“आमच्या कमिटीचा एक फोटो काढता का?” एका वृद्ध सरदारजींनी मला विचारलं.
मी फोटो काढला.
मी गावातल्या माणसांचे फोटो काढते तेव्हा त्यांना ते लगेच दाखवते – तसाच हाही
दाखवला.
ते सगळे खूष झाले एकदम.
आजोबांनी तर मला ‘देव तुझ भलं करो’ अशा थाटाचा आशीर्वादही दिला.
“हा फोटो मी तुम्हाला कसा पाठवू” मी विचारलं. त्यावर ते सगळे
गोंधळले, एकमेकांकडे पहायला लागले.
“ठेव तुझ्याकडे आमच्या गुरुंची;
आमच्या धर्माची आठवण म्हणून” आजोबांनी निर्णय दिला. सगळ्यांनी मान डोलावली.
पोस्टाने पाठवते फोटो, ई-मेलने पाठवते.... असले विचार मी मनातच ठेवले.
****
खूप वर्षांपूर्वी कधीतरी दुस-या राज्यातल्या कोणीतरी ‘ये सावित्रीबाई कौन थी?’
असं मला विचारलं होतं, तेव्हा मला राग आला होता –शिकल्यासवरल्या माणसांना काही
माहिती नसतं म्हणून! त्यानंतर कामानिमित्त मला भरपूर भटकता आलं – उत्तराखंडपासून
कन्याकुमारीपर्यंत आणि अरुणाचलपासून गुजरातपर्यंत. या सगळ्या प्रवासात आपल्याला
आपला देश किती कमी माहिती आहे हे पुन्ह्पुन्हा लक्षात आलं. पण त्यामुळे एक नक्की
झालं - आपलं जग दुस-या कोणाला माहिती नसलं, तर ते त्यांचं घोर अज्ञान ....आणि
आपल्याला दुस-या कोणाचं जग माहिती नसलं, तर ते मात्र स्वाभाविक – अशा मानसिकतेतून
मी बाहेर पडले – निदान असं मला तरी वाटतं.
परवा चंदीगडकडून सिरसाला निघालो तेव्हा आधीच उशीर झालेला होता. सकाळची मीटिंग
अपेक्षेपेक्षा लांबली होती. पण त्यात अनेक मुद्दे - जे मला सांगायचे होते त्यावर
चर्चा झाली होती, निर्णयही झाले होते त्यामुळे समाधान होतं. पण या सगळ्याच्या नादात
एरवी शहराकड मी ज्या पद्धतीन पाहते, त्यावर विचार करते त्यासाठी वेळ मिळालेला
नव्हता.
प्रवास सुरु झाला तेव्हा मग फोनही सुरु झाले. फोन हे असं एक साधन आहे की
ज्याद्वारे आपण समोर जे आहेत त्यापेक्षा समोर जे नाहीत त्यांच्यासाठी असतो. पण मला
मी ज्यांच्याबरोबर असते - त्यांच्यासाठी
वेळ द्यायला आवडतं. सकाळपासून फोन ‘शांत’ (silent mode) ठेवला होता तो मी – त्यावर अनेकांच्या हाका (missed calls) दिसल्या – मग
त्यांच्याशी बोलणं झालं. या नादात आम्ही एक तासभर तरी पुढे आलो होतो पतियाळाच्या
दिशेने.
