतो. इथं येण्यापूर्वी देबाहुती आणि अनासुआ यांच्याशी बरीच चर्चा केली होती. त्यातून अर्धा दिवस जुन्या कोलकात्यात (उत्तर कोलकाता) फिरायचं असं ठरलं.

सुबीरदा आमचे वाहनचालक होते. त्यांनी तीन वर्ष सोलापूरच्या मिलमध्ये काम केलं होतं, त्यामुळे त्यांनी आमच्याशी मोडक्यातोडक्या मराठीत बोलायची संधी घेतली. गाईडचं नाव पहिल्यांदा ऐकलं तेव्हा काहीच कळलं नाही – जोगोबोंधो. मग लक्षात आलं की ते जगबंधु आहे. दोन वेगळ्या विचारधारेशी निष्ठा असणारी माणसं आहेत हे पहिल्या दहा मिनिटांतच लक्षात आलं ते एसआयआर (Special Intensive Revision) सारख्या संवेदनशील विषयावरुन. तसंच एक मोहन बगानचा पाठीराखा तर दुसरा इस्ट बंगाल फुटबॉल क्लबचा.

कोलकात्यात भटकताना इडन गार्डन्स, सॉल्ट लेक स्टेडियम, नेताजी स्टेडियम .. अशा अनेक स्टेडियमजवळच्या रस्त्यांवरून गेलो. कोलकात्याचं क्रीडाप्रेम हा एक वेगळाच विषय आहे.

जुन्या कोलकात्यात पहिल्यांदा गेलो ते स्वामी विवेकानंदांच्या घरी.

स्वामी विवेकानंद यांचं घर

१२ जानेवारी १८६३ रोजी या घरात स्वामीजींचा जन्म झाला होता. मोडकळीस आलेले हे घर १९६२ मध्ये रामकृष्ण मिशनने ताब्यात घेऊन त्याचं पुनरूज्जीवन केलं. तिथं आता संग्रहालय आहे, संशोधन केंद्र आहे, भाषा केंद्र आहे, संगणक प्रशिक्षण केंद्र आहे. आम्ही लवकर पोचल्याने संग्रहालय पाहता आलं नाही. एका मोकळ्या जागेत तीन मुलं दोन प्रौढ मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार नृत्याचा सराव करत होती.

विवेकानंदांच्या घराच्या परिसरात एका छोट्या गल्लीत सुप्रसिद्ध गायक मन्नाडे यांचंही घर आहे.

मन्नाडे यांच्या घराच्या गल्लीत प्रवेश करताना

घरात जाता येत नाही. पण आम्ही मराठी आहोत असं कळल्यावर तिथं सध्या राहणाऱ्या गृहस्थांनी एका खोलीची मोठी खिडकी आमच्यासाठी उघडली. तिथं मन्नाडे यांचा फोटो आणि त्यांना मिळालेली विविध पारितोषिकं, स्मृतिचिन्हं वगैरे व्यवस्थित ठेवली होती. याच परिसरातल्या एका इमारतीत मिर्झा गालिब एक वर्ष राहिले होते असं जगबंधु दादांनी सांगितलं. 

परिसरातल्या अनेक घरांमध्ये कालीमाता आणि जगन्नाथ (पुरी) मंदिरं आहेत. अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या ही मंदिरे जपली गेली आहेत. कालीपूजा आणि रथयात्रा यांसारख्या सणांमध्ये या छोट्या मंदिरांना खूप महत्त्व असतं. यातली एक कालीची मूर्ती ही आधी दक्षिणेश्वर मंदिरासाठी तयार करण्यात आली होती, परंतु ती राणी रासमणी यांना आवडली नाही. म्हणून ती मूर्ती इथल्या एका घरगुती मंदिरात आहे असं जगबंधु म्हणाले. पण नंतर शोधूनही मला त्याचा नेमका काही संदर्भ अजून तरी मिळालेला नाही. या परिसरातली मिठाईची दुकानं प्रसिद्ध आहेत. पण आम्ही त्या दुकानांत थांबलो नाही. या एका परिसरात किती इतिहास आहे!

कोलकाता ट्राम

या भागात फिरताना कोलकाताची ट्राम (एकदाची) दिसली. 

१८७३ मध्ये सुरू झालेली इथली ट्राम ही आशियातली सर्वात जुनी ट्राम वाहतूक आहे. सुरूवातीची ट्राम घोडे ओढत असत. १९०२ मध्ये ती इलेक्ट्रिक झाली. १९८४-८५ मध्ये कोलकाता भेटीत या ट्रामने मी प्रवास केल्याची आठवण आहे. मंद गती, वाहतुकीत निर्माण होणारा अडथळा आणि वाहतुकीचे नवनवे पर्याय यामुळे ट्राम आता कमी आहेत. पूर्वी पन्नासपेक्षा जास्त मार्गांवरून चालणारी ट्राम आता फक्त तीन मार्गांवर चालू आहे.

