(२८ मे २०१९ या दिवशी मी
फिलिपिन्समधल्या डवाव शहरात राहायला आले. ही लेखमालिका म्हणजे हे शहर आणि हा देश
मला कसाकसा उमजत गेला याची नोंद . हा प्रवास म्हणजे एक शोध आहे, त्यात शाश्वत सत्य असल्याचा कसलाही दावा नाही.
हे शहर अनुभवताना ‘मी म्हणून माझे’ पूर्वग्रह आहेत याची नोंद वाचकांनीही घ्यावी. आणि हो, एक
धोक्याची सूचना : नेहमीप्रमाणेच
हे लेखन ‘डवाव’बद्दल कमी आणि ‘माझ्या’बद्दल जास्त
आहे. 😊)
२७ मे
२७ मे
एकदाची मी फिलिपिन्सला निघाले होते तर. खरं तर मी सत्तावीस मार्चला जाणं
अपेक्षित होतं. पण विजा मिळायला झालेल्या उशिराने पुढचेही बेत बदलत गेले. अर्थात
सहा आठवड्यांऐवजी चांगली चौदा आठवडे सुट्टी मिळाली म्हणून मी खुष होते. सुट्टी
म्हणजे मात्र फक्त निवांतपणा नव्हता. साठेक कामं उरकली – त्यातली काही घरबसल्या
उरकली. पंधरा पुस्तकं (मुख्यत्वे मराठी) वाचली. त्यात काही नवे (मला नवे) लेखकही
मिळाळे, पाच-सहा प्रवास केले. पक्षी पाहिले. फोटो काढले. मुख्य म्हणजे कच्छचं छोटं
रण आणि अजंठा लेणी पाहिली. पुण्यातही आगाखान पॅलेस, राजा केळकर संग्रहालय अशा अनेक
स्थानांना भेट दिली. भरपूर चालले. पस्तीस-चाळीस लोकांना भेटून छान गप्पा झाल्या.
सुमारे साठ वेगवेगळे भारतीय (आणि प्रामुख्याने मराठी) पदार्थ खाल्ले.
लॅपटॉप-किंडल-फोन दुरूस्त्या झाल्या. कॅमेऱ्यातल्या फोटोंचं वर्गीकरण करून झालं. आणि
हो, आरामखुर्चीत निवांत बसले .... वगैरे वगैरे.
पुण्यातून मुंबई विमानतळावर जायचं हेही एक कामच असतं. यापूर्वीचा अनुभव चांगला
असल्याने 'केके ट्रॅवल्स'च्या सेवेचा लाभ
घेतला. वाटेत कारचालकाशी गप्पा झाल्या आणि त्याने लावलेली अनेक नवीन गाणीही ऐकायला
मिळाली. सोबत एकच सहप्रवासी होते. त्यांनी झोपेचा पर्याय निवडल्याने त्यांच्याशी
मात्र फारसं बोलणं झालं नाही.
मुंबई विमातळावर पोचले. टर्मिनल २ वर यापूर्वी मी एकदाच आले होते, तेही २०१४
मध्ये. मागच्या पाच वर्षांत मुख्यत्वे येणंजाणं झालं ते दिल्लीतून. तिथलं टर्मिनल
३ मला आवडतं. मुंबईचं टर्मिनल २ ही मला आवडलं. मोबाईल-लॅपटॉप चार्जिंग पॉईंट्स कमी
आहेत एवढी एकच उणीव मला भासली. बाकी टर्मिनल प्रशस्त आणि मुख्य म्हणजे स्वच्छ आहे.
‘सिंगापूर एअरलाईन्स’ चांगली आहे
असं ऐकून होते. त्यांची सेवा चांगली होती. प्रवासात ‘Bohemian
Rhapsody’ हा चित्रपट पाहिला आणि तो
मला आवडला. विमानाचा आवाज मात्र फारच त्रासदायक होता.
२८ मे
सकाळी साडेसातला विमान
सिंगापूरला पोचलं. माझं पुढचं विमान साडेबारा वाजता होतं. टर्मिनल ३ ला मी आले आणि
पुढचं विमान टर्मिनल दोनवरून होतं. सिंगापूर विमानतळावर एकूण चार टर्मिनल्स आहेत
आणि त्यांना एकमेकांशी जोडणारी स्कायट्रेन आहे. स्कायट्रेनचा अनुभव चांगला होता, मजा
आली.