सगळ काम आटोपून मी जरा निवांत झाले. रस्ता मस्तच होता – खड्ड्यांविना. बरीच
गर्दी दिसत होती. ट्रॅक्टरमध्ये बसून जाणारी माणसं दिसत होती अनेक. आधी मला वाटलं शेतमजूर असतील. पण ते थकलेले दिसत नव्हते, उलट मजेत बसले होते. म्हणून वाटलं लग्नाचं व-हाड असेल. पण असे एकामागून एक ते दिसतंच राहिले तेव्हा प्रकरण काहीतरी वेगळं आहे
हे लक्षात आलं. दरम्यान रस्त्यात लाल झेंडे फडकवत अनेक ठिकाणी तरुण मुलं गाडया थांबवायचा
प्रयत्न करत होती. तिथ मोठे मंडप दिसत होते आणि ध्वनिवर्धकावर काहीतरी चालू होतं –
काही ठिकाणी बोलणं तर काही ठिकाणी गाणी! लक्ष देवून ऐकलं तर संदर्भाने आता मला
पंजाबी कळतं – पण आम्ही सतत पुढे जात होतो त्यामुळे नीट समजून घेता येत नव्हतं. पण
रस्ता अडवून गावगुंडांनी गणपतीची, साईबाबाची, नवरात्राची, होळीची, जीर्णोद्धाराची
वर्गणी मागण्याचा (खरं तर वसूल करण्याचा) आपल्या महाराष्ट्रातला नेहमीचा अनुभव.
त्याच प्रकारचं हे काहीतरी असणार असं समजून मी सोडून दिलं.
दोनशेवा ट्रॅक्टर पाहिल्यावर मी सोबत असलेल्या गृहस्थांना विचारलं – इतके सगळे
लोक कुठून कुठे चाललेत म्हणून. त्यावर काका (हे आमच्या वाहनचालकाचं नाव. पंजाबीत
काका म्हणजे ‘छोटा’ हे नव्यानंच समजलं) म्हणाला – “ते सगळे फतेहगड साहिबवरून
येताहेत.” महिन्याभरापूर्वी मी फतेहगड साहिबच्या परिसरात जाऊन आल्यामुळे मी माझ ज्ञान
पाजळलं – ‘हो, तिथं एक मोठं गुरुद्वार आहे ना. तिकडे काय आहे आज?”
मग त्याने मला सांगितलं की गुरु गोविंदसिंहाच्या दोन कोवळ्या मुलांना आणि गुरुंच्या
आईला जिथं कैद करून ठेवलं होतं आणि त्या दोन मुलांनी धर्मांतर करण्यापेक्षा क्रूर
मरण स्वीकारलं होतं (ही घटना १७०५ मधली) तो परिसर आता फतेहगड साहिब गुरुद्वार या
नावाने ओळखला जातो. त्या ठिकाणी २८ डिसेंबरला मोठा कार्यक्रम असतो. हे सगळे ट्रॅक्टरमधले लोक तिथल्या कार्यक्रमातून आपापल्या गावी परत जात होते. ते अर्थातच स्वखर्चाने
गेले होते. त्यांना बोलावणं कोणा व्यक्तीचं नव्हतं तर गुरुंचं होतं, धर्माचं होतं. या ट्रॅक्टरची मोजदाद करायचं मी सोडून दिलं. सगळा पंजाब आज वेगळ्या भावनेत होता तर!
धर्मात (ती नीट वापरली तर) समाजाला प्रेरित करण्याची, बांधून ठेवण्याची किती अफाट
ताकद आहे हे जाणवून मी स्तब्ध झाले होते.
पण मग रस्त्यावर गाड्या अडवून हे तरुण काय करत होते आजच्या पवित्र दिवशीही?
आणि एक दोन ठिकाणी नाही तर दर दोन मैलांवर? मी काकाला विचारलं.
काका म्हणाला, “तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हे तरुण मागत काही नाहीत. आज साहिबजाद्यांच्या(फतेहसिंह
आणि झोरावरसिंह ही ती गुरु गोविंदसिंहांची
दोन मुलं) स्मरणार्थ गावागावात लंगर आहे. ते आपल्याला थांबून प्रसाद घ्यायचा आग्रह
करताहेत.”
नीट माहिती न घेताच त्या मुलांबद्दल मत बनवण्याची चूक मी केल्यामुळे मी जरा
खजील झाले. काका म्हणाला, “आमच्या गावात पण असतो मोठा लंगर. पण आता आज मी तुमच्याबरोबर आहे ना, मग राहून
गेलं ते ...”