१९८४ मध्ये कोलकातामध्ये सुरू झालेली मेट्रो ही भारततली सर्वात जुनी मेट्रो आहे. जुनी मेट्रो जमिनीखालून होती. आता मेट्रोचं जाळं पाच विविध लाईन्स आणि सुमारे साठ स्थानकं असं विस्तारलं आहे. भूमिगत आणि उन्नत असे दोन्ही प्रकारचे मेट्रो मार्ग आहेत. काही मेट्रो स्थानकांची नावं वाचून थोडा गोंधळ उडाला. उदाहरणार्थ ऋत्विक घटक, कवि सुभाष, गीतांजली, सत्यजित रे ....ही मेट्रो स्थानकाची काही नावं आहेत. या नावाचं मोठेपण वादातीत आहे, पण ते नाव वाचून आपण शहरातल्या नेमक्या कोणत्या भागात आहोत याचा अंदाज नवख्या माणसाला येणं कठीण आहे.

कोलकात्यात प्रवासाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. काही जुने पर्याय अजूनही वापरात आहेत याची जाणीव हे पाहिल्यावर झाली. 

पुढे कॉलेज स्ट्रीटवर यात बसलेले प्रवासी दिसले

कोलकात्याच्या या भागाचं जुनेपण अजून टिकून आहे, आणि म्हणूनच एक प्रकारचा जिवंतपणाही. छोटे रस्ते, जुन्या इमारती, रस्त्यावर चपला बाजूला ठेवून देवाला नमस्कार करणारी माणसं, रस्त्यावरच्या नळावर आंघोळ करणारे पुरुष, रसरशीत ताजा भाजीपाला आणि घासाघीस करणारे ग्राहक, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची चिन्ह मिरवणारी पोस्टर्स , चालत किंवा सायकलवर जाणारे सर्व वयाचे लोक, सामानाच्या पिशव्या हातात घेऊन सावकाश चालत जाणाे लोक ....

जोरासांको ठाकुर बाडी

जोरा म्हणजे जोडी, सांको म्हणजे बांबूचा पूल. पूर्वी या परिसरातल्या ओढ्यावर बांबूचे दोन समांतर पूल होते, म्हणून या परिसराला जोरासांको नाव पडलं असं मानलं जातं. तर कुणी म्हणतं की या परिसरात दोन शिवमंदिरं होती, त्यावरून जोरासांको हे नाव पडलं. बाडी म्हणजे घर. जोरासांको परिसरातलं ठाकुरांचं घर. 

हे आहे टागोर घराण्याचे वडिलोपार्जित घर. १७८४ मध्ये नीलमणी ठाकूर यांनी हे घर बांधलं.

घर कसलं म्हणायचं, प्रचंड मोठी हवेली आहे.

ठाकुर बाडी प्रवेशद्वार

द्वारकानाथ टागोरांनी या घराचा विस्तार केला.  ७ मे १८६१ या दिवशी रवीन्द्रनाथांचा जन्म इथं झाला. त्यांचं बालपण या वास्तूमध्ये गेलं. याच घरात रवीन्द्रनाथांनी अनेक कविता लिहिल्या. याच घरात ७ ऑगस्ट १९४१ रोजी रवीन्द्रनाथांनी अखेरचा श्वास घेतला.

या इमारतीच्या एका भागात १९६१ पासून रवीन्द्र भारती संग्रहालय आहे. या संग्रहालयात पन्नासपेक्षा जास्त दालनं आहेत. एका दालनात टागोर घराण्याचा इतिहास मांडला आहे. रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ आणि वडील देबेन्द्रनाथ यांच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे, त्यांचं कार्य आणि त्या काळातील कागदपत्रं इथं आहेत. एकोणिसाव्या शतकातल्या बंगालमधलं एक प्रभावशील, शिक्षित, आणि श्रीमंत कुटुंब कसं जगत असेल याची एक झलक मिळते.  