एअरलाईन्सने मला ‘२० सिंगापूर डॉलर्सचं
ट्रान्झिट व्हाऊचर’ दिलं.
Gift Voucher |
मला ही मार्केटिंगची कल्पना आवडली. मी एरवी विमानतळावर काही खरेदी करत नाही. पण इथं वीस डॉलर्स खर्च करायचे म्हणून मी जरा हिंडले आणि शेवटी हवेच्या झोताने किणकिणणारी ही छोटी घंटा खरेदी केली. ही सोळा (सिंगापूर) डॉलर्सला होती. आणि दुकानात सहा डॉलर्सच्या आतली एकही वस्तू नव्हती. त्यामुळे मी पदरचे दोन-तीन डॉलर्स खर्च करून काहीतरी खरेदी करावी अशी मला तिथल्या विक्रेतीने बरीच गळ घातली. पण मी काही बधले नाही. चार डॉलर्स वाया गेले तर माझं काही बिघडणार नव्हतं – कारण ते डॉलर्स मुळात मी कमावलेले नव्हते. 😊
'सिंगापूर विमानतळ' मी आजवर पाहिलेल्या विमानतळांमधला एक उत्कृष्ट अनुभव म्हणावा
लागेल. प्रवाशांच्या सोयींचा आणि त्यांच्या गरजांचा चांगला विचार करून विमानतळ
चालतो असं म्हणावं लागले. जेव्हा मदत घ्यायची वेळ आली तेव्हा तिथल्या
कर्मचाऱ्यांनी तत्परतेने आणि हसऱ्या चेहऱ्याने मदत केली.
टर्मिनल २ मध्ये मी Orchid Garden आणि Enchanted Garden पाहिल्या.
Enchanted Garden |
Orchid Garden |
गार्डन म्हणजे एक छोटा भाग त्यांनी विकसित
केला आहे. पण एकदम वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटतं. मी या दोन्ही बागांमध्ये काही
वेळ निवांत बसून राहिले. मोबाईल हातात असताना आणि मोफत वायफाय सेवा असतानाही निवांत
बसून राहण्याचा अनुभव चांगला होता. हातात जास्त वेळ असेल तर सिंगापूर विमानतळावरून
मोफत ‘सिटी टूर’ करता येते. माझ्याकडे
तेवढा वेळ नव्हता पण पुन्हा कधी सिंगापूरमार्गे जायची संधी मिळाली तर मी ही टूर
करता येईल अशा पद्धतीने प्रवासाची आखणी करेन हे नक्की.
एका मैत्रिणीचा ‘तिथली बटरफ्लाय गार्डन छान
आहे’ असा निरोप आल्यावर तिच्या शोधात निघाले, ती
टर्मिनल ३ मध्ये असल्याचं कळलं. मग पुन्हा एकदा स्कायट्रेनने प्रवास केला. ही
छोटीशी बाग सुंदर आहे. हजारो फुलपाखरं तिथं आहेत.
Butterfly Garden |
माझ्या विमानाची वेळ होत
आल्याने मी तिथं जास्त वेळ थांबू शकले नाही.
‘कावेरी’ मध्ये
इडली-सांबार खाल्लं आणि कॉफी प्यायले. पानात येईल ते सगळं विनातक्रार खाण्याची सवय
मला असली तरी मलाही आवडीनिवडी आहेत हे इथलं सांबार मला आवडल्यावर माझ्या पुन्हा
एकदा लक्षात आलं. 'सांबार आवडल्याचं' मी आवर्जून सांगितल्यावर तिथं काम करणाऱ्या
दोन्ही स्त्रिया मनापासून हसल्या.
सिंगापूर सोडल्यावर लगेच ‘नभ मेघांनी
आक्रमिले’ अशी स्थिती झाली. अचानक मला आता ‘रडारला आपलं विमान दिसणार नाही की काय’ अशी शंका आली. रडार-विमानं-ढग या नुकत्याच लागलेल्या नवीन
शोधाच्या चर्चेचा हा परिणाम असावा!! पॅसिफिकवरून
उडणं हा एक मस्त अनुभव होता. वरून पाहताना निरनिराळ्या टप्प्यांत पाण्याचे रंग
वेगवेगळे दिसत होते. काही बोटी ‘एकला चलो रे’ म्हणत मार्गक्रमण
करत होत्या तर काही एकमेकींची साथ करत चालल्या होत्या.