मी काकाला म्हटलं, “थांबू आपण एका गुरुद्वारात. तिथं प्रसाद घेऊ आणि पुढे जाऊ.”
“उशीर तर नाही व्हायचा आपल्याला
पोचायला?” त्यानं साशंकपणे विचारलं. पण सिरसात जाऊन पोचायचंच होतं फक्त आज रात्री – काम
उद्या होतं. अर्धा तास उशीरा पोचल्याने काहीच फरक पडणार नव्हता.
संगरूर जिल्ह्यात प्रवेश करून एका गुरुद्वारासमोर आमची गाडी थांबली. आम्हाला
दहा तरुणांनी वेढा घातला. त्यांच्या हातात चहा होता, पुरी होती, हलवा (शिरा) होता,
बरेच पदार्थ होते. खरं तर आत जावून बसून जेवायची व्यवस्थाही होती – पण ज्यांना ते
करायला वेळ नसतो त्यांच्यासाठी ही ‘जलद सेवा’ होती. मी न मागताच हलव्याचा द्रोण
माझ्या हातात आला, चहाचा ग्लासही आला. एक प्रौढ सरदारजी आमची चौकशी करायला आले.
काकाने सांगितलं असणार त्यांना मी दिल्लीतून आले आहे वगैरे – कारण दोन मिनिटांत
ध्वनिवर्धकावरून मला माझ ‘स्वागत’ ऐकू आलं.
मला ते वातावरण विलक्षण वाटलं. ‘देण्याघेण्याच्या’ जमान्यात कोणीतरी कोणाला फक्त
देत असलं की मला कौतुक वाटतं. मी सरदारजींशी गप्पा मारायला सुरुवात केली. साहिबजाद्यांच्या
बलिदानाच्या स्मरणार्थ दर वर्षी २७, २८ आणि २९ डिसेंबर असे तीन दिवस या गावात लंगर
चालतो. एक समिती नेमली जाते – जी देखरेख करते. पण मुख्य काम करतात ते शेकडो –
हजारो स्वयंसेवक – कारसेवक. किती माणसं तीन दिवसांत जेऊन जातात याची काही गणती
नाही. मागच्या वर्षी चार लाख खर्च आला होता. हा सगळा खर्च गावातले लोक
स्वयंप्रेरणेने करतात. पैसा येतो, गहू येतो, साखर येते, लाकडं येतात, भाजी येते,
सामान येतं .... राबायला माणसंही येतात. इथं राबायला हा शब्द चुकीचा आहे खर तर – सेवा
करायला म्हणायला पाहिजे.
“एक फोटो काढला तर चालेल का?” मी विचारलं. मी फोटो काढल्यावर
सगळेजण परत माझ्याकडं पहायला लागले. मग आणखी दोन सरदारजी आले. म्हणाले, ‘चला,
तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवतो.” मग ते मला आत घेऊन गेले – जिथं पदार्थ शिजत होते. वेगेवेगळे विभाग होते आणि
शिस्तीत काम चाललं होतं – आरडाओरडा नाही. स्वच्छता होती. मी शिरा बनवणा-याचा फोटो काढला. मग पोळया बनवणा-या
विभागात गेलो – तिथ प्रामुख्याने बायकाच काम करत होत्या. “यांचा पण काढा फोटो” सरदारजींनी मला हुकूम सोडला.
त्यांचा स्वर प्रेमळ होता त्यामुळे मी त्यांचं ऐकलं लगेच. दहा मिनिटांनी आम्ही
निघालो, तोवर रात्रीचं जेवण त्यांनी आम्हाला बांधून दिलं होतं.
वर उल्लेख केलेला कमिटीचा फोटो निघताना अगदी शेवटी काढला.
त्यावर मी विचार करत राहिले आणि लक्षात आलं की हा सगळा अनुभव त्यांना काही ‘देण्यासाठी’
नव्हताच मुळी .... तो माझ्यासाठी होता....मला काही समजावून सांगणारा ...