एक दालन अशाच प्रकारे रवीन्द्रनाथांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी वापरलेले कपडे, टोप्या, पेन, चष्मा, घड्याळ, चपला ... अशा बऱ्याच वस्तू आहेत.  त्यांच्या अनेक प्रसिद्ध कवितांच्या आणि गाण्यांच्या हस्तलिखित प्रती इथं दिसतात. लिहिताना त्यांनी खोडलेले शब्द आणि त्यातून तयार केलेली चित्रं रोचक आहेत. महात्मा गांधी, अल्बर्ट आइन्स्टाईन आणि इतर जागतिक नेत्यांशी त्यांनी केलेला पत्रव्यवहार आहे, त्यांनी काढलेली चित्रं आहेत. १९१३ मध्ये त्यांना मिळालेल्या नोबेल पारितोषिकाची प्रतिकृती आहे.

मला सगळ्यात जास्त आवडला तो रवीन्द्रनाथांच्या जागतिक प्रवासाचा नकाशा. त्या काळी रवीन्द्रनाथांनी तीसपेक्षा जास्त देशांचा प्रवास केला होता. या मोठ्या नकाशावर टागोरांनी भेट दिलेल्या देशांचे मार्ग आणि तो प्रवास कधी केली याची नोंद आहे. नकाशासोबतच त्यांनी परदेश दौऱ्यात वापरलेल्या वस्तू, पासपोर्ट आणि विविध जागतिक नेत्यांसोबतची त्यांची दुर्मिळ छायाचित्रं आहेत. टागोरांचं जगाचं नागरिक असणं आणि त्यांनी विश्वभारतीची स्थापना करणं यांचा संबंध या नकाशातून काहीसा स्पष्ट होतो.

बाहेर पडताना इमारतीच्या आवारात मोठी रांग दिसली. चौकशी करता ती एसआयआरसाठी असल्याचं कळलं.

बोई पारा

बोई म्हणजे पुस्तक आणि पारा म्हणजे परिसर. बोई पारा – पुस्तकांचा परिसर. कॉलेज स्ट्रीट असं या रस्त्याचं अधिकृत नाव आहे. ही बाजारपेठ केवळ भारतातली नाही तर आशियातली सर्वात मोठी पुस्तकांची बाजारपेठ आहे. इथं महाविद्यालयीन अभ्यासक्रमाची पुस्तकं मिळतात तशीच दुर्मिळ पुस्तकंही मिळतात. 

१८१७ मध्ये या भागात (राजान राममोहन रॉय, डेविड हेअर, आणि अन्य सहकारी यांनी) हिंदू कॉलेजची (आता त्याचं नाव प्रेसिडेन्सी युनिवर्सिटी आहे) स्थापना झाली. साधारण तेव्हापासून पुस्तक बाजार सुरु झाला असं दिसतं. बोई पारा हा सुमारे दीड किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. पुस्तकांची छोटी-मोठी शेकडो दुकानं इथं आहेत. नजर पडेल तिकडं पुस्तकंच दिसतात. रविवार वगळता इतर दिवशी बाजार दिवसभर चालू असतो.   

दहा-पंधरा मिनिटांच्या चालण्याच्या अंतरात खूप महाविद्यालयं, विद्यापीठं दिसली. कोलकाता युनिवर्सिटी, हेअर स्कूल, हिंदू स्कूल, संस्कृत कॉलेज ही सहज आठवणारी नावं. तसंच बंगाल थिऑसऑफिकल सोसायटी, महाबोधी सोसायटीचं भारतातलं मुख्यालय अशाही नामवंत संस्था या परिसरात आहेत. विद्यार्थ्यांची विनोदबुद्धीही दिसली. 

उजवीकडे एका कागदावर कॅन्टीनच्या अन्नाबाबतची तक्रार "Don't make canteen food too oily, USA might invade our campus" अशा खोडकर शब्दांत केली आहे. 


बोई पारा परिसरात गेल्यावर
इंडियन कॉफी हाऊसमध्ये जाणं हे एक शास्त्र असतं, तिथं जावंच लागतं. 

ही जागा बंगाली संस्कृती, राजकारण, आणि साहित्याचं एक ऐतिहासिक केंद्र आहे. १८७६ पासून या जागेत अल्बर्ट हॉल होता. १८७६ मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या 'भारत सभे'चं हे मुख्य केंद्र होतं. १८८३ मध्ये पहिली अखिल भारतीय नॅशनल कॉन्फरन्स याच हॉलमध्ये भरली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अनेक राजकीय सभा या ठिकाणी झाल्या होत्या. इथं साहित्यिक, कलाकार आणि विचारवंतांचे वैचारिक गट एकत्र येऊन चर्चा आणि विचारविनिमय करत असत. रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस, सत्यजित रे, आणि मृणाल सेन यांसारखे दिग्गज या ठिकाणी नियमित येत असत. कोलकात्याची प्रसिद्ध 'अड्डा' संस्कृती इथूनच विकसित झाली.