पॅसिफिक महासागर |
पृथ्वी म्हणजे जमीन
अशी नेहमीची धारणा मागे पडून पृथ्वी म्हणजे जास्त पाणी आहे हे समजून घेणं महासागर
दूरून पाहताना आपोआप घडलं.
साडेतीन तासांनी डवावोला पोचले. दोनपैकी एकच कन्वेयर बेल्ट चालू होता आणि
हाँगकाँगहून आलेल्या विमानाचे प्रवासी त्यांचं सामान शोधत होते, त्यामुळे अर्धा
तास थांबावं लागलं.
इमिग्रेशनवाल्यांनी काहीच कटकट केली नाही. इथं 'पहिल्यांदा येणं' हा काहीतरी
सवलतीचा मुद्दा दिसतोय. ‘पहिल्यांदा आलात का’ एवढचं विचारून इमिग्रेशनने देशात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब
केलं आणि कस्टमने पण लगेच ‘पुढे जा’ असा आदेश दिला. दिल्लीच्या फिलिपिन्स दूतावासाने दिलेल्या
या बंद लिफाफ्याचं आता काय करायचं आहे हे कळेल कदाचित एक दोन दिवसांनी.
दूतावासाकडून आलेलं सीलबंद पाकिट |
किंबर्लेने आज-उद्या मला बाहेर पडावं लागू नये इतपत सामान आणून ठेवलं आहे. तिने एक कसलातरी अर्ज भरून घेतला आणि माझा फोटोही काढला
तिच्या मोबाईलवर. माझी गृहसखी (housemate) जोआन कार्यालयातून आली. ती केनयाची आहे. मग गप्पा झाल्या. अनोळखी माणसांशी भरपूर गप्पा
मारणं हे माझ्यासाठी नेहमीचं आहे.
२९ मे
प्रवासाचा शीण घालवण्यासाठी म्हणून मला आज सुट्टी होती. खरं म्हणजे मी चोवीस
तासांचा प्रवास करूनही दमलेली नव्हते. पण फार महत्त्वाचा मुद्दा नसेल स्थानिक
लोकांच्या निर्णयावर काही चर्चा करायची नाही हे माझं नेहमीचं धोरण मी अंमलात आणलं
आणि निवांत बसले.
काही काळाने लॅपटॉप आणि मोबाईल दोन्हींची बॅटरी संपत आली. त्यांच्या
चार्जिंगसाठी आवश्यक असलेला adapter माझ्याकडं
नव्हता. कार्यालयाने काल दिलेले पैसे (स्थानिक चलनात) आणि स्थानिक फोनच सिमकार्ड
आणायचं कारचा चालक विसरला होता. त्यामुळे माझ्याकडं स्थानिक चलन नव्हतं. त्यामुळे
बाहेर चक्कर मारायला जाण्यात अर्थ नव्हता. चालत जाता आलं असतं पण रस्ता चुकले तर
परत कसं यायचं हा प्रश्न होता.माझ्या बीएसएलएल इंटरनॅशनल सिमला पुरेशी रेंज
नव्हती. त्यामुळे किंडलची बॅटरी संपत आली होती. इंटरनेट-मोबाईलविना छत्तीस तास
राहण्याचा अनुभव मजेदार होता. या गोष्टींची सवय झाली आहे इतकंच. त्यांच्याविना
आयुष्य कसं जगायचं असतं हे मी फक्त विसरले आहे…
इथलं स्थानिक चलन आहे पेसो. इंटरनेटवर Peso हा शब्द आहे तर प्रत्यक्षात नोटेवर Piso असा शब्द आहे. म्यानमा भाषेतही ‘पैसा’ असा शब्द आहे. जोआन सांगत होती की स्वाहिली भाषेतही ‘पेसा’ (Pesa) हा शब्द वापरला
जातो. भाषांमध्ये बाकी कितीही विविधता असली तरी ‘पैशाची’ भाषा मात्र जगभरात एकच आहे असं दिसतंय.