मी लक्षात ठेवावी धर्माची सकारात्मक ताकद ...
मी विसरून जाऊ नये माणसांचं साधेपण ...
मी मत बनवू नये अर्धवट माहितीच्या आधारे ...
मी ठेवावी इतिहासाची जाण....
मी कुठेही असले तरी फटकून राहू नये समाजाशी कधीही ....
एक धागा आहे या सगळ्याचा माझ्या जगण्याशी ...
तो अतूट ठेवणं ही माझीही जबाबदारी आहे.
आजचा माझा दिवस सुंदर केला या पोस्टनं :)
ReplyDeleteगौरी, :-) अनुभव आहेच तसा तो!
ReplyDeleteफारच छान! खरंय असे अनेक धागे आहेत, डोळसपणे बघायला हवं.
ReplyDeleteफोटो हुमायूच्या tomb चा का? छान आहे.
एक धागा आहे या सगळ्याचा माझ्या जगण्याशी ...
ReplyDeleteतो अतूट ठेवण ही माझीही जबाबदारी आहे.
+100000000000
पोस्टगणिक माझी इच्छा प्रबळ होतेय. :)
अप्रतिम अप्रतिम पोस्ट !!
ReplyDeleteप्रीति, हं, डोळसपणा हा एक चांगला शब्द आहे.
ReplyDeleteभाग्यश्री, किती सगळी शून्य ... फक्त घोटाळ्याच्या बातमीत पहायला मिळतात ती आजकाल :-)
ReplyDeleteहेरंब, आभार पुन्हा एकदा.
ReplyDelete>>‘देण्याघेण्याच्या’ जमान्यात कोणीतरी कोणाला फक्त देत असलं की मला कौतुक वाटत.
ReplyDeleteअगदी अगदी...
खूप खूप छान पोस्ट , अनुभव....बरच शिकवून जाणारा नेहमीप्रमाणे...
अपर्णा, आभार.
ReplyDeleteअप्रतिम सुंदर पोस्ट ......
ReplyDeleteखुप छान पध्दतीने मांडले आहे सारे........ टिपलेले... !
Unique Poet, तुम्हाला हा लेख आवडला हे वाचून आनंद झाला. स्वागत आहे तुमच.
ReplyDeleteअनुभव आणि त्यातून घेतलेले धडे आवडले. आयुष्यात घडलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या घटनेवर सखोल विचार करणारा तुझा स्वभाव मला फार आवडतो. त्यातून तुझी संवेदनशीलताच दिसून येते.
ReplyDeleteस्मिता, :-)
ReplyDeleteएखाद्या ब्लॉगवरचे सगळे जुने लेख वाचायला भरपूर चिकाटी लागते - ती तू दाखवते आहेस म्हणून विशेष आभार.
नमस्कार सविताताई!
ReplyDeleteतुमची अनुदिनी वाचतोय.
खरंच शिखांच्या सेवावृत्तीला मानलं बुवा. इथे जवळंच लंडनमध्ये एक गुरुद्वारा बेघरांसाठी स्थानिक (=लोकल) अन्नछत्र चालवतं. बाकी कोणी म्हणजे कोणीही बेघरांना विचारंत नाही. पण शीख मात्र आवर्जून त्यांना खायला देतात. अगदी बेघरांच्या वस्तीवर खाणं पोहोचवतात सुद्धा. सेन्ट्रल लंडन पासून गुरुद्वारा बरंच दूर आहे. तेव्हा काही तरुण चक्क व्हॅन चालवंत अन्न आणतात. दोन तीन तास व्हॅनवर जेवण वाटप करीत असतात. थंडी असो वा पाऊस असो वा हिमवर्षाव. नेम कधी चुकला नाही. खरोखर गुरूंचा महिमा अपार आहे.
आपला नम्र,
-गामा पैलवान