१९४२ मध्ये 'कॉफी बोर्डा'ने हे हॉल भाड्याने घेतला. तिथं कॉफी हाऊस सुरू केलं. हेच ते इंडियन कॉफी हाऊसजिना चढून जाताना भिंतीवरची चित्रं दिसली. आत गेल्यावर दिसलं ते उंच छत, जुने पंखे, आणि पांढऱ्या गणवेशातील वेटर. रवीन्द्रनाथ, नेताजी, मन्नाडे, सत्यजित रे ... अशा अनेकांची छायाचित्रं आत आहेत. आम्ही गेलो त्यावेळी सुदैवाने फार गर्दी नव्हती. पण आम्हाला जास्त वेळ बसणं शक्य नव्हतं. कॉफी पिऊन निघालो.

या भागात हिंडताना नागरी हक्कांबाबत आंदोलन करणाऱ्या संस्थां-संघटना-लोकांसाठी अजूनही जागा शिल्लक आहे असं दिसलं. गर्दी जमण्यापूर्वी आंदोलनाची इतकी जय्यत तयारी – अगदी पोलिसांच्या वाहनासह – पाहता आली.

व्हिक्टोरिया स्मारक

ही कोलकात्यातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि भव्य वास्तू आहे. ब्रिटिश काळात राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ १९०६ ते १९२१ या काळात तिचं बांधकाम करण्यात आलं. पांढऱ्या संगमरवरी दगडात ही इमारत उभारलेली आहे. तिच्या रचनेत ब्रिटिश आणि भारतीय वास्तुकलेचा संगम दिसतो. इथं आतमध्ये एक मोठं संग्रहालय आहे. मला हे संग्रहालय पाहायला आवडलं असतं, पण हातात तेवढा वेळ नव्हता त्यामुळे बाहेरच्या फेरफटक्यावरच समाधान मानावं लागलं.

सुमारे चौसष्ट एकर परिसरात हे स्मारक उभं आहे. मुख्य संगमरवरी इमारतीभोवती विस्तीर्ण बाग, पायवाटा, आणि पाण्याचे तलाव आहेत. दुपारी एकच्या उन्हात या तलावांच्या काठी फिरणं सुखद होतं. 

अनेकदा गाईड माहिती देतात, पण ती तपासून घ्यावी लागते. इथं गाईडने आम्हाला दोन गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे गंगेचं (हुगळी नदी) पाणी थेट या तलावांमध्ये आणलं जातं – ब्रिटिशांनी तशी व्यवस्था केली आहे. दुसरं म्हणजे आजही ब्रिटिश सरकार या स्मारकाच्या देखभालीच्या खर्चाचा वाटा उचलतं.

मी घरी आल्यावर इंटरनेटवर या दोन्ही मुद्द्यांवर माहिती शोधली, तर प्रत्यक्षात असं काही नाहीये. या परिसरात एकूण सहा तलाव आहेत. हुगळी नदी स्मारकापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर आहे, पण नदीतून पाणी उचलण्याची काहीही व्यवस्था नाही. तलावांसाठी प्रामुख्याने भूगर्भातील पाणी आणि पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण या पद्धतींचा वापर केला जातो. स्वातंत्र्यानंतर हे स्मारक पूर्णपणे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली आहे. हे स्मारक पश्चिम बंगालच्या राज्यपालांच्या अध्यक्षतेखालील एका स्वायत्त ट्रस्टद्वारे चालवलं जातं. ब्रिटिश सरकार सध्या याच्या देखभालीसाठी कोणताही निधी पुरवत नाही.

गाईडने अशी तद्दन चुकीची माहिती का सांगितली असेल ते कळत नाही. एकदा हे चुकीचं आहे कळल्यावर मला त्यांनी दिलेली इतर माहितीसुद्धा विश्वासार्ह वाटेनाशी झाली. बढाचढाके सांगणं आपल्याकडं अनेकदा दिसतं. असो.

पुढच्या भेटीत या स्मारकातील संग्रहालयात नक्की जाईन.

सेंट पॉल कॅथ्रेडल

हे १९व्या शतकात बांधलेलं एक महत्त्वाचं चर्च आहे. १८४७ साली त्याचं बांधकाम पूर्ण झालं, तेव्हा ते आशियातील पहिलं अँग्लिकन कॅथेड्रल होतं. ब्रिटिश काळात कोलकाता ही राजधानी असल्यामुळे अशा भव्य चर्चची गरज भासली असावी.