नंतर काही वेळ टीव्ही पहात बसले. त्यातल्या कार्यक्रमांमधले काही शब्द – ते
स्थानिक भाषेत असले तरी – मला कळत होते त्याचं मला नवल वाटलं. नीट ऐकल्यावर लक्षात
आलं की काही शब्दांवर स्पॅनिश भाषेचा प्रभाव आहे. स्पॅनिश मला येत नाही. पण तिची
बहीण पोर्तुगीज भाषा मी वर्षभर (मोझाम्बिकच्या वास्तव्यात) पुष्कळ ऐकली आहे आणि
बोलायचा-वाचायचा-लिहायचा प्रयत्नही केला आहे. ‘आता इथं
स्पॅनिशच्या निमित्ताने पोर्तुगीजची उजळणी होईल’ या विचारांनी मला एकदम उत्साह आला.
म्यानमामध्ये असताना तिथल्या परिस्थितीमुळे मी ब्लॉग न लिहिण्याचा निर्णय
घेतला होता. आता इथं तशी काही अडचण नाही त्यामुळे परत लिहायला सुरूवात करावी अशीही
कल्पना मनात आली. लिहिण्याचं एक आहे – सराव सुटला की काही सुचत नाही. मी
काबूलबद्दल लिहिलं ते मोझाम्बिकमध्ये असताना. तसंच मी आता इथल्या दिवसांबद्दल
लिहायला सुरूवात केली तर म्यानमातले अनुभवही लिहिले जातील अशी आशा आहे.
रात्री अचानक पाऊस आला.
इथं पाऊस नेहमीच सोबत असणार आहे याचाही आनंद आहे.
३० मे
आज किम मला खरेदीला मदत करायला आली. चार एक तास आम्ही एकत्र होतो तेव्हा
तिच्याकडून बऱ्याच गोष्टी समजून घेता आल्या.
पहिली गोष्ट म्हणजे Davao चा उच्चार मी
करते तसा डवावो नसून ‘डवाव’ असा आहे. तसंच मिंडानाओ (Mindanao) असा उच्चार नसून ‘मिंडनाव’ आहे असंही लक्षात आलं. आम्ही ‘जीपनी’ (jeepney) नावाच्या
सार्वजनिक वाहनाने प्रवास करून मॉलला पोचलो. आपल्याकडच्या सहा आसनी रिक्षांसारखी
पण जास्त प्रवासी नेण्याची क्षमता असलेली ही सार्वजनिक व्यवस्था. त्यांचे ठरलेले
मार्ग आहेत आणि तशी पाटी (बसवर असते तशी) या जीपनीवर असते. किमान भाडं आठ पेसो
आहे, पुढं टप्पे वाढतील तसतशी भाड्यात वाढ होते.
डवाव शहर मोठं आहे. रस्ते रुंद आहेत, काही ठिकाणी कामामुळे ते खोदलेले होते.
ठिकठिकाणी सिग्नल आहेत. रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहनं चालतात. रस्त्यांना नावं
आहेत. एका ठिकाणी आम्ही जीपनी बदलली तेव्हा विद्यार्थ्यांचा एक मोठा गट आमच्यासोबत
होता. त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्या. फिलिपिन्समध्ये एक गोष्ट सोयीची आहे – ते
म्हणजे अनेक लोक इंग्लिश भाषा बोलतात. त्यामुळे संवादात अडचण येण्याची शक्यता कमी
आहे. हळूहळू कळेलच म्हणा.
'जी मॉल' नावाच्या एका मोठ्या मॉलमध्ये आम्ही गेलो. फिलिपिन्समधली माझी ही पहिली
खरेदी.
माझी पहिली खरेदी |
शब्दकोष आणि एक गोष्टीचं (लहान मुलांसाठीचं) पुस्तक. आता वाचेन ते.
किमने नवं सिमकार्ड आणलं होत – Globe कंपनीचं. ते मॉलमधल्या
एका दुकानात मोबाईलमध्ये बसवून घेतलं आणि तिथल्या मोफत वायफायचा उपयोग करून मी
सर्वांना ‘मी मजेत आहे’ हे सांगितलं.