ही इंडो-गोथिक शैलीतली इमारत आहे. इंडो-गोथिक शैली म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर — परदेशातून आलेली भव्य बांधकामाची पद्धत आणि भारतातल्या गरजा यांचा संगम. म्हणजे इमारत दिसायला उंच, थोडी टोकदार कमानी असलेली, मोठ्या खिडक्या आणि आकर्षक रचना. हे सगळं युरोपमधून आलेलं. पण तीच इमारत भारतात बांधताना इथलं उष्ण आणि दमट हवामान लक्षात घेऊन काही बदल केले जातात – जसं की जास्त हवेशीरपणा, जाड भिंती, आत थंडावा राहील अशी मांडणी. दिसण्यात परदेशी छटा आणि वापरात पूर्णपणे स्थानिक सोय - हा इंडो-गोथिकचा साधा अर्थ ही इमारत पाहताना छान लक्षात आला.

आतमध्ये काही स्मारकफलक आणि ब्रिटिश काळातील काही व्यक्तींची माहिती वाचायला मिळते. आत काही फलकांवर इतर कॅथेड्रल्सचा संदर्भ दिलेला दिसला, तो नेमका कशासाठी तो कळलं नाही. तिथं शंका विचारावी तर कुणी नव्हतं. फोटो काढून नंतर कुणा योग्य व्यक्तीला दाखवावा म्हटलं तर फोटो काढायला परवानगी नसल्याने तेही जमलं नाही.  मोबाईलला बंदी असल्याने आतमध्ये अगदी शांत वातावरण आहे. अर्थात ही शांतता फार काळ टिकली नाही. कारण चार पाच बस भरून शाळकरी मुलं-मुली सहलीसाठी आलेली दिसली. मग आम्ही तिथून निघालो.

कोलकाता बुक फेस्टिवल

कोलकाता बुक फेस्टिवलला खूप गर्दी होती. त्यात मी माझ्या मैत्रिणींपासून वेगळी पडले. तरीही चिकाटीने एकटीने वीसेक स्टॉल्सवर चक्कर मारली. तिथल्या विक्रेत्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता (पुणे पुस्तक महात्सवाच्या तुलनेत तो अगदी जाणवला). अमाप संख्येने बंगाली पुस्तकं होती, हिंदी जवळजवळ नव्हतीच. एखादं पुस्तक हाताळलं की लगेच कुणीतरी विक्रेता-विक्रेती येऊन त्याबाबत अधिक माहिती सांगायला लागायची. माझी बांग्ला शब्दसंपदा मर्यादित असल्याने ते श्वास घ्यायला थांबले की मी आमि बांग्ला जानि ना म्हणायचे. मग पुढचा संवाद मोडक्यातोडक्या हिंदी-इंग्रजीत व्हायचा. ते मला इंग्रजी पुस्तकं दाखवायचे. नाही म्हणत म्हणत खरेदी झालीच. एक बांग्ला पुस्तकही घेतलं. 

पुस्तक महोत्सवात लेखक-कवी-साहित्यिकांच्या मुलाखती योग्यच आहेत. पण नृत्य, गायन, भाषणं, आणि मुख्य म्हणजे खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल्स नसतील तर गर्दी कमी होईल. आणि पुस्तकप्रेमींना शांततेत पुस्तकं पाहता येतील – असं मला पुन्हा एकदा वाटलं. नेहमीप्रमाणे मी अल्पमतात आहे याची मला जाणीव आहे.

*****

या दीड दिवसाचा विचार केला, तर तो फक्त “ठिकाणं पाहण्याचा” राहिला नाही - तर कोलकात्याला थोडंफार समजून घेण्याची एक सुरुवात झाली. एका बाजूला प्रान्तिकपासून हावडा, हुगळी घाट, सरस्वती पूजनाचा अनुभव; तर दुसऱ्या बाजूला जुन्या कोलकात्याच्या गल्ल्या, घरं, विचारवंतांचा वारसा, आणि पुस्तकांच्या रस्त्यांवरची बौद्धिक चहलपहल — हे सगळं एकमेकांत गुंतलेलं दिसलं. इथं इतिहास फक्त संग्रहालयात बंद नाही, तर तो रोजच्या आयुष्यात, सणांमध्ये आणि लोकांच्या वागण्यात जिवंत आहे. वेळ कमी असल्यामुळे बरंच काही राहिलं, काही गोष्टी अर्धवट समजल्या — आणि काही नव्याने प्रश्न निर्माण करून गेल्या. कदाचित तेच कोलकात्याचं वैशिष्ट्य असावं.