मग मी आणि किम जेवलो. उपाहारगृहांत भरपूर गर्दी होती. शाळांना सुट्टी असल्याने
पालकांसमवेत मुलं-मुलीही मोठ्या संख्येने दिसत होते. मी भात आणि भाजी खाल्ली. जेवण गरमागरम होतं त्यामुळे बरं वाटलं. मग आवश्यक गोष्टींची
खरेदी उरकेपर्यंत तीन वाजले. मग हॉट चॉकलेटसोबत बिबिंगा (Bibingka) हा पदार्थ खाल्ला.
Bibingka |
भाताच्या पीठात साखर किंवा गूळ आणि नारळ घातलेला हा गोड पदार्थ मला आवडला.
बिबिंगाचे अनेक प्रकार दिसले. या पदार्थाची रेसिपी आता शोधून काढते.
अजून मी कार्यालयात गेलेली नाही आणि बाकी सहकाऱ्यांना भेटले नाही कारण ते
सगळेजण एका प्रशिक्षण कार्यक्रमात आहेत, दरम्यान कार्यालयाने मला वाचण्यासाठी अनेक
कागदपत्रं पाठवली आहेत. आज ते वाचून काढते.
३१ मे
आज एकदाची मी कार्यालयात आले. बाकीचे व्यग्र असले तरी जोआन मोकळी होती, त्यामुळे वायफाय पासवर्ड वगैरे शोधण्यात काही अडचण आली नाही. घरापासून चालत वीस मिनिटांच्या अंतरावर आहे कार्यालय. त्यामुळे रोज चालणं होईल.
दुपारी जवळच एके ठिकाणी जेवायला गेलो. तिथलं मेन्युकार्ड पाहून काहीच कळेना.
मग वेटरशी बोलून एक पालेभाजी आणि भात खाल्ला.
आता उद्या-परवा सुट्टी. घर लावायचं काम, साफसफाई आणि किंडलवर पुस्तक वाचणे असा कार्यक्रम डोक्यात आहे. घरात इंटरनेट फारसं चालत नसल्याने भरपूर रिकामा वेळ हाती येतो आहे तर 😊
३१ मे
आज एकदाची मी कार्यालयात आले. बाकीचे व्यग्र असले तरी जोआन मोकळी होती, त्यामुळे वायफाय पासवर्ड वगैरे शोधण्यात काही अडचण आली नाही. घरापासून चालत वीस मिनिटांच्या अंतरावर आहे कार्यालय. त्यामुळे रोज चालणं होईल.
दुपारी जवळच एके ठिकाणी जेवायला गेलो. तिथलं मेन्युकार्ड पाहून काहीच कळेना.
मग वेटरशी बोलून एक पालेभाजी आणि भात खाल्ला.
आता उद्या-परवा सुट्टी. घर लावायचं काम, साफसफाई आणि किंडलवर पुस्तक वाचणे असा कार्यक्रम डोक्यात आहे. घरात इंटरनेट फारसं चालत नसल्याने भरपूर रिकामा वेळ हाती येतो आहे तर 😊
'जीपनी'फिरलीस?!!! आपल्या जळगाव, आंबेगाव या "गावांचं" स्पेलिंग पण Gao or gaon असं करतात. तसंच 'डवाव' पण वाटतंय!
ReplyDelete"पैशाची भाषा" आवडलं! अजून लिहीशीलच आता!
'जीप'नी नाही, 'जीपनी'ने!
Deleteबिंबिंगका हा एक पोर्तुगिज पदार्थ आहे. आपल्या गोव्यात पण बनवतात. खरे तर पोर्तुगिज आणि गोवन संस्कृतीचे मिश्रण आहे हा पदार्थ. मंद अचे वर नारळाच्या करवंटी पासून केलेल्या निखाऱ्यावर भाजतात.
ReplyDeleteइथला Bibingka गोवा-पोर्तुगीजमधून आलेला नाही अशी माहिती मिळाली. थोडा शोध घेते अजून.
Deleteतुझा ब्लॉग खूप आवडला. फोटो पण छान.तू परत लिहायला सुरूवात केलीस म्हणून छान वाटलं - वंदना
ReplyDeleteधन्यवाद. लिहायचा विचार तर आहे, किती जमतंय ते कळेल लवकरच.
Delete